सबंध घरात तिला ‘मामी’ म्हणत. खरे म्हणजे तिला मामी का म्हणत, कोण जाणे! वास्तविक ती मुलांची होती मावशी. मुलांच्या आईची होती बहीण आणि मुलांच्या वडलांची मेहुणी! तिला सर्वांनी मावशी म्हणायला हवे होते, किंवा अक्का, माई असे तरी म्हणायला हवे होते. पण मुलांची आईसुद्धा तिला ‘मामी’ म्हणे म्हणून मग सर्वच तिला ‘मामी’ म्हणत. नात्यातली माणसे, गावातली माणसे-सारीच म्हणत, ‘काय, मामी आहेत का घरात?’
‘मामी’ म्हटले की, आपल्यासमोर जरा थोराड देहाचीच बाई उभी राहते. पण ही मामी अगदी एवढीशी होती. एखाद्या बाहुलीसारखी होती. आपल्याच हाताची करंगळी समोर धरावी आणि तिला म्हणावे, ‘मामी!’