Skip to main content

रात्री ९.३०ला चालू झालेली मिटिंग संपेस्तोवर बारा वाजून गेले. खुर्चीवर मागे रेलत उत्तरानी हाताची बोटं एकमेकात गुंतवून आळस दिला आणि ती तशीच बसून राहिली. दोन मिनिटं डोळे बंद करून घेत तिनं कामांची उजळणी केली. समोरच्या लॅपटॉपवर हवा तो फोल्डर कॉपी झालेला आहे याची खात्री करून घेऊन मग तिनं तोही बंद केला. टेबलवरचा सेलफोन पर्समध्ये टाकला आणि ती लिफ्टनी पार्किंगमध्ये आली. बेसमेंटमधल्या बंद पार्किंगमध्ये लिफ्टच्या दाराचा आवाज घुमल्यावर रामदिन तयार होऊन थांबला. उत्तराला पाहिल्यावर रामदिन गाडी घेऊन लगेचच तिच्याजवळ आला . आलिशान गाडीच्या मागच्या सीटवर उत्तरा बसल्यावर रामदिननं गाडीला वेग दिला.
फ्लॅटवर पोहोचेपर्यंत दोन वाजत आलेले होते. लॅपटॉपची बॅग घेऊन रामदिन वरपर्यंत आला. त्यानी बेल वाजविल्यावर सगुणाबाईंनी दार उघडलं. आत सगळीकडचे मंद दिवे चालू होते. पाठोपाठ येणार्‍या उत्तराला त्या दिव्यांनी खूप बरं वाटलं. ट्यूबलाईटच्या कोरड्यापांढर्‍या प्रकाशापेक्षा या मंद पिवळ्या प्रकाशात नक्की काहीतरी वेगळं असतं की ज्यामुळे मनाला खूप आधार वाटतो असं उत्तराच्या मनात येऊन गेलं.
‘‘गुडनाईट सगुणाबाई’’ असं सांगत उत्तरा बेडरूमकडे वळली. बेडच्या साईड टेबलवर दुधाचा ग्लास भरून ठेवलेला होता. शेजारीच गोळी ठेवलेली. बेडवर नाइटी ठेवलेली होती. उत्तरानी पर्समधला सेलफोन चार्जिंगला लावला. समोरच्या सिस्टीम मधली सीडी पाहिली. संतूरवर यमन होता. ती सीडी हलक्या आवाजात चालू केली. मग बेडरुमचं दार बंद करून घेऊन ती बाथरूममध्ये वॉश घ्यायला गेली. कढतकढत पाण्यानी तिचा दिवसभराचा सगळा शीण तिनं जणूकाही त्या पाण्यात वाहवून टाकला. आणि मग ताजीतवानी होत ती बेडजवळ आली. लॅपटॉप ऑन करीत तिनं सकाळी करायचं प्रेझेंटेशन पुन्हा एकदा तपासून पाहिलं. एक दोन किरकोळ चुका दुरुस्त करीत तिनं पुन्हा एकदा स्वतःची खात्री करून घेतली आणि मग ती बेडवर शांतपणे आडवी झाली. हातातल्या रिमोटने सीडीचा आवाज कमी करीत तिनं फोनचं आन्सरिंग मशीन चालू केलं. बरेचसे ब्लँक कॅाल्स आणि दोन-तीन किरकोळ निरोपानंतर तिला अचानक एक वेगळाच आवाज ऐकू आला. खूप ओळखीचा, पण खूप वर्षांनी ऐकायला आलेला . एकदम उठून मशीन पुन्हा एकदा सेट करून ती सावरून बसली. आणि तोच आवाज पुन्हा एकदा ऐकायला यायला लागला.
‘‘उत्तरा, रात्रीचे बारा वाजून गेले आहेत. म्हणजे खर्‍या अर्थाने नवा दिवस चालू होतोय. आज म्हणजे खरं तर कालच्या बिझिनेस न्यूजमध्ये तुझा फोटो आणि मुलाखत वाचली, आणि मग तुझेच विचार मनात आले. आणि सहज आठवलं, आज आषाढातला पहिला दिवस. सो? अ वेरी हॅपी बर्थ डे टू यू! म्हणजे अर्थात तिथीनं! बाय द वे, आवाज ओळखलास? उदय. बाय!’’ उत्तरानी आन्सरिंग मशीन बंद केलं. यमनातल्या समेवर येताना डग्गा घुमला आणि उत्तरा स्वतःच्याच विचारात गढून गेली. अनपेक्षितपणे आलेला उदयचा फोन तिला तिच्या इन्स्टिट्यूटच्या दिवसांकडे घेऊन गेला. तो सपाटून केलेला अभ्यास. हॉस्टेलचे दिवस. कट्ट्यावर तासनतास घातलेले वाद. ती मॉक प्रेझेंटेशनस्, ते रोल प्लेज, प्रोजेक्ट्स.... इन्स्टिट्यूटचं वातावरणच असं काही भारलेलं होत की जणू काही त्याच्या बाहेरच्या सगळ्याचा विसर पडावा. जुन्या मोठ्या दगडी इमारती, प्रशस्त वर्ग, कॉरीडॉरमधल्या मोठ्या कमानी, आजूबाजूला असणारी हिरवीगार झाडी, तिथला शांतपणा, या सगळ्याची आठवणसुद्धा तिचं मन प्रसन्न करून गेली. मग अचानक तिला जाणवलं की आठवणींचा हा प्रवास आज उदयच्या फोनमुळे झाला. ‘उदय.’ तिचा वर्गमित्र. चार चौघांसारखाच. पण त्याचं सगळं वेगळेपण त्याच्या डोळ्यात दिसायचं. एखाद्या बंगाली माणसासारखे त्याचे मोठे डोळे पटकन लक्षात राहायचे. नेमकं आणि मोजकच बोलायचा. बॅचमधल्या कुठल्या मुलीच्या ना तो प्रेमात पडला ना कुठली मुलगी त्याच्या प्रेमात पडली. शेवटच्या वर्षी कॅम्पस प्रोग्राममध्ये गोल्डस्टारनी त्याला निवडलं आणि सगळ्यांनाच त्याचा हेवा वाटला. परमीत, इशा, सब्यासाची ही सगळी तेव्हाची स्कॉलर मंडळी एकदम जमिनीवर आली. ‘गोल्डस्टार’ या नावाचाच महिमा तसा होता. मल्टीनॅशनल कंपनी, प्रोफेशनल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ग्रोथ! करिअर ग्रोथ! नंतर काही दिवस कुठल्या ना कुठल्या सेमिनारमध्ये उदयचं नाव ऐकू यायचं. आणि मग गेली काही वर्ष मात्र अज्ञातवासात गेल्याप्रमाणे त्याचं कुठेच काही नाव येईनासं झालं. उत्तराला अचानक जाणवलं, खरंच, आपण त्याची काहीच कशी चौकशी केली नाही? रोजच्या कामाच्या ताणात खरंच आपण एवढे विसरून गेलो? विचार करता करता उत्तरा गाढ झोपून गेली. बेडरूम मधला मंद प्रकाश तसाच होता. सिडी प्लेयरचं डिस्प्ले पॅनल त्यातला उत्साह संपल्यासारखं स्तब्ध होतं.
***
नेहमीप्रमाणे पहाटेच उत्तराला जाग आली. थोडा वेळ योगा आणि मेडिटेशन करून तिनं नव्या दिवसाच्या नव्या आव्हानांसाठी स्वतःला तयार केलं. कामांनी गच्च भरलेला दिवस तिच्या डोळ्यासमोर आला. सकाळी असणारं प्रेझेंटेशन, मग त्यावरची चर्चा, मग दुपारची व्हिडिओ कॉन्फरन्स, त्यानंतरची ऑडीट कमिटीची मिटींग, संध्याकाळी नव्या ट्रेनीजच्या इंडक्शन प्रोग्रॅम साठी काही वेळ, मग काही डीसिप्लीनरी ऍक्शनचे अवघड डिसिजन घ्यायचे, काही ट्रान्स्फरबद्दल चर्चा, एक्स्पान्शन प्लान विषयी चर्चा, या सगळ्याचा विचार करता, वेस्ट झोन ची रीव्ह्यू मिटींग संपेपर्यंत पुनः रात्री उशीरच होणार होता. दुसरा काही पर्यायच नाही. विचारांच्या ओघात उत्तरांनी समोर पाहिलं तर समोर सगुणाबाई उभ्या होत्या.
‘‘काय सगुणाबाई? काय झालं?’’ तिनं विचारलं.
सगुणाबाई काही न बोलता नुसत्याच खाली बघत राहिल्या.
‘‘काही प्रॉब्लेम आहे का?’’ उत्तरांनी पुन्हा विचारलं.
‘‘नाही म्हंजी, आज गावाला जायचं बोलले होते मी म्हणून .......
‘‘ेह! चू ॠेव! मी ठार विसरूनच गेले होते. असं कायं बरं सगुणाबाई? काल बोलायचं नाही का मला?’’
‘‘नाही पण , तुमची गडबड चालू होती म्हणून ...’’
‘‘कमाल आहे! माझी गडबड काय आजची आहे का? बरं ठीक आहे. रामदिनला सांगते मी. मला ऑफिसला सोडून मग तो तुम्हाला एस टी स्टॅन्डवर सोडेल.’’
‘‘ठीक आहे ताई.’’
‘‘तुम्ही कधी परवा संध्याकाळी येणार नं?’’
‘‘हो आणि हे पहा, मागे तुम्हाला सांगितलं तसं नीट लक्षात ठेवा. उगाच भावनेच्या भरात भावानी म्हटलं म्हणून कुठल्याही कागदावर सह्या देऊ नका. ती जमीन काही तुमच्या भावाची नाही. वाड-वडिलांकडून आलेली जमीन ती. बहिण म्हणून तुमचाही तेवढाच हक्क आहे. सरळ सांगून टाका भावाला, मी कुठेही सही करणार नाही. कागद आधी माझ्या ताईंना दाखवू , त्यांनी ते वाचू दे, त्या काय सांगतील ते बघू आणि ते जर पटलं तरच सही करीन मी. काय? बरोबर आहे नं?’’
सगुणाबाई क्षणभर शांत बसल्या. मग म्हणाल्या, ‘‘तुमचं पटतंय ताई. पण तिकडं भावाची परिस्थिती वाईट आहे, पदरी तीन पोरी. पोरगा अजून लहान आहे. अशावेळी मदत करायची कि अडवून धरायचं? बहिणीची माया वेडी असते.’’
मनातल्या संतापाला आवर घालत उत्तरा म्हणाली, ‘‘बरोबर आहे, बहिण, मग ती लहान असो व मोठी, तिची माया कायम वेडी असते. आणि भाऊ, मग तो लहान असो कि मोठा, तो नेहेमीच शहाणा असतो नाही का?’’
‘‘तसं नाही ताई, शेवटी रक्ताचं नातं आहे नं!’’
‘‘वा वा! म्हणे रक्ताच नातं! रक्ताच्या नात्याची कर्तव्य फक्त बाईलाच लागू होतात वाटतं? आणि पुरुषांना काय फक्त हक्काची मक्तेदारी दिलीय की काय?’’
सगुणाबाईंना उत्तराच्या संतापाचा आता काहीसा अंदाज आला म्हणून काही न बोलता त्या गप्प राहिल्या.
‘‘मी तुम्हाला सांगते, तुमच्या जागी मी असते न, तर...’’ असं म्हणत उत्तरा स्वतःशीच विचारात पडल्यासारखी गप्प झाली. आपल्या स्वतःच्या बाबतीत आपण जे काही केलं ते योग्यच केलं याबाबत तिला तीळमात्रही शंका वाट नव्हती. बाबा गेल्यावर काही वर्षांनी बंगला पाडून तिथं रीडेव्हलपमेंटचा प्लॅन सौमित्र घेऊन... आला आणि बरोबर सहीसाठी काही कागदपत्रं. ‘सहीचं ठीक आहे, पण यात मला काय मिळणार?’ असा प्रश्न विचारल्यावर त्याला प्रचंड शॉक बसल्यासारखा त्याचा चेहरा झाला. वडिलांच्या घरावर त्याच्याइतका माझाही हक्क आहे हे माझं म्हणणं, त्याला ऍक्सेप्ट करायला जड गेलं. आणि तीर्थरूप आईला तर आवडलंच नाही. मला माझ्या कंपनीनं हा मोठा फ्लॅट दिला आहे. त्यामुळे मला जागेची गरजच नाही. शिवाय कंपनीत मी मोठ्या पोझिशनवर आहे. त्यामुळे मला पैशांचीही काही गरज नसावी. आपल्या इथे नं, खरोखर लोक, लग्न न केलेल्या बाईला विरक्तीचं सर्टिफिकेट जणू काही ऍट सोर्स च देऊन टाकतात!
आपल भरकटलेलं मन उत्तरानं पुन्हा सफाईनं जागेवर आणलं. काही न उमजून सगुणाबाई तशाच उभ्या होत्या. त्यांच्याकडे पाहत उत्तरा म्हणाली, ‘‘ठीकंय! जा तुम्ही! घराची किल्ली घेतली आहे नं बरोबर? माझं म्हणणं एवढंच आहे, जो निर्णय घ्यायचा तो समजून उमजून घ्या. तुमच्या पोरीच लग्न झालंय. तरी तिला तिच्या आजोळचं पण काही मिळू द्या. बाकी तुमचं तुम्ही बघा. मी सांगायचं काम केल.’’
नुसती मान हलवून सगुणाबाई गेल्यावर उत्तरांनी पलीकडे पडलेला पेपर चाळायला सुरुवात केली. सुंदर मनसुखानीच्या कंपनीचे क्वार्टर वन चे रिझल्टस् आलेले होते. ते पाहिल्यावर तिनं कपाळावरचा चष्मा नाकाच्या शेंड्यावर स्थिर केला. त्या सगळ्या आकड्यांवरून नजर फिरवत असताना ती स्वतःशीच समाधानाने हसली. सुंदरची कंपनी गेली दोन वर्षं लॉस मध्ये आहे. यावेळचे रिझल्टस्सुद्धा काही फारसे वेगळे नव्हते. मागच्या वर्षी हिरानंदानीकडच्या पार्टीत सुंदर भेटला होता. तेव्हाच खरं तर त्याला विचारलं होतं, विकतोस का कंपनी तुझी? पण तेव्हा त्याला टर्न अराउंड ची स्वप्नं पडत होती. अर्थात झालं ते एक प्रकारे बरंच झालं. कारण आता अजून किंमत पाडून डील करता येईल. म्हणजे आपला तसा फायदाच आहे. लीगलच्या गोरेला सांगितलं पाहिजे. असा विचार मनात येताच तिनं साईड टेबलवरचा फोन घेऊन टू डू च्या लिस्ट मध्ये हे काम ऍड केलं. आणि मग इतर एंट्रीज चाळत असताना तिला एकदम उदय ला फोन करणे ही एन्ट्री दिसली. जरा थोडा निवांत फोन केला पाहिजे असा विचार करत तिनं घड्याळात पाहिलं. आता भरभर आवरणं आवश्यक होतं. आजचे कार्यक्रम पाहू जाता साडीच नेसावी लागणार होती. वॉर्डरोबचं दार उघडून तिनं आतल्या साड्यांवर नजर फिरवली. ग्रे रंगाची, हिरव्या काठाची, पदरावर बारीक वेलबुट्टी असणारी तिची आवडती सिल्कची साडी तिनं खूप दिवसांनी बाहेर काढली. जणू काही त्या साडीच्या नुसत्या असण्यानी तिचा सगळा मूड बदलल्यासारखी ती पुन्हा उल्हासित झाली. साडी नेसतानेसता स्वतःशीच गुणगुणायला लागली.
***
रविवार असला तरी उत्तराला जाग मात्र नेहमीप्रमाणे पहाटेच आली. पण रविवारची ही पहाट उत्तराला नेहमीच हवीहवीशी वाटते.बेडवरून उठून तिनं समोरचा पडदा जेंव्हा बाजूला सरकवला, तेव्हां बाहेर थांबून राहिलेला प्रकाश अलगदपणे काचेतून आत येऊन बेडरूमच्या कोनाकोनातून रेंगाळला. किंचित आळसावला. मग तिनं मोठी खिडकी उघडल्यावर, हवेतला गारवा तिच्या अंगावरच्या कपड्यातून आत शिरत शरीराला भिडला. त्या गारव्याच्या स्पर्शाला प्रतिसाद दिल्यासारखी तिच्या अंगातून एक शिरशिरी आली. आणि मग नकळत एक दीर्घ श्वास घेतल्यावर सगळा सभोवतालच आपल्या श्वासात सामावून घेतल्याची एक सुखद जाणीव तिच्या मनात तयार झाली. समोरचा रस्ता आज खूप शांत आहे. झोपेत कुस बदलल्यासारखी उगाच थोडीशी हालचाल होते, जेव्हां एखादा सायकलवाला तिथनं जातो तेव्हां. दुधवाले, पेपरवाले यांचीच काय ती जाग आहे. कंपौंडजवळच्या झाडावर बुलबुल इकडून तिकडे उडत एखादी लकेर त्या शांततेवर उमटवत आहेत. अशी सकाळ, संपूर्ण दिवसाचा उचका मनात तयार करत प्रत्येक क्षणाला पुढे ढकलत नसते, तर एखाद्या गवयानं तब्येतीत श्रुतींचं सौंदर्य दाखवत गावं, तशी ती उलगडत जाते असं तिच्या मनात येऊन गेलं.
मोकळ्या सोडलेल्या केसांची वर गाठ मारत उत्तरा बाथरूममध्ये गेली. ती बाहेर येईपर्यंत सगुणाबाईंनी कॉफी आणून ठेवली. बाथरूममधून बाहेर आल्यावर कॉफीचा मग आणि सेलफोन हातात घेत उत्तरा खिडकीजवळच्या खुर्चीत बसली. आणि मग तिचा पुढचा तासभर हा रात्रभरात येऊन पडलेले मेल्स, मेसेजेस बघण्यात गेला. काम करीत असताना मधेच आजच असणारे दोन वाढदिवसांचे अलर्ट तिला दिसले. एक जेनाचा आणि दुसरा भाऊराव देशमानेंचा. कंपनीचा ग्रुप प्रेसिडेंट आणि कामगार नेता यांचे वाढदिवस एकाच दिवशी असण्याची उत्तराला गम्मत वाटली. अर्थात त्या दोघांनाही बुके आजच मिळतील याची व्यवस्था कालच केलेली आहे. भाऊरावांकडे तर बुकेबरोबर खास मोठ्ठं मराठी ग्रीटिंग कार्डसुद्धा पाठवलं आहे. ते भाऊरावांच्या घराबरोबत मनातही नक्की पोचायला पाहिजे. वेज अग्रीमेंट लवकरच आहे. एवढी काळजी तर घ्यायलाच हवी. उत्तरांनी पुन्हा एकदा खिडकीबाहेर पाहिलं. आता त्या सकाळच्या वेळानी थोडा थोडा सूर जमवायला सुरुवात केलेली होती. रस्त्यावरची वर्दळ थोडी वाढलेली होती. पेन्शनरांचा एक ग्रुप हातवारे करत मोठ्यांदा बोलत चाललेला होता. काही हौशी जॉगर्स धापा टाकत पळत होते. वाहनांचे आवाज चालू झाले होते. खिडकीतून येणार्‍या वार्‍याच्या गार झुळुकीनं उत्तराला पुन्हा एकदा खूप बरं वाटलं. काही वेळ ती तशीच शांतपणे डोळे मिटून शांत बसली. अचानक तिला आठवलं, आपण ठरवूनही उदयला फोन नाही करू शकलो. आता मात्र केलाच पाहिजे. उदयचा विचार मनात आल्यावर तिला उगाचच जरा बरं वाटलं. एखाद्या भगभगीत रस्त्यावर अचानक कुठेतरी हिरव्यागार झाडांचा पुंजका दिसून डोळे निवून जावेत तसं काहीसं तिला झालं. आणि मग तिनं उदयला फोन लावला.
‘‘सुप्रभात, विरंदपूर सेवा समिती’’ पलीकडून आवाज आला.
‘‘हॅलो, हा उदय गोवर्धन यांचा नंबर नाही का?’’ तिनं विचारलं.
‘‘थांबा हं मॅडम, सरांना बोलावतो’’ पलीकडून घाईघाईनं उत्तर आलं. हे सेवा समिती काय प्रकरण आहे याचा विचार करीत असतानाच तिला ओळखीचा, उदयचा आवाज आला. किंचित टिपेचा तरीही खूप अनौपचारिक आणि ऐकणार्‍याला खूप आदर देणारा.
‘‘हॅलो, उत्तरा बोलतीय’’
‘‘वाव! काय मस्त सरप्राईझ आहे आज? मागच्या आठवड्यात मेसेज ठेवला होता तुला. पण तुझ्या एकूण रुटीनचा आवाका पाहू जाता तू फोन करू शकशील असं नव्हतं वाटलं. परत माझ्याकडे मोबाईल नाही. पण मस्त! खूप बरं वाटलं, तुझा फोन आला म्हणून! कशी आहेस? बाकी कोण भेटतं? किती वर्षांनी बोलतोय नं आपण? विश्वासच बसत नाही नं?’’
उत्तरा फक्त ऐकत राहिली. त्याचा बोलणं थांबल्यावर ती म्हणाली, ‘‘आता मी बोलू का?’’ यावर उदय नुसता हसला.
‘‘पहिली गोष्ट म्हणजे, थँक्स फॉर द बर्थ डे विशेस! अरे, इतक्या वर्षांत कुणीतरी पहिल्यांदाच मला तिथी लक्षात ठेवून विश केलं. आणि तू ते करणं तर अगदीच अनपेक्षित होतं. मुळात तू कुठं आहेस कुठे? काय करतोयस? कसा आहेस? कुणालाच तुझा काहीच पत्ता नाही. खूप काळानी का होईना पण सब्यसाची आणि इशा यांचा कधीतरी फोन, मेसेज असतो. आणि हल्ली आपली बरीच मंडळी फेसबुकवर काहीतरी ग्रुप वगैरे बनवत आहेत असं ऐकलंय. पण ते जाऊ दे, हे सेवा समिती काय प्रकरण आहे?’’
‘‘खरं तर उत्तरा, तुझ्या बहुतेक प्रश्नांची उत्तर ही, सेवा समितीचं एक उत्तर दिलं की लगेच मिळणार आहेत.’’
‘‘मग? सांग नं!’’
‘‘‘हं, पण सेवा समिती म्हणजे काय, याचं उत्तर मात्र फोनवर देता नाही येणार’’
‘‘का?’’
‘‘कारण ते उत्तर ऐकण्यापेक्षा प्रत्यक्ष समजून घेणं यातच खरी मजा आहे!’’
‘‘ओ, आय सी! मग सांग तरी कुठे यायचं ते समजून घ्यायला?’’
‘‘ उत्तरा, तू खरंच सिरीयसली विचारतीयस कि काय?’’
‘‘का? तुझी तशी अपेक्षा नाही का?’’
‘‘नाही गं! खर सांगू का? माझ्या अपेक्षेपेक्षाही, लोकांना हल्ली दुसर्‍याचं काही ऐकून घेण्याचा पेशन्स कुठे राहिलाय? मी-माझं-आणि मला यापलीकडे जाणं फार आउटडेटेड झालंय. म्हणून तुझ्या विचारण्याचं आश्चर्य वाटलं!’’
नकळत उत्तराला जाणवलं , अशा गप्पा मारण्यांनी आपल्याला खूप बरं वाटतंय, कारण हल्ली अशा गप्पाच कुणाशी होत नाहीत.
‘‘तर मग ऐक, विरंद्पूर हे नाव जर तू गुगल वर टाईप केलस नं तर...’’ असं म्हणत उदय थोडा थांबला आणि मग हसत म्हणाला, ‘‘तर तुला काहीही सापडणार नाही. गुजरात बॉर्डरवर एक अगदी छोटं आदिवासी खेडं आहे. अगदी म्हणजे अगदी छोटं. तालुक्याच्या गावापर्यंत कशीबशी तुझी मोठी गाडी येवू शकेल. पुढच्या प्रवासासाठी मात्र आमचं जीप्डचं पाहिजे. आणि हो, ज्या नंबरवर तू आता फोन केलास ना, ते म्हणजे आमचं शहरातलं ऑफीस कम उतरण्याचं ठिकाण सर्व काही. मला जर काही निरोप द्यायचा तर तो इथेच. कारण विरंद्पुरला फोन नाही.’’
‘‘म्हणजे? तू तिथे राहतोस? इथे नाही?’’ उत्तरानी आश्चर्यांनं विचारलं.
‘‘अर्थात! म्हणून तर म्हटलं न, समितीच काम बघायला तुला तिकडेच यायला हवं. मग? कधी येतीयस्?’’
उदयच्या या अचानकच्या प्रश्नानं उत्तराला उगाच कोशात गेल्यासारख झालं. त्याला हो म्हणण्यापेक्षा नाही कसं म्हणायचं या जाणीवेनं ती क्षणभर गप्प झाली. आणि ते जणू काही समजल्यासारखा उदय तिला म्हणाला ,
‘‘अगं म्हणजे लगेच नाही कदाचित शक्य होणार तुला हे मला समजतंय. पण ज्या क्षणी तुला असं वाटेल नं, कि यु नीड अ ब्रेक, तर सरळ उठ आणि विरंद्पूरला ये. आय प्रॉमिस यू, तुला क्षणाचाही पश्चात्ताप होणार नाही.’’
उदयच्या या बोलण्यानी तिला एकदम हायसं वाटलं. कायम कोणाच्यातरी आणि कुठल्यातरी अपेक्षांमध्ये सतत स्वतःला प्रूव्ह करत राहणं सध्या तिला नकोसं वाटायला लागलं होतं. आणि मग अशा छोट्या, साध्या आणि सोप्या गोष्टीचं सुद्धा ओझं वाटू लागतं असा तिचा सध्याचा अनुभव होता. उदयचा फोन झाल्यावर तिला क्षणभर खूप बरं वाटलं. त्याचं कारण शोधण्याचा मग तिनं प्रयत्न केला नाही. तिच्या मनात आलं, काही वेळा एखाद्या अनुभवाचा आनंद मनात तसाच रेंगाळू द्यावा. त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न नाही करू. हात वर घेत उत्तरानं आपले केस मोकळे सोडले आणि आज सगुणाबाईंकडून तेल लावून घेतलं पाहीजे असा विचार करत तिनं सगुणाबाईंना हाक मारली.
***
सुंदर मनसुखानीच्या कंपनीच्या डूयडीलीजन्सचं प्रेजेंटेशन संपल्यावर कॉन्फरन्सरूम मधले सगळे दिवे उजळले. ऍक्वीजीशन कमिटीचं हे प्रेझेंटेशन झाल्यावर उत्तरा क्षणभर शांत बसली.
‘‘मग सुंदरच म्हणणं काय आहे?’’ तिनं विचारलं
‘‘मॅडम, तो प्राईज कमी करायला तयार नाहीये.’’ फायनान्सच्या जोशींनी सांगितल.
उत्तरानं काही न बोलता नुसतीच मान हलवली . सगळेजण तिच्या बोलण्याची वाट पाहू लागले.
‘‘काय प्रॉब्लेम काय आहे या सुंदरचा? व्हाय हि इज सो अडमंट?’’ उत्तरानी विचारलं.
‘‘मॅडम, प्रॉब्लेम सांगितला तर कळेल नं! हि इज नॉट रेडी टू इवन टॉक एनिथिंग बिफोर प्राईज कन्फर्मेशन’’ गोरे म्हणाला
उत्तरानं पुन्हा जोशींकडे पाहिलं. आणि तिच्या मनात एक विचार आला. ती जोशींना म्हणाली,
‘‘जोशी, जरा मघाशी जे फ़िनान्शिअल्स दाखवले न, ते पुन्हा बघा आणि मला सांगा, व्हाट इज द एम्प्लॉयी कॉस्ट? जोशींना जणू काही या प्रश्नाची अपेक्षा असल्याप्रमाणे त्यांनी उत्तर तयार ठेवलेलं होतं. ‘‘मॅडम, इट इज १५%’’
‘‘काय? एवढी कॉस्ट? आर यु शूअर्?
‘‘हो, मॅडम. मी फिगर्स दोनदा चेक केल्या आहेत’’ जोशी पुन्हा म्हणाले.
‘‘""Then its too high ! no wonder ही कंपनी गाळात चाललीये. By the way, help me to understand what is the average age of his employees?’’ उत्तरांनी विचारलं
‘‘मॅडम, मी बघितलंय, इट्स ४४ इयर्स’’ एचआर्च्या त्रिवेदीनं माहिती दिली.
यावर पुन्हा काहीवेळ तिथे शांतता पसरली. उत्तरा काहीतरी बोलेल या अपेक्षेनं सगळेजण वाट पाहू लागले. तो वेळ सगळ्यांनाच खूप मोठा वाटू लागला. आणि मग अचानक उत्तरा म्हणाली, ‘‘Please go ahead and give the proposal to Sundar with a price he wants to have.. सगळेजण अवाक् होत तिच्याकडे पाहत राहिले. हे अगदीच अनपेक्षित होतं. पण उत्तराला मात्र या स्वतःच्या अनपेक्षितपणाचा पूर्ण अंदाज होता.आणि तशीच खातरीसुद्धा! काही वेळ तसाच जाऊ देत ती पुढे म्हणाली, ‘‘सुंदरला सांगा, तुला हवी आहे तीच किंमत आम्ही देत आहोत . पण तुझी मॅनपॉवर मात्र ५०% नी तू कमी कर. तरच हे डील होऊ शकेल. यात आपण थोडा स्कोप ठेवू. कारण मग तो रडेल. १०% इकडे तिकडे. एवढाच. पण इवन इफ ४०% ला तो अग्री झाला, तरी इट्स अ डील!’’ उत्तरांनी सगळ्यांकडे आत्मविश्वासाने पाहिलं. सगळेजण तिच्याकडे पाहत होते. कारण हा एक पूर्णपणे वेगळाच विचार तिनं मांडला होता आणि त्यावर कुणाकडेच काही उत्तर नव्हतं. आपल्या विचारांचा हा असा अनपेक्षितपणाच आपल्याला यशाच्या चढत्या कमानी पार करायला मदत करतो याची उत्तरला पूर्ण जाणीव असल्यासारखी ती निर्विकारपणे समोर पाहू लागली.
‘‘पण मॅडम,...’’ एच आरच्या त्रिवेदीन काही बोलण्याचा प्रयत्न केला तेंव्हा उत्तराच्या कपाळावर एक त्रासिक आठी उमटली.
‘‘येस् त्रिवेदी?’’ तिनं विचारलं
‘‘एवढ्या मॅनपॉवर कटनी प्रॉब्लेम होईल!’’ त्रिवेदी म्हणाला.
‘‘प्रॉब्लेम? येस. होईल नं! पण कोणाला? सुंदरच्या कंपनीला नं?’’ उत्तरा म्हणाली.
‘‘नाही मॅडम. सगळ्या इंडस्ट्रीमधेच याचा परिणाम होईल नं? कारण परिणाम होणार तो सगळ्या मिडल एजेड लोकांवर नं!’’ त्रिवेदी पुन्हा म्हणाला.
‘‘त्रिवेदी, मी याकडे ‘ह्युमन रिसोर्स’ म्हणून बघते आणि तुम्ही ‘ह्युमन रिलेशन’ म्हणून बघता, असं नाही का तुम्हाला वाटंत? मी सुंदरची कंपनी विकत घेतीय आणि तीसुद्धा त्याला हवी ती किंमत देऊन. मग मी माझ्या कंपनीचा फायदा बघणंही तितकच महत्वाचं नाही का? म्हणूनंच मी ती घेतानाच काळजी घेतीय ना! नाहीतर मग त्या माणसांना घ्यायचं आणि पुढच्या सहा महिन्यात घरी पाठवायचं हेही मी करू शकते. पण ते पाप मी का करावं? लेट सुंदर पे द प्राईस् ऑफ हिज इनॅबीलिटी टू हँड्ल द बिजिनेस! आणि त्याच्या लोकांचं म्हणाल, तर मी एवढंच सांगेन, जे घरी जातील त्यांचं नशीब वाईट आहे. जे टिकतील, दे आर द वन हू आर फीट फॉर द सर्व्हाईव्हल. नाही का?’’
तिच्या बोलण्यानी त्रिवेदीचा चेहरा पडला. उत्तराचं बोलणं लॉजिकल होतं. पण तरीही त्यात काहीतरी बिनसल्याचा सूर त्रिवेदीला वाटंत राहिला. प्रपोजलमध्ये काही इतर किरकोळ बदल सुचवून उत्तरा आपल्या केबिनमध्ये येऊन बसली. सुंदरच्या कंपनीचे हे डील जेंव्हा होईल, तेव्हा खरोखर आपण आपल्या कंपनीला एका वरच्या पातळीवर नेऊन ठेवू याची उत्तराला खात्री वाटत होती. मघाचाच विचार तिच्या मनात चालू होता. अवघड निर्णय घेणं हे अशक्य नसलं तरी त्याची म्हणून एक जी किंमत असते ती सगळ्यांनाच चुकवावी लागते. हे या त्रिवेदीला कसं समजावयाचं? अशा निर्णयांचा माझ्यावर काहीच परिणाम होत नसेल असं या लोकांना बहुधा वाटंत असावं. त्यांचा तो समज एक प्रोफेशनल म्हणून मला प्रूव करत असला तरी माणूस म्हणून माझ्यावर खूप अन्याय करत राहतो. पण आत्ताची इंडस्ट्री ही एक प्रकारे युद्धभूमीच आहे. आणि युद्धभूमीवर सगळं माफ असत ंनीती आणि अनीतीच्या कल्पना सांभाळत युद्धात उतरता येत नाही. युद्धात उतरण्यासाठी एकच गोष्ट महत्वाची. Winning Instinct! स्वतःच्याच विचारांनी उत्तराला बरं वाटलं. आपण योग्य मार्गावर आहोत याचा तिला पुन्हा विश्वास वाटू लागला.
गेले काही दिवस या सगळ्या गडबडीत गेल्यामुळे उत्तराला खूप दमून गेल्यासारख वाटायला लागलं. तेच रुटीन, त्याच चर्चा हे सगळं सगळं आपल्या अंगावर येतंय आणि तो ताण घेणं नकोनकोसं वाटायला लागलं की काय अशी भावना तिच्या मनात तयार होऊ लागली. आणि मग तिला पुन्हा एकदा उदयची आठवण झाली.
***
एखाद्यानं ठरवून चुकायचं म्हटलं असंत तरी त्याला चुकता येऊ नाही इतक्या डीटेल खाणाखुणा उदयनं दिल्या होत्या. आणि त्या सगळ्या फॉलो करीत उत्तरा जेंव्हा तालुक्याच्या गावाला पोचली तेंव्हा संध्याकाळ होत आलेली होती. शाळेच्या फाटकाच्या शेवटच्या खुणेशी जेव्हा उत्तराची गाडी थांबली तेंव्हा समोरच उभ्या असणार्‍या जीपपाशी उदय हाताची घडी घालून उभा होता. खूप वर्षांपूर्वी पाहिलेला. तसाच बारीक चणीचा. पण गेल्या काही वर्षात त्यानी लांब दाढी ठेवलेली होती. त्यातले बरेच केस पांढरे झालेले होते. चेहरा रापलेला दिसत होता. कपाळापासले बरेचसे केस गेलेले होते आणि म्हणून कपाळ रुंदावलेलं होतं. पण तरीही त्यानी उरलेले केस वाढवलेले होते. आणि पाठीमागे ते एकत्र करून त्याला एक रबरबँड लावलेलं होतं. आपल्या गाडीतून उतरताना स्वतःच्या नकळत आपला टी शर्ट सारखा करीत आणि डोळ्यांवरचा गॉगल कपाळावर सरकवत उत्तरा उदय कडे चालत आली.
‘‘ओ माय गॉष्! उदय? व्हाट अ चेंज? रस्त्यावर भेटलो असतो न तर नसतं ओळखलं मी तुला लगेच!’’ उत्तरा म्हणाली.
‘‘वेलकम उत्तरा!’’ तिच्याशी हात मिळवीत उदयनी बरोबरच्या माणसाला तिचं सामान जीपमध्ये ठेवायला सांगितलं.
‘‘कसा झाला प्रवास?’’
‘‘एका शब्दात सांगू?’’
‘‘ऑफ कोर्स!’’
‘‘थ्रिलिंग!!!’’
‘‘म्हणजे?
‘‘अरे म्हणजे, निघालो आम्ही सकाळीच. पण वाटेत गाडी पंक्चर झाली. मग चाक बदलेस्तोवर एका टपरीवर मस्त चहा प्यायले. आणि यु नो? मी तिथं भजी खाल्ली! मजा आली. नंतर दुपारी एका शेतापाशी थांबलो. टिफिन बरोबर घेतला होताच. रामदिन आणि मी मस्त झाडाखाली बसून जेवलो. आणि मग पुढचा हा सगळा झाडाझाडातून येणारा हा रस्ता मस्त एन्जॉय केला.’’
उदय नुसताच हसला.
‘‘सो? निघायचं आता आपण?’’ उत्तरानी विचारलं
‘‘तुला फ्रेश वगैरे व्हायचं असेल तर ..’’
‘‘नो नो, लगेच निघू. उदय, आय टेल यु, धिस इज हेवन! लेट्स गो’’
‘‘उत्तरा, ते समोर डोंगर दिसतात ना? त्यांच्याच मागच्या बाजूच्या डोंगरावर आपली वस्ती आहे. सो इट विल टेक टाईम हं!’’
‘‘ नो प्रॉब्स!’’
उदयनी जीप चालू केली आणि उत्तरा पुढे त्याच्या शेजारी बसली. आणि मग जीप निघाली. संध्याकाळचा प्रकाश सभोवतालच्या हिरव्या रंगात मिसळून आणखीनच गडद झालेला होता. रस्त्यावरच्या खड्ड्यातून जाताना जीपनं दोन तीनदा उसळी मारल्यावर उदय उत्तराकडे पाहत नुसता हसला. मग उत्तरांनी आपल्या डोक्यावरचा गॉगल काढून तो टी शर्ट च्या बटणाशी अडकवला आणि आपल्या केसांवरून सहज हात फिरवीत व डोळे बारीक करीत ती आजूबाजूला पाहत राहिली.
रस्त्यावर वर्दळ अशी काहीच नव्हती. क्वचित मधेच एखाद-दुसरा माणूस रस्त्याच्या कडेला शेतात दिसायचा. समितीची गाडी पाहताच हात करायचा. उत्तराला वाटलं, त्या तशा हात करण्यात काहीतरी बॉंडींग आहे. ते उगाचचअसणारं, लाचारवाणं हात करणं नाहीये. त्या तशा हात करण्याला, उदयचा प्रतिसादही तसाच वाटत होता. बरोबरीचा. आपल्या विचारांची उत्तराला उगाच गम्मत वाटली.
‘‘ओके उदय, आता तर सांगशील, ही तुझी ‘समिती’ काय करते ते?’’ उत्तरानी विचारलं.
‘‘खरं सांगू? ती काही तसं विशेष करते असं नाही. पण थोड्या अवघड शब्दात सांगायचं झालं तर मी असं म्हणेन कि, आम्ही इथली जीवनशैली जपण्याचा प्रयत्न करतो. बदलण्याचा नाही.’’ उदय म्हणाला.
‘‘म्हणजे?’’
‘‘म्हणजे असं की... हं.. तो समोरचा डोंगर दिसतोय न? आठ-नऊ वर्षापूर्वी तो जवळजवळ बोडका झाला होता. आम्ही तिथं बरीच झाडं लावली आणि जगवली. इथल्या वाड्यावस्त्यांमध्ये मेडिकल एड पोचविली. आणि.... सॉरी. मला खरं तर तुला हे काहीच सांगायचं नव्हतं आणि नाही. फरगेट इट.’’
‘‘नो, नो! नॉट ऍट ऑल. प्लीज कॅरी ऑन.’’
‘‘नाही उत्तरा, समितीचं काम वगैरे हे सगळं एक केवळ निमित्त आहे. ते बघायला मी नाही तुला इथं बोलावलं. त्या दिवशी तुझा तो इंटरव्ह्यू वाचला आणि का कुणास ठाऊक मला असं वाटून गेलं, तू जगण्यातलं काहीतरी हरवत आहेस. म्हणजे असं की, वर वर दिसायला सगळं उत्तम आहे. पण तरीही कसलीतरी एक अस्वस्थता तुझ्यात आहे. आता असं मला का वाटलं हे नको विचारूस. पण वाटलं हे मात्र खरं. मग सहज माझ्या मनात येऊन गेलं की ती सगळी अस्वस्थता, जगण्यातले प्रश्न यांना कदाचित इथल्या निसर्गात काही उत्तरं सापडतील. पण खरं सांगू? तुला खरंच काही प्रश्न आहेत की नाहीत हेही मला माहित नाही. पण त्यावेळच्या कुठल्यातरी एका instinct नी मला तसं वाटलं. आणि तुला फोन करण्याची एक अनिवार इच्छा माझ्या मनात आली. तुझा तिथीनं असणारा वाढदिवस हा केवळ एक योगायोग.’’
उदयच्या बोलण्यावर उत्तरा फक्त शांत बसली. मग उदय पुढे काहीच बोलला नाही. अंधारात फक्त जीपच्या इंजिनाचा तेवढा आवाज येत राहिला. जीप वाडीवर पोचली तेंव्हा मिट्ट अंधार झालेला होता. घरातल्या दिव्याच्या प्रकाशात घराची आऊटलाईन तेवढी दिसत होती. मागच्या बाजूला विंडमिलचा टॉवर दिसत होता. घरात पाऊल ठेवल्यावर उत्तराला खूप बरं वाटलं. आतला सगळा उबदारपणा जसा काही अलगद तिच्या अंगावर आला.
घरात मोजक्याच गोष्टी दिसत होत्या. टीपॉयवर आणि खोलीच्या दोन कोपर्‍यात ड्रीफ्ट वूड ठेवलेले होते. हातानी विणलेल्या छोट्या टोपल्या उलट्या करून त्याच्या लँपशेड्स केलेल्या होत्या. त्यातून झिरपणार्‍या प्रकाशाचा एक सुंदरसा पोत भिंतीवर पसरलेला होता. समोरच्या भिंतीपाशी पुस्तकांनी भरलेले तिन चार बुक रॅक्स होते. डाव्या बाजूला एक झोपाळा होता. आजूबाजूला कसलाही आवाज नव्हता. सगळीकडे एक घनदाट शांतता आणि अपवाद फक्त रातकिड्यांच्या एकसुरी आवाजाचा.
या सगळ्या वातावरणानंच उत्तराला आपला निम्मा शीण गेल्यासारख वाटलं.
‘‘तू वॉश घेणार आहेस?’’ उदयनी विचारलं
‘‘If possible , Sure’’
‘‘गार पाणी चालत असेल तर,You can take it immediately. Otherwise मला तुला गरम पाणी करून द्यावं लागेल’’
‘‘इट्स ओके! गार पाणी विल डू’’
आणि मग गार पाण्यानी मनसोक्त अंघोळ करून आल्यावर घरातल्या सुटसुटीत कपड्यात उत्तराला एकदम ताजंतवानं वाटलं. आणि तिला एकदम जाणवलं आपल्याला खूप भूक लागलेली आहे. उदयला शोधत ती जेव्हा किचनमध्ये गेली तेव्हा उदयनी अन्न गरम करून दोन ताटं वाढून ठेवलेली होती. तिनं ताटांवरून नजर फिरवली.
‘‘हे इथलं खास कॉन्टीनेन्टल जेवण आहे बर का!’’ उदय मिश्किलपणे म्हणाला
‘‘इज इट? मग तर बघितलंच पाहिजे टेस्ट करून’’ असं म्हणत उत्तरा घाईघाईनं जेवायला लागली. उदय काही न बोलता नुसता हसला.
जेवण झाल्यावर उत्तरा थोडी सुस्तावली. बाहेरच्या झोपाळ्यावर उगाच थोडे झोके घेत राहिली.
‘‘ती कोपर्‍यात दिसतीय न, ती इथली गेस्ट रूम आहे. तुझी झोपायची व्यवस्था तिथेच केली आहे.’’ उदय म्हणाला.
‘‘चल झोपते मी, गुड नाईट’’ असं म्हणत उत्तरा तिच्या खोलीकडे गेली.
अगदी साधी खोली होती. भिंतीच्या जवळ एक अगदी कमी उंचीचा बेड होता. त्यावर एकही सुरकुती नसलेली बेडशीट होती. तशीच उशीसुद्धा. पायाशी मऊसुत गोधडी. बेडला काटकोन करून ठेवलेल्या लांबट चौरंगावर अतिशय मंद प्रकाशलेला टेबल लँप होता. पलीकडेच स्वच्छ तांब्याचं तांब्या-भांडं ठेवलेलं होतं. तिथल्या साधेपणानं उत्तराला उगाच लहान होऊन आईच्या कुशीत गेल्यासारखं वाटलं. बेडवर पडल्यावर तिनं समोर पाहिलं तेव्हा समोरची भिंत वारली पद्धतीच्या चित्रांनी रंगवलेली होती. त्या चित्रांकडे पाहत असतानाच तिनं डोळे मिटले आणि दुसर्‍याच क्षणी तिला झोप लागली.
***
भल्या पहाटे उत्तराला जाग आली. आजूबाजूच्या शांतपणात वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज खूप मोठे वाटत होते. बाहेरून बासरीचे मंद सूर येत होते. क्षणभर तिला प्रश्न पडला आपण नक्की कुठे आहोत आणि मग एकदम भानावर येत ती उठून घराबाहेर आली. एव्हाना उजाडलेलं होतं. ऊन असं कुठेच नव्हतं. आजूबाजूच्या हिरवाईनं उत्तराला खूप शांत वाटलं. वार्‍याची गार झुळूक अंगावरून गेल्यावर तिनं हाताची घडी घालत समोर पाहिलं. घरासमोरच्या मोठ्या झाडाच्या पारावर बैठक जमवून उदय बासरीचे सूर आळवत होता. कुठूनतरी येणार्‍या ओल्या धुराचा वास तिला जाणवला. बाकी इतर कुठलाच आवाज नव्हता. तिला शहरातली आपली रोजची सकाळ आठवली. या दोन्ही सकाळीची तुलनाच होत नव्हती. सकाळचा तोच प्रकाश, पण इथे किती शांत आश्वासक आणि तरीही मोकळा वाटत होता. शहरात मात्र हाच प्रकाश किती बंदिस्त, मोजून मापून येणारा आणि संपूर्ण दिवसाला ताकदीनं पुढे ढकलणारा वाटत राहतो. उत्तरांनी हातातल्या सेलफोनकडे पाहिलं, तेव्हा आपल बासरी वाजवणं थांबवत उदय तिला म्हणाला ,‘‘आता बंदच करून ठेव तो. कारण इथे कुठलीही रेंज तुला मिळणार नाही.’’ मग आपला फोन बंद करत उत्तरा पारापाशी असणार्‍या आरामखुर्चीत बसली.
‘‘चहा?’’ उदय नी विचारलं आणि मग समोरच्या फ्लास्क मधला वाफाळलेला चहा मगमध्ये ओतून तिला दिला. आपली बोटं एकमेकात गुंतवीत तिने चहाचा मग आपल्या दोन्ही हातात धरला तेव्हा तिला त्याच्या गरम स्पर्शांनी बरं वाटलं. ‘‘तू पूर्वी वाजवायचास् का बासरी?’’ तिन विचारलं
‘‘नाही. पण इच्छा खूप होती. तेव्हा कधीच जमलं नाही. लहानपणी थोडी थोडी शिकलो होतो. पण मग इथे आल्यावर मनावर घेतलं.’’
‘‘कधी आलास इथे?’’
‘‘आठ एक वर्ष होतील आता मला पूर्ण’’
‘‘माय गॉष्! तू इथ आठ वर्ष राहातोयस?’’
‘‘येस’’
‘‘एकटाच?’’
तिच्या प्रश्नाचा रोख ओळखत उदय म्हणाला, ‘‘हो. एकटाच. मी लग्नच केल नाही. कॉलेजात असताना बाबा गेले. आणि नंतर काही काळानी आईपण गेली.’’
‘‘पण मग लग्न केलं नाही म्हणजे ...’’
‘‘नाही केलं हेच खरं. आणि आता करणारही नाही. जेंव्हा ते वय होत, तेव्हा करिअरच्या वेगात वेळच नाही मिळाला विचार करायला. ऑफ कोर्स नो रीग्रेट्स! पण नाही जमलं. उत्तरा, आता मला वाटतं, करिअरचा जो एक कैफ असतो ना, तो फार डेंजरस असतो. त्याच्या वेगात तुम्ही स्वतः तरexploit होताच पण इतरानांही exploit करत राहता.’’ स्वतःशीच बोलल्याप्रमाणे उदय बोलत राहिला.
‘‘करिअरच्या सुरुवातीलाच ‘गोल्डस्टार’ सारखी कंपनी मिळाली. आणि मग मी म्हणतो तशी त्या कैफाची सगळी गेटस् अचानक ओपन झाली.At the age of 38 , I was the youngest Managing Director of Asia Pacific Region. तिथं पोचलो. करिअरचा पिक पॉइंट होता तो. वरती पाहिलं तर ग्लोबल पोझिशन्स खुणावत होत्या. पण जेव्हा खाली पाहिलं तेव्हा जाणवलं, एवढे वर आलेलो आहोत पण या ठिकाणी मात्र एकटेच आहोत. आणि मग एका क्षणी वरती जाण्याच्या आव्हानापेक्षा खाली पडण्याची भीती मनात येऊन गेली.And that was THE turning point.! खरोखर उत्तरा, तुला सांगतो, माझ्या मनात आलं, आपण आपल्या जगण्याला एवढे व्हल्नरेबल होऊ असं वाटलं नव्हतं. त्याचं क्षणी निर्णय घेतला आणि दिलं सगळ सोडून. इथे आलो. अर्थात इथं येण हे काही प्लॅन्ड नव्हतं. पण मी आयुष्याला सोडून द्यायचं ठरवलं होतं. शाळेतली मुलं कशी मधल्या सुट्टीत वरच्या मजल्यावरून कागदाची भिंगरी सोडून देतात ? तसंच मी स्वतःला सोडून दिलं. मिळवलेल्या पैशांचा एक ट्रस्ट केला आणि जगायला लागलो इथं.’’
उत्तरा फक्त त्याचं बोलण ऐकत राहिली. क्षणभर तिला वाटलं, त्याचा आवाज भरून आला आहे. डोळ्याच्या कडा पाणावल्या आहेत. पण परत तिच्या मनात येऊन गेलं, हे आपल्याच मनाचे भास आहेत.
‘‘एनी वे, जाऊ दे! उगाच काहीतरी वेगळंच बोलत बसलो न मी?’’ उदय म्हणाला. मग त्यांनी आपल्या हाताचे तळवे एकमेकांवर जोरात घासले आणि ते तसेच आपल्या डोळ्यांवर ठेवले.
‘‘तुझं सांग. तू कशी आहेस? लग्न? संसार? मुलं-बाळ?’’ त्यानी विचारलं
‘‘काही नाही’’ उत्तरा थंडपणे म्हणाली
‘‘म्हणजे?’’
‘‘म्हणजे असं की, लग्न नाही केलं, त्यामुळे पुढच्या सगळ्या गोष्टी आपोआप टळल्या. नो संसार. नो मुलेबाळे’’ उत्तरा स्वतःशीच हसली.
‘‘एकटं वाटतं?’’ अचानक उदय नी विचारलं
‘‘वाटंत न! पण संसार नाही म्हणून नाही. एखाद्या जत्रेला जाताना कसं, आपण विचारांच्या नादात मागेच रेंगाळल्यानंतर जसे एकटे पडतो तसं वाटतं. अंदाजानं पुढचा रस्ता माहित असतो.आणि आपण एवढे पुढे आलेलो असतो की मागे वळणं शक्य नसतं.’’ उत्तरा म्हणाली
‘‘Exactly, उत्तरा, मला हेच म्हणायचंय. आपण नं, स्वतःकडे आपल्याच जगण्याचे ट्रस्टी म्हणून पाहावं. आणि बेनिफिशरी मात्र इतरांना होऊ द्यावं. म्हणजे मग जगण्यात असे तणावच तयार होणार नाहीत. आणि एक बाई म्हणून असं करणं तुला कदाचित जास्त सोपं जाईल. म्हणजे मला असं वाटतं कि बायकांच्या मनात हा सत्-असत् चा विचार कायमच चालू असतो. त्यामुळेच त्या त्यांच्या सहज जाणीवांना फार काळ सप्रेस करू शकत नसाव्यात. मग त्याची जी काही किंमत असेल ती मोजायलाही त्या तयार असतात. अर्थात हे मला वाटतं. पण ते मला समजलं आहे असं मात्र मी म्हणणार नाही.’’उत्तरा पुन्हा स्वतःशीच हसली.
‘‘पण म्हणजे काय, करायचं तरी काय? सगळ सोडून द्यायचं? इतके कष्ट उपसले. एवढी बुद्धी आणि ज्ञान पणाला लावलं. स्वतःच्या हिमतीवर उभं केलेल सगळं काही सोडून द्यायचं? विसरून जायचं? का आणि कशासाठी? मग सगळंच व्यर्थ की!’’
‘‘उत्तरा, जे कमावतात त्यांनाच गमावणही सोपं असतं. कारण काहीतरी गमावण्यासाठी त्यांनी कमावलेल तरी असतं ना! नाहीतर मग हा प्रश्नच येत नाही ना?’’ उदय म्हणाला.
‘‘अवघड आहे हे!’’ उत्तरा म्हणाली.
‘‘मान्य आहे. पण अशक्य नाही नं!’’ आणि मग उदय तिला त्याच्या जगण्याचं सगळ तत्व विस्तारानं सांगत राहिला.
उत्तराला जाणवलं, की या तत्वाचा स्वीकार करण्याचं धाडसच आपल्यात नाहीये. त्याचा मोह मात्र जरूर होतोय आपल्याला. कसा सोडवणार आहोत आपण हा तिढा?
प्रोफेशनलीझमच्या वेगात आपल पर्सनल सुद्धा प्रोफेशनलच झालंय. इनपुट- प्रोसेस आउटपुट विथ क्वालिटी हे प्रत्येक टप्प्यावर जगण्याचं जणू सूत्रच झालंय. त्यात आपल्या कुटुंबाचाही अपवाद नाही. पैसा सत्ता-पैसा मग सुखसोयी आणि अजून सुखसोयी आणि अजून सत्ता! या सगळ्याचा शेवट कुठे असणार आहे? वृद्धाश्रमात? एकटेपणात? Begin with the end in the mind हे तत्व आपण जगण्यात का नाही आणू शकत आहोत?
नंतर सगळ आवरून उदयबरोबर तिथल्या वाडी-वस्तीतून फिरताना हेच विचार उत्तराच्या मनात फेर धरून राहिले. तिथली छोटी छोटी मुलं, बायका, म्हातारीकोतारी माणसं. काय असतील त्यांच्या जगण्याच्या प्रेरणा? निव्वळ जन्माला आलो म्हणून जगणं? की त्यापेक्षा आणिक काही? नाहीतर नुसतं जगणं हे तर किडा-मुंगीलाही नाही चुकलेलं. मग माणूस म्हणून आपलं वेगळेपण काय? सत्तेची स्पर्धेची साठमारी? सुंदरच्या कंपनीतल्या निम्म्या लोकांचा एका फटक्यात निकाल लावून टाकणं म्हणजे आपली ताकद? या सगळ्याला एक सुंदर लॉजिक देणं ही आपली बुद्धिमत्ता? नात्यांमध्ये सुद्धा एखाद्या दुकानदाराप्रमाणे सतत तराजू घेऊन मोजमाप करत राहणं हा आपला जिव्हाळा म्हणायचा का?
उदय उत्साहानी तिथला सगळा परिसर तिला दाखवत होता. पण तिचं मन मात्र त्यात राहत नव्हतं. गेल्या आठ वर्षात थोडं थोडं करीत उभं केलेलं त्याचं काम त्याला आनंद देत होतं. तो आनंद त्याच्या बोलण्या चालण्यातून सगळा दिसत होता. उत्तराच्या मनात आलं, ठरवलं तर एका क्षणात पैशांची रास ओतून इथं आपण आपल्या कंपनीकडून सगळा कायापालट घडवू शकतो. पण मग ते उदयसुध्दा करू शकला असता. पण मग त्याला भेटणार्‍या लोकांच्या नजरेत त्याच्याविषयी जी आपुलकी दिसत होती, जो जिव्हाळा जाणवत होता, वागण्यातली जी सहजता होती, ती दिसली असती का? बाबांच्या श्राद्धाच्या दिवशी अनाथाश्रमात जाऊन आपण दरवर्षी एक मोठ्या रकमेचा चेक देतो. तिथल्या संचालकांचा लाचारपणा त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसंत राहतो. ज्यांच्यासाठी ते पैसे दिले जातात त्या मुलांच्या चेहेर्‍याकडे सुद्धा आपण पाहत नाही. पैशानी गोष्टी किती सोप्या करून टाकल्या आहेत नाही? उदय म्हणतो, जगण्यातल्या प्रश्नांना कदाचित इथल्या निसर्गातच काही उत्तरं सापडतील. उत्तरं मिळतील कि नाही हे अजून तरी नाही माहित. पण जे प्रश्न आपण आत्तापर्यंत यशस्वीपणे टाळले ते मात्र अगदी सहजपणे समोर आले.
म्हणजे आता उत्तरांच्या शोधासाठी पुन्हा तयारी करायला हवी. कदाचित काही प्रश्नाची उत्तरे म्हणजे, पुन्हा नवे प्रश्नही असू शकतील . पण प्रयत्न केला पाहिजे. खरंच, पुन्हा एकदा सुंदरशी बोलून पाहिलं पाहिजे. कदाचित त्याच्या लोकांना आपल्याच दुसर्‍या कंपनीत घेण्याचा पर्याय बघता येईल का असाही विचार करता येऊ शकेल.
‘‘हॅऽऽऽऽऽलो’’ उदयनी तिला हाक मारली.
‘‘कुठायस् तू उत्तरा? की पोचलीस ऑफिसात?’’ त्यांनी हसत विचारलं.
""You were right Uday ! Nature always has its own answers !! उत्तरा म्हणाली
‘‘म्हणजे?’’ उदयनी विचारलं
‘‘सांगेन कधीतरी. निघायचं आता आपण? उशीर होतोय नं?’’ उत्तरा म्हणाली
***
दुपारचं जेवण झाल्यावर उत्तरांनी आपली बॅग आवरली.
‘‘फायनली खरंच जातीयस्? लगेचंच?’’ उदयनी विचारलं
‘‘कांट हेल्प उदय. पण एक मेजर डील चालू आहे माझं सध्या. अक्विझिशनचं. अगदीच वैतागले होते. म्हणून हे दोन दिवस काढले.’’
उदय काहीच बोलला नाही. मग उत्तराही काही बोलली नाही. तिथे उगाचच एक शांतता पसरली.
मग उदय उठला आणि त्यांनी उत्तराची बॅग जीपमध्ये ठेवली. ती ठेवून तो मागे वळत असताना मागे उत्तरा उभी होती.
‘‘परत कधी?’’ उदय नी विचारलं
‘‘माहित नाही. कदाचित लौकरच. पण खरंच काही नाही सांगू शकत’’ उत्तरा म्हणाली.
‘‘ओके.’’ उदय म्हणाला.
तो पुढे जाणार इतक्यात उत्तरांनी त्याला हाक मारली
‘‘उदय....’’
उदय तसाच मागे वळला.
‘‘उदय, कॅन आय हग यू?’’ उत्तरांनी विचारलं. तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं.
उदयनी आपले दोन्ही हात पसरले आणि उत्तरा त्याच्या मिठीत शिरल्यावर तो तिला काही वेळ हलकेच थोपटत राहिला.
""Thanks Uday Thanks for everything'' आपले डोळे पुसत गहिवरल्या आवाजात उत्तरा म्हणाली आणि पुढे जाऊन जीप मध्ये बसली.
--- आणि जीप घाट उतरू लागली.
----
सुनील गोडसे
smgodse@gmail.com