‘होऽऽ आज मालीकडे गेले होते तुमच्या... भाचीकडे तुमच्या. मधल्या सुट्टीत! खूप दिवसांत झालं नव्हतं जायला. ती जाऊन आले आज.’’
छान आहे की! झालंय काय तिच्या तब्बेतीला?
ती, मुलं, सगळी छान आहेत. तिची तर तब्बेत नको इतकी छान दिसली.
नको इतकी म्हणजे नेहमीचंच तिचं.
अहो दुसरं काय? सहावा-सातवा तरी महिना असेल.
मी आपलं पाह्यलं तिच्याकडे अन् थक्कच झाले. म्हटलं, ‘माले, अगं लग्नाला सात वर्षं नाही झाली तर हे पाचवं मूल तुझं. काय म्हणावं तुला!’
म्हणाली की, ‘मामी, मुलांशिवाय शोभा नाही संसाराला!’ आता हिच्या या पोरांनी संसाराला शोभा यायचीय हिच्या! नाकं गळताहेत, कपड्यांवरनं, अंगावरनं घाणीची पुटं चढलीयत, केसांच्या झिंज्या अन् किडके दात. हट्टी तर कसली आहेत एकेक! ती तरी काय करणार म्हणा! आईचा हात लागला अंगाला तर कळा यायची काहीतरी. इथं म्हणजे आई सारखी गर्भारशी नाही तर बाळंतीण. कशाला बघतेय मग पोरांकडे. अन् शोभा येतेय म्हणे!
पण आपलं मला म्हणून म्हणायचं की, मुलांशिवाय शोभा नाही संसाराला. म्हणा म्हणावं. पहिल्यापहिल्यांदा वाटायचं वाईट, राग यायचा कुणी अस म्हणालं की, अन् या मालीनं तर मला टोमणा मारायची एक वेळ सोडलेली नाही. पण आता नाही वाटत कशाचंच काही. हो, नाहीयत मला मुलं. नाहीयत. काय करणार तुम्ही? बोलून बोलून बोलणार. एवढंच ना? बोला खुशाल!
अहो, एवढी शोभेची पोरं मधल्या वेळची खायला म्हणून आली तर हिनं कसं दिलं खायला माहीत आहे? सामानाच्या पुड्यांचे कागद सरळ केले अन् वाढली चतकोर चतकोर भाकरी न् आंब्याच्या लोणच्याची फोड एकेक. आई का काय म्हणायचं हिला? ते खायला दिलेलं पाह्यलं अन् वाटलं की घालावेत चार रट्टे पाठीत तिच्या. उठवळ मेली!
अन् पोरं तरी काय? मला पाह्यलं अन् मामी, खाऊ, मामी, खाऊ म्हणून ओरडायला लागली. आता माझ्याही मधल्या सुट्टीतनंच मी गेलेली तिच्याकडे. कसला खाऊ नेणार तेव्हा? पण ओशाळल्यासारखं झालं बघा. अन् वाईट वाटलं. म्हटलं एवढी पोरं खाऊखाऊ करताहेत नि आपण मात्र आलो दळभद्यासारख्या रिकाम्या हातानं.
पुन्हा माली म्हणालीच पोरांना. ओरडली त्यांच्यावर अन् म्हणाली, ‘‘अरे, तिच्या कसं लक्षात येणार तुम्हाला खाऊ आणायचं?’’ मी काहीच बोलले नाही. मनात म्हटलं, चुकल्येय खरी मी. म्हण तू आता काहीही. तुझंच बरोबर आहे.
पोरं मधल्या वेळाचं खाऊन शाळेला गेली, धाकटंही झोपलं, तशी माझ्याजवळ येऊन बसली माली अन् म्हणाली, ‘‘मामी तुझ्यासाठी आनंदाची बातमी आणलीय.’’
मी म्हटलं, ‘‘कसला ग आनंद?’’
तर म्हणाली, ‘‘बातमी कळल्यावर पेढेच देशील. तुझ्या हिताचं म्हणून सांगतेय. खरं तर तू मोठी अन् मी लहान. तुला मी असल्या गोष्टी सांगू नयेत. पण मी आपली सारखी तपासात असते. याला विचार, त्याला बघ म्हण, असं करत असते. तर परवा दूधवालीची नणंद आली होती माझ्या...’’
म्हणजे हिच्या मामीला पोर नाही ह्याची बातमी हिच्या दूधवालीच्या नणंदेपर्यंत पोचली! मी म्हणते, हिला करायच्यात काय नसत्या भानगडी? आपल्या पोरांचं नीट केलंस तरी मामीला पोचलं म्हणावं.
तर ती दूधवालीची नणंद तिला सांगत होती म्हणे की इथं पुण्यात गुरुवारात, असं आडबाजूला देऊळ आहे. बारा रामांचं. दुसरीकडे कुठे नाही ते पुण्यात आहे. देऊळ आहे छोटंच पण मोठं मनोहर आहे म्हणे. दगडी, अकरा कळसांच्या माळेवर बारावा कळस आहे सोन्याचा, झळझळीत. प्रभावळीतदेखील बारा नंदादीप. अकरांच्यावर बारावा. एक राम तेवढा वर आहे, बाकीचे अकरा आहेत खाली तळघरात. कुणी नवसबिवस केला तरच त्याला दर्शन देतात म्हणे बाकीच्यांचं.
तर म्हणे त्या देवळाच्या पुजार्याची बायको आहे मोठ्या हातगुणाची. मोठी भाविक अन् श्रध्दाळू. रामनवमीला तर दिवसभर ओलेत्यानं असते ती अन् मौन पाळते. अन् आपण मागितली तर अंगार्याची पुडी देते. संध्याकाळची खालच्या गाभार्यात जाऊन बसते. तिथं अगदी दाट अंधार असतो. ती बसलेली कुणाला दिसतही नाही. आलेलं माणूस तेवढं तिला दिसत असेल. आपण काही न बोलता त्या दिशेने हात पुढं करायचा, म्हणजे ती पुडी ठेवते हातावर. मग घेणार्यानं आपल्या कुवतीप्रमाणे काहीही द्यावं तिला. परवडणारे देतात शंभराच्यासुध्दा नोटा, नाही ती ठेवतात चार आणे. पण ती काहीच म्हणत नाही. हे आपलं मालीनं सांगितलेलं हं. अन् तिला सांगितलं तिच्या दूधवालीनं. म्हणजे तिच्या नणंदेनं. तिनं घेतला होता अंगारा गेल्या वर्षी.
पण त्या रामनवमीचा काही या रामनवमीला लावावा लागला नाही तिला.
आता तुम्ही असं का विचारताय तेच मला कळत नाहीय. खरंच तुम्हाला काही समजत नाही, की आपलं मला चिडवायला ढोंग करता कोण जाणे.
अन् कसं लक्षात येणार तुमच्या? तुमच्या मनाला लागून राह्यलंय का काही? म्हणून मी तिला म्हटलं की, बाई, राख-अंगारे-धूप-धुपारे करून काही मूल नकोय मला. एवढी काही खंगले नाही आहे मी त्याच्यावाचून. व्हायचं तर होईल अजून, नाहीतर असतात की कितीतरी माणसं अशी आमच्यासारखी!
नाही, पण मला सांगा, लग्न झाल्यापास्नं केलंत काय तुम्ही? हेच ना? कपडे धू, फरश्या धू, ओटे धू, भांडी घास! बायकोला तेवढी धुवायची बाकी ठेवलीत! घरात घालायचे कपडेदेखील इस्त्रीचे लागतात तुम्हाला. परटाची धुलाई पुरत नाही तुम्हाला म्हणून स्वतः कपडे धुता!
देवही म्हणाला की, ‘बरं बाबा, स्वच्छ राह्यचंय ना तुला, राहा स्वच्छ. अगदी निर्म ळ. उगाच डाग नकोत कसले तुझ्या अंगावर. हगलं रे, मुतलं रे, ओकलं रे, माती लागली रे, काही नकोच. भानगड नाही! बरं ऐकलं देवानं तुमचं.
तिला म्हटलं, ‘‘काही नको मला अंगारा न भंगारा. चांगलंं चाललंय आमचं. पोरं झाली असती तर मला तरी असं शिकायलासवरायला मिळालं असतं का? नोकरी करायला मिळाली असती का? रेडिओ, गॅस, गीझर मिळालं असतं का? छान आहे आमचं म्हटलं. आता आणि नसत्या भानगडी नकोत.’’
रागावली ती, ‘तुझ्याच हितासाठी म्हणून सांगितलं’, म्हणाली. डोळ्यांना पदर देखील लावलात. लाव म्हटलं. असे डोळ्यांना पदर लावून गोष्टी झाल्या असत्या तर जगच बदललं असतं! माझं हित तुझ्यापेक्षा मला जास्त कळतंय’ म्हटलं. अन् वेळ झाली शाळेची तशी उठले तिथून.
निघालात बाहेर? या जाऊन. कपडे न्यायचेत इस्त्रीला ते घेऊन जा. अन् हे पाहा, माझ्या त्या पावडरच्या डब्यात दहा-बारा रुपये आहेत ते घ्या अन् खाऊ घेऊन या चांगलासा. पोचवून या तिच्याकडे कधीतरी. चौकशी करीत होती तुमची ती. पोरांना जरा चांगलं खाऊपिऊ घाल म्हणून सांगून या.
पडते आता जराशी मी. डोकं लागलंय भणभणायला. म्हणजे तिच्या बोलण्यानं नाही हं. सांगितलं ना, मला आता कुणी काही म्हटलं तरी त्याचं काही वाटत नाही म्हणून? पण आज उन्हाची हिंडले ना म्हणून...
अन् हे बघा, अशी काही जरी मी कधी बोलले ना, तरी लावून नाही घ्यायचं. राख नाही घालायची डोक्यात. अखेर तुम्हाला मी अन् मला तुम्हीच आहोत आपण जगात. त्याच्यासाठी तरी काही रामनवमी नकोय अन् अंगाराही नकोय!
काय, मी एवढं बोलतेय तर हसा तरी जरासे. अहो, आपण आपलं सारं हसून गोड करावं! काय?
----
प्रस्तुत कथा ‘बारा रामांचं देऊळ’ (मौज प्रकाशन, मुंबई,१९६६) या कथासंग्रहातून साभार पुनर्मुद्रित केली आहे.
Posted in


