रेऊ कथा स्पर्धा : उर्वरित महाराष्ट्न् विभाग-द्वितीय क्रमांक
वाट चढून आले सोपानदेवाने आकाशात वर पाहिले, सूर्य आता डोक्यावर आला होता. त्याची स्वत:ची सावली त्याच्या पायाखाली आली होती. कुठेतरी बसावं नि फिरकीच्या तांब्यातलं पाणी घटाघटा प्यावं असं त्याला वाटलं. दाट सावलीचं एकही झाड त्याला जवळपास दिसेना. उघड्या बोडक्या घाटांतून रस्ता चढण्यात त्याचा बराच वेळ गेला होता. जरा लांबवर नजर टाकली, अंतरावर एक दाट सावलीचं झाड त्याला दिसलं. झपाझप पावलं टाकत तो तिथं पोहोचला. दाट पानांच्या गर्दीतून एखाद दुसरा सूर्यकिरण खाली येत होता. बाकी सावली झकास होती. ऐसपैस पाय पसरून तो बुंध्याशी विसावला.
पितळेचं झाकण गरगर फिरवून बाजूला टाकलं. घटाघटा पाणी प्याला. आडवं पडून झाडाचं निरीक्षण करू लागला. कुठलं होतं कुणास ठाऊक! पण भरगच्च पानांचं होतं. प्रत्येक फांदीला बचक बचक पानं लगडलेली होती. वड, पिंपळ, चिंच यापेक्षा या झाडाचा नूर वेगळाच दिसत होता. हिरव्यागार रंगाची लांबरुंद पानं, टोकाला निमुळती होत गेलेली पिंपळपानासारखी, पण जाडजूड पानं, साध्या वाऱ्यानं न हलणारी, वडाच्या पानांसारखी, आजूबाजूचा परिसर साफ रिकामा, नुसताच मुरमाचा डोंगर. हे एवढेच एक नावाला. बहुतेक संस्थानी राजवटीतलं असावं. बुंधा चांगला लांबरुंद, जुनाट, सालींचे ढलपे सुटत चाललेलं एवढं मोठं झाड; पण झाडावर एकही पक्षी नव्हता. आसपास पाण्याचा पत्ता नव्हता म्हणून असेल; पण रानगवत चांगलंच माजलं होतं.
सोपानला मग भुकेची जाणीव झाली. जवळचा डबा उघडून ज्वारीची भाकरी, मेथीची भाजी, कारळयाची चटणी संपवली. पुन्हा एकदा गटागटा पाणी प्याला. फिरकीचा तांब्या रिकामा केला. तिथेच लवंडला. डोक्याला खडे टोचू नयेत म्हणून पिशवीतला पंचा काढला. डोकं टेकवलं, थंडगार सावली, मोकळीढाकळी हवा. वाऱ्याच्या झुळुकांनी तिथेच मस्त घोरायला लागला. कितीतरी दिवसांनंतर आज असा गारवा मिळाल्यामुळे आणि थकव्यामुळे तो छानपैकी झोपला होता.
बऱ्याच वेळानंतर कुणाच्यातरी आवाजाने त्याला जाग आली. आपण एका झाडाखाली झोपलो आहोत, ही गोष्ट त्याच्या लक्षात यायला थोडा वेळ गेला. अर्धवट उठून बसला. त्याच्या डाव्या बाजूने अंदाजे चाळीस एक मेंढ्यांचा कळप धुरळा उडवीत, बें%% बें करीत चालला होता. धोतर नेसलेला, मोठ्ठं पागोटं डोक्याला बांधलेला एक पोरगेलासा धनगर त्यांच्या मागून हातातली काठी दगडांवर आपटीत, त्याच्या समोरून पुढे गेला. सोपाना मग सावध झाला. त्याला आता तरतरी आली. इकडे तिकडे बघत असताना त्याच्या लक्षात आले, की आपण अर्धा तास अंदाजे झोपलो होतो. त्या झोपेतच त्याला एक स्वप्न पडले होते. त्याने आठवायचा प्रयत्न केला. हळूहळू ते स्वप्न स्पष्टपणे त्याला आठवले. कुठल्यातरी घराच्या अंगणात आपण उभे आहोत नि कुणीतरी पाच पाच रुपयांची पांढरी जाडजूड नाणी त्याच्या हातात देत आहे. बोलत बोलत त्या समोरच्या माणसाचं सांगणं ऐकत आहोत. मान हलवत आहोत. कुठल्यातरी रस्त्याने पुन्हा चालत आहोत असं काहीतरी आठवलं.
हातात पिशवी घेऊन उठला. तिला हेलकावे देत चालायला लागला. चालता चालता त्याच्या ध्यानात आले. गावात आलो आहोत तर जगू धसाडेकडे एक चक्कर टाकू या. त्याचं शेंगाचं उत्पन्न यंदा बक्कळ आलं होतं. सहा महिन्यांपूर्वी उसनवार दिलेले पाचशे रुपये कदाचित परत मिळतील. कारण पाच पाच रुपयांची नाणी त्याला कोणीतरी आज दिली होती आणि हे स्वप्न भर दिवसा पडलेलं आहे. बघू या तरी, झालं तर झालं काम, नाहीतर एक चहाचा कप तर मिळेल.
पंधरा-वीस मिनिटांत तो कुंभारआळीत पोहोचला. जगू धसाडेचं घर कुंभारआळीच्या सुरुवातीलाच होतं. सोपानाचा अंदाज खरा ठरला. समोर अंगणात दरवर्षी कांदे पसरून ठेवलेले त्याला दिसत. आज मात्र नुकत्याच मळयातून आणलेल्या भुईमुगाच्या शेंगा अंगणभर वाळवायला पसरून ठेवलेल्या होत्या.
घराच्या पायऱ्या चढता चढताच त्याने 'जगो%बा'! अशी हाळी घातली, नि जगन्नाथबुवा त्याच्यासमोर एकदम दत्त म्हणून उभाच, ओटीवर टाकलेल्या घोंगडीवर दोघांची बैठक जमली.
''काय जगोबा, हायेस घरी, मला वाटलं कुठं मळयाबिळयात गेला असणार.''
''नाय बाबा, कालपासनं जरा उसंत मिळाली. भुईमूग उपटून आणला, हा काय 'पसऱ्या' टाकलाय वाळत. आज कसा काय टपकलास?''
''अगोदर, शेंगागूळ आण, मग बोलू.''
''नाय अरे, चाच सांगितलाय घरात, शेंगा काय खातोस. यंदा तुला पाठवतो घमेलंभर.''
''जग्या, मी काय म्हैस हाय काय, घमेलंभर खायला?''
''बोलायची पद्धत रे!''
''बरं, जरा बघतोस का, प्लास्टिकचा पाईप आणायचाय उद्या. सासवडचा बाजार हाय सोमवारी.''
''हां%%, पैशाचं काम म्हण की, बघतो घरात, बऱ्याच दिवसांनी आलाहेस, माझं काम तू केलंस, मी मग काय तुझं काम करणार नाय? असं कुठं झालंय का?''
चहापाणी, चुना, तंबाखू सगळा कार्यक्रम झकास झाला. मग जगोबा आत गेला, पाच मिनिटांत हातात नोटा घेऊनच आला, सोपानाला आनंद तर इतका झाला; पण त्याने चेहऱ्यावर तो दाखवला नाही.
''घे, माझी नड तू भागवली. घे त्या नोटा मोजून.''
जगू धसाडेने घोंगडीभर समोर पन्नासच्या नोटा ठेवल्या. पुन्हा सोपाना चमकला.
पाच पाच रुपयांची नाणी स्वप्नात नि पुन्हा पुढ्यात पन्नासाच्या नोटा आल्या, पाचाचा सबंध जुळला होता. जगूने आतमधूनच नोटा मोजून आणल्या होत्या. बरोबर पाचशे रुपये भरले.
''एकदम बरोब्बर आहेत.'' सोपाना जगूच्या मांडीवर थाप मारत बोलला.
''भुईमूग बरा आलाय म्हणायचा, बाकी.''
सोपानाला अडवत तो मध्येच म्हणाला, ''बरा काय, चांगलाच हाय, कालच्याला गिरणीवाल्याने शेंगा बघूनच हजारभर आडव्हान्स देऊन टाकलेत मला, तेलाच्या गिरणीलाच यंदा पाठवतो.''
.....
सोपाना घरी आनंदात परतला, ओटीवर चटई होती. रुबाबात पायऱ्या चढून आला. उशाला घोंगडी घेतली. विचारात बुडाला. मिटलेल्या डोळयांसमोर ते दुपारचे झाड आले. आपल्याला त्या झाडाखाली एक स्वप्न पडले. स्वप्नात पाच रुपयांची नाणी आली आणि स्वप्न खरे झाले, पाचशे रुपये लगेच मिळाले.
त्याने आपल्या बायकोला हाक मारली, ''भागीरथी, तुला आता घरात काही काम नसेल तर एका ठिकाणी जाऊन येऊ या.''
''आटपलंय काम, कुठं जायचंय?''
''घाटाच्या अलीकडे, वटपौर्णिमेला जशी तू वडाची पूजा करतेस ना, तशी पूजेची तयारी कर.''
''कशाला म्हण्ते मी?''
''अगं, अशाच एका झाडाची पूजा करायचीय.''
''झाडाची?''
''हां, म्हणजे ते सुद्धा वडासारखंच आहे. शंका काढत बसू नको, अमळशानं आपण निघायचं, अंधार व्हायच्या आत परतायचं.''
''बरं.... बरं.''
......
घरात राधामावशीला सांगून ती दोघं त्या झाडाकडे निघाली. अर्ध्या तासातच घाटाजवळ आली. सोपानाने ते एकुलते एक झाड बरोब्बर शोधून काढले. पाच मिनिटं तिथेच बसले. सोपानाने पूजेचं कारण तिला सांगितलं. तिलाबी ते पटलं. मग दोघांनी मिळून झाडाभोवती पाणी शिंपडलं, भागीरथीने वडाला प्रदक्षिणा घालतात तशा पाच फेऱ्या त्या झाडाभोवती पूर्ण केल्या. खोडाला हळद-कुंकू लावलं. झेंडूची-तगरीची फुलं पसरून ठेवली. गुळखोबरं पानावर ठेवलं. तांदूळ वाहिले. दोघांनी मिळून त्या झाडाला साष्टांग दंडवत घातले. डोक्यावरचा पदर खाली घेऊन कमरेला खोचला. तिथल्या सपाट जागेवर बसून लहानशी रांगोळी काढली. निरांजन पेटवून झाडासमोर ओवाळले.
बुंध्यावर गूळखोबरं ठेवलं. सगळं आटपलं नि दोघंबी कपडे झटकून उठले. सोपानाने पाण्याचा तांब्या उचलला, तेवढ्यात त्याला लांबून कुणाचातरी 'काय पावणं... रामराम पाव्हणं' असा आवाज आला. दोघंबी तिथंच थबकली. कोणीतरी गिरमेआळीतला ओळखीचा चेहरा त्याच्या पुढ्यात उभा राहिला.
''निघालेला दिसता... म्हटलं सोबत होईल... म्हणून साद दिली.''
''होय.... आटपून निघालोच होतो.''
''आटपून म्हणजे?... या झाडाची पूजा केलीय तुम्ही, कुठलं हाय हे, काय नावबीव?''
''काय तसं नाव माहीत नाही. पण करतो, वर्षातनं एकदा.'' सोपाना काय तरी बडबडला. काय सांगावं ते त्याला काहीच कळेना. तो पावणा तर त्याला एका पाठोपाठ एक प्रश्नच विचारत होता.
''तरी पण काय तरी कारण असेलच की; उगीच कोण कशाला- नाय- नाय म्हणजे काय... दोघं जोड्यानी आला म्हणून विचारलं.''
''हे झाड बाबा चांगलं शकुनी हाय असं म्हणतात, म्हणून वर्षातनं एकदा इथं येतो झालं.''
तिघंबी मिळून चालायला लागली. तो गिरमेआळीतला पावणा होता, सोपानाने त्याला तसं ओळखलं होतं. आठवड्याच्या बाजारात दर सोमवारी त्याला तो दिसायचा. चालता चालता दोघंबी इकडच्या तिकडच्या गप्पा मारत गावापर्यंत आले. पाठीमागून भागीरथी आली.
''बराय, चलतो; पण तुमी सांगितलं ते ध्यानात ठेवलंय, ते झाड शकुनी हाय म्हणता ते.'' सोपानाला त्याने झाडाची पुन्हा आठवण करून दिली आणि 'रामराम' करीत गावाकडे वळून दिसेनासा झाला.
....
सोमवारचा आठवड्याचा बाजार या वेळी जरा जोरात भरला होता. बेंदूर दोन दिवसांवर आला होत्या. प्रत्येक दुकानासमोर, बैलांच्या पाठीवर टाकायच्या रंगीत झालरी, गळयांत घालायचे पट्टे, नवे वळलेले वेगवेगळया रंगाचे दोरखंड, मण्यांच्या माळा, रंगीबेरंगी चकचकीत कागद, झिरमुळया, भिंतींना लावायचे रंग वगैरे वस्तू दुकानदारांनी दारासमोरच्या जागेत मांडून ठेवलेल्या दिसत होत्या. सोपानदेव साळीआळीतून कोपऱ्यावरच्या दुकानात आला, इतक्यात त्याला माळावर भेटलेला तो ओळखीचा माणूस भेटला. त्याने स्वत:च याला 'रामराम' करून ओळख दाखवली.
''पावणं, तुमी आमाला चांगलंच झाड दाखवलं बरं का, आमी त्या झाडाची पूजा करून आलो नि आमचा एक बरेच दिवस रखडलेला वेवहार एकदम मनासारखा जमून आला.''
''काय म्हणता, काम झालं?'' सोपानदेवाने त्याची जरा खोलात जाऊन चौकशी केली. ''ते कसं काय हो? म्हणजे जमिनीचा की काय?''
''तसंच म्हणा ना, पण ते झाड चांगलं सुलक्षणी हाय बरं का? वेवहार जमून आल्यावर मग आम्ही त्या झाडाची चांगली पूजाबिजा केली, गोड शेवयाच्या खिरीचा नैवेद्य दाखवला. आता प्रत्येक महिन्यात आमी जोडीने जातो, पूजाबिजा करतो. मनाला समाधान वाटतं, 'देवाचं देवपण माणसात असतं तसं झाडातबी असतं बरं का,' तुकारामानीच सांगितलंय, झाडं आपली सोयरे संबंधाची आहेत म्हणून.''
त्याने आग्रहाने सोपानाला जवळच्या हॉटेलात नेले. बुंदीचे लाडू मागविले, चहा दिला. एकमेकांची नावंगावं विचारून निरोप घेतला.
''ओळख असू द्या, भेटला म्हणजे.''
''अहो, दर आठवड्यात बाजारात असतो. भेटूच की.'' दोघं दोन दिशांना गेले.
....
सोपानदेवाच्या आळीत बरेचजण माळकरी होते. वशट न खाणारे, मंगळवार, गुरुवार, खंडोबाचा रविवार, देवीचा शुक्रवार आठवड्याचे चार दिवस उपवासाचे, त्यात एकादशी आली तर आणखी एक उपवासाचा दिवस वाढायचा, सोपानदेवाच्या भागीरथीच्या मनातलं तिच्या ओठात आलं. तिनं शेजारच्या चवऱ्याच्या बायकोला, समगीराच्या काकींना सगळं सांगितलं. दोन शब्द जोडून 'झाड शकुनी हाय' ही गोष्ट कर्णोपकर्णी झाली. आबा धुमाळांनी ठरवलं एकदा आपण आपला 'स्वाध्यायाचा वर्ग' त्या झाडाखाली घ्यायचा. त्यांच्या सांगण्याप्रमाणे वीस-पंचवीसांनी त्यांना मस्तपैकी सहकार्य केलं. सगळेजण त्या दिवशी आपापले जेवणाचे डबे घेऊन सकाळी त्या झाडाखाली पोहोचले. मग पहिली प्रार्थना, नंतर आबांचे गीतेवरचे निरुपण, वगैरे कार्यक्रम झाला. दुपारी जेवण सर्वांनी एकत्र घेतले. एक दोन तास आराम झाला. पुन्हा सगळया स्वाध्यायांनी गीतेचे सामुदायिक वाचन केले. संध्याकाळी सर्व गावोगावी परतले. सर्वांनी सहलीसारखा एक दिवस मजेत घालविला आणि कारणी लावला.
'स्वाध्याया'च्या कार्यक्रमाची गोष्ट ताकवले गुरुजींना समजली. गुरुजींची ज्ञानेश्वरीवर भलतीच भक्ती, त्यांनीसुद्धा ठरवून टाकले. दररोज घरी ज्ञानेश्वरी वाचतो. एकदा त्या झाडाखाली वाचन करावे. त्यांनी आपल्या नेहमीच्या श्रोत्यांना विचारून दिवस ठरविला. रविवार ठरविला. ताकवले गुरुजींच्या बरोबर बावडेकरगुरुजी, कुलकर्णीगुरुजी, खरे मास्तरसुद्धा तयार झाले. सर्वांनी मिळून प्रसादाकरिता एक किलो रवा, साखर, तूप सगळे साहित्य बरोबर घेतले. चुलवणासाठी लाकडे वगैरे जय्यत तयारी झाली. प्रसाद झाडाखाली करायचा ठरले. हां हां म्हणता चाळीसएक माणसं, त्यात दहा-बारा महिला होत्या.
ज्ञानेश्वरीच्या वाचनाअगोदर, त्या झाडाखाली स्वच्छता केली, रांगोळया घातल्या. चौरंगावर ग्रंथ ठेवून सामुदायिक पूजा झाली. मग दोन तास वाचन, आरत्या, प्रसाद वाटणे वगैरे छान कार्यक्रम झाला. गावातल्या एकाने कार्यक्रमाचा वृत्तांत लिहून तिथल्या स्थानिक साप्ताहिकात छापायला दिला. तो अनेकांच्या वाचनात आला. मग काहींना विषय मिळाला. चर्चा सुरू झाली. चर्चेबरोबर झाडाकडे ये-जा वाढली. तुरळक म्हणता म्हणता गर्दी व्हायला लागली. आबा धुमाळांचा आणि ताकवले गुरुजींचा कार्यक्रम झाल्यामुळे त्या जागेचे महत्त्व नक्की झाले.
ताकवलेगुरुजींना झाडाखालची जागा फार आवडली. त्यांनी त्या जागेला ''शांतिनिकेतन' नाव दिले. बरोबरच्या लोकांबरोबर बोलताना ते म्हणायचे, ''अहो, आपल्या शांतिनिकेतनमध्ये तो कार्यक्रम घेऊ या. आपले ज्ञानेश्वरीचे अध्याय पूर्ण झाले की तिथेच एक 'भंडारा' करू या म्हणजे ठरावीक आपले भक्तिमार्ग मंडळाचे जमतील, काय म्हणायचं तुम्हाला?
''कल्पना चांगली; पण सुट्टीचा दिवस ठरवा- म्हणजे चार माणसे आणि चार चौघांची वर्गणी जास्त जमेल.''
गुरुजींनी आखणी केली. झाड तसे गावाबाहेर फर्लांग-दोन फर्लांगावर होते; पण 'येणे-जाणे' वाढल्याने मग सवयीमुळे जवळचे वाटायला लागले.
भंडाऱ्याचा कार्यक्रम दणक्यात झाला, अगदी नाही नाही म्हणता तीन पंक्ती उठल्या. शंभरएक माणसं तरी त्या दिवशी जमली होती. काहींनी तिथे नारळ वाढवून खोबऱ्याचा प्रसाद वाटला. निघता निघता काही बायांनी मनातल्या मनात त्या झाडाला नवस बोलले. बुंध्याला हळद-कुंकू वाहून परतल्या.
सोपानदेवाच्या कानांवर या सर्व गोष्टी आल्या. झाडाला देवपण देण्यास आपण कारणीभूत आहोत, याचा त्याला अभिमान वाटायला लागला. त्याच्या अभिमानाचे रूपांतर मग पुढारीपणात व्हायला लागले. त्याने स्वत: त्याच्या आळीतील मित्राची मुद्दाम सोमवारच्या बाजारात भेट त्यासाठी घेतली. त्याने त्याचा बेत त्या जुन्या दोस्ताला सांगितला.
''एवीतेवी आपल्या शब्दांवरून आणि आपल्या वागण्यावरून बहुतेक लोक या देवाला ये-जा करताहेतच तेव्हा आपण पुढाकार घेऊन, या झाडाच्या बाजूला एक कट्टा नि वर सावलीसाठी चार खांब उभे करू या.''
''पण हे खर्चाचे काम झाले, सिमेंट, वाळू, दगड शिवाय मजुरी यांचा प्रश्न आलाचना?''
''ते होतंय सगळं वेवस्थित, मला थोडी साथ द्या, म्हणजे झालं.''
''ते कसं काय?''
सोपानदेवाने त्याला आपला प्लॅन सांगायला सुरुवात केली. त्यांचं नाव घुले होतं.
''बरं का घुले, आपण उद्या सरपंचाच्या ऑफिसात जाऊ जागेचं महत्त्व सांगू, बाकी मी बोलतो. तुमी हो ला हो म्हणा, आणि माझ्या प्रत्येक वाक्याला तुमचं वाक्य जोडा, माझ्या मनाची खात्री आहे, सरपंच पुढच्या वर्षी तालुका निवडणुकीला फॉर्म भरणार आहेत.'' लक्षात घ्या.
दुसऱ्या दिवशी घुले नि सोपान सरपंचाची गाठ घेण्यास गेले. कुणी नाहीत हे बघून दोघे रामराम करून आत जाऊन बसले. दोनचार कागदांवर सह्या मारून सरपंचांनी वर बघितले. सोपानदेव आणि सरपंच लहानपणापासूनचे दोस्त होते. ते एकमेकाला 'अरे तुरे' बोलत असत; पण सोपानदेव आपल्या जुन्या मित्राला चारचौघात मान देत असे. अहोजाहो म्हणत असे. सरपंचसुद्धा जुन्या दोस्ताला राव म्हणत असे.
''काय सोपानराव, कसा काय वेळ मिळाला?
''मोठ्या माणसांची गाठभेट घ्यायची म्हंजे वेळ काढायला लागतो.'' सोपानाने जबाब दिला.
''बोल बाबा, मोठ्या माणसाकडं काय काम काढलंस ते?''
सरपंचाने त्याचाच शब्द उचलला.
''माझ्या बरोबरचे हे घुलेमास्तर, आमचे काही अनुभव सांगायचे आहेत. तुम्हाला वेळ असला तर''
''वेळ आहे की, सांगा ना.'' घुले मास्तरांना नमस्कार केल्यासारखे हात जोडत, सरपंच बोलले.
''तुमच्या कानांवर काही नवं आलंच असंल की?'' सोपानरावाने प्रश्न टाकला.
''कशाबद्दल म्हणता? माझ्याकडे हजार लोक येतात- जातात, कोण काय सांगतं, तर कोण काय घरातलंच सांगत बसतं.''
''आपल्या नव्या देवस्थानाबद्दल.''
''काहीतरी उडत उडत आलंय, कानांवर! त्याचं, काय म्हणता?''
''सांगतो की स्पष्ट करून, तुमचा पुढचा बेत तालुका पंचायतीच्या निवडणुकीला उभा रहावयाचा आहे. तुमची महत्त्वाकांक्षा मला आवडली. तुम्ही जिद्दी आणि धोरणी आहात म्हणून...''
सोपानरावाला मध्येच अडवीत ते म्हणाले, ''माझी स्तुती जास्त करू नका, मोठेपणा देऊ नका, नाहीतर माझ्याकडून चांगली कामं व्हावयाची नाहीत. मीच गर्व करावयाला लागेन. महत्त्वाचं नि मुद्द्याचं बोलायचं.''
''सांगतो, जरा धीरानं घ्या, घुले मास्तरांना काही आणि मला काही झाडाबद्दल चांगले अनुभव आलेत ते ऐकून लोकांनी त्या झाडाला देवपण दिलंय. वातावरण चांगलं तयार झालं आहे. त्या ठिकाणी 'स्वाध्याय पाठ' आणि 'ज्ञानेश्वरी पारायणाचे' कार्यक्रम झालेत. आपण तिथे लोकांची उठण्या-बसण्याची सोय करायची, अधनं-मधनं तिथं जायचं.''
''तिकडं जायचं म्हणजे आमचा वेळ...'' सरपंचाची शंका.
''तुमाला उभं रहावयाचं की नाही?''
''तर''
''मग ऐकायचं माझं, तुम्हांला आता जनसंपर्क वाढवायला पाहिजे.'' सोपानरावाने खुलासा केला.
''जनसंपर्क? म्हणजे?''
''म्हणजे तुमच्याभोवती लोकांची गर्दी झाली पाहिजे, काय!''
''वाढवू की''
''काय?''
''जनसंपर्क म्हणजे गर्दी''
मग सोपानराव नि घुले मास्तर या दोघांनी त्यांना त्यांचा प्लॅन सांगितला, वर्गणी जमवायची, पावती पुस्तकं छापून घ्यायची वगैरे गोष्टी सुचवल्या, घुले मास्तरांना आपण समितीचे अध्यक्ष करू, सेक्रेटरी म्हणून मी काम पाहतो, तुम्ही सल्लागार, हितचिंतक म्हणून आमच्या या कमिटीवर राहायचं. हे सगळं आधी न करता एक प्रवचन तुमच्यातर्फे आयोजित करू या. त्या कार्यक्रमाच्या वेळी देवस्थान कमिटी डिक्लेअर करू अशी माझी आयडिया आहे. तुमचा पाठिंबा असला की सगळं सोपं होतंय.''
''ठीक आहे, पटलं. प्रवचनाला कोणाला आणावयाचं ते ठरवा. त्या कार्यक्रमाची सगळी व्यवस्था तुम्ही करा. तिकडे लाऊडस्पीकर लावता येणार नाही. कनात उभी करा, पाहुण्यांचं मानधन माझ्याकडून घ्या.''
सोपानदेव, घुले मास्तर, ताकवले गुरुजींच्याकडे गेले. त्यांना सामील करून घेतले. खरे, पोस्ट मास्तर, चिंचणीकर, आबा धुमाळ, बावडेकर गुरुजी, कामठे कॉन्ट्न्क्टर, नगरसेवक काटकर, डॉक्टर भालेराव यांच्या दोघांनी भेटीगाठी घेतल्या, स्टॉलवाल्या सातवांना निमंत्रण केले.
आपण शेती सांभाळून सामाजिक कार्य करीत आहोत, हे दाखविण्याकरिता जे जे शक्य होते ते ते त्यांनी केले. घुले मास्तर बोलवण्याच्या बाबतीत 'पोपट' होते. एकाने सांगावे नि ते घुले मास्तरांनी पुन्हा पुन्हा सांगावे, असे चालले होते.
गावातली काही पेन्शनरमंडळी दररोज सकाळी कुठेतरी जवळच्या रस्त्यावरून फिरत असत, या सर्व सेवानिवृत्त मंडळींनी आपला रस्ता बदलला. आता बरेच लोक या झाडाच्या दिशेने येऊ लागले. झाडाखाली थोडा वेळ आराम करून मग घरी परतायचे, या फिरण्यामुळे काहींना खरोखरच फायदा झाला. झाडाबद्दल लोक जास्त बोलू लागले. उत्तम झाड, उत्तम तब्येत असं बऱ्याच जणांना वाटायला लागले.
''अहो, माझा दमा कमी झाला!'' ''काही म्हणा झाडाखालची हवा भलतीच तेज हाय, आपलं सर्दीपडसं एकदम गायब झालं.''
''आपलीसुद्धा प्रकृती जरा सुधारली बरं का.''
अशा प्रकारचे संवाद आपसात होऊ लागले. झाड खरोखरच शुभशकुनी नि गुणकारी आहे. ही गोष्ट हळूहळू लोकांच्या मनात घर करू लागली. इतकं जवळचं गुण देणारं झाड आहे; त्यामुळे गावातले लोक येत-जात. आता त्यांचं ऐकून आजूबाजूच्या पंचक्रोशीतले शेतकरी आणि सुशिक्षित मंडळीसुद्धा आपापल्या बैलगाड्या, फटफट्या घेऊन यायला लागली.
घुले मास्तरांनी त्यांच्या ओळखीच्या एका प्रवचनकाराला कोरेगावला पत्र पाठविले. ते गृहस्थ एकेक-दोन दोन तास श्रोत्यांना एकाच जागी खिळवून ठेवत. अतिशय मिठ्ठास वाणी, दृष्टांतांची मांदियाळी आणि अभ्यासूवृत्ती, यामुळे प्रवचनकार म्हणून त्यांची ख्याती होती. कोरेगाव, सातारा, कराड, पाटण भागांत त्यांचं नाव सगळयांना पाठ होतं. ह. भ. पांडुरंगशास्त्री पाटणकर.
पाटणकरशास्त्रींचे प्रवचन ठरल्यानंतर तिथल्या पत्रकार मंडळींनी वर्तमानपत्रात कार्यक्रमाची माहिती दिली. सुट्टीचा दिवस निवडल्यामुळे नोकरदार मंडळींना दिवस सोयीचा झाला. सरपंचांनी कनातीचे कॉन्ट्न्ॅक्ट कामठेला दिले, त्याने सोबतीला बारघडेला घेतले. त्यांच्या टेम्पोच्या दोन-चार फेऱ्या झाल्या. शनिवारच्या संध्याकाळीच बारा तास अगोदर कनात उभी राहिली. त्यांनी तिथे 'ओपन एअर थिएटर' तयार केले, बारघडेने पाच-सहा सतरंज्या आणल्या, मस्तपैकी प्रवेशद्वार बनविले. पांडुरंगशास्त्र्यांची राहायची व्यवस्था घुलेंनी त्यांच्या वाड्यात केली.
रविवारी संध्याकाळी कार्यक्रम होता. सरपंच बागवे आणि उपसरपंच चव्हाणबाइंर्नी दोघांनी कनातीच्या प्रवेशद्वाराजवळ आपापली दोन-दोन माणसे बसविली. त्यांच्याकडे देणगीची पावतीपुस्तके देऊन ठेवली. चार-पाचपासून लोक यायला सुरुवात झाली.
बरोबर सहा वाजता गुरुजी सोपानदेवराव, बागवे, सरपंच, ह. भ. प. पांडुरंगशास्त्री पाटणकरांना घेऊन झाडाजवळ आले. तिथल्या मंडळींनी त्यांचे आगतस्वागत केलं. गुरुवर्यांनी पांडुरंगशास्त्रींना नव्या देवस्थानाबद्दल म्हणजे शुभशकुनी झाडाविषयी बरेच काही सांगितले होते. त्यामुळे शास्त्री तयारीत आले होते. शास्त्रींना फुलांचा हार देऊन सरपंच बागवे त्यांच्या पायावर डोकं ठेवून पाया पडले. गुरुजींनी फुलांचा गुच्छ दिला. टाळांचा दणक्यांनी टाळयांचा कडकडाट झाला. आख्यानाला प्रारंभ करतानाच शास्त्रींनी तुकारामांचा अभंग निरुपणाला घेतला. ''वृक्षवल्ली आम्हा सोयरीं वनचरीं'' मग झाडावर आख्यान सुरू केलं. शास्त्रीबुवांनी गाडगेमहाराजांच्या पद्धतीने सुरुवात केली. ते म्हणाले, ''वृक्ष म्हणजे झाड, झाड हे साधुपुरुष आहे, किंबहुना साधूच्यापेक्षा श्रेष्ठ आहे.'' त्यांनी एक संस्कृत श्लोक सांगितला व स्पष्टीकरण केले, ''ते आपल्याला सावली देते, फुले देते, फळे देते; पण आपणाकडून काहीच घेत नाही.''
''जन्माला आल्यापासून आपल्याला त्याचा उपयोग, बंधूंनो, लहान मूल कशात झोपतं!''
''पाळण्यात.''
शास्त्रींनी दुसरा प्रश्न विचारला, ''पाळणा कशापासून तयार करतात!''
उत्तर मिळालं, ''लाकडापासून!''
पुन्हा प्रश्न केला. ''लाकूड कोण देतं!''
''झाड!'' सर्वांनी उत्तर दिलं.
''माणसं घर कशापासून बांधतात?''
''लाकडापासून!''
''लाकूड कोण देतं?''
''झाड!''
''माणूस कशावर झोपतो?''
''खाटेवर!''
''खाट कशापासून तयार करतात?''
''लाकडापासून!''
''लाकूड कोण देतं?''
''झाड!''
''आपण नदीच्या पलीकडे पाण्यातून जातो, तेव्हा नाव- होडी वापरतो, ही नाव कशापासून तयार होते, बंधूंनो?''
''लाकडापासून!''
''म्हणजे लाकडपासून पाळणा, पलंग, होडी, घर तयार होतं. आपल्यावर या झाडाचे किती उपकार आहेत, खायला फळे मिळतात, पूजेला फुलं मिळतात हे सर्व आपल्याला वृक्ष म्हणजे झाड देते. झाडाचं देवपण हेच आहे. आपल्याला जसं घर तसं सगळया पाखरांना, पक्ष्यांना झाड हेच घर असते. पाखरांची पिल्लं, झाडावर घरट्यात जन्मतात, झाडावरच मोठी होतात नि झाडावर राहतात, बंधूंनो, झाडाचं महत्त्व आपल्याला विसरता येणार नाही.''
थोडा वेळ शास्त्रींनी एका अभंगाच्या ओळी चालीवर म्हटल्या, मृदुंगाची साथ मिळाली. टाळ तालात वाजले. श्रोते प्रवचनात गुंगले, थोड्या वेळाने मृदुंगाचा व टाळांचा गजर थांबला, मग पांडुरंगशास्त्री हलक्या आवाजात म्हणाले, ''बंधूंनो, हे झाड आपल्याला आयुष्यभर सोबत देते ना?''
सर्वांनी मोठ्याने आवाजात उत्तर दिले.
''हो%%!''
शास्त्रीबुवा पुन्हा हलक्या आवाजात म्हणाले, ''बंधूंनो, आपण जेव्हा निजधामाकडे निघतो, तेव्हासुद्धा आपल्याबरोबर या झाडाची लाकडेच असतात.'' त्यांनी दोन्ही हात वर केले, पुन्हा टाळांच्या दणदणाट आणि मृदुंगाची धुमाळी वाजली.
''तुळशीचे झाड, वडाचे झाड, पिंपळाचे झाड, सागाचे झाड, तसेच आपले हे झाड. अरे, परमेश्वर सगळीकडे आहे.''
''जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी'' शास्त्रीबुवा बोलत होते. समोरचे सर्व लोक कान देऊन ऐकत होते. संपूर्ण आख्यान तास-दीड तास चालले, नंतर भजनाचा कार्यक्रम झाला. सर्वांना कार्यक्रम आवडला. त्याबरोबर झाडाचे महत्त्व सगळयांच्या मनावर बिंबलं. कार्यक्रमाचा हेतू सफल झाला, भंडारा झाला, देणगी पुस्तकं तर सगळी भरून गेली. तो सबंध कार्यक्रम म्हणजे 'आनंदाचे डोही आनंद तरंग' असा लाजवाब झाला.
दुसऱ्या दिवशी नाना फोटोग्राफरने घेतलेले त्यांच्याकडचे, कार्यक्रमाचे फोटो होते, तेवढे सगळया वार्ताहरांना दिले. कार्यक्रमामुळे गावाचे नाव बहुतेक वर्तमानपत्रात आले. फोटोमुळे सरपंच, उपसरपंच, कार्यकर्ते यांचे फोटो पेपरमध्ये त्यांच्या आयुष्यात प्रथमच छापून आले. सर्वांच्या कामांची प्रशंसा झाली होती. घराघरात प्रत्येकाने वर्तमानपत्र नेले. कार्यक्रमाचा वृत्तांत आला. गावाचे नाव, तसेच काहींची नावे छापून आल्यामुळे तो दिवस सगळयांना 'सोनियाचा दिवस' वाटला.
आता दररोज त्या झाडाची पूजा-व्यवस्था पाहण्याकरिता कोणीतरी कारभारी हवा होता. मग उपसरपंचांनी त्यांच्या मोकळया असलेल्या भालेरावाला ते काम दिले. भालेराव दररोज सकाळी उठून तेथे जायचा. जाताना एक कळशीभर पाणी खांद्यावरून न्यायचा. पाणी शिंपडून सडा-रांगोळी काढायचा. अधूनमधून कुणीना कुणी फुलांचे पुडे घेऊन यायचं. मग झाडाची गंध अक्षतांसह फुले वाहून पूजा होऊ लागली.
..........
आण्णा महामुनी गावातील एक हौशी आणि सोशल आसामी. आपण सर्व ठिकाणी वावरलं पाहिजे, अशा मताचा पण नोकरीत अडकल्यामुळे आणि 'अप अँड डाऊन' करण्यात सगळा दिवस जात असल्यामुळे त्यांना आवड असूनही त्यांच्या शब्दांत सांगायचे म्हणजे 'सोशल राहायला पाहिजे, सोशल काम केलं पाहिजे' आता ते नुकतेच सरकारी भाषेत 'सेवानिवृत्त' झाले होते. भरपूर मोकळा वेळ होता. त्यामुळे सरपंच, उपसरपंच व भाऊसाहेब तलाठी यांच्यासोबत राहून त्यांनी या नव्या देवस्थानची माहिती घेतली होती. स्वत: मोकळे होतेच. सारं गाव त्यांना ओळखीत होतं. कारण कंडक्टरची नोकरी अठ्ठावीस वर्षे केली होती. आता कंडक्टर आण्णा पांढरा पायजमा, वर पांढरा शर्ट किंवा सदरा, डोक्यावर पांढरी टोपी अशा पोषाखात गावभर फिरत होते. फक्त समारंभाच्या दिवशी किंवा एखाद्या सभेला जाताना राखाडी रंगाचे जाकीट वापरत होते. ते प्रत्येक कार्यात पुढारीपण करायला तयार असत.
आपण या नव्या देवस्थानचा एक ट्न्स्ट करायचा आणि तो पुढे चालवायचा असं ठरवलं. आपले जवळचे मित्र त्यांनी अधिक जवळ केले. त्या झाडाकडे आपल्या मित्रांचा 'ग्रुप' घेऊन ते प्रत्येक दिवशी जाऊ लागले. जाकिटाच्या दोन्ही खिशांत हात घालून सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात मोठ्याने बोलावयाचे ''आपण येथे एक शेड उभी करू या. मी आमच्या सायबाला गावाकडे येणारी एक एस. टी. आणायला सांगतो.''
''एस. टी.?'' कुणीतरी विचारायचं.
''मग, भितो काय मी, याला एक महिन्यात गाडी चालू करतो की नाही बघा.''
बाकी आण्णाच्या बोलण्यात आत्मविश्वास खूप असायचा.
आण्णा सहज बोलला; पण त्याच्या साहेबाने त्याचा मुद्दा लक्षात ठेवला.
गावातल्या काही रिक्षा त्या झाडाकडे अधनंमधनं फेऱ्या मारीत होत्याच. एखादी फॅमिली पॅसेंजर मिळाली तर मग स्टँडवरून जीपसुद्धा त्या झाडाकडे, 'रिटर्नचार्ज' घेऊन जायची. एकूण काय रहदारी वाढली होती, आता वाहतूक सुरू झाली.
सरपंच, उपसरपंच, सोपानराव, घुले गुरुजी यांनी दरम्यानच्या काळात प्रवचनाच्या वेळी जमलेल्या देणगीच्या पैशातून त्या झाडानजीक एक चौकोनी ओटा बांधला. बाजूला दोन सिमेंटची बाकं आणून टेकवली.
महाशिवरात्र दोन दिवसांवर आली होती. जगन्नाथ धसाडेने शेतातली रताळी काढून अंगणात ढीग केला होता. आण्णा महामुनी आपल्या मित्रांना घेऊन त्याच्या घरी आला. आण्णा आणि जगन्नाथ धसाडे मराठी शाळेतले जुने दोस्त. नंतर आण्णा एस. टी.मध्ये घुसला, जगन्नाथला शेतजमीन भरपूर होती म्हणून तो गावालाच शेती सांभाळत राहिला. 'चार पैसे' बाळगणारा तो सधन शेतकरी होता. त्यामुळे त्याची आठवण आण्णाला अगोदर झाली.
''जगन्नाथबुवा, आपल्याला एक देवस्थान ट्न्स्ट तयार करायचा, त्यात मला तू पाहिजेस, काय?'' ''आहे ना.'' माझ्याकडून पहिली देणगीची पावती फाडणार हे मला माहीत आहे.
''अरे, ट्न्स्ट उभा करायचा आहे, तुला प्रमुख विश्वस्त करणार आहे. काय समजलास, तयार आहेस ना?''
''यस, घ्या नाव लिहून.''
आण्णांनी कागद काढले रुबाबात आण्णाचं नाव टाकलं. खाली उपाध्यक्ष म्हणून सरपंचाचं नाव टाकलं. उपसरपंचाला प्रमुख कार्यवाह नेमलं, कोषाध्यक्ष म्हणून स्वत:चं नाव, कोणालाही न विचारता लिहून टाकलं. कागद धसाडेच्या समोर ठेवला. त्यांची संपूर्ण सही घेतली. स्वत:ची सही नावापुढे केली. सभासद म्हणून सोबतच्या दोन्ही जोडीदारांची नावं लिहून टाकली. त्यांच्या सह्या घेतल्या. मग स्वत:च्या हाताने त्यांनी दुसरी एक प्रत 'कॉपी' तयार केली. पुन्हा त्या कागदावर सगळयांच्या सह्या गोळा केल्या.
एका सकाळी बागवे सरपंचाची संमती, सह्या दोन्ही कागदावर घेऊन त्यानं, मग उपसरपंचांना गाठलं. सरपंचांची सही बघून मग त्यांनीसुद्धा त्या कागदावर दोन सह्या दिल्या. मोठं काम झालं. आता ट्न्स्ट तयार झाला. आण्णांच्या खिशात कागद आणि गावात फिरायला डोक्यात विषय मिळाला.
माळरानावरच्या झाडाजवळ सिमेंटचा ओटा आणि गावातल्या लोकांत ट्न्स्ट. दोन गोष्टी दोन ठिकाणी तयार झाल्या. कामाला गती आली.
श्रद्धा ही मनुष्यप्राण्याची गरज आहे. त्या गरजेमुळेच मनुष्य कुणाला जोडत असतो, कुठेतरी पाय किंवा पायरी शोधून आपले मस्तक टेकवीत असतो. आण्णाला हे सारे समजत होते, आणि आता आपोआप एक वातावरण तयार होत होते. सगळयांची गरज पूर्ण होत होती. पूजन, भजन, कीर्तन, प्रवचन, भंडाऱ्यासाठी एक स्थळ तयार होत गेले. ''माझे तन, मन, धन आता मी या कार्यासाठी वाहून देणार आहे'' असे त्याने सर्वांना सांगून टाकले होते; पण तसा तो व्यावहारिक असल्यामुळे 'धन' इतरांकडून कसे मिळवता येईल, याचीच जास्त काळजी घेत होता. तनमन मात्र कार्यासाठी देत होता. आत्तापर्यंत आण्णा महामुनी एस. टी. कंडक्टर म्हणून ओळखला जात होता. येथून पुढे तो 'देवस्थानचा ट्न्स्टी' म्हणून वागायला लागला. स्वत:च्या खिशात 'विश्वस्त' म्हणून एक स्टँप ठेवायला सुरुवात केली होती.
पुढारीपणाची हौस आता पुरी करायला चांगली संधी मिळाली होती. सरपंचाचे कार्यालय, पंचायत समितीचे कार्यालय, एवढेच काय पण तो आता जिल्हा परिषदेच्या कार्यालयातसुद्धा 'देवस्थानचा ट्न्स्टी' म्हणून व्हरांड्यात फिरू लागला.
एक दिवस त्याने खोमणे, मेमाणे गुरुजी, उपसरपंच चव्हाणताई या सर्वांना घेऊन, त्याच्या एस. टी.च्या ऑफिसात घेऊन गेला.
प्रत्येक कंडक्टरची नि ड्नयव्हरची चौकशी करत तो ऑफिसात घुसला. डेपो मॅनेजरच्या ऑफिसात जाताच त्याने साहेबाला एक सॅल्यूट ठोकला. सगळयांना बसायला खुर्च्या आणावयाला सांगितल्या.
''काय आज कुठलं शिष्टमंडळ घेऊन आला?'' साहेबांचा प्रश्न. ''सांगतो सगळं, काम सांगतो'' सगळयात अगोदर उपसरपंच चव्हाणबाइंर्ची ओळख करून दिली ''या आमच्या उपसरपंच, हे मिस्टर खोमणे पतपेढीचे डायरेक्टर, हे मेमाणे गुरुजी.'' अशी सर्वांची ओळख करून दिली.
''आमच्याकडे, गावाकडे दोन गाड्या आपल्याकडे जातात, त्यातली एक गाडी वस्तीला असते. ती गाडी जरा पुढे फर्लांगभर न्यायची, गाडीला पॅसेंजर भरपूर आहेत. लोकांची सेवा नि सोय, आपलं उत्पन्न दोन्ही फायद्यात. हा अर्ज, दोन कॉप्या आहेत. एक डिव्हिजनला, एक तुमच्याकडे.''
आण्णाने आणि त्याच्याबरोबरच्या सगळयांनी त्याच्या बोलण्याला दुजोरा दिला, पंधरा-वीस मिनिटे चर्चा झाली, गाडीचा प्रस्ताव त्याच दिवशी पाठविला गेला.
फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला, पहिली जरा नवी असलेली एस. टी. गावाचा थांबा घेऊन झाडाजवळ येऊन थांबली.
आण्णा महामुनी आपल्या चार मित्रांना घेऊन खाली उतरले. झाडाची पूजा झाली. दोन नारळ फुटले, खोबरं वाटलं गेलं. ड्नयव्हरने शंका काढली, ''आता नक्की कुठल्या जागी गाडी दररोज थांबायची ती जागा कळू द्या की!''
''हाततिच्या, हा बघ हा मोठा दगड, इथे उभी करा. उद्यापासून आठ दिवसांत शेड तयार होईल आणि खरंच, आठ दिवस व्हायच्या आधीच तेथे एस. टी.चा 'रिप्ेस्ट थांबा', पत्र्याची शेड आली. सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक, फोटोग्राफर नाना वगैरे सगळे हजर होते. लहानसा समारंभ झाला. सरपंचांनी ड्नयव्हरच्या हातात फुलांचा गुच्छ, नारळ दिला. त्याने सरपंचाच्या पायाला हात लावला. आण्णांनी ट्न्स्टच्यावतीने एक दोन मिनिटे भाषण ठोकलं. ट्न्स्टच्या पैशातून आणलेले पेढे वाटण्यात आले.
दुसऱ्या दिवशी सगळया वर्तमानपत्रांत समारंभाचे फोटो प्रसिद्ध झाले. आजूबाजूच्या लोकांना समजले. झाडापर्यंत जायला एस. टी. सुरू झालीय, मग काय! भाविकांना काय तोटा, गर्दी वाढत होती; झाडाखाली आता पैशांची चिल्लरसुद्धा वाढत चालली, ''हल्ली गल्ला चांगला जमायला लागला आहे, बरं का!'' कुणीतरी चव्हाणबाइंर्च्या कानाजवळ बोललं.
''गल्ला! कुठला?''
''झाडाजवळ भाविकांची गर्दी वाढतेय.''
''ते होय, मग गल्ला काय म्हणता, ती 'दक्षिणा' म्हणा की!'' उपसरपंच चव्हाणबाई तडकल्या.
''आपण त्यावर विचार केला पाहिजे.
एक दक्षिणापेटी ठेवली पाहिजे.
ट्न्स्टच्याकडून व्यवस्था करू या.''
मग गावातल्या सुताराकडून 'देवस्थानाला देणगी' म्हणून एक लाकडाची पेटी तयार करून घेतली. भालेरावांच्या ताब्यात दिली. दररोज हिशोब ठेवायला सांगितले. दक्षिणेबरोबरच आता अधूनमधून नारळ येऊ लागले. फुलांचे हार, गुच्छ, खडीसाखरेच्या पुड्या, उदबत्त्यांचे पुडे, बरंच काही जमायला लागलं.
वाहतूक फायद्यात आहे, हे पाहून आजूबाजूच्या प्रत्येक डेपोने दर सोमवारी एक 'स्पेशल' एस. टी. सोडायला सुरुवात केली. एस. टी.च्या पाठोपाठ नेहमीप्रमाणे, इतरत्र दिसते, तसेच झाले, पाठोपाठ जीपगाड्या ये-जा करू लागल्या.
जाकिटाच्या दोन्ही बाजूच्या दोन्ही खिशात हात घालून आण्णा महामुनी पुढाऱ्याच्या ऐटीनं फिरत होता. चांगला धोरणी असल्यामुळे, कुणाकुणाला कशाकरिता गुंतवायचे हे त्याला सुचू लागले. काही वर्षांपूर्वी गावामध्ये हायस्कूल काढण्यात त्याने पुढाकार घेतला होता. तेव्हा तो जवानीत होता. त्यामुळे वाऱ्यासारखा फिरत होता. आता जरा दमादमानं एकाएकाची भेट घेऊ लागला. त्यात हल्ली फोनची चांगली सोय झालेली. अगोदर चौकशी करून मग भेट घेत असे.
आज गुरुवार असल्यामुळे काहींना आठवड्याचा ऑफ होता. कुलकर्णीला सुट्टी होती. कुलकर्णी भाजपाचा कार्यकर्ता होता. आण्णा आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन सकाळीच त्यांच्याकडे गेला. दोन्ही हातांनी एक नमस्कार केला. ''या पुढारी, सकाळी सकाळी!''
''पुढारी कसले, लोकसेवक म्हणा, तुमी जनतेची सेवा करता, आम्ही लोकांची सेवा करतो. गुरुवारी तुम्हांला सुट्टी, म्हणून आलो'' आण्णाने चटईवर मांडी घालून बसून खुलासा करायला सुरुवात केली. ''चहा ठेवायला सांगा, तीन कप. तुमाला पाहिजे असेल तर एक जादा.'' आण्णा स्वयंपाकघराकडे बघत बोलला. ''सांगायला लागत नाही इथे, माणसं दिसली की चहा तयार केला जातो, आज नाही बाबा, दररोज.'' कुलकर्णी सुपारी कातरीत बोलले.
''त्याचं काय आहे, आपल्या त्या माळावरच्या देवस्थानाला भाविकमंडळी खूप यायला लागली आहेत. तुमच्याकडून आमाला पाण्याची व्यवस्था व्हावी असे वाटते!''
''करू या, काय करायचं!''
''एक पाण्याची टाकी पक्षातर्फे मिळावी.''
''पाण्याच्या टाकीत पाणी?''
''ती व्यवस्था आम्ही ग्रुपग्रामपंचायतीकडे देणार, तुमची टाकी आली की पाण्याचा प्रश्न निघणार. ठराव आणू मीटिंगमध्ये, ट्न्स्ट आहे आमचा, आताच पंधरा लोक कार्यकारणीत आहेत. तुमचं नाव अगोदरच टाकलंय त्यात!''
''माझं नाव घेतलं?''
''तर, सर्वपक्षीय ट्न्स्ट आहे.''
शिवसेनेच्या वाल्मीकीचं नाव, राष्ट्न्वादी काँग्रेसच्या जगतापाचं नाव, राष्ट्नीय काँग्रेसच्या कदमांचं, नि राष्ट्न्सेवादलाच्या समाजवादी पवाराचं नाव आहे. धार्मिक कार्य, सामाजिक कार्य म्हटलं की सर्वगुणसंपन्न लोक निवडावे लागतात, त्यात तुम्ही एक''. ''ठीक आहे. आमच्या सभासदांना सांगून व्यवस्था करू. आठवडा तरी जाईल.''
''काही हरकत नाही, तोपर्यंत दरम्यानच्या काळात, जगतापांच्याकडून टाकीसाठी ओटा तयार करून घेऊ.''
''सिमेंटचा ओटा आहे ना?''
''अहो, ते स्टेज तयार केलंय, आता वेगळा उंच करून घ्यायचा.'' बैठक अर्ध्या तासात आटोपली, टाकीचं काम होणार, आता ओट्याखाली संध्याकाळी जगतापआळीत जायचं सर्वांनी ठरवलं.
एका देवस्थानामुळे आपल्या गावाचे नाव, आपले नाव, आपला फोटो पेपरमध्ये छापून यायला लागला. हा पेपर हजारांत, लाखात छापत असणार, सगळया गावातून, तालुक्यातून नि जिल्ह्यातून जातात, म्हणजे आपलं नाव यामुळे सगळया लोकांना माहीत होतंय, हे छान होतंय. सरपंच बागवे मनातून आनंदी झाले होते. तालुक्याच्या निवडणुकीला आता उभं राहायला हरकत नाही. त्यांनी गावात सोपानरावाला निरोप पाठवला. घरच्या ओट्यावर मीटिंग बोलावली. दोन-चार दिवस निरोपांवर निरोप पाठविले. मीटिंगसाठी पाचपंचवीस लोक तयार केले.
सोपानराव, घुले मास्तर, इनामदार गुरुजी, काझी गुरुजी, जगतापआळीतले शिवसेनेचे तरुण कार्यकर्ते, बजरंग दलाचे मंडळ, वंदेमातरम संघटनेचे वगैरे बरेच लोक आले, गर्दी बघून ओटीवरची मीटिंग अंगणात घेतली. सुरुवातीलाच, सगळयांना चहापाणी झालं. मीटिंग संपल्यावर पुन्हा अल्पोपहार ठेवला. लोकांच्या गर्दीत भुईमुगाच्या भाजलेल्या शेंगांची दोन ताटं भरून ठेवली. शेंगा खाताखाता मीटिंग सुरू झाली.
मीटिंगचा उद्देश त्याने प्रथमच सांगून टाकला.
''तुमचे हात म्हणजे माझे हात, तुमचे शब्द, हेच माझे शब्द असं मी समजतो, मी व्याख्यानबाजी करणार नाही, जे काही भलंबुरं बोलायचं ते तुम्ही बोला, मी फक्त उभा राहणार आहे.''
बागवे सरपंचांनी सगळयांच्या काळजालाच हात घातला. आपापसात चर्चा सुरू झाली. तेवढ्यात सोपानराव, कालिदास कुलकर्णींनी हात वर केले.
''बोला बोला!'' सरपंचांनी ताटातली शेंग उचलली.
''माझी एक कल्पना, यांना, कुलकर्णीसरांना सांगितलीय ते सांगतील-'' सोपानदेवाने आवाज दिला.
''कुलकर्णीसर उभे राहिले. ते बोलायला लागले, ''काय आहे आपल्या नवीन देवस्थानाला भेट देणारे भक्त वाढत चाललेत. त्यांना थांबायला सावली नाही. याकरिता एक लहानशी धर्मशाळा उभी करू या. त्या धर्मशाळेच्या निमित्ताने आपला जनसंपर्क नि आपले नाव पुढे जाईल. म्हणजे तुम्ही पुढे व्हा आम्ही तुमच्या मागे आहोत.'' धर्मशाळेच्या बांधकामाकरिता तुम्ही देणगी जाहीर करा. सगळया पेपरांतून आपला 'संकल्प' छापून आणावयाचा. आम्ही देणगी गोळा करू.'' काझी गुरुजींनी आपली संमती जाहीर केली.'' आमचे सगळे लोक तुमच्याबरोबर आहेत.''
मग कुलकर्णी, पुरंदरे, जोशी यांनी दोन कागद तयार केले. सगळयांच्या सह्या झाल्या. पावतीपुस्तके कोणाकोणाकडे द्यायची, त्याची यादी तयार झाली. मीटिंग संपता संपता कांद्याची भजी, भाजलेल्या शेंगा यांची ताटं फिरत राहिली. समारोप बागवे सरपंचांनी पुन्हा तेच भाषण करून केला. मीटिंग संपता संपता लाईट डीम झाला, विजेचे दिवे थंड झाले. मग घरातून कोणीतरी कंदील लावून आणला. मधोमध ठेवला.
उठता उठता काहींनी मूठमूठ शेंगा उचलल्या. सरपंच कंदील घेऊन दरवाजात उभे राहिले. उंबरा दाखवून ''सावकाश खाली बघा'' म्हणत राहिले. एकेक बाहेर जायला लागला. तेवढ्यात सोपानरावाची ट्यूब पेटली, त्याने आवाज दिला ''सरपंच, आपलं निवडणूक चिन्ह 'कंदील'!''
दोनचार दिवस पाखरांसारखे उडून गेले. शनिवार उजाडला गावात पहिल्या एस. टी.ने वर्तमानपत्रांचा गठ्ठा आला. पेपर घरोघर पोहोचले. सरपंचांचा तालुका पंचायतीचा निवडणूक निर्णय सगळयांच्या वाचनात आला. ''बागवे सरपंच तालुका पंचायत निवडणुकीला उभे राहणार'' ही बातमी गावात वणव्यासारखी पसरली. साळीआळी, माळीआळी, गिरमेआळी अशा सर्व भागांत एकच चर्चा-एकच विषय ''बागव्यांची निवडणूक.''
आण्णा महामुनींना समजले, बागवे निवडणूक लढवणार आहेत. दोन्ही हात आपल्या जाकिटाच्या दोन्ही खिशांत घालून नेहमीप्रमाणे घरात दोन फेऱ्या मारल्या. काहीतरी ठरविले. ट्न्स्टची फाईल हातात घेऊन ते बाहेर पडले.
सरळ जगतापआळीत घुसले. आपल्या दोन दोस्तांना घेऊन मामा पवारांच्या माडीवर पोहोचले. तिथला पेपर उचलला, त्यांच्यासमोर उलगडला. मधल्या पानावरची बातमी त्यांना दाखवली. तिथेच बोट ठेवले. दोघांनी मोठ्याने वाचन केले, नंतर 'वा वा' करून दोन मिनिटे मोठ्याने हसत राहिले. ''छान.... छान आपल्या गावातली माणसं तालुक्याला जाताहेत, याचा आनंद आहे, उद्या जिल्हा परिषदेला जातील. परवा विधानसभेला जातील. छान छान!''
मग ते आण्णांकडे एक कटाक्ष टाकीत म्हणाले, ''तुमचं यावर काय मत!''
''अहो, धर्म नि राजकारण यांची गल्लत नको- मी देवस्थानकडे लक्ष देतो, सगळया व्यवस्था करतोय, एस. टी. सुरू केली, शेड आणली.''
''मग?''
''आमचं मत तुम्ही का नाही उभे राहात? पंचायतीच्या या निवडणुका आता जवळ आल्यात.'' त्यांना अडवीत पवार म्हणाले, ''आपण देवस्थान बघतोय. इतर गोष्टी आहेत- शिवाय श्रद्धा मनुष्यप्राण्याची गरज आहे, त्या गरजेमुळे माणूस देवळात जातो, अस्तित्वात असणाऱ्या किंवा नसणाऱ्या परमेश्वर नावाच्या शक्तीशी माणूस आपलं नातं जोडून इच्छितो, म्हणून आपण या देवस्थानाकडे जादा लक्ष देऊ या.''
''पवारसाहेब, तुम्ही भाषण देऊ नका, मुद्द्याचं काय ते सांगा.''
''मला निवडणूक नको बुवा!''
''तुमच्यासारख्यांनी असं बोलायचं- मग आम्ही दुसऱ्या कोणाला आमच्या मनातलं सांगायचं?''
''खूप आहेत, आपले कार्यकर्ते काय कमी आहेत. निवडा आणखी एक, काय?''
रावसाहेब बोलता बोलता थोडावेळ थांबले. समोर त्या चौघांकडे रोखून पाहात बोलले.
आण्णा महामुनी तुम्ही या देवस्थानाला नावारूपाला आणलं. तुमच्यामुळे गावाचं नाव वर्तमानपत्रात दररोज छापून यायला लागलंय. विचारा यांना?''
सगळे माना डोलावत होते. ''हो हो' म्हणत होते. पवारसाहेब आण्णांची स्तुती करत होते. बोलता बोलता एकदम थांबले. नि आण्णांच्या जाकिटावर हात मारत म्हणाले, ''आण्णा महामुनींचं नावसुद्धा आता गाजतंय, आण्णा महामुनींना आपण या पंचायतीच्या निवडणुकीला उभं करू या, काय म्हणायचंय?'' ''एकदम कबूल!'' सगळे ओरडले.
''मी उभा राहू?''
''हां, आम्ही आहोत ना, एकसे भले दो!''
''चालेल- चालेल!'' मामांचे मित्र त्यांच्या पाठीवर हात ठेवत म्हणाले,'' यांना स्वतंत्र उमेदवार म्हणून उभं करू, यांना वेगळे चिन्ह देऊ, यांची निवडणूक निशाणी कोणती?''
''सध्या, आण्णा कोणाचं कार्य करताहेत?'' रावसाहेबांनी विचारलं.
''देवस्थानाचं!''
''मग यांचं निवडणूक चिन्ह आपलं 'झाड' असणार.''
आण्णा महामुनी गप्पच होते.
मग थोडा वेळ आपापसात चर्चा झाली. त्याचे समवयस्क मित्र राजू जगताप यांनी लगेच एक फुलस्केप त्यांच्याच फाइलीमधून काढला. मजकूर लिहायला सुरुवात करण्याअगोदर त्यांनी कोपऱ्यात एक लहानसे 'झाडाचे चित्र' काढून त्याखाली एक ओळ लिहिली.
''वृक्षवल्ली आम्हा सोयरीं वनचरंे!''
त्या रात्री आण्णा महामुनींना रंगीत स्वप्न पडले, स्वप्नात झाडासमोर उभ्या राहिलेल्या भक्तांच्या आेंजळीतील फुलांच्या मतपत्रिका झालेल्या आहेत व त्या पवित्र झाडाच्या ठिकाणी एक मतदान केंद्र उभं आहे.
- बाळकृष्ण जांभळे, तळेगाव



We at panache shoes make the
We at panache shoes make the UGG Australia available to you at your homes without any delivery charges. UGG Men you order, it is upon us to bring it you and get it hand delivered at your doorway. UK Ugg Sale has the most decent prices bringing it down and lighter on your pockets. Buying from us will get you a guaranteed bargain for we boast of some of the best classic ugg like Lulu Guinness, Radley, Baibella, Cosettini, Cheap UGG and Bulaggi, all at attention-grabbing discounts. Ugg discount, you can view the sample ugg bags and choose your favourite among the best. Therefore, hesitate ugg boots sale in thinking twice and order now!