ठण् ठण् ठण् ठण्.... पहारेकऱ्याने घंटेचे चार टोले दिले, तेव्हा ललिता खोलीतून बाहेर आली. खोलीसमोरचं मोगऱ्याच्या सुवासानं घमघमणारं अंगण पार करून चालायचा व्यायाम करायसाठी खास तयार केलेल्या रस्त्याला लागली. इथं या रस्त्याला कोणी `वॉकिंग ट्न्ॅक' म्हणत नव्हतं की त्याच्या सभोवती असलेल्या बागेला `जॉगर्स पार्क' म्हणत नव्हतं. पाच फेऱ्या म्हणजे दोन किलोमीटर चालणं. रोज पाच-सात किलोमीटर चालून वजनाचे किलो घटवायला अनेक जण इथं येऊन राहतात. ती सुद्धा त्याच उद्देशानं आलेली; पण तिला वजन कमी करायचं होतं ते तिच्या मुलीचं. स्वत:चं नव्हे. तरीही ही भल्या पहाटेची वेळ तिच्या अत्यंत आवडीची होती. साधारण साडेचार पावणेपाचला इथं लोकांच्या हालचाली सुरू होत. तत्पूर्वी असं रमतगमत फिरणं हाच तिथल्या रटाळ आणि निरस जीवनक्रमातला मोठा विरंगुळा होता. दिवसभर भाजून काढणारा उन्हाचा रखरखाट आणि उबवून टाकणाऱ्या घामट रात्रींच्यामध्ये पहाटेची ही वेळच काय ती थंडगार आणि प्रसन्न वाटायची तिला. त्यामुळे दिवसभर जयाच्या ट्नीटमेंटमागे वणवणून कितीही थकली असली, रात्रीचा पहिला प्रहर रमणिकच्या बेधुंद स्पर्शांना आठवत, तळमळत काढलेला असला तरीही पहाटेचे हे निसर्गसान्निध्यातले फिरणे तिला सोडावेसे वाटत नसे. फिरायचा मार्गही तसा आपलं वैशिष्ट्य राखून होता. त्यामुळे रस्त्याला लागल्यावर लगेच तिची नजर सरावाने समोर वळली.
पूर्वेकडे क्षितिजाच्या थोडं वर चर्चच्या क्रूसाच्या बाजूला चंद्रकोर चमकत होती. अन् तिच्या खाली ठसठशीत शुक्राचा तारा! लग्नानंतर सुरुवातीच्या काळात रमणिकबरोबर रात्री-अपरात्री भटकताना तिनं चंद्राची अनेक रूपं बघितली होती. करवाचौथचा लख्ख प्रकाश देणारा पूर्णत्वापासून थोडासा ढळलेला वाटोळा चंद्र, रात्री बारा वाजता माथ्यावर असणारी अष्टमीची अर्धी चंद्रकोर, आणि `चोरीचा आळ येईल- पाहू नकोस' म्हणत रमणिकनं डोळयांवर हात ठेवण्यापूर्वी पाहिलेली भाद्रपदातली चतुर्थीची मलूल चंद्रकोरसुद्धा! ही सगळी शुक्लपक्षातली चंद्राची रूपं! आजचा हा चंद्र कृष्णपक्षातला! कोणती तिथी? आठवायचा प्रयत्नही तिला त्रासदायक वाटला.
रस्त्याच्या वळणाबरोबर ती उजवीकडे वळली. चांदण्यासारखी छोटी छोटी फुलं अंगाखांद्यावर खेळवत बकुळीचे वृक्ष ओळीने उभे होते. पायाशी सुगंधी फुलांचा सडा पडलेला. जायची यायची वाटच ती! जाणारे येणारे खुशाल ती इवलाली फुलं पायदळी तुडवत निघून जायचे. पिचत तिच्यासारखं कोणी आेंजळभर फुलं वेचून घ्यायचं; पण ते पिचतच. तिथून वळसा घालून डावीकडे वळलं की उजव्या बाजूला असलेल्या तुळशीच्या वाफ्यांतून मंजिऱ्यांचा घमघमाट यायचा. पुढच्या वळणावर मधुमालतीचे वेल बहरलेले. त्यांचा सुवास नाकात साठवत पुन्हा डावीकडे वळलं की मग मात्र गुलमोहराची झाडं होती. उन्हाळयात फुलणारा- आपल्या लालभडक फुलांनी सूर्याला आवाहन करणारा गुलमोलर! बाकीची झाडं सूर्याच्या तापापुढं माना टाकतात. हाच कसा एकटा ताठ उभा राहतो; फुलांचे घोस अंगाखांद्यावर बाळगत? सूर्याला आवाहन करतो की आव्हान देतो? इथं कुठलेच सुवास नव्हते; पण उजव्या हाताला आश्रमातील सेवकांची घरं होती. एखाद्या संध्याकाळी एखाद्या घरातून दिल्या गेलेल्या हिंगाच्या फोडणीचा खमंग वास तिच्या नाकात घुसायचा आणि तोंडाला चरचरून पाणी सुटायचं. किती दिवस झाले काही खमंग-टमंग खाल्लंच नाही? तिच्या मनात येत राहायचं; पण मग जयाचा विचार मनात आला की ती मनाला मुरड घालायची. या अपंग मुलीला चालायला लावायचंच या निश्चयानंच तर ती इथं येऊन राहिली होती.
सहा वर्षांचा भोळाभाबडा जीव. मांसाचा गोळा- प्रचंड मोठ्ठा गोळा. विषण्ण हसू तिच्या ओठांवर यायचं आणि ती ओठ मुडपून घ्यायची. सहा वर्षांच्या त्या मुलीचं वजन होतं अठ्ठेचाळीस किलो. तिच्या स्वत:च्या वजनापेक्षा कितीतरी जास्त. झाली तीच मुळी चौदा पाउंडांची. आईचा सगळा जीवनरस जणू शोषून घेऊन. त्या कठीण-जीवावर बेतलेल्या बाळंतपणातून सावरायलाच तिला सहा महिने लागले. गोरी गोरी पान, काळयाभोर कुरळया केसांची गुटगुटीत जया, येणारे जाणारे वळून पाहायचे. कौतुक करायचे. सामान्य मुलांपेक्षा कितीतरी जास्त गुटगुटीत मुलीला जन्म दिलाय म्हणून ललितालाही धन्यधन्य वाटायचं. मान सावरणारी जया, कोणीही दिसलं की खुद्कन् हसणारी जया, आईच्या कडेवरून इतरांकडे जायला नकार देणारी जया, दिऊ%%, काऊ%%, चिऊ%% बोटांनी दाखवणारी जया-
पण मग इतकंच. बसवलं तर बसायची; पण कधी पालथी पडलीच नाही. उभं तर राहायचीच नाही. वजन जास्त आहे, काही मुलांची प्रगतीच उशिरा होते, अशी समजूत करून घेऊन काही दिवस काढले.
``मला वाटतं एखाद्या स्पेशालिस्टला दाखवावं. अजून उभीसुद्धा राहात नाही.'' जयाच्या दुसऱ्याच वाढदिवसाला ललिता रमणिकला म्हणाली होती.
``राहील गं%%%'' तो बेफिेकरीने म्हणाला होता.
``केव्हा? हिच्यानंतर वर्षभरानं जन्मलेली मुलंही चालायलाच काय धावायलाही लागली. ही अजून उभीही राहत नाही. वजन फक्त वाढतंय, बाकी प्रगती शून्य!'' ललिता तिरमिरली होती.
जवळ जवळ आठ दिवस दोघांमध्ये असे संवाद सतत झाल्यावर शंभरच्या काही नोटा तिच्याकडं भिरकावत रमणिकनं उदार मनानं तिला डॉक्टरकडे जायला परवानगी दिली होती.
``मला सध्या खूप कामं आहेत. तूच घेऊन जा. वाटलं तर टॅक्सीनं जा.'' रमणिकच्या या बोलण्यानं तिच्या डोक्यात तिडीक उठली होती. `वाटलं तर टॅक्सीनं जा म्हणे! नाहीतर काय हे एवढं मोठं धूड घेऊन मी एकटी लोकलनं जाणार आहे? कोणी मदत करणार नाही. एकटी कुठं जाऊ? माझ्या बछडीला कोणाला दाखवू?' संताप संताप झाला होता तिच्या जिवाचा. हताशेनं घेरलं होतं. मुलीबद्दल वाटणाऱ्या करुणेनं डोळयांतलं पाणी खळत नव्हतं. सगळं सोडून पळून जावसं वाटत होतं; पण प्रश्न मुलीच्या आयुष्याचा होता. आत्ताच उचलायला त्रास होतोय. पुढे काय होईल? तणतणतच ती फॅमिली डॉक्टरांकडे गेली. हे डॉक्टर म्हातारे सज्जन प्रेमळ; पण चालू काळाशी अजूनही नाळ जोडून असलेले. त्यांच्या सल्ल्याने इतर डॉक्टर्स. गेली चार वर्षं एका चक्रातच ती अडकली होती. डॉक्टर- स्पेशालिस्ट- तपासण्या, चाचण्या, औषधं, मसाज, प्लॅस्टर, उपयोग कशाचाच होत नव्हता. फक्त जया वाढत होती अंगानं- उंचीनं! बुद्धीची वाढही जेमतेमच.
रमणिक व्यवसायात रमलेला. एकत्र कुटुंबातली नंबर दोनची सून होती ती. त्यामुळे म्हटलं तर खूप कामं- पण जबाबदारी फारशी नव्हती. त्यामुळे जयासाठी वेळ देता येत होता. कंबर, पाठ दुखायची. धाप लागायची. तरी ललिता तिला जवळच्या बालक मंदिरात घेऊन जायची. सहा महिन्यांत तिची एक कविताही धड पाठ झाली नव्हती. बाकीही सगळा आनंदच! आपल्याच वाट्याला हा भोग का? ती स्वत:च स्वत:ला विचारायची आणि चिड-चिड चिडायची.
हा आश्रमही असाच कोणीतरी सुचवलेला. अॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद सगळयांनी हात टेकवल्यावर शेवटचा उपाय म्हणून स्वीकारलेला निसर्गोपचार गांधीजींच्या कोण्या शिष्याने उभारलेला. शुद्ध सात्त्विक जगण्यातून आयुष्याची कोडी सोडवू पाहणारा.
इथं आल्यावर सुरुवातीला तिला खूप बरं वाटलं होतं. निसर्गरम्य वातावरण. घरच्या कामांचा रेटा नाही. स्वैपाकपाणी नाही. भाजी आणणं नाही. रमणिकची वाट पाहाणं नाही. दीर जावांचे टोमणे नाहीत आणि सासूची कटकट नाही. पहिल्या आठ दिवसांत जयाचं वजन दोन किलोंनी कमी झालं. धरून का होईना ती आता उभी राहत होती. वजन आणखी कमी झालं की धरून धरून चालायला लागेल. आजपासनूच तिला चालवायचं. फिरणं आटोपून, एका उदंड विश्वासानं ललिता झपझप आपल्या खोलीकडे परतली.
खोलीत बा आणि जया दोघीही अजून झोपलेल्या होत्या. जयाची चाळवाचाळव सुरू होती. तिनं सरावानं हात जयाच्या कमरेखाली घातला. अंथरूण ओलं झालंच होतं. तिनं जयाला एकदम उठूनच बसवलं. `बाला बेडपॅन का मागितलं नाहीस?' धसमुसळेपणानं तिचे कपडे काढत ललितानं विचारलं. उत्तरादाखल जयानं जोरदार भोकाड पसरलं. बा खडबडून जागी झाली. अंथरुण ओलं झालंय म्हणून ओशाळली. `अगं, डोळाच लागला बघ सकाळच्या गारव्यानं. नाहीतर दिलंच असतं मी बेडपॅन,' ती पुटपुटली.
`तुला झोप लागली हे ठीक आहे गं! आता तुझं तरी वय आहे का असले कष्ट उपसायचं? पण या गधडीला समजायला नको? एवढी मोठी झाली तरी अंथरूण अजून ओलं करते!' ललिता तिरमिरली. आपल्या अकाली म्हाताऱ्या झालेल्या आईबद्दल सहानुभूती आणि लेकीबद्दल कणवयुक्त संताप तिच्या अंत:करणात अस्वलासारखा घुमू लागला.
बिचारी आपली बा! नातीसाठी स्वत:चं घरदार सोडून आपल्याबरोबर मदतीला म्हणून इथे येऊन राहिली. रमणिकची आई, बहीण, भावजय कोणी ढंुकून पाहत नाहीत. रमणिकची आई तर गावभर डंकाच पिटते; `ललिताला नं माहेरचीच ओढ जास्त. काहीही होवो. ती आपल्या बालाच बोलावणार. आम्हांला कोण विचारतो? नाहीतर आम्ही करणार नाही? आमचीही ती नातच आहे. पण तिची बा असते. मग आपण कशाला मधे मधे करायचं?' अप्रिय आठवणींची कोळीष्टकं मनाला चिकटू लागली तशी ललितानं मान झटकली. बापूंच्या आश्रमात काम-क्रोध-मद-मत्सर-दंभ-अहंकार सगळे षड्रिपू दूर ठेवायचे. तिनं स्वत:ला बजावलं अन् तिच्या रागाचा पारा बटन दाबताच बंद पडणाऱ्या कारंज्यासारखा एकदम खाली आला. निर्विकारपणे ती कामाला लागली.
प्रथम तिनं जयाला खुर्चीत बसवलं. स्टुलावर समोर तस्कर ठेवलं. हातात ब्रश दिला. तिचं तोंड धुणं आटोपेपर्यंत ती रसोड्यातून काढा घेऊन आली. आज अंथरूण ओलं झाल्यामुळे शरमून असेल कदाचित; पण जया खळखळ न करता तो काढा प्याली. एरवी गवतीचहा, आलं आणि तुळस घातलेलं ते तिखटसर गरम पाणी तिलाही आवडायचं नाही; पण आश्रमात चहा, कॉफीवर बंदी होती. बाला ती बाहेर जाऊन चहा पिऊन यायला लावायची; पण जयाला जे नाही ते आपल्यालाही नको या भावनेतून ती तो काढाच प्यायची. जयाला तो काढा प्यायला लावणं हे एक जिकिरीचं काम होतं.
व्हीलचेअरवर जयाला बसवून ती योगासनं करायला घेऊन गेली. जयाला स्वत:ला काहीच करता यायचं नाही; पण ललिताच तिचे हात धरून वर करा; डोकं जमिनीला टेकवा, पाय पसरून द्या, पाय वर करा, तिचे हात पायाच्या अंगठ्याला लावा असली कसरत करत राहायची. ही सर्कस अर्धातास केल्यावर ललिता तिला ट्नीटमेंट वॉर्डमध्ये घेऊन गेली. एनिमाच्या दिव्यातून पार पडल्यावर मातीची ट्नीटमेंट व सूर्यस्नान. त्यासाठी गच्चीत जायचं. तिथल्या अटेंडंटच्या मदतीनं जयाला वर नेताना तिची छाती लोहाराचा भाताच झाली. जयाला तिथं बसवून ती खोलीत जाऊन चटई घेऊन आली. माती आणायला गेली तेव्हा उमाबाई घमेल्यात मातीच भरत होती. `येतेच मी. तुम्ही व्हा पुढं!' ती म्हणाली. कोणीतरी आपल्या मदतीला आहे याचं ललिताला फार बरं वाटलं. चटई अंथरून तिनं जयाला चटईवर निजवलं. तिचा फ्रॉक काढेपर्यंत उमाबाई आलीच.
आपल्या टपोऱ्या डोळयांनी जया आजूबाजूला पाहात होती. पोटाला मातीचा लेप लावून आणि आपला लठ्ठमुठ्ठ देह अर्धा उघडा टाकून अनेकजणी सूर्यस्नान घेत होत्या. जयानं हे कुरूप दृश्य पाहूसुद्धा नये असं तिला वाटलं. आपल्या कमनीय बांध्याचा तिला अभिमान वाटू लागला. उमाबाई जयाच्या पोटावर आणि कपाळावर मातीचा लेप लावून निघून गेली आणि तो लेप सुकण्याची ललिता वाट पाहू लागली.
जवळ जवळ अर्धा तास ललिता ताटकळत बसून होती. एखादं मासिक आणलं असतं तर बरं झालं असतं असं तिला वाटू लागलं. `अवो बाई, तो परकर सरकवाकी पायापत्तूर. उघडं वाघडं झोपाया कसं बरं वाटतं म्हणतो मी.'' उमाबाईचा आवाज दणदणला म्हणून तिनं त्या दिशेनं नजर वळवली. पोटावर मातीचा लेप घेऊन पसरलेल्या त्या आडव्या तिडव्या बायांतली एक म्हणाली, ``अहो उमाबाय, हे सूर्यस्नान आहे. खरंतर सूर्यस्नान करताना अंगात इतके कपडेसुद्धा नकोत. तिकडं युरोप अमेरिकेत जाऊन पाहा. सगळया समुद्रकिनाऱ्यावर बाया अशाच पसरलेल्या असतात. आणि बाप्येपण तिथंच असतात. इथं तर कोणी बघायलासुद्धा नाही.'' सगळयाजणी फिदीफिदी हसल्या. बापूंच्या आश्रमात असलं घाणेरडं बोलणं? ललिताला हसावसंही वाटेना. तिच्या अंगावर सरसरून काटा आला. कोणी पाहायला नाही म्हणे! कोणी पाहिलं तर काय करेल? चुल्लूभर पानीमे डूब मरेगा बेचारा. ज्याला नागड्या बाया पाहायला आवडतं, त्याला इथं आणून सोडा म्हणावं! पुन्हा स्त्री देहाकडं डोळे उघडून पाहणार नाही! ह्या असल्या बेढब बाया पाहण्यापेक्षा आंधळं होणं परवडेल त्याला. पुरुषाला शेवटी हवं तरी काय असतं दुसरं?
या विचाराशी ती ठेचकाळली जराशी. रमणिकला तरी काय हवं होतं दुसरं? तिचं रुपडं पाहूनच तर त्यानं तिच्याशी लग्न केलं. एक रुपडं सोडलं तर तिच्यापाशी होतंच काय दुसरं? ढोकळा आणि पात्रा फार छान करते हे काय पलिफिकेशन होतं? अकाली मरून गेलेल्या गरीब शाळामास्तरची मुलगी! हे रूपही नसतं तर काय केलं असतं तिनं? गुजरातमधल्या एखाद्या खेड्यातल्या अशाच एखाद्या गरीब माणसाचा संसार? आणि आज रमणिकबरोबर तरी ती काय करतेय? जयासारखा मांसाचा गोळा सांभाळण्याशिवाय? सासूचे अन् नणंदा-जावांचे टोमणे ऐकण्याशिवाय? पैसा असो किंवा नसो. बाईचं प्राक्तन शेवटी हेच. कष्ट करणं आणि शिव्या खाणं!
तिनं रागारागानं जयाच्या पोटावर थापलेली माती काढून टाकली. तिचे दोन्ही हात धरून तिला उभी केली. एक एक पाऊल मागे टाकत ती तिला ओढत खाली नेऊ लागली. उमाबाई तिच्या मदतीला धावली तेव्हा तिचा राग थोडा कमी झाला.
खोलीत मसाज करणारी बाई त्यांची वाटच पाहात होती. जयाला तिच्या स्वाधीन करून ललिता बाहेर आली. आता पाऊण तासाची निश्चिंती होती. हातातल्या पर्सला हेलकावे देत ललिता बाजाराच्या रस्त्याला लागली. फळं आणायची होती. जयाला दुपारी देण्यासाठी शहाळं आणायचं होतं. खरंतर आश्रमात हे सगळं मिळायचंही- पण रुपया दोन रुपयांनी महाग! शिवाय गावात जायला तिला आवडायचंही! सडसडीत देहाचे आणि तुकतुकीत कांतीचे ते खेडूत बघतानाही बरं वाटायचं. रमत गमत तिनं खरेदी केली. ऊन चटचटायला लागलं होतं. जयाचा मसाज आता आटोपत आला असणार. ती झपझप पावलं उचलत आश्रमाच्या दाराशी आली. गेटपाशीच गाडी पार्क करणारा रमणिक तिला दिसला. आनंदाचं कारंजं तिच्या मनात थुई थुई नाचायला लागलं. रमणिकला घेऊन ती खोलीत आली. `जया, बघ तर कोण आलंय?' आपल्याला झालेला आनंद तिला लपवताच येईना. जयानं त्याच्या दिशेनं हात पुढे केले. तेलानं माखलेल्या आपल्या मुलीला जवळ घेणं त्याला जमेना. त्यानं तिचे हात हातात घेतले. पाठीवर थोपटलं आणि नंतर लगेच साबण लावून हात धुवूनही टाकले.
``येतेय मी हिला स्टीम-बाथ देऊन,'' ललिता उत्साहानं म्हणाली व व्हीलचेअरवर जयाला बसवून ट्नीटमेंट वॉर्डकडे गेली. नेहमीप्रमाणे तिथे खूप मोठा क्यू होता; पण क्यूमध्ये न थांबता सरळ आत घुसायची तिला परवानगी होती. ती सरळ आत घुसली. नेहमीप्रमाणे कोणीतरी कुरकुर केलीच; पण आज तिला नेहमीप्रमाणे राग आला नाही. स्टीममध्ये जेमतेम पाच मिनिटं बसल्यावरच जयाचा आरडाओरडा सुरू झाला. ललिता तिला बाहेर काढायला गेली तर तिथल्या रंजनाबायनं अडवलं. ``दहा मिन्टं तर होऊ द्या. येवढ्यानं काय होतंय?'' ती म्हणाली.
घड्याळाकडे पाहत ललिता मग बसून राहिली. दहाव्या मिनिटाला तिनं जयाला बाहेर काढलं आणि थंड पाण्याच्या शॉवरखाली धरलं. स्टुलावर बसवून साबणानं चोळून चोळून आंघोळ घातली आणि खोलीत घेऊन आली. रमणिक कॉटवर आडवा झाला होता. त्याच्या बाजूलाच तिनं जयाला ठेवलं. पावडर लावून फ्रॉक घातला, केस विंचरून रबरबँडमध्ये अडकवले. बारीक काळी टिकली कपाळावर टेकवली अन् तिच्या गालाचा मुका घेऊन तिला रमणिककडे सरकवलं. रमणिकनं त्याच गालावर आपले ओठ टेकवले, तेव्हा तर जणू काही आपल्याच अंगावर मोरपीस फिरतंय असं वाटलं ललिताला.
``मी आत्ता आंघोळ करून येते.'' आपले कपडे गोळा करत ती म्हणाली.
``या खोलीला अॅटॅच्ड टॉयलेट नाही?'' त्यानं विचारलं.
``नाही! समोर आहे.'' ती त्याच्याकडे न पाहाताच सोपकेस आणि बादली घेऊन बाहेर पडली.
आंघोळ उरकून ती आली तर रमणिक नव्हताच. बा जयाला गोष्ट सांगत होती आणि जया खिदळत होती. जयाचं जेवण आणायला ती रसोड्यात गेली. उकडलेली वाटीभर भाजी, कोशिंबीर आणि खाकरा, नॅपकीन झाकलेली थाळी घेऊन ती खोलीकडे निघाली तेव्हा ऑफिसच्या खोलीतून बाहेर पडणारा रमणिक तिला दिसला. ``चल आटोप लवकर. मी जनरल वॉर्डच्या पलीकडचा बंगला घेतला आहे. पॉश आहे. अशा भिकार खोलीत तू राहूच कशी शकतेस?'' तो म्हणाला. तिच्या कपाळावर आठी उमटली. `माझा सगळा जन्मच यापेक्षा भिकार घरात गेलाय.' तिला त्याला सांगावसं वाटलं- पण तिनं ओठ आवळून धरले, का म्हणून आपल्या माहेरच्या दारिद्र्याचा उल्लेख करायचा?
``जयाचं जेवण झालं की जाऊ.'' ती म्हणाली. हातातली थाळी तिनं स्टुलावर ठेवली व नॅपकीन काढला. ``हे असलं खाते माझी छकुली?'' तो म्हणाला.
``छकुलीच काय? इथं सगळेच हे असलं खातात. गांधीजींच्या शिष्याचा आश्रम आहे हा! इथं साधेपणानंच राहायचं असतं.'' ती ठसक्यात म्हणाली.
आपला हा ठसका लगेचच मोडीत निघणार आहे याची मात्र तिला कल्पना नव्हती. जयाला नवीन खोलीत घेऊन गेल्यावर ती आश्चर्यचकित झाली. या बंगल्यात साधेपणाचा मागमूसही नव्हता. आरामशीर पलंग, फोमच्या गाद्या, स्वच्छ बेसीन, टाइल्स लावलेली बाथरुम, फिक्या निळया रंगाच्या भिंती अन् निळीच मच्छरदाणी! आपण एखाद्या `ए' ग्रेडच्या हॉटेलात आहोत असंच ललिताला वाटलं.
``बा, तू रसोड्यात जाऊन जेऊन ये. मग मी आणि रमणिक जाऊ.'' आधीच्या खोलीतून हळूहळू सामान आणणाऱ्या आपल्या आईला ती म्हणाली.
``तुम्ही घाई करू नका. मी जाईपर्यंत दोन्ही खोल्या आपल्याकडेच आहेत.'' तो म्हणाला. त्याच्या त्या उद्गारांनी ललिताला रागच आला थोडा- पण तो लगेचच पुढं म्हणाला, ``आणि तुम्ही कशाला सामान आणताय? मी सांगितलंय शिवाजीकाकांना.'' तेव्हा तिला जरा बरंही वाटलं.
रसोड्यातलं ते बिन मिठाचं, तेल, तूप नसलेलं अन्न कसंतरी चिवडून रमणिक तिच्याबरोबर खोलीत आला. तेव्हा बा निमूटपणे बाहेर निघून गेली. बसेल बिचारी जुन्या खोलीत एकटी. ललिताच्या मनात आपल्या आईबद्दल कणव दाटून आली.
खिडक्यांचे पडदे सारून अन् दार किंचित लोटून ललिता जयाच्या बाजूला आडवी झाली. रमणिकनं तिच्या हातावर आपला हात अलगद ठेवला तेव्हा आतून मोहरून आली.
``गांधीजींचा आश्रम आहे हा! इथं असलं काही चालत नाही हं!'' चावटपणे हसत तिनं म्हटलं.
``हा गांधीजींचा नाही त्यांच्या शिष्याचा आश्रम आहे. आणि मी कुठं काय करतोय?'' थट्टेचा तसाच सूर कायम ठेवत तो म्हणाला, ``बाकी या आश्रमात राहून तू आणखीनच सुंदर दिसायला लागलीस हं!'' तिच्या केसांना हलकेच ओढ देऊन तिला जवळ घेत तो म्हणाला.
बाहेर ऊन तापलं होतं; पण खोली थंडगार होती. छतावर पंखा एका तालात फिरत होता. खिडक्यांचे पडदे एका लयीत डुलत-झुलत होते. पलंगाच्या एका कडेला जया गाढ झोपली होती आणि रमणिकचे चुकार स्पर्श शोषून घेत ललिता सुखावली होती. किती दिवसांनी रमणिक हा असा निवांत सापडलाय? किती दिवसांनी की वर्षांनी? ही दुपार अशीच राहावी. संपूच नये असं तिला वाटू लागलं.
संध्याकाळी रमणिकनं जयाला चालवलं. एरवी एक एक पाऊल टाकायला जया खळखळ करायची- पण रमणिकचं निमूटपणे ऐकत होती. बा बरोबर ती वडाच्या झाडाखाली पारावर बसली होती. ``चल जया, बाला पकड'' तो म्हणाला. हसत हसत झोकांड्या खात, एक एक पाऊल तिच्या दिशेने टाकत जया येत होती. रमणिकनं तिचा फक्त एक हात धरला होता. एरवी तिला चालवायचं म्हणजे एकीकडून ती, एकीकडून बा दोघी धरायच्या. तरी जया हटून बसायची. पाऊल उचलायचीच नाही; पण रमणिकचं ऐकत होती. तोही तिच्यात रमला होता. तिच्याकडे लक्ष देत होता. ललिता कौतुकानं हा सोहळा पाहत होती. मनोमन सुखावत होती. त्यांच्या तोलामोलाचं कुटुंब नसताना केवळ रूप पाहून त्यांनी आपल्याला करून घेतली. या जाणिवेनं तिच्या मनात सुरुवातीपासून एक न्यूनगंड दबा धरून बसला होता. परिणामत: छोट्या छोट्या गोष्टींचा तिला चटकन् राग यायचा. कपाळावर आठी उमटायची; पण रमणिक तिकडं दुर्लक्ष करायचा. की त्याला तिच्या भावविश्वाची जाणीवच नव्हती? जयाकडं तो दुर्लक्ष करायचा- तिच्याकडंही! पण अशी मुलगी झाल्याबद्दल त्यानं तिला कधी बोल लावला नव्हता. धंद्याच्या कामांसाठी उशिरापर्यंत तो घराबाहेरच असायचा. एकत्र कुटुंबात बायको-मुलगी यांच्याकडे विशेष लक्ष पुरवणं तसं आगाऊ आणि अयोग्यच होतं; पण इतक्या दिवसांत रमणिकनं आपल्याला कधी बोल लावला नाही की कमी लेखलं नाही. रमणिकबद्दलच्या प्रेमानं तिचं अंत:करण प्रथमच भरून आलं. बापूंच्या आश्रमाचा तर हा प्रभाव नाही? तिनं मनोमन बापूंना प्रणाम केला.
रात्री थोडी फळं आणि दूध जयाला देऊन ललितानं तिला झोपवलं. ``बा, आम्ही जरा फिरून येतो.'' ती आपल्या आईला म्हणाली.
त्या लहानशा गावातली वस्ती पार करून ती दोघं हायवेवर आली. दोन-तीन फर्लांगांवर एक ढाबा होता. रमणिकबरोबर जेवताना ना तिला जयाची आठवण झाली ना बाची! ते दोघं खोलीत आले तेव्हा बा जयाजवळ गाढ झोपली होती.
``झोपू दे त्यांना! मी तिकडे जुन्या खोलीत झोपतो बिचारा!'' रमणिक तोंड वेडंवाकडं करीत तिच्या कानात कुजबुजला. तिला खुद्कन् हसू फुटलं. सारी रात्र मग तिच्या स्वप्नात पारिजातकाची फुलं टपटपत राहिली.
दुसरा दिवस रमणिकच्या संगतीत कुठं उगवला आणि कुठं मावळला हेही ललिताला कळलं नाही. रात्री समंजसपणे बा जागी राहिली आणि ते बाहेरून जेवून आल्याबरोबर जुन्या खोलीत निघून गेली.
त्या दिवशी संध्याकाळपासून वारं सुटलं होतं. आकाशात आता ढग जमले होते. विजा चमकत होत्या. उन्हाळा संपत आला होता. आता पाऊस पडायलाच हवा होता.
पण पाऊस पडायच्याऐवजी वाऱ्याचा जोर वाढत होता. झाडं वेडीवाकडी हालत होती. पलीकडच्या गोशाळेतल्या गाई त्या झाडांच्या हलणाऱ्या भयाण सावल्यांनी आणि पानांच्या बेताल सळसळींनी घाबरून हंबरत होत्या. धूळ उडत होती. वाळक्या पानांबरोबर कोवळी पानंही तुटून खाली पडत होती. आश्रमातली वीज कधीच गेली होती. काळोखाच्या काजळीनं माखलेल्या आश्रमावर वीज रेघोट्या मारीत होती आणि खोलीतल्या अर्ध-अंधेरात रमणिकनं सकाळीच गोळा करून ठेवलेल्या बकुळफुलांची आेंजळ ललिताच्या केसात रिकामी केली होती. बाहेर पाऊस अनिवार आवेगानं कोसळू लागला. इतक्या दिवसांच्या तृषार्त जमिनीसारख्याच आपणही शांत आणि तृप्त होत आहोत हे ललिताला खोलवर कुठंतरी आत आत जाणवत होतं.
पहाटे जाग आली तेव्हा बाहेर सारं शांत होतं. बाथरूममधून शॉवरचा आवाज येत होता. तयार होऊन आलेल्या रमणिककडे ती पाहतच राहिली. कालच्या दिवस-रात्रीची तृप्ती त्याच्या देहावरून निथळत होती नुसती.
``हे काय, इतक्या लवकर कुठली तयारी?''
``कुठली म्हणजे? परत निघालोय. दोन दिवसांची फुरसद मोठ्या मुश्किलीनं काढली होती.''
``लगेच जाणार?''
``हो! निघायलाचं हवं.'' जयाचा मुका घेऊन तो निघालाच. त्याच्याबरोबर त्याला निरोप द्यायला ललिता आश्रमाच्या दाराशी आली.
``ती बंगल्यातली खोली आज दुपारपर्यंत खाली करायची आहे.'' कारमध्ये बसता बसता तो म्हणाला.
``काय?'' ती विचित्र आवाजात ओरडलीच.
``जनरल वॉर्डातल्या खोलीचं भाडं पन्नास रुपये आहे. बंगल्यातल्या साडेतीनशे. आणखी महिनाभर राहायचं म्हणजे- नऊ हजाराचा फटका- तशी तुला तर सवयच आहे-'' तिच्या काळजावर चरचरून डाग देत तो निघून गेला. त्याच्या गाडीचा धूर तेवढा क्षणभर मागे राहिला आणि आसमंतात विरून गेला.
वेदनेची एक कळ तिच्या हृदयात उमटून मस्तकात पोचली. तिथं संतापाच्या लाटांवर लाटा उसळू लागल्या. होय रे बाबा, मला सवयच होती खातेऱ्यात लोळायची. कशाला उचलून बंगल्यात बसवलंस? पुरुष लेकाचा- काल मनात त्याच्याबद्दल निर्माण झालेली प्रेमभावना कापरासारखी जळून गेली. मनातला न्यूनगंड अधिक न्यूनत्वाकडे गेला. संतापानं आपलं मस्तक फुटणार असं तिला वाटू लागलं. नऊ हजार- लाखो रुपयांची कार उडवणाऱ्या, लंचवर एका दिवशी हजारभर रुपये खर्चणाऱ्या ह्या ह्या पुरुषाला त्याच्या बायकोसाठी-मुलीसाठी- सासूसाठी आयुष्यात कधीतरी खर्च करायची वेळ आली तर नऊ हजार जास्त वाटतात. का? त्या बाया आहेत म्हणून? की गरीब आहेत म्हणून?
संतापाने दणादण पावले टाकत ती मागे फिरली. खोलीत आली. सवयीने जयाच्या कमरेखाली हात सरकवला. ओले कपडे दात ओठ खाऊन बदलले. ओली चादर जयाच्या अंगाखालून काढून कोपऱ्यात भिरकावली. रात्री तिच्या डोक्यात रिकामी झालेली बकुळीची फुलं खोलीत इतस्तत: पसरली. जयाच्या अंगावर पांघरूण टाकून ती फुलं पायदळी तुडवत ललिता तशीच बाहेर आली.
सूर्योदयाची वेळ, कालच्या पावसाने सगळी सृष्टी लख्ख धुतली गेली होती. फिरायच्या वाटेवर ती आली. बकुळीच्या फुलांच्या सड्यावरून, तुळशीचा घमघमाट नाकात भरून घेत, मधुमालतीला वळसा घालून पुढे गेली. लालभडक गुलमोहरच्या फुलांचा सडा पायतळी पसरला होता. गुलमोहर ताठ उभा होता. उरलेली फुलं अंगाखांद्यावर खेळवत उगवत्या सूर्याला आव्हान देत होता. पायतळी पडलेल्या फुलांच्या सड्याचं त्याला भानच नव्हतं. रात्री येऊन गेलेल्या वादळाचा मागमूस कुठं नव्हताच जणू!
ंंं
- डॉ. छाया नाईक,
नागपूर



buy viagra now
jdmgjhc buy viagra now 1207 cialis wEenBU sildenafil prices >:-OOO cialis 8]]] viagra JBzuyg cialis 5060
viagra
fbmlrm http://osfemr.com/ zqzyxl [url=http://hmdktc.com/]zqzyxl[/url]
ffbazx
qcdsng