Skip to main content

मिळून सार्‍याजणी विषयी

' मिळून साऱ्याजणी' या मासिकाचा पहिला अंक ऑगस्ट १९८९ मध्ये प्रसिध्द झाला. तेव्हापासून, आजपर्यंत एकही अंकाचा खंड पडता, दरमहा हे मासिक नियमितपणे प्रसिध्द होत आहे. ऑगस्ट २००७ मध्ये 'मिळून साऱ्याजणी' १८ वर्षाची वाटचाल पूर्ण करून १९ व्या वर्षात पाऊल टाकत आहे.

हे मासिक सुरू करण्यामागची पाश्वभूमी थोडक्यात सांगायची तर अशी सांगता येईल की, किर्लोस्कर प्रकाशन बंद करण्याचा निर्णय घेतला. गुडविलसह ही प्रकाशन प्रा. लि. यांनी विकत घेतली. मालकी आणि व्यवस्थापनातील बदलाच्या या टप्प्यावर, मी `स्त्री'च्या संपादकपदाचा राजिनामा देऊन बाहेर राखता येइेल असा विश्वास वाटला नाही. म्हणून `स्त्री' मधल्या कामाच्या सुरूवातीपासूनची २०-२२ वर्षांची अनुभवांची आणि जाणिवेची कमाई घेऊन मी त्या कामाचा निरोप घेतला.

पत्रकारितेनं आणि स्त्रियांच्या चळवळींनं मला अनेक अंगांनी वाढण्याची संधी दिली. म्हणून `स्त्री' मासिक सोडलं तरी स्त्रियांच्या प्रश्नांविषयीची आस्था आणि पत्रकारितेबद्दलची कृतज्ञता माझ्या मदा होतीच. म्हणून वयाची पन्नाशी ओलांडलेल्या आयुष्याच्या टप्प्यावरही मी हा निर्णय घेतला. माणूस,सत्यकथा, हंस, मोहिनी सारखी दर्जेदार नियतकालिकं त्यावेळी बंद केली जात होती. काळ फारसा अनुकूल नव्हताच. तरीही, ' मिळून साऱ्याजणी' सारखं स्त्री मासिकाच्या पलीकडे अर्धंतरी पाऊल टाकता यावं, अशा स्वरूपाचं मासिक सुरू करण्याचा मी निश्चय केला आणि कामाला लागले. मासिकाची उद्दिष्टं मनामध्ये निश्चित केली.

मासिकाची उद्दिष्टे
१) स्त्रीपुरूष समतेचा विचार, स्त्री चळवळीच्या परिघाबाहेर असणाऱ्या स्त्रीपुरूषांपर्यत पोचवावा.
२) शहरी आणि ग्रामीण जीवनाला जोडणारा एक पूल उभारावा.
३) मुख्य म्हणजे स्त्रियांना, पत्रकारितेत नसलेला किंवा अपुरा असलेला अवकाश बघता, त्यांच्यासाठी स्वत:ची एक जागा, अवकाश निर्माण करावा.
४) स्त्रीचळवळीचं मुखपत्र अशी प्रतिमा न ठेवता, स्त्रियांच्या जळवळीशी अतूट बांधलकी मानणारं सामाजिक मासिक म्हणून 'साऱ्याजणी' प्रकाशित करावं. याप्रमाणे मासिकाची उद्दिष्टं निश्चित केल्यावर मासिकाचा वाचकवर्ग कोण असेल या बाबतची स्पष्टता महत्त्वाची होती. त्यासाठी त्याची भूमिका काय असेल हे ठरवणं ओघानंच आलं.

मासिकाची भूमिका
या मासिकाचा मुख्य वाचकवर्ग स्त्रियाच असणार. कोणत्या स्त्रिया? तर कालच्यापेक्षा आज आणि आजच्यापेक्षा उद्या केवळ वयानं मोठ होण्यासाठी नाही तर `वाढण्यासाठी' धडपडणाऱ्या साऱ्याजणी. या साऱ्या जणी आपण बाया आहोत हे नाकारीत नाहीत, त्या जाणिवेत अडकून पडत नाहीत, त्याचा बाऊही करीत नाहीत. उलट, या बाईपणाला ओलांडून व्यक्ती आणि माणूस म्हणून त्या स्वत:ची ओळख करून घेऊ इच्छितात. यातल्या काही शिकलेल्या असतील तर काही न शिकलेल्या असतील. काही ग्रामीण तर काही शहरी असतील. काही पार गरीब, काही मध्यमवर्गीय, तर काही खूप श्रीमंत असतील. त्या कुठल्याही जातिधर्माच्या असतील. या साऱ्या जणी आणि अर्थातच आपल्या आयुष्यात वेगवेगळया नात्यांतून येणाऱ्या स्त्रियांशी बरोबरीचं नातं असण्यातलं मर्म आणि सुख समजू शकणारे पुरूषही, या मासिकाचे वाचक असतील, असा मला विश्वास वाटतो.

या मासिकाच्या संपादनाचंही एक वैशिष्ट्य असेल. संपादनाचा रोख वाचकांना खूप काही सांगण्यापेक्षा, त्यांना स्वत:ला आपल्या मानतलं काही सांगावसं वाटेल याकडे असेल. यासाठी वाचकांना, आपल्या व समाजाच्या जीवनाचा विचार करून बघणाऱ्यांना पण `लेखक नसलेल्यांना लिहावस वाटेल यासाठी आश्वस्तपण मिळेल आणि भावना विचारच वातावरण तयार होईल असा इथे प्रयत्न राहील. वाचक, लेखक व संपादक यांच्या समपातळीवरचा संवाद व्हावा, वाढावा अशी जाणीव संपादनात असेल.

'घरापासून समाजापर्यंत आणि व्यक्तिपासून ते संघटीत समुहापर्यंत, स्त्री पुरूषांना आपल्याला जाचक चाकोऱ्यांमधून सोडवणारं, सच्चा माणूसपणाकडे नेणारं जे जे काही असेल त्याला या व्यासपीठावर जागा आहे. म्हणूनच विकासाच्या बिकट पण अर्थपूर्ण वाटेवरून चालताना आधार देईल अशी माहिती, विश्वास निर्माण करतील असे अनुभव, माणसाच्या जीवनाच्या वास्तवावरची नजर ढळू न देता लिहिलेल्या कथा व कविता, आणि विकासाच्या या वाटेवर पडणाऱ्या लहान मोठ्या पण गुंतागुंतीच्या प्रश्नांची चर्चा करणारे लेख असं सारं या मासिकात असेल. उन्हाचे चटके, सावलीचे उमेद वाढवणारा गारवा आणि उसळत्या कारंजाचा उत्साह यासह जीवनाचं दर्शन यात असेल. थोडक्यात आपल्या बरोबर कुणीतरी साथी, सोबती, स्नेही आहे. ज्याला मनातली शंका किंवा घालमेल सांगता येईल, वाट विचारता येईल असा विश्वास देणारं, दोस्तीची साथ देणारं असं हे मासिक असेल. स्त्रियांपासून सुरूवात करून स्त्री पुरूषांपर्यंत निकोप दृष्टि-वृत्तीनं पोहचू बघणारं हे मासिक असेल. आज प्रथम दर्जाच्या मराठी / अमराठी लेखकांपासून ते पहिलच पत्र पाठविणारी सारी माणसं मिळून साऱ्या जणीतून प्रकाशित होतात.

बदल शेवटी एक एका व्यक्तिमध्ये व्हायला हवा. पण ह्या व्यक्तिगत बदलाचं बळ आणि वेग घटनेमुळं, एकजुटीमळं आणि चळवळीपुळं वाढतो. या साऱ्यासाठी चळवळीशी नातं ठेवत, अनुभवांच्या आणि त्यांतील भावना-विचारांच्या देवघेवीचे दुवे जोडत आपली अशी एक जागा निर्माण करायला हवी. हे मासिक ही ती जागा बनावी अशाी या मासिकाच्या जन्मामागची उत्कट इच्छा आहे.

मासिकाच्या जन्मकाळी आखून घेतलेली ही भूमिका पार पाडण्याची धडपड तर आजही `साऱ्याजणी' करत आहेच. पण त्याबरोबर ही नमूद करावसं वाटतं की, मासिकाच्या गेल्या १८ वर्षाच्या वाटचालीत ही भूमिका संकुचित तर झाली नाहीच उलट विस्तारत गेली. समतेचा विचार केवळ स्त्रीपुरूषांपुरता मर्यादित राहीला नाही. तर जातिधर्मापायी, अर्थकारणापायी आणि लिंगाधारित भेदभावापायी उगवणाऱ्या आणि वाढणाऱ्या विषमतेकडेही साऱ्याजणांनी वाचकांचं लक्ष वेधलं. तसच नर्मदा आंदोलन, अंधश्रध्दा निर्मुलन, पर्यायी विकासनिती, जनआरोग्य संसद, अण्वस्त्र विरोधी मोहीम, दलित चळवळ या साऱ्या आंदोलनाशी, मोहिमांशी `साऱ्याजणी' नी जवळचं नातं जपलं. याच्या बरोबरीनी, महाराष्ट्नबाहेर घडणाऱ्या घटना घडामोडी मग त्या साहित्यिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक क्षेत्रातल्या असोत, त्यांचा धागा जोडत रहाण्यात `साऱ्याजणी' सतत प्रयत्नशील आहे. ,

मिळून साऱ्याजणीमध्ये, कार्यकर्ता आणि पत्रकार अशा दोन्ही भूमिका बजावत-निभावत, संपादनाचं काम करण्याची धडपड आहे. यामुळे मासिकाचं व्यवस्थापनही अनौपचारिकतेमधली लवचिकता, ओलावा, कमीत कमी उतरंडीची रचना यांचं भान सांभाळू बघणारी आहे. नियमांच्या चौकटीपेक्षा परस्परांच्या विश्वासातून जबाबदारी सांभाळली जावी अशी इथे अपेक्षा आहे. एकाधिकारापेक्षा सामूहिक निर्णयाचं महत्व साऱ्याजणी' मानतो. पैसा आवश्यक आणि महत्वाचा आहेच, पण तो सर्वाच्च घटक नाही. असं इथे काम करणारे सगळेजण मानत आले आहेत. हे सारं आदर्शवादी म्हणूनच हवंहवंस वाटणारं आहे. तरीपण ते साऱ्याजणींना पूर्णपणे आचरणात आणता आलं आहे, असा अर्थातच दावा नाही. या मासिकाकडे बघत आमची वाटचाल सरू आहे.

पहिल्या अंकापासून मासिकाच्या मुखपृष्ठावर 'स्वत:शी नव्यानी संवाद सुरू करणारं मासिक' अशी एक ओळ सातत्यानी उभी आहे. मासिकाची उद्दिष्टं आणि मासिकाची भूमिका यांच्याशी मुखपृष्ठावरची ही ओळ सुसंगत आहे. तशीच ती मासिकाच्या अंतरंगाबाबतही बरंच काही सांगणारी आहे. यात - कथा, कविता, ललित, वैचारिक लेख, मुलाखती आणि यापैकी कोणत्याही साहित्यीक `घाटात' बसवताना येणारे वाचकांच्या मनाचे अविष्कार, असं खूप काही आहे पण ते केवळ मनोरंजनात्मक नाही. ते वाचनीय असेलच पण वाचता वाचता ते विचार करायलाही लावेल, याची चुणुक या मुखपृष्ठावरच्या ओळीतून मिळते. शिवाय `साऱ्याजणीची' मुखपृष्ठेही केवळ सुंदर स्त्रीचा वापर करणारी नसतात. त्यामुळे मुखपृष्ठापासूनच मासिकाच वेगळेपण वाचकांपर्यत पोहचत. ही मासिकाची मर्यादाही ठरते आणि तेच सामर्थ्यही ठरतं. अतिशय देखणी, अर्थपूर्ण मुखपृष्ठ हे साऱ्यांजणीचं एक वैशिष्ट्य आहे. उदाहरणार्थ पहिल्या अंकांच मुखपृष्ठ गोधडीचं आहे. आपल्याला रंगाच, पोटाचं आकाराचं वेगळेपण घेऊन एकत्र येणारे हे तुकडे जोडले की त्याच उबदार पांघरूण बनतं. म्हणून `मिळून साऱ्याजणी'च हे प्रतिकात्मक मुखपृष्ठ.

आर्थिक स्थिती , रंगीत मुखपृष्ठ परवडण्यासारखी नव्हती तेव्हापासून, म्हणजे अगदी सुरूवातीपासून, एवढा रंगीत छपाईचा खर्च आम्ही जाणीवपूर्वक केला. कारण आजच्या झगमगाटाच्या दुनियेत, अंक उचलला तर जायला हवा. तो उचलला गेला तर तो कदाचित वाचला जाईल ही शक्यता होती. म्हणूनच मुखपृष्ठावरच्या तत्त्वाची कधीही तडजोड न करता आम्ही क्वचित काही श्वेतशामल मुखपृष्ठांचे अपवाद वगळता, सुंदर, रंगीत मुखपृष्ठच देत आहोत.

आजच्या जाहीरातीच्या जमान्यात, सर्वार्थानी, सर्वांगानी, साऱ्याजणी हे जाहीरात दारांना आकर्षित करणारं मासिक ठरू शकत नाही. याचं भान आम्हाला आहे. म्हणूनच हरतऱ्हांनी, छापील शब्दांच्या पलीकडे जाऊन लोकांपर्यंत पोहचण्याचा आणि व्यक्तिगत संपर्क ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यात सखी मंडळ हा वाचक मैत्रिणींचा गट, सात सात हा तरूण मुलामुलींचा गट, अक्षरस्पर्श सारखं ग्रंथालय या उपक्रमाचा आणि गावोगाव जाऊन घेतलेल्या वाचक मेळाव्यांचा समावेश करता येईल.