प्रिय छोटी

ती विमानतळाबाहेर आली. हातात दोन बॅगा, गळयात लटकावलेली पर्स ! बाहेर आल्यावर हातातील बॅगा तिनं खाली ठेवल्या. तेवढ्यात तत्परतेनं ड्नयव्हर पुढे आला. त्यानं तिला अदबीनं नमस्कार केला. थोडंसं हसून ती म्हणाली.

``कसे आहात, अंकल ?''

``छान आहे. चला गाडी उभी आहे तिथं.'' त्यानं दोन्ही बॅगा हातात घेतल्या आणि डिकीत ठेवल्या. मागचा दरवाजा उघडीत त्यानं आदबीनं म्हटलं,
``बसा, ताईसाहेब.''

तिनं खिडकीची काच वर घेतली., ऐसपैस बसून मागे मान टाकली.

``ताईसाहेब, कॉफी...'' तो बोलता-बोलता थांबला.

``नको.''

``माँजींनी दिला होता थर्मास ! घ्या.'' तो म्हणाला.
तिचे डोळे भरून आले. पण ते पाणी आतल्या-आतल्या जिरवित तिनं कॉफी कपात ओतली. शांतपणे ती कॉफीचे घुटके घेऊ लागली. तिची कॉफी पिऊन होईतो तो बाहेरच फिरत राहिला. नंतर येऊन म्हणाला,

``निघायचं ताईसाहेब ?''

``हो.'' ती म्हणाली.

त्यानं गाडी सुरू केली. मग हलकेच म्हणाला.

``क्रॅसेट लावू?''

``नको.''

``ठीक आहे, ताईसाहेब.''

गाडीनं वळण घेतलं. त्याच्यासमोर तिनं आतापर्यंत चेहऱ्यावर ओढून आणलेलं हसू पुसट झालं. खिडकीतून रहदारीकडे बघता-बघता तिला आठवलं. तिच्या जावेनं पायलनं तिच्यापुढे एक पाकीट केलं होतं आणि तिनं ते रागानं बॅगेत टाकलं होतं. तिच्याकडे न बघता हातात दोन बॅगा घेऊन ती घराबाहेर आली. ड्नयव्हरने तिच्या हातून बॅगा घेतल्या.
ती गाडीत बसणार तेवढ्यात शौनक म्हणाला,

``अजून विचार कर, हर्षदा. वेळ गेलेली नाही. आपण दोघे वेगळे राहू. सुखात राहू. माझ्यावर विश्वास ठेव. इथून पुढे केवळ मी..''

``शौनक, बस्स झालं. मला तेच तेच पुन्हा ऐकायचं नाहीये.''

``तरीपण एक सांगतो. तुझा होकार-नकार काय असेल ते कळव. मी थांबेन तुझ्यासाठी, मला संधी देऊन बघ.'' तो थांबला.

ती गाडीत बसली. खिडकीची काच बंद केली. त्याचा निरोपाचा हात हलताना दिसत होता. ती मख्ख राहिली.

आताही तिच्या मनात विचार आला. शौनकनं म्हटलंय, इथून पुढे मी तुझा आणि केवळ तुझाच राहीन. खोटं बोलतोय तो! भलावण करतोय माझी! त्या नखरेल बाईनं त्याला वेडा केलाय. तो माझं ऐकेल! नाही ऐकणार. बनेल आहे ती पायल! पक्की डांबीस आहे. कुलटा, नीच, हलकट, उद्ध्वस्त केलंय मला. पण मी नाही उद्ध्वस्त होणार. बाबांचीच काळजी वाटत्येय. एकुलत्या एका लेकीचं असं विपरीत झालेलं पाहून धक्का बसेल त्यांना! बरंवाईट काही झालं तर...

तिनं एकदम नजर फिरवली. मनातले विचार निघून जाण्यासाठी ती पटकन म्हणाली,

``अंकल, क्रॅसेट लावा गाण्याची. पण नको. सनईची लावा. बस्स, तेच असू द्या.''

``ठीक आहे, ताईसाहेब!'' ड्नयव्हर म्हणाला.

त्या मधुर सुरांनी तिला बरं वाटलं. डोळे मिटून शांत पडावंसं वाटलं. मांडीवरची बॅग सीटवर ठेवत असताना तिला पाकिटाची आठवण झाली. ते पाकीट! पायलने तिला दिले होते. ``शी: कशाला घेतले ते पाकीट! तिचे भरलेले डोळे पाहून आपण विचलित झालो का? मग अशा स्त्रीचं पाकीट कशाला घेतलं? चुकलंच.''

मनातून असं म्हणत असतानाच तिनं पर्समधील पाकीट काढलं. पाकिटावरच्या दोन बाजूनं मारलेल्या पिना नखानं अलगद बाजूला केल्या, उचकटून फेकून दिल्या. पाकीट उघडलं. एक कागद होता लिहिलेला!

एवढं काय लिहिलंय हिनं? घरात आठवडाभर धुमसत असणारा अंगार, त्यावर आपण घातलेला प्रश्नांचा भडिमार आणि तेवढ्याच शांतपणे शौनकने दिलेली उत्तरे, सासूबाइंर्नी जोडलेले हात!

``हर्षदा, बेटी मत जाओ! मेरे लिये रुको.''

नाही थांबलो आपण ! थांबायचं नव्हतंच. निर्धारच झाला होता मनाचा. त्याला कोणाचंच आर्जव मोडू शकलो नाही. तिनं चिठ्ठी उघडली. वाचायला सुरुवात केली.

प्रिय छोटी,

मी कशीही असले तरी तुला `सुखी रहा' असा आशीर्वाद देते. तू म्हणशील, `तुझी आशीर्वाद देण्याची लायकी आहे का?' नसेलही. माहीत आहे मला. पण शुभ बोलावं माणसानं. तो आशीर्वाद फळेल न फळेल, पण मी मनापासून बोलतेय. त्याला बळ देणं विधात्याच्या हाती.
छोटी, तुला वाटेल मी इतकी वाईट वागते, आणि विधात्याचे नावपण घेते! पण छोटी, मला वाटतं, विधात्याला सगळंच ज्ञान आहे. तो जाणतो ना सारं? मग माझी अगतिकता, दु:ख हे पण तो जाणत असेलच. मग त्याला मी का स्मरू नये? त्याचा आधार घेऊन तुला आशीर्वाद का देऊ नये?
छोटी, मी फार शिकलेली नाहीये. परिस्थितीनं नाही जमलं. माझ्या दोन बहिणींची लग्नं झाली होती. त्यांच्या लग्नाचं कर्ज फेडता-फेडता बाबा मेटाकुटीला आले होते. त्या लग्नासाठी बाबांनी घरावर कर्ज घेतलं होतं. ते फेडू न शकल्यानं गहाण घर गेलं. आम्ही आईच्या माहेरी गेलो. आजोबांनी तीन खोल्यांचं घर घेऊन ते आईला दिलं. आईच्या माहेरानं आमच्यावर खरी सावली धरली.

बाबांनी काकांची शिक्षणे केली, तेच पुढे बाबांना विसरले. माझे प्रामाणिक बाबा कर्तव्याच्या आगीत होरपळून निघाले. पण ते दोन्ही काकांबद्दल कधी कटू बोलले नाहीत, किंवा त्यांच्या श्रीमंतीमुळे स्वत:ला कमीपण लेखले नाही त्यांनी!
माझी नववी झाली आणि बाबांनी आईला सांगितले.

``पायलला आता घरीच राहू दे. तिला आता घरच्या रीती-भाती, स्वयंपाक हे सारं शिकवायला हवं. तिचं शिक्षण पुढे नेणं माझ्याच्यानं होणार नाही. तिचं लग्न झालं की, मोठं काम झालं. आदेशच्या शिक्षणावरच लक्ष दिलं पाहिजे. दुकानदारीत काही राहिलं नाही. मोठमोठी आलिशान दुकानं आता उभी राहिलीत. छोट्या दुकानात आता गर्दी होत नाही. आदेश नोकरीला लागला की, मग कर्तव्याची समाप्ती झाली.''

छोटी, हे सारं बोलणं बोलताना, माझं शिक्षण बंद करताना, त्यांना फार वाईट वाटत होते. त्यांचे डोळे हे बोलताना गच्च भरले होते. पण त्यांनी निग्रहाने डोळे पुसले. आई मात्र घळाघळा अश्रू ढाळीत उभीच होती. आणि तरीही तिचा आधाराचा हात बाबांच्या पाठीवर फिरत होता. बाबा खिडकीतून बाहेर पाहात बोलत होते. आकाश निरभ्र होतं. पण आमची मनं मात्र काळोखाने भरलेली होती. दुकानदारी चालत नव्हती. बाबा काळजीत होते.
मग बाबांनी दुकानही विकून टाकलं. एका फर्ममघ्ये ते काम करायला लागले. आईनं भरतकामाचं काम अंगावर घेतलं. माझी तिला मदत होती. आदेश पैसे मागतच नव्हता, त्याचा वरचा खर्च तो दुकानांमध्ये, स्टोअर्समध्ये काम करून भागवीत होता. छोटी, हट्ट नाहीच केला कधी, त्यानेही आणि मीही! माझं वय वाढू लागलं होतं. वय वाढतंच ना? ते थांबवता येतं का? किमान गरीब माणसाला तरी अशी जादू यायला हवी होती, वय वाढणार नाही अशी! मी लहानच राहायला हवी होते. पण तसं कसं होणार? माझ्याकडे पाहून बाबा एकदम काळवंडून जायचे. फारसे बोलायचेच नाहीत. छोटी, तुला अनुभव नसेल, पण गरिबी माणसाला आतून पोखरत असते, दुबळं करीत असते.

छोटी, पण बाबा दुबळे नव्हते. पण घरच्या भावांनी बोलणं टाकलं, हे त्यांनी फार लावून घेतलं मनाला! एकदा त्याच विचारात कामावरून घरी येत होते. त्यांची गाडी ट्न्कला घासून गेली. मागच्या चाकात बाबा गेले. दोन दिवस झगडत होते मृत्यूशी! आणि मग बाबांची या जगातून सुटका झाली. आई कोसळली. तिला उभारी देता-देता आम्हां भावंडांची ससेहोलपट झाली.

पण सावरलो. छोटी, एकामागून एक संकटं यायला लागली की, मला वाटतं, माणूस जास्त खंबीर होत असावा. तसे आम्ही खंबीर झालो. आणि येईल या प्रसंगाला तोंड द्यायचं ठरवून टाकलं आम्ही! आदेश आणि मी, आईला सांभाळत, एकमेकांना दिलासा देत, दिवस ढकलत होतो. छोटी, तुला हे ठाऊकच नसेल `ढकलणं' काय असतं ते! आदेश आणि मी आईचे दोन खांब होतो, तिचा आधार होतो, तिचा आशीर्वाद आमच्यावर आभाळ भरून होता. त्याखाली आम्ही सुरक्षित होतो.

आम्ही गरीब होतो. पण छोटी, सौंदर्याची श्रीमंती विधात्यानं आम्हांला भरपूर, सढळ हाताने बहाल केली होती. सौंदर्याचा झंकार माझ्यात जास्त झंकारत असावा, म्हणूनच आईबाबांनी माझं नाव पायल ठेवलं असावं. पायल! छान छान वाजणारं! प्रत्येक झंकाराला एक सौंदर्यपाऊल जमिनीवर टाकणारं! पण छोटी, आपल्या समाजाला नुसतं रूप आणि गुण असणारी मुलगी नाही चालत, त्याचबरोबर तिला पदरात घेणाऱ्या सासऱ्यांना तिला स्वीकारल्याबद्दल भेट द्यावी लागते. त्याला हुंडा म्हणतात. तो आमच्याकडे तर नव्हताच. बाबांनी खूप प्रयत्न केले होते, पण बिनाभेटीशिवाय कोणीच मला पदरात घ्यायला तयार नव्हतं. कुठून आणायचे एवढे पैसे? जिथे रोजच्या रोजी-रोटीचा झगडा होता, शेवटी बाबा गेले. ते गेले तरीपण हुंड्याचा प्रश्न लोंबकळतच होता ना?
मग आईने काकांचे पाय धरले. धरावेच लागले. पोरीचं लग्न ठरवा म्हणाली. दुसरा पर्यायच नव्हता, छोटी! मग काका राजी झाले आणि त्यांनी हे स्थळ आणलं. आपल्या या श्रीमंत लोकांचं! ज्यांच्या घरी चारही दिशांनी पैसाच वाहात होता. पैशाशिवाय बातच नव्हती; असं कोट्यातलं एक स्थळ! आमच्या दृष्टीनं स्वर्गालाच हात लागले. आनंदाबरोबर घाबरलोपण आम्ही! छोटी, ज्यांनी पैसा, पैसा करीत अर्ध आयुष्य घालविल्यावर त्यांना एक पैशांचा डोंगरच दिसल्यावर काय होईल? तसंच झालं आमचं.

माझ्या काकाजींना या लोकांनी फक्त मुलगी मागितली. बस्स! एकही पैसा न घेता, मला गडगंज संपत्ती असणारं सासर मिळणार होतं. तर मग काय पाहिजे होतं? कुणीतरी म्हणालं, ``आम्हांला रूपवानच मुलगी पाहिजे होती.'' केवळ रूपामुळे एवढा बदल होतो? पण या आधीच्या स्थळांना पैसाही पाहिजे होता. अशावेळी माझ्या सासरचे लोक आमच्यासाठी `देव' बनूनच आले होते. छोटी, देवानं केवळ माझ्यासाठी, माझ्याचसाठी दया येऊन पृथ्वीवर हे घर निर्माण केलं असावं, असं म्हणून आईनं देवाच्या मूर्तीचे पाय अश्रूंनी धुतले. आदेशने मला मिठी मारली, त्याच्या डोळयांत आनंदाश्रू होते, तो अश्रू पुसत म्हणाला,
``दिदी, भगवान बहुत दयालूू है!''

मलाही तसंच वाटलं, छोटी. दुसरं काय वाटणार? सगळे म्हणाले, गेल्या जन्मी मी खूप खूप पुण्य केलं असावं, म्हणून या सौंदर्याच्या खाणीला असं सोन्यामोत्यांनी लगडलेलं सासर मिळालं.

छोटी, गरिबाला काय हवं असतं? मला इतकं श्रीमंत सासर मिळालं नसतं तरी मी दु:खी झाले नसते. एवढी मोठी अपेक्षा नव्हतीच ना! खरंतर आमच्याकडून कुठलीच अपेक्षा नव्हती. मुलगी पदरात घ्या, मागितलं काही तर फार मागू नका. मग तो मुलगा कसाही असू दे, खातं पितं घर असलं की बस्स! एवढीच अपेक्षा होती. मग हे स्थळ म्हणजे स्वर्ग तो हाच असं आम्हांला का वाटू नये? कुणी मला विचारलं असतं, स्वर्ग कुठे आहे? तर मी म्हटलं असतं `या घरी!' म्हणजेच माझ्या सासरी! याशिवाय दुसरा स्वर्ग असूच शकत नाही.

आलिशान मोटारीतून, सौंदर्य आणि वैभव, अंगाखांद्यावर मिरवत मी भव्य महालात प्रवेश केला. सासरचा बंगला राजाचा महाल शोभावा असाच होता. (तुला हे ठाऊकच आहे...आता.) त्याला `महाल' म्हणणंच बरोबर होतं. या महालात मी प्रवेश केला.

माझी स्तुती झाली. खूप, खूप! माझा चेहरा पाहण्यासाठी (मूँह देखी) नातेवाइकांनी समोरच्या चांदीच्या तबकात लाखो रुपये ठेवले, जे मी कधीच पाहिले नव्हते. मला वाटतं राहिलं, एवढ्या नोटा? एवढे-एवढे वीस-पंचवीस दागिन्यांचे बॉक्स! मन, डोळे विस्फारले माझे!

`हाय, हाय, ये बहू तो पूनम का चाँद है ।'

`ये तो इंद्रलोक की अप्सरा है ।'

`यह भगवान का करिष्मा है ।'

माझ्या अंगावर स्तुती-सुमनांचा पाऊस पडला. केसातल्या भांगापासून ते पावलांच्या बोटांपर्यंत सासरच्या दागिन्यांनी मी नटले होते. आईनं तिचा एक दागिना विकून मेखला केली. आईचा एकुलता एक दागिना, माझ्यासाठी तिनं खर्च केला, पण ती मेखला त्यांनी घालू न देता दुसरी हिरे-माणकांनी सजवलेली मेखला मला दिली. मला वाईट वाटलं, पण आईनं समजूत काढली. सौंदर्य, सोनं आणि सुवासिक फुलांचा परिमल! जणू मी कोणी सम्राज्ञीच होते. माझ्या पुरतीच नाहीतर माझ्या सगळया नातेवाइकांपुरती तरी!

छोटी, आमच्या चाळीस पिढ्या होऊन गेल्या असतील, माहीत नाही. गेलेल्या किंवा संपलेल्या आणि पुढे असणाऱ्या सगळयांनी माझी दृष्टपण काढली असेल त्यावेळी! असं सासर मला भाग्यवतीला मिळालं होतं. छोटी, मी खरंच भाग्यवती होते. आजपण आहे, तू म्हणते तशी!
तुला आजपर्यंतचे माझ्या जीवनाचं रामायण सांगितलंच पाहिजे छोटी! त्या रामायणात सीता केवळ रामाचीच बायको होती. केवळ आपल्या नवऱ्याची! माझ्या जीवनातील राम..! छोटी, मी घुंगट काढून बसले. पहिली रात्र होती माझी! गुलाबांचा, मोगरीचा घमघमाट पसरला होता. जशी शेज मखमली होती ना, छोटी, तसंच माझं मनपण या नव्या जीवनाबद्दल, संसाराबद्दल मखमली भावनांनी उत्सुक झालं होतं.
पहिला पुरुषी स्पर्श! हुरहुर आणि उत्सुक भीती! हृदयात होणारी कंपित धडधड! कसं होईल? ही एक भीतीची लहर अंगातून सुर्रकन जाणारी! हे संुंदर अस्पर्शी शरीर त्याच्या स्वाधीन करण्याचं बायको म्हणून कर्तव्य! संसाराची सुरुवात! पुरुषी स्पर्शाची जादू! आणि देह स्वाधीन करतानाची होणारी अंतर्बाह्य जाणारी वेदनायुक्त कळ!

लग्न झालेल्या मैत्रिणींनी पहिला संभोग सांगितलेला! थरारले होते मी, भीती, भयंकर भीती होती, पण नंतर वाटलं हे साऱ्यांनीच अनुभवलंय ना! असं म्हणून मनाला तयार केलेलं!

छोटी, मी पहिला रात्रीचा अनुभव मैत्रिणींच्या तोंडून ऐकला होता. हा अनुभव सांगताना, त्यांचं लाजून लाल होणं पाहिलं होतं. नंतर नंतर त्या सुखाची झालेली सवय! हे सांगताना बेशरमपणाचं हसूपण हसल्या होत्या. पण काही वाटलं नाही. मामला मैत्रिणींचा असतो ना, म्हणून तो त्यांचा बेशरमपणा आवडतोच.

छोटी, तर मी माझ्या नवऱ्याची वाट पाहात बसले. दार उघडले गेले, आणि बंद झाले. हृदयात नकळत धडधड माजली. कानांत ऐकू येईल एवढी! माझ्या शेजारी तो बसला.

`मला बळजबरीचा मामला आवडत नाही. इकडं बघ.' त्यानं घुंगट काढला. माझा सासरा माझ्या शय्येवर होता. मस्तकात अनेक घाव पडले. कल्लोळ झाला.

`तुला सांगतो ते नीट ऐक. माझा मुलगा-तुझा नवरा तुला शरीरसुख देण्यास समर्थ नाही. तुला ते सुख माझ्याकडून घ्यावं लागेल. तीपण तुझी इच्छा असेल तर! मला बाईच्या इच्छेविरुद्ध तिला हात लावायला आवडत नाही. आमच्याकडे पैसा भरपूर आहे. मिळवलाय. असं पुढ्यात बाईला घेणं मी कुमार वयापासून केलंय. माझ्या वाडवडिलांनी तेच केलंय. त्यात गैर वाटण्यासारखं काहीच नाही.'

`तुला, तुझ्या होणाऱ्या मुलांना आयुष्यभर बसून जगता येईल इतकी संपत्ती आहे माझ्याकडे! फक्त तुला तडजोड करावी लागेल. तुझ्या काकाजींना याची कल्पना होती. त्यांचीपण इच्छा होती. तुमची लाज, आमची लाज एकच आहे.' असं ते म्हणाले. आमची सून शरीरसुखासाठी बाहेर जाणार नाही. तुला इथंच राहावं लागेल. तेही राणी म्हणूनच! तू कुणाची बटीक नाहीस. तुला हे मंजूर नसेल तर तू तुझ्या माहेरी जायला मुखत्यार आहेस.'
छोटी, वय वर्षे सतरा वयाच्या या मुलीच्या जीवनात काय, काय घडू पाहात होतं बघ. स्वत:ला उंच कड्यावरून फेकून द्यावं आणि या जीवाचा शेवट करावा असं पण वाटलं मला! काकाजींनी या बापाविना मुलीला अलगद अशा गुहेत लोटली होती. तिथून मी परत कशी जाऊ? कुठे जाऊ? नवऱ्यानं सोडलेल्या मुलीशी कोण लग्न करील? कुणाला मी सांगितलेलं खरं वाटेल?

छोटी, मला खूप कष्टाच्या, भुकेल्या अनुभवातून जावं लागलेलं होतं. पुन्हा आयुष्याची फरपट होण्यास माझी मीच तयार नव्हते. मी निर्णय घेतला, आणि सासऱ्याच्या मिठीत गेले. माझं सुंदर शरीर, त्या बेडौल शरीराच्या पण पुरुषार्थानं गच्च भरलेल्या ताकदवान सासऱ्याच्या स्वाधीन केलं.
माझ्या नग्न देहाकडे पाहताना तो हसला. भेसूर वाटलं मला ते हसू! माझं शरीर हाताळतानाही तो हसतच होता. जिंकला होता तो! त्याचं ते हसू जिंकल्याचं... एका तरुण स्त्रीला अंगाखाली घेण्याच्या विजयाचं होतं. मला रक्ताळून टाकलं त्यानं.

जबरी संभोग! बलात्कार! छोटी, माझ्या डोळयांत आसवं होती. शरीरातील वेदना मस्तकापर्यंत जात होती. त्याने शरीराचे तोडलेले लचके! घेतलेले चावे! हुळहुळणारं शरीर! छोटी, मग रोजच हा बलात्कार झेलत राहिले. संभोगाच्या अनेक तऱ्हा! अनेक आसनांनी त्यानं मला पिसाळून टाकलं. छोटी, या पुरुषानं मला तरबेज केलं. आगीत होरपळायला त्यानंच शिकवलं आणि अंगाअंगाला शीतलता कशी येते, हे त्यानंच माहीत करून दिलं.
अनेक बायकांना थोपटणारे त्याचे हात मला थोपटत राहिले. मग दिवस-रात्रीचा मुलाहिजा संपला. त्याला हवं तेव्हा, हवं तसं! हवं तितक्या वेळा! तो सांगेल तसंच यायचं. मी पटाईत झाले. जखमांनी व्यथित होऊन जखमा चाटण्याइतकी! माझी जणू यासाठीच या घरात नेमणूक झाली होती. माझी जणू ही नोकरीच होती. मी ती, मालकानं सांगावं आणि मी ऐकावं, इतक्या इमाने-इतबारे करीत राहिले.

छोटी, तुझ्या लक्षात येईल, स्त्री निर्ढावली की किती बेशरमपणे वागू शकते ती! माझी सासू! तिला हे सारं माहीतच होतं. सासऱ्यानेच सांगितलं असावं. नवऱ्याच्या बाहेरख्याली जीवनाशी ती स्त्री समरस झालेली! पवित्र बाई, परस्त्रीशी शृंगार करून आलेला नवरा तिनं मानला. त्याला `वर' घेताना तिनं ते पण मान्य केलं. त्याची इच्छा असेल तरच तो आपल्याकडे येईल, आणि तो नेहमी येईलच असं नाही. छोटी, माझ्यासारखीच तिनेपण तडजोड केली असावी. आणि आजपण करतेय.

छोटी, आम्ही दोघी स्त्रिया! एकाच घरात राहणाऱ्या, समझोता केलेल्या! आणि एक दिवस वेगळंच घडून गेलं. माझा लहान दीर सुटीमध्ये घरी आला. तो म्हणजे तुझा नवरा शौनक! होस्टेलमध्ये राहणारा, तरुण, सुडौल, आकर्षक पुरुष! पुरुषीपणाचा वेग त्याच्याभोवती जणू विखरला होता. विचार केला तर माझ्या नवऱ्यासारखा बलदंड असणारा! पण पुरुष! खरा-खरा पुरुष! या दिराला मी लग्नातच पाहिला होता.
बापाचा दिमाख त्याच्यातही होताच. छोटी, मला कधी कधी वाटायचं, माझा नवराही हा असाच, यांच्यासारखा दिसणारा, मग पुरुषीपणाचा अभाव असणारा, पण दुबळा का? की माझ्या प्राक्तनातच हे सारं भोगायचं होतं? पुन्हा तेच. जाऊ दे. आज असं झालंय छोटी, की या दोन पुरुषोत्तमांमध्ये माझ्या नवऱ्याला तर मी विसरूनच गेलेय.

तुझ्या नवऱ्यानं बापाला आणि भावजयीला उघड्या अंगानं एकमेकांच्या कुशीत पाहिलं. पण गंमत अशी की, तो बापाला काहीच बोलला नाही. बापाने गाडी कारखान्याकडे वळवल्यावर तो माझ्याकडे आला, मला वाटेल ते बोलायला लागला. पुरुषांची ही उलटी गेम असते, छोटी. आग लावायची आपणच, पलिते फेकून! आणि पेटायला सुरुवात झाली की, बोंब मारायची, `आग लागली! धावा! धावा!' म्हणून. तसंच झालं होतं माझ्याबाबतीत.
तो मला हवं ते बोलायला लागल्यावर मी चवताळले. त्याच्यासमोर उभी राहून म्हणाले - ``तुझ्या बापालाच विचार ना! मला काय विचारतोस? तो का येतो माझ्या बेडरूममध्ये! तुझा भाऊ फिरतीवर का असतो? कंपनीच्या कामाने काय त्याला बायकोजवळ झोपायला बंदी केलीय? तो बाहेर-बाहेरच का असतो? मला काय रे! मी बांधून आणलेली गाय! बांधलेली गाय हलत नाही, डुलत नाही. मग तिच्यावर बैल झेपावला तर दोष कुणाचा रे?''
छोटी, मग मी ठरवले. बनेलपणा केला. रात्री शौनकच्या बेडरूममध्येे गेले. कपडे फेकून त्याच्या कुशीत शिरले. आता मी पूर्ण निर्लज्ज झाले. परिस्थितीनं मला कुठं आणून ठेवलं बघ, छोटी! एका सामान्य घरातील, सामान्य मुलगी मी, प्रेम, वासना काहीच गंध नसलेली, मला या दोन पुरुषांनी बनेल स्त्री बनवून टाकलं. शौनक माझ्या तरुणाईचा `वास' घेतल्यावर तो वारंवार घरी येऊ लागला. छोटी, मला दोन मुलगे झाले. या दोन पुरुषांकडून! या दोन पुरुषांची मी खरी तर बायकोच ना? जगासमोर वेगळं नातं सांगणारी!

छोटी, तू जाताना एक वाक्य तोंडावर फेकून मारलंस, ``माझा नवरा आपल्या स्वाधीन ठेवलास तू. विजयी झालीस हा विजय उराशी वटाळून बस. मला तो उष्टा नवरा नकोय. तुलाच घे हा नवरा! कदाचित तो गरीब, गरजू मुलीशी लग्न करील आणि ती तुमचा प्रणय शांतपणे सहन करील. तू दोघांवर राज्य कर. सम्राज्ञी हो. पण मी थुंकते तुझ्या या सम्राज्ञी पदावर!''

छोटी, किती सहजपणे बोलून गेलीस. सम्राज्ञीपद! त्यावर थुंकून गेलीस तू. सम्राज्ञी हा शब्द तू चांगला वापरलास. मान्य आहे तो मला! बेशरमपणे मी बोलू शकते की, `हो मी सम्राज्ञी आहे या-या घराची! दोन पुरुषांवर मी राज्य करतेय. दोन पुरुष माझ्यावर लोळतात. त्यांचा पैसा, इस्टेट यांची मी मालकीण आहे. म्हणून मी सम्राज्ञी आहे. आणि छोटी मी शेवटपर्यंत अशीच राहणार आहे. जगासमोर बडे घर की बहू!' नोकर मला `बडी माँ' म्हणतात. तुला `छोटी माँ' म्हणाले असते, पण तू निघून चालली आहेस. `माँ'चं पद या नोकरांनी दिलेलं आणि पत्नीपद नवऱ्यानं दिलेलं, या दोन्ही पदांना लाथ मारून तू निघून चालली आहेस. तुझ्या दृष्टीनं तुझा निर्णय बरोबरच आहे. तुझ्या जागी मी असते, तर मीपण हाच निर्णय घेतला असता.
छोटी, तुझं माहेर समृद्ध आहे. तुझ्या निर्णयाला ते अनुकूलच मत देतील. तुझ्या पाठीशी माहेराचा फार मोठा आधार आहे. शिक्षणाची ढाल तुझ्या हातात आहे. परिस्थितीचे वार तू सहज झेलू शकशील. तुझ्यात हिंमत आहे, जे तुला नकोय, ते तू स्वीकारणार नाहीस, हाच तुझा विजय आहे.
मला हे पुरुष छोटी, मरेपर्यंत सुटणार नाहीत. दोन पुरुषांचा संग, मी किंवा ते मरेपर्यंत राहणारच आहे. माझ्या मुलांचं `बापपण' दोघांनी स्वीकारलंय. ते आपलं कर्तव्य व्यवस्थित पार पाडतील.

नवी नवरी म्हणून नवऱ्याची पहिल्या रात्री वाट पाहात असताना, तुझा नवरा माझ्या मिठीत पडला होता. त्याची वाट पाहण्याचा कंटाळा येऊन तू बेडरूमच्या बाहेर आलीस. फिरत फिरत माझ्या बेडरूममध्ये लोटल्या दारातून आत आलीस. आम्हां दोघांना नको त्या अवस्थेत पाहून सुन्न झालीस. शौनकशी मग खूप वादावादी झाली. दुपारी मला काही बोलायला माझ्या रूममध्ये आलीस, दुपारी मी सासऱ्याच्या मिठीत होते. दोन पुरुषांच्या मिठीत झोपणारी तुझी व्यभिचारी जाऊ! मला तू वाटेल ते म्हणालीस तरी छोटी मला त्याचं काय वाटायचं? आणि का वाटावं?

छोटी, आज नसला तरी त्यावेळी माझ्या माहेरी उन्हाळाच होता. माहेरी गेले असते तर काकांच्या घरी मोलकरीण व्हावं लागलं असतं. पुन्हा नवऱ्याने टाकली म्हणून समाजकंटकांच्या नजरांचं भय होतंच. म्हणून तो विचार मी डोक्यातून काढला. आणि या दोन महान पुरुषांच्या स्वाधीन स्वत:ला केलं. दुसरा उपायच नव्हता. आता यांच्या कृपेनेच तुझ्या नवऱ्याच्या कारखान्यात माझा भाऊ भागीदार आहे. सुखात आहे. आईनं समाधानात या जगाचा निरोप घेतला, मुलाचं, लेकीचं कल्याण झालं. ती सुखात गेली हे माझं भाग्य. ती दु:खात नाही गेली. माझ्या लेखी हेच पुरेसं आहे, छोटी! तुला गरिबी माहीत नाही. तुला हे समजणार नाही.

छोटी, तुझ्यासारखं मला माहेर असतं, पाठबळ असतं, शिक्षण असतं, तर मी अशीच तुझ्यासारखी निघून गेले असते. पण मला कुठलं बोट आधाराचं नव्हतं. उद्या तू गेलीस तरी शौनकला बायको मिळेलच. आणि तरीही तो माझ्याजवळ येईलच. तो मला सोडणार नाही कधीच! आणि सासरापण सोडणार नाही मला. तूच ठरव छोटी, कोण भाग्यवंत आहे? दोन लांडग्यांना रोज सामोरी जाणारी, त्यांच्याकडून शरीराचे हाल करून घेणारी आणि जगासमोर `बडी माँ' म्हणून मिरवणारी मी! आहे ना भाग्यवंत?

छोटी, मी व्यभिचारी ठरले. पण आपल्या तरुण, सुंदर पुतणीला या व्यभिचारात लोटणारे माझे काका, ते कोणते पुरुष ठरतील? ते प्रतिष्ठित, होय ना छोटी? मला खेळणं समजून खेळणारे हे दोन पुरुष व्यभिचारी नाहीत. होय ना छोटी? न्याय असाच आहे. मग तो बाईनं केला तरी, त्यात फरक नाही पडत! तू बाई असून मला नाही समजू शकलीस. आणि न्यायपण देऊ नाही शकलीस. मला व्यभिचारिणी ठरवून मोकळी झालीस. तुला मार्ग आहे, छोटी! म्हणून तू रुबाबात घर सोडशील. परिस्थितीनं हतबल असणाऱ्या मला मात्र असा रुबाब करताच आला नाही, छोटी!
ज्या घरी तू जाशील, तिथं तरी तुझा नवरा तुझाच असू दे केवळ! अशी मी देवाजवळ तुझ्यासाठी प्रार्थना करीन. कुठेही गेलं तरी पैसेवाला नवरा, सोज्वळ असेलच असं नाही. घरात नाही तरी दारात तरी तो दुसरं फूल हुंगतच असतो. सगळे नसतील, पण काही आहेतच आहेत.
आणि हो, एवढं लक्षात ठेव, छोटी, बाई उघडी पडली तर बाईनंच तिच्यावर पांघरूण घालायचं असतं. बाई जेव्हा बाईवर पांघरूण घालायला विसरते ना! तेव्हा उघड्या बाईचा कब्जा लांडगे पुरुष घेतात. माझ्या सासूनं आणि मी हे सत्य स्वीकारलं लांडग्यांच्या वर्चस्वाचं! नाही झुगारू शकलो छोटी, खऱ्या तर आम्ही दुर्भागीच. पण तुला हे कसं पटणार, छोटी?

माझा नवरा ढेपाळ निघाला ही माझी चूक आहे का? माझा नवरा पुरुष नाही हे माहीत असूनही माझ्या काकानं मला या घरात पाठवली ही त्याची चूक नाही का? घरातल्या घरात सोय म्हणून मुलाला `बापपण'मिळावं म्हणून सासरा सुनेजवळ झोपला ही चूक नाही का? आणि तुझा नवरा, तो माझ्याशी तरुण भावजयीशी `रत' झाला, ही त्याची चूक आहे का? गरजू भावजय ना मी त्याची? मग तो माझ्याजवळ झोपला ही त्याची चूक कशी म्हणता येईल? मग चूक कोणाची, छोटी? माझीच का? म्हणून मी व्यभिचारिणी ठरते का, छोटी?

(तुझी) दुर्दैवी पायल.

``ताईसाहेब!'' म्हणत ड्नयव्हरनं गाडी थांबवली.
दचकून तिनं पत्र मिटलं. पर्समध्ये ठेवलं. तत्परतेनं ड्नयव्हरनं दार उघडलं. पर्स घेऊन ती घराच्या पायऱ्या चढली. माहेरच्या दारासमोर ती विषण्णपणे उभी राहिली....

नलिनी भोसेकरांच्या ''प्रिय छोटी'' ह्या कथेचे परीक्षण

सामाजिक कार्यकर्त्यांच्या निवेदनांवरून (इतर देशातल्या समाजांप्रमाणेच) भारतीय समाजातही आज वेगवेगळ्या तर्हांचा पुरुषी लांडगेपणा कदाचित बर्‍याच प्रमाणात गुपचुप चालत असावा हे निर्विवाद दिसते. पण ''प्रिय छोटी'' ह्या आपल्या कथेत नलिनी भोसेकरांनी पायलच्या काही परस्परविरोधी मनोव्यापारांचे जे चित्रण केले आहे ते हास्यास्पद वाटते. शिवाय त्यापायी पुरुषी लांडगेपणावर एकझोती प्रकाश टाकण्याच्या कामीही ही कथा निष्फळ ठरते.

भोसेकरांनी पायलच्या पत्रात एके ठिकाणी खालची वाक्ये रचली आहेत :

-----------------------------------------------------------------------------------

...[शौनक] मला हवं ते बोलायला लागल्यावर मी चवताळले. त्याच्यासमोर उभी राहून म्हणाले - ''तुझ्या बापालाच विचार ना! ...तो का येतो माझ्या बेडरूममध्ये! ...मी बांधून आणलेली गाय! ...मग तिच्यावर बैल झेपावला तर दोष कुणाचा रे?''

छोटी, मग मी ठरवले. बनेलपणा केला. रात्री शौनकच्या बेडरूममध्ये गेले. कपडे फेकून त्याच्या कुशीत शिरले. आता मी पूर्ण निर्लज्ज झाले. परिस्थितीनं मला कुठं आणून ठेवलं बघ, छोटी!....मला या दोन पुरुषांनी बनेल स्त्री बनवून टाकलं.’

-----------------------------------------------------------------------------------

भोसेकरांनी वरच्य़ा विधानांमधे दाखवलेला पायलचा मनोव्यापार कदाचित 'नाट्यपूर्ण' असला तरी ''मग मी ठरवले. बनेलपणा केला. रात्री शौनकच्या बेडरूममध्ये गेले. कपडे फेकून त्याच्या कुशीत शिरले. आता मी पूर्ण निर्लज्ज झाले. परिस्थितीनं मला कुठं आणून ठेवलं बघ, छोटी!....मला या दोन पुरुषांनी बनेल स्त्री बनवून टाकलं'' हा पायलच्या मनोव्यापाराचा भाग वास्तवाच्या दृष्टीने हास्यास्पद आहे. पायलच्या सासर्‍याप्रमाणेच शौनकनेही पायलवर सतत बलात्कार केला असे साधेसरळ कथानक रचून हा हास्यास्पद प्रकार भोसेकरांना सहज टाळता आला असता.

भोसेकरांची पायल पत्रात नंतर आणखी लिहिते : ''तू बाई असून मला नाही समजू शकलीस. आणि न्यायपण देऊ नाही शकलीस. मला व्यभिचारिणी ठरवून मोकळी झालीस.''...''गरजू भावजय ना मी [शौनक]ची? मग तो माझ्याजवळ झोपला ही त्याची चूक कशी म्हणता येईल? मग चूक कोणाची, छोटी? माझीच का? म्हणून मी व्यभिचारिणी ठरते का, छोटी?''  !!!

समजा पायलचा नवरा होता तसा ''ढेपाळ'' असता पण तिचा दीर आणि सासरा हे दोघेही कणभरदेखील ''लांडगे'' नसून सुसंसकृत असते तर ''गरजू'' पायलने आपल्या ''गरजे''पायी शौनकला भुलवून त्याच्याबरोबर नाहीतर आणखी कोणाबरोबर ''लफडे'' केले असते असा सरळ निष्कर्ष पायलच्या वरच्या विधानांवरून तयार होतो.

जगात सगळ्या तर्हांच्या स्त्रिया (आणि सगळ्या तर्हांचे पुरुष) आहेत : लग्न होऊ शकले नसले, किंवा वैधव्यानंतर वा काडीमोडानंतर पुनर्विवाह होऊ शकला नसला, किंवा नवरा ''ढेपाळ'' असला तर त्या ''कारणा''स्तव आपल्या ''गरजे''पायी कोणा विवाहित पुरुषाबरोबर कधीही ''लफडी'' न करणार्‍या असंख स्त्रिया जगात आहेत, आणि नवरा ''ढेपाळ'' आहे म्हणून आपल्या ''गरजे''पायी कोणा विवाहित पुरुषाबरोबर ''लफडी'' करणार्‍या स्त्रियाहि आहेत.

वरच्या दुसर्‍या प्रकारच्या ''एका पायल''चे चित्रण करून ''म्हणून मी व्यभिचारिणी ठरते का, छोटी?'' हा विचार वाचकांपुढे मांडणे हा जर भोसेकरांचा हेतू असता तर तशा कथा लिहिणे हा त्यांचा पूर्ण हक्क आहे; पण कथानकात तार्किक सुसंगती नसलेली आणि शिवाय त्यापायी पुरुषवर्गातल्या काहींच्या लांडगेपणावर एकझोती प्रकाश टाकण्याच्या कामीही निष्फळ ठरलेली ही कथा ''मिळून सार्‍याजणी''मधे छापण्याच्या तितक्याश्या लायकीची नव्हती असे मला प्रांजळपणे दिसते.

हे परीक्षण वाचून निराश न होता नलिनी भोसेकरांनी आपल्या ह्यापुढच्या कुठल्याहि लिखाणात उत्तम तार्किक सुसंगती राखण्याचा कटाक्ष बाळगून लेखन जरूर चालू ठेवावे असे मात्र मी आग्रहाने सुचवतो.

=========================================================

Hiphop, Rap, Türkçe rap