ती गेली तेव्हा...
तो ऑफिसमधून घरी येतो. दमून सोफ्यावर बसतो. त्याची आई आतून येऊन त्याच्या हातात चहाचा कप देते. तो आईकडे बघून किंचित हसतो. आईची नजर त्याच्यावर स्थिरावलेली... त्याच्यात काहीतरी धुंडाळणारी... नेहमीप्रमाणेच... तिचे डोळे त्याला काही प्रश्न विचारतायत.. त्याला जोखतायत...तिच्या मोजपट्टीने मापतायत... तो आईकडे पाणी मागतो... आई आत जाते... बराच वेळ झाला म्हणून तो आईला बघायला आत जातो... आत कुणी नाही... अगदी कुणीच ... तो संपूर्ण घर शोधतो... ते रिकामंच आहे... आई नाहीच तिथे... तो आश्चर्याने थबकून पाहू लागतो... आई आत्ता होती... इथे, इथेच. ती कुठे गेली? हळूहळू त्याचं आश्चर्य वाढू लागतं... थोडी शंकाही येते त्याला... आई गेली कुठे आहे? आई घरात नाही म्हणून मग आता थोडं मोकळं मोकळंही वाटू लागतं...
***
तो एकदम जागा झाला. जागीच उठून बसला. आपल्याला स्वप्न पडलं होतं हे त्याच्या लक्षात आलं. त्याची आई जाऊन आज बारा दिवस झाले. तो त्याच्याही नकळत थोडा सैलावला. तो अजून थोडासा झोपलाही असता तरी चाललं असतं... अंधारात त्याने घड्याळ निरखून पाहिलं. सहा वाजतच आलेले. आज तो आई गेल्यानंतर प्रथमच ऑफिसला जाणार आहे. नऊची विरार फास्ट आहे. काही वेळाने उठावंच लागेल. त्याने वेळेचा हिशोब केला.
तो तसाच पडून राहिला. काहीसं गरम होत असेलही. शेजारी त्याची बायको आणि मुलगा झोपले होते. पाऊस पडत होता का? त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं. तिथे पाऊस होताच... इतका रंगगंधहीन पाऊस! त्याला आश्चर्यच वाटलं. इतका आकार, उकार, वेलांट्या नसलेला पाऊस तो आयुष्यात प्रथमच पाहात होता.
आठ दिवस असाच पाऊस येत होता. अवेळी येत होता. त्याची आई गेली त्या दिवशीही असाच पाऊस होता.
त्याची बायको उठली. मुलगा गाढसाच... तोही मग घाईघाईने उठला. त्याने आवरायला घेतलं. आठ वाजताच तो अंघोळ उरकून आला तेव्हा फोन वाजला. त्याचा मित्र होता.
``निघतोच आहे. ऑफिसमध्ये भेटू.'' तो मित्राला म्हणाला.
``गुड टू हिअर. पुष्कळ दिवसांनी बाहेर पडतो आहेस. बारा दिवसांनी. कंपनीची काही बातमी ऐकलीस?''
``नाही. काय?'' त्याने उत्सुकतेने विचारले.
``अचानक प्रमोशन्स, इन्सेन्टिव्हज डिक्लेअर होतायत. तुझं नाव चर्चेत आहे. तुझे कन्व्हेयर बेल्ट्स आवडले होते फॉरेन डेलिगेट्सना. आठवतंय?''
``हो,'' तो काहीसा आश्चर्याने , काहीसा खुलून येत म्हणाला.
``भेटू'', मित्राने फोन ठेवला.
त्याची बायको आत नाश्त्यासाठी बोलवत होती.
***
आठ दिवसांपूर्वी तो कंपनीत काम करत होता तेव्हा त्याला त्याच्या बायकोचा मोबाईल आला. त्याची आई सिरीयस होती... आईच्या छातीत खूप तीव्र अशा वेदना होत होत्या, आणि डॉक्टर सांगत होते की सिव्हिअर हार्ट अॅटॅक आहे. यांना हॉस्पिटलमध्ये तातडीने न्यावं लागेल. तो मग कंपनीतून निघालाच... तो घरी पोचला तेव्हा त्याची बायको हळूहळू रडत होती... आई शांत झोपल्यासारखी.. त्याला पाहून डॉक्टर म्हणाले, ``सॉरी...लगेचच दुसरा अॅटॅक आला.'' तो आश्चर्याने पाहातच राहिला. आई गेली? ती इतकी शांत झोपल्यासारखी दिसत होती... डॉक्टरांनी डेथ सर्टिफिकेट लिहून दिले. हळूहळू गर्दी जमली. सोसायटीतले, नातेवाईक...मित्रगोत. घरातली गर्दी वाढत असतानाच, बाहेर पाऊस सुरू झालेला. त्याचं त्यावेळीही लक्ष होतंच त्या पावसाकडे.
त्याची आई पंचाहत्तर पूर्ण होती. म्हणजे तसं वय झालेलंच... पण ती दिसायची साठीचीच. राहणी कडक, नेटकी. केसही बरेचसे काळे. बाहेर जाताना तिच्या साड्या कडक इस्त्रीच्या असायच्या. ज्ञानेंद्रिये सगळी अजून धारदार... तिच्या शिक्षकी पेशाला साजेलशी. अजूनही जगाच्या कानाकोपऱ्यातल्या घडामोडींकडे त्याच्या आईचं बारीक, करडं लक्ष असायचं आणि त्यावर तिची ठाम, स्वत:ची अशी मतंसुद्धा. प्रकृतीचे नैसर्गिक, साधे त्रास सोडले तर आई तशी छानच होती.
आई गेल्याचं समजलं तेव्हा त्याला धक्का बसला होता का? खरं तर त्याला काही कळलंच नव्हतं. तिचं वय त्याच्या लक्षात होतं. नेहमीच, पण ती अशी अचानक जाण्याइतकी तोळामासा कधीच नव्हती. तिचं निदान एेंशीपर्यंतचं आयुष्य त्याने निश्चित धरलेलं होतं. फुलं, हार घातलेला आईचा देह पाहाताना त्याचा मावसभाऊ त्याला म्हणाला, ``निसर्ग आहे... चालायचंच.. वाळलेलं पान... कधीतरीझाडावरून पडून जाणारच.''
त्याने समजूतदारपणे मान हलवली. मावसभावाचं बोलणं पटल्यासारखी. त्याला ते पटलं होतंच... आईला शेवटचं उठवताना थोडा अस्वस्थ झाला तो, पण तिची सगळी क्रियाकर्म उरकून तो घरी आला, तेव्हा त्याचं मन शांत होतं. तो खूप दमलेला होता. संध्याकाळीच बायकोने दिलेला चहा पिऊन तो पुष्कळच हुशारला. रात्री शेजारच्या वझेबाइंर्नी पिठलं-भात आणून दिला होता.. त्याला जाणीव झाली, की खूप भूक लागली आहे त्याला... पुढ्यातला पिठलंभात अतिशयच चवदार होता. आणि मग तो त्याने पोटभर खाल्ला. अगदी शरीर तृप्तावेपर्यंत.
अंथरुणावर पाठ टेकता टेकता हेही लक्षात आलं त्याच्या, की तो तसा शांतही आहे, खूप दमूनही... झोपताना वाटलं ते इतकंच, की प्रत्येकाच्या आयुष्यातली ही अटळ, कधीच ठरून गेलेली ही बाब आहे. नैमित्तिक कर्माइतकीच. डोळयांपुढे आई येता येताच मग कधीतरी पुढच्या क्षणी तो गाढ झोपून गेला.
त्याला रात्रभर शांत झोप लागली.
सकाळी त्याचा एक मित्र समाचाराला आलेला... म्हणाला, ``सहा महिन्यांपूर्वी मीही याच दु:खातून गेलोय.. आई नसणार होती हे लक्षातच आलं नाही कधी... तिची घरात असण्याची सवय झालेली... म्हणजे तिचं असणं इतकं गृहीत धरलेलं रे...'' त्याने मित्राच्या डोळयांच्या कोपऱ्यात थोडं पाणी पाहिलं. तो आश्चर्याने मित्राकडे बघू लागला. आईच्या जाण्याने हे असं पाणी वगैरे... एका पुरुषाच्या... तेही एका वय झालेल्या आईच्या जाण्याने... त्याला कळलं नाही. त्याला वाटलं... त्याची बायको, मुलगा होतेच की तिथे, त्याचे आपले. त्याच्या आयुष्याचे दोन ताजे तरुण उपप्रवाह. ते तिथेच, त्याच्या सोबत होते. त्याचं आयुष्य वाहातं ठेवणारे, पुढे नेणारे ते प्रवाह होते. त्याची आई आता सुकत चाललेली..तिचा आटलेला झरा कधीतरी कुठेसा थांबणारच... ते तर नैसर्गिकच होतं... दोन ताजे तरुण प्रवाह सोबतीला असताना जुन्या प्रवाहांशिवाय आयुष्य कुठे अडून राहतं? मागच्या काळच्या कितीतरी गोष्टी, माणसं, राहून जातात मागेच... पण आयुष्यं पुढे जात राहतात.. हळूहळू मागे वळूनही न पाहता. आणि तोच निसर्ग आहे.
बारा दिवसानंतरही त्याला अजूनही तसंच वाटतं आहे. तो उठला. दाढी करताना त्याला दूरवरची आईची खोली रिकामी दिसली. ती खोली आता पूर्ण आर्यला देता येईल. तो त्याच्या छोट्याशा घरात मुलासाठी आनंदला.
***
नाश्ता करून तो उठत असताना त्याच्या बायकोने त्याचं वॉलेट, रुमाल, डबा, घड्याळ सगळं टेबलावर आणून ठेवलं. ती त्याच्याकडे पाहून हसली. त्याचा मुलगा झोपेतून उठून त्याच्याकडे झेपावत असलेला! बाबा...``मला पांढला वाघोबा हवा...'' मुलगा म्हणत होता. तो मुलाकडे बघून हसला. बायकोकडे, मुलाकडे प्रेमाने पाहात राहिला. खूप संपूर्ण होता तो ह्या क्षणी. त्याचं घर, त्याची बायको, त्याचा मुलगा... त्याचा छोटासा संसार. त्याला अभिमान वाटून गेला फार, सगळयाचा. तो शांत हसला.
``छत्री घेतलीत ना? पाऊस येतोय... आठ दिवस... कधीच्या कधीच...च्!'' त्याची बायको विचारीत होती. बाहेर पाऊस होताच... तोच, आठ दिवसांपूर्वीचा. त्याची आई गेली त्या दिवशी होता तसाच.
त्याने आरशात पाहून तयार होता होता बायकोला होकाराची मान हलवली. तो आरशात थांबून बघत राहिला... हे थोडंसं पुढे आलेलं कपाळ, सरळसोट नाकपुड्या, वर उचललेले गाल... त्याला ते सगळं त्याच्या आईसारखं वाटलं. हुबेहूब. आणि अचानक त्याने डाव्या बाजूने एकदा पाहिलं... मग उजव्या... तो थोडासा चकित झाला. तो इतका आईसारखा दिसत होता! पूर्वी कधी हे जाणवलं नाही? तो नवल करू लागला.
``आज-उद्या सिनेमाला जाऊ एखाद्या. कंटाळलो आहोत. हं?'' तो बायकोला दारात म्हणाला.
ती `हो' म्हणाली त्याला. प्रसन्न हसली.
त्याने दारावरची पाटी पाहिली. `सुलोचना हर्डीकर'. ही पाटी आता बदलली जाईल. तिच्यावर आता त्याचं नाव असेल. तो खुलून आला. त्याने संपूर्ण घराकडे एक नजर टाकली. त्याच्या मालकीचं, फक्त त्याचं, आता हे घर होतं.आई गेली तर तोच आता या घरचा मोठा होता. कर्ता पुरुष होता. या घरचा स्वामी. मालक. तो आता कुणी दुय्यम नव्हता आणि आईच्या पहाऱ्याखालचं, सत्तेखालचं त्याचं आयुष्यही आता संपलं होतं. आता यापुढे त्याचेच निर्णय या घरात राबवले जाणार होते. त्याने एक छाती भरून श्वास घेतला.
भराभरा जिन्याच्या पायऱ्या उतरताना, ठुबे समोर आले.
``झालं रुटीन सुरू? छान झालं. आई गेल्याच्या दु:खातून लवकर बाहेर याल. अहो, आईचं `असणं' कसं, कुठं असतं... नाही सांगता यायचं.''
तो मनात नवल करू लागला. त्याला वाटलं... आई होती आणि आता नाही,इतकंच. याहून अधिक काय असणार आहे? नाही... तसं काही नाही... वय झालं होतं.. इट वॉज नॉट ए सडन अँड अनटाईमली डेथ. हे तर गृहीत धरलेलंच असतं आपण... घरातली वयस्कर माणसं एक दिवस...' तो ओठ मुडपून समंजस हसला. ठुबे त्याला म्हणाले, ``खरंय... तरीही... तरीही.''
नऊची विरार...चर्चगेट फास्ट पकडून तिच्यात ऐसपैस बसताना त्याला छान वाटलं. बारा दिवसानंतर कामावर जाताना तो आत्ता अगदी आनंदात होता... नोकरीच्या पहिल्या दिवशीसारखा.
कंपनीत मशीनवर काम सुरू करताना चौगुले म्हणाला, ``तुझ्या प्रमोशनची शक्यता आहेय. मजा आहे तुझी. मिळालं की पार्टी हवी.''
तो खुलला. रंगात येऊन काम करू लागला. पाठीशी उबदार संसार होता.पुढ्यात प्रमोशन होतं. त्याला वाटलं... आयुष्य इतकं सुखी कधीच नव्हतं. त्याने तयार केलेल्या कन्व्हेयर बेल्टवरून देखणी ऑडी रूपाला येत होती. तो बघत होता...
आईला जाताना किती त्रास झाला होता? वेदना असह्य होत्या का? सगळं संपतंय हे तिला कळलं होतं का?
अचानक त्याच्या मनात उठलेले प्रश्न... कशासाठी? तो अस्वस्थ झाला.. तेच प्रश्न...वारंवार. हजार बार... त्याला थोडा घाम आला. तो बाजूला जाऊन बसला.
आपण घरी असतो तर आई वाचली असती का?
प्रश्न संपेचनात.. त्याचं मन तिथे लागेना. कामात चुका होऊ लागल्या. तो मग सरळ इमिजिएट बॉसपुढे जाऊन उभा राहिला.
``ओ. के. बरं वाटत नाही मि. हर्डीकर? यू क्रॅन गो होम... टेक रेस्ट..'' त्याचा बॉस हसत हसत त्याला म्हणाला.
तो कंपनीतून बाहेर पडला. तीनचं भगभगीत ऊन. अचानकच, ढगांना बाजूला सारून आलेलं.. तो चालत राहिला.. कसाही, कुठेही. दिशा नक्की कुठली, ते त्यालाही माहीत नव्हतं. तो मरीन ड्नईव्हवर आला. समुद्रधुनीत पडून राहिलेला. कातळावर दोन-चार जोडपी एकमेकांत मश्गुल. तो कातळावर बसून राहिला.
***
त्याची आई त्याला कधीच आवडली नाही. त्याचे बाबा गेले तेव्हा तो सहा वर्षांचाच होता. बाबांच्या आठवणी नाहीतच फारशा.. सगळया आठवणींमध्ये आईच आहे त्याच्या. ती शिक्षिका म्हणून सरस्वती विद्या मंदिरात लागली तेव्हा अधिकच शिस्तीची, कडक दिसू लागली.. त्याला तिच्या व्यवस्थितपणाची,शिस्तीची चीडच यायची. अभ्यासाची, शाळेची आवड नव्हतीच त्याला. गुणवंत शिक्षिका म्हणून त्याच्या आईचा गौरव झाला तेव्हापासून तर आईची चीड, भीती अधिकच वाढली...
सकाळच्या शाळेच्या वेळी त्याला उठणं अगदीच नको वाटायचं.. एखाद दिवस तरी सुट्टी... पण आई त्याला उठवायचीच. प्रसंगी जोर लावून, मारून. कधीमधी होणाऱ्या सर्दी खोकल्यालाही न जुमानता.
``शिस्त हवी रे आयुष्याला. एक ध्येय हवं... प्रयत्न, शिस्त आणि ध्येयाने काय साध्य होत नाही रे!'' ती त्याला म्हणायची. खेळातून, टीव्हीतूनही त्याला ओढून काढायची... ढकलत, फरपटत न्यायची. तो रागाने धुमसत असायचा... तिच्याकडे कपाळातून, डोळे रोखून पाहाता पाहता ठिणगी फुलून यायची मनात.
ती त्याचा अभ्यास घ्यायची... त्याला रडू यायचं... काही जमायचंच नाही... मग ती मारायची त्याला... ती निराश व्हायची...त्याच्यावर नाराज असायची कायमच. हे कळून तो आणखी धुमसत जायचा. परीक्षेच्या दिवसांमध्ये पहाटेच्या थंडीत आई त्याला अभ्यासाला उठवायची.. तो कुडकुडता... पेंगुळता... जीव नकोसा होत अभ्यासाला बसायचा.. आईच्या रागाचे कोरडे आवंढे गिळत राहायचा..
``भरपूर अभ्यास कर.. तुला डॉक्टर, इंजिनिअर, एमबीए करायचं आहे मला... माझं ते स्वप्न आहे.'' त्याची आईर् तो सातवीत असताना एकदा म्हणाली. तो दचकून आईकडे पाहू लागला. आईचा शब्द न् शब्द जोरकस, ठासून, आक्रमक. ह्याच्यावर सत्ता गाजवणारा कदाचित्. मग हे वाक्य, ही इच्छा त्याच्या आईच्या बोलण्यातून रोजच डोकावू लागली. रोज तेच वाक्य... तो दडपून गेला... त्याचा जीव मिटूनच गेला ...इतकं शिकायचं? नाही जमणारंय ते आपल्याला कधीच... तो जाणून होता. ती म्हणायची, ``तुला वडिलांमागे वाढवलं आहे... खूप कष्ट घेऊन ... ते कष्ट फळायला हवेत.'' तो हे ऐकता ऐकताच मोठा झाला... दुखत दुखत गेला... आईला त्याच्यासाठी काढलेल्या कष्टांची परतफेड हवी होती का? ती त्याच्यासाठी खाव्या लागणाऱ्या खस्तांचा हिशोब ठेवत होती का? तो आईपासून थोडा अधिक दूर जाऊन उभा राहिला.
आईने येणाऱ्या-जाणाऱ्यांनाही हे सांगून ठेवलं, की त्याला तिला डॉक्टर, इंजिनिअर करायचं आहे... तो ऐकताना शरमूनच गेला... त्याच्या आईने हे असं जाहीर करावं हे त्याला अजिबातच आवडलं नाही. दहावीत त्याला मार्क बेताचेच पडले. आईने सायन्स साईड ठरवून दिलेली... त्याला काहीच कळत नव्हतं... त्याला काय आवडतं आहे, काय योग्य आहे... तो सायन्सला गेला... अभ्यास जड पडत असलेला... जीव मिडपून मिडपून जायचा... बारावीच्या भीतीने आतडी गोळा गिच्च होऊन यायची पोटात... तो मनात धुम्मस घेऊन मग आईकडे पाहात राहायचा... आई आवडायची नाही त्याला, अगदीच. बारावी त्याची, कमी मार्कांनीच पार पडली. सत्तर टक्के. त्यानेे बी.एस्सी. व्हायचं ठरवून टाकलेलं... पण आई कर्ज घेऊन डोनेशनवरही त्याला इंजिनिअर करू पाहात होती... तो ठाम नाही म्हणाला. मला जमणार नाही म्हणाला. ह्याची आई खूप रडली, भेकली, संतापली. आयुष्यभराकरताच संतापली. मैत्रिणींमध्ये, बहिणींमध्ये तिला त्याने सांगताना ऐकलं, ``हा अगदीच सामान्य निघाला... खरं तर क्षूद्रच.. हुशारीही नाही... जिद्दही नाही... स्पर्धेत उतरायची कुवत नाही, उंच जायची कसलीच स्वप्नं नाहीत... बाकीची मुलं कशी आभाळं शोधून आहेत आपली आपली. याने माझी मान खाली केली... माझी इच्छा अपूर्ण राहिली.'' तो लाजेने मरून गेला. आपला कमकुवतपणा आईने असा चव्हाट्यावर का आणला? का? मग येता-जाता सततच ती वाक्यं हळूहळू आईने लोकांमध्ये म्हटलेली तो ऐकू लागला... आईच्या डोळयांत पाणी असायचं.. आणि याच्या मनात आग-आग. त्याच्या आईला आवडत नाही तो, ही खूणगाठ त्याने मनाशी बांधून घेतली. आई नावाची बाई इतकी कठोर, निष्ठुर का असते? हिने आपल्याला जन्माच्या, पोटच्या मुलासारखं वागवलं नाही. असं का? त्याला प्रश्न पडला.
बी. एस्सी. नंतची त्याची मेक्रॅनिक्समधली सुपरवायझर आणि असेंब्ली टेस्टरची नोकरी... पद, पगार बेताचाच... त्याची आई त्याच्या प्रमोशनसाठी आसुसलेली... कधी शब्द तिचे, कधी नजर... त्याला नोकरीतल्या कुशलतेचा लेखाजोखा मागायचे... जाब विचारत असायचे... हुबेहूब त्याच्या लहानपणच्या वेळेसारखे. त्याला चिरत, त्याला त्याच्या यशाविषयी हजारो प्रश्न विचारायचे. त्याला ते आवडायचं नाही... पूर्ण स्वतंत्र, एक मोठा झालेला माणूस होता आता तो... आईचा हात धरून जगण्याचे दिवस कधीच संपलेले... मग त्याची आई अजूनही त्याच्यात, साऱ्या आयुष्यात इतकी का डोकावत होती? अजूनही तिचं अस्तित्व त्याला त्याच्याखाली दाबून, कोंडून का ठेवत होतं?
त्याचं लग्न झालं. त्याला त्याची बायको आवडली होती.
त्याला मुलगा झाला.
तो पूर्णावला.
आईचा आणि त्याचा संवाद असा नव्हताच कधी, शेअरिंग-गप्पा यांनाही स्थान नव्हतं. घरात ती मोठी म्हणून तिची अशी एक `जागा' होती, वरची आणि `मूल' म्हणून तो दुय्यम स्थानीच होता. कुठल्याच निर्णयप्रक्रियेत त्याचा शब्द अंतिम नव्हता. तो आईविषयी तुटून तुटूनच जगत राहिला.
त्याची आई त्याच्या घरात होती, आयुष्यात होती, इतकंच.
अपरिहार्यपणे.
***
तो उठला. समुद्र अजूनही शांत थंडच... तो पाचच्या चर्चगेट-बोरिवलीमध्ये बसला तेव्हा त्याच्या लक्षात आलं... आज आईची औषधं, फळं, पोथ्या-स्तोत्रं यांची कसलीच खरेदी नाहीय. तो अचानक मोकळा-मोकळा होत बसला. रोज त्याच्या आईच्या या गोष्टी त्याला लक्षात ठेवून आणाव्या लागायच्या. कितीतरी वेळा ओव्हरटाईमनंतरही, खूप दमून भागल्यानंतरही आईच्या या गोष्टी त्याला न चुकता आणाव्या लागायच्याच. कधी विसरला तो, तर आईची करडी नजर त्याच्यावर... तो मग संकोचून जायचा. कंपनीतल्या `घडण्याचा' हिशोब विचारणारी आईच्या शब्द-नजरांची मोजपट्टीही आज नव्हती. पाठोपाठ अटळपणे येणारं त्याचं अपराधी फिलींग आणि गुन्हेगार असणं तिचं...हेसुद्धा आज नव्हतंच.
तसं हे आयुष्य सोपंच असेल, असं त्याला वाटलं. कंपनीतून घरी गेल्यावर आईला त्याला आता त्याच्या करिअरचा जमा-खर्चही द्यायचा नव्हता. मग त्याला अचानक आठवलं... बायकोला प्रमोशनच्या शक्यतेचं सांगायला हवं... तो उल्हासला. आयुष्यात प्रथमच हे घडत असलेलं...घरी बायको दारात कुणाशी बोलत होती... थोडी खजील. तो स्वच्छ होऊन चहा घेत असताना बायकोला म्हणाला, ``बैस, कन्फर्ड नाही पण एक गुड न्यूज आहे.''
बायकोची संध्याकाळच्या स्वयंपाकाची गडबड चाललेली.
``प्रमोशनची शक्यता आहे. तसं वारं वाहतंय कंपनीत.'' तो बायकोकडे पाहू लागला.
``हो?'' बायको फ्रिजमधून चिरलेली भाजी काढत होती... तिला फोडणी देणं.. ``बरं झालं..'' ती पाठमोरीच.
तो ताठ होऊन तिच्याकडे बघू लागला. ``हो? बस्स? इतका एकच शब्द? इतक्या शांतपणे हिने आपलं यश ऐकलं? ती वळली नाही, जवळ आली नाही, कुठे कसलेच कुतूहलाचे प्रश्न नाहीत, आनंदाचा उत्कट आवेग नाही...
``परवाच रेगे फर्मचं ऑडिट थोडं चुकलं... आज त्यांची माणसं आली होती... नाराज होती...च्! मनस्ताप झाला खूप.'' बायको करवादत बोलली. त्याची बायको घरच्या कॉम्प्युटरवर काही काम करून देते. महिना आठ-नऊ हजार मिळतात. तो ऐकत होता... ती तिच्याच दु:खात होती. ``या महिन्याला काम नाहीच फारसं.'' ती चेहरा उतरवून बोलली. तो उठला. बेडरूममध्ये येऊन पडला. त्याचा मुलगा हॉलमध्ये गाड्या खेळत असताना त्याला दिसत होता.
दारात कुणी सेल्समन आला. त्याच्याजवळच्या उदबत्त्या, स्टिकर्स, टेबलक्लॉथ बायकोला हवे होते. ती कामात... तिने त्याला उठवलं... ते घ्यायला लावलं...``मला काही कळत नाही त्यातलं.'' तो वस्तू ठेवत म्हणाला, ``तूच घ्यायला हवं होतंस.''
बायको एकदम थांबली. वळून त्याच्यावर जवळ-जवळ ओरडलीच, ``मी एका वेळी काय काय करू ते सांगा फक्त... दिवसभर घरची कामं, याला सांभाळणं असतंच. तुमची घरात मदत नसतेच कधी... मी किती दमून जाते कधी लक्षात आलं तुमच्या?''
तो चकित होऊन बायकोकडे पाहू लागला. तिला एवढं संतापायला काय झालं तेच त्याला कळेना... तो तिच्याकडे निरखून पाहू लागला. त्याच्या हळूहळू लक्षात आलं... हिला आपली असूया वाटते आहे... हिची उद्विग्नता तीच आहे... तिचं काम कमी झालं आहे... आणि आपलं करिअर कदाचित यशस्वीतेकडे... हिला ते पेलणं कठीण जातं आहे. हेवा, मत्सर यांची एक सूक्ष्म रेघ तिच्या चेहऱ्यावरून चमकते आहे..
तो आत येऊन पडला. त्याला काही आठवलं त्याचं मशीन फॉरेन डेलिगेट्सकडून वाखाणलं गेलं होतं. तेव्हा त्याच्या आईचा चेहरा आनंदाने केवढा चमचमलेला... त्यावेळी जवळ बसवून खूप प्रश्न विचारले होते त्याच्या आईने त्याला. केवढी उत्सुकता, केवढं कुतूहल. मग एकदा त्याची आई शेजारणीला सांगताना त्याने ऐकलेलं... ``मकरंदने मशीन बनवलंय... फॉरेनच्या लोकांना ते खूप आवडलंय म्हणे.'' त्याच्या आईचा आवाज ह्यावेळी गच्च भरून आलेला... नेहमी ती त्याला टोचून टोचून बोलायची... त्याच्या अपयशी असण्याची त्याला आठवण करून द्यायची सतत... पण त्या शब्दांखाली त्याच्या यशाची तडफड होती कदाचित्... कुठल्याही हेव्यादाव्याशिवायचं यश ती चिंतत होती का? बाकी नात्यांच्या बाबतीत असूयेची अशुद्धता येते का? तो नवल करू लागला. आजच कसं, का उमगतंय हे?
त्याची बायको त्याला जेवायला बोलावत होती.
``आज गोळयाची आमटी आणि भोपळयाचं रायतं केलंय... आइंर्सारखं. त्यांची रेसिपी... त्यांच्याकडून शिकले.'' त्याची बायको छान हसत त्याला म्हणाली. तो आनंदाने जेवायला बसजा... भूकही खूप लागलेली... पदार्थांच्या गंधाने त्याची रसना चाळवली गेली...
``कसं झालंय दोन्ही?'' बायकोने खुषीत येऊन विचारले.
जेवण चागलंच होतं. बायकोचे पदार्थ चवदार होते. पण किती चवदार... त्याला त्याच्या आईच्या हातचे हे पदार्थ आठवत राहिले. आईच्या हातची चव वेगळीच होती... ती बायकोच्या पदार्थांमधे नसावी असं त्याला वाटलं... आईच्या हातचे पदार्थ यापुढे नसतील... तो उगाचच अस्वस्थ झाला.
``जमलंय ना?'' बायको गुणगुणत विचारत होती.
जमलं होतं. ``हो, छान झालंय दोन्ही.'' तो बोलला.
पलंगावरही त्याला आईचं जेवण आठवत होतं.
बायको त्याला पलंगावर म्हणाली, ``तेराव्याच्या अनाथाश्रमाच्या आणि शाळेच्या देणगीचं लक्षात आहे ना तुमच्या?''
``हो, जाऊ आपण. कधीतरी.'' तो म्हणाला. त्याच्या आईची इच्छा होती...कुठलेही धार्मिक विधी तिला नको होते... तिच्या श्रद्धा तशा नव्हत्याच... पोकळ. भुसभुशीत. शिक्षणाची आच असलेली ती बाई होती... गेल्यानंतरही तिचा शिक्षणासाठी उपयोग व्हावा ही तिचीच इच्छा.
``इनव्हर्टर घेऊयात? निदान एका खोलीपुरता तरी घेऊच... माझ्या कॉम्प्युटरच्या कामाची फार पंचाईत होते... अं?''
तो बायकोकडे पाहू लागला. इन्व्हर्टर? एकदम इतकी मोठी खरेदी? त्याला बायकोला काय उत्तर द्यावं, कळलं नाही. आजवर अशी कधी वेळ आलेली नव्हती... आई होती तोवर तीच हे असे वेगळे निर्णय घेत होती. कसे, कुठल्या आधारावर... त्यालाही माहीत नव्हतं. त्या निर्णयांचा साधक-बाधक विचार, त्या निर्णयांच्या परिणामांची जबाबदारी... त्याला यातलं काहीच माहीत नव्हतं. त्याची आईच हे सगळं निभावून न्यायची... आता यापुढे त्यानेच सगळे निर्णय घ्यायचे होते का? त्या निर्णयांच्या परिणामांची जबाबदारीही आता त्याचीच होती का? निर्णय चुकले तर... त्याला घाबरल्यासारखंच झालं.
``बघू... ठरवू.'' तो बायकोला पुटपुटला.
त्याने डोळे मिटले. झोपला.
***
पहाटे त्याला अचानक लवकर जाग आली. पाच वाजता. धुम्म काळया अंधारात घर बुडून गेलेलं. तो जागेवर उठून बसला. झोप पूर्ण झाली असावी, असा. त्याने सवयीने स्वयंपाकघराकडे पाहिलं. ते थंड, अंधारलेलं होतं. त्याला वाटलं... बायकोला उठवावं... पण ती दमून गाढ झोपलेली. त्याची आई होती तेव्हा स्वयंपाकघर असं नसायचं. ती साडेचार वाजताच उठायची... कधी त्याला जाग आली असली की बारीक, स्वच्छ आवाजातली तिची स्तोत्रं त्याला ऐकू यायची... व्यंकटेशस्तोत्र, अथर्वशीर्ष... मनाच्या प्रसन्नतेसाठी तिने लावलेल्या उदबत्तीचा गंध आणि निरांजनाच्या दळदार पिवळयाधम्मक वातीचा घरभर पसरलेला उबदारपणा... घर पहाटेच उजळून यायचं... जागृत व्हायचं.
तो अस्वस्थ होऊन एकदम उठला. गरम चहा हवा, असं त्याला तीव्रतेने वाटलं. त्याची आईच पहिला चहा करायची... मग दिवसभर बायकोच्या ताब्यात. आईच्या हातचा तो पहिला ताज्या दुधाचा चहा... तो स्वयंपाकघरात आला. त्याने चहा केला. टेबलावर बसून तो शांतपणे गरम चहाचे घुटके घेऊ लागला. पण चहा त्याला जमला नाहीय असं त्याला वाटलं. त्याला फ्रेश वाटलंच नाही... तो कप जोरात सरकवून उठला. खिडकीतून त्याला बाहेरचा अशक्त, कुरकुरणारा पाऊस दिसला. तो चिडूनच गेला एकदम. त्याने त्या पावसाला शिव्या मोजल्या. ``स्साला हा पाऊस!'' तो ओरडला.
पंधरा मिनिटांनी त्याची बायको उठली. स्वच्छ होत कामाला लागली. ती झोपून नुकती उठूनही इतकी छान, ताजी दिसत होती! चहा करताना ती कसलीशी गाणीही गुणगुणत होती... ती गाणी तरुण होती... त्याला ती तरुण गाणी आणि बायकोचं हे असं ताजं दिसणं फार फार आवडलं. तो प्रसन्नच होऊन गेला एकदम.
डबा देताना बायको त्याला म्हणाली, ``तुमचा वाढदिवस आहे पुढच्या आठवड्यात. लक्षात आहे ना?''
``हो. चिकन करशील?''
बायकोने त्याला मान डोलावली.
``आता आईही नाहीय... तिला आवडायचं नाही नाहीतर... आता काही प्रश्न नाही...'' तो म्हणाला. दोघंही मोकळं मोकळं हसले.
कंपनीत आज काम खूप होतं. त्याचा बॉस म्हणाला की ऑर्डर्स खूप वाढल्यायत... `कंपनी इज इन ए गुड शेप.' त्याने कामाचा वेग वाढवला. लंच टाईममध्ये बायकोला मोबाईल केला.
``टि्न्पला जाऊयात कुठेतरी? चार दिवस... रजाही पुष्कळ साचल्यात. खूप दिवसात गेलो नाही.''
``हो, कोकणात जाऊ. पुष्कळ आहे तिथे पाहायला.''
तो कलिगला म्हणाला, ``प्रमोशन्स कधी डिक्लेअर होणारेयत?'' जी. एम. काही म्हणाले?''
कलिग एकदम गप्प झाला. त्याच्या लक्षात आलं हळूहळू. की चार दिवसात प्रमोशनचा विषयच नाही कंपनीत. त्याने कलिंगला विचारलं. अगदी पिच्छाच पुरवला.
``मिडल मॅनेजमेंटचं जबरदस्त लॉबिंग चालू आहे. सगळी पंजाबी लॉबी... मराठी नावं उडणारेयत अशी चिन्हं आहेत. बहुतेक तू आणि मी...''
तो कलिगकडेे पाहातच राहिला. इतका धरून चाललेला तो, की प्रमोशनवर जाईल तो, आणि मेक्रॅनिकल ड्नफ्टस्मनचं पद काही विशेष अवघड नाही. आता पुरेसे अनुभवी आहोत आपण. तो एकदम गप्प होऊन गेला. मनावर परत तीच उदासी पसरून गेली.
विरारमध्येच बसताना गजरेवाला मुलगा समोर आला.
``घ्या ना साहेब. सहाला तीन.'' जुईचे सुरेख गजरे.
आता तो घरी जाईल तेव्हा आई नसेल. एरवी रोज-रोज ती असायचीच. त्याला आठवलं की ती जायच्या दिवशीसुद्धा त्याचा आईशी काहीसा वाद झालेला... त्याच्या मुलाला कुठल्या शाळेत घालायचं वगैरे अशाच काहीशा विषयावरून. आई तिचा निर्णय त्याच्यावर लादते आहे असं त्याला वाटलं होतं... नेहमीसारखंच. तो नेहमीसारखाच दुय्यम स्थानावर होता.
आता मात्र तो पूर्ण स्वतंत्र होता.
त्याच्या बायकोला गजरे आवडायचे. आईही नव्हती आता... घरी पूर्णच एकांत मिळणार होता... त्याची बायको कित्येकदा ऑफिसातून गेल्यावर सुरेख सजलेली असायची... गजरे माळून. तिला या गजऱ्यांसकट जवळ घ्यावं, गुदमरवून टाकावं असं त्याला वाटायचं... कित्येक वेळा.. पण त्याची आई घरात असायची... त्याला मग तो आवेग आतल्या आत दाबावा लागायचा... खूप कुचंबणा व्हायची त्याची... पण आता घरात फक्त तो आणि त्याची बायको. त्याने एकदम खूप सारे गजरे त्या पोऱ्याकडून विकत घेतले... त्याला मग मनाची मजाच वाटली... ते कुठून कुठून आनंदाच्या वाटा शोधत राहातं... झाडांची मुळं जशी पाण्याच्या शोधात चिवटपणे स्वत:ला लांब-लांब पसरवत नेतात तसंच हे मनाचं. कुठे लांब लांब फिरून तेे आनंद शोधायला बघत असतं... तो रंगातच आला.
त्याचा जुना मित्र रेल्वेत चढला.
``हॅल्लो बॉस... काय खबरबात?'' त्याने मित्राच्या हातात हात मिळवला.
``कंपनीचा वेग ताशी... माणशी... किती?'' त्याच्या या मित्राची कंपनी सुरेख होती.
``ती कंपनी सोडली मी. आठ वर्षं नोकरी करूनही प्रमोशन नाही... कंटाळलो... सगळं पॉलिटिक्स. हाँजी हाँजी करणारे आणि बॉसच्या नात्यातले पित्तू यांचीच वर्णी. कारणं विचारली तर त्यांची एफिेशयन्सी काढायची. बदलली मग नोकरी... आता कंपनी सी ग्रेडचीच आहे, पण प्रामाणिक आहे. वर्षभरात इन्सेटिव्हज् मिळतायत.''
तो मित्राकडे दचकून पाहू लागला. प्रमोशन नाही? पॉलिटिक्स? त्याला कंपनीतली दुपार आठवली. त्याचं सगळं लक्षच उडून गेलं तिथून. हातातले घमघमते गजरे... पूर्ण एकांताची ती रोमँटिक संध्याकाळ.. सगळंच निरर्थक वाटू लागलं त्याला.
घरी त्याने गजरे बायकोजवळ दिले. ``घाल!'' तो पुटपुटला. त्याचा मुलगा गॅलरीत जिगसाँ पझल्स खेळत असलेला... तो स्वच्छ होऊन आला. चहा घेताना त्याच्या लक्षात आलं... मन ताणात आहे प्रचंड. भविष्याच्या भीतीने गुदमरतं आहे... बारीक-बारीक डोकंही दुखायला सुरुवात झालीय. तो एकदम पलंगावर बायकोच्या मांडीवर डोकं ठेवून पसरला. ``डोकं दाबतेस? दुखतं आहे.''
त्याची बायको हसली. त्याच्या केसातून बोटं फिरवत त्याचं डोकं दाबून देऊ लागली. त्याला वाटलं... बोलायला हवं आहे आत्ता बायकोपाशी. ती मग खूप काही बोलेल त्याच्याशी. तिचे शब्द बोलता-बोलता सहज त्याचं अर्ध दु:ख स्वत:कडे घेईल.
तो मग प्रमोशनच्या ताणाविषयी बोलला.
``हो? होईल सगळं ठीक.'' त्याची बायको म्हणाली. ``काल रेग्यांचं काम चांगलं झालं. पुढच्या महिन्यात चांगले पैसे साठले तर इनव्हर्टर घेऊयात? घेऊच... खूप दिवे जातात... त्रास होतो. हं?''
त्याने नजर वर उचलून बायकोकडे पाहिलं. ती स्वत:तच मग्न... स्वत:तच. त्याच प्रश्नात अडकलेली... त्याला काही आठवलं. लहानपणी मित्राशी भांडण झाल्यावर आणि तरुणपणी एकदा कंपनीत त्याच्या चुकीमुळं मशीन बिघडलं होतं, त्यावेळी, त्याच्या आईने त्याचं डोकं तिच्या मांडीवर घेऊन किती काय-काय सांगितलेलं त्याला. तिची स्निग्ध बोटं त्याच्या केसातून फिरत-फिरत त्याला कित्ती मोठा दिलासा देत गेलेली... तो चकितच झालेला... आईला त्याने न सांगताही त्याची वेदना कशी कळली? तिचे शब्द भविष्याच्या आशेचे होते... होतेच. तिची मांडी त्याक्षणी त्याच्या वेदना शोषून घ्यायला किती वडिलकीची होती....
त्याला बायकोची बोटं कोरडी, निर्जीव वाटली अचानक... कुठलंच आश्वासन तिच्या मांडीवर नव्हतं.. त्याचं दु:ख त्याच्यापाशीच राहिलं. तो मग उठला.
``गजरे घातले आहेत. पाहिलेत? छान आहेत.'' त्याची बायको प्रसन्न हसली. ``मी स्वयंपाकाचं बघते.'' ती आत गेली.
तो अस्वस्थ... फोन वाजला. त्याचा कलिग होता.
``तुला कळलं का? प्रमोशनमधून मी उडालो.''
त्याच्या छातीतून एक धारदार कळ सरसरत गेली. आयुष्यातलं पहिलंच प्रमोशन हे असं संपून गेलं?
``जीएम ची पिल्लं सगळी... मला आतल्या गोटातून बातमी कळली.'' त्याचा मित्र म्हणाला.
तळव्यांना आलेला घाम पुसत त्याने फोन ठेवला. त्याला जाणीव झाली... खूप एकटं एकटं वाटत आहे. तो हात मागे बांधून खोलीत तिरका वाकडा फिरू लागला. त्याची बायको आता स्वयंपाकघरात गुणगुणत असलेली...
त्याचा मुलगा मोठ्याने रडला.
``बाबा... लागलं.'' मुलगा हुंदके देऊ लागला. त्याने मुलाला जवळ घेतलं. ``बाबा... रक्त'' तो आता हमसून हमसून रडू लागलेला. त्याने मुलाच्या इवलुशा जखमेवरचा लाल थेंब रुमालाने टिपून काढला. बर्नाल लावलं. मुलगा रडतच होता. त्याने मुलाला जवळ घेतलं. मुलगा त्याच्या खांद्यावर मान टेकवून मुसमुसत राहिला. त्याने मुलाच्या पाठीवरून एक हात फिरवला. ``बाऊ पळाला राजा... रडू नको अं?'' त्याच्या एकेका शब्दाने, एकेका हात फिरवण्याने मुलाचे हुंदके हळूहळू थांबत गेले... तो शांत शांत होत गेला. एका क्षणी थांबला. मुलाने त्याची मिठी अधिकच घट्ट केली. त्याच्या लक्षात आलं... त्याच्याही छातीत असंच रडू आलं आहे. मनात कळा आहेत. तो दचकला. हळूहळू त्याला कळलं... असा कुठलाच खांदा त्याच्याकरता आता नाही... असा कुठलाच `मोठा' हात आता त्याच्यासाठी नाही... फक्त तोच आता मोठा झाला आहे तिथे. त्याला वाटलं... आज आपण मोठे झालो आहोत...कायमचेच... कधीच न उतरवता येणारं मोठं असणं आता सुरू झालेलं आहे... आपल्यालाही दुखलंय, पण आई नावाची एक जागा, सगळी दु:ख जिथे सहज मावू शकतात अशी जागा, आता नाही. आपल्यातलं लहान मूल बोट सोडून आईसोबत आता मागे निघून गेली आहे. आपल्यालाच आता आयुष्यभर मोठं राहायचं आहे.
आई गेली तेव्हा त्याला वाटलेलं... भूतकाळच होता तो. संपलाच. हे असंच होत असतं... या क्षणी त्याला वाटलं... आई इतकी सोबत होती, हे कधीच कसं लक्षात नाही आलं? आईचं `असणं' तिच्या नसण्यातून कळतं आहे. तिचं `होते'पण यापुढे सुखही देणारेय... नवे डंखही देणारेय.
आणि मग त्याच्या आयुष्यातली एक खूप मोठी विसाव्याची, निखळ स्वच्छ जागा आता संपून गेलीय या जाणिवेने त्याच्या डोळयांचे कोपरे प्रथमच, अगदी प्रथमच ओले झाले.
बाहेरचा बेसूर, अशक्त पाऊस बहुतेक आता थांबला होता.


http://www.kodes.com/category
http://www.kodes.com/category/sansar-salvo/
http://www.kodes.com/category/emre-baransel/
http://www.kodes.com/category/kolera/
http://www.kodes.com/category/fuchs/
http://www.kodes.com/category/hiphop-videolari/
http://www.kodes.com/category/kadikoy-acil/
http://www.kodes.com/category/sagopa-kajmer/
http://www.kodes.com/category/ceza/
http://www.kodes.com/category/cartel/
http://www.kodes.com/category/gekko-g/
http://www.kodes.com/category/ayben/
http://www.kodes.com/category/hip-hop
http://www.kodes.com/category/turkce-rap/
http://www.kodes.com/category/rap/
http://www.kodes.com/category/nesternino/
http://www.kodes.com/category/fuat-ergin/
http://www.kodes.com/category/killa-hakan/
http://www.kodes.com/category/istanbul-attack/
http://www.kodes.com/category/pit10/
http://www.kodes.com/category/patron/
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2010
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2011
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2012
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2013
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2014
http://www.kodes.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2015
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2010
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2011
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2012
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2013
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2014
http://www.kodes.com/ceza-konser-tarihleri-2015
http://www.kodes.com/
http://www.gekkog.com/
http://www.maskanimasyon.com/
http://www.gekkog.com/category/gekko-g/
http://www.gekkog.com/category/patron
http://www.gekkog.com/category/pit10//
http://www.gekkog.com/category/fuchs/
http://www.gekkog.com/category/kolera/
http://www.gekkog.com/category/hiphop/
http://www.gekkog.com/category/ceza/
http://www.gekkog.com/category/sagopa-kajmer/
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2010
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2011
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2012
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2013
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2014
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri-2015
http://www.gekkog.com/ceza-konser-tarihleri
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2010
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2011
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2012
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2013
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2014
http://www.gekkog.com/sagopa-kajmer-konser-tarihleri-2015
стартові
стартові пакети стартовий пакет download Human Target TV Show wallpapers Human Target TV Show wallpapers download free movie wallpapers Coraline free movie wallpapers ykapral2