Skip to main content

खिडकीशी बसून गतवर्षीचा वाढदिवस डोळयांसमोरून चलचित्रासारखा धावत होता.
``नको गं बाई मला म्हातारीला ७५ व्या वर्षी!''
``असं कसं म्हणता आई? काय कमी आहे तुमच्या आयुष्यात! दोन मुलं, सुना, नातवंडं; बाबा गेले तरीही या बंगल्यात आज तुम्ही सम्राज्ञीसारख्या राहत आहात. त्यानुसारच तुमची पंचाहत्तरी साजरी झाली पाहिजे.'' सुपर्णा मला आग्रह करकरून ती भरजरी साडी नेसायला सांगत होती. मोतीया रंगाची साडी आणि सुंदर लालचुटूक जरीच्या किनारीचे काठ. माझ्या वयाला साजेसाच रंग होता आणि खानदानी बाज होता. आवडली होती साडी मला. तशी मी पहिल्यापासून हौशी. प्रत्येक गोष्ट कशी सुंदर, नीटनेटकी आणि पद्धतशीर व्हायला पाहिजे, हा माझा कायमचा आग्रह. संसाराच्या सुरुवातीला कठोर कष्टांनी मी तो रेटला आणि पुढे ताकद कमी झाली तरी संपत्तीच्या समृद्धीने नोकराचाकरांच्या टेकूवर तो अट्टहास पुरा करू शकले.
सुपर्णाही माझ्याबरोबर गेली २१ वर्षं राहात असल्याने तिचंही सारं करणं व्यवस्थितच असे. कशाची वानवा नव्हतीच मुळी. इतक्यात गाडीचा हॉर्न वाजला आणि ओळखलं, सुचेता आणि सुदीप आले वाटतं. हो %%. बरोबर ओळखलंत. हा माझा मोठा मुलगा आणि सून दोघेही निष्णात, संगणक तज्ज्ञ, अतिशय बुद्धिमान, स्वतंत्र व स्वकर्तृत्वावर सारं सारं उभं करणारे, स्वाभिमानी. आल्या आल्या तिने लगेच प्रतिक्रिया दिली.
``वा %% आई, साडी छान दिसते आहे.''
मी पण स्वत:च्याच वैभवावर खूष होत अतिशय स्वच्छ अंत:करणाने पदराची नक्षी तिच्यापुढे धरत म्हटलं, ``काय करू बाई, सुपर्णाने हट्टच धरला, खास आजची भेट म्हणून आणली आहे, नेसलीच पाहिजे. मन नाही मोडलं तिचं, म्हणून नेसले! पण आहे खरंच सुंदर साडी!''
``होय ना, आई? मग माझं मन मोडू नका आता! हे घ्या मुद्दाम आज तुमच्यासाठी आणला आहे!'' टपोऱ्या खऱ्या मोत्यांचा एक सर आणि त्याला साजेसं तेजस्वी कानातलं तिने मला भेट दिलं. त्या सरात लालचुटूक माणकाचं आकर्षक पेंडल् होतं.
ते पाहून मी लगेच विचारलं, ``काय %% दोघींनी मिळून हा कट शिजवलात की काय?'' ``नाही हो आई'' दोघी हसत म्हणाल्या.
``नाही, मॅचिंग कसं योगायोगानं जमलं म्हणून विचारत होते.''
``म्हणजे काय आई? काही बाबतीत आहे हं आमचे विचार मॅचिंग'' पटकन् कुणीतरी म्हटलं. हसण्यात शब्द विरून गेले आणि शांतियज्ञाच्या तयारीकडे आम्ही तिघी रवाना झालो. हळूहळू माणसे येऊ लागली, आप्त येऊ लागले. घर नुसतं भरून गेलं होतं. `ह्यां'ची आठवण मला सारखी येत होती. नसणाऱ्यांची आठवण येणारंच म्हणून असणाऱ्यांचं प्रेम नव्हतं असं मुळीच नाही. कौतुकाचं अप्रूपच नसावं इतक्या पारमार्थिक देवत्वाला मी काही पोहोचलेली नाही किंवा अरसिक आणि माणूसघाणीही नाही. आहेर, उलट आहेर, जेवणावळी, सगळं सगळं यथास्थित पार पडत होतं. ज्याच्या त्याच्या तोंडी माझ्या मुलांचं कौतुक होतं. ``कुठेही गेली तरी फोन आल्याशिवाय राहात नाही हं त्या दोघा मुलांचा.'' या आणि अशा वाक्यांचे प्रतिध्वनी भिंतीभिंतीतून उमटत होते. आपल्या विद्वान मुलांच्या सुसंस्कृत वागणुकीचं कौतुक व्हावं यापेक्षा कोणत्या वेगळया सुरेल आवाजाची वार्धक्यात कानांना गरज असते? क्षणभर मलाही थोडं आतून शिष्ट झाल्यासारखं वाटत होतं. हेवा वाटत असेल नाही माझ्या सुखाचा इतरांना! असा पोरकट विचारही मनात येऊन गेला; पण वयाच्या पोक्ततेने मी क्षणात झटकला.
सेठीया- शहरातले प्रसिद्ध बिल्डर, हो! तेही अगदी आवर्जून त्या दिवशी आले होते. खूप मोठं कसलंस बॉक्स मला आहेर देऊन गेले. मला कुठे फुरसत होती उघडून बघायला! जाताना म्हणाले मात्र, ``वहिनी, पाहुणे लोक समदा गेलेवर चार दिवसांनी येतो भेटायला.'' माझ्या विस्फारलेल्या डोळयांतला प्रश्न जाणून त्यांनी व्यापारी चाणाक्षपणे उत्तरही देऊन टाकलं. ``काम हाय तुमचेकडे थोडासा.''
असेल काही तरी, `हे' असताना यायचे कधी-कधी ह्यांचा सल्ला घ्यायला.
आता सारं घर रिकामं झालं. जास्तीची भांडी आणि आलेली पाहुणी सगळी आपापल्या जागी पोहोचली आणि एके दिवशी सुपर्णाने मला निरोप सांगितला. ``आज संध्याकाळी सहा वाजता सेठीया काही महत्त्वाची बोलणी करायला येणार आहेत. आई, तुम्ही कुठेही बाहेर जाऊ नका.''
``अगो बाई! मला आधी का नाही सांगितलंस? अगं आमच्या महिलामंडळाच्या नेनेकाकूंकडे आमचं जमायचं ठरलं आहे. सेठियांना बोलाव नंतर कधीतरी.''
``छे! छे! त्यांना वेळ दिलीय मी. त्यांचं काम अधिक महत्त्वाचं आहे.''
``बरं! मी कळवून टाकते नेनेकाकूंना, मी येत नाही म्हणून.'' मनातला कढ मी मनातच दाबला, पण मला न विचारता अशी वेळ ठरवणं हे सुपर्णाचं मला नवीनच आणि आश्चर्यकारक वाटलं.
ठरल्याप्रमाणे वेळेवर सेठीया आले. माझा धाकटा मुलगा सुनील, सुपर्णा आणि मी तिघेही हजर होतो. सुपर्णाला विषय माहिती असावा, कारण गेले अर्धा तास शाळेतून आलेल्या मुलांना खाऊपिऊ घालून ग्राऊंडवर पाठविण्याची तिची लगबग चालू होती. ``हं %% बोला वहिनी, तुमच्या बंगल्याचा काय दाम द्यावा आम्ही?'' शेटजींनी एकदम विषयाला हात घालत विचारलं.
``काय शेटजी, आज चेष्टेची हुक्की आली वाटतं?'' मी म्हटलं. ``चेष्टा नाही, ते खरंच विचारताहेत'' सुपर्णाच्या आवाजात नव्यानेच एक ताठरपणा जाणवला. मी आशेने सुनीलकडे पाहिलं, ``हा काय प्रकार आहे? बंगला कुठे विकायचा आहे आपल्याला?'' असं विचारल्यावर ``होय आई, आता निर्णय घ्यायला हवा'' असं त्यानंही उत्तर दिलं. पुरेसा अर्थबोध न झाल्याने चहा-कॉफी आणि आदरातिथ्यात वेळ घालवून, ``विचार करून मी नंतर सांगीन'' असं सांगून मी शेटजींना परत पाठविलं. ते जाताक्षणीच सुनील व सुपर्णाने माझे प्रश्न काय असतील, याचा आधीच अंदाज घेऊन, त्यांची उत्तरे देण्यास सुरुवात केली. ``आई, गेली २१-२२ वर्षं आम्ही तुला सांभाळलं. आता दादानेही जबाबदारी घ्यायला हवी.'' हे आणि अशाच प्रकारचं काहीसं त्या दोघांनी मला ऐकवलं.
``तुम्ही मला सांभाळलंत कां मी तुम्हाला सांभाळलं? याचा पुन्हा एकदा विचार करा.'' एवढं एकच वाक्य बोलून मी माझ्या खोलीत निघून गेले. राहता बंगला यांच्या स्वकमाईचा. सुनीलला घालून दिलेली फॅक्टरी यांनीच सुरू केलेली. सुदीप मात्र स्वत:च्या जीवावर शिकला. इथे न राहता स्वत:चा वेगळा फ्लॅट घेऊन राहिला. अजूनही बंगल्याचे वास्तुविषयक खर्च मीच देते, ह्यांनी माझ्यासाठी ठेवलेल्या रकमेतून. शारीरिक म्हणाल तर तशीही मी सर्व बाबतीत स्वावलंबी होते. उलट घरातल्याच चार जबाबदाऱ्या अजूनही उचलत होते. कोण सांभाळतंय कुणाला? मलाही प्रश्न पडला. खूप विचार केला. मला तो प्रसंग अजिबात आवडला नव्हता, ताण आला होता मला, माझ्या मेंदूला!
खोलीचं दार लावलं, ए. सी. लावला; पण संतापाची उष्णता शमविण्याचं सामर्थ्य त्यात नव्हतं. कागद काढला आणि लिहीत गेले माझी भूमिका. वीस पानी पत्र दोन मुलं आणि दोन सुना यांना लिहिलं. सर्व ऊहापोह केला नातेसंबंधांचा, कर्तव्यांचा आणि शेवट लिहिलं. ``काळजी करू नका, मी एकटी सेठीयांशी बोलणी करीन. वास्तूत तीन ब्लॉक असतील. तुमचे दोघांचे दोन आणि माझा एक. सर्व व्यवस्था व आर्थिक व्यवहार माझ्याच इच्छेने होतील. घाबरू नका, कुणी मागितलं म्हणून आणि कुणी मागितलं नाही म्हणून मी भेदभाव करणार नाही. दोघांना समान गोष्टी मिळतील. तुम्हांला करण्यासारखं यात काहीच नाही. गेली दहा वर्षे `हे' असतांपासून पगाराची स्वतंत्र तजवीज करून ठेवलेला माझा नोकर माझ्याबरोबर आहेच. तुम्हाला करण्यासारखं एकच, ती सुद्धा विनंती, ``आठ-दहा दिवसांपूर्वी झाला ना तसा `बैलपोळा' यापुढे कधीही साजरा करायचा प्रयत्न करू नका. बाकी आग्रह कधी नव्हताच, आताही नाही.''
जोरजोरात वाजविलेल्या टाळयांनी माझी तंद्री भंग पावली. खिडकीतून डोळे उघडून बघते तो आनंदाने नाचत आमचा शेखर- माझं काम करणारा नोकर हो- ओरडून मला सांगत होता, ``वहिनी, किती येल झाला, तुमचा लक्ष कुठं हाय, दार उघडा, दार. मी कधीची बेल वाजवतोय.''
दार उघडलं आणि तो तीरासारखा आत घुसला, पायावर डोकं टेकलंन आणि म्हणाला, ``वहिनी, अवं किती केलंत माझ्यासाठी, हे घ्या पेढे, तुम्हांला नातू झालाय. माझे आईबाप मी कधीच पाहिलेच नाहीत. तुमच्याच रूपात मला आई दिसली.''
मी म्हटलं, ``खरं रे बाबा! तुझ्याच मुलात मला आता नातू बघायचाय.'' माझंही तसंच, सगळं असून...

- पद्मा गोखले,
पुणे

खोलीचं दार लावलं, ए. सी.

खोलीचं दार लावलं, ए. सी. लावला; पण संतापाची उष्णता शमविण्याचं सामर्थ्य त्यात नव्हतं. कागद काढला आणि लिहीत गेले माझी भूमिका. वीस पानी पत्र दोन मुलं आणि दोन सुना यांना लिहिलं. सर्व ऊहापोह केला नातेसंबंधांचा, कर्तव्यांचा आणि शेवट लिहिलं. ``काळजी करू नका, मी एकटी सेठीयांशी बोलणी करीन. वास्तूत तीन ब्लॉक असतील. तुमचे दोघांचे दोन आणि माझा एक. सर्व व्यवस्था व आर्थिक व्यवहार माझ्याच इच्छेने होतील. घाबरू नका, कुणी मागितलं म्हणून आणि कुणी मागितलं नाही म्हणून मी भेदभाव करणार नाही. दोघांना समान गोष्टी मिळतील. तुम्हांला करण्यासारखं यात काहीच नाही. गेली दहा वर्षे `हे' असतांपासून पगाराची स्वतंत्र तजवीज करून ठेवलेला माझा नोकर माझ्याबरोबर आहेच. तुम्हाला करण्यासारखं एकच, ती सुद्धा विनंती, ``आठ-दहा दिवसांपूर्वी झाला ना तसा `बैलपोळा' यापुढे कधीही साजरा करायचा प्रयत्न करू नका. बाकी आग्रह कधी नव्हताच, आताही नाही.'' pmp braindumps rhce braindumps comptia server+ braindumps security+ braindump sscp braindumps cisco braindumps cwna braindumps microsoft braindumps ged prep software