अलीकडे जगाच्या सुधारणेसंबंधी शाब्दिक वल्गना फार सवंग
झाल्या आहेत. शेतकीची प्रदर्शने, मजुरांचे संघ, अस्पृश्यांचा उद्धार
आणि स्त्रियांची सेवासदने इ. नावांना तर आजकाल ऊत आला आहे.
ह्या गलबल्यांचे जे सुंदर रिपोर्ट आज छापून वाटले जात आहेत ते
आणखी हजार वर्षांनी जर एखादा बावळट वाचील तर त्याला आजचे
युग म्हणजे सुवर्णयुगच वाटेल पण असली नकली युगे मागे पुष्कळ
झाली व पुढे होतील. खरे सोने मात्र आहे तेथेच आहे. अमेरिकेतील
शेतकरी श्रीमंत झाले, रशियात मजूर स्वतंत्र झाले, हिंदुस्थानातील
अस्पृश्य लवकर इतरास शिवून घेणार नाहीत. (काही िख्र्तासी
`अस्पृश्य' आजच नाकाने वांगी सोलताना मी प्रत्यक्ष पाहिले आहेत.)
परंतु जगातील स्त्रियांची खरी योग्यता कळू लागेल त्या पुढील काळाचा
मागमूसदेखील मला अद्यापि लागत नाही.
१. मानवी जगाचा सामाजिक इतिहास ज्या थोड्यांनी निर्विकार
मनाने व मार्मिक दृष्टीने पाहिला असेल त्यांना कळून चुकले आहे,
की या इतिहासाच्या आरंभी तरी निदान समाजात स्त्रियांचे प्राधान्य
होते. इंग्रजीत प्राचीन सामाजिक रचनेला चरींळरीलहू उर्फ स्त्रीराज्य
असे नाव आहे. पूर्वी पाताळात हे स्त्रीराज्य होते अशी समजूत आहे.
त्याचे वर्णन आमच्या पाताळयंत्री पुराणांतून आढळते. मलबारात
असताना या राज्याची चुणूक मी प्रत्यक्ष पाहिली आहे. तिकडे
इंग्रजांच्या बेगडी सुधारणेमुळे जी नायर मॅरेज अॅक्टाच्या नावाखाली
स्त्रियांची `सुधारणा' होऊ घातली आहे, तिच्यामुळे लवकरच त्यांच्या
हातच्या खऱ्या स्वातंत्र्याचे खोबरे जाऊन खोट्या सुधारणेचे परटे
लवकरच येण्यास फार दिवस लागणार नाहीत. थोडक्यात सांगायचे ते
हे, की स्त्री जात हल्लीप्रमाणे नेहमीचीच दडपलेली नव्हती. मानवी
योनीत, तिने बरे दिवस मागे पाहिले
आहेत. पुढे केव्हा ते ती पाहील हा
निराळा विचार. पशुयोनीत-विशेषत:
पक्षी योनीत-मादीच अद्यापि
राणीपदावर आहे. नर तिचा केवळ
मॅनेजर उर्फ पेशवा आहे. मलबारात
ह्या मॅनेजरला कारणवान असे
कायदेशीर नाव आहे. त्यावरून पुरुष
खरा राजा नसून केवळ पेशवाच आहे
हे सिद्ध होते. त्रावणकोर महाराजही
असलेच एक कारणवान आहेत. खरे
राज्य त्यांच्या बहिणीचे किंवा मावशीचेच असते. मोगली पुत्र,
वसिष्ठी पुत्र, गौतमी पुत्र वगैरे जी पाली वाङ्मयातून काही तेजस्वी
पुरुषांची नावे आढळतात, त्याचेवरून तरी एके काळी नष्ट झालेले
स्त्री महत्त्वच दिसून येते. त्यावेळी आईवरून घराणे वारसा आणि
जातही ओळखीत असत. हिमालयाच्या पूर्वेकडे व दक्षिणेकडे हे
स्त्रीसाम्राज्य तीन हजार वर्षांपूर्वीच्या आर्येतर जगात होते; ते फोर्मोसा
वगैरे पूर्वेकडील द्वीपातून अद्यापि आहे असे प्रवासी सांगतात.
पितृसावर्ण्य हे आर्यांचे थोतांड किंवा शहाणपण होय. प्राचीन मोंगली
शहाणपणाचा झरा उलटा वाहत होता.
२. असो. इतिहासाचे महत्त्व इतिहासालाच माहीत; ते तितके
ब्रह्मदेवालाही माहीत नाही. इतिहासाला खोटे बोलण्याची कला
कळली आहे. तशी ब्रह्म्यालाही ती कळत नाही. म्हणून कार्लाइलने
इतिहासाला वेश्येची उपमा दिली आहे. इतिहासाचा नाद सोडून आपण
आजकालचा प्रकार स्वत:च्या डोळयाने पाहू या. काही झाले तरी
राज्स स्त्रीचेच हाती आहे. पुरुष हा जंगम अथवा भटक्या प्राणी
असल्यामुळे देवाने त्याला अजून घरचे रहस्य कळू देखील दिले नाही.
अलकंदराने जग जिंकिले. पण घर त्याच्या बायकोचे होते, मुलांना
चांगल्या सवयी लावणे, पाहुण्यापुढे अब्रू राखणे, योग असो नसो,
त्याचा क्षेम राखणे, कुटुंबात समाधानाची शिल्लक सांभाळणे,
वडिलोपार्जित संप्रदायाचे लोण जसे मिळाले तसे पुढील पिढीस
पोचविणे वगैरे नजरेंत न भरणाऱ्या हजारों सुखसंपदा कोणावर अवलंबून
आहेत? पुरुष शूर असेल, शहाणा असेल व (सर्वांत त्याचा सद्गुण
म्हणजे) अत्याचारीही असेल. पाश्चात्य जगात अखेरचा हा सद्गुण
दाखवीपर्यंत कोणी कोणाला `दि ग्रेट' पदवी अर्पण करीत नाहीत.
पण भावना व उपजत बुद्धीच्या संपत्तीचा वारसा मात्र जगच्चालकानेमुकाट्याने आपल्या मुलीला दिला आहे, तितका मुलाला दिला नाही.
३. सर्वात मोठा आधुनिक फ्रेंच तत्त्ववेत्ता बर्गसाँ ह्याला विचारा
म्हणजे तो सांगेल की, जगाच्या उत्कर्षात विवेचक बुद्धीची
किंबहुना यत्नशक्तीची ही किंमत कमी आणि
भावना आणि विशेषत: उपजत बुद्धीची
तरी फारच अधिक आहे. ज्यावेळी मागे स्त्रीराज्य होते त्यावेळी स्त्रियांत
विवेक आणि यत्न ह्या शक्ती असल्याच पाहिजेत. शिवाय मुख्य शक्ती,
भावना व उपजत बुद्धी ह्यांचा साठा आताप्रमाणे तेव्हाही त्यांना
असावाच. असा माझा समज आहे. एरवी प्रजोत्पादन व प्रजापालन
ही राजकारणांची आद्य अंगे तिने इतिहासाचे आरंभी कशी चालविली
असतील? म्हणून त्या पूर्वयुगात स्त्री ही पोक्त आणि पप् दशेला पोचली
होती. आणि पुरुष हिरवट राहिला होता, असे म्हणण्यात खात्रीने
अतिशयोक्ति आहे, असे म्हणवत नाही. पोक्त आणि पप् अतएव पंगू
बनलेल्या प्राण्यांकडून हिरवटांनी राज्ये आणि साम्राज्ये हिरावून
घेतलेली उदाहरणे पुरुषाच्या मध्ययुगीन इतिहासात कमी आढळतील
काय? आज कालचे सर्व इतिहास व स्मृत्या ही जरी पुरुषांनीच लिहिली
आहेत तरी त्यातूनही सुसंस्कृत पण नेभळट पुरुषांची साम्राज्ये हिरवटांनी
व बळकटांनी घेतलेली रडगाणी इतकी ऐकू येतात! मग पूर्वीपासून
स्त्रियांनी जर काही इतिहास लिहून ठेवले असते, तर आजकालच्या
इतिहास संशोधकांना काय वाटले असते कोण सांगू शकेल? बर्गसाँ
तरी म्हणतो हत्तीपेक्षा मुंगी श्रेष्ठ. कारण हत्तीच्या खांद्यावर पाटीवर
मेंदूचे डोके असूनही त्यांत उपजत बुद्धीचे कण फार कमी आहेत.
पण मुंगी पाहावी तो उपजत बुद्धीचे ते एक स्वयंवाहक जिवंत
यंत्रच आहे. म्हणून सामाजिकदृष्ट्या मुंग्यांचा दर्जा पुष्कळशा
माणसांहूनही अधिक आहे असे बर्गसॉसारख्या शोधक तत्त्वज्ञांचे
म्हणणे आहे. त्यात सूक्ष्म दृष्टीने पाहता अत्याचारजन्य मोठेपणा व
भपका बाजूस ठेवला तर मानवी जिवीतात पुरुषापेक्षा स्त्रीलाच भाव
चांगला येईल असे तुम्हाला वाटत नाही काय?
४. पण सर्वांत आश्चर्याची गोष्ट ही की वरील युक्तिवाद जरी
पुरुषाच्या विरुद्ध असला तरी तो काही जाणत्या पुरुषांना पटेल. पण
तितक्याच जाणत्या स्त्रिया सापडतील काय ह्यांची मात्र शंकाच आहे.
कारण सवयीच्या अभावी जाणीव आणि यत्न हे गुण स्त्रियांतून बहुधा
लुप्तच झाले आहेत. आणि केवळ भावना व उपजत बुद्धी ह्यांच्यामुळे
पुरुषापुढे घरीदारी वेळी अवेळी हार खाणे हाच त्यांचा धर्म आणि
हीच त्यांची मनोरचना बनली आहे, किंवा बनविण्यात आली आहे.
अस्पृश्यांना जसे त्यांचेच एका काळचे ऐतिहासिक ऐश्वर्य सांगितले तर
कळत नाही, वळत नाही, निदान त्यांचा त्यांच्यावर इष्ट परिणामही
होत नाही, तसेच त्यांच्याहूनही पतित दशेस गेलेल्या स्त्री जातीलाही
जरी त्यांचे पूर्ववैभव नीट पटले तरी तेवढ्यावरून त्यांचा उद्धार होईल
ही गोष्ट खरी नाही. कारण स्पेन्सरने म्हटल्याप्रमाणे केवळ ज्ञानाने नीती
सुधारणार नाही. जरी ती सुधारली तरी तेवढ्यावरूनच समाजात सत्ता
प्राप्त होत नाही. म्हणून ज्ञानी व नीतीमान स्त्रिया अजून अबलाच आहेत.
५. पुष्कळांना हा भ्रम आहे की पाश्चात्य जगात सुधारणा व
स्वतंत्रता असल्याने तेथे स्त्रियांचा उद्धार झाला असावा. मोटार,
एरोप्लेन, वायरलेस म्हणजेच केवळ सुधारणा नव्हे, किंवा स्वतंत्रताही
नव्हे. ह्या बाह्य थोतांडांनी पाश्चात्य समाज एकंदरीत अधिक परतंत्र
व अस्थिर मात्र झाला आहे. तेथील स्त्रियांना नकली राजकारणांत
मते मिळाली म्हणून त्यांना पूर्वीचे स्त्रीराज्य मिळेल असे म्हणणे, म्हणजे
एका थेरडीला परकर नेसविला की ती लहान मुलीप्रमाणे स्वभावसुंदरही
होईलच असे म्हणण्याप्रमाणे आहे. जो समाज अजून बळकट पुरुष
मजुरांनाही प्राप्तीचा अर्धा वाटा द्यावयाला तयार नाही तो अबलांना
समान दृष्टीने पाहील हे शक्यच नाही. पौरस्त्यांची तर गोष्ट काढावयाला
नको. येथे पूर्वेकडे अवघा प्रपंच पुरुषाचा; आणि स्त्री म्हणजे केवळ
भारवाहक पण प्रतिष्ठित दासी असा खरा प्रकार आहे. ब्रह्मदेश आणि
मलबार येथेही हाच मनू बळावत चालला आहे. अरबस्तान, हिंदुस्थान
किंबहुना चीन, जपान वगैरे सर्व पौरस्त्य देशांकडे पाहिल्यास `ज्याचे
त्याला गाढव ओझ्याला' अशीच स्थिती पूर्वेकडील बहुतेक बायकांची
आहे असे दिसून येईल. रस्त्याने चालत असता बायकोच्या बुटाचा
लेस सुटला असता काही इंग्रजी शिकलेले उपचार बहाद्दर तो स्वत:
बांधीत असतील. पण तेवढ्यावरून स्त्री समान दर्जाची झाली असे
होत नाही. केवळ काही व्यक्तींच्या स्त्रीदाक्षिण्याने स्त्रीजातीचा
दर्जा वाढेलच असे नाही. दाक्षिण्याचे ढोंग म्हणजे समता नव्हे.
६. पाळण्याचीच नव्हे तर सर्व घरगुती राज्याची दोरी आजही
स्त्रियांच्याच हाती आहे. पुरुषाची पाटीलकी चावडीत आणि
त्याच्यापुरतीच. त्याचा मुलगा पुढे पाटीलकी चालवीलच असे
व्हायला घरातले आद्य शिक्षणच आवश्यक आहे. ते
पाटलिणीच्याच हातात आहे. म्हणजे पुरुष हा चालू पिढीचा केवळ
घराबाहेरचा मालक. स्त्रीच्या इतके पुरुषांचे गुण सांसर्गिक नाहीत,
किंबहुना आनुवंशिकही नाहीत हे जननशास्त्रावरूनच समजणार आहे.
प्राचीन मानवी समाज इतर प्राणी-समाजाप्रमाणे स्त्रीरक्षित होत्या.
आजही तो तसाच आहे. पुरुष पेशव्याने तिला जरी वरवर
पाहणाऱ्याच्या दृष्टीने पदभ्रष्ट केले आहे, तरी आध्यात्मिक अंत:पूर
आजही तिचेच स्वाधीन आहे. हा अनुभव केवळ तोंडदेखलेपणाचा
नव्हे. थोर पुरुषांची व सत्पुरुषांची चरित्रे वाचा म्हणजे त्यांचे खरे
थोर गुण-केवळ अत्याचार व गाजावाजा नव्हे. बहुतेक सर्व त्यांच्या
आईच्या वंशावळीतच अधिक सापडतील. इतके असूनही आमच्या
वेदांत्यांनी स्त्री केवळ क्षेत्र, प्रकृती, माया अशी नावे ठेवून सर्व
पौरुष्य आपल्याकडे घेतले आहे. कारण वेदांताचे लिखाण सर्व
पुरुषांचे हातात होते. पण खरी लेखणी ब्रह्म्याचे हाती असून ते
ब्रह्म नपुंसक आहे, असेही आमच्या धर्माचे म्हणणे आहे. त्याच
आशेवर स्त्रियांनी आपली जातिविशिष्ट संस्कृती कायम राखून जगाचा
उद्धार बिनबोभाट करावा. त्यात त्यांना यश द्यावे अशी त्या नपुंसक
ब्रम्ह्याजवळ आमचीही नम्र प्रार्थना आहे.
Posted in


