प्रिय वाचक,
काल होळी झाली. आज धुळवडीचा दिवस.
महाराष्ट्नतल्या ऋतुचक्रानुसार, होळीपर्यंत थंडीचे
दिवस. शिशिरातल्या पानगळीमुळे झाडांखाली
वाळलेल्या पानांचे, भिरभिरत उतरणारे थवे! हवेतला
कोरडेपणा वाढलेला. धूळ, सगळीकडे धूळ!
दिवस मोठा व्हायला सुरुवात झालेली. एकीकडे
परीक्षांचे दिवस. दुसरीकडे झाडांना पालवी फुटण्याचे
दिवस. त्यांच्या मोहोरण्याचे, बहरण्याचे दिवस.
अशोकाची लांबसडक नवी, तकाकत्या पोपटी रंगाची
पानं वाऱ्यासोबत हलताहेत.... थंडी संपून उन्हाळा
सुरू होत असल्याचा इशारा देणारा हा संधीकाल आहे.
मात्र ऋतूंचाही आजकाल भरवसा राहिलेला नाही!
पुण्यात अख्ख्या थंडीच्या मोसमात खरी थंडी
फक्त आठवडाभरच होती, असं तापमापक आणि
हवामानतज्ञांनी सांगितलं! शिवाय उन्हाळयाची गाडी
इतकी पुढे आली की ती थंडीसाठीच्या राखीव
महिन्यात घुसली. नुसती हलकेच आत शिरली नाही
तर सरासरीच्या नेहमीच्या तापमानापेक्षा ५-७ अंशानं
पारासुद्धा वर घेऊन गेली!
निसर्गाशी दोस्ती राखत, आपलं पर्यावरण
सांभाळण्याची साधी माणुसकी माणसं विसरत चालली
आहेत, त्याची खरं तर आठवण करून देणाऱ्या या
निसर्गाच्या धोक्याच्या सूचना येताहेत! पण आपण
माणसं इतकी आत्मकेंद्री बनत चाललो आहोत की
आपलं त्याकडे लक्षसुद्धा जात नाही. २००८ च्या
आपल्या दिवाळीअंकामध्ये याच विषयासाठी आपण
एक मोठा विभाग योजला होता. निसर्गाशी दृढ नातं
जोपासत जगणारी माणसं, त्यांचे विचार, काही
वेगळया जीवनपद्धती, काही नवे प्रयोग, काही
प्रकल्प, काही विशेष महत्त्वाची माहिती या विभागात
आवर्जून देण्यात आली होती. काही वाचकांना हा
विभाग अतिशय आवडला तर काहींना तो जरा जड
वाटला. अशी मतमतांतरं असणारच तरीपण त्या
विषयाचं रोजच्या जगण्यामधलं महत्त्वाचं स्थान तरी
त्यातून ठळकपणे पुढे आलं का याचा विचार व्हायला
हवा. सुरुवातीला उल्लेख केलेल्या ऋतुंमधल्या
इतक्या वर्षांच्या विशिष्ट तापमानाचं इतकं
अल्याडपल्याड होणं यामागे काही कारणं आहेत. ती
माणसाच्या वागण्यात आणि त्याच्या
निसर्गाबरोबरच्या बिघडलेल्या नात्यात आहेत हे
विसरून चालणार नाही.
झपाट्यानं `विकसित' होणारी शहरं बघताना,
मला एकेकदा वाटतं की हा विकास एका परीनं
सुखाचा, सोयीचा वाटतो खरा, पण दुसरीकडे तो
आपल्याला निसर्गापासून दूर तर नेत नाही ना?
म्हणजे असं बघा की माझ्या लहानपणी
पुण्यासारख्या शहरात, वाडे होते, बंगले होते. त्यांच्या
आजूबाजूला छोटंसं अंगण होतं. त्यात मोगरा, कुंद,
अबोली, जाई, जुई, सायली, चाफा, गुलाब अशी
कितीतरी फुलझाडं असायची. एखादं आंब्याचं,
सीताफळाचं, चिक्कूचं, नारळाचं झाड असायचं.
चिमण्या, बुलबुल, साळुंक्या, कोकिळा, कावळे,
भारद्वाज असे कितीक पक्षी असायचे. सगळंकाही
आपल्या घरात, आपल्या दारात असायचं असं नाही,
पण आपल्या आजूबाजूच्या घरात तरी ही फुलं, झाडं,
पक्षी यांचा वावर असायचा, अस्तित्व असायचं.
त्यामुळे या साऱ्यांची, त्यांच्या गंधातून, रंगातून,
नादातून जागही असायची आणि ओळखही
असायची. या साऱ्यातून मी जुन्या काळातल्या
आठवणी आठवण्यात, स्मरणरंजनात अडकून पडले
आहे असं कृपा करून समजू नका. पण या साऱ्या
सोबतीमुळे सहजपणे, निसर्गाशी रोजचीच गाठभेट
होत होती, हे आज नक्कीच आठवतं.
आता जुने बंगले, जुने वाडे पाडले जाताहेत.
माझ्या आईवडिलांचं घरसुद्धा पाडून, त्यातून नवीन
सोसायटी उभी राहिली आहे. हे काहीसं अपरिहार्य
आहे हे मला कळतं. पण अपरिहार्यता, गरज, लोभ,
सोस हे शब्दसुद्धा किती सापेक्ष बनतात असं जाणवतं.
पैसा हाती येणं, जीवनशैली आणि जीवनमान बदलणं.
त्यातून गरज आणि चैन यांच्यातल्या सीमारेषा
पुसल्या जाणं. नवनवीन गोष्टी समोर येणं, त्यात
बाजारकेंद्री प्रवाह मिसळणं. नवं काही सोयीचं,
उपयुक्त, हवंहवंसं वाटणं आणि तसं सतत सतत घडत
राहणं! एकेकदा वाटतं आपण असे कसे धारेला
लागलो? एके काळी होतो तिथून इतके नकळत,
इतक्या दूर कसे आलो? ही भूल कुणी घातली?
असंही वाटतं की, त्या जुन्या जमान्यात, माणसं
थोडीफार जवळ होती. एकमेकांच्या जवळ होती आणि
निसर्गाच्याही जवळ होती. आता या शहरातल्या
गर्दीपायी माणसं `तशी' जवळ असतात, खेटूनसुद्धा
वावरत असतात आणि तरी परस्परांपासून दूर
असतात! इतरांपासून दूर असतात पण स्वत:चा
विचार करण्याइतकी, स्वत:शी संवाद करण्याइतपत
तरी स्वत:च्या जवळ असतात? आत्ममग्न तरअसतात, पण नेमकी कशात मग्न असतात?
हो, होळी खेळतात. रंगपंचमीत एकमेकांना रंगानं
भिजवतातही! पण ते रंग फेकणं, उधळणं नेमकी काय
प्रकारची मौजमजा देतं? ते रंग तरी पारखलेले,
निरुपद्रवी असतात? ती कोरडी रंगीत धूळ तर
दूरदर्शनवर बघतानासुद्धा नाकाशी, डोळयाशी आपले
हात जातात! हा रंगांचा खेळ कशाचं तरी प्रतीक आहे.
प्रेम, आपुलकी, मैत्री यांचा हा खरा खेळ आहे. ते
सारं या रंगांच्या फेकाफेकीत आणि उडवाउडवीत
सापडतं आहे? मला खरंच समजत नाही. उलट मनात
येतं की `मूळचा रंग' झाकण्यासाठी तर या रंगांचा
आधार घेतला जात नाही? जगण्यातल्या दुखऱ्या,
अंधाऱ्या कोपऱ्यांचा विसर पडावासा वाटणं मला
समजू शकतं, पण यातून ते घडतं का? आणि कशाचा
तरी विसर पडावा यासाठी जीवनातले खरे रस, रंग,
गंध यांचा तर विसर पाडण्याचा हा प्रयत्न नाही ना?
आजकाल शहरात अनेकदा सूर्योदय होतो पण
बघायला मिळत नाही. इमारती आड येतात.
चांदण्यांनी भरलेलं आभाळ दिसत नाही, दिसतो
एखादा आभाळाचा तुकडा. फुलांचे सुगंध, झाडांवरून
येत नाहीत पण निदान कधी कधी मोगऱ्याच्या
जाईजुईच्या गजऱ्यांमधून आपल्यापर्यंत पोचतात.
मावळतीच्या वेळेचं आकाश, त्यातले ढगांचे
हलतेफिरते मनोहारी आकार, रंगांच्या विविध छटा
आपल्याला भेटू शकत नाहीत! कधी वेळ नसतो, तर
कधी `अवकाश' नसतो, तर कधी कधी मनच बंद
होऊन गेलेलं असतं! या साऱ्यांचे मनाला, डोळयांना
होणारे स्पर्श केवढे सुंदर असतात. आणि
अवतीभवतीच्या आपल्या किंवा आपल्या नसलेल्या
माणसांबरोबरच्या नात्यांमध्येसुद्धा असेच अनेक रंग,
रंगांच्या अनेक छटा असतात. त्याच्याही पलीकडे,
किंवा खरं तर त्याच्या अलीकडेच आपलं म्हणून एक
अस्तित्व असतं. कधी ते सगळयांसह, सगळयांसोबत
असूनही आपण आपलं `आपापलेपण' (मी
माझ्याशी, माझ्यापाशी) जपत असतो. ते एकटेपण
असतं. तरीपण एकाकीपण नसतं! त्याचेसुद्धा कितीक
रंग असतात. काळयाकबऱ्या रंगापासून ते तांबूस,
पोपटी, निळसर, पिवळया धम्मकापर्यंत. या
एकटेपणातले रंग, गंध, स्पर्श आपल्यातच असतात.
स्वाधीन असतात ते, आपली सोबत करतात. विचार
आणि भावना यांच्या साथीनं ते जशी काही आपली
एक मैफिलच रंगवत असतात. हे एकटेपण जसं
एकाकीपण नाही तसं ते तुटलेपणसुद्धा नाही. कारण
एका परीनं हे एकटेपण स्वत:ला इतरांपर्यंत जोडत
असतं. त्याला नातेवाईकांच्या पलीकडे असलेल्या
समाजाचं भान असतं. आपण माणूस आहोत आणि हा
मनुष्यप्राण्यांचा समाज माणसांचा आणि माणुसकीचा
समाज म्हणून जगत, वाढत राहावा असं आपल्याला
वाटतं. यासाठी आपण काय करू शकू असा प्रश्न मला
अस्वस्थ करतो! आजकाल गर्दी, मोठा आवाज,
भडक रंग, सजावटीपासून सारं आयतं तयार विकत
घेणं याकडचा उत्सवांचा कल वाढताना दिसतो.
सहजता, उत्स्फूर्तता, प्रसन्नता, आर्द्रता यांच्या जागी
कुणी भलतंच विराजमान झाल्याचं दिसतं! त्यात
रमायला त्रास होतो म्हणून स्मरणरंजनात जीव रमतो.
निसर्गाच्या शोधात, त्याच्या जवळ जात,
ऋतुमानानुसार त्याचीच सोबत हवीशी वाटते. हा
झगमगाट, हा कलकलाट आणि आवाजाचा, शब्दांचा,
वाद्यांचा कल्लोळ हे सारं का बरं इतक्याजणांना हवंसं
वाटत असेल? हे कशापासून तरी पळून जाणं किंवा
कशाची तरी झाकापाक करणं तर नाही?
मनाच्या संभ्रमित अवस्थेत थोरामोठ्यांच्या स्मृती
आधार देतात. १४ एप्रिल हा डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांचा जन्मदिवस. जातीवर आणि लिंगभेदावर
आधारित विषमतेच्या विरोधात हयातभर लढणाऱ्या या
नेत्याला मन:पूर्वक आदरांजली!
Posted in


