प्रिय वाचक,
आपल्या मासिकाचं हे विसावं वर्ष. गेल्या वर्षीपासून आपण पावसापायी होणाऱ्या अडचणीमुळे आपला वाढदिवस ऑगस्टऐवजी फेब्रुवारीत साजरा करायला सुरुवात केली आहे. आत्ताच ७ फेब्रुवारीला हा कार्यक्रम झाला. कबीर कला मंचच्या तरुण कार्यकर्त्यांच्या दमदार गाण्यांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. रेऊ कथास्पर्धेतल्या बक्षीस विजेत्या लेखकांसाठी बक्षीस वितरण झालं. डाऊ केमिकल्सविरोधी लढ्यात वाघिणीसारखा सहभाग घेणाऱ्या सुवर्णा पानमंद यांनी मनोगत व्यक्त केलं आणि सर्वात शेवटी झुंजार पत्रकार आणि मानवी हक्कांसाठीच्या लढ्यातल्या कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड (मुंबई) आणि परखड अभ्यासू पत्रकार आणि लेखक प्रा. जयदेव डोळे (औरंगाबाद) यांची औचित्यपूर्ण भाषणं झाली. सगळा कार्यक्रम अर्थपूर्ण आणि चैतन्यदायी झालाच. शिवाय गरवारे कॉलेजचं सभागृह तुडुंब भरून राहिलेल्या श्रोत्यांनी मनापासून दाद दिली. दुसऱ्या दिवशी प्रतिनिधींची बैठक. त्यातून परस्परांना मिळालेलं प्रेम, आपलेपणा आणि उत्साह! या सगळयाला साक्षी राहिल्यानं तर, मासिकाच्या २० व्या वर्षात माझं मन(सगळया व्यक्तिगत आणि मासिकाच्या मर्यादांचं भान बाळगूनही) कसं भरून आलं असेल हे तुम्ही समजू शकाल.
आता मात्र महिला-दिन विशेषांकाचा म्हणून संवाद सुरू करते. अंकावरचं मुखपृष्ठ बघितल्यावर काय वाटलं? सुप्रसिद्ध चित्रकार नंदलाल बोस यांचं १९४८ सालातलं हे चित्र आहे. विषय आहे `सती.' एकविसाव्या शतकातलं पहिलं दशक पूर्ण होण्याच्या टप्प्यावर असताना, एकदम सतीचं मुखपृष्ठ? हो, सतीप्रथा कायद्यानं बंद झाली आहे खरी. पण आजही सतीच्या मंदिरात भाविकांचे भाबडे लोंढे जातच आहेत आणि मुख्य म्हणजे वाजतगाजत आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी ही प्रथा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे विविध रूपात आजही सर्वदूर चालूच आहे! तुमच्या-माझ्या अवतीभवती किंवा कधी कधी तर आपल्या घरातही ती वावरत असते आणि आपण कळत नकळत त्याबाबत बधीर किंवा संवेदनाहीन होऊन चुकलेले असतो. सतीच्या प्रथेचा इतिहास आपण पुन्हा एकदा आठवायला हवा. पतिनिधनानंतर कित्येकदा एकेका पत्नीला जीवनातला अर्थ संपला असं वाटतं. पतीवर अवलंबून जीवन जगणारीला निराधार वाटतं. स्त्रीचं कुटुंबातलं आणि समाजातलं स्थान/प्रतिष्ठा संपूर्णत: वैवाहिक स्थानाशी किंवा नवरा जिवंत असण्यानसण्याशी किंवा मूल असण्यानसण्याशी निरगाठीनं घट्ट बांधून ठेवलेलं असतं. म्हणूनही जगताना नवरा बरोबर नसणं यामुळे स्त्री मानसिकदृष्ट्या हतबल होते. हे सारं वास्तव मला समजतं. पण म्हणून अशा अवस्थेतील स्त्रीला, नवऱ्याच्या चितेवर जळून/जाळून घ्यावंसं वाटेल? पण तिच्या इच्छेचा, मनाचा विचार न करताच, पुरुषसत्ताक व्यवस्थेनं संपत्तीवाटपामधला वाटेकरी नाहीसा करण्यासाठी सतीप्रथा हळूहळू रूढ केली. आणि वर इतिहासात आणि सती मंदिराच्या रूपात स्त्रीला उच्च आणि गौरवास्पद स्थानावर पोचवली. प्रत्यक्षात सती जाणाऱ्या स्त्रीला बेशुद्ध करणं किंवा ती भानावर असेल तर तिच्या किंकाळयांचा आवाज ढोल ताशांमध्ये बुडवून टाकणं यासारखे उपाय, `पतिप्रेमासाठी त्याच्या चितेवर स्वखुषीने चढणाऱ्या' स्त्रीच्या बाबतीत करावे लागले नसते.
आता या प्रकारचा `सती प्रयोग' कायद्याने आणि व्यवहारातही पुष्कळसा संपुष्टात आला आहे. पण एकूणच स्त्रीच्या जगण्यावर आणि मरण्यावरही पुरुषी अंकुश ठेवण्याच्या विविध तऱ्हा आपल्याला आजही दिसतात. सुरुवातीला स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवलं. त्यानंतर नोकऱ्यांमध्ये नाइलाजानं स्त्रियांना घेतलं, पण त्यावरही त्यांच्या स्त्रीत्वाच्या जैविक जबाबदाऱ्या आणि मर्यादा यांची दखल घेतली नाही. यापुढे जाऊन स्त्रिया अधिक शिकून पुरुषांच्या बरोबरीचं कर्तृृृत्व सिद्ध करू लागल्या, तेव्हा लिंगभेदावर आधारित अनेक प्रकारची कुचंबणा स्त्रियांच्या वाट्याला येतेच आहे. याप्रकारे शिकून, नोकरी करून, व्यापक आणि व्यामिश्र क्षेत्रात, घराबाहेर करियर करणाऱ्या स्त्रिया स्वाभाविकपणेच स्वत:चा विचार करू लागल्या आहेत. स्वत:चे निर्णय घेऊ लागल्या आहेत. एकीकडे ही त्यांच्या कुुटुंबाची, समाजाची, देशाची शान आहे आणि दुसरीकडे सदैव स्त्रियांच्या वागण्याबोलण्यावर कब्जा करून, त्यांना `देवता' म्हणून आणि संस्कृतीच्या पताका म्हणून घरात, देवळात कोंडून ठेवणारे किंवा इतरत्र मिरवणारे संस्कृतिरक्षक अस्वस्थ झाले आहेत.
मंगलोरच्या पबमध्ये आपल्या मित्रांबरोबर गेलेल्या तरुण मुलींना मारपीट करणारे, त्यांच्यावर हल्ला करून, त्यांचे केस आणि कपडे ओरबाडत फरपटत नेणारे श्रीरामसेनेचे कार्यकर्ते हे या प्रकारचे संस्कृतिरक्षक! स्त्रियांनी/मुलींनी पबमध्ये जाण्यात संस्कृती कलंकित होत असेल तर त्यांचा अपमान करणाऱ्या श्रीरामसेनेच्या कार्यकर्त्यांच्या कृत्यांनी संस्कृती काय सोन्यासारखी झळाळून उठते?
या संदर्भात एक प्रश्न सगळीकडे अनेकांना विचारला जातो आहे. तो असा की मुलींनी/स्त्रियांनी दारू प्यावी का? पबमध्ये जावं का? माझं स्पष्ट उत्तर असं आहे की स्त्रियांना दारू पिण्याचा आणि पबमध्ये जाण्याचा अधिकार असायलाच हवा. सारासार विचार करून या दोन्ही गोष्टी करण्याचा किंवा न करण्याचा निर्णय घेण्याचं त्यांचं स्वातंत्र्य अबाधित असायला हवं. या प्रश्राला थेट, स्पष्ट उत्तर देण्याचं अनेक राजकीय आणि पुरोगामी मंडळींनी टाळलं. याचं एक कारण असं की संस्कृतीच्या नावाखाली स्त्रियांना काबूत ठेवण्याच्या अधिकाराचा म्हणजे पुरुषसत्ताकतेचा त्यांना अभिमान आहे. स्त्री आणि पुरुष मूलत: माणसं आहेत आणि म्हणून त्यांचे मानवी हक्कही सारखेच जपले पाहिजेत यावर त्यांची निष्ठा नाही आणि बांधिलकीही नाही! दारू जर वाईट असेल तर कुणीच पिऊ नये. मग पिणारी व्यक्ती स्त्री असो वा पुरुष! स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही विचारपूर्वक निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असायला हवं. ज्या संस्कृतीत, स्त्रीला पुरुषांपेक्षा कनिष्ठ मानलं जातं, तिच्या आयुष्यातले सर्व निर्णय, तिला नाकळती ठेवून पुरुष घेतात, तिला एक रक्षणीय वस्तू मानून आत्मनिर्भर होऊच देत नाहीत, त्या संस्कृतीचा गर्व तर राहोच, निषेध करणं योग्य आहे.
या अंकात, महिला दिनाच्या निमित्ताने, `ऑनर किलिंग' या विषयावर झालेल्या एका चर्चासत्राचा आधार घेऊन काही मांडणी करण्यात आली आहे. यासाठी `मासूम' या संघटनेची विश्वस्त आणि कार्यकर्ती मनीषा गुप्ते या मैत्रिणीचं मोलाचं सहकार्य झालं आहे. मुलगी म्हणून जन्माला आलेलं मूल, लहानाचं मोठं होत असताना, एका विशिष्ट प्रकारे वाढवलं जातं. एखाद्या रोपाची राखावी तशी तिची निगा राखली जाते. मात्र, त्याचा उद्देश, हे रोप रोपटंच राहील आणि त्याची काटछाट करत करत ते फार स्वतंत्रपणे विस्तारणार नाही याची काळजी घेणं हा असतो! यामुळे तिचा आत्मसन्मान तर सांभाळला जात नाहीच. उलट तिच्या वागण्या वावरण्यावर कुटुंब, घराणं, जात, धर्म, देश या साऱ्यांची प्रतिष्ठा किंवा अब्रू जोखली जाते. अनेकदा ती मुलगी म्हणून जन्मापासूनच प्रेमाऐवजी नकोसेपणाची धनी होते. त्यातून कुणाच्या वाट्याला लाडाकोडाची वागणूक आलीच तरी तिचं शिक्षण, तिचं वागणं, तिचं लग्न किंवा तिची योनीशुचिता यासारख्या गोष्टींबाबत या व्यवस्थेचे, या संस्कृतीचे अत्यंत कडक नियम असतात. ते मोडून स्वतंत्रपणे निर्णय घेणारी मुलगी प्रेमाची वाली राहू शकत नाही. प्रेमाची जागा `अब्रू' नावाची कल्पना घेते. आणि कदाचित प्रिय असलेली मुलगीसुद्धा अशावेळी प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी बळी दिली जाते! याबाबत अधिक विस्ताराने मांडणी करणारा मनीषा गुप्तेंचा आणि माझा असे दोन लेख या अंकात आहेत. त्यावरून मुखपृष्ठावरच्या सतीच्या चित्राचं औचित्य स्पष्ट होईल.
या वेळची निमंत्रित कथा आहे भारत काळे यांची. ही कथा हाती आली तेव्हा `ऑनर किलिंग' या विषयावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय झाला नव्हता. ही कथा अतिशय सहजपणे त्यातल्या नायिकेचं चित्र रंगवते. त्यातून या निश्चयाचाच तपशील हळुवारपणे भरला गेला आहे. सख्खा भाऊ, गावातले तरुण, हतबल वडील, पुढे नवरा सगळे मिळून तिची काटछाट करण्याची काळजी घेतात!
या साऱ्यातून हे लक्षात घ्यायला हवं की आपण सगळयांनी अतिशय सजगपणे आपल्या मुलींना आणि त्याहूनही अधिक मुलांना वाढवायला हवं. आणि काही घरात अशी खऱ्या अर्थाने `सुसंस्कृत' मुलं आज वाढताहेत. नुकतीच आमच्या कार्यालयात काही तरुण मुलामुलींची छोटीशी बैठक झाली. त्यावेळी मंगलोरच्या पबमधल्या मुलींना झालेल्या मारहाणीची घटना ताजी होती. त्यावर त्यापैकी तिघांच्या प्रतिक्रिया होत्या- `मुलींना या प्रकारे मारणं ही काय संस्कृती आहे?' `त्या मुली आईवडिलांना सांगूनच आल्या असतील तर?'
`पबमध्ये जाण्याबाबतच्या नियमात मुलगा/मुलगी हा फरक कशासाठी?'
ही मुलं फक्त १६/१७ वर्षांची आहेत. कोणत्याही चळवळीत सहभागी नाहीत. आणि या त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया होत्या!
या मुलांसारखीच मुलंमुली स्वतंत्रपणे विचार करणारी म्हणून वाढोत आणि कोणत्याही टप्प्यावर प्रेमापेक्षा प्रतिष्ठेचा प्रश्न बनून बळी जाण्याची वेळ त्यांच्यावर न येवो असं मला तीव्रतेनं वाटलं!
यासाठी कुटुंबातल्या, जातीधर्मातल्या आणि एकूणच समाजातल्या ज्येष्ठांची जबाबदारी महत्त्वाची आणि निकडीची आहे. या ज्येष्ठांत निर्णायक मत बहुधा पुरुषांचंच असतं आणि त्यांची री ओढणाऱ्या काही स्त्रियाही असतात.
स्त्रियांच्या भूमिकेचं समर्थन न करताही मी म्हणेन की स्त्रियांनी री ओढावी याप्रकारेच तर त्यांची घडण केली जाते! म्हणूनच या केवळ `री' ओढण्याची आणि फरपटण्याची वेळ आपल्यावर येता कामा नये यासाठी स्त्रियांनी जागं व्हायला हवं. त्याच वेळी त्या आपल्या विरोधात जात आहेत. म्हणजे त्या आपल्या शत्रू, असं पुरुषांना आणि एकूणच वडीलधाऱ्यांना वाटता कामा नये.
आपल्या इतकाच मोकळा श्वास प्रत्येक माणसाला घेता यायला हवा, या विचारात आणि त्यानुसार आचारातच माणसाची प्रतिष्ठा आहे, सन्मान आहे, ऑनर आहे. अखेरीस माणसाची आणि मानवतेची प्रतिष्ठा, जात, धर्म, संस्कृती या सगळयापेक्षा मोठी आहे.
श्रीरामसेनेने मंगलोरमध्ये पबमधल्या मुलींना धडा शिकवण्याचं `शौर्य' दाखवलं! रामसेना ही सर्वदूर पसरलेली, स्त्रीवर मालकीहक्क गाजवत, संस्कृती जपू बघणारी प्रवृत्ती आहे. साऱ्या स्त्रिया आणि शहाणे पुरुषही एकमुखाने हे जाहीर करू इच्छितात की यापुढे स्त्रिया कुणाच्या मालकीच्या राहू इच्छित नाहीत. त्या स्वत:च विचार करून निर्णय घेतील. कधी चुकतीलही, तरी त्यातूनच शिकतील आणि आत्मनिर्भर होतील. जे काय धडे शिकवायचे ते त्यांनी पुरुषांना शिकवावे, ज्यामुळे ते स्त्रीकडे केवळ मादी म्हणून, वस्तू म्हणून बघणार नाहीत. त्यामुळे स्त्रियांच्या आणि संस्कृतीच्या रक्षणाच्या स्वयंघोषित जबाबदारीतून ते मुक्त होतील!
१२ ।२ ।२००९


