Skip to main content

पहिल्या प्रेमाचा प्रवास

मेधा टेंगशे
``ताई, मी शोभाला घरी घेऊन जाते. ती सारखी मला फोनवर म्हणते, `मला घरी राहायचंय'... असं असताना, तिला जर मी इथं ठेवलं तर, माझं मन मला खात राहील घरी...'' एका दमात सुमित्राबाई बोलल्या आणि माझी संमती गृहीत धरत त्यांनी तिचं सामान बांधलंदेखील!... आपल्या मतिमंद मुलीचं-तिच्यासारख्या मुलींच्यासोबत योग्य पद्धतीनं पुनर्वसन व्हावं- तिच्या जीवनाला (मर्यादित अर्थानं का असेना) अर्थपूर्णता यावी याची तमा न बाळगता, आपल्या भावुक मनाचा कौल महत्त्वाचा मानून, त्या तिला आपल्या घरी परत घेऊन गेल्यासुद्धा!... शोभाचं चार भिंतींच्या चौकटीतलं पूर्वीचं रंगहीन, अर्थहीन, सुस्त आयुुुष्य पुन्हा सुरू झालं...
ही रुखरुख मनाच्या अडगळीत टाकून, मी आमच्या `साधना व्हिलेज', पुणे या संस्थेच्या ग्रामीण महिला बचत गट प्रमुखांच्या बैठकीला हजर झाले. `ताई, तुम्ची आयडिया लई चांगली हाय.. पर आम्च्या बाप्यामाणसांना खवनार न्हाई... वरल्या वाडीतल्या बायांशी आम्चं लई बोलंनं-चालनं न्हाई... आमी न्हाई त्यांचा बचतगट करु शकत..' असं म्हणत आमच्या एक कर्तबगार बचतगट प्रमुख सुरेखाबाइंर्नी चर्चेवर पडदा टाकला...
हे दोन्ही प्रसंग लागोपाठ घडले... बघता बघता राग-उद्वेग-नैराश्य अन् बधिरवणाच्या लाटांनी मला घेरून टाकलं... वाटलं - `बस्स!... फार होतंय हे!... आता कात टाकावी... वाट बदलावी... घालावं का नाव पी.एचडी.साठी?...करावं का संशोधन?.. गुंतवावा का जीव त्याच्यात?... काहीतरी हातात तरी पडेल... निदान समाधान तरी!... ही `हरणारी लढाई' आता किती दिवस खेळायची?.. जीव पणाला लावून... जीवघेणी लढाई खेळायची अन् पुन्हा हरायचंच ना?...'
नुस्ता गुंता!... आठवडा असाच अस्वस्थतेत गेला... स्वत:च्या विचार-भावनांशी प्रामाणिक राहू पाहणारं मन, करत असलेल्या कामाचा हिशोब करायला बसलं होतं... रात्रं-दिवस तोच विचार!... अशीच सकाळची वेळ. केंद्रातल्या कार्यकर्त्या-संगीतामावशी निशाला घेऊन आल्या, म्हणाल्या, `ताई, निशाला शाबासकी द्या- अजितनं आज तिला शिव्या दिल्या-तिचं ताट ओढून घेतलं तरी हिनं त्याला मारलं नाही...' कुठलीही गोष्ट मनाविरुद्ध झाली की, कुणालाही अगदी कार्यकर्त्यांनाही ढकलणारी, त्यांचे केस ओढणारी, संस्थेच्या प्रौढ मतिमंद केंद्रात वर्षापूर्वी आलेली निशा माझ्याजवळ पाठ करून उभी राहिली. मी तिच्या पाठीवर शाबासकी दिली आणि काही बोलायच्या आत ती निघून गेली.... हिंसेला-हिंसेनं-अपशब्दांना-अपशब्दांनी उत्तर द्यायचं नाही या भूमिकेचा संस्थेनं केलेला अंगीकार निशाला आणि केंद्रातल्या आणखीही काही मतिमंद बांधवांना उजेडाच्या वाटेकडं घेऊन जातो आहे याची जाण संगीतामावशींपर्यंत पोचली असेल का?... मन विचार करत राहिलं..
दुसऱ्या दिवशीचीच गोष्ट... संस्थेच्या पुढाकारानं स्थापन झालेल्या महिला बचतगट प्रमुखांची बैठक ठरवली होती- जायलाच हवं म्हणून तिथे गेले... प्रमिलाबाई सांगत होत्या- `ताई, आमाला लई न्हाई जमायचं-पर आमी कमलाबाईला येकली न्हाई पाडनार...आसंना का येडी, पाटचं अन् पोटचं न का इचारीना, तिला आम्च्या गटातल्या बाया वाळकी भाकर का हुईना द्येतील, तिला पानी-लोनी द्येतील...!
मी म्हटलं- `बघा, प्रमिलाबाइंर्चा गट नागावची, सरकारची वाट बघत नाही बसलेला!... कमलाबाइंर्साठी जमेल तेवढं करतोय... कुणाला काही सांगायचंय?... मग बायकांचा आवाज वाढला- दुसरीचं सांगून होईपर्यंत थांबावं हे (कितीदा सांगूनही) न पटलेल्या त्या गटप्रमुख आपापल्या गटाचं पैशांव्यतिरिक्तचं काम - चढ्या आवाजात, आपल्या गोष्टीवेल्हाळ पद्धतीनं सांगू लागल्या... मी ऐकत होते अन् नव्हतेही...
`बघितलंस?... थोडं धीरानं घेतलं की...! नाही बदलायची वाट!..' मन स्वत:लाच बजावत होतं... बरोबर की, चूक? इतक्या वर्षांच्या अनुभवानंतरही टोकाला जाणाऱ्या आपल्या मनाचा आशा-निराशेचा काटा असा नेहमीच खालीवर का होतो?.. परस्परांवर उत्कट प्रेम करणाऱ्या जोडप्याने एखादी ठिणगी परस्परांत पडली की, घटस्फोटाच्या भोज्जाला शिवून यावं- क्षणभरातच त्यातल्या एखाद्याची छोटीशी प्रेमाची नि:शब्द कृती पाहून, भडकलेल्या दुसऱ्यानं शांत होत माघार घ्यावी अन् (अपराधी भावनेला मागं टाकत) पुन्हा परस्परांना आयुष्यभर सोबत करण्याची मूक शपथ (मनातल्या मनात, तेही स्वत:च्या नकळत!..) घ्यावी अन् पुन्हा आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांत बुडून जावं-असं होतंय का, आपलंही?.. ह्या कामातली अशी कोणती गोष्ट आपल्याला इथं बांधून ठेवतेय?... संस्थेच्या प्रौढ मतिमंद केंद्रातील मतिमंद बांधवांचं निरागस प्रेम, आपल्याला आहे तसं स्वीकारण्याची (इतर तथाकथित सर्वसामान्य व्यक्तींपेक्षा) त्यांची सहज तयारी मनाला, संस्थेच्या कामात बांधून ठेवतेय?... की, आपल्या जिण्यात पावलोपावली प्रतिकूलता असताना, कासवाच्या गतीनं का होईना पडत-झडत-धडपडत आपल्या ग्रामीण महिला विकासाच्या वाटेवर चालतायत- चालू पाहतायत- त्यांच्या ह्या जिद्दी वृत्तीनं आणि पारदर्शी गुण-दोषांनी आपल्याला मोह घातलाय?.. याचं उत्तर देणं कठीण. पण ह्या दोन्ही ुगटांच्या सोबतीनं त्यांच्या विकासाचा मार्ग शोधताना, मानवी जीवनासंबंधीचं माझंच आकलन एवढं वाढलं की, माझीच पुढची वाट स्पष्ट, ठळक होत गेली... त्याचं कारणही तसंच आहे-`साधना'च्या प्रौढ मतिमंद केंद्रात मतिमंद बांधव अनेकदा येताना आपल्यासोबत अपशब्दांचे गाठोडे, आक्रमकता, हिंस्रता संरक्षण कवचासारखे घेऊन येतात- घरी वाट्याला आलेली कमालीची उपेक्षा किंवा अति लाड, पालकांच्या मतभिन्नतेमुळे त्यांच्या संस्कारात, वागणुकीत असलेला कमालीचा फरक, घरात-समाजात सातत्यानं भावंडांच्यात झालेल्या तुलनेने मनात निर्माण झालेला न्यूनगंड, त्यामुळे ओठावर आणि मनात कडवटपणाची चव सतत असतेच. अशावेळेला त्यांचा सुरुवातीचा आणि स्थिरावण्याचा काळ कसोटीचा असतो- त्यांच्या आणि आमच्याही!... मनाला सतत पटवावं, समजवावं लागतं-' त्याच्या/तिच्या वागण्यात फरक पडायला वेळ लागेल - तुला त्याला/तिला समजून घ्यावं लागेल - त्यांच्यातील बदलासाठी तुला त्याला/तिला मदत करावी लागेल-मुख्य म्हणजे, तुला आणखीन् स्वत:ला बदलावं लागेल- समज अधिक वाढवावी लागेल... यातूनच ठामपणा म्हणजे चढा आवाज, आपल्याच चष्म्यातून सगळया जगाकडं बघण्याचा अट्टाहास, सर्व गोष्टी आपल्याच फूटपट्ट्यांनी मोजून चूक-बरोबर ठरवण्याचा आग्रहही कमी होत गेला... माणसांना, जीवनाला निरभ्र मनानं, सर्व बाजूंनी न्याहाळण्याचं बळ मिळत गेलं... नेहमीच े असं सहज जमतं असं नाही- पण प्रवास `त्या' वाटेवरचा असतो हे निश्चित!...
तरुण वयात कुठल्याही `इझम'कडं खेचलं जाणारं ओढाळ मन, प्रत्येक `इझम्'च्या विचारसरणीच्या मर्यादा पाहायला शिकलं-त्यामुळं `स्त्री-मुक्ती'पासून सुरू झालेला प्रवास `मानवमुक्ती'कडं सरकला अन् `समाजवादा'वरची निष्ठा अधिकाधिक डोळस होऊ लागली... जीवनाचं आणि मानवी स्वभावाचं आकलन करून घेताना, कुठलीही एक तार्किक कारणमीमांसा पुरेशी पडत नाही इतकं ते व्यापक आणि मानवी बुद्धीला पुरुन उरणारं आहे याचं भान आलं आणि एकूण विश्वाच्या ह्या व्यापक पसाऱ्यात आपलं अस्तित्व नगण्य आहे ह्याचा स्वीकार करायला शिकलं. त्यामुळेच एखाद्या कृती यशामागचा कर्तेपणा पाहताना त्यात अनेक घटक कसे गुंतलेले आहेत - हेही समजून घेऊ लागलं.. पण यातून मनानं निवृत्ती नाही स्वीकारली!.. उलट, ह्या वैश्विक चक्राचा एक भाग म्हणून आपल्या वाट्याला आलेलं जीवन- त्यात आपण डोळे उघडे ठेऊन, स्वीकारलेलं काम आपल्याला श्वासोच्छ्वासासारखं चिकटलंय, निगडित झालंय आणि हेच काम आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत करणं-करत राहणं हाच आपल्याला उमजलेला मार्ग आहे हेही जाणवलं...
परवा, खूप वर्षांनी माझे एक काका भेटले- बोलताबोलता संस्थेच्या कामाचा विषय निघाला- ते म्हणाले, `तुला कळतंय का, की र्ूेी रीश षश्रळीींळपस ुळींह ीळवशींीरलज्ञ? ... मी काहीच बोलले नाही... ऐन महाविद्यालयीन जीवनात कुवतीनुसार साहित्य, संगीत, अभिनयाच्या क्षेत्रात मुशाफिरी करण्याची संधी मला मिळाली होती- त्याचे ते एक साक्षीदार होते... त्याच ललित कलांच्या क्षेत्रात प्रयत्नशील, प्रयोगशील राहायचे सोडून, `असे' काहीसे एकारलेले आयुष्य मी का स्वीकारावे, असा त्यांच्या प्रश्नांचा रोख होता.. त्यात काहीसे तथ्य असेलही; नव्हे आहेच पण स्वत:च्या मर्यादा ओलांडण्याची पुन्हा पुन्हा संधी देणारं आणि इतरांच्या जीवनाला (पर्यायानं स्वत:च्याही जीवनाला...) अर्थपूर्ण करणारं हे काम!... आपोआपच मनाला नित्य कलांच्या स्थानकांकडं घेऊन जातं - जीवनाचं `संगीत' आणि त्यातलं `नाट्य' माझ्या मनापर्यंत पोहोचवतं... त्यातून सकस लेखनाचे अंकुर पुढं-मागं उगवतीलही!..
पण तोपर्यंत एका वैश्विक प्रवासातील आपण एक पांथस्थ आहोत आणि `त्या' प्रवासातला प्रत्येक क्षण आणि प्रत्येक कण आपण आपल्या कामात सक्रिय आहोत हे समाधान मोलाचं वाटतं- मग, याहून आणखी काय हवं?...
मेधा टेंगशे
साधना व्हिलेज संस्था, १, प्रियांकित अपार्टमेंट्स,
लोकमान्य कॉलनी, पौड रोड, पुणे ४११०३८