प्रिय इशा,
माझं पत्र बघून तुला आश्चर्य वाटेल की दुसरं काही याबद्दल काहीच ठरवता येत नाही मला.. कारण तशी माझ्या पत्राची तुला थोडीफार सवय आहेच.
...खूप वर्षांपूर्वी, तू चौथीपाचवीच्या वयात असताना, मी एकदोन पत्र लिहिली होती तुला. आणि त्या भाबड्या, शब्दांच्या नक्षीने भारावून जाण्याच्या वयात तूही भरभरून उत्तरं दिली होतीस त्यांना.
त्यानंतर शुभांगी गेल्यावर विश्वनाथांना लिहिलेलं सांत्वनाचं पत्र! त्याचंही उत्तर तूच दिल्याचं आठवतंय. त्यावेळी तुझ्या पत्रातून जाणवणाऱ्या तुझ्या समजूतदार स्वभावाचं मला खूप कौतुक वाटलं होतं. नीतूला मी मुद्दाम ते पत्र वाचून दाखवलं आणि तुझ्याबद्दलचं कौतुकही बोलून दाखवलं होतं.
तुमच्या लग्नानंतरची दोन वर्षं म्हणजे तुम्ही दोघं तेनांगला होतात तेव्हा आपण दोघी (हो आपणच दोघी. कारण नीतूला फारसा वेळच नसायचा आणि तू कंटाळलेली असायचीस) एकमेकींना इ-मेल सुद्धा पाठवायचो. काही निवडक फॉरवर्डस आणि त्याखाली एकदोन ओळीशब्दांतल्या मार्मिक टिप्पण्या...
आता ते सगळंच संपलंय. अनेक अर्थानी आपल्यातला संवाद मिटून गेलाय. कित्येक दिवसांत तू माझ्याशी जिव्हाळयाचं काही बोललेली नाहीस, एखादा किस्सा सांगून हसली नाहीस, मी स्वत:कडे दुर्लक्ष केलं म्हणून रागावली नाहीस... आपल्या दोघींमधले शब्दांचे पूलच कोसळून गेलेयत जसे काही.
तसे आपल्यात लिखित दुवे आहेत अजूनही, पण ते फार वेगळे. बोलता येत नाही म्हणून पाटीवर थरथरत्या हातानी लिहिलेल्या वेड्यावाकड्या मागण्यांना काय संवाद म्हणायचं?
तुला वेगळं राहायचं होतं - राहायचंय. माझी किंवा ह्यांची त्याला हरकत असायचं काहीच कारण नव्हतं. कारण बदलत्या काळानुसार आता वेगळं बिऱ्हाड मांडणं हा एक सहज सोपस्कार झालाय. उडता यायला लागल्यावर पाखरांच्या पिल्लांनी दुसरं झाड शोधावं यात खंत वाटण्यासारखं काय आहे ? माणसांची पिल्लं दुसरं झाड शोधतात तेव्हा मागे राहणाऱ्या आईवडिलांना आपली मुळं उखडल्यासारखं वाटतं खरं, पण तो निसर्गनियम आहे. त्रासदायक वाटला तरी आम्हां दोघांनाही तो मान्य होताच.
...पण तेवढ्यात अचानक माझा हा आजार उपटला. घशाचा क्रॅन्सर. जिवावरचं स्वरयंत्रावर निभावलं खरं, पण त्यामुळे माझं आयुष्य पार नि:शब्द होऊन गेलंय गं. मला बोलता येत नाही आणि तुला माझ्याशी बोलावसं वाटत नाही.
नेमकं ह्यांनाही आत्ताच आठ महिन्यांसाठी बर्लिनला जावं लागलंय. त्यामुळेच नीतूने घराबाहेर पडायला नकार दिला असणार आणि तुम्हा दोघांना माझ्यासाठी इथे थांबावं लागलं असणार म्हणून ही नाराजी आहे का?
पण तसं म्हणावं तर हे सगळं व्हायच्या आधीपासूनच तू घरात बोलायची बंद झालीयेस. कशामुळे तुला शब्दांचा कंटाळा आलाय? केवळ ओठांची मुरड आणि कपाळावरच्या आठ्या एवढाच संवाद पुरेसा नसतो गं सोने.
कधीपासून तुटत गेला गं आपल्यातला संवाद ? नेमका क्षण आठवतोय तुला ? मला नाही आठवत. कारण आपल्यात असं काही झालंय हे माझं मन अजूनही मानत नाही. अजूनही मला तू तशीच वाटतेस- माझ्या मुलीसारखी ! हो माहितेय मला, तुला हा शब्द आवडत नाही. कोणतंही नातं एकमेव असतं. ते दुसऱ्या कोणत्याच नात्यासारखं नसतं असं तुझं ठाम मत आहे. वेळोवेळी तू ते व्यक्तही केलंयस. करतेस... तो स्वभावच आहे तुझा. मनातलं सगळंच तू नको इतक्या स्पष्टपणे व्यक्त करून टाकतेस. समोरच्याला काय वाटेल, त्याच्यावर आपल्या व्यक्त करण्याचा काय परिणाम होईल याचा विचारही न करता !
लहानपणापासूनची सवय म्हणून तू मला अगं मावशी म्हणतेस. लग्नानंतरही तू तसंच म्हणत राहिलीस, म्हणून मोठ्या आत्याने तुला टोकलं... ``आता तिला अहोे आई म्हणत जा. तशीही तुला आई नाहीच आहे.''
तेव्हा तू फटकन म्हणालीस, ``आई एकच असते. माझी आई आता नसली तरी तिची जागा दुसऱ्या कुणाला देणार नाही मी.''
त्यावेळी मी कौतुकाने हसले.
त्या कौतुकरंगाला कितीतरी छटा होत्या.
तुझ्या स्पष्टवक्तेपणाचं कौतुक. केवळ वयानात्याच्या कारणासाठी कुणाचीही भीड न बाळगण्याच्या स्वभावाचं कौतुक ...तू माझी झाली आहेस या आनंदात तुझ्या कशाही वागण्याबद्दलचं कौतुक.
तुझ्या सगळयाचंच कौतुक वाटायचं मला. आंधळं कौतुक ! कारण तू सून म्हणून घरात आलीस तेव्हा लहान मुलाला एखादी अपूर्वाईची वस्तू मिळावी तसा आनंद झाला मला. कशाकशाची अपूर्वाई वाटली म्हणून सांगू.. मला मुलीची हौस. तुझ्या पावलांनी एक रेडिमेड- कधीही सासरी न जाणारी मुलगीच घरात आली त्याची अपूर्वाई. तुझ्या आणि नीतूच्या एकमेकांवरच्या प्रेमाची अपूर्वाई... तुमचं एकमेकांशी बरोबरीच्या नात्यानं वागणं, चिडणं- चिडवणं, छोट्याछोट्या कारणांवरून भांडणं ,लहान मुलांसारखं माझ्याकडे तक्कार करणं... तरीही एकमेकांत आकंठ बुडून जाणं हे सगळंच माझ्यासाठी अपूर्वाईचं होतं.
नवराबायकोचं नातं असं असतं? मी विस्मयाने पाहात राहायची. लग्नाला तीस वर्षं झालेली असूनही अशा सुंदर, निर्मळ सहजीवनाचा अनुभवच नव्हता मला. तसा आमच्या दोघांच्यात काही बेबनाव नाही, पण फारसा सुसंवादही नाही. आमच्या पिढीचं सहजीवन असंच होतं. त्यात नवराबायकोने समान असणं अपेक्षितच नव्हतं कुणाला. केवळ वयानेच नाही, तर मनाने, पगाराने, शिक्षणाने सगळयाच बाबतीत नवऱ्याने वरचढ(च) असायचं आणि बायकोने त्याच्यापेक्षा कमी... नुसतं कमी असायचं नाही तर, सर्व प्रकारच्या कसरती करत आपलं कमीपण-दोघांमधलं हे कमीजास्तचं अंतर कौशल्याने जपायचं. कुठेच त्याची बरोबरी करायची नाही. अगदी दीडदोन वर्षांच्या मुलाच्या मनावरसुद्धा आईपेक्षा बाबा कसे श्रेष्ठ आहेत ते बिंबवायचं.
नवऱ्याने बरोबरीने वागवलं तर तुम्हां मुलींना त्यात विशेष काही वाटत नाही. `त्यात काय विशेष?' ते तर साहजिकच आहे. मीसुद्धा त्याच्याएवढीच शिकलेय. त्याच्यासारखीच कमावती आहे. मी जर कुठे कमी नसेन, तर त्याने मला बरोबरीने वागवलंच पाहिजे' अशी तुमची धारणा असते.... आमच्या बाबतीत मात्र नवऱ्याने बायकोला बरोबरीचा मान देणं ही अभिमानाने सांगण्याची, दागिन्यासारखी चारचौघात मिरवायची गोष्ट. ते जोडपं क्रांतिकारीच ठरायचं एकदम. नोकरी करत असली, नवऱ्याच्या बरोबरीने कमावत असली तरी, घरात शिरल्याबरोबर तिने सुशिक्षितपणाचं चिलखत उतरवून ठेवायचं आणि आज्ञाधारक गृहिणीचं सोवळं वस्त्र नेसायचं. त्यामुळे शिक्षण घेऊन नोकरी करत असूनही असं बरोबरीने वागणं, मनातलं काहीही नवऱ्यापाशी मोकळं करणं कधी शक्यच झालं नाही आम्हांला. संवादाची - कुणापाशी तरी अंतर्बाह्य मोकळं होण्याची गरज मनात तशीच दडपून राहिली. म्हणूनच तू आपल्या मित्रांबद्दलसुद्धा नीतूशी सहजपणे बोलू शकतेस आणि तोही तुमच्या मैत्रीच्या नात्याकडे निर्मळपणे पाहू शकतो हे मला नवलाईचं वाटत होतं.
तुझं बेधडक वागणं हा माझ्या विस्मयाचा आणखी एक विषय. मला त्या बेधडकपणाचं आकर्षण वाटायचं. मनात कुठेतरी मलाही असं वागण्याची सुप्त इच्छा होती. पण तसं वागता यायचं नाही. मनात आलेला एखादा विचार कितीही खरा, कितीही तर्कशुद्ध असला तरी समोरच्या माणसाच्या वयानात्याचा, त्याला काय वाटेल याचा विचार व्यक्त करून मगच तो व्यक्त करायचा संस्कार मोठ्यांच्या वागण्यातून आमच्यावर नकळतपणे घडत गेलेला होता. आणि आमचं वागणंही तसंच....
तू तुझ्या स्वाभाविक सहजपणे विचारशील `असं खोटं कशाला वागायचं ?'
पण मला त्याचं उत्तरही स्पष्टपणे देता यायचं नाही.
मात्र असं असलं तरी, वादाभांडणातून का होईना पण कुटुंबातले घटक म्हणून आम्ही एकमेकांशी बांधून राहात होतो. सवयीने आणि मनाविरुद्ध का होईना, पण एकमेकांच्या जगण्यातले तपशील एकमेकांना देत राहिलो होतो.
अर्थात त्यात एकमेकांना समजून घेणं कमी असायचं. म्हणूनच एकमेकांना समजून घेणारा संवाद मला जास्त गरजेचा वाटतो.
तू संध्याकाळी ऑफिसमधून आलीस की मी तुला विचारायची, ``आज काय विशेष घडलं ऑफिसात ?'' किंवा तू एखाद्या कार्यक्रमाला, सहलीला जाऊन आलीस की तिथल्या खाण्यापिण्याबद्दल, विशेष गोष्टींबद्दल चौकशी करायची. सुरुवातीला तू सौम्यपणे बोलायचीस, पण नंतर मात्र चिडायला लागलीस. रोज काय सांगायचं ? असं तुला वाटायचं आणि ते चुकीचंही नव्हतं.
मात्र माझ्या विचारण्यामागची भूमिका समजून घेतली असतीस तर तुला प्रश्न पडला नसता. कारण माझं ते विचारणं म्हणजे केवळ संवादाची सुरुवात असायची. दिवसभर दूर राहिल्यामुळे आपल्या दोघींच्या मूडमध्ये पडलेलं अंतर साधून घेण्याची धडपड... माझी नोकरी राष्ट्नीकृत बँकेतली तर तुझी कॉर्पोरेट विश्वातली. (मला त्या वातावरणाबद्दलही कुतूहल आहेच.) म्हणून मला अनोळखी असणाऱ्या तुझ्या विश्वाशी स्वत:ला जोडून घेऊन, तुझ्याजवळ येण्याची धडपड...
मला एक छोटासा प्रसंग आठवतोय. मी नोकरी करणं ही घराची गरज असली तरी, माझं दिवसातले दहाबारा तास बाहेर राहणं सासूबाइंर्ना खटकायचं. मग घरातली जास्तीत जास्त जबाबदारी माझ्यावर टाकून माझी फेजती करायचा त्यांचा प्रयत्न असायचा. रोज येताना घरातला एखादा संपलेला जिन्नस, भाजी हे मी लक्षात ठेवून घेऊन यायलाच हवं ही अपेक्षा... एकदा घरातले दाणे संपले होते. दुसऱ्या दिवशी संकष्टी होती. पण त्या दिवशी नेमकं आमच्या बँकेत दुपारी लंच अवरमध्ये एक कस्टमर आला आणि त्याने खोटा चेक वटवण्याचा प्रयत्न केला. कसा कोण जाणे, पण माझा काही संबंध नसताना माझ्या ते लक्षात आलं आणि मी वेळेवर हालचाल करून त्याचा बेत हाणून पाडला. रक्कम मोठी होती. चेक वटला असता तर बँकेला चांगलीच झळ लागली असती... त्यामुळे थोडी पळापळ, सगळयांची एक्साईटमेंट, पुन्हा पुन्हा तीच चर्चा, दुसऱ्या ब्रँचमधून येणारे अभिनंदनाचे फोन, वरिष्ठांनी मुद्दाम येऊन केलेलं माझं कौतुक... दिवसभर मी वेगळयाच मूडमध्ये होते. घरी यायलाही नेहमीपेक्षा उशीरच झाला. आल्यावर माझा हा पराक्रम घरात सगळयांना सांगायला उत्सुक होते मी. पण घरात पाऊल टाकल्याबरोबर सासूबाइंर्नी टपून बसल्यासारखं विचारलं, ``दाणे आणले नसशील ना उद्यासाठी ?'' माझा चेहरा कोरा. मी साफ विसरून गेले होते.
मग ह्यांच्याकडे तक्रार. माझ्या बेजबाबदारपणाबद्दल, घरात लक्ष नसण्याबद्दल ह्यांनी दिलेलं भलं मोठं व्याख्यान... माझा तो पराक्रम घरात कधीच कळला नाही. त्याचं फारसं दु:ख वाटलं नाही मला, मात्र त्याच क्षणी मी ठरवून टाकलं. आपली सून नोकरी करणारी असली तर आपण कधीच तिच्याशी असं वागायचं नाही... म्हणून मी रोज तुला....
पण जाऊ दे. तू त्याचा वेगळाच अर्थ घेतलास...
दर दहा वर्षांनी पिढी बदलते म्हणतात. त्या हिशोबाने तुझ्यामाझ्या वयात अडीच पिढ्यांचं अंतर आहे. म्हणजे नीतूच्या आणि माझ्या वयात आहे तेवढंच. पण तरीही जेव्हा तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हा नीतूपेक्षा जास्त जवळची वाटलीस... तुला आठवतं? तुम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलंत, तेव्हाही नीतूच्याही आधी तूच मला सांगितलंस. ``मावशी, नवनीत म्हणतोय की...''
वाक्य अर्धवट तोडत तू लाजलीस आणि मला सगळं समजलं. किती जवळचं, शब्दाशिवायचं नातं होतं तेव्हा आपल्यात !
आणि त्याचं कारणही ठाऊक आहे मला. मुलगा असो किंवा नवरा ! त्यांच्यापेक्षाही कधीकधी मैत्रीण जास्त जवळची वाटते. कारण समजून घेण्यातला फरक. एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीला जास्त चांगली समजून घेऊ शकते. (अर्थात तिने मनात आणलं तर !)
कॉलेजच्या शिक्षणासाठी म्हणून तू मालेगावहून इथे आलीस तेव्हा खरं म्हणजे तुला होस्टेलपेक्षा आमच्याच घरी ठेवावं असं मला वाटत होतं. पण तेव्हा आमचं घरही लहान होतं आणि तुझ्या वडिलांना-विश्वनाथना ते आवडणार नाही हेही मला ठाऊक होतं. पण होस्टेलला राहिलीस तरी, सतत तू घरी येत राहिलीस. माझ्या लहानश्या, गैरसोयीच्या घरात येऊन मोकळेपणाने वावरत राहिलीस... पण आता मात्र तुला ते घर आपलं वाटेनासं झालंय. का गं ? तेव्हासारखा संवाद उरला नाही आपल्यात म्हणून ?
कशामुळे झालं असं? आपण नात्यात बांधल्या गेलो म्हणून? मग नातं म्हणजे नेमकं काय? माणसांना जवळ आणणारे रेशीमधागे? की माणसांमध्ये अंतर आखून त्यांना एकमेकांपासून दूर नेणारी लक्ष्मणाची रेघ?
आणि आता तर जवळ दूरचा प्रश्नच उरलेला नाही. आपल्यातला संवादच संपलाय. ओठ वाकडे करू नकोस. संवाद म्हणजे नुसती एकमेकांशी बोललेली वाक्य नाहीत. हां! संवादाची सुरुवात अशा छोट्यामोठ्या वाक्यांतूनच होते हे खरंय, पण तुमच्यातला संवादाचा पूल भक्कम असला तर नंतर अशा वाक्यांचीच काय, शब्दांचीही गरज उरत नाही. तुमच्या आजच्या भाषेत सांगायचं तर संवाद म्हणजे नातं टिकवण्याचं फेव्हिकॉल. आणि तुझा नातं या शब्दावरच भरवसा नाही. त्यामुळेच तुला या फेव्हिकॉलची गरज वाटत नाही का ?
की तुमची संवादाची संकल्पनाच वेगळी आहे म्हणून असं होतंय ? तुमच्या पिढीचा संवाद म्हणजे इ-मेल आणि एसएमएस. वेळ असेल तेव्हा मोबाईलवर बोलणं...
पण तुझ्या एक लक्षात येतंय का, इशा? संवादाची ही सगळी साधनं निर्जीव आहेत. थेट बोलणं, स्पर्श, हाका मारणं, पत्रातल्या खास अक्षरातून एकमेकांपर्यंत पोहोचणं, साधं एकमेकांकडे बघून हसणंसुद्धा.... या सगळयातून साधल्या जाणाऱ्या संवादाची जातकुळीच वेगळी. एखाद्या लहान मुलाच्या काजळमाखल्या, शेंबड्या अवताराकडे बघून आपण कौतुकाने `व्वा! कित्ती छान!!' अशा अर्थाचा अभिनय करावा आणि त्यातलं केवळ कौतुक ओळखून त्या लबाडाने बोळकं पसरून हसावं... हे दृश्य डोळयासमोर आणून बघ. म्हणजे तुझ्या लक्षात येईल एकही शब्द नसलेला हा संवाद किती प्रसन्न असतो ते. असा संवाद तरी गेल्या कित्येक दिवसांत आपल्यात झालाय? किती दिवसात तू माझ्याकडे बघून मन:पूर्वक हसलेली नाहीस, `मा%वशी%' म्हणत खोट्या रागाचा आव आणलेला नाहीस... दिवसभर मी इथे बेडवर पडून असले तरी, संध्याकाळी टी.व्ही. बघायला हॉलमध्ये येऊन बसते, रात्री जेवणाच्या टेबलावर आपण एकत्र असतो, सकाळी जाताना तुम्ही दोघं माझ्या खोलीत येऊन जाता, पण तरीही गेल्या कित्येक महिन्यांत आपल्यात असा बिनशब्दाचासुद्धा संवाद घडलेला नाही.
तसं तू माझ्याकडे दुर्लक्ष करत नाहीस. बाहेर जाताना उशीर होणार असेल तर त्याची कल्पना देऊन जातेस. मधूनच फोन करून शामाबाईला माझ्याबद्दल विचारतेस. माझ्या औषधांची, खाण्यापिण्याची काळजी घेतेस. शामाबाईने माझ्याकडे दुर्लक्ष केल्याचं जाणवलं तर, तिला रागावतेस. एखाद्या वेळी शामाबाई येणार नसेल तर, तुझे कार्यक्रम रद्द करून माझ्या सोबतीसाठी घरात राहतेस. (मात्र त्यावेळी माझ्या खोलीत न थांबता तुझ्या खोलीत बसून लॅपटॉपवर काम करत बसतेस ते वेगळं.) पण माझ्याजवळ बसून माझ्याशी काही बोलायचं मात्र तुझ्या जीवावर येतं. नाईलाज म्हणून माझ्याशी बांधून राहावं लागल्याचं मला तुझ्या डोळयांत स्पष्ट दिसतं.
आज तुला पत्र लिहिताना मला वाटतंय, बरं झालं मला बोलता येत नाही ते.
कारण मला बोलता येत असतं तर मी सलग एवढं बोलू शकले नसते. एवढा वेळच दिला नसतास तू. दोन वाक्यांनंतरच ``पुरे ग मावशी. वही पुराने गीतोंकी महफिल ऐकायचा कंटाळा आलाय आता.'' असं म्हणून मला तोडून टाकलं असतंस आणि हे सगळं मग माझ्या मनातच राहिलं असतं. जसं आजवर राहिलं तसं...
वेळोवेळी मी तुझ्याशी बोलायचा, संवाद साधायचा प्रयत्न केला आणि वेगवेगळया कारणांनी तू ऐकून घ्यायचं टाळलंस... म्हणून तर हे एवढं सगळं साचून राहिलंय मनात.
माणूस सगळयात जास्त कशाला भितो ठाऊक आहे, इशा?
एकटेपणाला.
तो एकटेपणाला मिटवण्यासाठी म्हणूनच त्याला स्वत:ला भोवतालच्या विश्वाशी जोडून घेण्याची गरज भासते. आणि मग त्या विश्वात शिरण्यासाठी तो वेगवेगळे रस्ते शोधतो. शब्दांचे, सुरांचे, रेषांचे, रंगांचे, तालाचे, लयीचे... आपला एकटेपणा या रस्त्यांवर भिरकावून देण्याचा प्रयत्न असतो त्याचा. पण ही झाली कलावंतांची गोष्ट ! आपल्यासारख्या सामान्य माणसाला सुखदु:ख वाटून घ्यायला माणूसच लागतं. तेही आपल्यासारखंच सामान्य ! आपल्याच स्तरातलं !! आपल्याच विचारांचं !!
ऑफिसमध्ये मला खूप मैत्रिणी होत्या. अर्थात त्यातल्या कुणालाच शुभांगीची सर नव्हती. पण तरीही संसारातल्या रोजच्या कटकटी, घरातली बारीकसारीक आनंददु:खं आम्ही चिंचेच्या आंबटगोड चवीसारखी वाटून घ्यायचो. सासूचा स्वभाव, नवऱ्याचा तऱ्हेवाईकपणा, मुलांची प्रगती असली साधीशीच सुखदु:ख असायची आमची. पण ती वाटून घेण्यातला आनंद, समाधान काही वेगळंच असायचं. त्यातून दु:खाची तीव्रता कमी व्हायची आणि आनंदाची चव वाढायची.
तुम्हांला कळणाऱ्या भाषेत सांगायचं तर, आमच्या पिढीतल्या गृहिणींचा आऊटलेट होता तो. भावना काय आणि वाहतं पाणी काय. दोन्हीला मोकळं व्हायला वाट हवीच. नाहीतर ते साचून राहतं. कुजतं आणि त्याचा दुर्गंध वातावरणाला प्रदूषित करतो.
माझ्या या अनुभवातूनच एकदा मी सहज तुला विचारलं, ``तुम्ही आय.टी.तल्या मुली एकमेकींशी काय गप्पा मारता गं? आता तुमच्या सासवा काही आमच्या सासूसारख्या घरात बसणाऱ्या नसतात. त्यामुळे तुमचे संघर्ष आमच्यासारखे नसतील. तुम्ही पण आमच्यासारख्या घरातल्या गोष्टींवर, सासूसुनेच्या नात्यांवर गप्पा मारता का गं ?'' त्यावर तू फटकन म्हणालीस, ``ह्यॅ ! असल्या फालतू गोष्टींवर बोलण्यापेक्षा आम्हांला इतर बरेच विषय असतात बोलायला.''
मला उडवून लावलंस त्याचा राग आला नाही. नात्यासारख्या कोमल गोष्टीला तू फालतू म्हणावंस याचं वाईट वाटलं मला, इशा. कोणतंही नातं फालतू नसतं गं. त्याचे आपण काढलेले वाभाडे फालतू असतात.
पूर्वी तू अशी नव्हतीस. तुझा स्वभाव थेट शुभांगीसारखा होता. माणसं जोडणारा. धरून ठेवणारा...
शुभांगी आणि माझ्यातलं नातं मैत्रीण या शब्दाच्याही पलीकडलं होतं. माझ्या मनात एखादा विचार येण्याआधीच तो तिच्या शब्दातून उमटायचा लग्न होईपर्यंत आम्हांला तिसऱ्या एखाद्या मैत्रिणीची गरजच वाटली नाही, आम्ही दोघीच पुरेशा होतो एकमेकींना खरं सांगायचं तर तिच्या या अशा परिपूर्ण मैत्रीमुळेच मला मोकळं होण्याची, सुसंवादाची सवय लागली आणि नंतर तो मिळेनासा झाला तेव्हा घुसमट.
सख्खी मुलगी असूनही तुला फक्त बारा वर्षे शुभांगीचा सहवास लाभला. पण मी मात्र चोवीस वर्षे तिच्या प्रत्यक्ष सहवासात होते. लग्नानंतरही आम्ही पत्रातून एकमेकींना भेटत होतो.
म्हणूनच नीतू आणि तू लग्न करणार असल्याचं जेव्हा तू मला सांगितलंस तेव्हा माझ्या मनात दोन परस्परविरोधी प्रतिक्रिया उमटल्या. पहिली मनापासून आनंदाची होती आणि दुसरी थोडीशी भीतीची होती... आनंद एवढ्यासाठी की तू माझ्या लाडक्या मैत्रिणीची- शुभांगीची मुलगी होतीस. शुभांगीच्या मृत्यूमुळे अर्ध्या वाटेवर राहिलेला आमच्या मैत्रीचा पल्ला तू पुढे नेशील अशी आशा वाटली. हो! सासू होण्यापेक्षा तुझी मैत्रीण व्हायचं होतं मला. तूच नाही -सून म्हणून कुणीही मुलगी घरात आली असती तरी मी मैत्रीच करणार होते तिच्याशी. कारण जगायला- संवेदनापूर्ण जगण्याला अन्न-पाणी-हवेइतकीच मैत्रीचीही गरज असते हे मला ठाऊक आहे.
माझ्या नशिबाने माझ्या आयुष्यात नात्यांची रखरखच आली सगळी. पण तरीही मी जगले ती केवळ मैत्रीच्या थेंबथेंब ओलाव्यावरच.
मैत्री हा शब्दही ठाऊक नव्हता तेव्हापासून शुभांगी आणि मी एकमेकींच्या मैत्रिणी होतो. तिच्या सावत्र आईचा जाच आणि आमच्या घरातलं दारिद्रय या दोन्ही गोष्टी जगापासून लपवत आम्ही फक्त एकमेकींशी बोललो. वाढत्या वयात एकमेकींची गुपितं जपली आणि नंतर मनातच राहून कितीतरी मूक सलही पत्रातून एकमेकींपाशीच उलगडले. नवऱ्याशीही जे बोलता येत नव्हतं ते आम्ही पत्रातून लिहायचो एकमेकींना. आर्थिक, सामाजिक, भौगोलिक, कितीतरी प्रकारची अंतरं होती आमच्या दोघींच्या अस्तित्वात, पण मैत्रीच्या चिवट धाग्याने आम्ही सगळया फटी शिवून टाकल्या होत्या.
नीतू तुझ्याशी लग्न करतोय म्हणून मला वाटलेल्या भीतीचं कारणही तेच होतं. तू शुभांगीची सौ शुभांगी विश्वनाथ देवळेची मुुलगी होतीस. देवळेंचं घराणं मोठं. कारखानदारांचं. त्या घराण्यातली वेगवेगळी माणसं राजकारण, समाजकार्य, क्रीडा, शिक्षण, कला अशा क्षेत्रात आघाडीवर चमकलेली. समाजात तुमच्या घराण्याला नाव होतं. लोकप्रियता होती... त्यामानाने आम्ही साधी सामान्य माणसं. आमच्या घराण्यात कुणीही, कसलेही पराक्रम गाजवलेले नव्हते. आमच्या नावाआडनावाभोवती कसलंही वलय नव्हतं. जन्मभर एक ते तीस तारखेच्या फेऱ्यात अडकून बेसिक, डी.ए. आणि भत्ते यांच्या बेरीजवजाबाक्या करण्यात आमचा जन्म गेलेला. आता नीतू चांगला शिकला आणि डिपार्टमेंटच्या परीक्षा देत हे वरच्या हुद्द्यावर पोचले, त्यामुळे मध्यम वर्गातून आम्हीही उच्च मध्यमवर्गाची पायरी चढली होती हे खरं, पण वृत्तीत बदल झाला नव्हता. ह्यांच्या हिशोबी स्वभावाची गुणसूत्रं नीतूच्याही रक्तात उतरलेली होतीच. तुझ्यासारखी लाडाकोडात, ऐषारामात वाढलेली मुलगी या घरात कशी सामावून जाईल याचीच मला भीती वाटली. त्यातून तुझा स्वभाव मनस्वी. संवेदनशील. अशा स्वभावाच्या माणसाचं ह्या घरात कसं माकड होतं हे मी स्वत: अनुभवलंय. तुझं तसं झालं तर?... ही भीती मला वाटत होती.
शुभांगी गेली आणि तू पूर्णपणे विश्वनाथांच्या सावलीत वाढलीस. त्यांच्यासारखीच झालीस. भावनेपेक्षा पैशाला महत्त्व देणारी... वरवरच्या दिखाव्याला भुलणारी... जीवनात फक्त आनंदच असावा अशा अपेक्षेनं जगणं विकत घेऊ पाहणारी...
माणसांचं मूल्य जाणणारा तुझा स्वभाव याच काळात कधीतरी पार पुसून गेला.
तुझ्यातला हा बदल माझ्या लक्षात आला नाही. कारण शुभांगी गेल्यावर मी माझ्या दु:खात बुडून गेले. माझ्या संसारात आधीही दु:ख होतंच... अपेक्षाभंगाचं दु:ख. संवेदनाहीन जोडीदाराबरोबर आयुष्य काढावं लागण्याचं दु:ख. माहेरच्या गरिबीमुळे सासूबाइंर्नी पदोपदी पाणउतारा करण्याचं दु:ख... दिसायला छोटी वाटणारी, पण जगण्याच्या आनंदाला रोजच टाचणी लावणारी माझी क्षुल्लक दु:खं. शुभांगी असताना तिच्याशी मी पत्रातून हे सगळं बोलू शकायची. ती गेल्यावर तिच्या नसण्याच्या दु:खाची बेरीज झाली माझ्या जगण्यात आणि मग तुझं काय झालं असेल हे लक्षातच आलं नाही माझ्या. विश्वनाथ तुला काही कमी पडू देणार नाहीत. आपल्या लाडक्या लेकीने मागितलं तर गुलबकावलीचं फूलसुद्धा आणून देण्याची हिंमत आणि ताकद त्यांच्यात आहे हे मला ठाऊक होतं. पण त्या ताकदीने ते तुझ्या आयुष्यात एवढी मोठी पोकळी करून ठेवतील ही शंकासुद्धा माझ्या मनाला शिवली नाही...
हो ! एक खूप मोठी पोकळी राहिलीय तुझ्या आयुष्यात, इशा.
तुला नकार ठाऊक नाही.
नकार पचवायला खूप मोठी ताकद लागते आणि ती ताकद जवळ असली की, आयुष्यात कोणतंही दु:ख, कसलंही संकट पचवता येतं. पण तू कधी नकार अनुभवलाच नाहीस. आईवेगळी पोर म्हणूनही आणि श्रीमंत बापाची एकुलती एक मुलगी म्हणूनही... आणि नकार न सोसल्यामुळे तुझं जगणं असं एकांगी झालंय. आपल्या आयुष्यात काय उणीव आहे हे तुझ्या लक्षात येत नाही. यायचंही नाही. कारण सतत मिळणाऱ्या होकारामुळे तुझी विचारांची दिशाच बदलून गेलीय. फक्त तुझीच नाही, तुमच्या पिढीचीच ही शोकांतिका आहे. सुबत्तेची सूज आलीय तुमच्या मनावर आणि त्या बाळसेदार मन:स्थितीमुळे तुम्हांला सगळया गोष्टी कस्पटासारख्या वाटतात. आपल्या हातून नात्यांची वीण उसवली जातेय. त्याचे धागे सुटे होतायत याचं शल्य तुम्हांला बोचत नही. मन:शांतीऐवजी तुम्ही कैफ देणाऱ्या गोष्टींच्या मागे लागता आणि संवाद संपवून बसता. स्पर्धेचा कैफ, पैशाचा कैफ, सुखसोयींचा कैफ, वेगाचा कैफ, आपण जग विकत घेऊ शकतो या अभिमानाचा कैफ... पण तुला एक सांगू का, इशा? पैशाने विकत घेता येणाऱ्या गोष्टींपासून मिळणारा आनंद म्हणजे कैफ असतो. पण बिनपैशाच्या वस्तूकृतीतून मिळणारं असतं ते समाधान, कैफ उतरतो, समाधान मनात मुरून रहातं...
माझं हे जुनाट तत्त्वज्ञान तुला पटणार नाही. कारण तुमच्या पिढीला त्या कैफाची ओढ आहे. त्या कैफात तुम्ही घरातल्या माणसांपासूनच काय, जोडीदारापासूनही लांब जाता.
हो. त्याबद्दलच तुला सांगायचं म्हणून मी हे पत्र लिहायला घेतलंय. पण मनाला, शब्दांना लगाम घालता आला नाही आणि सगळंच बोलत बसले. तू बोअर झाली असशील ना ? सलग एवढं काही ऐकण्याची, वाचण्याची सवय नाही राहिली ना आता? आणि तेही असं रडगाणंछाप!
कारण तुम्ही मित्रमैत्रिणी भेटता तेव्हा धम्माल करता. गाणी ऐकता. पार्टी करता. नाचात मन रमवता. सिनेमा बघता. वेगाने गाडी हाकण्याचा कैफ अनुभवता. सुखाचे सगळे सोहळे करता. पण दु:खाला जोजवत नाही. त्याला मनातल्या मनात तसंच रडत ठेवता... की असं काही दु:ख, खंत नसतेच तुमच्या मनात ? म्हणून तुम्हांला संवादाची गरज भासत नाही?
जगण्याच्या-आरामात जगण्याच्या सगळया गोष्टी तत्परतेने समोर आल्या की शब्द आणि माणसं नकोशी होतात का? आपल्याच मस्तीत बुडून जगताना कुणाचीच सोबत नकोशी वाटते का?... तेव्हाच सुरुवात होते का संवाद तुटायला?... आपल्यात झाली तशी!
आलकाल तुमच्या आय.टी. जगात अजून एक नवा प्रवाह येऊ घातलाय. दिवसभर म्हणजे बाराचौदा तास ज्याच्याबरोबर काम करतो त्या सहकाऱ्याशी आपण मनातलं खूपसं शेअर करतो आणि त्यामुळेच की काय घरी सहचरापाशी मोकळं होण्याची गरज उरत नाही. वेळ कमी असतो, दिवसभराची दमणूक. यातून संवाद साधायला संधीच मिळत नाही आणि दुरावा वाढत जातो...
बिरबलाच्या गोष्टीसारखं `नाती का तुटतात?' `दुरावा का येतो?' `गैरसमज का होतात?' आणि `एकटेपणा का वाढतो?' या चारही प्रश्नांचं उत्तर एकच आहे... वेळेवर न बोलल्याने!
बघ. मी पुन्हा वाहावत गेले...
आता मुद्दयावर येते.
काल दुपारी माझी मैत्रीण साधना आली होती. तिच्या मुलाचंही अलीकडेच लग्न झालंय. छान सून मिळालीय. पण पुन्हा तेच!
``बाकी सगळी चांगलं आहे गं...'' ती सांगत होती... आपण कुणासाठी स्वत:ला जरा दुमडून घ्यावं, दुसऱ्याला आनंद मिळत असेल तर आपला आनंदही त्यात सामावता येईल हे बघावं हे गावीच नसतं आभाच्या.घरातल्या माणसांना काही विचारावं, त्यांच्याशी बोलून निर्णय घ्यावा, आपले ताणतणाव त्यांच्याबरोबर वाटून घ्यावेत ही वृत्तीच नाही आजच्या पिढीची. आभाचंही तेच झालंय. स्वार्थी म्हणता येणार नाही, पण दुसऱ्यांचा जराही विचार करायची सवय नाही तिला. त्याचा फार त्रास होतो. कधीतरी तिने आपला, आपल्या भावनांचा विचार करावा असं वाटतंच ग मला.. पण तिचे वडील कित्येक वर्षं दुबईला आहेत नोकरीनिमित्ताने. इथे ती आणि तिची आई दोघीच राहतात. त्यामुळे तिला चार माणसांचा विचार करायची सवयच लागलेली नाही...''
तिचं हे बोलणं ऐकलं आणि माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. तुझ्या वागण्यामागचं कोडंही उलगडलं (बघ आमच्या पिढीला नकळत अशीच सवय लागलेली आहे दुसऱ्याच्या वागण्याच्या पार्श्वभूमीचा विचार करायची.) वेगवेगळया कारणाने का होईना पण तुझ्या आणि आभाच्या वागण्यातलं मूळ एकच आहे. एकच एक पालक असलेल्या घरात तुमची जडणघडण झालीय. आणि म्हणूनच तुमच्यातली संवादाची आवश्यकता क्षीण झालंय... तुझे बाबा किंवा आभाची आई यांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं असं मला म्हणायचं नाहीये. पण कदाचित अतिकाळजीमुळे, दुसऱ्या पालकाची उणीव भरून काढण्याच्या प्रयत्नात नकळत तुमचं संगोपन इतर मुलांपेक्षा वेगळया पद्धतीने झालं आणि तुम्ही स्वकेंद्री बनत गेलात...
केवळ तुमच्याच बाबतीत नाही तर, आज सगळयाच समाजासमोरचा हा मोठा प्रश्न आहे... एकेरी पालकत्वाचा ताण सांभाळताना संपून जाणारा सुसंवाद, त्यातून मुलांचा बदलत जाणारा स्वभाव.
माझं आयुष्य आता संपल्यातच जमा आहे. स्वरयंत्र काढलं म्हणून मी काही शंभर वर्षे जगणार नाही. तो दैत्य कुठेतरी हातपाय पसरत असेलच माझ्या शरीरात. आणखी फारतर एकदोन वर्षं... आणि कितीही जगले तरी माझं बोलणं संपलंच आहे आता. उरलाय तो फक्त एकतर्फी संवाद! तोही दुसऱ्या कुणी साधला तरच. पण तुमची गोष्ट वेगळी आहे. अजून आयुष्य पडलंय तुमचं...
आजकाल तुझे आणि नीतूचेही बरेच खटके उडतात... तसे आमचेही उडायचे. अजूनही उडतात.. पण आमची पिढी काही झालं तरी, लग्न ही जन्मभर निभावण्याची बाब आहे असं ठामपणे मानणारी! तुमचं तसं नाही. तुम्ही आपापल्या स्वातंत्र्याचा विचार करून, फटकन वेगळे व्हाल. अशा वेळी तुमच्या मुलाचं काय ? पुन्हा त्याला याच एकेरी पालकत्वाच्या चक्रातून फिरावं लागेल.. पुन्हा त्याचा स्वभाव तसाच आत्मकेंद्री... आणि कदाचित आयुष्याच्या उतरणीवर तुला आणि नीतूला त्याच्या स्वभावातल्या कोरडेपणाचा बसणारा धक्का... कदाचित त्यावेळी तुम्हांला संवादाचं - एकमेकांमधल्या सुसंवादाचं महत्त्व कळलेलं असेल आणि पुढच्या पिढीचा कोरडेपणा सहन होणार नाही. धक्का देऊन जाईल. माझ्यासारखीच एकटेपणाची खंत तुम्हांला कुरतडायला लागेल.
पण हातात काही उरलेलं नसेल.
नको गं, इशा. असं व्हायला नकोय. या गोष्टीची आत्ताच काळजी घ्या. सगळा संवाद संपून केवळ दगडी आयुष्य जगणं ही जन्मठेपेच्यापेक्षाही मोठी शिक्षा असते. वैऱ्याच्याही वाट्याला ती येऊ नये असं वाटतं, मग तुमच्यासारख्या माझ्या जिवलगांच्या बाबतीत तर..
कशीही वागलीस तरी, तू माझी फार लाडकी आहेस, इशा. नीतूपेक्षाही जास्त लाडकी. आत्ता तुझ्या वागण्यामुळे मनात तुझ्याबद्दल दुरावा असला तरी तो तात्पुरता आहे. तुझ्याबद्दलच्या कोणत्याच वाईट भावना नाहीत माझ्या मनात...
...आणि नीतूचा जन्म झाल्यापासून मी जे ठरवलंय तेच अजूनही मला वाटतंय...
मी जे दु:ख भोगलं ते माझ्या सुनेच्या वाट्याला कधीच येऊ नये.
तुझी
मावशी.



Mac Makeup
This palette is appropriate by consumers as Mac Makeup assists them in appearance asperous spots, aphotic circles, and in some cases tatoos Cheap Mac Makeup. Some consumers accept claimed the actuality that able appearance spent some time alive so able-bodied who’s helped Mac Makeup Wholesale awning over an covering ancestral disorder. Therefore Mac Makeup Cheap, the concealer has be a wee Wholesale Mac Makeup abatement to awning up generally base blemishes Mac Brushes added concealers would not high. Yet, some accept claimed the commodity is Mac Eyeshadow for able television, music, video artist, and book media professionals MAC Foundation. This blueprint is just makes absolute faculty and is consistently on the win agitated accolade with consumers.
Michael Vick Authentic
Michael Vick Authentic Jersey
DeSean Jackson Authentic Jersey
Nnamdi Asomugha Authentic Jersey
Brent Celek Authentic Jersey
LeSean McCoy Authentic Jersey
DeSean Jackson Jersey
Michael Vick Jersey
Nnamdi Asomugha Jersey
Brent Celek Jersey
LeSean McCoy Jersey
Asante Samuel Jersey
Brandon Graham Jersey
Jeremy Maclin Jersey
Nathaniel Allen Jersey
Randall Cunningham Jersey
Reggie White Jersey
Stewart Bradley Jersey
Wes Hopkins Jersey
Dominique Rodgers-Cromartie Jersey
Customized
LaDainian Tomlinson Authentic Jersey
Darrelle Revis Authentic Jersey
Nick Mangold Authentic Jersey
Mark Sanchez Authentic Jersey
Dustin Keller Authentic Jersey
Jets Jersey
New York Jets Jersey
Cheap Jets Jersey
Antonio Cromartie Jersey
Bart Scott Jersey
Brett Favre Jersey
D'Brickashaw Ferguson Jersey
Darrelle Revis Jersey
Dennis Byrd Jersey
Dustin Keller Jersey
Dwight Lowery Jersey
Joe Klecko Jersey
Joe Namath Jersey
Kyle Wilson Jersey
LaDainian Tomlinson Jersey
Laveranues Coles Jersey
Leon Washington Jersey
Mark Gastineau Jersey
Mark Sanchez Jersey
Muhammad Wilkerson Jersey
Nick Mangold Jersey
Plaxico Burress Jersey
Santonio Holmes Jersey
Shonn Greene Jersey
Thomas Jones Jersey
Vernon Gholston Jersey
Wesley Walker Jersey