Skip to main content
Posted in

गोळाबेरीज
संयमाचं स्पर्शप्रूफ चिलखत
अंगभर लपेटून
डोळयाला निर्लेपपणाचा
गॉगल चढवून,
होते मी स्वत:ला सांभाळत.
माझ्याबरोबर निखळ मैत्रीचं
घनदाट जंगल तू जोपासलंस.
विश्वासले मी तुझ्यावर
टेकली मान तुझ्या खांद्यावर
रमू लागले तुझ्या सहवासात.
तुझ्याबरोबर मोकळी होत जाताना
स्पर्शाची लक्ष्मणरेषा
कधी, कशी ओलांडली गेली
ते मला कळलंच नाही.
लबाडा ! सारे कसे तुला कळतं
पण घडले मला नकळत
करू जाता गोळाबेरीज एकंदरीत
सारे काही घडले कळतनकळत !!
सरोज जोशी, मुंबई
८१/७, आज्ञाद, पेस्तोम सागर, टिळकनगर, एक ८९.

नवी पहाट
मळल्या वाटा मागे पडल्या
आठवणीही जाव्यात बुजून
संचाराला उदंड धरणी
पालव कालचा जावा सुटून
पुसून टाकलेत माग सारे
नवी वाट तेव्हा दिसेल
अतीताची मिटता छाया
नवी दिशा गाली हसेल
वर्तुळाचा ठरीव परीघ
ओलांडावा सहज सुसाट
आखीव रिंगणापल्याड उत्सुक
वाट पहाते नवी पहाट !
अनुराधा साळवेकर
४/१५, आनंदनगर, दीनदयाळ मार्ग
डोंबिवली (प), जि.ठाणे.

प्रतिमा
आपण प्रतिमा एकाच मूळ वस्तूच्या
तरीही इतक्या वेगवेगळया, की
मूळ वस्तू कळू न देणाऱ्या
प्रतिमांना असते-नसतेपणा का असावा ?
कुणाच्या स्वप्नातले आपण
तृष्णेने ग्रासलेले ?
नाटकात काम करता
स्वत:ला विसरून जाणारे ?
संहिता कुणाची, दिग्दर्शन कुणाचं
तरीही नांदीपरीक्षा आपलीच का ?
बेंबीच्या देठापाशी
पिळवटून टाकणारी
एकटेेपणाची वेदना
म्हणजे जर भासच तर
खरं काय ?
मरण्याआधीचं जगणं
की
जगण्यात ठायी ठायी पेरलेलं मरण ?
सुजाता महाजन
आय-८, शिवनगरी, महात्मा सोसायटीजवळ,
कोथरूड, पुणे ४११०३८

अंदाज
तू माझ्या डोळयांचेच माप घेतलेस
नजरेचे नाही
तू ओठांची महिरप मोजलीस
शब्दांची सुरावट नाही
तू पावलांचे हळुवारपण अनुभवले
पदन्यासाचे पडघम नाही
तू नाजूक बोटातच गुंतून पडलास
हाताच्या मुठीकडे लक्षच नाही
वरवरचा सारा अंदाजच तुझा चुकीचा
आत वाहतो बेफामवारा
कायम माझ्या मुक्तीचा !
सुरेखा भगत
द्वारा प्र.कृ.पाटील,प्रभू कॉलनी, महादेव-खोरी रोड,
शांतिनगर, अमरावती ४४४ ६०१

निश्चय
तो फाड फाड
मुस्कटात मारतो,
शिव्या देतो,
उभं आडवं सोलून काढतो
कधी वाग्बाणांनी
कधी हातांनी..
ती घायाळ
पण शब्द उच्चारत नाही
शिकलेली बायको करण्याचा हा एक फायदा
संघर्ष वगैरे शब्द माहीत असतात तिला
फक्त ते रक्तात भिनवून घेता येत नाहीत
प्रतिष्ठेपायी ओठांच्या बाहेर
पडत नाहीत साधा हुंकार..
दुसऱ्या दिवशी सकाळी ती दिसते
अंगण झाडताना
सडारांगोळी टाकताना
चेहरा सुजलेला
कपाळाला टेंगूळ
अंगभर ठणका
मी विचारते
माहीत असनूही
अगदी साळसूदपणे
काय झालं ?
ती सांगते
बाथरूममध्ये पाय घसरून पडले काल
कळते मला
पण रेटत नाही जीभ
फुटत नाहीत शब्द
आता ती भरत असते रांगोळीत रंग
मी सल्ला देते तिला
आंबेहळद लावून शेक बाई
बरं वाटेल तुला...
तिच्या डोळयांतून ओघळतात दोन थेंब
मिसळून जातात मातीत
ओठ मात्र अधिकच गच्च आवळलेले...
मला आठवते माझी माय
भूतकाळ चांगला नव्हताच
पण भविष्य...?
मी ठरवून टाकते
माझ्या पोरीला बोलायला शिकवेन.
प्रा. संध्या रंगारी
ना. वा. महाविद्यालय, आखाडा बाळापूर, ता. कळमनूरी, जि. हिंगोली

आठवणी
आता तिने आठवणींची
निवड करण्याचे ठरविले
बालपणीच्या आठवणीत
ती जरा जास्तच रमली
तिला आठवले लहानपणी
विहिरीची खूप भीती वाटायची तिला
खोल खोल पाण्यात उतरणे
अगदी नको वाटायचं
विहिरीतील गूढ अंधाराची
स्वप्नही पडायची अधूनमधून...
तिने आता प्रेमाच्या आठवणींची
निवड करायचे ठरविले
पहिले प्रेम, दुसरे प्रेम, तिसरे प्रेम
अंतहीन प्रेमच प्रेम
पाण्याचा मोठ्ठा लोंढाच
अंगावर यावा असे तिला वाटले
तिने डोळे गच्च मिटून घेतले
अंधाराची तिला आता सवयच
झाली होती.
त्या अंधारात तिला आता
काही दिसू लागले होते
अनेक आकृत्या, त्यांचे कोरे चेहरे
आणि आपला भेसूर चेहरा
तिने डोळे उघडले
खिडकीतून बाहेर पाहिले
सूर्य खरंच उगवला होता.
नीलिमा पालवणकर
अॅकोलेड हौ.सोसा., ३ ए-७०१, हुजुरी दर्गा रोड,
जीवन चिंतामणी बिल्डिंग,
एल. आय. सी.शेजारी, ठाणे ४००६०४

उदामतवादी
कोण गं तो मळेवाला ?
त्याचं प्रेम वगैरे होतं का तुझ्यावर ?
अगदीच ध्यान... किती बावळा !
तसं माझ्या कानांवर होतं काही बाही...
पण खरं सांगू - लक्ष नको देऊस
कॉलेजातलं सगळं झूट असतं बाई
माझ्यावरही भाळल्या होत्या कितीजणी
साऱ्यांनाच दिली झाली हुलकावणी !
स्वत:वर बेहद्द खूष होत तो मोठ्यांदा हसला
तिच्या कमरेभोवती हात घालून म्हणाला
`हं, काय आबा कधी येताहेत ?
लेकीचा नवा संसार... काही द्यायला ?
तसं जॉइंर्ट अकाऊंट आहे ना गं ?
आयदर ऑर...
मी देखील गाडी बदलायची म्हणतो...'
तो बोलतच राहिला -
तिच्या डोळयांत गावाकडची माती
नदीकाठचा `त्याचा' मळा
अखेरची एक सांज -
तिच्या भविष्यासाठी त्यानं केलेली प्रार्थना
शांत नंदादीपाची मैत्रीची नजर
सगळं चित्र मालवतं...
नवऱ्यानं मालवलेल्या दिव्यामुळं
अंधार गडद होतो - अधिकच..
एका सर्पाचा विळखा,
आणि रोजचा विषाचा पेला,
आज अधिकच बधिर करून जातो.
मन्दा कदम
२३०५/६, डी-शुक्रवार, कलाप्रसाद,कोल्हापूर

एका क्रॅसेटच्या दोन बाजू
तुझ्या घनगर्द
सावळया पाठीचे रसरशीत
ताजे पान
अथांग उन्हाळे हिवाळे सोसून
आतल्या आत
करपत झिजत
चाललेय.
माझे उत्फुल्ल गाल
त्यावर टेकवित
हजारो चांदण्या रेखल्याचा
माझा छंद मात्र
अजूनही थकलेला नाही.
पण
आजच्या
ढासळत्या उत्तररात्री
मलाही कळलंय
उल्कापातांचे सत्य
आणि स्वप्नांच्या ठिबकत्या
गळतीने
तुडुंब भरलेले लोणार...
आणि
हरळीगत उगवणारे पुनर्जन्माचे
अपंग सत्य.
एकाच क्रॅसेटच्या दोन बाजू
आतल्या आत भिजणारी पाने
आणि पुनर्जन्माची अपंग स्वप्ने
डॉ. शैला लोहिया
मनस्विनी महिला प्रकल्प, पो.बॉ.नं.२३
अंबाजोगाई, जि.बीड.

बीजभूमी
शांततेच्या गायी
शिंगं मारूच पहाताहेत.
मनातलं ढोर
चरायचं थांबता थांबत नाही!
जमिनीत
सात्त्विकतेचं
बी
टोचून घेत प्रवास सुरू ठेवलाय!
सुपारीसारखा
जीव फुटत निघाला आहे.
आणि
अवघं अस्तित्वच धारदार
दोन पात्यांच्या अडकित्त्यात सापडलं आहे!
जिंदगी अशी
दातदाढांखाली चघळत बसणं
न परवडणारी
गोष्ट होऊन बसली !
केशव सखाराम देशमुख
सात्विक, २४ समर्थनगर, म्हाडा, मंठा रोड, जि.जालना
करायचे तर एवढेच
रंग विखुरताहेत क्षणात काहीच एकसंध नाही
बंद पापणीआड आता मळभातले चंद्र काही.
हातात भुळभुळणारी वाळू आणि दूर मंद दिवे
दचकून मागे सरावे तर लाट पुढे पुढे धावे
काळया पांढऱ्या अक्षरांची गर्दी तशी भरभरून माणसे
हुबेहुब स्वत:लाच पकडणारे जसे शोभिवंत आरसे
पारा पुसून घ्यावा मनाचा, व्हावे आरपार काच
करायचे तर एवढेच पण त्याला स्वत:चाच जाच
शरयू आसोलकर
वंदना, न्यू कॉलनी, माठेवाडा,
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग -४१६५१०.

ती
आगीतून निघावं अन् फुफाट्यात पडावं
असंच झालं तिचं...
कळत्या वयापासून ते आतापर्यंत
रक्त वाळवणारं काम करत आली
मी थांबवू शकलो नाही तिला अजूनही
घराच्या सावलीत कायमचं
किंवा
तिलाच वाटत नाही फरक
या सावलीत
अन् त्या उन्हात....
आताशा तिला ती एक काट्याचं झाड आहे
असंच वाटत राहातं
म्हणते, तुझ्या घरात काटे संाडायचे नाहीत मला
गावाकडे नेऊन सोड
मी राहीन माझ्या कमाईवर, हिमतीवर
अन् जीव जातोय असं वाटलं
की, बोलावून घेईन तुला
तेवढाच एक त्रास उचल शेवटचा
मग तुझा रस्ता फुलांचा.....!
वैभव देशमुख
द्वारा, किरण अकाते पाटील, सह्याद्री
प्लॉट नं. १०४६, साईनगर, सिडको,
एन.ई.औरंगाबाद

प्रवाह
प्रवाह थांबत चाललाय
वहात नाहीये
साकळंत चाललंय पाणी
आपल्या संबंधांचं
बघ! प्रवाह खरंच थंाबत चाललाय
हे मान्य कर, तू म्हणालीस.
आता हळूहळू एकाच जागी
साठत जाईल पाणी
मग त्यावर शेवाळं चढेल
मग किडे होतील आणि
मरून जाईल पाणी
आपल्या संबंधांचं, ज्याचा
कुणालाच उपयोग रहाणार नाही
ना तुला ना मला.....
तू आवेगानं बडबडत राहिलीस
वरून थांबल्यासारखेच वाटतात
संबंधांचे प्रवाह
ते वहात असतात निरंतर
अंतरंगातून
कोणत्याही अडथळयांशिवाय
तेवढे असतीलच
संबंध प्रामाणिक तर !
बघ, आत प्रवाहात घालून हात
तुला जाणवेल पाण्याची वहाती ओढ
पाहिल्यास तर दिसतील तुला
दोन्ही काठांवरच्या लाटांच्या ओल्या खुणा
मी दर संध्याकाळी
न चुकता बघत आलोय आणि
निर्धास्तपणे रात्रीला भिडत गेलोय
तुझ्याशिवायच्या.
मी सविस्तर मांडत राहिलो
हे सर्व, त्यावर तू
उसासून नाइलाजानं हासत राहिलीस
अरे, जे थांबलंय ते थांबलंय
मान्य कर ना! बघ डोळे उघडून
आणि जे जे थांबतं, ते ते संपतं..
सबब हे संपलंय मान्य कर
स्वत:चीच फसवणूक करून
जगण्याचे दिवस, संध्याकाळ
रात्र सरकवू नकोस
तू त्रासून म्हणालीस
मग मी फुटलो आतून आणि
प्रवाहासारखा अंतरंगातून खळाळलो
- जा तू जायचं असेल तर..
संपत असं काहीच नसतं
फक्त रूप बदलत राहातं
मी जपत राहीन प्रवाह
वहाता ठेवीन जीवनाच्या करारानं..

तू घाईघाईनं
निघून जाताना त्राग्यानं
माझं शेवटचं वाक्य
ऐकलंस की नाही
माहिती नाही.
प्रमोद कोपर्डे
१५५, गुरुवार पेठ, (बागेसमोर)
सातारा ४१५००२

पाऊस
कोणत्या आत्ममग्न प्रहरी
पाऊस सुरू झालाय
कोणास ठाऊक?

सर्जनशीलतेचा हा रंगोत्सव
ओंजळभर फुलांनी
भूमीवर सादर वाहिला !

आभाळभर मेघांनी एकसुरात
इंद्रधनुषी रंगांच्या
मंगलमय सुरावटी गाईल्या !

अन् वेड्या दु:खमग्न
डोळाभरल्या आठवणीसह
तो कोसळतच राहिला...

पदरात बांधून ठेवता
येत नाही ग त्याला
सई, हे तुला कोण संागणार?

बिलोरी काचेवर जमलेली
ही चिरप्रतीक्षेची आर्त धूळ
तू हलकेच पूस नं, सई !

मग बघ, हे सोशिक आभाळ
कसं गच्च गच्च भरलंय
तुझ्या दोन्ही डोळयांतून !
डॉ. मीरा रामनवमीवाले
श्रीराम मंदिर (किल्ला), करमाळा, सोलापूर

सुई अन् दोरा
सुई अन् दोरा लगे
माझ्या हातात देऊन
आई म्हणाली,
``हे असू दे तुझ्याजवळ
मी शिवलेलं
कधी कुठं
फाटलं तुटलं तर
येईल तुझ््या कामाला''

पुढच्या प्रवासात
नेहमीच फाटलो
नेहमीच तुटलो
मला मी
नेहमीच तुणलं
नेहमीच विणलं

सुई कधी गंजली नाही
दोरा कधी संपला नाही

जाताना मीही
देईन आता
अगदी न चुकता
माझ्या पोराच्या हातात
हीच सुई अन् हाच दोरा

पुढं कधी कधी
त्याच्याही नक्कीच
येईल कामाला
उत्तम लोकरे
द्वारा गणेश किराणा, सहकारी दवाखाना रोड,
जुन्या कन्याशाळेसमोर,
उस्मानाबाद ४१३५०

भय
रक्ताच्या नात्याच्या
अशा धांदोट्या
का होतात?
एकमेकांपर्यंत पोचायला
कोणते डोंगर
आडवे येतात?
समोर मावळतीचा सूर्य
तरी
भूतकाळातल्या जखमा,
अधिकच चिरत
कां जातात?
भय बदलाचे असते
की,
बदलायला आपणच
भीत असतो?
वन्दना कुलकर्णी,
११ चैत्र, पहिला क्रॉस, चिंदंबरनगर, बेळगाव ५९००४६
माणूस आणि दगड
या देशात माणसापेक्षा
दगड बरे वाटतात...
निदान रस्त्याच्या
काळजात तरी बसतात..
माणसानं सदैव ऋणी असावं
दगडाचं, धोंड्यांचं अन् खड्यांचंही
कारण माणसं खडा टाकून पाहतात..
दगड मारून पाहतात..
पायावर धोंडा पाडून घेतात...
दंगल उसळली की..
दगड किती उपयोगाचे !
माणुसकीचं डोकं फोडण्यासाठी
म्हणे दगडालाही पाझर फुटतो..
माणूस दगड होतो तेव्हा... !
इथली माणसं तशी सर्जनशील आहेत...
दगडाला देव बनवतात..
अन् माणसाला दगड
दगड अन् माणसाचं... नातंही अतूट
माणूस उचलला की दगड सापडतो
अन् दगड उचलला की माणूस !
अन् दगड उचलला की माणूस !
डॉ. शोभा रोकडे
सोनल कॉलनी, शेगांव रोड, अमरावती -४

ी चिमणीसारखी म्हणून
घरादाराने चिमणी म्हणून संबोधले
म्हणूनच
मी चिमण्यांची झाले
पण परवा
मुलाने चिमणीला पकडून
बांधला तिच्या पायी दोरा, आणले ओढीत-ताणीत
ती तडफडली, आक्रोश, आकांताने
मी सोड म्हणताच
तू म्हणालास, खेळू दे, मुलं आहेत.
मी पटकन् म्हणाले,
नाही, चिमण्यांना अशी ओढत आणणारी
मनोवृत्ती मी मोडीत काढीन.
तर तू हसून म्हणालास; चिमणे,
आता तू पहिल्यासारखी
चिमणी वाटत नाहीस !
संजीवनी तडेगावकर
४, ज्ञानेश्वरी, शिवनगर, जालना ४३१२१३.

the north face denali jacket

And when the locations are after all have been a drop the north face denali jacket all the gods have become abnormal expression of surprise