Skip to main content

सुरुवातीसुरुवातीला इतर वाचकांप्रमाणे मलाही गौरी तिच्या लेखनाआडूनच काय ती दिसत राहिली. एका विद्वान, सामाजिक बांधिलकी असोशीनं मानणाऱ्या कुटुंबात जन्मलेली आणि लखलखत्या, तेजस्वी प्रतिभेचं देणं लाभलेली बुद्धिमान मुलगी अशी ती गौरीची प्रतिमा होती.
हळूहळू श्री. पु. भागवतांच्या शेजारामुळे गौरीशी प्रत्यक्ष गाठ पिचत कधी पडत गेली. निरनिराळया देशांतील तिच्या वास्तव्यातून श्रीपुंना ती जी पत्रं पाठवी, किंवा कधीमधी टेलिफोनवर त्यांचं जे बोलणं होई किंवा प्रत्यक्ष भेटीत ती ज्या गप्पा त्यांच्याशी करत असे. त्याविषयी श्रीपु अत्यंत कौतुकानं आमच्यापाशी भरभरून बोलत. त्यात व्यक्तिगत तपशील विशेष नसायचे, पण गौरीचं व्यक्तिमत्त्व मात्र त्यातून स्पष्टपणे दिसत राहायचं. अशा साऱ्यांतून वेळोवेळी माझ्या मनात उमटणारं गौरीचं रुपडं अगदी लोभसवाणं होतं. तिचं ते धबधब्यासारखं खळाळून हसणं, भराभरा बोलणं, श्रीपुंचा शब्द न् शब्द आतुरतेनं कानात साठवणं आणि त्यातून खुलणं हे सारं पोरवयातल्या अवखळ मुलीला साजेसं असायचं. गौरी आली, की श्रींपुंचं घर आनंदानं भरून जायचं. कालांतरानं मी माझ्या बदललेल्या चष्म्यातून जेव्हा गौरीकडे पाहू लागले, तेव्हा मात्र त्याच गौरीच्या प्रतिमेतून वारंवार एक आक्रोशणारी बालिकाच काय ती तेवढी मला दिसत राहिली.
त्या गौरीविषयी लिहिण्यापूर्वी माझ्या या बदललेल्या चष्म्याविषयी आधी थोडं सांगायला हवं. मी एक डॉक्टर आहे. अनेक वर्षं विनापत्यता या एकाच प्रश्नाशी मी माझा स्त्रीरोगतज्ज्ञाचा व्यवसाय निगडित ठेवल्यानं स्त्रियांचे अनेक वैयक्तिक आणि सामाजिक प्रश्न मला फार जवळून पाहता आणि हाताळता आले. पुढे आयुष्याच्या पन्नाशीच्या टप्प्यावर हा उत्तम चालणारा व्यवसाय बंद करून केवळ आनंदाची एक नवी वाट चोखाळावी म्हणून मी रूळ बदलले. बालसंगोपनाच्या क्षेत्रात सजग, प्रभावी पालकत्वासंबंधित काम मी करू लागले आणि बघता, बघता त्यात अगदी रमूनही गेले. पालकांनी केलेल्या संगोपनाचा मुलांच्या जडणघडणीवर होणारा परिणाम हा माझा अभ्यासाचा विषय बनला. त्या विषयावरचं वैद्यकीय शास्त्रातलं माझं वाचन वाढलं. आणि वर्षभर सुरू असलेल्या मुलं आणि त्यांच्या पालकांच्या सामायिक शिबिरातून माझा त्या विषयाचा प्रत्यक्ष अभ्यासही वाढला. या वाटचालीत मुलांप्रमाणेच प्रौढांकडे पाहण्याचीही माझी दृष्टी नकळतच बदलली. मला भेटणाऱ्या व्यक्तींच्या गुणदोषांकडे पाहताना अनेकांगांनी त्या दोषांना कारणीभूत असलेलं, त्यांना लाभलेलं संगोपन मला जाणवू लागलं. आता तर सदासर्वदा जणू तोच एक चष्मा घालून मी वावरत असते. या नव्या चष्म्यातून आज मला दिसणारी गौरी ही अशी आहे.
जन्मत:च मी कोण ? हा प्रश्न प्रत्येकाला पडतो, तसाच तो गौरीलाही पडलेला असणार. त्यासाठी ती कशी आहे, ते ती इतरांप्रमाणे जोखत गेली असणार. आसपासच्या व्यक्तींच्या वर्तनांतून वेळोवेळी व्यक्त होत गेलेल्या आपल्या प्रतिमेतून मूल स्वत:ची ओळख पटवून घ्यायचा प्रयत्न करत असतं. नकळत स्वत:बाबत ते अनेक ठोकताळे बांधत असतं. ज्या मुलाला मी चांगला आहे, गुणी आहे, मी सर्वांना खूप आवडतो, हवाहवासा वाटतो असं इतरांच्या त्याच्याशी होणाऱ्या वर्तनातून जाणवत राहातं, ते मूल सुरक्षिततेच्या जाणिवेच्या उबदार पांघरूणात वाढू लागतं. असं प्रेम वाट्याला न आलेलं मूल अनेकदा स्वत:ला अकारण कमी लेखू लागतं. दोषी, अपुरं मानू लागतं. मुलाच्या आत्मशोधाच्या या प्रेरणेसोबतच अवतीभवतीच्या जगाबाबत एक अनिवार कुतूहल
याच्या ठायी उपजत असतं. ते शमवण्याच्या प्रयत्नात ते मूल नाना उचापती करत राहातं. अपुऱ्या आवाक्यामुळे कधी ते अकारण धोके पत्करतं, जखमी होत राहातं, तर कधी ते इतरांना जाच होईलसं वागतं, असं मानसशास्त्र सांगतं. मूल जेवढं जास्त बुद्धिवान, प्रतिभावान तेवढी त्याची आत्मशोधाची ऊर्मीही प्रबळ असते, आणि तशीच त्याची प्रेमाची भूकही अफाट आणि अनेकांगी असते, असं माझा अनुभव सांगतो. अशावेळी मुलाच्या खटाटोपाला, त्याच्या मनोभूमिकेला आणि त्यातून उद्भवणाऱ्या व्यथेला समजून घेत त्याच्याकडे प्रेमळ, क्षमाशील, आपुलकीच्या नजरेनं पाहू शकणारं पालकत्व जर त्याच्या घरातील वडीलधाऱ्यांनी सांभाळलं, तर ते मूल अवतीभवतीच्या जगाबाबत अपार विश्वास तर बाळगू लागतंच, पण त्याचा ठायीचा आत्मविश्वासही वाढीस लागतो. मूल त्याच्या या वयात वडीलधाऱ्यांना आदर्श मानून त्यांच्या गुणांप्रमाणेच त्यांचे दोषही नकळत अंगीकारत असतं. प्रेमळ, क्षमाशील पालकत्व लाभलेलं मूल प्रेमळ, कणखर, धैर्यवान बनतं. जीवनातील आव्हानांना थेट भिडण्याचं बळ त्याच्यात येतं. मुलाच्या जडणघडणीवर त्याला लाभलेल्या संगोपनाचा असा थेट परिणाम होत असला, तरीही तेच एकमेव कारण मात्र नसतं. त्या त्या मुलाच्या गुणसूत्रांनुसारही त्याच्या प्रवृत्ती ठरत जातात. म्हणूनच एकाच आईबाबांनी वाढवलेली मुलं वेगवेगळी निपजतात.
गौरीला उच्चशिक्षित, विद्वान, सजगतेनं जगाकडे पाहाणारे पालक लाभले होते. इरावतीबाइंर्ना तर चूलमूल करण्यातच रमलेल्या स्त्रियांच्या त्या काळात स्वत:च्या संसारापलीकडला बाह्य जगतातला संसार, त्यातल्या विवंचना याबाबतची कृतिशील बांधिलकी जाणवत होती. त्यांच्या पतीनं त्यांच्या प्रगतीला प्रोत्साहन देताना घरातील दैनंदिन कामातही सक्रिय हातभार लावला होता. ईरावतीबाइंर्मधल्या स्नेहशील, गृहकृत्यदक्ष गृहिणीबद्दल श्रीपुही अनेकदा कौतुकानं बोलत. मला त्यांची प्रतिमा कायम एका सौजन्यशील, सुशिक्षित, सुसंस्कृत अशा स्त्रीचीच दिसत राहिली. पण पुढे गौरीच्या लेखनातून तिला एक प्रेमळ, क्षमाशील, मायेनं कुशीत घेणारी आई लाभली होती, असं मात्र मला कुठे प्रत्ययास आलं नाही. गौरीच्या वडिलांनी इरावतींच्या गैरहजेरीत लहानग्या गौरीची दैनंदिनी सुरळीत पार पाडली. त्या दोघांमधलं बापलेकीचं नातं प्रेमाचं होतं, असावं. पण गौरीची प्रेमाची गरज मोठी आणि अनेकांगी असल्यानं अशा प्रसंगी एकेरी पालकत्व निभावणारे तिचे वडील तिला पुरेसं प्रेम द्यायला कदाचित कमी पडले असतील.`धडपडणाऱ्या मुलांमधून' धीट, पराक्रमी व्यक्तिमत्त्वं घडवणारा पुरुष सानेगुरुजींप्रमाणे मातृहृदयी असला पाहिजे. सर्वसामान्य पुरुषांना ते कसं जमावं ? गौरीच्या लेखनातून तिला प्रेमळ ताई लाभली होती हे जाणवतं. पण कदाचित वयातील अंतरामुळे असेल, पण तिचं प्रेमही गौरीच्या गरजेला पुरलं नसावं.
इरावतीबाइंर्ची पिढी ही आपल्याकडल्या उच्चशिक्षण घेणाऱ्या स्त्रियांची पहिली पिढी. त्या पिढीतील शिकलेल्या स्त्रियांनी आईची क्षमाशील भूमिका पत्करण्यापेक्षा तत्कालीन बाबांप्रमाणे मुलांच्या कठोर दैनंदिन बाह्य आचरणातील शिस्तीलाच प्राधान्य दिलं. कदाचित घर आणि व्यवसाय ही दुहेरी जबाबदारी सांभाळताना त्यांना ते सोयीस्कर पडलं असावं. त्याहून महत्त्वाचं कारण मला वाटतं, की अशा कठोर शिस्तीच्या मुलांवर होणाऱ्या घातक परिणामांची त्यांना बिलकुल कल्पना नसावी. नाहीतर प्रपंचातली इतर नातीगोती आवर्जून सांभाळणाऱ्या या स्त्रियांनी मुलांना वाढवताना तशी दक्षता नक्कीच बाळगली असती. कधी, कधी असंही वाटतं, की प्रथमच बाहेरच्या जगाचं वारं अंगावर घेणाऱ्या स्त्रियांच्या या पिढीला मुलांवर श्यामच्या आईसारखं भाबडं प्रेम करणं कदाचित त्यांच्या सुशिक्षितपणाला न साजेसं वाटलं असेल. त्यांना ते मागासलेल्या बायकीपणाचं निदर्शक वाटलं असेल. त्यामुळे सुशिक्षित पालकांची गौरीच्या पिढीतील अनेक मुलं भावनिक क्षमतांतील शहाणपणात कमकुवत राहिल्याचं मला दिसतं. कठोर शिस्तीच्या घरात वाढणारं मूल मग स्वत:चं यशापयश प्रामुख्यानं बाहेरील जगाच्या मान्यामान्यतेवर जोखत राहातं. स्वत:ला कुठेतरी सलणारं पण सजग जाणिवेच्या अंतस्तरावर वावरणारं एक विचित्र पोरकेपण त्याच्यात येतं ते दैनंदिन संघर्षाला सामोरं जाताना अशा लेकराला नाना पळवाटा शोधायला प्रवृत्त करतं. तसंच कधी ते त्याला भरकटायलाही कारणीभूत होतं. अर्थातच यामागेही जनुकांमधली प्रबळ प्रवृत्ती कारण असतेच. प्रेमळ, क्षमाशील वातावरणात मुलांत जोपासलेली सुरक्षिततेची जाणीव मुलांना धीट, कणखर बनवून अशा प्रवृत्तींच्या प्रकटीकरणाला आळा घालत असावी.
गौरीच्या वाढत्या वयात तिच्या निकट सहवासात आलेला पुरुष म्हणजे तिचे बाबा. तिचं त्यांचं नातं प्रेमाचं होतं. तिला त्यांच्याबद्दल आदर वाटे. स्वत:च्या आईवडिलांमधलं पतिपत्नीचं नातंही गौरीला प्रगत आणि आदर्श वाटे. म्हणूनच बहुधा गौरीच्या लेखनाच्या सुरुवातीच्या काळात प्रेमाचा शोध ती स्त्रीपुरुष (नरमादी) संबंधातून घेत राहिली असावी. ती सदैव तिच्या आईवडिलांकडे ज्या आदराने पाहात आली, तो आदर लहानग्या अवखळ, व्रात्य गौरीच्या पालकांची भूमिका पार पाडताना त्या दोघांनी तिच्याबाबत दाखवला असेल का ?
गौरीचं लिखाण वाचताना आज मला गौरीबाबतच अनेक प्रश्न सतावतात. इतकी विविध, वाचकांना अचंबित करून टाकतील अशी स्त्री, पुरुष पात्रं निर्माण करून, त्यांच्या नात्यातल्या अनेक शक्यतांचे पदर उलगडून दाखवणाऱ्या गौरीला ते नातं अखेर बंधनालाच कारण होतं, असं का वाटत राहिलं ? मला ते नीटसं उमगत नाही, पण त्याचं कारण मुख्यत: तिच्या बालपणातच दडलेलं असावं असं वाटतं. बुद्धिवान मुलांपेक्षाही प्रतिभावान मुलांची प्रेमाची गरज अधिक अनेकांगी असावी. वयाच्या मानानं अधिक वाढ झालेल्या या मुलांची संवेदनक्षमता तर जास्तच असते, पण त्यांच्यातील असुरक्षिततेची जाणीवही झटकन उमटत राहात असावी. पालकांच्या ते ध्यानात येणं कठीण असणार. प्रेमाच्या भुकेलेपणाची ती जाणीव मग या मुलांना प्रेम विफल वाटायला लावत असावी. अशा मुलांना प्रेम सुफल, संपूर्ण वाटण्यासाठी बालवयात त्यांना त्यांच्या पालकांकडून प्रेमाच्या विविध पैलूंचा आणि त्यातील विविध पदरांचा सकस अनुभव मिळायला हवा, असं फार वाटतं.
असा अनुभव मुलांना मिळाला, की दोन महत्त्वाच्या गोष्टी घडतात. पहिली गोष्ट म्हणजे अशी मुलं दुसऱ्याला हवंसं वाटेल आणि पुरेसंही वाटेल असं प्रेम इतरांवर सहज करू शकतात. आणि दुसरी त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी मुलं त्यांच्यावर इतरांनी नाना तऱ्हांनी व्यक्त केलेलं प्रेम ओळखून ते आदरपूर्वक स्वीकारूही शकतात. वेळप्रसंगी कधी एकाकी पडली, तर अशी मुलं चराचरातून प्रेम घेत स्थिरचित्त राहू शकतात. भरपूर प्रेम वाट्याला येऊनही ते न उमगणारी किंवा ते घ्यायला असमर्थ ठरलेली मुलं प्रेमासाठी सदैव आसुसलेली असतात. गौरीसारखी व्यक्ती तर त्यासाठी तडफडू लागते. तिला ती तडफड जाणवते, पण त्यामागचा कार्यकारणभाव समजून घ्यायला ती अपुरी पडते. कारण प्रेमातून तृप्त होण्याचा अनुभव पुस्तकांतून नाही घेता येत. त्याची ओळख बाळपणीच स्वानुभवातून व्हावी लागते.
गौरीच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग तिच्या बुद्धीमुळे, व्यासंगामुळे छान वाढला. प्रतिभेमुळे तो फोफावलाही. पण तिच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग मात्र बालीश राहिला. बालीश म्हणजे पोरकट नव्हे. या बालीशपणामुळे तिच्या आप्तांवर ती प्रेमवर्षाव करायची, पण तो तिच्या अटींनुसार. दूरच्या नात्यात ते तिला सोपं पडलं. पण निकटच्या नातेसंबंधात तिच्या बालीश आत्मकेंद्रित अपेक्षांमुळे खूप ताणतणाव येत राहिले असणार. तिचा अकारण, अनाठायी भ्रमनिरास झाला असणार. त्याबाबत तिच्या आप्तांनी तिला दोष दिला नाही, त्यांनी तसंच तिला स्वीकारलं याचं कारण तिचं ते सहज सुंदर बालीश भाबडेपण. तिच्या सहवासात आलेल्या प्रत्येकालाच हे तिचं भाबडेपण भावत गेलं. पण तिला मात्र ते वारंवार दु:खाला कारण ठरलं असणार.
प्रौढपणी लेखन करू लागल्यावर स्वनिर्मित पात्रांकडे पाहता पाहता गौरीनं स्वत:कडेही वारंवार पाहिलंच असणार; पण तेही बालीश नजरेचंच पाहाणं असणार. कदाचित बालसुलभ आप्पलपोटेपणामुळेच लेखनात स्वनिर्मित पात्रांपासून जे अलिप्त होणं आवश्यक असतं, ते तिला जमलं नसावं. गौरीच्या असामान्य बुद्धिमत्तेनं आणि प्रतिभाशक्तीनं स्वत:च्या कोंडमाऱ्याचा निचरा करण्यासाठीच कदाचित तिला लेखनाला प्रवृत्त केलं असेल. म्हणूनच तिच्या लेखनात बुद्धीची नेत्रदीपक चमक दिसते. पण जीवनाच्या फापटपसाऱ्यात सुखाच्या किंवा दु:खाच्या मुळाशी जाऊन भिडायला, त्याच्याशी सामना करायला जे बळ आणि धैर्य लागतं. ते त्यातून अलिप्त झाल्याशिवाय कसं मिळणार ? परिणामी तिच्या लेखनातून त्या, त्या टप्प्यावरच्या तिच्या व्यक्तिगत आयुष्यातल्या कथा आणि व्यथा उमटत राहिल्या. एका अर्थी ते बरंच झालं म्हणायचं. त्यानिमित्तानं थोडाफार निचरा झाल्यावर तिला मोकळं, मोकळं वाटलं असणार. निदान काही काळ तरी. योग्य वाट निवडण्यावर तर माणसाचं निम्मंअधिक कृतार्थपण अवलंबून असतं. गौरीनं वाट तरी योग्यच निवडली. मग गणित चुकलं कुठे ? त्याचं उत्तर ज्ञानेश्वर अगदी चपखल देतात. ते म्हणतात, `एखाद्याला जरी कामधेनू दैवयोगे गवसली, तरी तिचं दूध त्याला काढता आलं पाहिजे. ती हातोटी त्यानं आत्मसात केलेली असली, तरच त्याला कामधेनू हवं ते देईल. हातोटी नसलेल्या माणसाला ते निदैवी म्हणतात. सुदैव म्हणजे निव्वळ नशिबानं वाट्याला आलेल्या चांगल्या गोष्टी. दुर्दैव म्हणजे नशिबानं वाट्याला आलेल्या दु:खद गोष्टी. मग निदैव म्हणजे काय ? तर वाट्याला आलं, पण उपभोगता न आलं ते.
गौरीवर तिच्या आप्तांनी, मित्रमैत्रिणींनी, वाचकांनी, सर्वांनीच भरभरून प्रेम केलं. पण ती निदैवी ठरली.
सुरुवातीला मला दिसलेल्या, खळाळून हसणाऱ्या गौरीत आता मी पुन्हा वाचलेल्या तिच्या लेखनातून, तिच्या लेखनाच्या समीक्षेतून आणि तिच्यावर काढलेल्या विशेषांकातून, तिच्यावरील पुस्तकांतून दिसते ती अशी एक विद्ध आक्रोशणारी बालिका - जी ना पुरती मूल, ना पुरती प्रौढा.
अशा या गौरीच्या आयुष्यात, फार उशिरा का होईना, पण तिला खूप आवडतीलशी, ती जशी होती तशीच्या तशी, तिला स्वीकारणारी तीन माणसं आली. व्यक्ती नाही म्हणत मी. खरीखुरी `माणसं' आली. ती म्हणजे तिचे पती सुरींदर, तिची मैत्रीण अंबिकाबाई सरकार आणि श्री. पु. भागवत. त्यापैकी सुरींदरना मी प्रत्यक्ष पाहिलेलं नाही. पण वाचनातून ते जे मला दिसत राहिले, किंवा श्रीपुंच्या बोलण्यातून जो काही संदर्भ येत राहिला, त्यातून त्यांनी एक वत्सल प्रेमाचा वर्षाव गौरीवर केला असावा; असं वाटतं. अंबिकाबाई आणि श्रीपु तर काय ? प्रशांत महासागरच. आणि तेही गोड्या पाण्याचे. त्यांनी या चातकाची तहान भागवायचा प्रयत्न केलाच. पण परदेशात भारतीय संगीताची जवळीकही सोसू न शकणारी, त्यानं गलबलणारी आपली भाबडी गौरी या तिघांचा प्रेमळ सहवासही फार काळ सोसू शकली नसावी. पुन्हा पुन्हा उठून ती एकटीच विंचुर्णीला जात राहिली. खरं तर या तिघांपैकी कुणा एकाच्याही मायेची ऊब तिला पुरली असती. पण त्या टप्प्यावर सारं काही झुगारून देऊन ती ऊब घेत विसर्जित होण्याइतपत धैर्य आणि धीर तिच्यापाशी उरलेला नसावा.
साऱ्यालाच कसा फार फार उशीर झालेला !
डॉ. लता काटदरे
फ्लॅट नं. ४, मेरी लँड कॉर्नर,
सायन (इ), मुंबई ४०००२२