Skip to main content

मी नेपाळमधल्या पोखराचा. सहा वर्षाचा असताना आई गेली. आईचा चेहरा आठवतही नाही. १२:१३ व्या वर्षी कामाला म्हणून मुुंबईला आलो. अमोल पालेकरांकडे माझे चाचा रामबहादूर कामाला होते. त्यांच्या ओळखीनं मला प्रियाताईनं घरी आणलं. या घरात आलो तेव्हा मी १४ वर्षांचा होतो. आज माझा बडा बेटा १५ वर्षांचा आहे.
मी आलो तेव्हा प्रियाताईने करण राजदानबरोबर शादी केलेली होती. तनुताइंर्ची भी शादी झालेली होती. झुमकी १ वर्षांची होती. राजादादा, सीमाभाभी, आई, बाबा आणि बंटी आम्ही राहात होतो. बंटी सात वर्षांचा होता आणि सचिनदादापण रहायचे. सचिनदादा म्हणजे राजादादाच्या मावशीचा मुलगा. घरात मासे होते, कोेंबड्या पाळलेल्या होत्या. कासव होतं, पक्षी होते, लव्ह बर्ड होते, पोपट होते, टर्की होते, दोन कुत्री होती. थोडे दिवस एक माकडही होतं. गॅलरीला जाळी बसवून तिथे पक्षी, कोंबड्यांसाठी जागा केलेली होती.
राजादादाला प्राण्यांची फार आवड होती. मी त्या सगळया पक्ष्यांकडे बघायचो, माशांना खायला द्यायचो, कुत्र्यांना फिरवायला न्यायचो, बंटीबरोबर खेळायचो. त्याला शाळेत सोडायला-आणायला जायचो.
आई घरातली सगळी कामं करायची. म्हणजे केरपोछा, कपडे-भांडीला नोकर होते. मी पण नोकरच, पण मला घरातल्या कुणीच कधी नोकर मानलं नाही.
आई, बाबा, प्रियाताई, तनुताई, राजादादा, सचिनदादा, सीमाभाभी असंच बोलवायचो. प्रियाताई असेपर्यंत १२ वर्षं तिनं मला राखी बांधली. मी तिला भाऊबीज द्यायचो. `साहेब' मी कधी कुणाला म्हटलं नाही.
आलो तेव्हापासून आजपर्यंत हे `माझं घर' असंच वाटलं. माझ्या आईचा चेहरा आठवतबी नाही. `आई' म्हणजे डोळयापुढे राजादादाची आईच येते.
मला शिकवलं कुणीच नाही. आईबरोबर काम करता करताच शिकलो. वरण-आमटी, चिकन-मटण-मासे सगळं. बाबांना आईच्या हातचाच स्वयंपाक आवडायचा. आईनंं काहीही केलं तरी बाबांना आवडायचं. बाबांचं असं काही नसायचं की हे जेवण बनव, ते बनव असं. जे करेल ते खायचे.
आमच्याकडे जेवणाची ठरलेली अशी एक वेळ नसायची. कुणीही केव्हाही जेवायचं. बाबा २/३/४ कधीही जेवायचे, पण आम्हाला म्हणायचे, `तुम्ही जेवून घ्या.'
मला बहादूर कधी नाही म्हणणार. कधी सोन्या, कधी बेटा... हे करतोस काय रे चंद्रा ? असं म्हणणार. माझं नाव चंद्रबहादूर. `हे कर' असं म्हणणार नाहीत.
बाबा त्यांच्या कुठल्याच गोष्टी दुसऱ्याला करायला सांगायचे नाहीत.
बाहेरून आले तरी आपली आपली वस्तू जागेवर ठेवणार. मी फक्त धुतलेले कपडे, इस्त्री करून द्यायचो. आधी त्यांचे कपडे आई आणायची, मग प्रियाताई. नंतर कधी विद्याताई आणायची. कुणी कुणी त्यांना गिफ्ट द्यायचे. पण त्यांना शौक नव्हता. लोकांना वाटायचं ते छान रहातात, पण तसं नव्हतं. कुठलेही कपडे घालायचे. मी म्हणायचो, `बाबा, एवढे नवे कपडे आहेत. जुने कशाला घालता ?' तर म्हणायचे, `अरे, मी म्हातारा माणूस. कशाला हवे नवे कपडे? हे असू दे. मऊ आहेत.'
बाबांनी मला कधीच चपला उचलू दिल्या नाहीत की गादी घालू दिली नाही. बिछाना पण आपला आपणच घालायचे. मी त्यांच्या घरातलाच असल्यासारखा रहायचो. आईबरोबर काम करायचो. राजादादा, प्रियाताई म्हणाली तर बँकेत जायचो, पण मला लिहिता वाचता यायचं नाही. बाबांनी, प्रियाताईने ड्नयव्हिंग शिकवलं. बाबा म्हणायचे तू एवढा हुशार आहेस, शिकलास तर मोठा होशील, पण जाऊ दे.
बाबा आजारी पडल्यावर मी सगळी औषधं माहीत करून घेतली होती. वाचता यायचं नाही, पण बरोबर ध्यानात ठेवून त्या त्या वेळेला ते ते औषध मी द्यायचो. विद्याताई ते काय तो शब्द म्हणायच्या, `पिक्चर मेमरी'.
आधी मी आलो तेव्हा घर कसं भरलेलं होतं. सारखं कुणीतरी यायचं. तेव्हा मला बाबा एवढे बडे आदमी आहेत, हे ठाऊक नव्हतं. येणारे लोक बी मोठे आहेत, ते बी मालूम नव्हतं. मग हळूहळू ध्यानात येऊ लागलं. अमोल पालेकर यायचे, राजू परूळेकर सारखाच यायचा. दिवसात एकदा तरी यायचाच. जेवायचा... गोविंद निहलानी यायचे. अमरिश पुरी, ओम पुरी, सत्यदेव दुबे, सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष कोण कोण येऊन जायचं. राज ठाकरे येऊन गेलाय. त्याला पण जेवण घातलंय मी.
कोणी आलं, मी चहा घेऊन आलो की बाबा ओळख करून द्यायचे, `हा आमचा बहादूर... माझ्या मुलासारखाच आहे.' मी जेवण शिकलो आईकडून. त्यामुळे माझं जेवणही बाबांना खूप आवडायचं. सगळयांना सांगायचे, `बहादूर मासे छान करतो, ते छान करतो.' राजू परूळेकरला पण माझं बनवलेलं जेवण आवडतं.
बाबांना केवढी बक्षिसं मिळायची. पण ती कधीच उचलून आणली नाहीत. ते फक्त फुलं घेऊन यायचे. फुलं फार आवडायची त्यांना. बक्षिसं कुणीतरी आणून ठेवायचे. बक्षीस मिळालं म्हणून त्यांना फार खुशी झालीये असं नसायचं. त्याचं त्यांना काहीच वाटायचं नाही. कुणी नावं ठेवली तरी काही वाटायचं नाही. शिवसेनेनं त्यांना धमक्या दिल्या. आमच्या गल्लीशी त्यांना नावं ठेवणाऱ्या पाट्या लिहिल्या, तरी बाबा नेहमीसारखेच, पोलीस प्रोटेक्शन दिलं, तर बाबा म्हणे, माझ्या घरी नको पोलीस वगैरे. त्यांना मला मारायचंच असेल तर कुठूनही गोळया झाडतील. प्रियाताई घाबरायची. एकटे बाहेर जाऊ नका म्हणायची, पण बाबा सगळीकडे जायचे. शांत असायचे.
आईला फार वर्ष पायाचा त्रास होता. पण बाकी तब्येत झकास होती. दहाएक वर्षांपूर्वी आधी तिला काहीतरी हार्टचा प्रॉब्लेम झाला. नंतर तर तब्येत पारच बिघडली. बिछान्याला खिळली. औषधं घ्यायला त्रास द्यायची. पण छान हसून खेळून होती. बाबांशी, तनुताइंर्शी बोलायची. राजादादा आणि ती एकाच वेळेला आय.सी.यू.त होते. राजादादा गेला तर तिला सांगितलं बी नाही, कारण तसं सांगितलं तर तिला पण धोका होईल म्हणून. ती सारखं विचारायची, राजा कुठंय, तो काही नाही भेटायला आला ? बाबा सांगायचे, तो शूटिंगला गेलाय. मला पण तसंच बोलायला सांगितलं होतं. शेवटपर्यंत राजादादा गेला तिला सांगितलंच नाही.
राजादादा लै चांगला क्रॅमेरामन. कमी बोलायचा. आधी तो गेला, मग प्रियाताई. प्रियाताईला क्रॅन्सर झाला तरी कामं करायची. कुणाला सांगू नका म्हणायची. एवढ्या लवकर जाईल, असं वाटलं नव्हतं. मी नेमका माझे वडील गेले म्हणून नेपाळला गेलो होतो, तवाच ती इकडं गेली. बरं झालं, मी तिला तसं पाहू शकलो नसतो. माझी ताई होती ती. आता जेव्हा पण तिचा सिनेमा लागतो. टी.व्ही.वर मी बघत नाही. बाबा गेल्यावर पण मी नाही पाहिला टी.व्ही. कवाच नाही. एक बी बातमी नाही पाहिली.
मी इथे आलो तवा माझ्या चाचानं प्रियाताईशी चारशे रु. पगार ठरवला. आता चार हजार केला. मी एकदा पण पगार मागितला नाही, की वाढव म्हणालो नाही. प्रियाताई होती तोवर पैशाचं समदं तीच बघायची, मग बाबा. आपणहून पैसे द्यायचे. माझं लग्न झाल्यावर, मुलं झाल्यावर पगार वाढवत नेला. लग्न झाल्यावर आईनं बायकोसाठी साडी, पैसे दिले. बेटा दोन वर्षाचा झाल्यावर बायको दाखवायला आण म्हणाली म्हणून घेऊन आलो. दर साल एकदा दोन महिने मी नेपाळला जातो. जानेवारीत बाबांच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी. प्रत्येक वेळा जाताना बाबा म्हणणार, `ये, वाट पाहातोय.'
गेल्या साली पण गेलेलो. बाबांना बरं नव्हतं. मला मधेच म्हणायचे, `तुला दुसरं काम मिळालं तर बघ. तुला पैशाची गरज आहे. मी म्हातारा तुला किती देऊ शकणार ?' पण पुन्हा फोनवर म्हणणार, `ये परत. आठवण येतेय. तू आलास तरच मी मंुुबईला येणार. मी शब्दच दिला होता, तुम्ही आहात तोवर तुम्हाला सोडून मी कुठंच जायचा नाही.'
प्रियाताई गेली, आई गेली. आईनं लई तरास काढला. २ नर्स, २ बाया असायच्या. कधी एखादी आली नाही तर मी समदं करायचो. आईच होती माझी. प्रियाताई गेल्यानंतर पार्ल्याचं घर सोडून आम्ही अंधेरीला आलो. हे घर बाबांना आवडायचं. इथून आकाश दिसतं म्हणायचे. खिडकीसमोर आरामखुर्चीत बसायचे. औषधांमुळे सारखी झोप यायची. तेव्हापासून बँकेची , पैशाची समदीच कामं मी करायला लागलो. रोख पैसे पण सांभाळायचो. कुणाचा करार आहे, कोण पैसे देतंय, कोण बुडवतंय, सगळं मला ठाऊक असायचं. मी बाबाला आठवण द्यायचा, बाबा रॉयल्टी आली नाही. बाबा म्हणायचे, `जाऊ दे रे चंद्रा.' त्यांना काहीच वाटायचं नाही. मला मात्र अशा माणसांचा राग यायचा. स्वत: मोठ्या मोटारीत फिरतात आणि आमच्या बाबांना बुडवतात.
त्यांना कायच वाटत नाही, त्याचा पण राग यायचा. `असू दे रे, जाऊ दे रे.' काय म्हणून ? कोणी एखादी गोष्ट घेऊन जायचा, परत द्यायचा नाय. मी म्हटलं की म्हणणार, `आपण दुसरी आणू.'
कुत्र्यांवर त्यांचा फार जीव. आमचा पहिला कुत्रा टायसन गेला, तेव्हापण डोळयात पाणी आलं त्यांच्या आणि लोक म्हणतात, मुलं गेली तरी तेंडुलकर शांत होते. अरे, लेकरं गेल्यावर कोणत्या बापाला दु:ख होणार नाही ?
दु:ख बी दायवायचे नाहीत, आनंद बी नाही. मी घरी आलो त्याच वर्षी दिवाळीची गोष्ट. बंटी लहान होता. गच्चीत फटाक्याची दारू एका खोक्यात ठेवलेली. बंटीनं काय तरी अगरबत्तीचं केलं. एकदम दारू उडाली. बंटीला तिथून उचललं, पण त्या दारूनं मी भाजला. मला तुरंत प्रियाताईनं नानावटीला पोचवलं. १९ दिवस मी अस्पतालमंदी होतो. रोज घरातले सगळे मला भेटायला यायचे. ताई मला आवडतं ते खायला पाठवायची. दिवसभर मला कंटाळा येऊ नाही म्हणून प्रियाताईनं टीव्ही, व्हीसीआर आणून ठेवला. एक माणूस बी ठेवला होता. माझा चेहरा जळला होता. प्रियाताई बोलली, `तुझा चेहरा ठीक करायला तुला अमेरिकेला पण घेऊन जाईन.' खूप धावपळ केली सगळयांनी. मी बरा झालो. तेव्हापासून मी या घरातलाच झालो. नीलिमाताई म्हणायची हा बहादूर तेंडुलकरच आहे म्हणून.
बाबा आजारी झाले तेव्हा आधी मी घरीच होतो. विद्याताई दवाखान्यात असायच्या. अशोककाका सगळंच बघायचे.
बाबांना तेव्हा बोलता यायचं नाही. मला रोज एसएमएस करायचे. बोलता यायला लागल्यावर फोन करायचे. मग त्यांना मुंबईला आणले. तनुताईकडे मी पण गेलो. थोडे दिवसांनी घरी आले बाबा. खूप औषधं होती. मी द्यायचो. पण मग त्यांना फार कंटाळा यायला लागला. औषध नको, खायला नको म्हणायचे. विद्याताइंर्ना वाटायचं, नको रे जबरदस्ती करू. पण मी जबरदस्तीनं त्यांना द्यायचा. कधी कधी एकदम रागवायचे, आधी कधी रागावले नाहीत. कधीतरी रागवले तर नंतर येऊन म्हणणार, `सोन्या, तुझ्यावर नाही रे, त्या तमक्यावर रागावलो होतो.' एवढा मोठा माणूस माझी माफी मागणार. ते याद होतं. मग ते आजारी असताना माझ्यावर रागावले तर काय झालं ? खूप तरास झाला त्या आजारात. बघू वाटायचं नाही. शेवटचे दोन महिने मी पुण्यात अस्पतालमध्येच होतो. तिथेच झोपायचा. अंघोळ बी तिथेच.
शेवटी फार कंटाळले होते. उपचार नको म्हणायचे. एकदा त्यांना रत्ना हॉस्पिटलमध्ये सी.टी. स्क्रॅनसाठी न्यायचं होतं. ते फॉर्मवर नातेवाईकांची साईन लागते, ते मीच करायचो. तर त्या दिवशी पण साईन केली आणि त्यांना न्यायचं, तर एकदम चिडले, म्हणाले, `तुझ्यामुळे मला एवढा त्रास होतोय.' त्यांची तकलीफ मला बघवायची नाही. आन शेवटाला उपयोग झालाच नाही.
शेवटी आजारी होते तेव्हा काय काय बोलायचे. म्हणायचे, `तुला सगळंच माहिती आहे.'
मला खरंच सगळं माहिती आहे. पैशाचं समदं, घरातल्या बायांचे पगार, सामान आणणं, जेवण बनवणं.
मला नेपाळी जेवण बनवता येत नाही. दहाव्या वर्षापासून मी इथंच आहे. मराठी जेवण करतो. धड नेपाळी बोलताही येत नाही. तिकडे गेलो तरी मधे मधे मराठी बोलतो. मी आलो तवा घरात केवढी माणसं होती. आई, बाबा, राजादादा, सीमाभाभी, बंटी, प्रियाताई, सुषमाताई, तनुताई यायचे.
आधी आई बिछान्याला पडली, राजादादा गेला. सीमाभाभी घरी राहत नाही. प्रियाताई गेली. पक्षी गेले. मासे गेले.
आता घरात फक्त मी, बंटी आणि डेनिस आणि अजून एक कुत्र्याचं पिल्लू बंटीनं आणलंय.
आधी वेळ कसा जायचा कळायचं नाही. आता घरात कंटाळा येतो. दरवर्षी मी जानेवारीत नेपाळला सुट्टीसाठी जातो. यंदा बाबा नाही. त्यांचा वाढदिवस झाल्यावर जायचो. आता सप्टेंबरमध्येच जाऊन येणार.
आई गेली, आता बाबा पण गेले. त्यांची खुर्ची दिसते, त्यांचे कपडे, छोटी छोटी वस्तू पाहिली की सारखी आठवण येते. बाबा हाक मारतात असं वाटतं. `मित्रा, सोन्या...'
शेवटी एकदा मला म्हणाले होते, `तुला अर्ध राज्य दिलं असतं रे, पण नाही ना माझ्याकडं राज्यं' मला लिहिता येत नाही, धड बोलता बी येत नाही. पण बाबाविषयी बोलायचं, म्हणून थोडं फार जमेल तेवढं बोललो. मनामधी खूप आहे.
बाबासारखा लेखक असतो तर केवढं संागता आलं असतं.
चंद्रबहादूर
शब्दांकन - नीलिमा बोरवणकर