Skip to main content

असे का होते आहे?

चळवळी समाज कार्यकर्ती असा त्यांचा परिचय. नारोडी मंचर आंबेगाव या भागातल्या आदिवासींमध्ये काम. जंगल बचाव मोहिमेमध्ये महत्त्वाचा सहभाग. वनविषयक धोरणाचा सखोल अभ्यास. प्रस्तुत लेखामध्ये आपल्या आहारातील अनेक भाज्यांचं आता उच्चाटन झालेलं आहे आणि काही ठरावीक भाज्यांवरच आपला भर आहे. आपल्या आहारातल्या दुर्मिळ झालेल्या शाकभाज्यांचा त्यांनी अभ्यास करून त्यांच्या परिणामांचा साधकबाधक विचार मांडलेला आहे. अन्न, आरोग्य आणि मानसिकता यांचा आप्तसंबंध आपण कसा विसरत चाललो आहोत याबद्दल त्यांनी केलेलं हे विवेचन.

`सकाळच्या न्यारीला मोठ्या थोरल्या खमंग भाजलेल्या बाजरीच्या भाकरी, घरच्या गाईच्या दुधात मुरगळायच्या आणि खायच्या. त्या गावरान बाजरीला चव व्हती आणि दुधबी बेस होतं. दुपारपर्यंत भूक लागत नसं', सखूबाई सांगत होती, `आता या हायब्रीडला चव नाही आणि जर्सी गायीच्या दुधाला बी न्हाई. म्हणून बघा लई मसाले घातल्याशिवाय अन्नाला हात लावत न्हाय कुणी.'
सोजीरबाई सांगत होती, `सकाळी बाजरीचे वाळवून ठेवलेले वडे चुलीवर भाजायचे. दाण्याच्या कुटातलं कैरीचं लोणचं, त्याची मोठी १ फोड आणि आेंजळभर वाळलेल्या-भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा म्हणजे झाली न्यारी. मग शेताला जायचं फक्त भाकरी घेऊन. शेतात वांगी भेटायचीच कुठंकुठं, ती गवताची आग पेटवून भाजायची, मिरचीबी भेटायची, मीठ फक्त आणायचं मग वांग्याचं भरीत, पात्राची पानं. लई बेस जेवण व्हायचं समद्यांचं.'
`पावसाळया दिवसाला रानात किती तरी भाज्या मिळतायत. चाव्याचे देठ, फुलं, कुरडुची भाजी खुडून आणायची, खेकडं लई महामूर, ते पकडून आणायचे. उन्हाळयाच्या दिवसात बाखऱ्या हिरव्या आऊळाची, उंबराची, भोकराची भाजी करतोय आम्ही. चिचुर्ड म्हणजे बारीक-बारीक रानवांगी, कडू असत्यात. ती गोळा करून आणून कांदा-लसूण घालून भाजी करायची. ती पोटाला फार चांगली. सावरीचे दोडे, बहाव्याची फुलं, भारंगीची फुलं, कितीतरी भाज्या, रानात हिंडायचं, गोळा करायच्या आणि नीटवाणी शिजवून खायच्या.' फसाबाई सांगत होती.
आजही दूरस्थ भागात, जंगलात, ग्रामीण भागात लोकांची अन्नाची गरज रानातल्या भाज्या, फळं, कंदमुळं, शेतातली पिकं यावर भागत असते. शहरात मात्र लोक दुकानातल्या ठरावीक भाज्या आणून खातात. त्यात आणखी भर पडते आहे. हॉटेलमधलं खाणं, मॉलमधल्या देशी-विदेशी भाज्या, फळे, अन्नधान्य आणि तयार-अन्न अशा पदार्थांची अन्न ही माणसाची एक महत्त्वाची गरज आहे. गरजेसाठी `अन्न हे पूर्णब्रह्म' म्हणून खाणे ही एक गोष्ट झाली आणि जिभेला विचारून चाखतमाखत अन्नाचा उपभोग घेणे ही वेगळी गोष्ट झाली. जिभेला फक्त चवीची आवड-निवड समजते. तिला पोटाला-स्वास्थ्याला चांगला वाईट याची समज असत नाही. ती बुद्धीला असते. ती मनाला शिकवायला लागते आणि मग ती शिस्त पाळावी लागते. एकदा ती शिस्त लागली की जिभेची हुकूमशाही चालत नाही. लहानपणापासून ग्रामीण भागात, आदिवासी भागात मुलांना दूध देताना त्यात साखर न
घालता देण्याची पद्धत आहे. या मुलांना त्यामुळे गोडाची सवय आणि आवड नसते. मोठे झाल्यावर यांना साखरेचा वा गोडाचा त्रास त्यामुळे होत नाही. उलट ज्यांना लहानपणापासून गोडाची सवय लागली जाते ते मोठेपणी गोडापासून सुटू शकत नाहीत. सध्या शहरात अनेक कारणाने माणसाला बाहेर हॉटेलमध्ये वा दुकानातून तयार पदार्थ खावे लागत आहेत. कंपन्या, दुकानदार मग असेच पदार्थ ठेवतात जे जिभेला भुलवतील, म्हणजे आवडीआवडीने लोक खाण्यासाठी येतील. हे निव्वळ भुकेकरता खाल्ले जात नाहीत तर उपभोग म्हणून खाल्ले जातात. चायनीज पदार्थात अजिनोमोटो हे रसायन घातलेले असते. विकत मिळणाऱ्या सर्व तयार खाण्याच्या पदार्थांत टिकवण रसायने घातलेली असतात. ही कर्करोगप्रवण असतात हे माहीत असले तरी ते पदार्थ राजरोस आणि सर्रास घरातली मोठी माणसे खात असतात आणि लहान मुलांना खायला घालत असतात. आपले पारंपरिक सवयीचे पदार्थ - लोणची, पापड हे आणि नव्याने वापरायला लागलो असे जॅम, जेली, सॉस, आईस्क्रीम, मायोनिज असे सर्व काही पदार्थ - यात टिकवण रसायने घालावी लागतात. जी कर्करोगप्रवण आहेत. कर्करोग होईल तेव्हा बघू. कर्करोगप्रवणसारखीच ही रसायने जीवनाशकही असू शकतात. यांच्यामुळे आपले पचन बिघडते पण तरी त्याचा विचार न करता याचे सेवन केले जाते आहे. अन्न आता उपभोगाची, जिभेच्या लाडाची बाब नक्की बनली आहे.
काही पदार्थ पूर्वी आपण फारसे खात नव्हतो. टोमॅटो, मटार, फ्लॉवर, कोबी अशा अनेक गोष्टी अन्नात आता महत्त्वाचे स्थान घेऊन बसल्या आहेत. एकूण भाज्या, सलाद, फळे यांचे महत्त्व वाढले आहे. या पदार्थातून रफेज म्हणजे तंतूमय पदार्थ मिळतात जे पचनात महत्त्वाचे असतात. पाश्चिमात्य अन्नात तंतुमयता नसल्याने त्यांना या पदार्थाची गरज भासते. भारतीय पारंपरिक अन्नात भाकरी, चपाती कोंडा न काढता केल्यास, भात फार पॉलीश केलेला नसल्यास त्यात पुरेशी तंतुमयता असतेच. पण पाश्चिमात्यांच्या गुलामगिरीत दीर्घकाळ काढल्यामुळे आपल्यावर त्यांच्या अनेक पद्धतींचा प्रभाव पडला आहे. असे लक्षात येते की, भाज्या, फळे यासाठी बरीच आणि तीही सिंचनक्षम जमीन वापरली जाते आहे. जी वास्तविक पाहता भुसार पिकांसाठी - गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, तूर, गळिताची पिके अशासाठी वापरली जायला हवी. सध्या तर ब्रोकोली, जांभळी कोबी, रंगीत ढबू मिरच्या, चेरी टोमॅटो, अस्परागस अशा खास आणि महागड्या भाज्या आणि फळे याकरता तसेच फुलांकरता जमीन आणि पाणी वापरले जात आहे. अशा पदार्थांना गिऱ्हाईक मिळेल अशी परिस्थिती उद्योगधंदे, कारखाने आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अवास्तव पगारांनी निर्माण झाली आहे. आणि मग गरिबाचे अन्न असलेली धान्ये महाग होऊन त्यांना उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे.
पूर्वी साधारणत: स्थानिक शेती उत्पादनावर लोकांचे अन्नपदार्थ बेतले जायचे. बाजरी, ज्वारी, तांदूळ ही पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जायची आणि ती त्या त्या भागात खाल्ली जात. बि्रटिश काळात ए. हॅवॉर्ड या शास्त्रज्ञाने भारताच्या शेतीचा अभ्यास करून ज्वारी-बाजरी अशा स्थानिक धान्यांचे पोषणमूल्य महत्त्वाचे म्हणून मान्य केले. त्याची सवय असल्यानेही ती रुचकर वाटत. या रीतीमुळे वाहतूक खर्चही कमी होत होता. त्यामुळे ती स्वस्तही असत. अन्न ही गरज मानली जात असल्याने हे मान्यही होत होते. सहसा माणसे आपला प्रदेश सोडून दूर जात नव्हती यामुळे वाहतूक करून सर्व पदार्थ सर्वत्र उपलब्ध असण्याची गरजही नव्हती. पण आता हे सर्व बदलले आहे. काही लोकांच्या जवळ बराच पैसा आल्याने ते शेलक्या, आवडतील या गोष्टी खायला मागतात. काश्मीरवरून सफरचंद, नागपुरची संत्री, दक्षिणेकडचे अननस, रत्नागिरीचे हापूस-पायरी आंबे अशी फळे, परदेशातून भुसार धान्ये, तेल असे पदार्थ वाहतूक करून त्यात खूप खर्च करून ती महाग करून उपलब्ध केली जात आहेत. महागाईचा अर्थ फक्त पैशाने महाग असा होत नाही. तेवढी ऊर्जा-वाहतूक, साठवण, शीतीकरण, खते, जंतुनाशके, मॉल, दुकाने अशावरती खर्च होऊन टंचाई निर्माण होत आहे. स्थानिक खाद्य पदार्थ वापरल्यास यातील खर्च कमी होऊन गरिबाला अन्न परवडेल.
अन्न आणि स्वास्थ्य-आरोग्य याचा जवळचा आणि अतूट असा संबंध आहे. ठरावीक स्थानिक पदार्थ माणसाच्या पोटाला पचायला सोपे जातात, अंगी लागतात. पोषण चांगले होते. त्यापेक्षा वेगळे पदार्थ सुलभपणे पचत नाहीत. पोषक होत नाहीत, त्यामुळे भूक खऱ्या अर्थाने भागत नाही. अनेक वर्षाच्या अनुभवातून माणसाने आडाखे बसवून अन्नपदार्थ निवडून, त्यावरच्या प्रक्रिया शोधून ते खाण्यायोग्य बनवले आहेत पण आजच्या उपभोगवादी, चंगळवादी जीवनशैली आणि त्याला भर घालणारे जागतिकीकरण यामुळे अन्नसामग्री आणि पदार्थ यात खूप बदल होत आहेत. सर्व वस्तूंचे बाजारीकरण झाल्याने यात वाढ होते आहे. एकदा बाजाराची सवय आणि आवड निर्माण झाली की व्यापारीकरण, जाहिरातीकरण, फसवणूक, पूर्ण माहिती न देणे, आकर्षित करून घेणे, त्याला प्रतिष्ठेचे लेबल चिकटवणे अशा अनेक गोष्टी होत आहेत. पैसे मिळविण्याकरता खूप धडपड आणि वेळ गेल्यावर घरी स्वयंपाक करणे, पदार्थ बनवणे याला वेळ उरत नाही. यामुळेही शहरात अन्नाचा बाजार वाढतो आहे. पैसेवाल्यांसाठी गोडधोड, मेवामिठाई, सुकामेवा, तळलेले, तुपकट चमचमीत पदार्थ हवे असतात. पदार्थांच्या कृतीमध्ये हे असेच जिन्नस आता आढळतात. हे स्वास्थ्याच्या दृष्टीने फार गैर आहे. लहान मुले, तरुण अशा पदार्थांच्या मोहात एकदा पडले की त्यांचे पोषण, स्वास्थ्य धोक्यात येते आहे. थंडगार बाटली-पेये हा एक घातक पदार्थ अन्नाच्या जोडीला येऊन बसतोच आणि यांची सुलभ उपलब्धता आणि चटक यातून खप प्रचंड वाढतोय.
अशा हॉटेलात आणि बाजारात मिळणाऱ्या पदार्थांना पोषणमूल्य असो वा नसो, त्यांना प्रतिष्ठा जरूर आहे. आणि तशी प्रतिष्ठा देण्याचे अनेक मार्ग काढले जात आहेत. कंपन्यांनी पैसे दिले की डेंटिस्ट अॅसोसिएशन्स चॉकलेट दाताला उपयोगी असण्याची शिफारस करतात, आईच्या दुधापेक्षा बेबी-फूड अधिक पोषक ठरतात. घरच्या अन्नापेक्षा टॉनिक्स महत्त्वाची ठरतात. कोकाकोला, पेप्सीकोलासारखी पेये हानिकारक नसल्याची प्रशस्तीपत्रके मिळू शकतात. अशा कित्येक गोष्टी आहेत की ज्या मानवी जीवाशी खेळ करणाऱ्या असतात, तरी जाणकार शास्त्रज्ञ त्या विषयी गप्प बसतात. माहिती मिळाली तरी समाज तिकडे दुर्लक्ष करून तत्काळ फायदे महत्त्वाचे म्हणून घेतो. आज बाजारात येणारा शेतमाल हा जहरी औषधाने फवारलेला असतो. कित्येक भाज्या फवारणी करून लगेच बाजारात पाठवल्या जातात. कित्येक फवारणीची रसायने सिस्टिमिक जहरे असतात, जी वनस्पतींच्या अंगात भिनून किडेकीटकांना मारतात. ही रसायने आपण पोटात घेत असतो, लहान लेकरांना प्रेमाने खाऊ घालत असतो. नुकतेच शेतकऱ्यांकडून असे कळले की कोथिंबीर काढायच्या अगोदरची शेवटची फवारणी दारूची असते, कारण यामुळे कोथिंबीरीला चकाकी येते. या चकाकीशिवाय एजंट तिला हात लावत नाहीत. आपल्याला चकाकणारी कोथिंबीर का हवी असते ? तांबडा रंग लावलेली गाजर, लाल रंगाची आणि साखरेची इंजेक्शन्स दिलेली कलिंगडे, रसायने वापरून पिकवलेले आंबे, केळी आणि इतर फळे आपल्याला का आवडतात ? दिवसेंदिवस वाढणारा कर्करोग आपल्याला विचारात घ्यावासा वाटत नाही. संकरित आणि विशेषत: गुणसूत्र-बदल अन्नपदार्थ यावर आपण प्रश्नचिन्ह लावत नाही. असे का होते आहे ?
कुसुम कर्णिक
मंचर, जि. पुणे ४१०५०३
फोन ०२१३३-२२४१०७