प्रिय वाचक,
दिवाळीच्या निमित्ताने होणारा हा संवाद आहे. त्यामुळे माझ्या डोळयासमोर दिवाळीच्या स्वागतासाठी घराघरात हेलकावणारे आकाशकंदिल, पणत्या, रांगोळया, फराळाच्या पदार्थांचे डबे, खास खरेदी असं उत्साहाचं वातावरण उभं राहात आहे. शिवाय मिळून साऱ्याजणीच्या विसाव्या वर्षातला हा दिवाळी अंक आहे.
म्हणून सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीतल्या आनंदासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.
वेगवेगळया जातिधर्मांमध्ये अशा प्रकारच्या उत्सवाच्या जागा आणि दिवस वर्षानुवर्ष साजरे होताहेत. त्यामागे कदाचित् असंही कारण असावं की, माणसं आपल्या रोजच्या, नेहमीच्या दिनक्रमात चाकोरीतलं आयुष्य जगत असतात. कधीकधी सरावानं तो दिनक्रम इतका अंगवळणी पडतो किंवा इतका थकवतो की गाडा यंत्रासारखा आपोआप ओढला जावा अशी आयुष्याची गत होते. यातून माणसाला थोडं जागं करण्यासाठी, उत्साह देण्यासाठी, काही कर्तव्य, जबाबदाऱ्यांची आठवण देण्यासाठी, काही नात्यांमधला ओलावा जपण्यासाठी अशा विशेष दिवसांचा उत्सव साजरा करण्याची प्रथा असावी. मग तो नाताळ असेल, बुद्ध पौर्णिमा असेल, रमझान-ईद असेल, पतेती असेल किंवा जैन, शीख इ. अन्य धर्मातील पवित्र दिवस असेल. त्या त्या जातीतल्या, धर्मातल्या लोकांना आपापल्या आयुष्याच्या रहाटगाडग्याच्या थोडं पलीकडे आणि वेगळं असं काहीतरी करायला प्रवृत्त करणारे असे हे सण उत्सव असतात.
मूळ कल्पना किती चांगली आहे. यात आपल्या कौटुंबिक, सामाजिक नात्यांना उजळा देण्याची आणि प्रेम, आस्था, जबाबदारीचं भान हे सारं व्यक्त करण्याची ही एक संधी आहे. मात्र आज या कल्पनेला एक बाजारू, व्यापारी आणि राजकीय रूप आलेलं दिसतं आहे. त्यामुळेच भेटीतल्या आनंदाऐवजी गर्दीचा भाग बनावं लागतं. आंतरिक ओलाव्याऐवजी, भावनेचं भडक प्रदर्शन बघावं लागतं. एकमेकांशी संवाद करण्यासाठी आलेल्यांना फटाके, ढोल, मिरवणुकांमधले आवाजच ऐकावे लागतात. व्यक्तिगत नात्यांचं आणि छोट्या, आवाक्यातल्या, मर्यादित पण मनापासूनच्या भेटण्याचं, देवघेवीचं एकदम सार्वजनिकीकरण, सपाटीकरण झाल्यासारखा अनुभव येतो. माणसांच्या, आवाजाच्या, दिव्यांच्या गर्दीत आपलं काही भेटण्याऐवजी आपणच हरवून जाण्याची भीतीसुद्धा एकेकदा दाटून येते आणि हा प्रकाश काही दाखवण्याऐवजी डोळयापुढे अंधार पसरवतो किंवा डोळे मिटवून, दिपवून टाकतो.
दिवाळीच्या निमित्तानं बोलत असताना मला निराशेचा सूर लावायचा नाही. पण म्हणून भोवती जे नकोसेपण नाचतं आहे त्याची जाणीव मात्र माझ्या मनात जागी होते ती तुमच्यापर्यंत पोचवायची आहे. विविध धर्मीय/जातीय सण आणि उत्सव आपलेसे करत आनंद वाढवायचा की एकमेकांमध्ये त्यांच्या निमित्तानं ईर्षेची, द्वेषाची बीजं पेरायची ? मोठ्या संख्येनं रस्त्यावरच्या मिरवणुकांमधून शक्तीप्रदर्शन करत, आवाजांचे आणि अडवणुकीचे आघात करताना आपण काय करतो आहोत याचा विचार व्हायला हवा. म्हणून माझ्या मनातली अस्वस्थता मी व्यक्त करते आहे.
या दिवाळी विशेषांकाची योजना, आखणी करताना या अस्वस्थतेचाच आधार होता. म्हणूनच अंकामधली सर्वात मोठी, महत्त्वाची आणि अग्रक्रमाची जागा `पर्यावरण' या विषयासाठी द्यावी असं आम्ही ठरवलं. उष:प्रभा पागे आणि शोभा भागवत यांच्या हाती याचं संपादन सोपवून आम्ही निर्धास्त झालो. पर्यावरणाचं आणि माणसाचं, म्हणजेच आपलं सर्वांचं नातं काय आहे, त्याचे अनेक पदर तज्ज्ञांच्या, अभ्यासकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या लेखनातून तुमच्याआमच्या मनापर्यंत पोचतील अशा पद्धतीने या विभागातून उलगडणार आहेत. आपल्या सगळयांच्या जीवनमरणाचा हा प्रश्न दिवाळीतल्या साऱ्या आनंददायी उपक्रमातूनही आपण आपल्या पुढ्यात ठेवावा अशी विनंती आहे.
या अंकात, अंकाची मुखपृष्ठकथा म्हणावी अशी मल्लिका साराभाई यांची मुलाखत प्रा. पुष्पा भावे यांनी घेतली आहे. `कार्यकर्ती कलावती' या नावातच मुलाखतीचं वेगळेपण लक्षात येईल. याखेरीज प्रसिद्ध पर्यावरणातज्ज्ञ डॉ. वंदना शिवा याच अंकात भेटणार आहेत. या अंकात एक वेगळा स्त्रीविभाग करता येईलसे लेख आम्ही एकत्र न देता विखरून दिले आहेत. त्यात जनाबाई, मुक्ताबाईसारख्या संत स्त्रियांपासून ते गीता साने, गौरी देशपांडे, उमाबाई केळकर, ज्योती सुभाष आणि काही सामाजिक कार्यकर्र्त्यांच्या बायकांपर्यंत, भूतकाळातल्या आणि आजच्या काळातल्या अनेक स्त्रियांची वेगळयाच प्रकारची ओळख आपल्याला अनुभवायला मिळणार आहे.
कथांमध्ये महाश्वेता देवी, प्रज्ञा पवार आणि वंदना भागवत यांच्या उत्कृष्ट कथा आहेत. याखेरीज प्रा.लीला पाटील, मंगला गोडबोले, चित्रा बेडेकर, आशा साठे आणि वंदना खरे यांचेही वाचनीय लेख या अंकात आहेत.
तेंडुलकरांचं निधन हा अनपेक्षित धक्का नसला तरी ते दु:खदायक निश्चितच होतं. त्यांच्या साहित्यिक योगदानाचं महत्त्व अनन्यसाधारण असलं तरी इथे आम्ही त्यांच्या स्नेह्यांची हृद्य मनोगतं अंतर्भूत केली आहेत.
आणि हो, कवितांची निवड करण्यासाठी आम्ही डॉ.नीलिमा गुंडी यांची मदत घेतली आहे. त्यांनी अभ्यासपूर्ण वाचन करून `लाटांचं मनोगत' प्रसिद्ध केलं आहे. त्यांच्या नजरेखालून गेलेल्या अनेक कवी स्त्रियांपैकी, त्यांनी काहींची शिफारस केली. त्यांच्या कविता मागवून या वेळचा कविता विभाग समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.
असा हा दिवाळी अंक वाचकांच्या हातात देताना फार मनापासून आनंद होतो. कारण त्याच्यामागे कितिकांचे विचार आणि हातभार असतात. त्याची तयारी तर एका परीनं गेल्या दिवाळी अंकाबरोबरच सुरू झालेली असते. याचं कारण असं की पुढ्यातला दिवाळी अंक तयार करत असताना, त्यात सामावून घेता आलं नाही असं काही, उशीरा सुचलेलं काही, योजना करूनही वेळेवर हाती न आलेलं काही - असं सारं डोळयासमोर असतं. ते पुढच्या वर्षीच्या दिवाळी अंकासाठी कधी मनात तर कधी टिपणात जाऊन बसतं. त्यात आणखी भर पडते नव्यानं घेतलेल्या शोधाची, चर्चांची आणि वर्षभर घडत राहणाऱ्या घटना घडामोडींची. या साऱ्यातून आणि साऱ्याजणांबरोबरच्या देवघेवीतून दिवाळी अंक तयार होत असतो. एकेकदा गंमतीनं मी म्हणते आमची दिवाळी होळीच्या प्रकाशातच रुजायला लागते आणि गणपतीत तर आम्ही फुलबाज्या उडवायला लागतो !
दिवाळी अंकाबाबतचं हे `योजनापर्व' मी अशासाठी सांगितलं की हे काम चालू असतानाच अगदी ताज्या घटनाही आमच्या डोळयासमोर आणि ध्यानात येत असतात. उदा. बिहार ओरिसातली पुरावादळाची भीषण, प्रलयंकारी परिस्थिती, खैरलांजी हत्याकांडाचा निकाल, बंगलोर, अहमदाबाद, दिल्लीमध्ये झालेले बाँबस्फोट, अण्वस्त्रकरारामुळे राजकीय पक्षात उठलेले वाद आणि वादळं, सेझ प्रकरणातून निर्माण झालेली अशांतता - हे आणि आणखी बरंच काही घडतंच आहे, घडतच राहाणार आहे. या सगळयांना कवेत घेत अंक तयार करणं सोपं नाही. तरीपण दिवाळीसारख्या एका मोठ्या उत्सवाच्या निमित्तानं, महाराष्ट्नची खासियत ठरावी अशी ही दिवाळी अंकांची शतायुषी परंपरा - तिची प्रतिष्ठाही सांभाळायला हवी, याचं भान आम्हाला आहे आणि राहीलही. म्हणून तर चांगलं काही निवडून देताना, जुन्यातलं काही आठवावं आणि नवंही न्याहाळण्यासाठी आपल्या वाचकांसमोर ठेवावं असा आमचा प्रयत्न आहे. आनंददायका-बरोबरच दु:खदायकही, त्याच्याच बरोबरीनं पुढे ठेवायचं आहे. कारण खरं चांगलं म्हणजे केवळ आनंदाचाच अनुभव नव्हे तर चांगलेपणही, हसू आणि आसू दोन्हीत आहे, असा विचार, अशा जाणिवा आणि संवेदना मनात आहेत. त्या सर्वदूर पसराव्या, पोचाव्या आणि त्यातून विचारांचे तरंग उठत राहावेत असं वाटतं.
या संदर्भात एका गोष्टीकडे मला साऱ्यांचं लक्ष वेधायचं आहे. व्यक्तिश: मी देव मानत नाही, देव पुजत नाही. मला खरंच वाटतं की देव वागण्याबोलणाऱ्या जिवंत माणसात बघावा. म्हणूनच मी दिवाळीचे सारे धार्मिक संदर्भ दूर करत त्याला उत्सव म्हणू इच्छिते, सर्व धर्मियांच्या अशा उत्सवात सहभागी होऊ इच्छिते. हे सारं मनात येतं आणि समजून घ्यावंसं वाटतं की देवदर्शनासाठी लागणाऱ्या रांगा, जत्रा किंवा उत्सवात लोटणारे गर्दीचे महापूर, त्याचं दिवसेंदिवस वाढत जाणारं प्रमाण. हे सारं आपापल्या घराबाहेर, रस्त्यात, डोंगरावर का साजरं होतं आहे ? रस्ता अडवणाऱ्या, संख्येनं मिरवीत जाणारी नवरात्रातली तोरणं, जोधपूरच्या ताज्या घटनेतील मंदिरातील गर्दी, मांढरदेवीच्या यात्रेतला अलोट जनसमुदाय ! नावं वेगळी. गावं वेगळी. इथं होणारे अपघात, चेंगराचेंगरी - त्यातून देवाच्या दारात होणारे मृत्यू. याचा कसा अर्थ लावायचा. अमुक एक ठिकाण, तिथली देवता, देव, पीर, दर्गा यांच्या भेटीतून भलं होतं असं का वाटतं ? यात केवळ गरीब, अडाणीच नसतात तर श्रीमंत सुशिक्षितही असतात. लग्न ठरताना, ठरल्यावर किंवा अन्य काही कारणानं देवदर्शनाला जाणारे किंवा तिथून परतणारे अपघातात मरतात ही देवाचीच करणी आणि प्रसाद म्हणायचा ? माणसांच्या मनावरची देवकृपेची ही भूल कशी उतरायची ? समोरचं, भोवतीचं जे बिघडतंय त्यासाठी काही घडवायचं की जे निर्जीव, मुकं आहे त्याच्या दारात असलेला, नसलेला पैसा खर्च करायचा ? मला माहीत आहे, या विचाराचा रागराग करणारे, त्याला विरोध करणारे अनेकजण असणार. या अंधभक्तीला बळी जाणाऱ्यांपेक्षा त्यांना त्यासाठी फशी पाडणाऱ्यांना माझा विरोध आहे.आपण मेंदू वापरू या. विचार करू या. आपल्या पुढचा मार्ग उजळायला हवा असेल तर आता हा बाहेरचा झगमगाट, गोंगाट आणि जागर कामाचा नाही. आपापल्या मेंदूला जागं करत तेवतं ठेवायला हवं. कार्यकारणभावाच्या मार्गानेच डोळस व्हायला हवं. या पणत्या आपल्या मनातल्या आणि सभोवती असलेल्यांच्या मनातल्या पणत्याच आपल्याला ऊर्जा आणि उजेड देणार आहेत. त्यांचा दीपोत्सव साजरा करू या.
यंदाच्या विशेष अशा विसाव्या वर्षात, `मिळून साऱ्याजणी'साठी अनेकजणांचे अनेक हात मदतीला धावून आले आहेत. त्या साऱ्यासाऱ्यांना शुभेच्छा.
३ ऑक्टोबर २००८


