उन्हं उतरत आली तशी कमळी तांदुळाची सुपली हाती घेऊन अंगणाच्या पेळेवर येऊन टेकली. दारातल्या फणसाच्या लांबलेल्या सावलीत कुत्रं बसलं होतं. त्याच्या पलीकडे चार कोंबड्या आपली पिलावळ सांभाळीत हिंडत होत्या. सुपलीतले चार दाणे त्यांच्याकडे उडवीत कमळी उगीच बसून राहिली. तांदूळ निवडायचं विसरून.
तिचा हा रोजचाच क्रम झाला होता. एकटीने वेळ कसा काढायचा ह्याच विवंचनेत ती नेहमी असे. मांगरात एकच म्हैस होती. तिचं करून वेळ उरत असे. स्वत:पुरता भात नाही तर एखादी भाकरी टाकून भागत असे. मग अशीच अंगणाच्या भोवतालच्या गडग्याकडे पाहात पेळेवर नाहीतर वृंदावनाच्या ओट्यावर बसून राही. पाहता पाहता तिला त्यात जीव धरल्याचा भास होई. त्या गडग्याच्या जरा वर डगरीवर असलेला मांगर, त्याच्या बाजूला असलेलं बेलाचं झाड नि भोवतालची कधीकाळी हिरवी असलेली झाडं-झुडपं हे सारं सजीव झाल्यासारखं वाटे. त्यातल्या पाखरांची किलबिल ऐकू यायची.
केव्हातरी इथे माणसांचा राबता होता. मांगरात दोन म्हशी नि जोताचे बैलही होते. ह्याच अंगणाच्या मेरेनी चार फुलझाडं नि मांगरापलीकडे कसल्यातरी भाजीचा मंडप असे. अंगणातही पूर्वी पडवीला लागून पत्र्याचा छोटा मांडव होता. सावलीसाठी. अंगणाच्या आखाड्याबाहेर डावीकडच्या पांदीत तोंड करून पडवीच्या टोकाला दुकान होतं. किराणा मालाचं. दुकानामुळेच तर माणसांची सतत जाग असे. आता या दुकानाची आठवण झाली नि ती शहारली. इथेच तिचा अधू पाय असलेला नवरा रघू दिवसभर बसून असे. मधूनच घरात डोकावी, पण ते तेवढंच. कारण कमळी एकतर कामात तरी असे किंवा घुश्शात तरी. किंवा घुस्सा नको म्हणूनच ती स्वत:ला कामात गंुतवी. तसा पसाराही बराच होता. दुकानाची थोडीफार विक्री होई. त्यामुळे रोकड चार पैसे हातात खेळत. घरची शेती होती नि जोतंही होतं. दोन बैलांचं आणि गडीमाणसांचं करण्यात तिला दिवस पुरत नसे.
दुधाची व्यवस्था लावून शेणगोठा झाला की की गडी पेज खाऊन बैलांना घेऊन शेतावर जाई नि दुसरा दुकानावर. नंतर मग शामू माल आणायला तालुक्याला जायला निघे. शामू हाच तिचा एकुललता एक जिव्हाळयाचा विषय होता. जिव्हाळयाबरोबरच रागाचाही.
तिच्या बरोबरचाच होता. दिवसाआड बाजार करायला जायचा. कधी आपल्या घरी जाऊन यायचा.त्याची शाळा सुटल्यापासून तो जवळजवळ इथेच होता.रघूचा तो चुलत चुलत भाऊ. त्याच्याही घरी मोठा बारदाना. म्हणून मग तो इथेच राहायचा. रघुची आई होती तोवर छान चाललं होतं. चार कामं सांभाळून पायानी अधू असलेल्या आपल्या चुलतभावाला मदत करी.तो होता म्हणूनच दुकानाचं काम व्यवस्थित चाललं होतं.
आणि आता? शामूच्या आठवणीनं कमळी व्याकूळ झाली....
प्रथम त्याला पाह्यलं ते माहेरी. लग्नाच्या बैठकीतच. चार गावकरी जमून तिचं लग्न ठरवत होते. तेव्हा शामूच वराकडून उपस्थित होता. इतकंच काय पण नवरामुलगा म्हणूनही त्यालाच दाखवलं होतं ! तिची साफ फसवणूक झाली होती. शामूला दाखवून लंगड्या रघूशी तिचं लग्न लावलं होतं. खेड्यातल्या लग्नात मुलाकडच्यांनी मुलीकडे जानोसा घ्यायची नेहमीची प्रथा. ती मोडून जेव्हा मुलीकडच्यांनी उचलून यावं अशी अट रघूच्या माणसांनी घातली, तेव्हाच कमळीच्या दरिद्री बापाला संशय आला होता. पण कुणीतरी बाजूला नेऊन मध्यस्थाची मूठ दाबली. म्हातारा हो-नको म्हणायच्या आधीच लग्न ठरल्याचं जाहीर झालं. सुपारी फुटल्यावर काय बोलणार म्हणून तो गप्प बसला.
मांडवात गोंधळ नको म्हणून मग म्हाताऱ्याने जास्त कुणाला बरोबर नेलंच नाही. शेती नि दुकान असलेल्या घरी पार पडत्येय तेही हुंडापांडा न देताच, हेच जास्त असं समजून आईसही गप्प असली. पाठच्या पोरींची सोय लावायला हवी होती ह्याचीही चिंता बापाला होतीच.
शेवटी कमळीचं अधू पायाच्या रघूशी लग्न लागलं. अंतरपाट दूर झाल्यावर दिसलेला अनोळखी पण आर्जवी चेहरा पाहून कमळी क्षणभर थबकली. पण कुणीतरी बळेच तिच्या हाताला धक्का दिला नि यंत्रासारखे हात हलवून तिने माळ घातली !
माणसं पांगली नि रात्री नवरी मुलगी म्हणून कमळी घरात आली तेव्हा तिला शामूच समोर दिसला. मिस्किल हसणारा. निदान त्याक्षणीतरी तिला त्याची चीड आली. घृणा वाटली.कारण ह्या कारस्थानात तो सहभागी आहे असं तिला वाटत होतं. मग तिला उमगलं की दैवानं जमवलंय तसंच राहणार. तसंच राहायला हवं.
चार दिवस ती नवरी म्हणून हिरवा चुडा लेवून मिरवली. लंगडा रघूही हळदीचे डाग पडलेलं धोतर नेसून आपला किरकोळ पाय झाकून नवरदेव असल्याचं दाखवीत होता. घरात दुसरं माणूस नव्हतंच. सासू आधीच गेलेली. सगळी जबाबदारी तिच्यावरच होती. दिवस आले आणि गेले. ती घरात रुळली. रोजच्या कामात गढली ते शामूकडे पूर्ण दुर्लक्ष करायचं ठरवूनच ! पण... पण जसे दिवस जायला लागले तसं तिला कळलं की आपण कितीही अपेक्षा केली तरी शामूवाचून इथे पान हलत नव्हतं. कारण बाहेरचा सारा कारभार शामूच सांभाळीत होता.
तो तिच्याकडे पाहात होता. बोलायचा प्रयत्नही करीत होता. तिने उत्तर दिले नाही तरी न रागावता तिथून निघून जात होता. सारं वरवर सुरळीत असल्यासारखं वाटत होतं. एकदा सकाळच्या वेळी रघू दुकानावर बसला होता.ती मागच्या अंगणात शेणी लावत होती.सहज म्हणून शामू तिथे आला. जरा खाकरला आणि तिथेच घोटाळत राहिला.त्याला बहुधा काही बोलायचं होतं. पण ही घुम्म बसून आपलं काम करीत राह्यली....
`वहिनी..'
`....'
`काल बराच माल आणून ठेवलाय.'
`मग?'
`दोन चार दिवस तरी तालुक्याला जायला नकोय'
`बरं..'
`मी दोन दिवस घरी जाईन म्हणतोय. आईबाबा कुणीच लनाला आले नव्हते. भेटून खुशाली सांगेन.'
`कुणाची खुशाली ?'
`म्हणजे? आपली. इथली. भेटही होईल आणि शिवाय एकंदर लग्नाची हकिगतही त्यांना कळेल. तिकडचं घर बंद करून त्यांना येता आलं नाही ना. खरं तर तुम्ही दोघांनी जायला हवं.'
`करायचंय् काय जाऊन?' तिच्या स्वरात चीड होती. रघूपेक्षाही जास्त शामूबद्दलची.
`म्हणजे बऱ्याच वर्षांनी या घरात कार्य झालं. दादाची आई गेल्यापास्नं इथे बाई माणसाचा वावरही नव्हता. आता तू.. तू आल्यापास्नं घर कसं भरल्यासारखं वाटतंय.' बोलताना तो अडखळला नि मग आपण खूप बोललो असं वाटून एकदम गप्पच झाला.
`घर भरलेलं दिसावं म्हणून नवरी आणायची?' तिचा तिरका प्रश्न.
`म्हणजे?'
`मन भरून यावं असं कुणालाच वाटलं नाही?'
`मी नाही समजलो.'
`नाहीच समजणार तुम्हाला ते, भरल्या घराला मनाचं रितेपण कळत नाही. नि रित्या मनाला भरल्या घराचं सोयर सुतक नाही.' अर्धवट त्याला, अर्धवट स्वत:शी ती बोलली.
`तू अशी वाकडं का बोलतेस ? आधी कधी बोलत नाहीस नि जेव्हा बोलतेस तेव्हा हे असं तिरकं.'
`मी कशाला कोणाला तिरकं बोलू नि कशासाठी? नि आता उपयोग तरी काय आहे त्याचा?'
`ते मला काय माहीत? पण बोलत बरीक असतेस.'
`तुमच्याशिवाय कुणाला माहीत असणार? तुम्हाला काहीच माहीत नाही?'
`म्हणजे? कशाबद्दल बोलतेयस तू हे?'
`आव बरीक चांगला आणता. सारं माहीत असून नसल्यासारखा.'
`मी जाणूनबुजून काहीही केलेलं नाहीय. मध्यस्थामुळे ज्यात गोवला गेलो त्यात माझा काहीच दोष नव्हता.'
`म्हणजे आपण काहीतरी वाकडं वागलो एवढं तरी तुम्हाला उमगलंय ना?'
`मी.. मला... असेल.'
`आम्ही मुली म्हणजे दाव्याच्या गाई. कुणीही वैरणकाडी टाकावी नि दावं सोडावं असं वाटलं तुम्हाला? पण त्या मुक्या गाईसुद्धा ओळखीच्या....सवयीच्या माणसाला जवळ फिरकू देतात. मी... मी तर माणूस..'
`का? अडखळलीस का? बोल ना'
`बोलले तरी उपयोग काय त्याचा? दाखवायच्यावेळी तुम्ही आलावतात ना? मग बोहल्यावर भावालासा उभा केलात? का आयत्यावेळी बेत बदलला तुमचा?'
`तसं नव्हे गं. म्हणजे तेव्हा लग्नाचं काहीच ठरलेलं नव्हतं.निदान मला तरी ठाऊक नव्हतं.'
`म्हणजे भावासाठी नवरी बघायला आलावतात तुम्ही?'
`हो म्हणजे आधी तसंच ठरलवतं. मग पुढे मध्यस्थांनी काहीतरी घोटाळा केला.तुला काय मीच नवरा मुलगा वाटलो होतो?'
`जाऊ दे, काय उपयोग त्या वाटण्याचा, माझं नशीब माझ्या पुढ्यात आलंय, त्याच्या उस्तवाऱ्या आता मी करीन. कसं कसं भोगते ते पाहा आता डोळे उघडे ठेवून.' आपण फार बोललो असं वाटून ती थबकली. नि मग शेणी थापताना तिचा हात अकारणच वेगाने चालू लागला.
`मग? जाऊ ना मी?'
`मी कोण परवानगी देणारी? घरच्या धन्याला विचारून काय ते ठरवा.'
शामू निघून गेला. उदासवाणा होऊन. शेणानं भरलेल्या हातानं कमळी त्याच्याकडे पाहात राह्यली... नि एक उसासा सोडून पुन्हा कामात गुंतली...
कोंबड्याच्या कलकलाटानं ती भानावर आली. पंख फडफडवीत कोंबड्या कलकलाट करीत होत्या. घारीनं बहुधा एक पिल्लू पळवलं असावं. तिनं अंदाजानं पिल्लं मोजली. एक, दोन, तीन...
मोजता मोजता तिला आठवलं. अशीच एकदा मागच्या पडवीत भागीच्या पोरीबरोबर सांगरगोटे खेळत होती. एक.दोन..तीन... वय तसं लहान नि विरंगुळयाचं साधन नाही. केव्हातरी रघू दुकानात ट्नन्झिस्टर लावी.. गाणी ऐकता येत पण घरातूनच. बाईमाणूस दुकानात कशी जाणार, मग ती भागीच्या पोरीशी भेंड्या लावायची. कधी सागरगोटे. असंच काहीबाही. रघू लक्ष देत नसे. पण शामू येताजाता पाहात होता नि तिच्या बालीशपणाला हसतही होता....
सागरगोटे खेळता खेळताच तिला किंकाळी ऐकू आली. भागी पुढल्या दारावरनं ओरडतच आली. `व्हयने, व्हयने गे... काय इपरीत घडला तरी. कायैक कळंना. धाव गे माझ्या आवशी...'
सागरगोटे तसेच टाकून ती धावली. नि... नि पाहाते तो दुकानात बसल्याजागी रघू फेफऱ्याने आडवा झालेला.पूर्वी कधी असं झाल्याचं तिनं ऐकलं नव्हतं. एकदम ताठ शरीर नि बुब्बुळं कशीतरीच फिरवत होता. भोवती जिन्नस इकडे तिकडे विखुरलेले.समोर कुणी गिऱ्हाईक तर दिसत नव्हतं. हे असं कसं झालं. क्षणभर तिची वाचाच गेली. मग तिच्या लक्षात आलं. आपण काहीतरी करायला पाहिजे. पाचपन्नास उंबऱ्यांचं वाडीवजा गाव. डॉक्टर नव्हताच म्हणून तिने भागीच्या पोरीला नारायणभटाकडे पिटाळलं. तो वैद्य होता.
मग तिने तिथलाच कांदा फोडून रघूच्या नाकाशी लावला. त्याचे तळवे चोळू लागली. पूर्वी असं झाल्याचे तिने ऐकलं नव्हतं. काय आहे कळेना.शामूही घरात नव्हता. दुकानातला गडी त्याच्याबरोबर गेलेला. मदतीला एकट्या भागीशिवाय कोणी नाही. त्यातून असला काही अनुभव नाही. अगदी असहाय्य एकटी पडल्यासारखं वाटलं.त्यातून ही फीटच काही वेगळी वाटली. वाटलं उन्हाच्या झटक्यानं असेल. भागीनं पाण्याचा तांब्या पुढे केल्यावर तेही तोंडावर मारलं. तरी मधूनच रघू शांत होई नि मधूनच अंग झाडी. अगदी धनुकलीसारखा वाकडा होई. तिचं लक्ष गेलं तो त्याच्या वाकड्या पायाला काहीतरी जखम दिसली. इथेच दुकानात काहीतरी पत्राबित्रा लागला असेल. बोलणं फारसं नसल्यामुळे तिला माहीतच नव्हतं. बराच वेळ हे चालू होतं. वैद्य नाडी धरून बसलेला. फेसानं बरबटलेलं तोंड पुसून वैद्याने दिलेलं चाटण कमळी त्याला चाटवीत होती. चारदोन माणसं दाराशी जमा झालेली.
`धनुर्वात म्हणायचा की काय हा? काहीच कळत नाहीये.'
वैद्याचे उपाय थकले. त्याने कुणीतरी करणी केल्याचा निर्वाळा दिला. कोण करणार? कमळीला क्षणभर वाटलं.... तिने मोठ्या कष्टाने तो विचार झटकून टाकला. तिचं लक्ष गेलं तो रघू एकाएकी हातपाय झाडायचा थांबला.एकदा अर्धवट डोळे किलकिले करून त्याने कमळीकडे पाह्यलं. त्या डोळयांत आर्तता हेाती. मग त्याने जे डोळे मिटले ते पुन्हा न उघडण्यासाठीच.
शामू सायकलवरून खाडीकाठानं तालुक्यावरनं सामान घेऊन आला तो त्याला बांधावरच कुणीतरी अर्धवट बातमी दिली होती. गळाठल्या पायांनी त्याने आखाडा ओलांडला. अंगणात पाऊल ठेवताच त्याला जणू कापरं भरलं. सारं घर सुन्न आणि उदासवाणं. अद्याप दुकानाच्याच पायरीवर बसलेल्या कमळीचे हुंदके आणि उसासे ह्यांनी वातावरण भरलेलं. मधेच तिच्या पाठीवरनं हात फिरवणाऱ्या भागीचं मोठयाने रडणं आणि बडबडणं.
`धन्या रे माज्या. असा काय केलास रे बाबा माज्या. कोनी करनी केल्यान तेच्या घराचा सत्यानाश होवंदे. ह्या बायकडे कोन बगणार आता....'
तो पडवीकडच्या दाराने दुकानात गेला तो त्याची पावलं क्षणभर थबकली नि मग पुढे होऊन तो रघूला हात लावून बघायला लागला. कमळीकडे त्याची नजर गेली. तिचा तो भाबडा चेहरा कमालीचा दीनवाणा वाटला. उमलण्याआधीच खुडलेल्या कळीसारखा मलूल. तिने एकदा मान वर केली. तिच्या डोळयांतलं ते कारुण्य! छे, त्याला तिथे थांबवेना. आपला भाऊ गेला त्यापेक्षाही कमळी उघडी पडली ह्याचं त्याला अधिक वाईट वाटलं. त्यातून कमळीच्या ह्या अवस्थेला अप्रत्यक्षपणे का होईना पण दुर्दैवाने आपणच जबाबदार आहोत ही बोचणीही लागून राह्यली. हे टळलं असतं तर? क्षणभर पळून जावसं वाटलं.
दिवस आले नि गेले. दुकान काही दिवस बंद ठेवून शामूने शेतांकडे लक्ष दिलं. सुकल्या बागेकडे पाह्यलं. पाव्हणे, त्याचे नि कमळीचेसुद्धा वडील भेटून गेले. चार दिवस भात शिजवून भावजयीला घातला. नंतर जमेल ते शिजवून कमळी पोटात ढकलीत होती नि त्याला वाढत हेाती. पण प्रत्येक घास दोघांच्याही घशाशी अडकत होता. तिथे राहणंही त्याला अवघड वाटत होतं. पण तिला टाकून जाणंही जड वाटत होतं. व्हायचं ते होऊन गेल्यावर दैवाला दोष देत दिवस ढकलण्याशिवाय गत्यंतर नव्हतं...
दोनेक महिने गेले. पावसाच्या शिडकाव्याने वातावरण निवळलं तरी कमळीच्या मनाला टवटवी येणं शक्य नव्हतं. दिवसच्या दिवस कुठेतरी अंतराळी नजर लावून बसे. एकदा अशीच मागच्या अंगणात बसली होती. सहज समोर पाह्यलं तो त्या दिवशी विखुरलेले सागरगोटे पहिल्या पावसानं रुजले होते.त्यांना कोंब फुटले होते. दैवानं तिचा मांडलेला डाव उधळला तरी निसर्ग चुकला नव्हता. तिच्याही बाबतीत निसर्ग जागरूक हेाताच नको होतं ते होऊ घातलं होतं नि ते फक्त तिलाच माहिती होतं. पुढे काय हा प्रश्न डोक्याम काहूर उठवत होता. लोकांच्या जिभांना खाद्य मिळणार होतं.
आताशा भागीची नजरसुद्धा विचित्र वाटायची. शेवटी न राहवून तिनं खडा मारलाच.
`व्हयने, धाकला येऊ म्हंता की काय?'
`........'
`तसा झाला तर बरा होईल हो. धन्याचा नाव ऱ्हाईत.'
कमळी सुन्न झाल्यासारखी ऐकत होती. फक्त ऐकतच होती. उत्तरं देणं तिनं बंदच केलं होतं....
सहज म्हणून एकदा ती पेटी उघडून बसली होती. कापडंचोपडं उघडून पाहताना लग्नातल्या कोऱ्या लुगड्याची घडी हाती आली नि तिला एकदम भडभडून आलं. अजून कोरा वासही विरला नव्हता. एक जरीकाठी डोक्याला बांधायचा रुमाल नि खणही मिळाला. लग्नानंतर शामू गावी जाऊन आला तेव्हा त्याच्या आईने शकुनाचा म्हणून ओटीसाठी पाठवलेला खण, आता काय उपयोग ह्या सगळयाचा. खणाची फारतर कुंची..येणाऱ्यासाठी. छे. कसली कुंची नि काय. विझवटं बापाला पोचवून जन्माला यायचंय. करायची काय कुंची? नि तो रुमाल. कोण बांधणार आता. तिला आठवलं. वैद्य म्हणाला होता. रघुवर कोणीतरी करणी केली..... तेव्हा तिच्याही मनात विचार आला होता. काय सांगावं. भावाचं दुकान बळकावायसाठी शामूनेसुद्धा केली असली तर.... नुस्तंच दुकान की आणखी काही?
हल्ली शामूकडे पाहायचीसुदधा तिला चोरी वाटे. तिला भीती वाटे. शामूची नव्हे. स्वत:चीच. आणि लोकांचीसुद्धा. सारंच अशुद्ध नि अवघड. विचारांच्या आवर्तातून बाहेर येत तिने तो खण पेटीच्या तळाशी दडपून टाकला. आपल्या दु:खासारखाच. मागे वळली तर शामू बाहेर निघून गेलेला दिसला. म्हणजे? ह्याला कळलं तर नाही? पण हे टाळता नाही का येणार? काय हरकत आहे? दोनच तर महिने उलटलेत. पपईच्या बिया खाव्या का? आपोआपच होईल. नाहीतरी स्वत:च्याच पोटाची विवंचना नि वर कुणाचा आधार नाही. शामूचा तरी काय भरवसां? उद्या गेला निघून तर? एकटी बाई माणूस पोराचा सांभाळ कसा करणार? फक्त प्रश्न, वादळासारखे चोहीकडून फक्त प्रश्नच. फेर धरून नाचत होते जणू.
शामूला तरी कुठे चैन पडत होतं? शेतावरचं काम संपवून त्यानं दुकार चालू केलं. अशी फार मोठी विक्री नव्हतीच. तरीही किरकोळीचं गिऱ्हाईक येत असे. तेवढाच विरंगुळा पण जे व्हायचं होतं, त्याची त्यालाही कल्पना आली होती. रघूच्या पिंडाला कावळा शिवेना तेव्हाच त्याला ते खटकलं.आता लोकांच्या तोडाला कुणी तोंड द्यायचं? मनाच्या अशा अवस्थेत दोघंही रोजचे व्यवहार सांभाळत होती. एकमेकांकडे न बघता न बोलता सारं चाललं होतं.तिच्या मनात येई; हेच शामूशी ठरल्याप्रमाणे आपलं लग्न होतं तर आपल्या ह्या अवस्थेचं केवढं कोडकौतुक झालं असतं. आणि आता? दैवाचा सारा खेळ विचित्र. कुठलंही सुख पुरेपूर उपभोगू देत नाही हेच खरं.
तिला फार दिवस काळजी करावी लागली नाही. ज्याने दिलं त्यानेच त्याची विल्हेवाट लावली. चार महिन्यांंचा गोळा मातीत मिळाला. कमळी मोकळी झाली. शरीराने नि मनानेसुद्धा.सारा ताण नि काळजी संपली. शामूला तर स्वत:ला काय वाटतंय हेच कळेना. दु:ख होतं ते रघूच्या जाण्याचं किंवा कमळीच वैधव्याचं. थोडकंसं तिच्या मोकळं होण्याचंही. पण त्यातही मग मनावरचा ताण.. काळजी नि लोकनिंदा हे सारं क्षणात संपलं म्हणून समाधानही वाटायला हवं होतं. पण तेही वाटत नव्हतं. कारण पुढे काय हे प्रश्नचिन्ह तसंच होतं!....
`व्हयने गो...'
हाकेसरशी कमळी भानावर आली. आखाड्याजवळ उभा राहून विष्णू पोस्टमन हाका मारीत हेाता. भोवताली काळोख व्हायला आलेला तिच्या लक्षातच आलं नाही.
`काळोखात बसूनशी काय विचार करतंयस? तुजी चिठ्ठी हाय.'
`कुणाची ती?'
`तां मना कसा कलनार? पर नाव बरिक तुजा हाय. लगनचिट्टी वाटता.'
कमळीने झटकन चिठ्ठी घेतली नि ती घरात गेली. मग तिच्या लक्षात आलं की आधी दिवा लावायला हवा. दिवा लावून तिने चिठ्ठी उघडली.... शामूच्या लग्नाची पत्रिका होती ती. आठवड्याने त्याचं लग्न होणार होतं.
कमळीला कळेना आपल्याला काय होतंय. आनंद वाटतोय की... खरं तर शामूचं लग्न म्हणजे आनंदच वाटायला हवा. पण मग हा सल... ही जीवघेणी कळ का यावी? आपल्याही नकळत आपण शामूत गुंतत चाललो होतो की? मन हेलावून गेलं. तळाचं दडपून टाकलेलं वर आलं. नि मग अवघं मनच गढूळलं. जुन्या आठवणींनी...
रघू गेल्यानंतर एकदा ती संध्याकाळी देवळात गेली होती. श्रावणाचा महिना. कालाष्टमी संपली तरी उत्सवाच्या निमित्तानं कथा होती. विरंगुळा म्हणून ती गेली. नुकतीच सर येऊन गेल्यामुळे वातावरण आल्हाददायक होतं. त्यात बुवांनी राधाकृष्णाचं आख्यान लावलेलं. तिच्या चित्तवृत्ती प्रसन्न झाल्या. रितं मन भरून आल्यासारखं वाटलं. सारं दु:ख, वेदना जणू ती विसरून गेली. घरी परतायला तिन्ही सांजा होऊन गेल्या. ती घरी परतली ती बुवांनी म्हटलेलं राधेचं एक पद गुणगुणतच तिनं घरात पाऊल टाकलं तेव्हा शामू दुकानाच्या फळया लावीत होता. त्याला तिचं ते उशिरा येणं नि गुणगुणणं आवडलं नाही. दुकान बंद करून आत आल्यावर सहज म्हणावं तसं तो म्हणाला,
`घरंदाजांच्या लेकीसुनांनी रस्त्यात गुणगुणणं चांगलं नव्हे. लोकं नावं ठेवतात.'
`ठेवू देत. मी घरंदाज नाही नि आता कुणाची सूनही नाही. उगाच कशाला तो सासुरवास?'
`सासुरवास कसला? काही चांगल्या गोष्टी पथ्य म्हणून पाळायच्या असतात.'
`ज्यांना मनाचा रोग असेल त्यांना ते पथ्य वगैरे. मला मनच उरलं नाही नि रोगही नाही. मग कसलं पथ्य?'
`अगदी नि:संग असल्यासारखंच बोलतेयस. पण भोवती चार लोकं वावरतात त्यांचा काही विचार?'
`लोक काय ते मला म्हणतील. तुम्हाला का उगाच पंचायती?'
`म्हणजे मला बोलण्याचा काहीच अधिकार नाही?'
`कुणास ठाऊक. अधिकार गाजवायची वेळ वाया घालवलीत. आता का गाजवताय?'
`म्हणजे आता तुझा माझा काहीच संबंध नाही?'
`अधिकार नक्कीच नाही !'
त्याला चपराक बसली.कुणीच मग जेवलं नाही. तीही विचार करत डोळे गाळत बसली. राधाकृष्णाचं एवढं सुंदर आख्यान ऐकल्यावर ती त्याच्याशी एकरूप झाली होती. क्षणभर शामूला कृष्ण समजून तिने स्वत:राधा असल्याची कल्पना करून पाह्यली.नि तिची तिलाच लाज वाटली. त्यातून शामूने डोकं उठवलं. नि.... नि मग साऱ्या स्वप्नाचा चक्काचूर झाला. स्वप्नंच ते, भंगायचंच !
आपण तरी असं का वागलो? तिचं तिलाच कळत नव्हतं....एकदा सकाळी शामू आत आला नि म्हणाला,`आज जरा लवकर जेवण कर. मला तालुक्याला जायला हवंय.'
`मी कुणाची ताबेदार नाहीयै हुकूम सोडायला. होईल तेव्हा करीन.'
शामू हतबुद्ध झाल्यासारखा पाहात राह्यला. हल्ली ती नेहमीच वाकडं बोलायला लागली होती. `मी पण कुणाचा नोकर नाहीयै दुकान सांभाळायला. दिवसभर मरावं नि वर बोलणी खावी. चांगला न्याय आहे.'
`काही जरूर नाही दुकान सांभाळायची. माझ्या पोटाला गोळाभर भात मिळेल एवढं भात येतंय घरात.'
`मग... दुकान काय मी माझ्यासाठी सांभाळतोय?'
`मला काय माहीत? भावाच्या पाठीमागे मिळतंय आयतं तर कशाला सोडाल?'
`मी आता बंद करून टाकतो दुकान, खा काय खातेयस ती.'
`मला धमक्या नकोयत. ज्यानी त्यानी पायरी ओळखून बोलावं हे बरं.'
`तू हल्ली फारच तिरसटासारखं बोलतेस. तुला कुणीतरी समज द्यायला हवी चांगली. तुझ्या वडलांनाच कळवतो.'
`काही नकोय कळवायला. माझी मी मुखत्यार आहे. मी कसंही बोलेन... वागेन.'
`पण ह्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं.'
`ह्या थराला म्हणजे? काय हो वाकडं वागले मी? नि ते सांगणारे तुम्ही कोण? काय अधिकार तुमचा?... देवा रे देवा माझंच नशीब खोटं. असं म्हणून तिने कपाळावर हात मारून घ्यायला सुरुवात केली. त्याने पुढे होऊन तिचा हात धरला. धरला मात्र... वाघिणीसारखी ती चवताळून उठली.
`भावजयीचा हात धरायला शरम वाटत नाही? एवढी हौस होती अधिकार गाजवायची तर मांडवातच का नाही धरलात हात. तेव्हा कानावर हात ठेवून मोकळे झालात. एका गरीब गाईचा बळी गेला तुमच्यामुळे. दूर व्हा माझ्यासमोरून. मला इच्छा नाही तुमचं तोंड बघायची.'
ती वात झाल्यासारखी बडबडत राह्यली. शामूही तावातावाने बाहेर निघून गेला. तो दिवस मग तसाच गेला. दुसऱ्या दिवशी ट्न्ंकेत कपडे भरून शामू खरंच जायला निघालर. हिशेबाच्या चोपड्या नि गल्ल्याची पेटी तिच्यासमोर ठेवून तो फक्त दोनच शब्द बोलला.
`मी निघतोय.' आणि ट्न्ंक उचलून मागे वळूनसुद्धा न बघता निघून गेला !...
तिला मग जाणवलं. आपण असं वागायला नको होतं. शामूचा केवढा आधार होता. एकट्या तरण्याताठ्या विधवेनं दिवस काढायचे म्हणजे घरात कुणाचा तरी आधार हवांच. तिला आठवलं. एकदा भागी म्हणालीसुद्धा होती.
`व्हयने, तुमच्या वाण्याबामणातसुद्धा पाट लावतात नाय?'
ती चमकली होती.
`नाय. मी आपल इचारलंय. ह्या असा किती दिवस एकला ऱ्हवाचा. लोकां म्हंतात दिखीत.'
`काय म्हणतात?'
`काय नाय. ह्याच आपला.. मानुस बरा हाय.'
`कोण?'
`ऱ्हावंदे' भागीनी आपला विचार मनातच दडपला.
तेव्हा तिने बोलून दाखवलं नसलं तरी लोकांची कुणकुण तिच्या कानावर आली होतीच. काय हरकत होती तसं व्हायला? पण तिथेसुद्धा शामू दुबळा पडला. भावासारखाच. त्यानेच पुढाकार घेतला असता तर? त्यानेच थोडी जबरदस्ती आणि अधिकार दाखवायला हवा होता.पण आपण तरी कुठे मानला तो. शेवटी व्हायचं तेच झालं.शामूने त्याच्या गावी जाऊन दुकान काढलं नि आता लग्न करणार होता! सारं आठवताना ओठ दाबून तिने आवंढा गिळला. काहीतरी आठवल्यासारखी मग ती आपल्या खोलीत गेली. माच्या खालून पेटी पुढे ओढून तिने पेटी उघडली. पेटीच्या अगदी तळाशी कोंबलेला तो खण नि रघूने लग्नात बांधलेला रुमाल काढून बघत बसली.अगदी एकटक !
शकुनाचा तो खण तिला लाभायचाच नव्हता. कसला शकून नि कसलं काय? चोळी नाही तर निदान कुंची तरी, तीही नाही ! येणारा जीव आलाच नाही नि रघूही निघून गेला. दोन्ही वस्तू तिच्या दृष्टीने निरुपयोगीच. काय करायच्या त्या आता. द्याव्या धाडून शामूला. त्याच्या बायकोला तरी लाभू दे तो खण. तो रुमाल नि खण हातात धरून मग बराच वेळ ती तशीच बसून राह्यली.वाहत्या डोळयांनी. आसवांच्या स्पर्शाने तो शकुनाचा खण जणू पावन झाला!
विजय खाडिलकर, मुंबइ
Posted in


