Skip to main content

आम्ही मुलींकडे राहतो...

`स्त्री-भ्रूण हत्या', लोकसंख्येतलं बायकांचं घटतं प्रमाण, या विषयावर चर्चा सुरू असताना साहजिकच विषय वळला तो त्यामागच्या सामाजिक कारणांकडे. आपल्या पोटचा मुलीचा गर्भ पाडून टाकावा, असं सुखासुखी कुणाला वाटणार नाही, हे तर नक्कीच. मग नेमकी कोणकोणती कारणं त्यामागे असू शकतात ? मुलींच्या लग्नाचा खर्च, हुंडा, मेल्यावर क्रियाकर्म करायला मुलगा याबरोबरच `म्हातारपणाची काठी' असंही मुलाकडे बघितलं जातं. `मुलगी मात्र परक्याचं धन' असं मानण्याची मानसिकता. `हल्ली काळ बदललाय, दोन मुलींनंतरही कुटुंब थांबवलं जातं,' `वृद्ध आईवडील मुलींकडेही राहतात' वगैरे मुद्दे कुणीकुणी काढले, तेव्हाच `आम्ही लेकीकडे राहतो' ही वाचकचर्चा ठेवावी, असा विचार मनात आला. अंकात तसं जाहीरही केलं.
मुलगा आहे म्हणून किंवा नाही म्हणून, मुली-जावया-सोबत राहताना कोणते अनुभव येतात. चार दिवसाचा पाहुणचार वेगळा आणि कायमचं एकत्र राहणं वेगळं, कायम एकत्र राहताना आर्थिक व्यवहार, जेवणाच्या चवी, पाहुणे रावळे, मुलांशी वागणूक, मतभिन्नता, कामाची विभागणी, आजारपणं, असे अनेक मुद्दे महत्त्वाचे असतात.
लेक जावयाबरोबर राहताना कसं वाटतं, हे सांगणाऱ्यांनी यासारख्या विषयांना स्पर्श करावा, अशी आमची अपेक्षा होती. सासू-सून यामध्ये ज्या विषयांवरून (उदा. घरकाम, घराचं स्वामित्व इ.) वाद होतात, भांड्याला भांडं लागतं, तेच विषय मायलेकीत कसे हाताळले जातात, की दोन स्वतंत्र व्यक्ती म्हटल्या की नातं कोणतंही असताना, वाद होतातच, हे जाणून घ्यायचं होतं. मुलाच्या संसारापेक्षा, लेकीकडे अधिक ऊब जाणवते का, आणि जाणवत असेल तर नेमकी कशामुळे, अशा अनेक नाजूक प्रश्नांची उत्तरं, या चर्चेतून समोर यावीत अशी अपेक्षा होती. चर्चेच्या निमित्तानं अशा पालकांची कौटुंबिक परिस्थिती (आर्थिक परिस्थिती अशा अर्थानं नव्हे, `चित्र' या अर्थानं) वाचकांना दिसावी, हा या आवाहनाचा हेतू होता.
मुलींच्या संसारातही आईवडील छान सामावले जाऊ शकतात, `मुलगीही आईवडिलांची म्हातारपणची काठी बनू शकते' असं आशादायी चित्र समोर आलं, तर स्त्री भ्रूणहत्येला विरोध करणारं एक अस्त्र, आपल्या हाती आहे, असं आपण अभिमानानं सांगू, असं वाटत होतं.
शहरी, मध्यमवर्गीय समाजात पाहिलं तर अशी अनेक कुटुंबं अवतीभवती दिसतात, पण...
वाचकचर्चेला भरघोस प्रतिसाद मिळाला, असं आम्ही म्हणू शकत नाही. २५/३० लेख आले.
मुंबई, कोल्हापूर, बेळगाव, नागपूर, पुणे या गावातून बहुतेक सर्व स्त्रियांनी लिहिलेले हे अनुभव आहेत.
सुनंदा प्रभूंसारख्या इतरही काहींनी सध्या राहतोय, पण शक्य होईल तोवर स्वतंत्र राहण्याची इच्छाच व्यक्त केली आहे. सुरेखा उल्लागड्डी, एक मुलगी परदेशी असल्यानं, भारतात राहणाऱ्या मुलीकडे राहतात. जावई बोटीवर असतो. त्यामुळे दोघांनाही एकमेकांची गरज असल्यानं एकत्र राहतात.
सुनीता घाटे याही, `आता तुमचं वय झालंय. एकटे राहू नका, असा लेकी जावयांनी आग्रह केल्यानं लेकीकडे राहतात. `असे जावई मिळणे ही सात जन्माची पुण्याई', असं म्हणतात.
हे लेख वाचताना बहुतेक सर्व सासवांनी जावयांचं मन:पूर्वक कौतुक केलेलं दिसलं. `जावई' प्रेमानं सेवा करतात, हवं-नको पाहतात, असं आवर्जून सांगितलं आहे. ते वाचताना नकळत वाटून गेलं, की मुलासुनेसोबत राहणाऱ्या किती सासवा, `सून प्रेमानं करते, हवं-नको पाहते' असं खुलेपणानं कौतुक करतात? `अजूनही सुनेनं ते करायलाच हवं, ती तिची जबाबदारी' आणि
जावयानं केेलं तर ते अप्रूप', असं मानण्याची मानसिकता आहे, हे वास्तव लेखांनिमित्तानं पुन्हा समोर आलं.
ठाण्याच्या प्रतिभा पेंडसे यांनी मुलगा अमेरिकेत असतो म्हणून लेकीकडे राहण्याचा निर्णय घेतला. पण त्या मुलाकडेही बरेच महिने जाऊन राहतात. आणि मुला/मुलीकडे कुठेही राहिलं तरी उपरं वाटत नाही. जनरेशन गॅपमुळे किरकोळ मतभेद होतात, पण ते होणारच आणि मुलांबरोबर राहिल्यानं कित्येक आवडीच्या, हिताच्या गोष्टी विनाकष्टाच्या मिळतात. त्यांच्यापुढे हे क्षुल्लक मतभेद कस्पटासमान वाटतात, असं म्हटलंय.
`मुलांच्या फुलणाऱ्या संसारात, त्यांच्या गरजेला, आपली अडचण वाटू न देता राहावं', अशी मोलाची गोष्ट त्या सांगतात. `कुठेही राहिलं तरी स्वत:चे छंद जोपासायला हवेत' हेही सांगतात.
प्रमिलाताई केळकर मूळच्या अनगोळच्या. त्यांच्या जावयाला क्रॅन्सर झाला म्हणून लेकीकडे गेल्या. पुढे त्यांचा मृत्यू, त्यांच्या जागेवर मुलीला मिळालेली नोकरी, अशा कारणांनी त्यांचं तिथे राहणं वाढत गेलं, पण कधीही परकेपणा जाणवला नाही, उलट `जावयांसह सर्वांना आमचा आधारच वाटतो' हे जाणवायचं, असं त्यांचं म्हणणं.
कोल्हापूरच्या सरला वझे यांनी त्यांच्या नात्यातल्या काही वयस्करांबद्दलचे अनुभव सांगितले आहेत. `आईचा जीव लेकीत जास्त गुंतलेला असतो' असं त्याचं सार !
बेळगावच्या शेल्लीकेरींचा मुलगा अमेरिकेत असतो. तिथे आपल्याला कायमचं राहणं आवडणार नाही. त्यापेक्षा लेकीच्या गावी (बेळगाव) राहावं, असं ठरवून त्यांनी पार्ल्याहून बेळगावला मुक्काम हलवला. मात्र अजूनही प्रत्यक्ष मुलीच्या घरात न राहता घराजवळ राहाणंच ते पसंत करत आहेत. मुलगा असो वा मुलगी, त्यांच्यावर ओझे होऊ नये. ओढ टिकून राहावी, असं त्यांचं मत.
`रामसुता' या टोपणनावानं एक लेख आला आहे.स्वत:च्या मुलासुनांच्या संसारात आईवडिलांना कसे वाईट अनुभव आले, ते त्यांनी प्रसंगातून उलगडून सांगितले आहेत. मुलांच्या वाईट अनुभवातून त्यांनी लेकीकडे राहायचा निर्णय घेतला आणि गेली पाच वर्षे त्यांना अतिशय चांगले अनुभव आले.
प्राजक्ता कुलकर्णी यांचा पुण्याहून विस्तृत लेख आला आहे. दोन मुली, एक मुलगा असं परिपूर्ण कुटुंब. मुलींची लग्नं झाली, मुलगा उच्चशिक्षणाला परदेशी गेला. अचानक एक जावई गेला त्यामुळे मुलगी माहेरी आली. पुढे अनेक स्थित्यंतरं होत गेली आणि मुलीनं पायावर उभं राहून आईवडिलांनाच आधार दिला. लेखाचा शेवट असा, ``आम्ही, आमची मुलगी व नातवासोबत आनंदात आहोत, आणि हेच पूर्ण कुटुंब आहे असं आम्हाला वाटतं. इथे प्रत्येकजण एकदुसऱ्यावर फक्त प्रेम करतो आणि एकमेकांशी काळजी घेतो.''
बहुसंख्य लेख हे मध्यमवर्गीय कुटुंबातले आहेत. एक लेख कोल्हापूरहून वैशाली गोखले यांनी शब्दांकन करून पाठवला आहे. सगुणाबाई तोरस्कर या अल्पउत्पन्न गटातल्या स्त्रीचा. ट्न्क ड्नयव्हर नवरा, लग्नात ८/१० तोळे सोनं, पण मुलगी दोन वर्षांची असताना अपघातात नवरा गेला आणि परवड वाट्याला आली. धुण्याभांड्याची कामं करून लेकीला वाढवलं. लग्न लावून दिलं. तिच्या गरजेच्या वेळी तिच्याकडे राहायला गेल्या. पण काही वर्षांनी गरज संपल्यावर, नातवाचं लग्न झालं. जागा कमी पडायला लागल्यावर आईला घराबाहेर पडण्याचं सुचवलं.
सगळे अनुभव सांगून शेवटी सगुणाबाई व्यावहारिक सल्ला देतात, ``मुलगा-मुलगी-भाचा-पुतण्या, कुणाच्याही घरी राहा, तुम्ही जोवर कष्टानं, पैशानं करत राहाल तोवरच तुम्हाला मान ! तुमची ऐपत, शक्ती किंवा त्यांची गरज संपली की सगळंच संपतं. मग तुम्ही तिथे परक्याच ! शेवटी मी ठेवलेला पैसाच कामी येईल, असं वाटतंय.
सांगलीहून आलेलं सिंधूताई काळे यांचं अनुभवकथन अतिशय सकारात्मक वाटतं. त्यांना चार मुलगे, दोन मुली. धाकटी लेक-जावई डॉक्टर. त्यांच्या घरात नोकरमाणसं असली तरी कुटुंबातली एखादी ज्येष्ठ व्यक्ती हवी, या गरजेतून त्या मुलीकडे राहायला गेल्या. मुलगा असताना मुलीकडे राहणं, त्यांच्या घराल्यांनी जसं स्वीकारलं तसंच सुनेच्या आईचं मुलाकडे राहणं, त्यांच्या व्याह्यांनीही ! `सुनेची आई माझ्या मुलाच्या संसारावर राज्य करते' असा विचारही त्यांंच्याकडच्यांना शिवला नाही.
त्यांनी म्हटलंय, ``मी स्वत:चंच घर समजून शिस्त, नेटकेपणा राखला. उधळमाधळ केली नाही. अधूनमधून मुलांच्या घरी गेलं तर उलट तिथेच परकेपणा जाणवतो.''
ठाण्याच्या निर्मला बर्वे गेली ३०हून अधिक वर्षे मुलीकडे राहात आहेत. इतक्या वर्षांत एकदाही पश्चात्ताप वाटला नाही. जावयानं त्याचे आईवडील आणि या दोघात काहीही भेदभाव केला नाही. काशीयात्रेलाही सर्वांना मिळून नेलं.
वाचकचर्चेला आवाहन देणारे हे सर्व लेख पूर्ण स्वरूपात छापता येणं शक्य नसल्यानं त्यातल्या काही ठळक बाबींचा उल्लेख इथे केला.
वेगवेगळया भागांतून लेख आले ते स्वागतार्ह वाटले. आपल्या मनीचं आम्हाला सांगावं वाटलं, म्हणून त्या सर्व लेखकांना मनापासून धन्यवाद.
पण तरीही एक खंत जरूर वाटते, ती म्हणजे लेखात पारदर्शक अनुभवांची कमतरता जाणवली. एकत्र कुटुंबातून विभक्त कुटुंबाकडे आपल्या समाजाची वाटचाल वेगाने होत आहे. अशावेळी लेक-जावयासह एकत्र कुटुंब ही वेगळी उदाहरणं असणार आणि म्हणूनच त्यातली सुख-दु:खं, राग-लोभ, आर्थिक देवाणघेवाण यासारख्या गोष्टींविषयी जाणून घ्यायचं होतं, पण तपशिलाच्या खोलात कुणी फारसं गेलेलं नाही.
त्या अनुभवांचं विश्लेषणही कुणाला करावं वाटलं नाही. अमुक गोष्ट मुलीनं केली म्हणून चालली, कदाचित सुनेनं केलेली आवडलीही नसती, अशा प्रकारचं सडेतोड लेखनही पिचत एखाद्या ठिकाणी आढळलं. लेखनात सडेतोडपणा नसणं, कमी प्रतिसाद येणं, याचा अर्थ अजूनही आपल्या समाजात मुलीकडे राहणाऱ्यांचं प्रमाण कमी आहे की त्याबद्दल बोलणं म्हणजे मुलाला दुखावणं अशी भीती आहे ? खरंतर जे व्यक्तिगत असतं, तेच कुठेतरी सार्वजनिक जीवनातही दिसतं, म्हणून असे अनुभव जास्तीत जास्त समाजासमोर आले तर अशी उदाहरणे जास्तीत जास्त प्रमाणात दिसू लागतील हा चर्चेमागचा प्रमुख हेतू होता.
तरीही वाचक चर्चेच्या निमित्तानं वाचकांशी भेट झाल्याचा, परस्परसंवाद साधल्याचा आनंद मिळतो. पत्रातून वाचक भेटत असतात, पण सहसा ती खुषी/नाखुषीची पत्रं असतात. आपली मतं आणि वाचकांची मतं कितपत जुळतात, आपल्या म्हणण्यावर वाचक कसा प्रतिसाद देतात, ते जाणून घेण्यासाठी या चर्चा फार महत्त्वाच्या असतात.
सतत स्वत:शी संवाद साधणाऱ्या साऱ्याजणी परिवारातर्फे सर्व चर्चा लेखकांना पुन्हा एकदा धन्यवाद !
नीलिमा बोरवणकर, पुणे

मनोगत :
डॉ. छाया नाईक
नुकताच जर्मनीतील २ महिन्यांचा मुक्काम आटोपून भारतात आलो. आल्या आल्या `मिळून साऱ्याजणी'च्या मे महिन्याच्या अंकातील `मुलगा आहे तरी आम्ही मुलीकडे राहतो' या विषयावर लेख लिहून पाठवायचे आवाहन वाचले. आतापर्यंत `वृद्धाश्रम - काळाची गरज', `वृद्धाश्रम - किती योग्य, किती अयोग्य' या विषयावर चर्चा झडत होत्या. वृद्धांनी काय करावे; यापेक्षा वृद्धांची सोय कशी लावावी हा प्रश्न आपल्याकडे अजूनही ऐरणीवर आहे. तरुणाईची जीवन जगण्याची वाढती गती आणि वृद्धांची मुळात कमी असलेली आणि वाढत्या वयाबरोबर कमी होत जाणारी गती यातील हा संघर्ष आहे. वाढलेल्या जीवन मर्यादेनं हा प्रश्न बिकट होत चालला आहे. त्यातील भावनिक बाजूंनी वृद्ांना केविलवाणे व तरुणांना बेदरकार केले आहे.
जर्मनीत आम्ही ज्या इमारतीत राहत होतो, त्याच्या बाजूच्याच इमारतीत सरकारी वृद्धाश्रम होता. १७८ वृद्ध तेथे राहत होते. (बहुतेकांचे वय ९० च्या पुढे सर्वजण व्हीलचेअर शिवाय हालचाली करायला असमर्थ. स्वत:च्या हाताने जेवणेही त्यांना शक्य नव्हते. पण त्यातले कोणीही आजारी नव्हते. वाढत्या वयामुळे देह थकलेला. ऊन असले की सर्व व्हीलचेअर्स अंगणात ओळीने उभ्या राहात. त्यांचा नाश्ता तिथे व्हायचा तेव्हा सर्वजण दिसत. जर्मन भाषेशिवाय दुसरी भाषा त्यांना येत नव्हती.) दुभाष्याच्या मदतीने त्यांच्याशी संवाद साधला. बहुतेक सर्वजण समाधानी होते. वृद्धाश्रमात येण्यापूर्वी स्वतंत्रपणेच राहात होते. पिचतच कुणाची मुले - (साठीच्या वर त्यांचे वय) - नातवंडे (तिशी पस्तीशी उलटलेले) भेटायला येत. त्यांना व्हीलचेअरवरून थोडेसे फिरवून आणत. रविवारी त्यांच्यापैकी काहीजण स्मशानात जाऊन आपल्या प्रियजनांच्या कबरीवर फुले वाहून येत. `इथे काही त्रास किंवा गैरसोय होत नाही का ?' या प्रश्नावर सगळयांच्याच चेहऱ्यावर आश्चर्य उमटले. आपल्या मुलाने/मुलीने आपले काही करावे ही अपेक्षाच नसल्याने, तशी सामाजिक पद्धतच नसल्याने आणि वृद्धाश्रमात नोकरी करणारा कर्मचारीवर्ग कर्तव्यतत्पर असल्याने आपल्या समोर असणाऱ्या समस्या त्यांच्यासमोर नव्हत्या हे स्पष्ट आहे.
हे चांगले की वाईट या वादात मला शिरायचे नाही. फक्त वस्तुस्थिती सांगितली. कारण -
`मिळून साऱ्याजणी'च्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा म्हणून मी काही मध्यमवर्गीय वृद्ध जोडप्यांना भेटले - त्यांच्या प्रतिक्रिया -
प्रथम भेटले ते जोडपे `अ' आजोबा. वय वर्षे ८०, आजी ७५ वर्षे. एक मुलगा व सून डॉक्टर. दुसरा मुलगा इंजिनिअर. त्याची बायको डॉक्टर. राहतात शाळेत शिक्षिका असलेल्या मुलीकडे. का? या प्रश्नाचं उत्तर, `आपणच आपली लक्तरं वेशीवर टांगायची का ?'
मुलांशी - त्याहीपेक्षा सुनेशी न पटणं हे मुख्य कारण. तपशिलात फरक असतो. पण खाण्यापिण्याच्या सवयी, झोपायच्या व उठायच्या वेळा यातच बहुधा संघर्ष आढहतो.
दुसरे `ब' जोडपे मुलाच्या लग्नानंतर मुलगा व सून यांच्याबरोबर २० वर्षे राहिले. सून नोकरी करणारी. त्यामुळे तिला सासू सासऱ्यांची मदत हवी होतीच. नातवंडं लहानाची मोठी झाली. सासू-सासऱ्यांची गरज संपली आणि इतके दिवस न बोचलेले काटे टोचू लागले. `ह्यांना दोघांनाही डायबेटिस. तरीही चोरून गोड खातात. मग तब्येती बिघडल्या की आम्हांलाच त्रास होतो.' म्हणत स्वयंपाक घराला कुलुप लागलं. `जन्मभर आम्हीच करायचं का ?' म्हणत पंच्याहत्तरी ओलांडल्यावर मुलीकडे रवानगी झाली.
तिसरे `क' आजी-आजोबा. यांची मुलगी लग्नानंतर ८ वर्षांत विधवा झाली. पदरात तीन मुलं ! मुलाशी व सुनेशी बोलून मुलीकडे राहायला गेले. वडीलांची पेन्शन व आईचे कष्ट-मुलीचा संंसार मार्गी लागला. नातवंडं मोठी झाली. नातवाचे लग्न ठरले आणि
आजी-आजोबांची अडचण वाटू लागली. बावीस वर्षं मुलीचा संसार सांभाळल्यावर आता मुलाकडे आले. मुलगा-सून समंजस. पण यांनाच तिथं उपऱ्यासारखं वाटतं. `काय लिहायचं? मुलगी दुखावेल ना ?'
चौथ्या `ड' जोडप्याला तीन मुली. सगळयांची लग्न झाली. आधी स्वतंत्र राहात होते. ज्या मुलीची गरज असेल तिच्याकडे नातवंडं सांभाळायला कधी मुलीच्या/जावयाच्या धंद्यात मदत करायला जात होते. आता शरीर थकलं. चार-चार महिने एकेका मुलीकडे राहतात. `दर दिवाळीत माझ्याचकडे', एक मुलगी कुरकुरते. `आमच्या वाट्याला कधी फेब्रुवारी महिना येतच नाही. जुलै-ऑगस्ट आपले आमचे', दुसरी कुरकुरते. `यांना आता वृद्धाश्रमातच ठेवू या', तिसरीचे प्रयत्न सुरू असतात. थकले भागलेले आईवडील मृत्यूची वाट पाहात आहेत. पण त्यांना वृद्धाश्रम नको आहे.
पाचवे जोडपे स्वतंत्र राहाणारे. वय ८५ च्या पुढे. दोन मुलींची साठी उलटलेली. मुलगा साठीचा. या वयातही हे मजेत जगतात. भरपूर खातात-पितात-चार माणसं गोळा करून त्यांनाही खाऊ-पिऊ घालतात. अजूनही यात्रा कंपनीबरोबर प्रवासाला जातात. हे त्यांच्या मुलांना - (त्यात मुलीही आल्याच) सहन होत नाही. `आहे तो पैसा उडवून टाकतील आणि शेवटी आजारी पडले की येतील आमच्या दारात. मग कोणी करायचं यांचं ?' सून उघडपणे बोलते. इतर बोलले नाहीत तरी भाव तोच असतो.
आजच्या मध्यमवर्गीय घरांतील ही प्रातिनिधिक चित्रं आहेत. मुलगा नाही म्हणून किंवा मुलगा आहे तरीही मुलींकडे राहणारी जोडपी किंवा एकेकटे वृद्ध बरेच आहेत. पण त्यांना आपल्याला मुलींकडे राहावं लागतं ही स्वत:ची मानहानी वाटते. काही जण मूकपणे सहन करतात. काही जण मुलाची/सुनेची निंदानालस्ती यथेच्छ करतात. काही स्वतंत्र राहतात - (पण त्यांचं हे स्वातंत्र्य त्यांच्या मुलांच्या डोळयांवर येतं.)
झालंय असं की गेल्या ५० वर्षांत समाज जीवन पूर्णपणे बदललं आहे. ७-८ मुलांना जन्म देणारे आई-बाप आता कालौघात नाहीसे होत आहेत. ७-८ मुलांपैकी सगळयात मोठा मुलगा नाईलाजाने का होईना, आईवडिलांच्या संसाराला हातभार लावायचा. ते वृद्ध झाले की त्यातल्या त्यात वयाने लहान असणारा मुलगा - स्वत: तरुण असल्याने त्यांच्याकडे लक्ष देऊ शकायचा - वेळ आली की त्यांची शुश्रूषा करायचा. कुटुंबात वैयक्तिक आवडीनिवडीला फारसे स्थान नव्हते. त्यामुळे तेव्हाचे प्रश्न वेगळे होते.
दोन मुलींच्या जन्मानंतर मूल न होऊ देणारे आई-बाप आता सत्तरी-पंच्याहत्तरीत आहेत. ४०-५० वर्षांची सरासरी आयुर्मर्यादा आता ९०-९५ पर्यंत पोचते आहे. प्राणघातक साथीचे रोग नष्ट झाले अन् त्यांची जागा डायबेटिस, हाय ब्लड प्रेशर, हार्ट अॅटॅक अशा डिजनरेटिव्ह आजारपणांनी घेतली. विभक्त कुटुंब अस्तित्वात आली तरी अजूनही आई-वडिलांनी मरेपर्यंत मुलाकडे आणि मुलगा नसेल तर आता मुलीकडे राहावे अशीच आपली मानसिकता आहे. गेल्या १०-१५ वर्षांमध्ये माणसाच्या वैयक्तिक जीवनात आणि त्यामुळे समाजजीवनातही प्रचंड बदल झाला आहे. ह्या बदलाशी जुळवून घेता येत नाही आणि त्यामुळेच `आपली लक्तरं वेशीवर टांगणे',`आमच्या दारात येऊन पडणे' असे शब्दप्रयोग वापरात येतात. `येणारं म्हातारपण' या प्रश्नाचा आपण बुद्धिनिष्ठ विचार केला पाहिजे, ही वेळ आता आली आहे असे वाटत नाही का ?
डॉ. छाया नाईक

मनोगत :
सुधा देव
आम्हाला दोन मुलीच ! ह्या मुलीच मधला च हा आमच्या मनातला नसून आमचे सन्माननीय नातलग आणि भोवतालचा समाज ह्यांच्या मनातला आहे. कारण मुलगा म्हणजे वंशाचा दिवा किंवा म्हातारपणीची काठी अशा काही कल्पना आमच्या मनात कधीच नव्हत्या. मात्र आपल्याला दोन मुले असावीत कारण त्यामुळे मुलांचे बालपण सहज सुंदर होते यावर आमचा आमच्या बालपणामुळे विश्वास होता. ह्या दोन्ही मुलींना आम्ही व्यक्ती म्हणून वाढवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मुली म्हणून काही वेगळया सवलती दिल्या नाहीत, किंवा त्यांच्यावर मुलगेपणही लादले नाही. मात्र स्त्रीत्वाच्या नैसर्गिक फायद्यातोट्यांची कल्पनाही त्यांना योग्य वेळी दिली आणि मुलगा मुलगी असा भेद आमच्या मनात नसला तरी भोवतालच्या समाजात असल्याने त्याचा सामना तुम्हाला समर्थपणे करावाच लागेल याचीही जाणीव करून दिली.
पाहता पाहता मुली मोठ्या झाल्या. शिक्षित झाल्या. मोठी मुलगी इंटिरियर डिझायनिंगच्या परीक्षेत युनिव्हर्सिटीत सर्वप्रथम आली. धाकटी मुलगी कॉम्प्युटरच्या परीक्षेत युनिव्हर्सिटीत पहिली आली. दोघी आपापल्या पायांवर स्वतंत्रपणे उभ्या राहिल्या.
मोठ्या मुलीला व्यावसायिकच नवरा हवा होता. त्याप्रमाणे तिला तसा नवरा शोधला. लग्नानंतर वर्षभरातच तिला मुलगा झाला. ती संसारात रमली - आणि अडकलीही ! मोठीच्या लग्नानंतर पाच वर्षांनी धाकटीचे लग्न ठरले. आता दोन्ही मुलंीची लग्ने झाल्यानंतर आपली महत्त्वाची जबाबदारी पार पाडल्याच्या समाधानात, आम्ही उरलेले आयुष्य एकमेकांच्या साथीने संपन्न करणार होतो. त्यावेेळी आपण एकटे कसे राहणार, म्हातारपणी आपले कसे होणार असे काही विचार मनात आलेच नाहीत. कारण आम्ही दोघेही आपापल्या क्षेत्रात कार्यरत होतो. पण धाकट्या मुलीचे लग्न झाले आणि लगेचच मोठ्या मुलीपुढे व्यवसायाची एक चांंगली संधी चालून आली. मात्र तिचा मुलगा लहान असल्याने त्याचे काय करायचे हा प्रश्न होता. व्यवसाय म्हटला म्हणजे नोकरीसारखी ठरावीक वेळ असणार नाही. परगावीही जावे लागेल. त्यामुळे मुलाला फक्त दिवसभर माझ्याकडे ठेवून भागणार नाही, शिवाय या व्यवस्थेत मुलगाही कुठेच नीट रूळणार नाही, माझे घर आणि त्याच्या आईवडिलांचे घर या दोन्हीत कदाचित कुठलेच घर त्याला आपले वाटणार नाही. त्याची शारीरिक आणि मानसिकही खूप ओढाताण होईल असा विचार आमच्या मनात आला आणि त्यातूनच मग सर्वांनी एकत्रच राहण्याचा पर्याय पुढे आला. शिवाय आपली मुलगी खूप बुद्धिमान आहे, तिला जर चांगली संधी मिळत असेल तर तिच्या पाठीशी उभे राहणे हे पालक म्हणून आपले कर्तव्य आहे असेही आम्हांला वाटले आणि त्याप्रमाणे गेली दहा वर्षे आम्ही एकत्र राहात आहोत.
आता ही दहा वर्षे अगदी गोष्टीतल्यापमाणे छान छान गेली का ? तर नक्कीच नाही. मात्र आपण घेतलेल्या निर्णयाचा पश्चात्ताप व्हावा असे प्रसंग फार फार पिचत आणि तत्कालीकच आले. कारण एकत्र राहायचे ठरवले तर साधारणपणे कोणकोणत्या अडचणी येतील यावर आम्ही चौघांनी एकत्र बसून चर्चा केली. काही मार्गदर्शक तत्त्वे ठरवली; ज्यामुळे वादविवाद व कटुता गैरसमज कमी होतील ! आम्ही मुलगा मुलगी भेद मानत नसल्याने मुलीकडे कसे राहायचे असा काही विचार आमच्या मनात आला नाही. जावयाच्या बाजूनेही तसा प्रश्न आला नाही कारण तो स्वत: व्यावसायिक असल्याने एकत्र राहण्याचा फायदा त्यालाही मिळणारच होता. मुळात आम्ही मुलीकडे किंवा मुलगी आमच्याकडे राहणार नसून आपण सगळे एकत्र राहणार आहोत ही भावना आमच्या सर्वांच्या मनात पक्की होती. मात्र असे राहणे समाजप्रवाहाच्या जरा विरुद्ध असल्याने त्या दृष्टीने काय काय अडचणी येतील आणि त्याला कसे तोंड द्यायचे यावरही विचार केला. साधारणपणे पुढील मुद्द्यांवर चर्चा झाली.
१) आपण एकत्र राहणार ते परस्परांची गरज म्हणून ! म्हणजे मुलाला सांभाळले जाणे ही मुलीची गरज आहे, तशी नातवाशी खेळणे, त्याची माया ही आमची गरज आहे. काही वर्षांनी या गरजांचे स्वरूप बदलेल. मात्र कुठल्याही परिस्थितीत आणि कुठल्याही काळात फक्त एकालाच गरज आहे अशी भावना किंवा विचार प्रबळ होता कामा नये. तो अन्याय ठरेल.
२) आर्थिक पारदर्शकता - साधारणपणे महिन्याचा एकूण खर्च किता होतो तो काढून त्याचे व्यक्तींइतके समान भाग करायचे. आमचया दोघांचा खर्च आम्ही द्यायचा. त्यांचा त्यांनी द्यायचा. महिन्याच्या एक तारखेला सर्व पैसे एकत्र करून ठेवायचे व आमच्या दोघांपैकी एकाने हिशोब लिहायचा. पिचत जास्त खर्च झाल्यास तो सर्वांनी वाटून घ्यायचा. घरखर्चाखेरीज इतर खर्च म्हणजे औषधपाणी, कपडे, प्रवास, मुलांची शिक्षणे इ. ज्याचा त्याने करायचा.
३) आपण दोन स्वतंत्र कुटुंबे असून प्रत्येकाचे स्वातंत्र्य जपले गेले पाहिजे. म्हणजे सर्वांनी एकत्र सिनेमाला, हॉटेलात किंवा गावाला जाण्याइतकेच स्वतंत्रपणे जाणेही नैसर्गिक समजले पाहिजे. त्यात मानापमानाचा प्रश्न आणायचा नाही.
४) आपले समज गैरसमज, न आवडलेल्या गोष्टी ह्या त्या त्या व्यक्तीला सांगायच्या. म्हणजे जावयाने मुलीला व तिने आम्हाला किंवा उलट म्हणजे आम्ही मुलीला व तिने तिच्या नवऱ्याला अशा पद्धतीने संवाद ठेवायचा नाही. जे काही बोलायचे ते समक्षच!
५) आपले असे एकत्र राहणे हे तसे प्रवाहाच्या विरुद्ध आहे. त्यामुळे बाहेरचे लोक विशेषत: नातलग काड्या टाकण्याचा प्रयत्न करतील - म्हणजे आम्हांला असे ऐकावे लागेल की - `काय करणार हो बिचारे, मुलगा नाही ना, शेवटी जावयाचा आधार घ्यावा लागला !' - आणि जावयाला `घरजावई' म्हणून हिणवणार! सासऱ्याच्या पैशावर डोळा ठेवून एकत्र राहातोय असा आरोप करणार ! पण आपण कुणालाही काहीही स्पष्टीकरण द्यायला जायचे नाही. कारण लोकांना समजून घ्यायचेच नसते. त्यामुळे परिस्थिती अधिक चिघळते. त्यापेक्षा आपल्यात सामंजस्य ठेवायचे.
आता जरी एकत्र बसून हे सगळे ठरवले तरी ते तसे अगदी सहज सुरळीतपणे निदान सुरवातीला तरी झाले नाही. विशेषत: पहिली दोन वर्षे खूप कटकटीची गेली. कारण सुनेप्रमाणे जावई हा दुसऱ्या घरातला असल्याने त्याच्या सवयी आवडीनिवडी अगदी वेगळया होत्या. त्याच्या दृष्टीने आमचेही तसेच होते. शिवाय मुलीनेही लग्नानंतर पाच वर्षे स्वतंत्र संसार केल्याने तिच्यातही खूप बदल झाला होता. आमच्या दोघांच्याबाबतीत आम्ही नेहमीच स्वतंत्र राहिल्याने आम्हांलाही हे बरेचसे बंधनात्मक झाले. त्यामुळे अनेकदा वादविवाद गैरसमज आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना आपल्याला गृहीत धरल्याचा राग असे प्रत्येकाचे झाले. मात्र दोन वर्षांत हळूहळू सगळे स्थिरावले. सर्वांना सर्वांच्या
स्वभावाचा साधारण अंदाज आला. गुणदोष समजले. सगळयांनी सगळयांना आहे तसे स्वीकारले. मुख्य म्हणजे चौघांच्याही दृष्टीने दोन्ही मुले - (मधल्या काळात तिला एक मुलगी झाली.) केंद्रस्थानी होती. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत घर मोडायचे नाही हे निश्चित होते. मुलांइतकाच महत्त्वाचा होता व्यवसाय ! मध्यमवर्गीय मराठी माणसाची मुलगी स्वतंत्रपणे व्यवसाय करते ही गोष्ट आमच्या दृष्टीने खूप अभिमानाची होती. त्यामुळे तिचा व्यवसाय वाढण्यासाठीही एकत्र राहणे गरजेचे होते. शिवाय दोन वर्षांत हळूहळू एकत राहण्याचे फायदे सर्वांनाच जाणवू लागले होते. जेवणाच्या टेबलावर गप्पा इतक्या रंगत की हात वाळून जायचे. व्यवसायातले विविध अनुभव, शाळेतल्या गंमतीजमती यात वेळ कसा संपायचा ते कळत नसे. मुले (नातवंडे) थोडी मोठी झाल्यावर आम्ही पुन्हा आपापल्या कामांना सुरुवात केली. ह्या दहा वर्षात मुलीचा व जावयाचा व्यवसाय खूप विस्तारला. त्यांनी स्वत:चा कारखाना काढला. पर्यावरणाला अनुकूल असा वेगळयाच प्रकारचा रंग तिने तयार केला. पाणी आणि सिमेंटशिवाय प्लॅस्टरचा शोध तिने लावला. नुकताच तिला `उद्योगजननी' हा पुरस्कारही मिळाला.
आज मागे वळून पाहताना असं वाटतं की त्यावेळी आम्ही जर मुलीबरोबर कसे राहायचे, लोक काय म्हणतील असा कोता विचार केला असता, किंवा आता मुलीचे लग्न झाले आहे, तिचे प्रश्न तिने सोडवावेत, आम्ही आता स्वातंत्र्य उपभोगणार असा स्वार्थी विचार केला असता तर माझ्या मुलीच्या असामान्य बुद्धिमत्तेचा फायदा समाजाला मिळाला नसता आणि आमचेही आयुष्य एकटेपणामुळे कदाचित एकांगी झाले असते. आज तरुण पिढीच्या सहवासात राहिल्याने आमचेही मन तरुण राहिले आहे आणि नातवंडांशी गप्पा मारण्यात, खेळण्यात, हट्ट पुरवण्यात आम्हीही पुन्हा लहान होतो, आमचे वय विसरतो, काळाबरोबर धावू लागतो, आमचे आयुष्य पुढे सरकत राहते, वाहात राहते.
सुधा देव

If you are scouring for

If you are scouring for Discount Louboutin, then, you are able to come across it on the internet.Cheap Louboutin speak about your company’s image. It’s going to act as a representation of one’s provider and hence gift suppliers on line have developed Louboutin Outlet and trendy gifts, Christian Louboutin Pumps liked by all. Discover a gamut of personalized gift suppliers and they can customize your gifts, in addition to gift ideas Christian Louboutin Boots to you.There are certain gift objects that are exclusively developed for a unique occasion. These are ideal to be Louboutin UK press conference, corporate events, organization meetings, trade shows or summit.