लहानपणी आजीच्या मागेमागे देवळात जाताना सुप्रियाला खूप गंमत वाटे. मुरुमाच्या रस्त्यावरून चालताना आजीच्या चपलांचा `कुर्रुक कुर्रुक' असा आवाज येत असे. टाचेच्या भाराने छोटे छोटे दगड उडत असत. ती ते टक लावून पाही. तिला मग आजीच्याच चपला घालाव्याशा वाटत. संधी मिळाली रे मिळाली की त्या ती घाली. आणि चालताना मुद्दाम मागे वळून पाहात, दगड तसेच उडतात का ते बघे.
याशिवाय आजीच्या नऊवारी पातळाच्या निऱ्या, मागून तिच्या दोन्ही पायांमधून पंख्यासारख्या उघडझाप करीत, त्याचीही तिला भारी मजा वाटे. मधून मधून ओचे सारखे करून, पदर खांद्यावरून ठाकठीक करत चालायची आजीची लकब तिला पाठ होती. त्यामुळे आजीबरोबर कुठंही जायचं म्हटलं की सुप्रियाचा वेळ एकंदरीत छान जात असे. त्यातून देवळात जायचं म्हटलं की सुप्रियाची कळी खुलत असे. तिथले तेल, उदबत्ती, पंचामृत, फुले वगैरेंचे वास, मंत्रघोष, कथेकरी बुवांचे कीर्तन, नुसती मजाच मजा!
आजी भिंतीची जागा धरून बसे आणि ही परकर सावरत आजीला चिकटून. सर्वात तिला आवडे म्हणजे बुवांनी गळयात घातलेला ताज्या फुलांचा रसरशीत सुंदर हार. तो कुणीतरी अतिशय भक्तिभावाने घरून करून आणलेला असायचा. चांगला सुप्रियाच्या छोट्या दंडाएवढा जाडीचा. त्याच्या मधे मधे गुलाबाची फुलं गुंफलेली असत. तेवढा हार घालण्यासाठी तरी आपण कीर्तनकार व्हावे असं सुप्रियाला वाटून गेलं होतं.
बुवांनी आख्यान लावलं की ती त्यात अगदी तल्लीन होऊन जाई. आरती सुरू झाली की मगच तिची समाधी भंग होई. आख्यान जर चिलीया बाळाचे असले तर चिलीयाच्या आईबरोबर तिचेही अश्रू उखळात पडत. दुष्ट हिरण्यकशिपूची गोष्ट रंगत असली की आपणच काही काळ भक्त प्रल्हाद आहोत असं समजून तिच्या अंगात वीरश्री संचारे किंवा ध्रुवाचा अढळपदाचा निर्धार कधी तिला हेलावून जाई.
कदाचित तिच्या लहानपणीच्या या संस्कारामुळे असेल किंवा कदाचित तिच्या नैसर्गिक स्वभावधर्मामुळेही असेल पण तिच्या अंगातले काही विशिष्ट गुण तेव्हापासून आपसूक जोपासले गेले. मोठं झाल्यावरसुद्धा मूल्यांबाबत संदेह तिच्या मनात कधीच आला नाही. एखादी गोष्ट करायची म्हटली तर जीव ओतून, हातचं काही न राखता ती करायची. तसंच कुठल्याही गोष्टीबाबत एकदा का तिचा निर्धार झाला तर मग शेंडी तुटो की पारंबी, त्यात बदल होत नसे. आजी आजोबांच्या प्रेमळ शिस्तीखाली वाढताना तिचे विचार साधे, सरळ, पारदर्शक आणि निर्मळ होते.
आईवडिलांच्या पश्चात जरी आजी आजोबांकडे ती वाढली तरी तिच्या शिक्षणात कुठे कमतरता नव्हती. वेळेवारी ती बी.ए. आणि त्यानंतर एम.ए. झाली. त्यानंतर आजोबांचा आग्रह म्हणून टीचर्स डीग्रीसुद्धा केली. आजोबांचा कटाक्ष होता की अर्थार्जनाची निकड असो वा नसो पण मुलींच्यात त्याची क्षमता अवश्य हवी. या द्रष्टेपणाबद्दल नंतरच्या घटना घडताना सुप्रियाला कृतज्ञता वाटली आणि त्याच्या या मताची आठवण अनेकदा झाली.
एक चांगली नोकरी असलेला इंजिनीअर मुलगा बघून सुप्रियाचं लग्न झालं. इथवरही सगळं ठीकच होतं. आर्थिकदृष्ट्या फार गरज नव्हती म्हणून सुरुवातीच्या काळात सुप्रिया घर संसारातच रमली. चिन्मयच्या आगमनानं तिच्या संसारात दुधात साखरच पडली. चिन्मय जसजसा मोठा होऊ लागला, तसं शिरीषशी विचारविनिमय करून सुप्रियानं त्याच्याच नर्सरीमध्ये शिकवायला सुरुवात केली. मायलेक दोघं बरोबरच जात येत. म्हणजे चिन्मयकडे दुर्लक्ष होण्याचा प्रश्नच नव्हता.
बऱ्याचदा शिरीषला कामावरून यायला उशीर होत असे. पण नोकरीच्या धबडग्यात चालायचंच, म्हणून सुप्रिया सोडून देई. वारंवार असणाऱ्ा त्याच्या फिरत्यांचीही तिला सवय एव्हाना झाली होती. एरवी सुप्रिया बरीच धीट आणि स्वतंत्र असली तरी चिन्मयला जरा कमीजास्त झालं तर मात्र ती कावरीबावरी होई.
एकदा नर्सरीतच त्याला बराच ताप भरला. ती त्याला घरी नेताना डॉक्टकडे घेऊन गेली. फ्ल्यू असला तरी ताप बराच होता. घरी आल्यावर त्याच्या कपाळावर कोलॉनची पट्टी ठेवली. त्याला बेबी क्रोसीन पाजलं. त्यानंतर तिनं बेडरूमधल्या एक्सटेंशनवरूनच शिरीषला फोन लावला. त्याच्या सेक्रेटरीने फोन घेतला.
``हॅलो, झेडकॉन एजन्सी ?''
``मी मिसेस पाथरकर बोलतेय.''
``थांबा हं, सरांना देते.'' शिरीष फोनवर आला. तिनं चिन्मसबद्दल त्याला सांगून फोन ठेवला.
त्यानंतर शिरीषचे चौकशीचे दोन फोन आले. दोन्ही वेळा चिन्मय झोपला होता. स्वस्थ होता. त्यामुळे शिरीषला घरी यायला उशीर झाल्याचे सुप्रियाला विशेष वाटले नाही.
काही दिवसांनंतर शाळेला गॅदरींगनंतरची सुट्टी होती. चिन्मय अजून उठला नव्हता. शिरीष निघण्याच्या तयारीत होता. सुप्रिया काहीतरी आणायला आतल्या खोलीत आली. तेवढ्यात फोन वाजला. शिरीष गडबडीत असेल म्हणून तिनं आतून उचलला.
तेवढ्यात शिरीषनेही बाहेरून फोन घेतला.
``डार्लिंग तू उशिरा येणार आहेस असं सांगून ठेवलं आहेस ना ?'' पलीकडून आवाज. सुप्रियाला इतकं आश्चर्य वाटलं की फोन तसाच हातात राहिला. तिला वाटलं राँग नंबर असणार. पण तितक्यात शिरीषचा दबलेला आवाज, ``तुला सांगितलं आहे ना उषा, की घरी अजिबात फोन करायचा नाही. शिवाय सुप्रिया आज घरीच आहे.''
``ओ, सॉरी. पण तू लवकर ये.''
शिरीषने फोन ठेवून दिला आणि सुप्रियाला हाक मारली,
``पिया, ए पिया, मी चाललो. आज उशीर होईल गं. जरा क्लायंट््ना घेऊन जायचं आहे.''
सुप्रियानं स्वत:च्या नकळत फोनचं एक्सटेंशन खाली ठेवलं. शिरीष गेल्यावर दार लावलं आणि पायातलं बळ गेल्यासारखी ती डायनिंग टेबलापाशी बसली. एखाद्या सुंदर चित्रावर अचानक चिखलाचा शिंतोडा उडावा तसं तिला वाटत राहिलं. सुरळीत चाललेल्या आयुष्यात हे भलतंच काय मधेच ? काहीतरी साधं उत्तर असणार ह्याचं. आपण उगाच काहीतरी समजतोय. उषा म्हणजे शिरीषची सेक्रेटरी. हे म्हणजे फारच सिनेमातल्यासारखं.
पण ते डार्लिंग ? तिच्या आवाजातली सलगी ? रात्री उशिरा पोचण्याबद्दलची आठवण ? एकदम इतके योगायोग ? आपण कधी लक्षच दिलं नाही. शिरीषच्या त्या विश्वाचा या विश्वाशी कधी संबंधच आला नाही. आपणही कधी आग्रह धरला नाही.
सुप्रिया सावध झाली. त्याच्या वागण्यात, बोलण्यात खाणाखुणा शोधू लागली. कामानिमित्त जेवायला जातो म्हणाला तर कोण कोण विचारू लागली. एकदा तिनं विचारलं, ``कुठे जाणार जेवायला ? मी येऊ का ?''
``तू ?''
``का ?''
``तसं नाही, पण चिन्मयचं काय ?''
``त्याला नेत्राकडे ठेवेन काही वेळ.''
``अगं, साधं कामाच्या बाबतीतलं जेवण आहे. तू उगाच बोअर होशील. असं करूयात का ? उद्या आपण तिघं जाऊ. चिन्मयला दोसा आवडतो तो खायला.'' ती जास्त हट्ट धरू शकली नाही.
सुप्रिया जरी नेहमीसारखं वागायचा प्रयत्न करत होती तरी सगळं काही बिनसल्यासारखं झालं होतं. तिचं मन अतिशय अस्वस्थ होतं. रात्री शिरीष जवळ आला की ती ताठरत होती, किंवा झोपेचं सोंग करून वेळ मारून नेत होती. एक दोनदा शिरीषने टोकलेही. ``काय गं सुप्रिया, हल्ली ऑफ मूड वाटतेस ? बरं वाटत नाही का ? डॉक्टरकडे जायचंय ?''
सुप्रियाने मान हलवल्यावर, ``सुट्ीत जरा आजोळी जाऊन ये. बरे वाटेल.''
``तुला वेळ मिळणारे यायला ?''
``वा ! मॅडम, तुमच्या शाळेच्या सुट्ट्यांप्रमाणे मीही जर रजा काढू लागलो तर मग पाहायलाच नको. तू आणि चिन्मय जाऊन या. आम्ही आपले काम एके काम.'' तो विषय तितक्यावरच राहिला. सुटीला अजून अवकाश होता.
पुढच्या वेळी शिरीष जेव्हा टूरवर गेला तेव्हा सुप्रियाने मुद्दाम ऑफिसचा नंबर लावला. फोनवरचा आवाज अनोळखी होता. तिनं उषा उपाध्येंना फोन द्या असं सांगितलं. पलीकडच्या माणसाने ती रजेवर असल्याचं सांगितलं. तशी सुप्रियानं तिचा पत्ता विचारला. दुसरे दिवशी शाळेनंतर तिनं चिन्मयला नेत्राकडे सोडलं. स्कूटर तिनं उषाच्या घरापासून थोडी दूर लावली. अपार्टमेंटच्या गुरख्याने उषा गावाला गेल्याचे सांगितले. चौकशी अंती उषाही शिरीष येणार त्याच दिवशी परत येणार असल्याचे गुरख्याने सांगितले. चिन्मयला घेऊन ती घरी परतली. हा विलक्षण योगायोगही असू शकत होता. किंवा बॉसच्या टूरची वेळ साधून तिनंही सुट्टी घेतली, असं असू शकत होतं. अजूनही हा काही ठाम पुरावा नव्हता.
तिनं परत ऑफिसात फोन करून शिरीषच्या हॉटेलचा नंबर मागून घेतला. एरवी नंबर नसल्याचं तिला काही वाटत नसे. कारण टूरवर असताना शिरीष ठरावीक वेळी चिन्मय झोपायच्या आधी फोन करीत असे. त्यामुळे एकीकडे अशी हेरगिरी करताना सुप्रियाला अपराधी वाटत होते. पण त्याच वेळी आपल्या संसारावर आलेलं हे सावट दूर केलंच पाहिजे असंही वाटलं.
त्या रात्री चिन्मय झोपला. ती वाचत बसली. रात्री अकराला तिनं एस.टी.डी. करून शिरीषच्या खोलीचा नंबर जोडून द्यायला सांगितलं. रिंग वाजत होती तसं तिचं मन आपोआप देवाचा धावा करत होतं. ``शिरीषने फोन उचलू दे देवा, शिरीषने फोन उचलू दे.''
फोन उचलला गेला. सुप्रियाचा श्वास थांबलेला. पलीकडून बाईचा झोपाळलेला आवाज. ``हॅलो ? हॅलो ?'' सुप्रियाने काही न बोलता सावकाश फोन ठेवून दिला.
हे आभाळ आता कोसळू द्यायचे का ? तीन माणसांच्या आयुष्याचा प्रश्न अशा तऱ्हेने सोडवायचा ? एखादी इमारत खिळखिळी झाली असली तर ती कोसळायला किती वेळ लागतो? एक एक वीट ढासळते की एकदम सगळी इमारतच जमीनदोस्त होते ? कसं ठरवायचं की पुढचं पाऊल कोणतं ? आपल्याला जी शंका येते आहे, पोखरते आहे, ती मुळात सत्य आहे, हे कसं कळणार ? कोण सांगणार आपल्याला ? पुरावा काय ? डोक्याला नुस्ता भुंगा.
सवयीनं मनुष्य काहीही करतं. सुटीपर्यंतचे काही दिवस सुप्रियानं तसेच कसेतरी ढकलले. मग सुटीचं निमित्त करून ती चिन्मयसकट आजोळी आली.तिथे सर्व काही पूर्वीसारखं असूनही तीच वेगळी होती. गप्प, गप्प होती. एकटीच लांब लांब फिरायला जात होती. अनेक पावसाळे पाहिलेले आजी आजोबा जाणून होते की तिचं काहीतरी बिनसलंय. पण सुज्ञपणे ते गप्प होते. आजी मुद्दामहून चिन्मयला खेळांत, गोष्टीत गुंतवून ठेवत होती. जेणेकरून सुप्रियाला मोकळीक मिळावी. वेळ देण्यापलीकडे आजी आजोबा तरी जास्त काय करू शकत होते.
सुटी संपायला थोडा अवकाश होता. एक दिवस सुप्रिया म्हणाली, ``आजी, मी जरा घरी जाऊन येते. काही काम आहे. चिन्मयला इथंच राहू दे. मी लगेच परत येते.''
``अगं, पण शिरीषला कळवायला नको का ?''
``नको, नको मुळीच नको. तुम्ही काही फोनबिन करू नका.''
``काल रात्रीच तर त्याचा फोन झालाय. चिन्मयशीसुद्धा बोललाय तो.''
आजीनं जास्त आग्रह केला नाही. सुप्रियानं सकाळची बस घेतली आणि ती गेली. बस स्टँडवरून तिनं रिक्षा केली. घर आलं तसं रिक्षावाल्याला पैसे देऊन ती दारापाशी आली. लॅच की होतीच. तिनं दार उघडलं. पर्स साईड टेबलवर ठेवली आणि पाय धुवायला बेडरूमकडे वळली. दार अर्धवट उघडं होतं. ते ढकलून ती आत गेली. अंथरुणात उठून बसलेला शिरीष. बाथरूमधून तोंड पुसत बाहेर येणारी उषा उपाध्ये. स्टेजवर नाटक चालावं तसं बघत सुप्रिया. ती दारातच थबकली. एकवार दोघांच्याकडे बघितलं. मागे वळली. पर्स उचलली. चपला घातल्या. आली तशी दारातून बाहेर पडली. रिक्षा करून परत बस स्टेशन.
बसमध्ये खिडकीच्या गजाला डोकं टेकून, डोळे मिटून तोंडावर वारं घेत राहिली. मनात त्या क्षणी तरी काही विचार नव्हते. इमारत कोसळत होती. कोसळतच होती. आधाराचा खांबच कुजका निघाला होता. त्या ढिगाऱ्यात तूर्तास तरी काही गवसत नव्हतं. मनाची विश्लेषण करायची ताकद याक्षणी तरी संपली होती. ती मनाला थोपटत राहिली.
``काय गं ? लौकरशी परतलीस ?'' आजीनं हटकलं.
``हं...''
``काम संपलं इतक्यात ?''
``संपलंच म्हणायचं'' म्हणत ती आपल्या खोलीत गेली.
``काही कळत नाही या पोरीचं....'' पुटपुटत आजी आपल्या कामाकडे परत वळली.
दिवस उगवला तसा संपला. रात्री जेवणानंतर आजोबांच्या आरामखुर्चीजवळ जाऊन, त्यांच्या मांडीवर डोकं टेकलन् तेव्हा सुप्रियाच्या डोळयांतून पहिला अश्रू टपकला.
``हं, बोल बेटा'' सगळी कहाणी अश्रूंबरोबर बाहेर आली.
आजोबांचा म्हातारा मायेचा हात तिच्या केसांवरून फिरत राहिला. ``हं%%%'' एक लांब सुस्कारा. ``मग आता काय ठरवते आहेस ?'' त्यांच्या ठाम, पारदर्शक नातीला ते चांगलं ओळखत होते. संसारगाड्याच्या दोन चाकांमधली गती बिघडली होती, हरवू पाहात होती हे त्यांनी जाणलं. दोनांपैकी एक चाक भरकटलं की रथ किती कोसळू शकतो हे वयाच्या अनुभवाने त्यांना ठाऊक होतं. हेही त्यांना ठाऊक होतं की पाखरू फार वेळ वळचणीला थांबणं आता अवघड होतं.
एव्हाना अश्रूंनी बरंच मळभ दूर झालं होतं. लहानपणापासून घडलेला पिंड घट्ट होता. ``अजून खूप विचार करायला लागेल, आजोबा. चिन्मयचाही प्रश्न महत्त्वाचा आहे. मी घाईनं काहीच निर्णय घेणार नाही. सध्यातरी असं वाटतंय की इथून जवळच गुरुकुल पद्धतीवर एक शाळा सुरू होतेय. त्यांना रेसिडेंशियल शिक्षकांची गरज आहे. तिथे चिन्मयला घेऊन राहावं. म्हणजे फार उत्पात न होता, पुढील विचाराला संधी मिळेल.'' आजोबांचा सुप्रियाच्या डोक्यावरचा हात आता स्वस्थ झाला होता.
``काही झालं तरी चिन्मयला जपायला हवं. हे एक. दुसरं
मला वाटतं की इतकं झाल्यावर, काही घडलंच नाही असं न वागता मी उषाशीसुद्धा बोलेन.'' वेळ आल्यावर त्यांची नात असंच काहीतरी ओरिजिनल करेल याचं आजोबांना जराही आश्चर्य वाटलं नाही.
``सध्यातरी तिकडे परत जाणं मला जमणार नाही. तुमची हरकत नसेल तर अजून काही दिवस मी इथेच राहीन.''
``आमची कसली हरकत असणार बेटा. तुला हवं तितके दिवस रहा. घर तुझंच आहे.'' ह्या क्षणी एक चिन्मय सोडून तिचं काहीतरी होतं का ?
आजोबांनी शिरीषला फोन करून सुप्रिया सध्या त्यांच्याकडे थांबणार असल्याचं कळवलं. वादाचा प्रश्नच नव्हता. सुप्रिया शाळेच्या प्रिन्सिपलशी बोलली. नेत्रालाही तिनं फोन केला. वेळ काढून नेत्रा येऊन गेली. तिच्याबरोबर सुप्रियानं आपल्या राजीनाम्याचं पत्र धाडून दिलं.
नवीन शाळेची संस्था चांगली मान्यवर आणि अभिनव विचारांची होती. तिनं अर्ज केला. इंटरव्ह्यूला तिला बोलावलं. इतक्या पलिफिकेशनची, अनुभव असलेली शिक्षिका म्हणजे तसा प्रश्न नव्हता. शिवाय ती क्रॅम्पसवर राहायला तयार होती. ती निवडली गेली. क्रॅम्पसवर तिला दोन खोल्यांची जागा मिळाली. चिन्मयलाही अॅडमिशन मिळाली. पाहिजे तेव्हा शनिवार, रविवार आजी आजोबांकडेही जाता येण्यासारखं होतं.
सुप्रियाची नोकरी सुरू झाली. नवी शाळा हळूहळू अंगवळणी पडली. चिन्मयही रुळू लागला. अधूनमधून तो बाबांविषयी विचारे. ``आई, बाबा का नाहीत इथं ?''
``अरे, तुला माहीत आहे ना बाबांना किती काम असतं ? त्यांचं काम खूप महत्त्वाचं आहे. म्हणून काम सोडून सध्या ते इकडं येऊ शकत नाहीत.''
``म्हणजे काम संपलं की ते येतील. हो ना ?''
``तीच तर गंमत आहे.''
``गंमत ?''
``हो ना. आता असं बघ तू जेव्हा नवीन गोष्ट ऐकतोस, तेव्हा तुला त्या नवीन गोष्टीचा शेवट ठाऊक असतो का ?''
``नाही.''
``तसंच हे आहे. ही आपल्या तिघांच्यातली गंमत आहे. आपण थांबून बघायचं आहे की काय होतं. बाबा येतात की नाही.''
``तोपर्यंत आपण इथं पिकनिकसारखं राहायचं. हो ना आई?''
``कित्ती छान कल्पना आहे चिन्मय. आपण एक पिकनिकच समजू याला. ही आपली गम्मत मात्र कुण्णाकुण्णाला सांगायची नाही हं.''
चिन्मयने खूष होऊन बसलेल्या सुप्रियाला मागून मिठी मारली आणि तिच्या गालाचा एक मोठ्ठा पापा घेतला. हात मागे करून तिनं त्याला हळूच थोपटल्यासारखं केलं.
महिन्यातून एका वीकएण्डला सुप्रिया चिन्मयला घेऊन आजोबांच्याकडे जाऊन येत होती. अशाच एका भेटीनंतर सुप्रिया, चिन्मय परत गेल्यावर आजीनं आजोबांना टोकलं, ``अहो.''
``काय ?''
``हे असं किती दिवस चालायचं ?''
आजोबांनी वाचत असलेलं पुस्तक मिटून शेजारच्या टेबलावर ठेवलं आणि चष्मा नाकावरून काढत ते म्हणाले, ``हे तर ज्याचं त्यालाच ठाऊक. तू जे पाहाते आहेस ते आपल्या दोन पिढ्या पुढचं आहे. हे एक. पण दुसरं असंही आहे की सुप्रियाचे आईवडील अचानक गेल्यानंतर, मुलगी आणि जावयापश्चात आपणच नाही का तिला वाढवली ?''
``आपणच वाढवलेलं रोपटं आता झाड होऊ पाहातंय. त्याला भलतीच फळं येणार नाहीत याची मला खात्री आहे. मुळाची माती घट्ट ठेवण्याचं काम आपलं आहे. ते आपण निगुतीनं करायचं. याउप्पर शांतपणे होईल ते पाहाणं हेच खरं.तिचं आयुष्य तिला जगू दे. माझा आहे तसा तूही तिच्यावर विश्वास ठेव. सगळं ठीक होईल.''
एक दीर्घ निश्वास टाकत आजी स्वैपाकघराकडे वळली.
****
काळ अपरिहार्यपणे पुढे जात राहतो. सुप्रियानं मनाशी निश्चय केला आणि उषा उपाध्येला फोन लावला. ``मी सुप्रिया बोलते आहे.'' त्या क्षणी तरी मिसेस पाथरकर म्हणावंसं वाटलं नाही. पलीकडून स्तंभित शांतता. ``तुम्हाला कदाचित ह्या फोनचं नवल वाटेल. पण बऱ्याच विचारांती तुमच्याशी एक दोन गोष्टी बोलायच्या ठरवल्या आहेत. आत्ता वेळ नसल्यास परत फोन करता येईल.''
``नाही. नाही. बोला ना.''
``जे घडलंय ते घडलंच नाही असं म्हणण्याइतपत मूर्ख आपण कुणीही नाही. हे कबूल असेल तरच पुढचं बोलते.''
``हो.''
``तुमची आणि शिरीषची ओळख मी त्याच्या आयुष्यात येण्याआधीची. ती कामामुळे असेल, कामाव्यतिरिक्त असेल. त्याच्याशी प्रत्यक्षात मला देणंघेणं नाही. हे जर मला आधी ठाऊक असतं तर काय झालं असतं हे मी सांगू शकत नाही. तरीही आज ह्या गोष्टीवर बऱ्याच विचाराअंती बोलते आहे. लग्नाआधीची ही मैत्री लग्नानंतर चालू राहू शकते का, राहावी का हे प्रश्न अलाहिदा. तो माझ्या अनुभवाचा प्रांत नाही. पण गेली पाच दहा वर्ष मी आणि शिरीष काहीतरी घडवत होतो, बांधत होतो, असं मी समजत होते. ते काय, कितपत खरं यावर आता परत एकदा विचार करायला लागेल. आज जे मी तुमच्याशी बोलते आहे, ते एक विचारी बाई दुसऱ्या विचारी बाईशी, ह्या नात्याने बोलते आहे.''
``आपण एखादी गोष्ट जेव्हा करतो तेव्हा त्याची किती किंमत कुणी द्यायची ह्याबद्दलही विचार करायला लागतो. चिन्मयसारख्या वयाच्या मुलांत ती किंमत देण्याची कुवत तरी आहे का ह्याचा विचार व्हायला हवा असे वाटते. शिरीषने आणि मी पुढला काहीही निर्णय घेताना हा विचार पहिल्यांदा करावा लागेल. हॅलो ? तुम्ही ऐकता आहात ना ?''
``हो, हो तुम्ही बोला.''
``एक बाई जेव्हा दुसऱ्या बाईच्या आयुष्यात अशा रीतीने येते तेव्हा ती बाईच्या बाईबद्दल असलेल्या भरवशाला तडा देते. हे मला फार गंभीर वाटतं. ह्याचा विचार तुमच्या मनात आला का? आजच्या काळातली बाई म्हणून तो तसा यायला नको का?''
``दुसरी गोष्ट. प्रेयसी असणं आणि बायको असणं या दोन वेगळया गोष्टी आहेत. हे सगळंच जागवेगळं आहे तेव्हा आणखी एक जगावेगळं मी सजेस्ट करते. काही दिवस तुम्ही शिरीषची बायको आहात असं समजून राहा आणि पाहा कसं वाटतंय ते.''
पलीकडून अजूनही शांतता. सुप्रिया बोलत राहिली. कितीतरी जागलेल्या रात्रींचा परिपाक.
``विश्वासानं एखादं घर उभारायला, नवरा बायकोतलं नातं जोपासायला, दर दिवशी प्रयत्न करावा लागतो. त्या विश्वासाला तडा जायला एखादीच अविचारी घटना पुरते. मागे उरलेल्या अवशेषांचं काय करायचं हा दुसरा एक मोठा प्रश्न आहे. सध्या माझ्या आयुष्याला पुरून उरणारा.'' सुप्रियाला इतकं बोलून आता थकवा जाणवत होता. तो केवळ शब्दांचा तर निश्चित नव्हता. तरीही तिनं नेटानं मनात ठरवलेलं बोलणं तडीला नेलं.
``ह्या बोलण्याला संवादरूपानं सुरू ठेवायचं की नाही हे माझं अजून ठरलं नाही आहे. तरीही मला असं वाटतं की मी आता मांडलेल्या मुद्द्यांचा तुम्ही विचार करावात. पुढच्या वाटचालीचं बळ मिळवायच्या माझ्या वाटा मी शोधीनच.''
``आय अॅम सॉरी, सुप्रियाताई. आय अॅम सो सॉरी.'' उषा उपाध्येच्या आवाजात अश्रू, पश्चात्ताप, सुप्रियाच्या धैर्याबद्दल कौतुक. इतरही बरंच काही. सुप्रियानं ऐकलंही आणि नाहीही. शेवटी ती म्हणाली, ``कदाचित मी परत कधीतरी बोलीनही तुमच्याशी. जर गरज पडली तर. जर त्यानं काही साध्य होणार आहे असं वाटलं तर. कदाचित नाहीही. आज सांगणं कठीण आहे. ठेवते मी फोन.'' एक अर्धविराम.
****
सुप्रियाचं स्पष्ट बोलणं, तिचं धैर्य, तिच्या विचारांचा वकूब बघून उषा स्तंभित झाली. त्यानंतर करण्यासारखं एकच उरलं. तिनं राजीनामा दिला आणि शिरीषशी शेवटचं बोलली. त्या शेवटच्या दिवशी तिनं त्याला कॉफी प्यायला बाहेर बोलावलं. आधीच्या घटनेनंतर तसं तर ते ऑफिसव्यतिरिक्त बोलले, भेटले नव्हतेच आणि जे काही कामाचं भेटणं बोलणं झालं तेही एका विशिष्ट ताणाखाली.
इकडं शिरीषनं सुप्रियाला केलेले फोन सुप्रियानं त्या दिवसांपासून घेतलेच नव्हते. सुप्रियाच्या आजोबांचा फोन आला तेव्हा त्यानं विचारलं होतं, ``मी सुप्रियाला येऊन भेटू का ?''
``माझा सल्ला विचारत असलास तर मी म्हणेन की सध्या तरी नको. ती भेटेल असं वाटत नाही.''
त्यानंतर अधूनमधून एखादा फोन करून शिरीष, सुप्रिया आणि चिन्मयची खुशाली विचारत राहिला. स्वत:च्या संसाराला स्वत:च लावलेलं ग्रहण कसं सोडवावं याचा विचार करत राहिला.
हॉटेलात उषा आणि शिरीष भेटले. प्रथम एक ऑकवर्ड शांतता. मग उषानंच विषयाला हात घातला. ``माझा राजीनामा मी वर पाठवलाय. तो मान्य होईपर्यंत मी रजेवर चालले आहे. जमलं तर दुसऱ्या एखाद्या गावीच नोकरी घेईन.'' एवढं म्हणून तिनं शिरीषला सुप्रियाच्या फोनबद्दल सांगितलं.
बिल देऊन दोघं बाहेर पडले. काही प्रसंग असे असतात की तेव्हा निरोप घेण्याची आवश्यकता नसते. त्यांनी उद्ध्वस्त केलेले प्रदेश मात्र दीर्घकाल तसेच असतात - त्सुनामीग्रस्त. कधीच न संपणारे.
****
त्या रात्री सुप्रिया आणि उषामधल्या फोनबद्दल विचार करताना शिरीषला एक आशेचा कवडसा गावला. सर्वस्वच पणाला लागलेलं असताना घाबरायचं कशाला ? शिरीषच्या मनात एक बेत आकार घेऊ लागला.
सुप्रियाच्या आजोबांकडून ती मोकळी असेल अशा एका वीकएण्डची माहिती मिळविली. आजोबांना विनंती करून तेव्हा चिन्मय त्यांच्याकडे जाईल अशी व्यवस्था केली. त्याप्रमाणे चिन्मय सुप्रियाच्या आजोबांकडे पोचला. कधी नव्हे येवढी मोकळीक सुप्रियाला मिळाली.
छान शिकेकाई, रिठ्याने केस धुवून ते वाळवत, गरम चहा पीत सुप्रिया वाचत बसली. तेवढ्यात दारवान सांगत आला, ``साह्येब भेटायला आले हाईत.''
``कोण साहेब ?'' किंचित आठी घालत सुप्रियाने पुस्तकातून वर पाहिलं.
``काय की बा. फकस्त तुम्हास्नी सांगा म्हनत्यात. मग आणू का ?''
``आण.''
तिनं केसांची गाठ बांधली. पुस्तक मिटलं. तेवढ्यात दारवान शिरीषला घेऊन आला. तिनं दारवानाला `जा' म्हणून खूण केली. शिरीषला बसण्यासाठी खुर्चीकडे हात केला. समोरच्या खुर्चीवर तो सावरून बसला. क्षणभर तिनं त्याला निरखून शांतपणे पाहिलं. गेल्या काही महिन्यात तो वाळला आहे असं तिच्या लक्षात आलं. न बोलता ती आत गेली. आणखी एक कप चहा केला. त्याला आवडतं म्हणून सवयीनं त्यात आलं घातलं. कप त्याच्यासमोर ठेवून ती परत खुर्चीत बसली.
शिरीषनं चहाचा एक घोट घेतला. आल्याचा स्वाद तत्काळ जिभेला जाणवला. एक जुनी, पावसाळी आठवण मनात तरळून गेली. चिन्मयच्या आधीची. ते दोघं असंच सुट्टीच्या दिवशी भटकायला बाहेर पडले. पावसाचेच दिवस. अचानक पाऊस. तरीही मनसोक्त भिजले. हातात हात घालून धावत धावत घरी आले. तसंच ओलेत्यानं सुप्रियानं आलं घातलेला चहा त्याला करून दिला आणि ती कपडे बदलायला वळली.
शिरीषनं तिचा हात धरून तिला जवळ ओढली.ती खळखळून हसली. चहा तसाच गार होत राहिला.
``चहा गार होतोय...'' आपल्याच तंद्रीत हरवलेल्या शिरीषला सुप्रिया म्हणाली.
``अं... हो.'' त्यानं चहा संपवला.
``आपल्याला कुठं पाय मोकळे करायला जाता येईल का?''
सुप्रिया न बोलता विचार करत राहिली.
``मला थोडं बोलायचं होतं, पिया.'' तरीही ती गप्प.
``प्लीज नाही म्हणू नकोस.'' अजूनही तिच्याकडून काही प्रतिक्रिया नाही. शिरीषच पुढे बोलत राहिला.
``खूप विचार केला आहे मी पिया. एकच संधी दे मला बोलण्याची. मग काय होईल ते पाहू. चल ना प्लीज. जरा मोकळयावर जाऊ.''
काही न बोलता सुप्रियानं पायात चपला सरकवल्या आणि ती निघाली. दोघं शाळेबाहेर पडले. शहर तसं काही फार मोठं नव्हतं. जवळ नदी होती. वाहाती होती. तिच्या काठावर एका खडकावर ते बसले. सुप्रिया एक एक लहान दगड हाताने उचलून पात्रात टाकत होती. प्रत्येक दगडाचा बुडायच्या आधी एक छोटा भोवरा बनत होता. खडा बुडाला तरी काही वेळ तरंग तसेच उमटत राहात. सुप्रिया ते पाहात होती.
``आय अॅम सॉरी.'' शिरीष.
``सॉरी ?'' सॉरीनं अशा जखमा भरल्या असत्या तर कुणीतरी सॉरी मलमाचं मार्केटिंग करून कोट्यधीश झालं असतं. सुप्रियाच्या मनातला एक ओझरता विचार. पूर्वीच्या सुप्रियाने तो शिरीषला सांगितला असता आणि दोघं भरघोस हसले असते. आता ती फक्त मातीत रेघोट्या ओढत राहिली.
``मी तुला जेवढं दुखवलं आहे, त्याला तुलनाच नाही. त्याबद्दल मी कायमच तुझा अपराधी राहीन. पण या एका चुकीबद्दल मला आयुष्यभराची एकटेपणाची जन्मठेप देऊ नकोस, प्रिया.''
डोळे उचलून भेदक नजरेनं सुप्रियानं एकवार शिरीषकडे पाहिलं आणि परत नजर नदीपात्राकडे करून, ते वाहातं पाणी ती पाहू लागली.
``तुला वाटतं तसं पहिल्यापासून आमचं काही नव्हतं, पिया. तू बाळंतपणाला गेलीस आणि मला खूप एकटं वाटलं. उषापण एकटीच. खूप काम होतं. अनेक तास एकत्र. आणि मग तो एक क्षण. अविचारी.''
``त्यानंतरही पिचतच भेटलो. पण व्यसनच ते. काय म्हणू मी पिया ? शेण खाल्लं. अस्सल बावनकशी सोनं जवळ असताना, एका शेंडाबुडखा नसलेल्या नात्यापायी सगळयाचाच नास केला. चुकलं माझं, पिया. चिन्मयची शपथ पुन्हा असं माझ्या हातून घडणार नाही. एक संधी मला दे. फक्त एकच संधी.''
खूप वेळ शांतता. घरी परतणाऱ्या चिमण्यांचे चिवचिवाट. समोर नदीपत्रावर भरारणारा एक पांढरा पाणपक्षी. आकाशात सूर्यास्ताची रंगपंचमी.
सुप्रियाच्या मनात आठवणींची, विचारांची गर्दी. त्यातच आईवडिलांच्या अॅक्सिडेंटने हुकलेल्या बालपणीच्या छत्राची गहिरी जखम. खूप प्रेमळ आजीआजोबा असून, आईबापाविना पोरक्या झालेल्या दिवसांची आठवण. कसं असेल चिन्मयचं आयुष्य शिरीषशिवाय ?
मनाची एक गती असते, ज्याचा काळाच्या गतीशी काही संबंध नसतो. एका क्षणी सुप्रियाच्या मनाची खात्री झाली की एखाद्या कायद्याच्या कपट्यावर कुणाचं विभक्त होणं अवलंबून नसतं. शेवटी ती एक प्रोसेस असते. त्याचा संबंध तुमच्या अंतर्विश्वाशी असतो.
ती हेही समजून चुकली की आता ती कुठेही असली तरी समर्थ होती. त्याचवेळी तिला जाणवलं की सर्वप्रथम ती चिन्मयची आई होती. आई म्हणून तिला हे मान्य करणं जरूर होतं की मुलाच्या व्यवस्थित जोपासनेला शक्यतो आई आणि वडील दोन्ही असावेत. म्हणूनच आपल्या अस्मितेला पणाला न लावता चिन्मयला आईवडील दोन्ही देणं आवश्यक होतं. एकदा सम चुकली म्हणून सगळी महफिल सोडून चालणार नव्हतं.
एक लांब श्वास घेऊन तिनं निर्णय पक्का केला. ती शिरीषकडे वळली.
``ठीक आहे. आपण प्रयत्न करून पाहू. गॅरेन्टी मला कशाचीच देता येणार नाही. लावलेलं ठिगळ, न उसवता, किती आणि कसं जगता येईल ते पाहू.''
``पण आता मी परत तिकडे येणार नाही. तू इथे नोकरी पाहा. मिळाली की घर घेऊ आणि पुन्हा एक प्रयत्न करू. चिन्मयला वाटेल की एक मोठं पिकनिक संपलं.'' हे शेवटचं वाक्य जवळजवळ ती स्वत:शीच पुटपुटली.
सूर्यास्तापूर्वीचा शेवटचा क्षण. आहे नाही त्या तेजानिशी मावळता सूर्य तळपत होता. संधिप्रकाशाने नदीपात्र भारलं होतं. न बोलताच शिरीषने शेजारी बसलेल्या सुप्रियाच्या हाताला हलकेच स्पर्श केला.
``उद्या जाऊन मी चिन्मयला आणतो. रविवारचं आपण खरंखुरं पिकनिक करू. या नदीकाठच्या वाळूवर. त्याला आवडतं तसं एक मोठ्ठं घर बांधू. वाळूवर, पाण्यापासून लांब, जे वाहून जाणार नाही. चल परत जाऊ. आणि थँक्यू, सुप्रिया थँक्यू.''
ज्योती अशोक कानेटकर, पुणे
Posted in



viagra price
fzkdxs viagra price Zxfqpa ordering cialis >:-[ cialis yRgcIl viagra xLuFGq cialis 8]]] viagra without prescription 0704
cialis
yqbsrtgb cialis %-[[[ cialis 3571 viagra 8]]] cialis 1614 viagra %-[[[ where to buy viagra >:]]
viagra
pyczuolf http://jrvygz.com/ nngztsfe [url=http://wwlkul.com/]nngztsfe[/url]
viagra
iyvfqjns http://tviryl.com/ gneeolly [url=http://wnjkqt.com/]gneeolly[/url]
utusjeww
nsavdrp
ygtgcvfz
hwmrru
Michael Vick Authentic
Michael Vick Authentic Jersey
DeSean Jackson Authentic Jersey
Nnamdi Asomugha Authentic Jersey
Brent Celek Authentic Jersey
LeSean McCoy Authentic Jersey
DeSean Jackson Jersey
Michael Vick Jersey
Nnamdi Asomugha Jersey
Brent Celek Jersey
LeSean McCoy Jersey
Asante Samuel Jersey
Brandon Graham Jersey
Jeremy Maclin Jersey
Nathaniel Allen Jersey
Randall Cunningham Jersey
Reggie White Jersey
Stewart Bradley Jersey
Wes Hopkins Jersey
Dominique Rodgers-Cromartie Jersey
Customized
LaDainian Tomlinson Authentic Jersey
Darrelle Revis Authentic Jersey
Nick Mangold Authentic Jersey
Mark Sanchez Authentic Jersey
Dustin Keller Authentic Jersey
Jets Jersey
New York Jets Jersey
Cheap Jets Jersey
Antonio Cromartie Jersey
Bart Scott Jersey
Brett Favre Jersey
D'Brickashaw Ferguson Jersey
Darrelle Revis Jersey
Dennis Byrd Jersey
Dustin Keller Jersey
Dwight Lowery Jersey
Joe Klecko Jersey
Joe Namath Jersey
Kyle Wilson Jersey
LaDainian Tomlinson Jersey
Laveranues Coles Jersey
Leon Washington Jersey
Mark Gastineau Jersey
Mark Sanchez Jersey
Muhammad Wilkerson Jersey
Nick Mangold Jersey
Plaxico Burress Jersey
Santonio Holmes Jersey
Shonn Greene Jersey
Thomas Jones Jersey
Vernon Gholston Jersey
Wesley Walker Jersey