दूरदर्शनच्या झी-मराठी चॅनेलवरील `सारेगमप' स्पर्धेत आपल्या निकोप-सुरेल गाण्याने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांपासून परीक्षकांपर्यंत सर्वांच्या पसंतीस उतरत असलेली `ती.' काळयाभोर, तुकतुकीत रंगाची अन् तेजस्वी, चमकदार डोळयांची. ती गात असताना अधून-मधून पण सातत्याने पडद्यावर दिसत असलेला कुरळया केसाच्या, काळया-सावळया, तरतरीत तरुणाचा बोलका चेहरा. तिचं गाणं मन लावून ऐकत असलेला, परीक्षक तिला गुण देत असताना उत्सुकतेने बघणारा, आणि महागायिकेचा मान तिला मिळाल्यानंतर थेट रंगमंचावर पाणावल्या डोळयांनी तिचं अभिनंदन करणारा `तो' अन् अतिशय समाधानाने त्याला हलकेच थोपटणारी `ती.'
परीक्षकांकडून `नी'पर्यंत गुण ती मिळवत होतीच. सर्वोत्तम सादरीकरणाचं पारितोषिकही तिने सर्वात जास्त वेळा मिळवलं. `डेंजर झोन'पासूनही ती कायम दूरच होती. अन् अंतिम फेरीत ती
अशी तयारीने गायली की महागायिकेचं पद तिच्याकडे एस्एमएस् च्या रूपाने अक्षरश: चालत आलं.
अमरावतीजवळच्या खारतळे गावातील `ती' व नागपूरच्या हिंगणघाटातील `तो'. तिकडलं आपलं सर्वस्व सोडून, आपापल्या कपड्यांच्या दोन सूटकेसेस आणि पाण्याची एक बाटली एवढ्याच सामानानिशी मुंबईला नशीब आजमावायला आलेली ती दोघं, वैशाली (भैसने) आणि अनंत माडे. वैशालीजवळ होता गाणारा सुरेल गळा अन् गाणं म्हणण्याची उपजत आवड तर अनंतजवळ होता वैशालीच्या गाण्यावरील अनंत विश्वास !
`अशी झेप घ्यावी, असे सूर गावे' हीच इच्छा लहानपणापासून मनाशी बाळगणारी ही सूरवेडी. आपण गायिका व्हावं हाच तिचा ध्यास होता. `इच्छा तशी फळं आणि इच्छा तिथेच मार्ग ... !'
अमरावती-नागपूर इथं होणाऱ्या कार्यक्रमांतून, स्पर्धांमधून ती गात होती. बक्षिसं मिळवत होती. पण तिथल्या मर्यादित अवकाशात तिच्यातील गुणांना पुरेसा वाव मिळत नव्हता. सुरांच्या साथीने आपल्यातील गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी ओढ लागली होती मुुंबईची. `डोळयांत माझ्या असे एक आकाश; श्वासात आकाश, प्राणातळी.' अशी अवस्था झाली. अनंतच्या साथीने तिने मुंबईच्या गान-अवकाशात झेप घेतली. मुंबईत नातलग तर कुणी नाहीतच पण ओळखीचंही कुणी नाही. त्यामुळे ह्या महानगरीत सुरुवातीला आमदार निवासाचा आसरा घ्यावा लागला. दर पंधरा दिवसांनी राहण्याची मुदत वाढवत राहून एकीकडे दुसऱ्या घराचा शोध सुरूच होता. शेवटी तीन महिन्यांनी एक भाड्याचं घर मिळालं. ते सोडून दुसरं मिळालं. अन् आता शोध सुरू आहे स्वत:च्या घरासाठीचा.
एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात किती विरोधाभास असावेत, याचं चालतं-बोलतं, नव्हे गातं उदाहरण म्हणजे वैशाली भैसने-माडे. तीन वर्षांपूर्वी मुंबईतल्या रस्त्यांची, लोकल ट्न्ेन्समधून फिरण्याची काहीही माहिती त्या दोघांना नव्हती. आणि आता त्याची गरजही उरलेली नाही, कारण ह्या महागायिकेला मिळालेली नवी कोरी मोटरकार तिच्या दिमतीला कायम सज्ज असते. शिवाय परिस्थिती अशी आहे की रस्त्याने चालत फिरणं तिला अशक्यच होऊन बसलंय. कारण जाणारी-येणारी असंख्य माणसं या महागायिकेला लगेचच ओळखतात व तिथे रस्त्यातच थांबवून गाण्याची फर्माईश करतात.
अमरावतीच्या एका लहानश्या खेड्यात जन्मलेली, वाढलेली शेतकरी कुटुंबातील ही मुलगी ! त्या खेडेगावात पंधरा-सोळा वर्षांपूर्वीपर्यंत डोक्यावर हंडे घेऊन बाहेरगावाहून पाणी आणावं लागायचं. शेती हाच तिकडचा मुख्य व्यवसाय. चणे, मूग, सोयाबीन, ज्वारी, कापूस ही मुख्य पिकं देणारी कोरडवाहू शेती. सकाळचं जेवण मिळालं तरी आता संध्याकाळी काय अशा विवंचनेत जगत असलेले हे कुटुंब.
घरासाठी काडीचीही मदत न देता रोजच्या दोन वेळच्या अन्नासाठी बायकोला दुसऱ्यांच्या शेतात राबायला लावणाऱ्याने, आपली कुटुंबप्रमुखाची, पालकत्वाची जबाबदारी नाकारून फक्त संघर्ष करायला लावणाऱ्याने, वैशालीचा गुणगुणणारा सुरेल गळा मात्र बरोब्बर ओळखला. तिचे वडील संध्याकाळी तिला एखादं गाणं शिकवायचे, आपल्याबरोबर भजनीमंडळात न्यायचे.
घरची, स्वत:ची शेती दुसऱ्याला कसण्यासाठी देऊन, त्यातून मिळालेले पैसे मटका-जुगारात उडवून टाकणाऱ्या तिच्या वडिलांनी सट्ट्यात मिळालेल्या २५०० रूपयांतून २००० रुपयांचा एक टू इन वन तिच्यासाठी विकत आणला. हीच त्यांनी आपणहून दिलेली एकमेव अमूल्य वस्तू, भेट नव्हे ! कारण नंतर वैशालीच्या कमाईतून हे पैसेसुद्धा त्यांनी तिच्याकडून परत मागितले. ती म्हणते, `माझ्या बाबाला आपली मुलगी महागायिका झाली आहे हे माहितीच नाही अन् ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी शोकांतिका आहे. आयुष्यात जे भोगावं लागलं ते केवळ त्यांच्यामुळे. त्यांनी थोडीतरी मदत केली असती तर आयुष्य जरा सुकर झालं असतं, इतका पराकोटीचा संघर्ष करावा लागला नसता.'
आपला बाळपणीचा सुखाचा काळ लवकरात लवकर आटोपत्या घेणाऱ्या वैशालीने आईच्या बरोबरीने कष्ट करण्याचा, धाकट्या भावांना त्यांचं बालपण मिळवून देण्याचा, घरातील बिकट परिस्थितीची झळ त्यांना लागू नये म्हणून शक्य तितक्या लवकर कमावतं होण्याचा निर्णय घेतला. ती शनिवार-रविवार आईबरोबर शेतात काम करायला लागली. निंदायला, खुरपणी करायला तिला मदत करू लागली.
शाळेत पाचवीत शिकत असताना, कीर्तन करणाऱ्या एका महाराजांच्या कार्यक्रमात मध्यंतराच्या वेळात पहिल्यांदाच एक गाणं तिनं गायलं. बाबांनी शिकवलेल्या `परदेसियोंसे ना अखियाँ मिलाना' ह्या पहिल्याच गाण्याच्या चालीवरचं ते एक भक्तिगीत होतं. संगीताची जाण असणाऱ्या त्या महाराजांनी तिचा गाता गळा ओळखला. तिच्या गाण्याचं कौतुक केलं. ते घरी येऊन आई-वडिलांना भेटले. तिला शास्त्रीय संगीत शिकवण्याची बहुमोल सूचना त्यांनी केली. पण अशिक्षित आई-वडिलांना शास्त्रीय संगीत म्हणजे काय हे माहिती नव्हतंच. आणि शिवाय गावातही तसं शिकवणारं कुणी नव्हतं.
ह्या तिच्या गाण्यामुळे `गाणारी' वैशाली सगळयांच्या ओळखीची झाली. `शाळेची लता मंगेशकर' असं सगळे जण तिला म्हणू लागले. ती म्हणते, `मी वैशाली आहे, म्हणजे मी नेमकी कोण आहे, माझी कुवत काय आहे, माझी झेप कुठवर
असणार आहे हेही कळत नसण्याचा तो अर्धवट वयातला काळ.'
तिला आठवतात शाळेतले शिक्षक ज्यांनी तिच्यातील ह्या कलेचा गुण ओळखून तो वाढविण्यासाठी नेहमी प्रोत्साहन दिलं. तिच्या घरच्या कठीण परिस्थितीतून तरून जाण्यासाठी आवश्यक असलेलं मनोबळ ते पुरवत राहिले.
शाळेतल्या गणिताच्या शिक्षकांनी तिची गाण्याविषयीची इच्छाशक्ती जागृत केली. शाळेेत शेवटच्या तासाला, ऑफ पिरिअडला ते तिला गायला लावायचे आणि सर्व मुलं तिच्या गाण्यांवर टाळया वाजवत ठेका धरायची. मोजकी दोन-तीनच गाणी त्यावेळी तिला गाता येत होती. त्या शिक्षकांनीच तिला तिच्या घरच्या परिस्थितीची अन् तिच्यातल्या गायनकलेची जाणीव करून दिली. `गायचं की शेतात जाऊन निंदणी करायची हे ठरव. घरातील हलाखीची परिस्थिती बदलायची असेल तर गाण्याचा ध्यास घे. तेच तुला अन् तुझ्या कुटुंबाला ह्यातून तारून नेईल.' असा विश्वास त्यांनी दिला.
ती म्हणते, `देवाने एक दार बंद केलं तरी तो दहा दारं उघडतो. हे जेव्हा ते सांगत तेव्हा गंमत वाटायची. त्याचा अर्थच समजत नव्हता. `हे कसं शक्य आहे ?' असं वाटायचं. त्या अल्लड वयात अविश्वसनीय वाटणारे ते बोल आता अनुभवाने पटू लागले आहेत.'
तिच्याजवळ असणाऱ्या ह्या सुरांनीच तिला तारलं. स्वत:ला अन् कुटुंबीयांना जगण्यासाठी अत्यावश्यक आर्थिक बळ दिलं. त्यातूनच संघर्ष करण्याची ताकद दिली. जगण्याची हिंमत वाढली. मन:शांती देणारं, स्वत:तील निर्मितीक्षमतेला साद घालणारं, परमेश्वराच्या जवळ नेणारं `संगीतं श्रवणामृतम', वैशालीसाठी ठरलं `संगीतं जीवनामृतम् !'
आयुष्यातील सर्वात कठीण दिवसांविषयी जराही भावनाविवश न होता, अतिशय अलिप्तपणे ती बोलत होती. `एकदा सारे कुटुंबीय बाहेर कुठे जात असताना एका ठिकाणी गाण्याचा कार्यक्रम चालू होता. तिथे वडील मला घेऊन गेले व मला गायला मिळावं म्हणून त्यांनी संयोजकांना विनंती केली. त्या गाण्याने वन्समोअर घेतला. त्यानंतर हळूहळू गाण्याचे कार्यक्रम मी करू लागले. सुरुवातीला १०० रु. मिळत असत. पण फक्त स्वत:साठी, बालसुलभ आवडीनुसार खर्च करण्यासाठी त्यातले १० रुपयेदेखील खर्च करणं शक्य नव्हतं. शाळेत जाताना घालायला साध्या ५-१० रुपयांच्या चपला घेणं परवडत नव्हतं. आईसाठी, धाकट्या दोन भावांसाठी आपणच काहीतरी केलं पाहिजे. आपलं काहीही होवो पण त्यांचं चांगलं व्हावं ही त्यागाची भूमिका. लग्नाची मंगलाष्टकं म्हणणारे बरेच ग्रुप्स गावात होते. ते बोलवायला यायचे. तिथे ती गायची. गाऊन, पैसे घेऊन लग्गेच घरी परत ! लग्नाचं जेवण आवडत नसे. ह्या पैशांतून हळूहळू घराला चांगले दिवस येत राहिले. आणि आवडत्या आशाबाइंर्च्या गाण्यांच्या, उर्दू गझलांच्या क्रॅसेट्स घेता येऊ लागल्या. त्या एकमेव टू-इन-वनच्या मदतीने नवीन गाणी ऐकता येऊ लागली. उर्दू गझलांचा अर्थ समजत नसला तरी त्या ऐकायला, गायला आवडायच्या. `गाता तर येतात ना मग बस्स!' असं एक समाधान मिळत होतं. कार्यक्रमात गाण्यासाठी नवीन गाणी आपली आपण ऐकून, बसवून गाता येऊ लागली. अमरावतीमधील पं. प्रभाकर धाकडे हे तिचे संगीतातील पहिले गुरू. ते स्वत: उत्तम व्हायोलिन वाजवणारे अन् गाणारे.
`बालपणीचा काळ सुखाचा' म्हणजे काय हे तिला माहितीच नाही. आईची एकटीची घर सांभाळायची धडपड अन् वडिलांची घरच्यांविषयीची असलेली अनास्था. त्यातून त्यांच्यात होत असलेली भांडणं, वडिलांची मनमानी, आईला होत असलेली मारझोड तिला खुपू लागली. वडिलांचं सकाळी सहा वाजल्यापासून रात्री-अपरात्रीपर्यंत घराच्या बाहेर असणं तिला असह्य होत होतं. शिवाय त्यांचा पुरुषी ताठाही होताच. चहा प्यायला, जेवायला बोलावून आणायचं. बोलवायला गेलं नाही तर अपरात्रीसुद्धा घरी आल्यावर झोपेतून उठवून मारायचं. एकट्या आईच्या जीवावर किती अन् कायकाय म्हणून निभावून न्यायचं ? राग आला की ते घरातून निघून जायचे व सहा-सहा महिने घरी परत फिरकायचेच नाहीत. त्यातच आजी, वडिलांची आई, घरी येऊन तिच्या आईलाच रागावणार, `तुझ्यामुळे माझा मुलगा घरातून गेला !' घरी परतल्यावर पुन्हा मागील पानावरून पुढे सुरू, त्यात सुधारणा नाहीच.
कोणत्याही गोेष्टीची जशी सुरुवात असते, तसाच शेवटही असतोच ना! एक दिवस आईला मारत असताना तिला भयंकर राग आला. त्या भरातच तिने वडलांना धमकावलं, `तिला मारलंत तर मी तुम्हाला मारीन.' त्या दिवसानंतर आईला होत असलेली मारझोड बंद झाली, कायमची. धाकट्या दोघा भावांना तिने जीवापाड सांभाळलं. आई-बाबांच्या भांडणाची झळ स्वत:वरच थोपवून धरली. त्यांच्यापर्यंत ती पोचूच दिली नाही. आजही त्यांच्या शिक्षणासाठी, नोकरीला लावण्यासाठी तिची धडपड, अन् आर्थिक मदत कर्तव्य-तत्पर कठोरतेने सुरूच आहे.
ती म्हणते, `माझ्यासाठी आई-वडिलांनी, विशेषकरून वडिलांनी काहीच का केलं नाही ? माझ्याच वाट्याला हे भोग का आले ?' असे विचार मनात येतात पण आता मी आपली आपणच समजूत घालू शकते की, हेच माझं नशीब आहे. संघर्ष होता, आहे, त्यातूनच लढण्याची ईर्ष्या मनात निर्माण झाली, म्हणूनच यश मिळालं.
इतका सकारात्मक विचार करणारी वैशाली आता ठामपणाने सांगते, `मीच माझ्यासाठी प्रेरणादायी पुस्तक आहे. एका छोट्याशा खेड्यातून येऊन आज महागायिका होणं हेच माझ्या दृष्टीने खूप
मोठं आहे. मीच मला सतत तयार करत राहिले. शाळेतल्या शिक्षकांनी जे शिकवलं ते आजही मला मार्गदर्शक वाटतं. माझी सुरुवात कुठून झाली आहे हे माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वपूर्ण आहे व म्हणूनच कुणासारखं बनावं असं कधीच वाटलं नाही, आणि वाटतही नाही. मी वैशाली म्हणून मोठं व्हावं, नाव मिळवावं.'
शाळेत नववी-दहावीत शिकत असतानाच तिने गाण्याचे कार्यक्रम करायला सुरुवात केली. कार्यक्रमांच्या ठिकाणी सोबत म्हणून वडील बरोबर येत असत. पण जाण्या-येण्याचा, जेवणा-खाण्याचा, पान-सुपारीचा खर्च या साऱ्यासाठी सर्वस्वी तिच्या कमाईवर अवलंबून रहात. कालांतराने, अकरावी-बारावीनंतर, घरातील वातावरण थोडं बदललं. तिच्या कमाईतून घराला आर्थिक स्थैर्य येऊ लागलं. टेलिफोनसारख्या सुविधा घरासाठी घेता येण्याइतपत परिस्थिती बदलू लागली. मुलीने अजूनही पुढे चांगलं शिकलं पाहिजे ही आईची मनापासून इच्छा होती. आर्ट्समधील पदवीपर्यंत ती शिकली.
कॉलेजच्या गाण्याच्या स्पर्धाच्या निमित्ताने तिची अनंतशी ओळख झाली. त्या स्पर्धांना आपल्या मित्राबरोबर तो येत असे. तिच्या गाण्यावर पहिल्यांदा ऐकल्यापासूनच तो फिदा झाला होता. तिच्या गाण्याचा निस्सीम चाहता होता. आहे. तिथे त्याला भेटताना एका गोष्टीचं त्याला नेहमी आश्चर्य वाटायचं, `गाण्याच्या स्पर्धांमध्ये कायम पहिलं-दुसरं बक्षिस मिळवणारी ही मुलगी, एकुलता एकच पंजाबी ड्न्ेस घालून सगळीकडे जात असते. असं का ?' ओळख थोडी वाढल्यावर त्याला हळूहळू वैशालीच्या घरच्या हलाखीच्या परिस्थितीची जाणीव होऊ लागली. तिला बक्षीस मिळाल्याचं कळताच तिच्या बक्षिसाच्या पैशांवर टपून बसलेले, असले-नसलेले सारे नातेवाईक तिच्याभोवती जमायचे आणि आपली रडगाणी तिच्यापुढे गाऊन तिच्याकडून पैसे मागून न्यायचे, स्वत:साठी वापरायला तिच्याजवळ काही उरतच नसे. अनंतचा जीव तिच्यासाठी तुटायचा. पण काय करणार ? तो तिला थेट मदत करू शकत नव्हता. तो गुपचूप एस्.टी.च्या एखाद्या ओळखीच्या ड्नयव्हर-कंडक्टरबरोबर एखादा ड्न्ेस तिला पाठवायचा, तिला घ्यायला लावायचा.
यथावकाश तिच्या गाण्याचा कार्यक्रम ठेवायच्या मिषाने तिचा घरचा फोननंबर त्याने मागून घेतला. एक दिवस अचानक त्याने तिला फोन करून सांगितलं `कधी काळी लग्नाचा जेव्हा विचार करशील तेव्हा सर्वांत आधी माझी आठवण कर.' तोपर्यंत परिस्थितीशी दोन हात करता करता वैशाली पार थकून गेली. घरच्यांची काळजी घेताघेता स्वत:कडे दुर्लक्ष झालं होतं. ह्या साऱ्याचा विपरीत परिणाम जेवणा-खाण्यावर, तब्येतीवर झाला. वजन कमीहोत होत २०-२५ किलोंवर येऊन पोचलं. तब्येतीचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल, पण मानसिक ताण इतका प्रचंड होता की त्यातून बाहेर पडायला जवळजवळ एक वर्षाचा काळ जावा लागला.
लग्न करायचं ठरवल्यावर अर्थातच डोळयांसमोर फक्त अनंतच होता. त्याचे आई-वडील दोघंही शिक्षक. तीन भावांतील हा मधला. त्याचा स्वत:चा ऑटो स्पेअर पार्ट्सचा चांगला चालणारा धंदा होता. तो कॉलेजमध्ये शिकत असताना एकदा मित्रांबरोबर गाडीतून जात होता. दुर्दैवाने त्या गाडीला झालेल्या अपघाताने बावीस दिवस तो कोमामध्ये होता. त्यातून तो बरा झाला पण दोघा माणसांच्या आधाराविना त्याला चालता येईना. गळयाजवळील शिरेला जबर दुखापत झाल्याने वाचा तर गेलीच होती. पण बहुधा वैशालीसाठीच त्याचा पुनर्जन्म होणार होता. आता तर कुणाला सांगूनही हे सगळं खरं वाटणार नाही इतका ह्या विलक्षण दुखण्यातून तो पूर्ण बरा झाला आहे. त्याचा गाणारा गळा बंद झाला तरी गाण्याची उपजत आवड मात्र पूर्वीसारखीच कायम आहे.
त्याच्या आई-वडिलांचा लग्नाला विरोध नव्हताच. समंजसपणाने त्यांनी अनंताला एवढंच सांगितलं की, `आयुष्य तुम्हा दोघांना एकत्र काढायचं आहे. तेव्हा विचारपूर्वक निर्णय घ्या.'
वैशालीच्या घरी मात्र आईचा विरोध. वडिलांना तर काहीच माहितीच नाही. शिवाय लहान गाव असल्याने जातीचा पगडा खूप. पण वैशाली तिच्या निर्णयावर ठाम होती. माडे आपल्यापेक्षा उच्च जमातीतले असल्याचं तिनं आईला समजावलं. आणि एक दिवस घरातून निघून जाऊन दोघांनी लग्न केलं. तिने लग्न केल्याचं
तिच्या घरच्यांना माहिती होतं, पण ते मान्य नसल्याने लग्नानंतर एक वर्षभर वैशाली घरच्या कुणालाच भेटली नाही. तिची आई अंगणवाडी-सेविका म्हणून काम करते. त्यातच सारी भागवाभागवी त्यांना करावी लागली, कारण वैशालीची मदत त्या काळात पूर्ण बंद होती. एक वर्षानंतर हळूहळू सारे संबंध पूर्ववत झाले.
उभ्या आयुष्यात वैवाहिक सहजीवनाचं सुख नशिबी नसणाऱ्या आईच्या पोटी जन्मलेल्या वैशालीला अनंतच्या रूपाने भेटला पत्नीव्रत मनोभावे निभावणारा `वडसत्यवान' अनंत !
लग्नानंतर लगेचच दोघंजण मुंबईला आले. वैशालीने गाण्यात करिअर करायची हे ठरवूनच त्यांनी अनंतच्या घरच्यांचा निरोप घेतला. त्याने चांगल्या चालत्या धंद्यातला दोन लाखाचा माल अक्षरश: निम्म्या किंमतीत विकून टाकला. ज्यांनी माल घेतला त्या साऱ्यांनी पैसे दिले. अर्थात हे पैसे काही एकरकमी मिळाले नाहीत. पण फसवणूक न होता कुणी दहा हजार, कुणी वीस हजार असं करत करत सगळं देणं दिलं. मुंबईतील सुरुवातीच्या काळात ह्या पैशांची मदत झाली. शिवाय जसे लागतील तसे पैसे अनंतचे मित्र, भाऊ पाठवत होते.
मुंबईच्या मायानगरीत दोघं आले पण माहिती तर काहीच नव्हतं. वैशालीजवळ होता गाण्याचा सूर आणि अनंत. आणि अनंतजवळ होता वैशालीविषयीचा आत्मविश्वास, तिच्यापेक्षाही जरा जास्तच ! प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक विचार करण्याची सवयही त्याचीच. कुणा संगीतकाराची, संगीतक्षेत्रातील एखाद्या व्यक्तीची माहिती मिळवायची आणि त्यांच्याकडे जायचं. `मी गाते, मला काम हवंय' असं सांगायचं. आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची परीक्षा पास झालेली ही मुलगी मुंबईतील संगीतक्षेत्राची दारं ठोठावत होती. पण अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. काय करावं हे समजत नव्हतं. शिवाय झी-मराठी चॅनेलने प्राथमिक फेरीत वैशालीला नापास ठरवलं. ती खचली, नाउमेद झाली. `हे गाणं, कामासाठी सतत दुसऱ्यांच्या मागे लागणं आता पुरे झालं. आपण गावी परत जाऊ या.' असा तिने अनंतच्या मागे लकडा लावला. तो मात्र परत जाण्याच्या पूर्ण विरोधात होता. त्याने तिला ह्या खच्चीकरणातून बाहेर काढलं.
वैशाली आता हसत-हसत सांगते, `वाईटातून चांगलं होतं. आम्ही दोघं ह्या काळात एकमेकांच्या जास्त जवळ आलो. माझ्यासाठी सारा संघर्ष अनंतने केला. मी फक्त गायले. नवनवीन ओळखी करून घ्यायच्या, तत्परतेने त्यांना, ते म्हणतील त्या दिवशी, त्या वेळेला संपर्क साधायचा, फोन करायचा हे अतिशय संयमाने त्याने केलं. सगळयांशी चांगले संबंध त्याने निर्माण केले. पुरुषी इगो बाजूला ठेवून माझ्या गाण्यासाठी सारं काही सोसण्याचं बळ त्याच्याकडे आहे. संगीत क्षेत्रातली लोकं माझ्यापेक्षा अनंतलाच जास्त ओळखतात.
संगीतकार अशोक पत्की यांनी मला पहिल्या भेटीत खूप चांगला सल्ला दिला. त्यांनी माझ्या गाण्यांची, रेकॉर्डेड आवाजातली एक सीडी बनवायला सांगितली. त्याचा खूपच फायदा झाला. दरम्यान `मराठी बाणा'मध्ये अशोक हांडेंसोबत मला काम करायला मिळालं. जवळजवळ दीडशे-पावणेदोनशे प्रयोग मी त्यांच्याबरोबर केले. ह्या ग्लॅमरच्या जगात कसं वागायचं, कुणाशी कसं बोलायचं हे हळूहळू मला समजू लागलं. कार्यक्रम करीत असतानाच हांडेंकडून बऱ्याच गाण्यांची माहिती मी करून घेतली. गाण्यावरच मेहनत घ्यायची हा विचार पक्का होता. `सारेगमप'च्या प्राथमिक फेरीतून जरी मी बाद झाले होते तरी पहिले भाग मी अभ्यासू नजरेने बघितले. त्या भागांमधून खूप काही शिकायला मिळालं. देवकीताई, अवधूतसर इतरांना ज्या सूचना करायचे त्यांचा बारकाईने अभ्यास केला. आपल्या गाण्यात त्यानुसार कसे बदल करायचे ह्याच्या टिप्स घेत आपलं गाणं दिवसेंदिवस कसं चांगलं होत राहील त्याचाच अभ्यास करत होते. त्याचा फायदा दुसऱ्यांदा निवडफेरीसाठी गेले तेव्हा झाला.' निवडफेरीसाठीच्या त्या दिवसाची ती आठवण तिच्या मनात कायमची राहिली आहे. त्यासाठी दादरच्या हिंदू कॉलनीतील एका हॉलमध्ये चाचणी सुरू होती. सकाळी साडेदहाच्या सुमारास ही दोघं जेव्हा तिथे पोचली तेव्हा बाहेरच्या मैदानावर भली थोरली रांग लागलेली होती. शेवटी उभं राहिलं असतं तर न जाणो अख्ख्या दिवसभरात तरी नंबर लागला असता की नाही कुणास ठाऊक. वैशालीने मनाचा थोडा हिय्या केला अन् रांगेच्या मध्येच उभ्या असलेल्या एका मुलाजवळ ती गेली. `दादा, मी तुमच्यापुढे उभी राहते आणि तुमच्याआधी आत जाते, चालेल का ?' अगदी हळूच, आर्जवी स्वरातील तिचं बोलणं ऐकून तो मुलगा लगेचच हो म्हणाला. दिवसभर उभं राहून कंटाळल्यानंतर रात्री आडेआठच्या सुमारास तिचा नंबर आला आणि मग त्यानंतर ती पुढे-पुढे जातच राहिली. वैशालीला आपल्याआधी नंबर लावू देणाऱ्या त्या मुलाची निवड झाली नाही. परंतु वैशालीची निवड झाली ह्या खुशीतच तो परत गेला.
वैशाली म्हणते, `ही तर आत्ताशी कुठे सुरुवात आहे. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. झी-मराठीच्या महागायिका सन्मानाने ह्या क्षेत्राची दारं माझ्यापुढे खुली झाली आहेत. टीव्ही खेड्यापाड्यातून पोचलेला असल्यामुळे खऱ्या टॅलेंटला वाव मिळू लागला आहे. नाहीतर अजूनही दहा वर्षं अशीच संघर्षमय गेली असती. आयुष्याच्या ह्या टप्प्यावर आता जरा स्थिरता आली आहे. म्हणजे संघर्ष संपला अन् आता मी समाधानी आहे असं नव्हे. कारण समाधान झालं म्हणजे माझी वाढ खुंटली.' देवकीताइंर्चं कळकळीचं सांगणं तिने मनावर धेतलं आहे. पं. अजय पोहनकर यांच्याकडे तिने शास्त्रीय संगीताचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली आहे. शिवाय योग्य शब्दोच्चारांसाठी उर्दू व हिंदीचा अभ्यासही चालू केला आहे.
आता तिचं लक्ष्य आहे हिंदी सारेगम. महागायिका असल्याने तिला त्यात थेट प्रवेशही मिळाला आहे.
तिचा तो खडतर प्रवास ऐकणं मला अचंबित करणारं होतं. ह्या मुलाखतीच्या निमित्ताने तिच्यासाठी जुन्या दिवसांची उजळणी तिला करायला लावली ह्याचं ओशाळलेपण मला जाणवायला लागलं. तिला असं म्हणताच ती मात्र शांतपणे म्हणाली, `बागेत वाढवलेलं झाड आणि जंगलात वाढलेलं तेच झाड ह्यांच्यात जो फरक आहे तोच आज मला माझ्यात जाणवतो. ऊन-वारा-पाऊस ह्या साऱ्यांचे थेट तडाखे सोसत, त्यात टिकून राहता येणं हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. जुन्या आठवणींचा त्रास होतो, त्या आठवायला नको वाटतं हे जरी खरं असलं तरी आगीतून तावून सुलाखून निघाल्यावर धातूला जो टणकपणा येतो तोच आज माझ्यातही आला आहे. मी आता चांगलीच खंबीर झाले आहे. त्यामुळे आता कुणीही काहीही बोललं तरी आजिबात त्रास होत नाही. भल्या-बुऱ्या सर्व परिणामांच्या पलीकडे मी गेले आहे. प्रत्येक संघर्ष आनंदाने केला तर त्याचा त्रास खूप कमी होतो.
महागायिकेपर्यंतच्या ह्या अनुभवाने मला माणसांची पारखही झाली. ज्यांनी ऐन गरजेच्या, अडी-अडचणींच्या वेळी पाठ फिरवली तीच माणसे महागायिकेचे नातलग म्हणून मिरवू लागले आहेत.' आजवरचा हा सारा प्रवास म्हणजे ही देवाची कृपा, त्याची देणगी आहे असं ती मानते.
अरुणा ढेरेंच्या `राधे'च्या `अनय'प्रमाणे `वैशाली'च्या `अनंत'ने आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर केलं. निरर्थाच्या वाटेवर न हरवता, आपल्या सूरमयी झिळमिळत्या स्वप्नांनीशी उभ्या राहणाऱ्या तिला समजून घेतलं, सावरलं, आवरलं, उराशी धरलं. आता दोघं मिळून वाट बघताहेत वैशालीच्या कुशीत वाढणाऱ्या तिसऱ्या अनामिक जीवाची. ते बाळही बहुधा गात-गातच ह्या दुनियेत प्रवेश करणार अशी सदिच्छा व्यक्त करून, त्या दोघांना शुभेच्छा देऊन मी त्यांचा निरोप घेतला.
मनात गुंजत होत्या ओळी - `मी पाहिली वडसत्यवान-सावित्री नव्या युगाची, मी पाहिली वडसत्यवान-सावित्री नव्या युगाची! '
चित्रा राजेंद्र जोशी, ठाणे



शिक्षण
नमस्कार
असे लेख लिहित रहा. अनोकांना उपयोग होतो.
+91 96 57 06 7210