तिने मला भेटल्यापासून विलक्षण भारावून टाकलं. जितकी मी तिच्याजवळ जात होते, तिचे विविध छटांनी झळकणारे रंग, लोलकातून जाणाऱ्या प्रकाशकिरणांप्रमाणे, बिल्वरी-सप्तरंगी तारांगणाप्रमाणे, क्रॅलिडिओस्कोपमधील काचतुकड्यांप्रमाणे विविध आकृत्या धारण करत माझ्याभोवती फिरत राहिले.
आज वाटतं, बरं झालं, तिच्या तीन लग्नांची हकिकत मला पहिल्याच भेटीत कळली नाही ती, नाही तर माझ्यासारख्या बुरसटलेल्या, कोत्या मनाच्या बाईने विनाकारणच तिला भेटीपूर्वी झिडकारले असते. दुसऱ्याच्या आयुष्याचे, आपली फूटपट्टी लावून मोजमाप करायचा अधिकार कुणी दिलेला असतो आपल्याला ? आपण म्हणजे धुतल्या तांदुळासारखे स्वच्छ ! आपले विचार वाचनाने प्रगल्भ झालेले ! अनेक वर्षांच्या अनुभवातून शहाणपण काय ते आपल्यालाच आलेले ! जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे, हे विचारांचे गांभीर्य असणारा खरा विद्वान की झापड लावलेल्या डोळयांनी स्वत:च्याच दृष्टिकोनातून दुसऱ्याला जोखणारा शहाणा ? आज तिच्याबद्दलचा तसा नुसता विचार जरी मनात आला तरी तोंड, लाज वाटून हाताने झाकले जाते.
आम्ही शाळेत बरोबर होतो. थोड्या आगेमागे. म्हणजे मी तिच्यापुढे दोन वर्ष. मी शिक्षकांची लाडकी कारण थोडे आवडण्यासारखे व्यक्तिमत्त्व, आणि प्रत्येक विषयाची शिक्षकांना लुभावणारी जाण ! वासरातील लंगडी गाय एवढंच त्याचं महत्त्व! पण तिचा स्वभाव धडाडीचा. कुणी शिक्षक वर्गात तयारी न करता वेळकाढूपणा करू लागले की त्याही वयात त्यांना त्याची जाणीव देणारी. एवढे धारिष्ट्य शाळेच्या वयात विरळाच. टॉमबॉय होती नुसती. फूटपाथवर किंवा विजेच्या खांबाला पाय टेकवून सायकलवरून न उतरता तासन्तास गप्पा मारू शकायची. उशीर झाला म्हटलं की डबलसीट सोडायला यायची. वाटेत पोलीस दिसला की नमस्कार मामा म्हणत पुढे
निसटायची. तिची खेळातील मस्ती, ही मगरूरी आमच्यात कुठेतरी असूया निर्माण करायची. आम्ही महाराष्ट्न् मंडळ सुटले की घरी पळायचो. ती मात्र कधी ह्या मैत्रिणीकडे, कधी मैत्रिणीच्या आणखी कुणाकडे करत आठपर्यंत घरी जायची.
अमेरिकेतील एका भारतीय संमेलनात मी भाषण केले आणि श्रोत्यांच्या घोळक्यात ती तिचे मनोगत व्यक्त करायला माझ्याजवळ आली. पुढे ती निवांत भेटल्यावर, मला तीस वर्षांनी कळलं की तिला कॉलेजच्या दुसऱ्याच वर्षी अमेरिकेची शिष्यवृत्ती मिळाली आणि सी ए सारखाच ऑडिटरचा अभ्यासक्रम करण्यासाठी ती न्यूयॉर्कला आली. माझे ते कॉलेजचे शेवटचे वर्ष होते. त्यातून चकाकणाऱ्या पितळी बटणांच्या कडक युनिफॉर्मच्या मी प्रेमात पडले होते. परीक्षा झाल्याशिवाय लग्न नाही हे ठरलेच होते. त्यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित होते. बंदुकीसह बंदुकधाऱ्याशी त्याच अटीवर तह झाला होता. ती माझ्याजवळ आली तीच कित्येक वर्षांची ओळख असल्यासारखी अगं-तुगं करत. आता मी सासू होते, आजी होते. मला वाटले इंग्लिशमधील यू चे तू भाषांतर असेल.
ती - तू कुठली ?
मी - पुण्याची.
ती - कुठल्या कॉलेजची ?
मी - एस.पी.
ती - मी पण. तू कुठल्या शाळेतली ?
मी - भावेस्कूल.
ती - अगं, माया का तू ? तरीच ओळख असल्यासारखी वाटली. मी विद्युल्लता आताची मिसेस मॉर्गन, इथली व्हीएल् किंवा व्हिदिए, ओळखलंस की नाही ? पटकन् पत्ता फोन नंबर दे इथला. मला निघायला हवं.
चार सुंदर अमेरिकन चित्पावनी गोऱ्या मुली, पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा अशा साड्यांच्या, कुंकवाबांगड्यांच्या थाटात, सहज तिच्याभोवती उभ्या होत्या. त्यांची तिने ज्युली, डाना, मार्था आणि एंजला अशीच काही तरी भाच्या-पुतण्या कुणाची कुणी मैत्रीण ओळख करून दिली. भारतीय पोषाखात सहज वावरत होत्या. त्या सगळया पाहुण्यांना प्लेट्स देत होत्या. जातीने प्रत्येकाचे हवे नको पाहात होत्या. ती मात्र सुसाट कुठे तरी निघून गेली. मी इतर लोकांच्यात मिसळले.
लगेचच्याच मंगळवारी सकाळी दहा वाजता फोन आला. आहेस का घरी ? जेवायला येते आहे. आधी न सांगताच ? आपण अमेरिकेत आहोत का भारतात ? आता काहीतरी करायला हवं. रात्रीचे काढून चालणार नाही. बया तेवढ्यात पोहोचलीसुद्धा. मुद्दामच मला वेळ दिला नव्हता. मी आज घरी असल्याची खात्री करून घेतली होती माझ्या सुनेकडून. दरवाजातूनच ओरडली, `मी मस्तपैकी हिरव्या मिरच्यांचं ताजं लोणचं, बटाटेवडे आणि जिलब्या आणल्या आहेत. घरचं हं. फ्रोझन पिज असले तर मटार उसळ कर, ब्रेडबरोबर खाऊया. संध्याकाळची पण करून टाक, म्हणजे उठायला नको. खूप गप्पा मारता येतील. हा धबधबाच होता. माझ्या घरात मी काय करायचं ते पण तिनेच ठरवलं, तेसुद्धा माझ्याकडे येण्यापूर्वी. मी अमेरिकेतून परत जाईपर्यंत हिची गुलाम म्हणून राहणार बहुतेक ! पुढे त्या गुलामगिरीचीच वाट पाहू लागले, ती बात अलाहिदा. सगळयात गंमत म्हणजे माझ्या युनिव्हर्सिटीच्या वेळा तिने माझ्या सुनेकडून माहीत करून घ्यायच्या आणि नेहमीच मला धक्के द्यायचे. घरातील सगळयांनाच मावशी, नवी आजी आवडली होती. त्या दिवशी तर घरी आल्याआल्या नातवंडे तिला जी चिकटली ती जाईपर्यंत. तिच्या गालावर गाल घासून चार वर्षांच्या मोठ्या नातवाने तिला विचारले, आज्या शाळेत जातात ? त्यांना पण मैत्रिणी असतात ? तुम्ही दोघी कधी लहान होतात ? मग मी तेव्हा किती मोठा होतो ?
ती आली तशीच हसत, सगळयांना हसतं करत निघून पण गेली.
काय गप्पा झाल्या मैत्रिणींच्या ? मुलाच्या प्रश्नाने मी भानावर आले. काहीच आठवेना. मुलगा सून मला हसत होते. आम्ही किती एक्साईट झालो होतो ह्याची त्यांना जाणीव झाली होती. अरे, आठवणीच आठवणी. ती काही सांगायला लागली की मला काही आठवायचे आणि तिच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला लागले की तिला दुसरीच गंमत आठवून ती मला तोडायची. अजून मी तिला तिच्या नवऱ्याबद्दल, मुलांबद्दल पण नाही विचारले. मी तिला माझ्या सैनिकी आयुष्याबद्दल सांगितले होते. बी पेरले एकीकडे, उगवले दुसरीकडे, रोप वाढले तिसरीकडे आणि फळं धरेपर्यंत विंचवाचे बिऱ्हाड अजून नव्या स्थानी पोहोचले होते. त्यात चार लढायांचा थरार अनुभवला होता. सैनिकाच्या पत्नीची जबाबदार भूमिका निभावत असताना सामाजिक संस्थांशी जोडले गेले होते. मुलांबरोबर मीही शिक्षणाची पुढची उर्मी पुरी करत होते. नोकरी करत होते. लग्नानंतर तेहतीस वर्षांनी नवऱ्याच्या निवृत्तीनंतर पुन्हा आता पुण्यात येऊन समाजाचे ऋण फेडण्याचा तोकडा प्रयत्न करीत होते.
कधीतरी पुन्हा फोन आला की शुक्रवारी येते. जेवायला बाहेरच जाऊ. त्याच दिवशी तिचा पेशंट मिस्टर मरे आजारी झाला, आणि तिने येणे रद्द केले. त्याची क्रॅलिफोर्नियाची मुलगी उद्या येणार होती. हिचे कोण पेशण्ट ? ऑडिटींगमध्ये क्लायंट असतात का पेशण्ट ? तिच्या आयुष्याचे जिग्सॉ कोडे पुरे व्हायला मला पुन्हा अमेरिकेची वारी करावी लागणार. बरं झालं मी मला माझ्या अभ्यासात गुंतवू शकत होते. अनेक युनिव्हर्सिटीज् नी त्यांच्या लायब्ररीज वापरायची परवानगी दिली होती. नाहीतर हिची वाट पाहण्यातच दिवस संपले असते.
पुन्हा अवचित् मंगळवारसारखी मी युनिव्हर्सिटीत जात नसल्याची सुनेकडून विचारणा करून घेऊन ती आली. मी उन्हात वाचत बसले होते. तिचा गाडी पार्क करत असतानाच ओरडा आला, आहेस का घरात की गेलीस भटकायला ? तिला पाह्यल्याबरोबर मनात विचार केला हिने गेल्यावेळी आपले चीरहरण केले, आज आपण हिची तीस वर्ष विचारून घ्यायची. तिच्या लहानपणीच कमावलेल्या शिष्यवृत्तीबद्दल उत्सुकता होती, तिच्या नोकरी-छंदाबद्दल होती आणि गृहिणीच्या भूमिकेबद्दल होतीच होती. पण ती आली तोच तिने तिच्या दुसऱ्या सासूला एमिलीला, बरे नसल्याने वॉशिंग्टन डी.सी.जवळील शॅनिंग्डोव्हला कसे अचानक जावे लागले आणि मी जर ऑगस्ट-सप्टेंबर पर्यंत राहणार असेन तर तिच्याबरोबर कशी मी तिच्या सासूकडे जाऊ शकेन आणि पानगळीचे अप्रतिम रंग पाहू शकेन ह्याचा बेत आखला. ह्या सर्वांतून मला झालेला बोध एवढाच होता की 'शॅनिंग्डोव्हला पानगळीचे रंग पाहायला जायचे असते आणि तिला दोन सासवा आहेत. तिला माझा भ्र्रम कळला आणि इतक्या सहजतेने म्हणाली अग, रघू, माझा पहिला नवरा, दुसरा जेम्स, त्याची आई तिथे असते. दचकतेस काय ? अग माया, मी तीन लग्न केली, माहीत आहे तुला ?
मला कसं माहीत असणार, त्याची डोक्यात पुरती नोंदही झाली नसावी, पण गोंधळ मात्र उडालाच ते ऐकून.
`चल बाहेर जेवायला जाऊया की घरातच खाऊया ? मी आज फक्त सुरळीच्या वड्या आणि चिवडा आणलाय, त्याने पोट तर नाही भरायचे. हे बघ, खिचडी, पापड, कढी कर. दहा मिनिटात होईल. खूप भूक लागली आहे. निघताना तोंडात टाकायचे राहिले. माझी सध्या शुगर थोडी वाढली असावी. सुरळीच्या वड्या करेपर्यंत म्हाताऱ्या ऍनीचा तीनदा फोन आला. पलंगावरून उतरताना तिच्या पायाला पलंगाचा पाय लागला, सत्त्याएेंशी वय आहे पण अजून एकटे राहण्याचा उत्साह. मग करते इमर्जंसी फोन, पोटच्या पोरीसारखे प्रेम करते.'
`कोण ती की तू ?'
`दोघी, ती जोरात हसून म्हणाली. दोन चार लाडू होते, तिला आवडतात. माया, मी सगळयांना इंडियन केले आहे इथे. केक आणि बेक खाऊन कंटाळतात मग आपले पदार्थ आवडतात. ते बिन तिखटाचे करावे लागतात, करायचे. घाईत घाईत थोडा वेळ काढायचा, आणि पदार्थांत प्रेम ओतायचे, बस्स.'
`तुझ्याकडे अजून किती शिल्लक आहे ?'
`काय ?'
`प्रेम.'
`पुष्कळ.'
`दोन नवऱ्यात संपलं नाही ?'
ऐकले ते खरे ह्याची खात्री नसल्याने गोंधळ केला पण ती निर्व्याजपणे पुन्हा म्हणाली.
`दोन कुठले ती%न.'
`काय ?'
`मिस्टर मॉर्गन माझा तिसरा नवरा. खूपच चांगला आहे, मस्त माणूस. मला छान सांभाळतो.'
`मग त्या इंडियन समारंभातल्या चार पोरी ?'
`त्यातली ज्युली जेम्सची, दुसऱ्या नवऱ्याच्या बहिणीची, आणि मार्था हार्डीच्या चुलत भावाची. पेशन्ट कुठचे बघतेस ? आणि तू स्कॉलरशीप घेऊन केलेल्या ऑडिटिंगचे काय झाले ?'
`त्यामुळे दुसरा नवरा मिळाला.'
`ए, मला समजेल असं बोल नं काहीतरी.'
`आधी पटकन जेवून घेऊया. मग लोळत गप्पा मारूया. मस्त लागते आहे गरम खिचडी, पापड, कढी.'
`बरं हे सांग की, हे पेशन्ट कोण?' मी विषयाकडे आणत विचारले.
`त्याचं असं झालं की, एकदा जेम्सची आई एमिली आमच्याकडे आलेली असताना आगीत पडली. तिला उचलायला जाण्यापूर्वी मला मेडिकल लायसेन्स नसल्याने अॅम्ब्युलन्स बोलवावी लागली. माझ्या दत्तक मुलासाठी गरज होतीच. मग ठरवले की मेडिकल लायसन्स घ्यायचा. आता मी म्हाताऱ्या, आजारी लोकांची त्यांच्या घरी जाऊन सुश्रुषा करू शकते, त्यांना दिलासा देऊ शकते.'
`कधी ?'
`त्यांना गरज असेल तेव्हा.'
`आणि ऑडिटिंग ?'
`मला वेळ असेल तेव्हा.'
`धन्य आहे बाई. तुला मुले किती ? माझा डायरेक्ट प्रश्न. कारण आता उत्सुकता फारच ताणली गेली होती. चार. रघूपासूनची प्रिया, जेम्सचा आर्थर. प्रिया उपनगरात राहते आणि आर्थर उर्फ शशांक बारावी करतानाच बॅण्ड पथकात अॅकॉर्डीयन वाजवून उत्कृष्ट गातो.'
`आणि दोन ?'
`संजू आणि राजू.'
`ती कुणाची ?'
` ती ट्न्ॅॅिजडीच आहे. माया इथे एक भारतीय कुटुंब राहात होते. रोड अॅक्सिडेंटमध्ये एकावेळी दोघं नवराबायको गेली. मुले मागच्या सीटवर सुरक्षित होती. श्री. राव एकटेच. त्यांची भावंडे सावत्र. एक भाऊ मुलांच्या इशुरन्सवर डोळा ठेवून त्यांना न्यायला भारतातून इथे आला खरा पण संजू रिटार्डेड
आणि काहीसा अधू पाहून धैर्य होईना. मी सुशांतीला सौ. रावला ती मरण्यापूर्वी हॉस्पिटलमध्ये सांगितले आजपासून संजू राजू माझे आहेत. तेव्हा संजू १३ आणि राजू ११ वर्षाचे होते. कळायला लागले होते. रोपटी दुसऱ्या जागी वाळून गेली असती. खूप प्रेम दिले त्यांनी मला.'
मला तिचा राहूनराहून आदर वाटत होता. ती एकदाही, मी त्यांना प्रेम लावले, मी त्यांच्यासाठी काही केले असं कुणाबद्दलच म्हणत नव्हती. त्या सगळयांंनी तिच्यासाठी केलेला जणू तो त्याग होता. ती पुढे म्हणाली,
`जेम्सने पण मला कधी टोकलं नाही. उलट रघूला मधून मधून आपण होऊनच घरी आणायचा. त्याच्या शेवटी अती दारू पिण्याने किडनीज फेल झाल्या तेव्हा जेम्स त्याला आमच्याकडे घेऊन आला आणि जेम्स असतानाच रघूचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.'
`तुझं रघूबरोबर घटस्फोट घेण्याचे कारण पण काय तेच होते ?'
`दुसरं काय असणार ? अगं, रोज तो असा घरी आला की प्रिया खूप घाबरायची. तिच्यावर ह्या सर्वांचा परिणाम नको म्हणून मी वेगळी झाले. नाही तरी लग्न झाल्यावरही तो कित्येक वर्षं दुसऱ्याच गावी होता आणि माझा आणि प्रियाचा खर्च मीच बघत होते. आमची कौटुंबिक ओळख होती. तेव्हा लहान वय होते ना, उतावळी होते. आज वाटतं आजच्या इतका पेशन्स तेव्हा असता तर मी त्याला बरं करू शकले असते. आज इतक्या लोकांसाठी धावाधाव करते तेव्हा मनातला रघू कळवळतो. खूप बारीक झाला होता. जेम्सने त्याला सांभाळणे हा त्याचा मोठेपणा होता. अजूनही त्याच्या आईचा मासिक खर्च मी पाठवते कारण त्यांच्या घरात सगळयांना त्याची सवय झाली आहे. त्यातून तिला त्यांनी निदान चांगले औषधोपचार करावेत एवढी माफक अपेक्षा असते. मी माझी त्यातून रघूबद्दलची टोचणी कमी करायचा प्रयत्न करत असते.'
ही मला माहीत असलेली विद्यु बोलत नव्हती. मी कॉफी करायला उठले. साडेचार वाजून गेले होते. आणखी तासाभरात मुले येणार होती. मुलांना आल्यावर विद्युच्याच फराळावर ताव मारायचा होता, पण पिल्लांसाठी शिरा भाजावा असा विचार केला. तिच्या आयुष्याच्या जिक्सॉ कोड्याचे आणखी काही तुकडे जुळले होते. पण अजूनही चित्र पुरे व्हायला अवकाश होता.
तिचा त्यानंतरचा फोन मात्र मलाच आला, मधे-आधेच. उद्या रात्री राहायला येतेस, असं विचारायला. हार्डी टूरवर जाणार होता आणि तिची मुले त्या शनिवार-रविवार येणार नव्हती. शनिवारी आमच्याकडे जेवूनच आम्ही निघालो. माझ्या सुनेने तिला आवडतील असे राजस्थानी पदार्थ केले होते. रविवारी बोलण्यात व्यत्यय नको म्हणून डबा देते असेही वर डोळे मिचकावत सांगितले. गेल्यावर प्रथम फोटो अल्बम पाहिले. ती फोटो दाखवत जुना पाढा वाचत होती. चेहरे समोर आल्यावर मला संदर्भ लागत होते. आम्ही शाळेतल्या कविता, गाणी म्हटली. शिक्षकांच्या नकला केल्या. कोण कधी भेटले, कोण काय करतो, अखंड बोलत होतो. त्यात कधी झोप लागली कळलंच नाही.
सकाळी उठल्यावर कॉफी पितापिता मी तिला म्हटले, `तुझा जेम्स काय स्मार्ट आहे गं !'
जणू काही मध्यंतरी आम्ही झोप घेतलीच नव्हती असा बोलण्यातला पुन्हा ओघ आला आणि ती सांगू लागली, `जेम्स फारच उमदा होता. तसाच आर्थर पण आहे. बघशीलच तू !'
रघू गेल्यावर लवकरच रोड अॅक्सिडेंटमध्ये जेम्सचा मृत्यू झाल्याचे तिने मला मागेच सांगितले होते. जेम्स आर्किटेक्ट होता, त्याचे ऑडिट ती करायची. रघूबरोबरच्या घटस्फोटानंतर त्याने तिला विचारले. ही आडनावाने माहेरची देव असली तरी ना घारी होती ना गोरी. पण डॅशिंग असल्याने तो तिच्या मोहात पडला असावा. त्याचा धंदा चांगला असल्याने हिनेही त्याला हो म्हटले. दोघांना एकमेक माहीत होते. मित्राबरोबर त्याची भागीदारी होती. व्हिएलच्या अति काटेकोरपणाने जेम्सचा पार्टनर तिच्यावर फारसा खूष नव्हता. तिने जरी कधी स्पष्ट आरोप घेतला नाही तरी तिला शंका असावी की अॅक्सिडेंटच्या दिवशी त्याला एवढी दारू पाजण्यात त्याच्या भागीदाराचा हात असावा. नॉमिनेशन न झाल्याने कोर्टात केस चालू होती. एमिलीला तिचा पैसा पुरेसा होता. व्हिएलची नोकरी होती पण आर्थरला जन्मत:च डोक्यात एक गाठ होती. त्यावर उपाय चालू होते. इन्शुरन्सचा पैसा पुरत नव्हता. तिने सकाळी ब्रेड तसेच पेपर वाटण्याचे काम हाती घेतले. त्यासाठी ट्न्क चालवायची. चार मुले पदरी. त्यातल्या दोघांना सतत डॉक्टरची गरज. औषधांची बिले, शिक्षणाचा खर्च, टॅक्सेस... मेटाकुटीला आली होती नुसती. पण मुलांवर प्रेम करायची. रात्री झोपताना मुलांना जवळ घेऊन शुभरात्री म्हणायचे एवढेच (?) प्रेम देऊ शकत होती. मुलांना पण त्याची पूर्ण जाणीव होती. त्यांच्या परीने ती पण छोटीमोठी कामे करतच होती. भारतात मी काय परिस्थितीतून जात आहे ह्याची कुणालाच कल्पना नव्हती. फोन केला तर त्यांच्या मागण्या मात्र असायच्या. माझ्या प्रत्येक लग्नामुळे त्यांना कमीपणा वाटायचा. कशाला नको ती झंझटे मागे लावून घ्यायची, स्वत:चे बस्तान स्थिर नसताना, असे सल्ले मिळायचे. मग मी फोन करणेच टाळायची. विद्यु म्हणाली कसा देव सगळया बाजूने परीक्षा बघत होता. पण त्याच वेळी आणखीही कुणी माझ्याकडे कौतुकाने बघत होता त्याची मला कल्पनाच नव्हती. देवाच्या रूपाने हार्डी मॉर्गन माझ्याकडे बघत होता. दोघांच्या कॉमन मैत्रिणींतर्फे त्याने मला विचारले. पण आता मला माझ्या नशिबाचा पुढचा डाव बघायचा नव्हता. आम्ही कधी एकत्र जेवायचो, मधूनच कधीतरी भेटायचो. त्याने मला, माझ्या जबाबदाऱ्यांना कळवून घेतले. पुन्हा कधी लग्नासंबंधी विचारले नाही. मुलांशी मात्र दोस्ती केली. चौघांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. डॅडी म्हणून जरी नाही तरी त्याला मित्र म्हणून स्वीकारला. आता मधूनच कधीतरी मी कामात असले की प्रिया बरोबर तो आर्थरला किंवा संजूला घेऊन डॉक्टरकडे तपासणीला जात असे. कधी ग्रोसरी, कधी फळे-भाजी घरी आणून टाकत असे. आमच्या गावात तो एकटाच असल्याने मी थॅन्क्स गिव्हिंगला, दिवाळी, िख्रास्मसला त्याला पण इतर मैत्रिणींबरोबर जेवायला बोलवत असे. मुलांवर संस्कार असावेत म्हणून सगळे समारंभ करायचे. त्यात जेवायला खायला काय केले ह्यापेक्षा सगळे एकत्र येण्यालाच महत्त्व होते. खरं तर हार्डी जेम्सचाच दूरचा नातेवाईक आहे हे मला माहीतही नव्हते. अशीच दोन वर्षे गेली.
माझ्या पन्नासाव्या वर्षाच्या वाढदिवसाला मुलांनी, हार्डीबरोबर मी राहिलेली त्यांना आवडेल असा प्रस्ताव मांडला. तोपर्यंत संजूचे शिक्षण संपून तो त्याला झेपेल अशी नोकरी करत होता. राजूचा आर्किटेक्चरचा अभ्यास संपला होता. फक्त इंटर्नशिप राहिली होती. त्याचा त्याला मोबदला मिळणार होता. त्याने संजूची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवली होती. प्रिया कॉलेजजवळच्याच मैत्रिणींबरोबर शेअर करून राहात होती. आर्थर एकटाच चौदा वर्षांचा होता. पण त्याने हार्डीला मित्र म्हणून स्वीकारलेच होते. आता मला फक्त माझाच विचार करायचा होता. पण मन धजत नव्हते. मुलं आली की दिवस आनंदात जायचे. गेली की विषण्णता यायची. सकाळच्या ट्न्कच्या फेऱ्या ती पण करायची आल्यावर. आणि एक दिवस माझ्या देखतच आर्थरने हार्डीला जेवायला बोलावले आणि तू माझा अंकल, मम्माचा नवरा हो म्हणून सांगितले. हार्डीने माझ्याकडे पाहिले, मी गंमत वाटून हसले आणि फसले. एका साध्या समारंभात आम्ही विवाहबद्ध झालो. दोघांनीही धर्मांतरण केले नाही. हार्डीचे आईवडील म्हातारे होते. ते लग्नाला येणे शक्य नव्हते, पण त्याच्या चुलतमावस भाऊबहिणी आल्या होत्या. तो आईवडिलांचा एकुलता एक होता. माझी चार मुले आणि मित्रमंडळ ! मुले फार आनंदात होती. त्यांच्या मते मम्माची कुतरओढ संपली होती. समारंभात जवळीक होती. पहिल्या लग्नानंतरच्या घटस्फोटानंतर जवळजवळ पंधरावीस वर्षांनी हार्डी पुन्हा विवाहबद्ध होत होता. त्याचा त्याच्याकडच्यांना खूप आनंद होता. माझे घर आता रिकामेच होते, हार्डी व मी माझ्याच घरात राहू लागलो. पण घराचे उरलेले हप्ते फेडायची माझ्याकडून कबुली घेतली. माझे सकाळचे उठणे बंद झाले. आम्ही लग्न झाल्याबरोबर चारी मुलांसकट युसेमिटीला हार्डीच्या आईवडिलांना भेटायला गेलो. काय खूष होते दोघं सांगू ! माझा रंग, माझी धर्म-जात, चार-चार मुले, डायबेटीस, काहीकाही त्यांना टोचले नाही. त्यांना आनंद होता तो त्यांचा हार्डी विवाहबद्ध झाला आणि त्यांच्या सुनेला चार मुले आहेत याचा !'
`ऐकावे ते नवलच आहे बाई ! आपल्याकडे नसता हो कुणी इतका दिलदारपणा दाखवला, मला बोलल्याशिवाय राहवलेच नाही.'
`माया, त्याला एक कारण होतं. हार्डीच्या पहिल्या बायकोला मूलच नको होते, त्यामुळे म्हातारा म्हातारी नातवंडांसाठी झुरत होती. आता त्यांना एकदम चार नातवंडे मिळाली नं ! तिथे गेल्यावर मला अजून एक गंमत कळली. हार्डी माझ्यापेक्षा पाच वर्षांनी जसा लहान होता तसेच त्याचे वडील त्याच्या आईपेक्षा पाच वर्षांनी लहान होते. त्यामुळे तोही वादाचा मुद्दा नव्हता. खरं सांगू, अगं, ती माणसे माणसांवर प्रेम करणारी होती, त्यामुळे कुठे सलच नव्हता. रोज मुलांना तऱ्हेतऱ्हेचे केक्स बेक व्हायचे, चिकन पार्टीजच्या डिशेस बनायच्या. मुलांच्या स्वप्नातील बर्फ खेळांसाठी प्रसिद्ध असलेल्या युसेमिटी पेक्षा आजीआजोबांचे युसेमिटी अधिक सुंदर होते. आईला सासर छान मिळाले म्हणून मुले खूष होती. त्यातल्या त्यात छोटा असलेला आर्थर खराच नातू म्हणून वावरत होता. आठवडा कसा संपला कळलंच नाही. आम्ही परत आलो. हार्डी मॅनेजर होता एका डिपार्टमेंटल स्टोअरचा.' तिच्या भूतकाळातील पर्णहीन कष्टांना नवी पालवी फुटली होती जणू ! तिच्या लहानपणापासूनच्या धडाडीने तिला इथवर आणले होते. संजू, राजू, प्रिया मोठे होते, पण आर्थरने मात्र त्यांना खऱ्याखुऱ्या आजीआजोबांचे सुख दिले.
`मग आता तू तीन सासवांना आणि एका सासऱ्याला सांभाळतेस म्हण की !'
`किती नशीबवान आहे की नाही ? त्या सगळयांच्या प्रेमात आत्तापर्यंत सोसावे लागलेले कष्ट कधीच विसरायला झालेत बघ मला. बघ कशी फुगले आहे आता.'
`एक दिवस हार्डीचा फोन आला. उद्या आम्हांला आर्थरला घेऊन डॉक्टरकडे जायचे आहे. आर्थर आणि मी तुम्हा मैत्रिणींच्या गप्पा ऐकायला उत्सुक आहोत, येणार का ? संध्याकाळी पाचपर्यंत परत येऊ या. एक मार्गी दोन तासांचा ड्नईव्ह आहे. सर्व रस्ता जंगलाचा आणि नदी किनाऱ्यालगतचा आहे. तुला नक्की आवडेल. तिथल्याच अती प्रसिद्ध किनारा रेस्टॉरन्टमध्ये जेवूया. आणि हो आर्थरने निरोप दिला आहे की तिथे कंपनी आऊटलेट आहे त्यात स्वस्त कपडे पण खरेदी करता येतील.'
किती आमिषे दाखवणार आहात ? असं हसत म्हणत मी मुलांचे कार्यक्रम विचारून पक्के करते सांगितले.
माझ्याकडून आणि विद्युकडून फक्त दोन्ही घरची मंडळी
एकमेकींच्या गोष्टी ऐकत होते पण अजून पाहण्याचा प्रसंग आला नव्हता. आम्ही दोघींनी फारच ताणले होते सर्वांना.
मुलांना आल्यावर विचारले तर म्हणाली किती दिवस आम्ही बेत करतोय पण जमत नव्हते. तू ही सुवर्णसंधी घालवू नकोस. अगं, ते किनारा हॉटेल तर इतके प्रसिद्ध आहे की केवळ कल्पनेनेच माझ्या तोंडाला पाणी सुटतंय, मुलगा म्हणाला. खूप पैसे घेऊन जा कारण त्या कंपनी आऊटलेटमध्ये काय घेऊ आणि काय नको असे होऊन जाईल.
गाडीत मी आणि आर्थर मागे होतो आणि विद्यु-हार्डी पुढे. तो सोळा वर्षांचा होता. अजून ड्नयव्हिंग लायसेन्स मिळायचा होता. कदाचित मम्मा हार्डीबरोबर जायची ही शेवटचीच वेळ ठरू शकणार होती. सहा फूट दोन इंच उंची, सरळ उंच पातळ नाक, भुरे कुरळे केस, खेळाच्या मैदानावर कमवलेले शरीर. काहीशी युरोपीय चेहरेपट्टी आणि हार्डी पक्का गोलमटोल अमेरिकन. मी त्याची चेष्टा करत गप्पा मारत होते. तो पण कुठे माझ्या तंगड्या ओढण्यात तसूभर कमी पडत नव्हता. हार्डी आणि विद्यु नुसतेच हसत आमच्या टवाळया ऐकत होते. मधूनच बाहेर पडायला सांगून त्या प्रदेशाचे वर्णन ऐकवत होते. मी आर्थरला म्हटले, मेडिकलला जाणार म्हणजे मेंदू शाबूत आहे, खेळतोस म्हणजे शरीर स्वस्थ आहे, चष्मा नाही म्हणजे दृष्टी चांगली आहे. इतक्या लोकांना आवाजाने भुरळ पाडतोस म्हणजे तिथेपण काही प्रश्न नाही आणि मी बोललेले सहज ऐकू शकतोस म्हणजे कान शाबूत आहेत, मग दर तीन महिन्यांनी डॉक्टरकडे जायचा सोपस्कार कशासाठी ? का ते निमित्त करून किनाऱ्याचे जेवण घ्यायचा करार झाला आहे तुझा त्याच्या मालकाशी ? लहानपणीपासून माझ्या डोक्यात एक पाहुणा घर करून बसला आहे. तो जागेवरच आहे ना बघायला जावे लागते.
आम्ही बोलत असताना व्हीएल किंवा हार्डी एकदाही मध्ये बोलले नाहीत. विनोद झाला की फक्त गालातल्या गालात हसायचे. वडिलांना तो हार्डीच म्हणत होता कारण त्याने त्याला मित्र मानले होते. विद्युने मला आधीच सांगितले होते की आजची चाचणी महत्त्वाची आहे कारण खेळताना माहीत असूनही आकसाने त्याच्या एका मैत्रिणीने मुद्दामच त्याला डोक्याला बॉल मारला होता. मनुष्य स्वभावाचा हा दुसरा पैलू होता. मी गंभीर झाले पण आर्थरने कंपनी आऊटलेटच्या कपड्यांच्या किंमती आणि किनारा रेस्टॉरन्टमधील पदार्थांचे रसभरीत वर्णन सांगून मला परत हसते करायचा प्रयत्न केला. तिच्या आयुष्याचे जिग्सॉ जवळजवळ लागत आले होते. तिच्याकडे फोटो अल्बम बघताना माणसे कळली होती. रोजच्या बोलण्यातून प्रत्येक जण आपापली भूमिका विषद करीत होता. माझा विद्युबद्दलचा कौतुक-आदर शुक्लेंदुवत् वाढत होता.
मेडिकल रिपोर्ट जसा हवा तसा आला आणि मग हसण्याखिदळण्याला पुन्हा जोम चढला. आर्थरने त्यांच्याबरोबर करत असलेल्या आजच्या शेवटच्या ड्नईव्हसाठी आणि रिपोर्टसाठी, एकत्रितपणे मोठी विशेष ऑर्डर द्यायची ठरली. प्रथम तिथली खास दारू आली. मी जरी सगळयाची चव बघणार होते तरी माझ्यासाठी मला रुचेल तेच घ्यायचा करार होता. त्यासाठी होणारी थट्टा मी सहज पचवू शकत होते. तो दिवस आमचा अवर्णनीय गेला. विद्युबद्दलचे दोघांचे प्रेम वाक्यावाक्याला जाणवत होते. घरी येताना माझ्या हिमालयातील ट्न्ेकचे अनुभव ते विशेष उत्साहाने ऐकत होते. आणि मग आमच्याकडे एकदा स्लाईड शोला येण्याचे हार्डीने कबूल केले. तिथल्यातिथेच रात्रीच्या जेवणाचा बेत ठरला. युसेमिटीतील असल्याने हार्डीला बर्फाचे खेळ आणि ट्न्ेक्सची स्वाभाविकच आवड होती.
शनिवारच्या जेवणानंतर थोडा वेळ गप्पा मारून मुले, नातवंडांना घेऊन झोपायला गेली. आज सूनबाइंर्नी खास राजस्थानी बेत केला होता. छोटी पिल्लेपण खूष होती. खूप साऱ्या स्लाईड्स बारकाईने पाहिल्यावर हिंदुस्थानात आल्यावर माझ्याबरोबर हिमालयाचा तसेच शिवाजीच्या किल्ल्यावरचा ट्न्ेक करायचा ठरवून त्यांनी निरोप घेतला. गाडीत बसता बसता हार्डी परत आला आणि म्हणाला, पुढच्या आठवड्यात व्हिएल युसेमिटीला जात आहे, तू तिच्याबरोबर जातेस का बघ !
`तुला जसं आत्ता युसेमिटीचे आमिष दाखवून गंडवतो आहे नं, माया, मला पण लग्नाचे आमिष दाखवून असेच घोळात घेतले.'
पण आता पस्तावतो आहे, हार्डी म्हणाला. नेहमीसारखा हसत आम्ही निरोप घेतला.
मी काही दिवसांनी सॅन फ्रॅन्सिस्को, सॅन डिऍगोचा कार्यक्रम आखला होताच.
बघते कसं जमते ते, म्हणून आत आले.
बरं झाले गेले ते ! विद्युचा आणखी एक पैलू लक्षात आला. नाहीतर तिच्या आयुष्याच्या जिग्सॉ कोड्याची नक्षीदार किनारपट्टी सांधायची राहूनच गेली असती.
व्हिदिआ सासूसासऱ्यांची मानसिक तयारी करण्यासाठी आधी गेली होती. दोघांची वये खूप झाली होती. नव्या माणसांना पटकन स्वीकारणे कठीण होण्याचा संभव होता. सासूला अल्झायमर झाला होता आणि सासऱ्यांना पार्किन्सन. दोघांचे ऐकण्याचे मान खूपच कमी होते. हा काय बोलायचा ते तिला कळायचे नाही, तिने काय उत्तर दिले त्याचा त्याला पत्ता नसायचा. त्यांना बिले भरणे, टॅक्सेस देणे लक्षात येत नव्हते. त्यांचे राहाते घर काऊंटीच्या प्रॉपर्टीत जमा होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्या दोघांना ज्येष्ठ नागरिक गृहात टाकायचे तिथल्या लोकांनी ठरवले होते. विद्यु तिथेच राहून त्यांची काळजी घेण्याच्या बाबत विचार करण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडे राहण्यास आली होती. हार्डीला वाटत होते हे तिचे भारतीय संस्कार आहेत. तिच्या वाढलेल्या साखरेची त्याला काळजी वाटत होती म्हणून पण मला जायचा आग्रह केला असावा असे मागून लक्षात आले.
विद्यु ऑडिटची चांगली प्रॅक्टिस सोडून फक्त वयस्कांची सेवा करायच्या निर्णयाप्रत पोहोचली होती. युसेमिटीच्या घरावरच्या हार्डी आणि त्याच्या आईवडिलांचा लोभ तिला कळत होता. आज त्या वास्तूची बाजारातील किंमत तिला माहीत होती. पूर्व किनाऱ्यावरून पश्चिमेकडे जाऊन बस्तान बसवणे कठीण होते. विद्युची चार मुले, मित्रमैत्रिणी तिकडे होती. तिचे सर्व पस्तीस वर्षांचे आयुष्य तिकडेच गेले होते. अजून आर्थर कॉलेजला गेला नव्हता. पण तिनेच तसा निर्णय घेतला होता. हार्डीला नव्या जागी नवी नोकरी शोधणे कठीण असल्याने अजून विचार करायचा होता. पण तोपर्यंत हे दोघे घरासकट कम्युनिटीच्या ताब्यात गेले असते, त्यापूर्वीच विद्युने तडकाफडकी निर्णय घेऊनही टाकला. नशिबाने आत्तापर्यंत घेतलेल्या सत्त्वपरीक्षेचा हा परिपाक होता.
मी गेले तेव्हा मटकीची उसळ, पोळी, कोशिंबिरीचा बेत होता. दोघे आजी-आजोबा आवडीने जेवत होते. सपरला मात्र तिच्या सासूने हलके पदार्थ केले. घर अतिशय स्वच्छ व सुंदर होते. सासऱ्याने स्वत:च्या हाताने लाकडे कापून बांधले होते. सासूने केलेले अतिशय अप्रतिम भरतकाम घरात जागोजागी प्रदर्शित झाले होते. ती पुन्हा पुन्हा घर, फेर्नचर पुसत होती. सकाळी मोठ्या जंगली खारींना जेवण देत होती. सासरे मला सांगत होते की आज तीन वेळा त्यांना जेवण मिळाल्याने उद्या त्यांचे पोट बिघडणार आहे. त्या दोघांनाही माझे माया नाव चांगले लक्षात राहिले. पण हार्डीला, त्याची आई पूर्ण विसरली होती. तिचा कुणी मुलगा नाही असे सांगायची, त्यालाच फोनवर ! विद्यु सून आहे म्हणून तिच्या सासऱ्याला कळत होते. म्हणून ती त्याची लाडकी पण होती. स्वत:ची कार कुणाला चालवायला न देणारा तिचा सासरा तिला मात्र ऐन बर्फ पडत असताना सुद्धा दोन्ही गाड्या सूपूर्त करत होता. बर्फ पडला की त्यांना ह्या वयातही स्वत:लाच रस्ता, गॅरेज साफ करावे लागत होते. सर्व कामे जिकिरीची होती. हार्डी आता तिघांच्या काळजीत होता. विद्युच्या बोलण्यात त्याच्याबद्दलची आत्मीयता सातत्याने जाणवत होती. ह्या घरात केवळ राष्ट्नीय एकात्मताच नव्हे तर आंतरराष्ट्नीय एकात्मता नांदत होती. तीन नवऱ्यांचे जवळचे दूरचे नातेवाईक, मित्रमंडळ, शेजारी, ओळखी अनोळखी सगळी लोकं त्यांचीच होती. ते सर्वच एकमेकांसाठी झटत होते. ते सर्व माणूस म्हणून एकमेकांना ओळखत होते.
कोण मी ? कुठली ? किती दिवसांची रंगत संगत असलेली? कोणत्या संस्कृतीचा अभिमान सांगणारी ? तिथे जाऊन माणसाच्या नात्याचे जिग्सॉ सुटले. तिच्या आयुष्याचे जिग्सॉ सोडवता सोडवता स्वत:च्या आयुष्याचा अर्थ गवसला !
शाळेतील टॉमबॉय विद्यु आता केवढी मोठी झाली होती !!
डॉ. अरुंधती सरदेसाई, पुणे
Posted in



Michael Vick Authentic
Michael Vick Authentic Jersey
DeSean Jackson Authentic Jersey
Nnamdi Asomugha Authentic Jersey
Brent Celek Authentic Jersey
LeSean McCoy Authentic Jersey
DeSean Jackson Jersey
Michael Vick Jersey
Nnamdi Asomugha Jersey
Brent Celek Jersey
LeSean McCoy Jersey
Asante Samuel Jersey
Brandon Graham Jersey
Jeremy Maclin Jersey
Nathaniel Allen Jersey
Randall Cunningham Jersey
Reggie White Jersey
Stewart Bradley Jersey
Wes Hopkins Jersey
Dominique Rodgers-Cromartie Jersey
Customized
LaDainian Tomlinson Authentic Jersey
Darrelle Revis Authentic Jersey
Nick Mangold Authentic Jersey
Mark Sanchez Authentic Jersey
Dustin Keller Authentic Jersey
Jets Jersey
New York Jets Jersey
Cheap Jets Jersey
Antonio Cromartie Jersey
Bart Scott Jersey
Brett Favre Jersey
D'Brickashaw Ferguson Jersey
Darrelle Revis Jersey
Dennis Byrd Jersey
Dustin Keller Jersey
Dwight Lowery Jersey
Joe Klecko Jersey
Joe Namath Jersey
Kyle Wilson Jersey
LaDainian Tomlinson Jersey
Laveranues Coles Jersey
Leon Washington Jersey
Mark Gastineau Jersey
Mark Sanchez Jersey
Muhammad Wilkerson Jersey
Nick Mangold Jersey
Plaxico Burress Jersey
Santonio Holmes Jersey
Shonn Greene Jersey
Thomas Jones Jersey
Vernon Gholston Jersey
Wesley Walker Jersey