दिल्लीच्या पश्चिम भागातल्या उपनगरातलं एक साधं घर. दोन विधवा स्त्रिया तिथं राहतात. त्यातली एक हरनाम कौर - सत्तर वर्षांची म्हातारी आणि दुसरी तिची सून - दलजित कौर, चाळीसएक वर्षांची. १ नोव्हेंबर १९८४ च्या सकाळी त्या दोघींच्या नशिबी एकदमच वैधव्य आलं.
हरनाम कौरच्या मनातून फाळणीच्या आठवणी कधी पुसल्या गेल्या नव्हत्या. बान गुहार नावाच्या आता पाकिस्तानात असलेल्या गावी ती जन्मली, पाठीवर पाच भाऊ बहिणी घेऊन, अवघ्या पंधराव्या वर्षी, १९४६ मधे तिचं लग्न इलेक्टि्न्क फिटिंग आणि दुरुस्ती करणाऱ्या एका माणसाशी लावून देण्यात आलं. त्यानंतर वर्षभरात चार महिन्यांच्या तान्ह्या बाळाला घेऊन नवऱ्याबरोबर फाळणीच्या सीमारेषेवरून ती सहीसलामत भारतात सटकली. पाठीवर केवळ कपड्यांचं गाठोडं बांधून.
पाकिस्तानातल्या त्या दंगलींची दहशत हरनामला आठवते. घरांना, दुकानांना सर्वत्र आगी लागलेल्या, लोकांना रस्त्यात भोसकलेलं, बलात्कारितांचं आक्रंदन, लुटालूट, गोळीबाराचे आवाज आणि निद्राविहीन लांबच लांब काळरात्री. अखेर सैन्यानं तिची सुटका केली आणि कुरुक्षेत्रावर उभारलेल्या निर्वासितांच्या छावणीत त्यांना नेऊन सोडलं. पण पुन्हा अशा नरकयातना भोगायला लागू नयेत, अशी हरनामाची इच्छा पूर्ण होणार नव्हती.
हरनाम छावणीत चार वर्षे राहिली. इलेएटि्निशउायनचं कौशल्य वापरून काम मिळवत तिच्या नवऱ्यानं पुन्हा नवं जीवन सुरू केलं. अंबाला शहरात त्यांनी एक छोटं घर भाड्यानं घेतलं. घरांतून, शाळांमधून आणि कंत्राटदारांकडे कामं मिळू लागली. चार वर्षांनी दिल्लीतल्या आनंदपर्वत भागात ते राहायला गेले.
आता त्यांना चार मुलं होती आणि अजून चार व्हायची होती. आठांपैकी चार मुलं, चार मुली.
मुलांपैकी फक्त एक कारखान्यात कामाला लागला. बाकीच्यांनी वडिलांचा व्यवसाय स्वीकारला एकामागून एक मुलांची लग्नं झाली आणि हरनामला कर्तव्य पार पाडल्याचा आनंद झाला.
एके दिवशी तिच्या नवऱ्याला पक्षाघाताचा झटका येऊन त्याच्या शरीराची एक बाजू लुळी पडली. यमुना नदीकाठी वसलेल्या त्रिलोकपुरी वसाहतीमधे मग त्याने दोन मुलांच्या मदतीने एक जनरल स्टोअर सुरू केलं. हरनाम आनंदपर्वतमधल्या घरात मोठ्या मुलाबरोबर राहू लागली.
फाळणीच्या काळात दिल्ली शहरात शीखांचं प्रमाण अवघं १.२ टक्के होतं. १९८४ पर्यंत त्यांची संख्या ७.५ टक्क्यांएवढी (सुमारे ५,००,००० लोक) वाढली. बाकी ८३ टक्के लोक हिंदू होते. शीखांपैकी अनेकांनी मेहनतीच्या जोरावर दिल्लीत नशीब काढलं होतं. उद्योग उभारले होते, प्रासादवजा बंगल्यात ते राहात होते. आनंदपर्वत आणि त्रिलोकपुरीसारख्या दिल्लीच्या सीमेवरील भागात छोटेमोठे व्यवसाय करणारे शीख राहात होते. त्यांच्या बरोबरीने हिंदूदेखील राहात होते. पंजाबमधून हिंसाचाराच्या आणि अशांततेच्या बातम्या येत असल्या तरी तिथल्या हिंदूंनी शीखांविरुद्ध द्वेषाची भावना बाळगली नव्हती. उलट शीखांचा देशाभिमान, त्यांची उद्योगी वृत्ती यांना मान दिला जायचा. हिंदू समाजाचं विस्तारित स्वरूप म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाई.
१९८० च्या मध्यावर हे सारं बदललं. दोन्ही समाजातल्या राजकारण्यांनी अविश्वासाची आणि भेदभावाची बीजे पेरली. १९८४ च्या उन्हाळयात तर कळस झाला. अमृतसरच्या सुवर्णमंदिरात लपलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी इंदिरा गांधींनी सैन्यबळाचा वापर केला. शीख बंधूंना सर्वत्र वाटलं की सरकारनं आपल्या मर्यादा ओलांडून धर्मस्थळाचं पावित्र्य बाटवलं आहे. आपला विश्वासघात केला आहे. सूडभावनेनं पेटलेल्या इंदिरा गांधीच्या सुरक्षारक्षकांनीच त्यांचा ३१ ऑक्टोबर १९८४ च्या सकाळी खून केला.
त्या दिवशी दुपारी वैमानिक असलेल्या इंदिरा गांधींच्या मुलाला, राजीव गांधींना पंतप्रधानपदाची शपथ दिली गेली. संध्याकाळी देशभरातून शीखांविरुद्ध हिंसा भडकल्याच्या बातम्या येऊन थडकू लागल्या. दिल्लीतल्या हिंसाचाराची पहिली बळी ठरली त्रिलोकपुरी वसाहत. तिथे हरनामची सून, दलजित आपला नवरा आणि सासऱ्यांबरोबर राहात होती. चार दशकांपूर्वी झालेल्या रक्तरंजित फाळणीनंतर इतक्या मोठ्या प्रमाणात देशभरामध्ये जातीय दंगल पहिल्यांदाच होत होती.
त्रिलोकपुरीमधे हिंसेचे थैमान नक्की कसं सुरू झालं कुणालाच माहिती नाही. पीपल्स युनियन ऑफ डेमॉक्रॅटिक राईट्स आणि पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टिज नावाच्या दोन संघटनांनी नंतर केलेल्या चौकशीत आढळलं की अशोककुमार नावाचा काँग्रेस (आय)चा सल्लागार आणि डॉक्टर एक कि. मी. अंतरावरच्या कल्याणपुरीमधे दवाखाना चालवत होता; त्याने एक बैठक बोलावली होती. त्यामधे इंदिरा गांधींची हत्या मिठाई वाटून, रोषणाई करून शीख मंडळी साजरी करत आहेत असा त्याने आरोप केला. देशभर अशाच अफवा पसरत होत्या. क्षुब्ध झालेल्या जमावाचं नेतृत्व करत अशोककुमारने स्थानिक गुरुद्वाराला आग लावली.
रात्रीतून दुचाक्यांवरून, ट्न्क आणि व्हॅन्समधून शस्त्रसज्ज तरुण पोरं उतरली. हातातले त्रिशूल, तलवारी, खंजीर, लोखंडी कांब्या पारजत, घोषणा देत सकाळी सकाळी ते रस्त्यांवर पसरले. त्यातले काहीजण त्या वस्तीतले होते, पण बरेचजण शेजारच्या शहरांमधून आलेले होते.
दलजितचे सासरे, नवरा आणि अविवाहित दीर प्रचंड घाबरले. कांबळी पांघरून घरात दडून राहिले. दारांवर थापड्या मारत, घराघरांतून दडलेल्या पुरुषांना बाहेर काढत, बायकामुलांच्या किंकाळयांमधून क्षुब्ध जमाव हळूहळू पुढं सरकत होता. त्यांचा अंदाज घेत दलजितने घरातल्या पुरुषांना भुर्रकन् मागच्या दाराने बाहेर काढले. शेजारच्या गल्लीतून पलीकडे जाऊन एका रिकाम्या जागी ते लपले. तिथं ते सुरक्षित राहतील असं दलजितला वाटत होतं. त्यांच्याबरोबर थोडा वेळ थांबून ती लपत छपत घरी परतली, घरून जेवण आणि पाणी घेऊन जाण्याच्या इराद्यानं. माघारी जाईस्तोवर ते तिघंही मेलेले होते. त्यांना काठ्यांनी, कांब्यांनी मारहाण करून जिवंत जाळण्यात आलं होतं.
धक्का बसून ती मटकन् खाली बसली. डोळयांत टिपूसही आला नाही. भोवताली धूसर आणि ज्वाळांचं तांडवनृत्य सुरू होतं. घरं, दुकानं, वाहनं, माणसं जाळली जात होती. एका कारमधे माणसाला कोंडून बाहेरून कारला आग लावण्यात आली. घरांच्या कड्या लावून घरांवर रॉकेल, डिझेल, पेट्नेलचा मारा करण्यात आला आणि आगी लावण्यात आल्या, या आकांडतांडव करणाऱ्या जमावाला रॉकेलचा पुरवठा करणारे काही दुकानदार होते. लुटालुटीमधे बायका सामील झाल्या. गस्त घालणाऱ्या पोलीस जीपा दुरून बघत होत्या. काही वेळा, खाकी वर्दीतले जीपांमधून डिझेल आणि पेट्नेल काढून देताना दिसत होते.
दलजित हताश होऊन बघत राहिली. तिचंही घर लुटून जाळण्यात आलं. त्यांच्या दुकानाची तोवर राखरांगोळी झाली होती.
सूडाच्या ज्वाळांनी सारं काही धडपडत असताना तिघांच्या प्रेतांवर तिचं लक्ष लागून राहिलं होतं. विधीपूर्वक नीट दहन व्हावं असं तिला वाटत होतं. काटक्या, वाळकी पानं गोळा करून तिनं प्रेतांवर रचली. शेजाऱ्यांकडे गोवऱ्यांची भीक मागितली. स्वत:च रचलेल्या चितेला आग लावून क्षीणपणानं तिनं एक प्रार्थना पुटपुटली.
रस्त्यांवर शेकडो शीख बायकामुलं एकत्र जमली होती. रडता रडता एकमेकांचं सांत्वन करत होती. एकत्र राहून एकमेकांचं रक्षण करत होती. पण दलजितनं पुढचे दोन दिवस आणि रात्री त्या चितेजवळ घालवले. सूडाचं थैमान अजूनही पेटलेलं होतं.
संख्येने आणि सूडभावनेनं जमाव फुगत चालला होता. पिण्याच्या पाण्याचे साठे विष कालवून शीखांनी नासवल्याच्या अफवा पसरल्या. रेल्वेगाडी भरून हिंदूंची प्रेतं दिल्ली स्टेशनवर आल्याच्या अफवा उठू लागल्या. आश्चर्य म्हणजे देशभरातही त्याच अफवा उठल्या होत्या.
त्या भागात गस्त घालणाऱ्या जीपवरनं पोलीस ओरडून सांगत होते की शीखांनी त्यांचं रक्षण स्वत:चं करावं, पोलिसांवर त्यांची जबाबदारी नाही. काही हिंदूंनी शीखांना आश्रय दिला. एका हिंदूचं घर त्यामुळे जमावानं जाळलं. ओळख लपवण्यासाठी काही शीखांनी त्यांचे लांब केस कापले, दाढ्या काढून टाकल्या, पगडी फेकून दिली.
जशाजशा रात्री आणि दिवस सरले तसतसा सडलेल्या प्रेतांचा वास हवेत पसरला. जळक्या लाकडी सामानाच्या आणि घरांच्या वासासहित. घुशी आणि कुत्र्यांनी अर्धवट जळलेल्या मांसाचे लचके तोडायला सुरुवात केली. विध्वंस करत माणसांचे थवेच्या थवे दलजित जवळून गेले पण कुणी तिला हात लावला नाही.
त्या वसाहतीतील काही हिंदू लोक कल्याणपुरी स्टेशनच्या अधिकाऱ्यांकडे मदत मागण्यासाठी गेले. पण ते तसूभरही हलले नाहीत. त्यांच्या मतानुसार त्रिलोकपुरीमधे `पूर्ण शांतता' नांदत होती.
त्या तीन दिवसात कमीत कमी ४०० शीख पुरुषांची त्रिलोकपुरीत कत्तल करण्यात आली. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उसळलेल्या दंगलीचं त्रिलोकपुरी हे अतिशय वाईट उदाहरण होतं. जयप्रकाश नारायण हॉस्पिटलने नंतर त्या भागातून सात बलात्काराच्या केसेस नोंदवल्या.
दिल्ली जळत असताना नव्याने नेमलेले गृहमंत्री पी. व्ही. नरसिंह राव, लेफ्टनंट गव्हर्नर वाली आणि दंडाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांच्या गटाने दंगल शमवण्यासाठी सैन्याची मदत घ्यायला नकार दिला. विरोधाभास असा की ३००० जणांची पायदळाची ब्रिगेड आणि नाविक व हवाई दलातल्या इतर १०००
जणांना इंदिरा गांधींच्या अंत्यविधीपायी कामाला लावण्यात याच अधिकाऱ्यांना अडचण वाटली नाही.
शेवटी २ नोव्हेंबरच्या रात्री त्रिलोकपुरीतल्या जीव वाचवलेल्या लोकांच्या सुटकेसाठी केंद्रीय राखीव पोलीस आले. दुसऱ्या दिवशी सकाळी दलजितचा नंबर आल्यावर तिने आनंदपर्वत वसाहतीत नेण्यास सांगितले. आपली सासू आणि दीर जिवंत आहेत का नाहीत याची तिला कल्पना नव्हती. त्यांचं घर, दुकान जाळण्यात आलं होतं, त्यांना दगडाने मारहाण झाली होती, तरी त्यांना जिवंत पाहून तिच्या जीवात जीव आला. पण त्रिलोकपुरीतील भयानक बातमी त्यांना सांगण्याची तिच्यावर जबाबदारी येऊन पडली.
पुन्हा एकदा तिच्या सासूवर, हरनामवर निर्वासितांच्या छावणीत जाण्याची पाळी आली. पुन्हा एकदा अंगावरच्या कपड्यांखेरीज तिच्याजवळ काहीही उरलं नाही. फरक इतकाच होता की यावेळी तिला आपला नवरा आणि दोन मुलं गमवावी लागली होती. आपल्या विधवा सुनेला आणि वाचलेल्या मुलांना घेऊन हरनाम पुन्हा एकदा छावणीत राहायला गेली; तिथून एका गुरुद्वारात आणि तिथून एका भाड्याच्या घरात आणि तिथून एका दंगलग्रस्त विधवांच्या तिलक विहार वसाहतीमधे. लांबवरचा प्रवास ! आता ती दलजितबरोबर राहते. सरकारकडून घरातल्या प्रत्येक मेलेल्या सदस्यांमागे दहा हजार रुपये मदत मिळाली. `नुकसानभरपाई' असं त्याला नाव देण्यात आलं. त्या रकमेच्या व्याजावर त्या गुजराण करतात.
आज सोळा वर्षांनंतर, दोघींच्या डोळयांत १९८४ च्या घटनांच्या आठवणींचं मळभ दाटून येतं. पण हरनाम आणि दलजित कौर मोठ्या धाडसी बायका आहेत. आपलं अनंत दु:ख मागं सारून त्या निर्धारानं पुढच्या भविष्याकडे, उदरनिर्वाहाकडे बघू लागल्या आहेत.
पण या वरवरच्या शांततेच्या आवरणाखाली एक गोष्ट त्यांच्या मनाला कायम सलत राहिली आहे - ती म्हणजे - सोळा वर्षांनंतर अजूनही दिल्लीतल्या या ३००० माणसांचं शिरकाण करणाऱ्या आणि हजारोंना निराधार करणाऱ्या या मनुष्य संहाराबद्दल एकाही माणसाला शिक्षा झाली नाही. इतकं सगळं घडून गेल्यावर किंचितही न्याय मिळाला नाही. आणि आता हे देखील स्पष्ट दिसतंय की न्याय मिळणार नाही.
(हर्ष मंदर यांच्या णपहशरीव तेळलशी (झशपर्सीळप इेेज्ञी, २००१) पुस्तकातील गोष्टीचे भाषांतर)
अनुवाद : माधुरी दीक्षित, अहमदनगर
Posted in


