Skip to main content

एकदम काय झालं, ते नानींना कळलंच नाही. त्या टॉयलेटला गेल्या आणि त्यांचा एक पाय सटकन घसरला. एक पाय अगदी पुढे गेला तर एक पाठीमागे. शरीराचा जसा सरळाकोनच झाला. आता दोन्ही पाय जवळ आणून मधलं शरीर त्यावर कसं तोलायचं तेच त्यांना कळेना. १-२ मिनिटं त्या तशाच पडून राहिल्या. पण जरा वेळाने भानावर आल्या. एका बाजूने थोडी ओली झालेली साडी त्यांनी कशीबशी नीट केली आणि मग भिंतीला धरूनधरून त्या कशातरी उठल्या. बरं तर बरं, दाराला आतून कडी घातली नव्हती. तशाच एकेक पाऊल टाकत हळूहळू त्या सोफ्यावर येऊन बसल्या. घरात कोणीच नव्हते. नेमके काय घडले, ते आत्ता कुठे त्यांच्या लक्षात आले. पण आता मात्र दारुण वेदनांनी त्यांच्या सर्वांगाला वेढून टाकले. त्यांना काही सुचेना आणि सहनही होईना.
साधारण तासाभराने त्यांची सून गीता घरी आली. बघते तो नानी सोफ्यावर मान टाकून विवर्ण चेहऱ्याने कण्हत पडल्या होत्या. ``काय झालं, आई ?'' मनाशी किंचित चरकत तिने विचारले. त्यांनी काय घडले ते सारे सांगितले आणि साडी वर केली. मांडी चांगलीच काळीनिळी पडली होती. मग रिक्षा करून त्यांना हॉस्पिटलमधे नेले. एक्स-रे, गोळया त्याचे रिपोर्ट हे सारे सोपस्कार झाले. मग पायाला प्लॅस्टर आले. त्यांचं सारं करायला १५०/- रु. रोजाची नर्स चांगली १०-१२ दिवस ठेवावी लागली. नानींना या दुखण्याचं राहून राहून वाईट वाटत होतं. घरच्यांच्या त्रासात आणखीनच भर. शिवाय खर्च वेगळाच.
चार दिवसांनंतरची गोष्ट. नानी अशाच कॉटवर पडल्या होत्या. घरात शंतनू - त्यांचा नातू आईजवळ फी मागत होता. तशी गीता एकदम उसळून म्हणाली, ``आता आली का लगेच तुझी फी? म्हणजे ४-५ हजाराचा खड्डा. आत्ताच हॉस्पिटलचे भले मोठे बिल भरले. घरांचे टॅक्सेस आहेत. खड्डेतरी किती किती भरायचे ? डोक्याचं टेन्शन काही कमी होत नाही.'' आणि घरांतून भांड्यांचा धडाधडा आवाज यायला लागला. हे सारे उद्रेक नानींच्या कानांवर पडत होते. डोळयातलं पाणी पुसून त्यांनी शांतपणे कूस बदलली. ``खरंच, देव किती आंधळा, किती अन्यायी आहे ! चांगली तरणीताठी, कामाची माणसं तो लीलया उचलतो आणि मला म्हातारीला मात्र व्याधींमध्ये गुंतवून मजा बघतोय ! खरं तर रोज रात्री झोपताना त्या प्रार्थना करायच्या. `देवा, सारी कर्म आणि त्यांचं फळपण मी तुला अर्पण केलंय. तू दिलेलं आयुष्य छान जगून झालंय. तेव्हा आजतरी रात्रीतून अलगद उचल मला. तुझ्या घरी यायचंय मला आता. या डोळयांना उद्याचा दिवस नको दिसायला. कृपा कर रे, माझ्यावर एवढी कृपा कर.' तरी एकेक दिवस सरत आता त्यांना ८० वे वर्ष लागले होते. दिवस उजाडला, अंथरुणावर डोळे उघडले की, त्या कसानुसा चेहरा करत. आपल्या हाताला एक चिमटा काढत, आणि मग हताशपणे उसासा सोडत.
कधीकधी त्यांना वाटे, या नातेसंबंधांचा खराखरा अर्थ आत्ता या वयात कळू लागला आहे आपल्याला. इतके दिवस आपलं हा आला, तो आला, एकेकाची केळवणं, बारशी, वास्तुशांती, मुलांची दुखणी, अभ्यास, क्लास, स्वयंपाकपाणी, आजारी माणसाची सेवा यात कसे गेले ते कळलेच नाही. तेव्हा फक्त कर्तव्य डोळयांसमोर होती. संसारातल्या अडचणी, आर्थिक ओढाताण, अनेक काळज्या करतच दिवस ओढले. मुलांची शिक्षणं, त्यांची लग्नं, पुढच्या जबाबदाऱ्या निभवलं कसंतरी. संसार इथपर्यंत आणून ठेवला. बापूंची नोकरी तशी बेताचीच. मुलं मोठी झाल्यावर आपण एका उद्योगकेंद्रात
जात होतो. कमालीची काटकसर करून, तारुण्यसुलभ साऱ्या इच्छाआकांक्षा दडपून कसंतरी हा तीन खोल्यांचा फ्लॅट घेतला. तेव्हा किती कृतकृत्य वाटलं होतं ! डोक्यावर छप्पर असल्याचा आनंद काय असतो तो त्यांनी त्याक्षणी अनुभवला होता. आता मुलगाही बऱ्यापैकी शिकला होता. कंपनीत नोकरीला होता. मुलाचं लग्न करताना `त्याला निदान सेपरेट बेडरूम आहे' या गोष्टीचा त्यांना खूप आनंद झाला होता. इतक्या वर्षांच्या वैवाहिक जीवनात त्यांना स्वतंत्र अशी बेडरूम फक्त ४-५ वर्षेच मिळाली होती. म्हणजे मुलाचे लग्न होईस्तोवर. नंतर परत त्यांचा मुक्काम हॉलमधे आला होता. दिवसा कोणी मुलाकडे आलं, तर बापू बाल्कनीतच बसत. मग तिथे एक कॉटच टाकून घेतली. कधी नानी पडत, तर कधी बापू.
भूतकाळाचा मोठाच्या मोठा पडदा त्यांच्या डोळयांसमोर होता. गीता थोडीशी हट्टी आणि फटकळ स्वभावाची होती. आपल्याला हवं तसंच करून घेणारी. एकंदर सारी परिस्थिती ओळखून अॅडजस्टमेंट नानींनी स्वत:च्या बाजूनेच जास्त केली, बापूंनाही करायला लावली. स्वत:चे घर असूनही. कारण मुलगा स्वतंत्र जागा घेऊ शकत नाही हे त्यांना दिसत होतं. मग शक्य तेवढं तिच्या मनासारखं वागून त्यांचा संसार टिकवणं भाग होतं.
आणि आज सुनेच्या लग्नाला बत्तीस वर्षं झाली. नातसून घरात आली. तरी तडजोड संपत नाही. समोरच्या भिंतीकडे बघत त्यांनी एक नि:श्वास सोडला. सुनेला सून आली. पण अर्थातच शंतनूने - त्यांच्या नातवाने लग्नाच्या आधीच एक छोटासा फ्लॅट घेतला होता. लग्न झाल्या झाल्या तो त्यांच्या फ्लॅटमधे राहायला गेला. सारं किती सोपं, सरळ, मनासारखं ! हल्लीच्या मुली खरंच भाग्यवान. लग्न झाल्याझाल्या स्वत:चं घर, पैसा, नवरा, सारंसारं त्यांच्या ताब्यात येतं. अलगदपणे ! झाडावरून फूल खाली पडावं तसं. बापूंशी त्या असं बोलल्याही, तर हसून ते म्हणत, ``सुमती, तू जर अशीच फक्त ५-६ वर्षांपूर्वी जन्माला आली असतीस ना, तर तुलापण हे सगळं मिळालं असतं. यावर काही उपाय आहे का सांग.'' मग जरा वेळाने मोठ्याने हसून ते परत म्हणत, ``आहे, एक उपाय आहे. तू आणि मी छानपैकी मोकळया हवेत फिरून येऊ, चल.''
दहा वर्षांपूर्वी बापूंना हार्टअॅटॅक आला, आणि ते झोपेतच गेले. आणि संसाराचे एक चाक निखळून पडले. पण आता वाटतं, बरंच झालं ! सुटले ते ! माझ्यासारखं दु:ख भोगत भोगत आयुष्याची पानं उलगडत नाही राहिले. ते गेल्यानंतर तर रात्री झोपायला हॉलसुद्धा मिळेनासा झाला. गीताच्या माहेरचं कुणी ना कुणी असेच. त्यामुळे ही बाल्कनी नशिबाला चिकटली ती कायमचीच.
कधीकधी नानींना वाटे, त्यांची आणि आपली आयुष्यं दोन समांतर रेषांवरून चालली आहेत. माझी वाट धूसर, घसरडी आणि पैलतीरीची आहे. तिथे घसरण्याचे प्रसंग आता हरघडीच येणार आहेत. पण एकदाचं जोराचं घसरून तत्क्षणी हृदय बंद पडून गेलं तर कित्ती चांगलं होईल. पण हे सारखं सारखं पसरून इथे तिथे पडणं, लागणं आणि मग हॉस्पिटलचा खर्च. त्यांची वाट प्रकाशाची आहे. सोनेरी भविष्याची आहे. मुलांची फुललेली आयुष्यं बघणं, त्यांच्या घरी वरचेवर जाणं, नातवंडांचं कौतुक करणं, त्यांना भेटवस्तू देणं - एक ना दोन. आपल्या मुली चांगल्या संपन्न घरी पडल्या. पण आईला बदल म्हणून कधी महिनाभर काही घरी घेऊन जात नाहीत. हवाबदल, विश्रांती, जरा रुचिपालट आणि मानसिक स्वास्थ्यही हवं असतं ना माणसाला ! पूर्वी कधीतरी २-४ दिवस न्यायच्या. हल्लीतर तेही नाही. उलट हल्ली त्या म्हणू लागल्या होत्या, ``आई, हल्ली तुझा स्वभाव फारच हट्टी आणि विचित्र झाला आहे. अगं, सगळंच तुझ्या मनासारखं कसं होईल ? शिवाय तुझ्यासोबत घरी सतत कोण राहणार ? पण सगळे बाहेर गेले की, तू अगदी घर डोक्यावर घेतेस ! कसं करायचं माणसाने अशा वेळी?'' नानी नुसत्याच चूप होत. पण आतल्याआत त्यांची घुसमट चाललेली असे. एखाद्या लहान मुलासारखी एकटं घरात राहायला त्यांना हल्ली भीती वाटत असे. समजा कोणी घरात नसताना माझा जीव घाबरा झाला तर ? कुठे पडून एकदम प्राणच गेला तर ? अशी उदाहरणं त्यांना अगदी तोंडपाठ होती.
परवा पोट दुखतं म्हणून सहज डॉक्टरांकडे दाखवायला नेलं तर काय हार्निया निघाला. मग काय परत तपासण्या, रिपोर्ट, औषधं आणि मग घरातल्यांचे पुन्हा टॉर्चर ! ``काय बाई तरी करावं ? एकीकडे आम्ही काटकसर करून खातो. पण त्याचा काय उपयोग? यांचे एक दुखणं उभं राहिलं की झालं ! मिळकतीच्या दहापट यांचा खर्च.''
``अगं, यावेळी आपण ससूनमधेच जाऊ या.'' इति नानींचा मुलगा.
``अहो, पण जाण्यायेण्याचा केवढा व्याप होईल. १०-१२ हेलपाटे घालावे लागले तर काय भावात पडणार ? शिवाय दगदग किती होईल ?''
``तेही खरंच आहे म्हणा. अरे शंतनू, जरा चॅरिटेबल हॉस्पिटलचे पत्ते आणि फोन नंबर मिळव बघू. बसल्या बसल्या तेवढं तरी काम कर.'' एखाद्या सासुरवाशिणीसारखं नानींना हे शब्द गिळावे लागले. असेच २-४ दिवस गेले. आणि अचानक गीताचे वडील गेले. असतील ७५ वर्षांचे ! मग काय ! सगळे कुटुंब तिकडेच. घरात त्या अगदी एकट्या पडल्या. रात्री झोपायला फक्त शंतनू घरी येई. एक दिवस शंतनूबरोबर रिक्षाने जाऊन त्याही विहिणीला भेटून आल्या.
चौदावा आटोपून मंडळी घरी आली. `किती लोक आले होते गं समाचाराला. फारच पॉप्युलर होते वाटतं तुझे वडील ?' इति रवी. ``हं. लोकांच्या खूप उपयोगी पडायचे, चांगले सल्ले द्यायचे. पण देवाचा न्याय पाहा. असं माणूसच देव लवकर नेतो !'' गीताला गहिवरून आले. ``नाही, म्हणजे तसं काही नाही वाईट झालं. हिंडते फिरते असताना गेले. ७५ वय होतेच ना. उगीच हॉस्पिटल, दुखणी, बेडवर खिळणं हे प्रकार नाही झाले.'' ``हो ना. भाग्यवानच म्हणायचे. आणि माधवनेही चांगलं केलं सगळं. चौदाव्याला किती लोक बोलावले होते, बघितलंत ना ! सारं कसं यथासांग झालं.'' एवढा वेळ नानी त्यांचं बोलणं ऐकत पडल्या होत्या. एकदम एक विचार
त्यांच्या डोक्यात सुरसुरत आला. ``रवी, साधारण किती रे खर्च आला असेल ?'' ``आँ ? आता ते मला काय माहीत ? ते कोण विचारणार ? पण ७-८ हजार तरी लागले असतील. का गं, पण तू का विचारतेस ?'' ``नाही. म्हणजे मी म्हणते, एवढा जर खर्च येणार असेल तर मी गेल्यावर असले कोणतेही धार्मिक विधी करू नका. अगदी फोटोसुद्धा लावू नका. ते पैसे आत्ता माझ्या औषधासाठी वापरा. वेदना अगदी सहन होत नाहीत रे मला. काय करू ? नाहीतर झोपेच्या गोळया तरी घेऊन ये. म्हणजे चिरशांतीच मिळेल एकदाची.'' तसं मुलाने आणि सुनेने त्यांच्याकडे दचकून पाहिलं. मग मात्र सूत्रं जरा हलली. लिहून दिलेली औषधं तातडीने आणली गेली. आणि ते दुखणे एकदाचे निपटले गेले.

सध्या फक्त त्यांना कॉटचीच सोबत होती. या ना त्या कारणाने त्या पडूनच असत. अशा वेळी विचारांना काय तोटा ? कुठल्या कुठल्या गतकाळच्या आठवणींमधे मेंदू गुंतून जाई. असंच एकदा त्यांना टीव्ही वर ऐकलेल्या प्रवचनातले शब्द आठवले. ``अहो, वाढत्या आयुर्मानाला घाबरू नका. वेदउपनिषदांमधेसुद्धा सांगितलंय की, चांगलं १०० वर्षे जगावे. पण लाचारपणाने नाही. आनंदाने जगा. प्रसन्न राहा.'' तेव्हा त्यांनी सांगणाऱ्याकडे विलक्षण अविश्वासाने रोखून पाहिले. मग मनातल्या मनात त्या म्हणाल्या, ``हो, तुम्हांला म्हणायला काय जातंय? आजूबाजूच्या आपल्याच माणसांना आपल्या दुखण्याखुपण्याचा एवढंच नव्हे - तर आपल्या अस्तित्वाचासुद्धा त्रास होत असतो. त्याचं काय ? आपलं काय निसर्गातल्या त्या झाडासारखं थोडंच असतं ? आणि त्यांना परवा वाचलेली ती कविता आठवली. खरं तर त्यांना ती खूपच आवडली होती. ती कविता अशी होती :
``पिकल्या पानांचं एक बरं असतं ।
हिरव्या पानात, कोवळया पालवीत हरवलं हिरवेपण शोधत वाऱ्यासंगे झुलता येतं ।
गळून पडेपर्यंत झाडावरच राहाता येतं ।
पिकल्या पानांचं वेगळं असं झाड नसतं ।''
`हं ! हा निसर्गसुद्धा अन्यायाने नाही वागत, मग आपण तरी कशाला गिल्ट ठेवायचा मनात ? छान, आनंदाने जगायचं. पण जमेल आपल्याला ? समोरच्याने नुसतं, ``काय आजी, कशा आहात ?'' असं विचारलं, तर तेव्हा आपल्याला त्याच्या डोळयांत, बोलण्यात कुचेष्टा असल्याचा भास होतो. आपल्याही नकळत आपला चेहरा कसानुसा होतो. उदासपणे आपण नुसतीच मान हलवतो. त्यांना पुन्हा मागचा एक प्रसंग आठवला. एकदा अशाच दोन्ही मुलींच्या सासवा त्यांच्याकडे आल्या होत्या. बराच वेळ गप्पा झाल्यावर त्या म्हणाल्या, ``नानी, एखादं भजन म्हणा हो. तुम्ही खूप चांगलं म्हणता म्हणे. आमची ऐकायची कधी वेळच आली नाही. म्हणा एक.'' सून, मुली सगळयाच होत्या. तेव्हा नानी म्हणाल्या, ``मी सुद्धा बरेच दिवसात गळा तापवला नाही. बघते प्रयत्न करून.'' मग २-४ मिनिटं विचार करून त्या म्हणू लागल्या. ``जाईन मी आता आपुल्या माहेरा । निरोप या संताहाती आला, हाती आला.'' म्हणता म्हणता त्या अगदी तल्लीन होऊन गेल्या. जणू खरंच त्या वाटेने त्या निघाल्या होत्या. पण तेव्हा व्यक्त केलेली ती इच्छा अजून पूर्ण होत नाही. नुसता निरोप येऊन काय उपयोग? त्याने प्रत्यक्ष यायला नको ? मी तर कधीची गाठोडं बांधून बसलेय. पण त्याची गाडी येतच नाही तर काय करू ?'
नानी परत हसल्या. काय तरी बाई आपलं मन झालंय ! आता एक संकल्प करतं की लगेच त्याच्या विरुद्ध टोकाला जातं.
पण एक दिवस त्यांच्या या दिनक्रमात एक आक्रीत घडलं. त्या दिवशी त्यांचा नातू शंतनू आणि त्याची बायको शलाका दोघंही आले होते. त्यांनी आधी आईवडिलांशी गप्पा मारल्या, आणि मग ते नानींजवळ आले. ``नानी, कशा आहात ?'' तिने नमस्कार करत विचारलं. ``वयाला शोभेशीच तब्येत आहे म्हणायची दुसरं काय ? अरे बाबा, बुकिंग तर कधीच झालंय, आता गाडीची वाट पाहातेय. यापेक्षा दुसरा कोणता बदल होणारेय माझ्या आयुष्यात सांग.'' सहजसुरात त्या म्हणाल्या.
शलाकाने चमकून त्यांच्याकडे पाहिले. केसांचा कापूस कधीच झाला होता, पण ते विरळही झाले होते. कुठे कुठे आतली टाळू दिसायला लागली होती. अशक्तपणामुळे आणि सुरकुत्यांनी हातातल्या बांगड्या घसरून खाली आल्या होत्या. वार्धक्यापुढे पराभव पत्करल्याची एक खिन्न उदास भावना चेहऱ्यावर होती. तिला वाटलं, `खरंच, ह्यांच्याकडे आपण इतक्या बारकाईने कधी पाहिलंच नाही. आणि तिच्या मनात त्यांच्याबद्दल एक विलक्षण कणव दाटून आली. मग हलकेच त्यांचा हात हातात घेऊन ती म्हणाली, ``नानी, माझ्या घरी येता दोनतीन दिवस ? खरं तर इतक्या वृद्ध व्यक्तींचं करण्याची मला सवय नाही. पण तरी जमेल तसं करीन मी. चालेल तुम्हांला?'' नानींनी काहीशा अविश्वासाच्या नजरेने तिच्याकडे पाहिलं. त्या काहीच बोलल्या नाहीत. तेव्हा गीताच म्हणाली, ``अहो नानी, जा ना, ती म्हणते आहे तर. तेवढाच जरा जागापालट होईल. चला, मी भरते तुमची सामानाची पिशवी.'' नानींचा अजूनही विश्वास बसत नव्हता. पण दोघी सासवा-सुनांनी चंगच बांधला. थोडे कपडे, औषधे भरलेली एक छोटी बॅग शलाकाने आपल्या हातात घेतली. नातवाने नानींचा हात धरून त्याच्या कारमध्ये बसवले. घरात नेतानाही हात धरून नेले आणि चट हॉलमधल्या कॉटवरच बसवले. तीच त्यांच्या मुक्कामाची जागा झाली आता. छोटासा तीन रुम्सचा ब्लॉक होता त्यांचा. नवनवा संसार होता. पण आनंदी पाखरांसारखी दोघं भोवती भोवती करत होती.
सकाळी चहा, बिस्किटं. नऊ वाजता दूध. ``आजी, स्वैपाक काय करू ? तुम्हांला काही पथ्यपाणी आहे का ?'' नानींनी मान हलवली. ``फक्त सगळं खूप मऊ लागतं गं मला. माझी भाजी कुकरमधेच ठेव आणि चपातीपण कुस्करूनच दे मला. तेवढीसुद्धा शक्ती नाही माझ्यात.'' `बरं' म्हणत शलाका परत किचनमधे पळे. नाश्त्यातपण मऊ मेतकूट भात एकदा दिला. तर एकदा दूध ब्रेडबटर असं दिलं. चपाती पानात वाढली जायची. पण नानी स्वस्थ बसून राहिल्या की, मग तिच्या लक्षात यायचं. मग जेवायला बसलेली ती परत उठायची आणि चपाती कुस्करून त्यावर आमटी ओतून द्यायची. आणि मग हळूच विचारायची, ``नानी, बरं झालंय ना सगळं ? जमतंय ना मला ?'' त्या कौतुकाने मान डोलवायच्या.
बघताबघता दोन दिवस तर संपले. आज संध्याकाळी त्यांना घरी पोचवायचे होते. त्यांच्यासाठी ती एक वजनाने अगदी हलके पण तलम पोताचे असे लुगडे घेऊन आली. दुपारी त्या पडल्या, पण झोप येईना. वाताने पायाला सारखा बाक येत होता. बेडवर उठून बसत त्या पायावर हात फिरवत राहिल्या. तशी मनावर इथल्या अगत्य आणि आदराची तृप्ती होती. पण पाय काही सुचूही देत नव्हता. आपल्या हाताने त्या दाबत होत्या. तेवढ्यात शलाका तिथे आली, ``काय होतंय, नानी ?''
``काही नाही गं, वाताने पेटके येतात, नि मग बोटं वाकडी होतात. मग दुखतात पाय.''
``थांबा हं, घरात एक वेदनाशामक आयुर्वेदीक तेल आहे. ते लावते तुम्हांला.'' आणि खरंच दोन मिनिटात ती एका वाटीत तेल घेऊन आली. आणि अगदी हलक्या हाताने चोळून चोळून लावू लागली. तिची लांबसडक सावळी बोटं अगदी आदबशीरपणे, मायेने फिरत होती. उशाच्या तक्क्यावर मान टेकून नानी बसल्या होत्या. तो स्पर्श त्यांना चांगलाच सुखावत होता.
``कसं वाटतंय आता ? बरं वाटतंय ना ?''
``हो गं, खूप छान वाटतंय.'' मिटलेल्या डोळयांनीच त्या म्हणाल्या. एक ८-१० मिनिटं ती तेल चोळत होती. मग ती उठली.
``नानी, वाटीतलं सगळं तेल चांगलं जिरवलंय मी. पुरे का आता ?'' पण नानी काहीच बोलल्या नाहीत.
``नानी, जाऊ ना मी आता ? चहा करून आणते.'' त्यांना स्पर्श करून ती निघाली. आणि त्याच क्षणी काय नवल घडले कुणास ठाऊक ! नानींनी एकदम मानच टाकली. ``आँ !'' निघालेली ती थांबली, आणि विलक्षण घाबरली.
``अरे, अरे शंतनू, इकडे ये आधी. नानींना काय झालंय बघ.'' आणि बोलता बोलता तिच्या डोळयांत एकदम पाणी दाटलं. शंतनूने नानींना नीट झोपवले. मघाशी नातसुनेची सेवा घेता घेताच त्यांचा प्राणपक्षी अलगद केव्हा उडून गेला होता, ते कळलंच नाही.
``शंतनू अरे, पहिल्यांदाच आणलं आपण त्यांना घरी. आणि असं व्हावं का रे ? आज साडी देऊन मी त्यांची चांगली पाठवणी करणार होते, तर....'' ती हमसून हमसून रडू लागली. तिला कुशीत घेऊन थोपटता, थोपटता शंतनू मात्र मनात म्हणत होता, ``शलू, अगं, बरीच वर्षे उपेक्षेचे बोल झेलून झेलून विकल झालेल्या आजीला हे दोन दिवसातले प्रेम, सुख, माया सोसलं नाही गं ! ममतेचे स्पर्शसुख अनुभवता अनुभवताच तिने समाधानाने डोळे मिटून घेतले. कायमच्यासाठी.''
मग शलाकाला शांत करून तो फोन करायला धावला.
- कल्पना कुलकर्णी, पुणे