``येरे येरे पावसा, तुला देतो पैसा'' असे म्हणत आपण लहानाचे मोठे झालो. खरोखरच पैसे टाकून पाऊस विकत घेता आला असता तर ?
केंद्रीय आयोगाने १९९१ मध्ये एक अहवाल तयार केला होता. त्यावरून असे दिसते की १९९० मध्ये, पिण्यासाठी, शेतीसाठी आणि उद्योगासह अन्य वापरासाठीची पाण्याची जी गरज होती, ती ३५ वर्षांत म्हणजे २०२५ साली दुप्पट होईल. यातील २/३ गरज पृष्ठभागावरील पाण्यातून तर १/३ गरज भूगर्भातील पाण्यातून मर्यादित असल्याने दरडोई पाण्याची उपलब्धी कमी कमी होत जाणार.
पावसापासून आपल्याला दरवर्षी ४० कोटी हेक्टर मीटर पाणी मिळते. त्यातील १७ कोटी हेक्टर मीटर (४० %) पाणी बष्पीभवन होऊन वातावरणात निघून जाते आणि वातावरणातील समतोल राखते. उरलेले २१.५ कोटी हेक्टर मीटर पाणी ओहोळ, ओढे, नाले आणि नद्या यातून वाहत असते. त्यातले जेवढे आपण जमिनीत मुरवू, धरणांत साठवू, तेवढे जादा पाणी आपल्याला वापरता येते.
``उदक चालवावे युक्तीने'' असा नारा पाण्याच्या क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ श्री. विलासराव साळुंखे यांनी दिला होता. भूपृष्ठावरील पाणी आणि जमिनीखालील पाणी ही सामाजिक संपत्ती आहे आणि तिचे न्याय्य वाटप झाले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता.
धावत्या पाण्याला चालतं करा
चालत्या पाण्याला बसतं करा
बसत्या पाण्याला झोपतं करा
हा खरा जलसंधारणाचा संदेश. पावसाच्या पाण्याचा थेंबन् थेंब साठवणं आणि वापरात आणणं, हा आपला उद्देश असायला हवा.
वर्षांच्या १२ महिन्यांतील पावसाचे ४ महिने महत्त्वाचे. या ४ महिन्यांत ४० दिवस पाऊस पडतो. या ४० दिवसांत प्रत्यक्ष पाऊस पडतानाचा वेळ मोजला तर तो ९६ तास भरतो. म्हणजेच ३६५ दिवसांपैकी ४ दिवसात वर्षभराचे पाणी मिळते.
पूर्वी पाऊस ४०-४६ दिवस पडायचा. त्यांत रिमझिम किंवा झडीचा पाऊस असायचा. हळूहळू पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरणे तुलनेने सोपे. पण आता पाऊस लहरी बनत आहे. तो आता ३४-३८ दिवसांत पडू लागला आहे. म्हणजे पाऊस पूर्वी - एवढाच पडला तरी, त्याची तीव्रता वाढत असल्याने पाण्याचा प्रवाह वाढू लागतो आणि पाणी जमिनीत मुरण्यात अडचणी येतात.
त्यात पुन: महाराष्ट्नपुरते बोलायचे झाले तर, आपला भूगर्भ वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो अशा कारणांनी, की जमिनीखाली बेसॉल्ट आणि ट्न्ॅप या नावाने ओळखला जाणारा खडक आहे. कातळ, ते पाणी सहजपणे मुरू देत नाही. म्हणून जमिनीखाली पाण्याचे साठे उथळ स्वरूपाचे राहतात.
विजेची उपलब्धी, ती नसेल तर डिझेल पंपांचा वापर, आणि खोलवरचे पाणी पंप करू शकणारी यंत्रसामुग्री उपलब्ध झाल्याने विंधण विहिरींचा वापर वाढू लागला. हे भूजल किती उपसावे याला काही मर्यादा ? वसई-विरार भागांत १५ वर्षांपूर्वी वस्ती वाढू लागली, पाणी पुरेना म्हणून प्रचंड प्रमाणात विंधण विहिरी घेतल्या. चिकूच्या बागा उद्ध्वस्त झाल्या, जमिनीखालचे पाणी खारट झाले. `सांगलीची द्राक्षे युरोपात' ही बातमी वृत्तपत्रात वाचून एखादा सुखावेल पण या द्राक्षांनी इतरांचे तोंडचे पाणी पळविले, त्याचे काय ? पश्चिम महाराष्ट्नत विंधण विहिरी फक्त ६०-७० मीटरवर होत्या, त्या विदर्भात ५००-५५० मीटर खोलवर गेल्या. तरीही अमरावती - वरूड भागात संत्र्याच्या बागा पाण्याअभावी जळू लागल्या. भूजलाची पातळी खोल खोल जाऊ लागली.
भूगर्भातील पाणी आपण झपाट्याने संपवत आहोत. हैद्राबादमध्ये भूजलाचे वय शोधण्याचा प्रयोग झाला आणि ते निघाले ६४० वर्षे ! म्हणजे ६४० वर्षे थेंब - थेंब जिरवत गेलेले पाणी स्वातंत्र्यानंतर ५० वर्षांत आपण संपवत आणले. पाणी मुरवण्याचे, जिरवण्याचे प्रयत्न कमी होऊ लागले आहेत आणि उपसा तर प्रचंड वाढतोय. दोन्हीतील असमतोलामुळे भयानक परिस्थिती होत आहे. पुढे काय होणार ? जलसंधारण हे खरे यावरील उत्तर आहे.
एक हेक्टर उसाचा मळा दीड हजार ग्रामीण लोकवस्तीचे, आणि एक हेक्टर केळयांची बाग दोन हजार वस्तीचे पाणी फस्त करते. तेव्हा भूगर्भातील पाण्याच्या उपश्यावर ताबडतोबीने बंधने आणायची वेळ आली आहे. तथापि अनेक कारणांनी याला विरोधही होईल. मग पीकरचनेत बदल करता येईल का ?
आज पावसाचे पडणारे पाणी सारेच्या सारे आपण अडवू शकू, अशी परिस्थिती नाही. त्यामुळे नदीनाल्यामधील मोठ्या प्रमाणावर न वापरलेले पाणी समुद्राला जाऊन मिळते. तेव्हा पावसाचा थेंब न् थेंब अडवायचा, वापरायचा, समुद्राला मिळू द्यायचा नाही, म्हणजे जलसंधारण. `पाणी अडवा, पाणी जिरवा' ही वसंतदादा पाटलांची घोषणा सर्वांना आठवेल.
नैसर्गिकरित्या तलावांत पावसाचे पाणी साचते, हे जलसंधारणाचे सोपे रूप. त्याला श्रम पडत नाहीत. शिवाय तलावाच्या तळाशी प्लॅस्टिकचे आच्छादन पसरून साठवण तलाव करता येतो. अर्थात् इथे पाण्याचा जमिनीत पाझर अपेक्षित नाही.
धरण बांधणे हा जलसंधारणाचा कृत्रिम, खर्चिक व वेळखाऊ प्रकार. त्यात शेतकऱ्यांच्या जमिनी बुडीत क्षेत्रांत जाणे आणि जमीन मालकांचे पुनर्वसन या किचकट बाबी येतात. अर्थात् तरीही, (धरणे मोठी असावीत का लहान या वादात न शिरता) धरणांची आवश्यकता व उपयुक्तता वादातीत.
पण याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आपण गावोगावी पाणी अडवू शकतो. यात गली प्लगिंग, सिमेंट नाला बंडिंग, लहान बंधारे, भूमिगत
बंधारे यांचा समावेश होतो. स्थानिक परिस्थितीनुसार यांची निवड करता येते. या कामात पुढाकार, आस्था, उत्साह, परिश्रम हे आवश्यक आहेतच. पण त्याचबरोबर तांत्रिक सल्ला मिळाला तर उत्तमच. कारण बांधलेला प्रत्येक बंधारा यशस्वी ठरतोच असे नाही.
नाला क्षेत्रामध्ये जाळी पसरून त्यात दगड भरून पुन: जाळयाचे आवरण देऊन गॅबियन बंधारे बांधता येतात. हे कमी खर्चाचे असतात. शिवाय वनराई बंधारेही अनेक ठिकाणी यशस्वी झाले आहेत. त्यासाठी पावसाळा संपत आला की सिमेंटच्या गोण्यांमध्ये माती भरून त्यांच्या सहाय्याने लहान बंधारे कमी वेळात बांधता येतात. या दोन्ही प्रकारात तळातून थोडे पाणी पाझरले तरी फारसे बिघडत नाही. कारण पाण्याच्या प्रवाहाचा वेग खंडित करणे हा मुख्य हेतू साध्य झालेला असतो.
डोंगरात चर खणून पाणी अडवता येते. मात्र हे चर शिखरापासून पायथ्याच्या दिशेने खणू नयेत. कारण पाऊस आला की पाणी उताराच्या दिशेने भस्कन वाहत येते. त्यामुळे कार्यहानी होते. त्याऐवजी डोंगराला वेटोळे घातल्यासारखे खणलेले चर अधिक उपयुक्त ठरतात. शिवाय कंटूर ट्न्ेंिंचग किंवा जमिनीवर समान पातळीवर तळ असणारे चर खणल्यास पाण्याचा प्रवाहच नसल्याने पाणी तुंबून राहून मुरू लागते. याच प्रकारे शेततळी बांधली जातात. पण त्यासाठी पीक न येणारी मुरुमाड जमीन चांगली. चांगल्या जमिनीसह शेततळे बांधले तर पीक बुडते, म्हणून शेतकरी तयार होत नाहीत.
मात्र, केवळ हे असे बंधारे बांधले, चर खणले म्हणजे सारे संपले असे नाही. कारण पावसाचा पाण्याचा प्रवाह येताना आपल्या बरोबर माती आणतो आणि तो गाळ बंधाऱ्यांच्या, तलावाच्या तळाशी असतो. त्यामुळे पाणी मुरण्याच्या क्रियेस बाधा येते. तेव्हा उन्हाळयाच्या अखेरीस गाळ काढणे जलसंधारणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरते. मात्र यासाठी श्रमदान हा खरा मार्ग आहे.
धरणांत, तलावांत जे पाणी साठवले जाते, त्याचा बराचसा अंश बाष्पीभवनाने नाहीसा होतो. उन्हाळयातले प्रमाण वाढते. हे बाष्पीभवन रोखणे म्हणजेही जलसंधारणाचा पूरक प्रकार. बाजारात काही द्रवरूपी रसायने मिळतात. बोटीचा वापर करून हे रसायन पसरून पाण्याच्या पृष्ठभागावर एक तवंग निर्माण करता येतो. याद्वारे किमान २५ % आणि काही वेळा याहून अधिक बाष्पीभवन रोखता येते. अर्थात् हे प्रकरण थोडे खर्चिक आहे, हे खरे.
आपल्याला जर तहान लागली तर आपण ग्लासभर पाणी पितो. फारच तहान लागली तर तांब्या तोंडाला लावू. पण बादलीभर पाणी डोक्यावर ओतू का ? त्यातील पाणी तोंडात किती जाणार आणि शरीरावरून किती वाहून जाणार ? हाच न्याय शेतीला पाणी देण्यासंदर्भात लागू आहे. खरे म्हणजे मुळाशी पाणी देण्याची गरज असते. आणि तेही केव्हाही नाही, तर पाण्याची आत्यंतिक गरज असेल तेव्हा. म्हणून शेतात लहान पाट काढून पाणी न देता ठिबक सिंचन वा फवारा पद्धतीने पाणी दिल्यास पाण्याची बचत करता येईल. अर्थात् यालाही खर्च येणार. पण शासनाचे थोडे अनुदान मिळू शकते.
पाऊस पडू लागला की आपण डोक्यावर छत्री धरतो. स्वत:चे रक्षण करतो. आता पाऊस पडताना हीच छत्री उलटी धरली व तळाला एक भोक पाडले तर छत्रीवर पडणारे पावसाचे पाणी संचय करता येते. यालाच पाऊस पाणी संचय, वा रूफ रेनवॉटर हार्वेस्टिंग म्हणतात. इमारतीच्या छपरावर पडणारे पावसाचे पाणी अशा रीतीने सिंटेक्स टाकीमध्ये साठवता येईल. मात्र त्यासाठी छप्पर साठा होण्यासाठी एखाद दुसरा पाऊस जमा व्हावा लागेल. टाकीतील पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकून ते पाणी पिण्यासाठीही वापरता येईल. वा छपरावरील पाणी पाईपने आणून त्याला एक सोपा फिल्टर जोडून विंधण विहिरीत सोडता येईल. तसेच बोअर ब्लास्ट टेक्निकच्या साहाय्याने भूगर्भातील खडक फोडून अधिक पाणी मुरवता येईल. छपरावरील पावसाचे पाणी साठवणे, हे खर्चाच्या दृष्टीने पाहाता, लहान इमारतींसाठी फारसे उपयुक्त नाही. मोठ्या इमारतींसाठी हा प्रकार फायदेशीर ठरेल.
आज अनेक शहरांत लांबवरून पाणी आणावे लागते. ही व्यवस्था करणाऱ्या यंत्रणेवरचा ताण वाढत चालला आहे. तेव्हा जलसंधारणाचा एक हेतू असाही असावा की या यंत्रणेवरील ताण कमी करणे. स्थानिक स्वरूपात उपलब्ध असलेल्या भूजलाचा वापर करून हे साध्य करता येईल. नाहीतरी आपण घरी नळाद्वारे जे पाणी वापरतो, त्यातील सर्वात जास्त भाग स्नान, शौच आणि कपडे धुणे, भांडी घासणे यासाठी वापरला जातो. ठाण्यातील एका सोसायटीने आवारात २ विंधण विहिरींवरील पाणी इमारतीवरील स्वतंत्र टाक्यांत चढवले. हे पाणी स्वतंत्र पाइपिंगद्वारे बाथरूम - शौचालय इथे पुरवले. स्नानगृहातून निघणारे सांडपाणी एका फिल्टरच्या माध्यमातून गाळून विंधण विहिरीपासून दूरवर पुन: जमिनीत मुरवले. भूजलाचा काही भाग पुन: परत जमिनीला अर्पण. इकडे नळाच्या पाण्याचे बिलही कमी झाले. महापालिकाही खुश. अशा प्रकारचे अन्य उपायही शोधण्यासारखे आहेत.
शेवटी लांबवरचे पाणी किती आणत राहणार, हाही प्रश्न विचारात घेतला पाहिजे. जसजसे लांबवरचे पाणी आणत जाऊ तसे ग्रामीण भागात उपलब्ध असणारे पाणी कमी होईल. शेती धोक्यात येईल. शहरी - ग्रामीण असा नवा संघर्ष निर्माण होईल. नाहीतरी आमची धरणे आमच्यासाठी बांधली आहेत, शहरवासीयांनी त्यांच्यासाठी स्वतंत्र धरणे बांधावीत अशी मागणी होऊ लागली आहेच.
या लेखाचा मुख्य वाचकवर्ग हा शहरी, सुशिक्षित असणार. त्या वर्गाला वाटेल जलसंधारण वगैरेशी आपला काय संबंध ? ही कामं शेतकऱ्यांची. पण शेतकऱ्याला पाणी मिळेल, तेव्हाच आपल्याला अन्न मिळेल, हे लक्षात घ्यायलाच हवं. असा विचार केल्यास तो आपला सर्वांचा प्रश्न आहे, हे भान येईल.
त्यामुळे प्रत्येकानं जमेल तसं जमेल त्या स्वरूपात पाणी वाचवलं पाहिजे. मग ते पिण्यासाठी ग्लासभर घेऊन उरलेलं फेकून देणं टाळणं असो, वा गाडी धुण्याऐवजी पुसणं असो वा भाज्या धुतलेलं पाणी कुंड्यात घालणं असो, `एक थेंबही वाया घालवणार नाही' हा प्रत्येकाचा मंत्र असावा.
नाहीतर वापरण्याजोग्या प्रत्येक थेंबासाठी पैसे मोजण्याची वेळ येईल. किंवा पैसा आहे, पण प्यायला पाणीच नाही अशी वेळ आली तर?
विचार करा.... कृती आपोआप होईल.
- अशोक अळवणी, पुणे
Posted in


