इंद्रायणी, इंद्रायणीकाठी

इंद्रयणी-कांठी-मराठीच्या भवितव्यासंबंधी
एक काव्यात्म सवालजवाब
खालील दोन कविता `एकता' त्रैमासिक, (टोरांटो, क्रॅनडा) यात समस्यापूर्तीचे सदर चालविणाऱ्या दोन कवींनी रचलेल्या आहेत. दोघेही मराठीचे अभिमानी आणि निष्ठावंत लेखणीबहाद्दर असले, तरी अरुण जतकर छिद्रान्वेषी काकदृष्टीचे टीकाकार, आणि बरेचसे निराशावादी आहेत, तर विद्युल्लेखा अकलूजकर आत्यंतिक आशावादी, आणि `शिवी' तही `शिव' शोधणारी हटवादी सकारात्मक बया आहे. जतकर अमेरिकेच्या पूर्वभागात तर अकलूजकर क्रॅनडाच्या पश्चिमतीरावर राहातात. पण गेली दहाबारा वर्षे `एकता' साठी लेखन-संपादनाचे काम करताना या दोघांच्या अशा अनेक शाब्दिक चकमकी येता-जाता झडत असतात. कधीकधी त्या तमाम वाचकांसाठीही उपलब्ध केल्या जातात. तसा खालील सवाल-जवाब `एकता' जुलै २००६ मध्ये प्रथम प्रकाशित झाला. `मिळून साऱ्याजणी' मध्ये त्याचे प्रकाशन होताना त्याचा वरील संदर्भच हरवल्याने आणि `इंग्रायणी' हा महत्त्वाचा शब्दच चुकीचा छापल्यामुळे बरीच गफलत झाली, म्हणून या अंकात या कविता-द्वयीचे नीट पुन:प्रकाशन होत आहे. चूकभूल द्यावी घ्यावी.
- विद्युल्लेखा अकलूजकर
इंद्रायणी

मराठी जरी मायबोली, जिभेला किती गोड ही इंग्रजी भासते
कसें वैभवाच्या शिरीं बैसवावें? मराठी न जिव्हा अतां बोलते
अहो, विस्मरूनी अतां जायचें तें- नसे पांग फेडायची वेळ ही
जुन्याचें नको आज आम्हांस ओझें! नवे नाच नाचायची वेळ ही!

जगीं सभ्य-भाषा असे गौरवर्णी! सदा `थँक्स' `एक्स्क्यूज' येती मुखी,
`करा माफ' वा `धन्यवादां' त आम्ही असा गोडवा पाहिला ना कधी
दिवाळें दिवाळी! उधारी प्रतिष्ठा! नको कर्जमुक्ती ! गुलामी भली!
फुलें वाहुनी गंध लावूनि ठेवूं-मराठी झिजाया नको आपली!!

किती अश्रु ढाळूं, अहो ज्ञानदेवा, उभे निश्चयांचे गिरी ठाकले
अतां टेम्स-हड्सन् नद्यांच्या जळाने पिकावे मराठी मळे आपुले!
समाधीस सोडा, पहा आसमंती, कुठे कानिं ये का मराठी जनीं
न इंद्रायणी अन् न ही इंद्रवाणी, इथे वाहते आज इंग्रायणी!
- अरुण जतकर, यु.एस.ए.
इंद्रायणी-कांठी

जरी टेम्स-हड्सन् नद्यांच्या जळाने पिकाया मराठी मळे लागले,
तरी `एकता' छापती, वाचती हो मराठी जिथे जाऊनी बैसले!
`धरी आंग्ल-शब्दांस ओठी मराठी ! जिभा बाटती!' वाटतें का तुम्हां?
अरेबी व फार्सी किती शब्द खाल्ले तरी मोडला ना मराठी कणा!

म्हणा `थँक्स', एक्स्क्यूज' मित्रांपुढे, ये `अयाई' मुखी, लागतां ठेच कां?
किती इंग्रजी ग्रंथ वाचून झाले, `मना सज्जना' चा तरी ध्यास कां ?
नवे नाच नाचा, परी भांडताना कसा आठवे स्पष्टवक्ता तुका?
जिजाई जनाई मनीं जागती, तोवरी अश्रु ढाळायचे का फुका?

म्हणा वाघिणीचे असे दूध किंवा विषारी सुरा ही ; तरी ना मरूं!
पिवूनी निळा कंठ झाला, तरीही मनाचे मराठी शिवाला स्मरूं!
पुढे ठाकली कोणतीही समस्या, तिची पूर्ति आम्ही सुखाने करूं,
नदी आडवी येत इंग्रायणी, त्या पुरातून पोहून आम्ही तरूं!
- विद्युल्लेखा अकलूजकर, क्रॅनडा