Skip to main content

फार फार वर्षांपूर्वीची नव्हे, शे-दीडशे वर्षांपूर्वींची गोष्ट आहे. पुण्यवान नगरीत घडलेली, एका साध्या सुध्या पण सुसंस्कृत घरातल्या दोघा नवरा बायकोकडे बोटं दाखवली जात होती.
नव्या नवतीचं ते जोडपं, सासूबाइंर्चं बारीक लक्ष असे सूनबाईकडे, डोळयांच्या कोपऱ्यामधून, येताजाता ती बघे. सुनेच्या अंगोपांगांवरून तिची नजर फिरे.... आता इतके महिने लोटले लग्न होऊन, पण तरी अजून.... कसलंच शुभचिन्ह दिसत नाही, ते कसं?
सावित्रीची मान खाली जाई. ती अंग चोरून घेई. हातातले काम चालूच राही, तरी मनात मात्र सुरू होई एक झंझावात... कसं नि काय होईल? काय निघेल यातनं...? घराच्या भिंतीही कुजबुजताहेत, नातलग, येणारेजाणारे .... या भिंतींचा आधारच सुटला तर ? ....
सावित्रीच्या नवऱ्यानं, जोतीनं तर-समाजातल्या उपेक्षितांना, स्त्रियांना, विधवांना आधार द्यायचा, शिक्षण द्यायचा वसाच घेतला होता, आणि त्यात सामील होती सावित्रीही. ह्या कार्यात दोघंही तनमनानं गुंतलेली.
अशीच वर्षं लोटली....आणि तरी घरात पाळणा हलत नव्हता. आता थेट सावित्रीच्या कानांवर पडतील अशी ती बोलणी... शेजारणीपाशी तिची सासू म्हणत होती, ``ही माजी सून सावित्री... माज्या जोतीचा वंशमळा फुलवणार का नाही ?'' असंतोषाचा धूर आता घराबाहेरच्यांनाही दिसू लागला. ``व्हय ! तसंच दिसतंय न्हवं?'' शेजारणीनं दुजोरा दिला. ``काय करावं !'' सासू कपाळाला हात लावून बसली, शेजारणीनं तिला ढोसून म्हटलं, ``आगं, मग समज दे की जोतीला...!'' ``हं, आखेरीला तोच विचार चाललाय माजा ..! त्याच्या बापाकरवीच देववते त्याला समज !'' ``मग काय तर...!''
रात्रीची शांत वेळ, घरात बाकीच्यांची निजानीज झाली असावी. जोती मात्र आपल्या खोलीत अजूनही समईच्या उजेडात वाचत बसला होता. शेजारी सावित्री बसली होती. तिच्याही समोर होतं उघडं पुस्तक नि एक वही. ती झरझर पुस्तकावरून काही उतरून घेत होती. अचानक हातातलं पुस्तक मिटून जोतीनं म्हटलं, ``सावित्री - मला तुझ्याशी काही बोलायचंय..'
``बोला ना..'' सावित्रीनं हातातला टाक दौतीत ठेवला. नवऱ्याच्या चेहऱ्याकडे पाहताना तिच्या मनात आलं, या तेजाची साथ मला करायची आहे ती माझ्या इच्छेनंच.
``तुझ्या कानांवर सगळं आलंच असेल, सावित्री...'' तो म्हणाला ``मूलबाळ होणं नं होणं काही आपल्या हातात नाही... आणि तरीही तुझ्या सासूसासऱ्यांनी, वेगळाच प्रस्ताव मांडलाय माझ्यासमोर...'' त्यानं क्षणभर डोळे मिटून घेतले, नि मनाचा दगड केला. त्यांच्या भाळावर उमटलेल्या चिंतेच्या लहरी स्पष्ट दिसल्या तिला. मग पुन्हा तिच्याकडे सरळ पाहात तो म्हणाला, `` दुसरं लग्न करावं.. केवळ अपत्यासाठी असं म्हणणं आहे त्यांचं...सगळयाच वडीलधाऱ्यांचं...''
``हो ठाऊकाय मला...'' सावित्री म्हणाली, ``चार दिवसांपूर्वी खुद्द माझे बाबाही आपल्याकडे आलते... तेही, गोष्ट तुम्हाला पटवण्यासाठीच, हो ना?''
``हो, सावित्री, खुद्द तुझे बाबा तेही मला आग्रह करत होते, की मी ... त्यांचं नवल वाटलं मला.''
``नवल काय त्यात !'' ती सहजपणे म्हणाली. ``म्हणजे..सावित्री..? प्रत्यक्ष मुलीचा संसार उद्ध्वस्त...'' यावर किंचित स्मित केलं सावित्रीनं. ``समाजाची रीतच आहे ती.'' ती म्हणाली नि गप्प झाली.
जोतिबाची नजर तिचा चेहरा वाचत होती... काय वाटलं असेल माझ्या सावित्रीला ? काळजाच्या ठिकऱ्या उडवणारा अपमानकारक प्रस्ताव.. तिच्यासमोर मांडायचा ? मीच ?.
``मग- तुझी संमती आहे अशा लग्नाला ?'' त्यानं सरळच प्रश्न केला. ``माझी संमती?'' ``हो सावित्री. तुझी संमती मागणं कर्तव्य नव्हे माझं ? तसंच सांगितलंय मी त्यांना..''
``असं होय ! ``सावित्री शांत स्वरात म्हणाली, ``मग ती देणं माझंही ! तुम्ही म्हणत असाल तर ! तुमचे विचार, भावना समजतात मला... म्हणून संमती आहे माझी..''
``सावित्री?!'' त्यानं धसकून म्हटलं. काहीशा आश्चर्यानं नि विषादानंही. आपण ऐकले ते शब्द तिचेच काय...?...कोणीतरी अंगावरची त्वचा सालीसारखी ओढून काढली होती जणू. खोल अंत:करणात उगम पावलेली वेदनेची गंगा चेहऱ्यावरून वाहू लागली होती त्याच्या. जोतिबा एकटक आपल्या पत्नीकडे पाहात होते. क्षणभरानं तिनं नजर उचलून नवऱ्याकडे पाहिलं नि हळूच प्रश्न केला, ``चुकलं नाही ना माझं काही ?''
जोतिबांनी एक दीर्घ नि:श्वास टाकला आणि मानेनंच नकार दिला. ``मग ? झोपा आता तुम्ही ! शांत चित्तानं झोपा!..'' सावित्री म्हणाली. .... जोतीला नवल वाटत राहिलं. ही सावित्री? क्षणापूर्वी एक निरागस बालिका असते तर पुढच्याच क्षणी आपल्याला समजावणारी मातामदीया होते. कधी विनम्र, आज्ञाधारक, काहीशी दबलेलीच अशी वाटली, तर प्रसंगी तिचं ते रूप बदलून समोर दिसते, ती तिची कर्तव्याला वज्रकठोर अशी `मूर्ती'-खरोखरच शतरूपा !
घराच्या ओटीवर जमले होते सारे. पुन्हा तीच बोलणी, आग्रही समजावणी ``जोतीराव ! आता निदान... तुमच्या वडिलांच्या इच्छेचा मान राखा...आणि निर्णय घ्या'' वयानं वाकलेले एकजण म्हणाले. जोतिबांच्या भुवया आकसल्या . तो दबावयुक्त आग्रह.. सगळे असह्य झालं त्यांना, दु:खसंतापाचा कढ आवरत त्यांनी म्हटलं, ``ते ठीक आहे...पण माझंही थोडं ऐका.. तुम्हांला त्या पुराणकथांमधल्या राजांच्या गोष्टी ठाऊक आहेत ना?''.
``कोणत्या राजांच्या ?'' वडीलधाऱ्यांनी प्रश्न केला. ``त्याच.. त्यातले काही तर तुमचे `वंदनीय पुरुष' किंवा `पूजनीय देव' आहेत!'' ``त्यांचे काय!'' वडीलधाऱ्यांनी पुन्हा विचारलं. ``त्या पुरुषांना अपत्य नव्हते व म्हणून त्यांना पुत्रकामेष्टी यज्ञ करावे लागले होते- आणि हे त्यांच्या प्रत्येकी एकाहून अधिक भार्या असूनही ! ह्या कथा तरी भाकड म्हणणार नाहीना तुम्ही !'' जोतिबा आवेगानं बोलत होते. त्यांच्या डोळयांतल्या तेजाकडे बघवत नव्हतं कुणालाही. सगळे अवाक् झाले होते. जोतिबा पुढे झाले, ``तेव्हा वांझ तर पुरुषही असू शकतो हेच सिद्ध करणाऱ्या या तुमच्याच कथा ! त्या भाकड निश्चितच नसतील नाही का!''
दाराआड उभ्या असलेल्या सावित्रीच्या काळजात धस्स झालं. तिला वाटून गेलं, यांनी थोडीतरी पर्वा करायची होती. या वडीलधाऱ्यांची !.... जोतिबांचे शब्द तीक्ष्ण, तिखट बाणांसारखे त्या सनातनी / रूढीवश मनांमधे थेट जाऊन रुतत होते, बोचत होते.
``अर्थ काय जोती तुझ्या या बोलण्याचा?'' एक पिकलं पान म्हणालं ``अर्थ स्पष्ट आहे बापसांनो, तो हा, की मूलबाळ होत नाही तर त्याचा दोष एकट्या पत्नीकडे तुम्ही देता, ते योग्य आहे? कशावरून तुम्ही म्हणता हे ? उलट माझ्यातच दोष..''
जोतीचे सासरे पुढे झाले. जोतीचं बोलणं तोडत, हात जोडून काकुळतीनं म्हणाले, ``जोतीराव, मी पाया पडतो तुमच्या. तुम्ही स्वत:कडे दोष घेणार की काय याचा ?'' ``अर्थातच ! वंध्यत्वाचा दोष माझ्यातही असू शकेल!'' क्षणाचाही विलंब न लावता जोतीराव म्हणाले. सासऱ्याच्या नजरेला नजर देत त्यांनी पुढे म्हटलं, ``अर्थात, तुम्हा सर्वांच्या म्हणण्यानुसार मी दुसऱ्या लग्नाच्या प्रस्तावाला मान्यता देतोय-सावित्रीच्या संमतीनं.''
``मग ठीकच आहे.'' जोतीचे शब्द ऐकून सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. ``अंहं-जोतीरावांनी लगेच म्हटलं, ``पण एका अटीवरच मी दुसरं लग्न करेन''. ``येवढंच ना ? अहो, मग सांगा की जोतीराव - तुमची अट मान्य होईलच.''
जोतीराव किंचित हसले. त्यांनी आतल्या दरवाजाकडे झटकन पाहिलं. मघापर्यंत त्या दाराच्या चौकटीला टेकलेला सावित्रीचा चेहरा आता दिसेनासा झाला होता. जोतीराव क्षणभर चमकले. त्यांच्या मनानं साद घातली - `सावित्री ... सावि... अगं, ऐक तरी ... विश्वास ठेव तुझ्या नवऱ्यावर...' क्षणात त्यांनी स्वत:ला सावरलं... आणि मग.. एकेक शब्द सावकाशपणे उच्चारीत त्यांनी म्हटलं, ``मूलबाळ होत नाही म्हणून माझं दुसरं लग्न करून देणार तुम्ही. ठीक आहे. तर हे लग्न मी तेव्हाच करीन, जेव्हा त्याच वेळी सावित्रीचं पण दुसरं लग्न करून दिलं जाईल!''
``जोती-!'' वडील फक्त उद्गारले. थरथर कापत होते ते. त्यांना धड बोलवेना. सगळे स्तब्ध. काही क्षण शांतता पसरली तिथे. नि मग दुसरे एकजण काहीसे तीव्र स्वरात म्हणाले, ``हे बोलणे की काय ! की आपली उचलावी जीभ आणि लावावी टाळयाला?''
``असे पहा-'' जोतिबा शांतपणे म्हणाले, ``दोष तिच्यात आहे की माझ्यात..हे दोघांचं दुसरं लग्न केल्याशिवाय कसं समजेल ?'' ``ते कशाला समजायला हवंय ! - ते गृहस्थ म्हणाले, ``फक्त वंशाला दिवा हवाय !'' ``अहो, पण माझ्यातच दोष असला, तर ? मग कितीही लग्नं करून द्या माझी'' आणि जोतिबा मोठ्याने हसले. ``भयंकर बोललात - जोतीराव भयंकर!
आजवर या कानांनी, असं काही ऐकलं नव्हतं...! `` मग आणखी हेही ऐका - '' जोतीराव शांत स्वरात पण ठामपणे म्हणाले, ``स्त्रीची विटंबना, अपमान करणारी ही अमानुष रूढी मला लाजेनं मान खाली घालायला लावतेय. ही बंद व्हावी म्हणून आता मीच स्वत: उदाहरण घालून देणाराय !'' आणि वडिलांकडे वळून त्यांनी फक्त म्हटलं, ``मग त्यासाठी पुन्हा घर सोडावं लागलं तरीही !''
जोतीरावांचे वडील खिळल्यासारखे झाले होते. जोतीरावांच्या सासऱ्यांनी मग त्यांना हात देऊन उठवले आणि ते दोन्ही बाप हळूहळू आतल्या घरात निघून गेले. माजघराच्या अंधारातून जोतिबांच्या आईचे शब्द आले कडाडणाऱ्या विजेसारखेच कानांवर पडले ते - ``त्या दोघांना म्हणावं ... हा हट्ट सोडा... नाहीतर मग... घर सोडा!''
त्या दिवशी रात्रीच्या जेवणाच्या पंक्तीला जोतिबांचे वडील नव्हते. जोतिबांना वाईट वाटत होते. पण त्याला इलाजही नव्हता. वडिलांना भेटायला लोक येत. वडील आढ्याला नजर खिळवून खाटेवर पडून असत. आई त्यांच्या शुश्रूषेत असे. या जोडप्याशी तर तिनं बोलणंच टाकलं होतं. नातलगात, गावात काहूर उठलं होतं. जोतीरावांना शिव्याशापांची लाखोली वाहिली जात होती. ``हा तर निर्लज्जपणाचा कळस झाला कळस! '' लोक म्हणत. शहरात माणसं कुठेही भेटली तरी बोलण्याचा विषय हाच होता- `जोतीरावांनी केलेलं सीमोलंघन!...'
सावित्री खोलीच्या दारातच थबकून उभी होती. ``ये सावित्री!'' टेबलावरचे पुढ्यातले कागद बाजूला सारत जोतिबा म्हणाले. सावित्री हलक्या पावलांनी आत आली. त्यांच्यासमोरच्या खुर्चीत बसली. दिवसभराच्या कष्टांचा थकवा तिच्या चेहऱ्यावर दिसला त्यांना. पण सावित्रीनं आपल्या संथ तेवणाऱ्या नजरेनं त्यांच्याकडे पाहिलं क्षणभर, नि मग तिचे ओठ स्मितासाठी किंचित विलगले... आणि जोतिबांच्या चित्ताचं शांतवन झालं. त्यांना समजून चुकलं, की याच-याच एका आश्वासनासाठी तडफडत होता जीव आपला. ते मोठ्यानं हसले. ``मग? कधीचा धरावा मुहूर्त?'' त्यांनी थट्टेखोरपणे विचारलं. त्यांच्या प्रश्नातल्या थट्टेला डावलत सावित्रीनं उत्तर दिलं ते गंभीरपणेच. ती म्हणाली, ``पुरे, तो प्रश्न बाकीच्यांना विचारा.. मामंजींची तब्येत मात्र मधल्यामधे'' ``बरं, बरं, ते राहू दे'' जोतिबा आपल्या सुज्ञ, शहाण्या पत्नीकडे पाहातच राहिले क्षणभर. मग त्यांनी म्हटलं, ``सावित्री - एक प्रश्न पडला होता मला... प्रश्न कसला... एक महाभयंकर,, निरुंदसा, निसरडा पूल पार करायचा होता जसा... आणि पार% पल्याड% होतीस तू... आता विचारतो. माझ्या दुसऱ्या लग्नासाठी तू संमती दिलीसच कशी !?'' त्यांना हाताच्या इशाऱ्यानंच थांबवत सावित्री म्हणाली, ``आणि मी ती दिली नसती तर ? ... तर मग काय केलं असतंत?'' जोतिबा गडबडले. पटकन म्हणाले, ``मी डगमगलो नसतो....!... पण-तू-संमतीच कशी दिलीस?'' सावित्रीनं एक दीर्घ नि:श्वास टाकला. क्षणार्थानं तिनं किंचित हसून म्हटलं, ``खरं सांगू का- माझी खात्री होती म्हणून ! म्हणून दिली मी संमती!'' ``म्हणजे ? ती देताना भीती नाही वाटली? थोडी सुद्धा?''
आता सावित्रीला मनापासून हसू आलं. तिला वाटलं, एवढा शहाणासुरता हा गृहस्थ, पण - ती म्हणाली, ``नाही वाटली. म्हणजे असं, की - तुम्हांला जो पूल का काय तो `भयंकर, निरुंद नि निसरडा' वाटत होता ना, तो माझ्यासाठी तसा नव्हताच ! मग भीती कसली!.... आणि जमिनीची मशागत करणाऱ्याला मळा फुलेल याची खात्री नको ?''
जोतिबांना मनोमन वाटलं, मला नेहमी जाणवत आलंय तेच हे सत्य - ही सावित्री - हे स्त्रीरूप- या वेलीला वृक्षाचा आधार लागतो आणि तरीही, तिला स्वतंत्र, वेगळं असं अस्तित्व आहे - अतुलनीय, श्रेष्ठ आहे ते पुरुषाइतकंच किंवा अधिक !
अशी ही कथा महात्मा जोतिराव फुले आणि त्यांची पत्नी सावित्री यांच्या सत्य जीवनावर आधारलेली... पुढे दोघांनी एका अनाथ मुलाला दत्तक घेतले, तोच त्यांचा पुत्र यशवंत. जोतिबांनी आपल्या पत्नीचा होणारा अपमान नि मानखंडना जाणली नि त्याच्या धगीपासून तिला वाचवून - समाजाला एक उदाहरण घालून दिलं. त्यासाठी रिवाज मोडण्याचं धैर्य दाखवलं. सनातन्यांना त्यांच्या विचारात अमानुषता, त्रुटी दाखवल्या.
आज दीडशे वर्षांनंतर आपल्यासमोर कोणता सत्यधर्म आहे त्याची आपल्याला जाण असावी ना ?
त्या काळी त्यांनी जे विचार मांडले त्यांना आज तर विज्ञानाची साथ मिळाली आहे. हे खरंच, की उंच वृक्षाचं क्षितिज विशाल, कितीतरी अधिक व्याप्तीचं असतं !
- सुकन्या आगाशे, मुंबई

Download Office 2010 Several

Download Office 2010 Several population indulge Office 2007 Key phenomenal ensnare transforming microsoft office 2010 key prepares to foriegn microsoft office 2007 key merely polish very office 2010 professional plus have a photo, Office Professional 2007 in accordance what’s Microsoft Office 2010 Professional explained. I have Download Windows 7 to at one Windows 7 Ultimate .