Skip to main content

प्रतिसादास उत्तर द्या

कविता

Posted in

मातीस सांगते माती
चुकतो फकीर आणि
पढतो नमाज जेथे
अग्नीत फूल पडता
जळतो कवीच तेथे
मंदिरात वाजे घंटा
थकलेल्या भक्तांसाठी
मग काळ थबकतो तेथे
विझलेल्या रक्तासाठी
ती बांग मौलवी देतो
अल्लाच्या पायी नमुनी
ही करू इबादत आम्ही
आभाळाखाली जमुनी
मग चर्चबेलही वाजे
येशूची येऊनी याद
ते दैव कोण पंथाचे
हा कशास आम्हा वाद
ही पायतळीची माती
लावूया आपल्या माथी
मातीतून आलो सारे
मातीस सांगते माती
माधव रामचंद्र पवार, सोलापूर

नो एन्ट्नी
मी धुंडाळला कानाकोपरा तुझ्या हृदयाचा
मिळेल जरासा दिलासा, मायेचा
किंचित कोपरा प्रीतीच्या छायेचा...
मी बांधत राहिले सेतू
माझ्या हृदयापासून तुझ्या हृदयापर्यंत...
मी वाहत राहिले
संसाराच्या भावसरितेत...
मी प्रेमात गंभीर
तू तुझ्या, बाजूने खंबीर...
`नो एन्ट्नी'चा बोर्ड घेऊन
माझे विश्वच तुला समर्पित,
तू मात्र टाकणार पावले जपून!
तुला मिळणारे सल्ले अनाहूत...
आपल्या विस्कळित भावनांची
दुरून बघतात `गंमत'
मला तुझ्याशिवाय जग पारखे
तू मात्र केले मला पोरके
आज
अधात ना मधात
तळयात ना मळयात
असे होण्याआधी
सा...व...र... ले
बरे केले ना?
- प्रा. कविता डवरे-लाहुडकर, अमरावती

बापूंच्या तीन माकडांच्या संस्कारावर आम्ही पोसलो
अन्
ठार बहिरे, मुके आणि आंधळे झालो
नाही दिसला भ्रष्टाचार, अत्याचार नि बलात्कार
डोळे असूनही!
नाही ऐकल्या आर्त किंकाळया हुंडाबळींच्या, लहानग्या भूकबळींच्या
कान असूनही!
तोंड असूनही कधी ना उघडले, चुकार थोरा-मोठ्यांपुढती
पाडून घेतला धोंडा आम्ही आमुच्याच पायांवरती
माझिया मना! बस्स् झाले आता!
उघड तोंड आता, फाड बुरखा संभावितांचा
डोळे उघडून पाहा बाजार उपेक्षितांचा
कान उघडून ऐक कहाण्या आपुल्याच माय-बहिणींच्या
गाडून टाका भस्मासुर अन् नराधमांना
अभय दे अगतिक, दीन-दुबळया, शोषितांना
पिटाळून लाव `त्या' कालबाह्य, मुर्दाड, निष्क्रिय मर्कटांना
आवतण दे शांती, समता, माणुसकीरूपीं
या त्रिमूर्ती, ब्रह्मा-विष्णु-महेश्वरांना!
- लीला राऊत - मालाड, मुंबई

संवादाचे सारे पूल कोसळल्यानंतरही
ती भेटत राहते त्याला
त्याच्या निरभ्र डोळयांत
मागमूसही नसतो तिच्या अस्तित्वाचा
तसं
सांधण्या-जोडण्याचं
शिवण्या-टिपणाचं बाळकडू
जन्मापासूनच तिला
बाईपण कणखरतेने पेलता यावं म्हणून
``पोरी, ओठातला शब्द
म्हणजे भात्यातला बाण
जेवढा ठेवशील राखून
तेवढा तुझा खरा वाण''
अशा अगणित वाणांचं ओझं
सांभाळताना
चुलीच्या धुरात घुसमटलं जातं
अवघं बाईपण
तेव्हा काळजातल्या निखाऱ्यासकट
ती विझवून टाकते स्वत:ला
पण अलीकडे
जोतिबांची सावित्री रोजच येते स्वप्नात
बजावून सांगते कानात
शतकाचा उंबरठा ओलांडताना
राहावंच लागतं सावित्रीला सज्ज
शेणगोट्याच्या माऱ्यासाठी
तरीही तुला उच्चारायला हवा `ब्र'
काढायला हवा `ब्र'
आणि लिहायलाही हवा `ब्र'
इतिहासाच्या नव्या पानावर
- छाया कोरेगावकर

प्रतिसाद

The content of this field is kept private and will not be shown publicly.
Type the characters you see in this picture. (verify using audio)
Type the characters you see in the picture above; if you can't read them, submit the form and a new image will be generated. Not case sensitive.