पूर्णविराम
बेबीच्या ओढीनं मी घराच्या दिशेने झपाझप पावलं उचलत होते. एका सोसायटीच्या बाहेर चांगलीच चिंधी मिळाली. कोणीतरी कपड्याचं बोचकंच टाकलं होतं. मला उचलत नव्हत. तरी तस्संच ओढत डोक्यावर घेत अमिनीबाईचा काटा गाठला. दोन रुपये किलोनं एकदम १०० रुपये कमाई झाली. बेबीला चॉकलेट घेतलं. अंधाऱ्या वस्तीतून चढउतारातून वाट काढीत मी चालले होते. अख्ख्या वस्तीत चुली ढणाढणा पेटल्या होत्या. भाकरीचा खमंग वास पोटात भूक पेटवत होता. समोरून येणाऱ्या दत्तूला पाहून मी चमकले. क्षणभर उभी राहिले. दत्तू खाली मान घालून बाजूनं सटकला. संतापानं माझी लाही झाली.
झोपडीचं दार ढकलून मी आत शिरले. पोत्यावर माझी वाट बघत पोरगी पडली होती. शेजारी विजू बसला होता. पंधरा दिवसात पोरगं शहाणं झालं. बहिणीसाठी राखण करायला लागला. मी बेबीच्या हातावर चॉकलेट ठेवलं. ती हसली. हे हसू त्या नराधमानं ओरबाडून नेलं.
`विजू, अरे तो दत्त्या वस्तीत दिसला की!'
`हो आई, डोंगरीवरून सोडलं म्हणे त्याला. मला पण दुपारी इतका राग आला होता, नरडीचा घोट घ्यावा वाटलं.'
बेबीला मी मांडीवर घेतलं. थोपटत राहिले. पंधरा दिवसांत पोरगी सुकून गेली होती. विजय तुझी शाळा सुरू झाली की तू हॉस्टेलवर जाणार. बेबीला सोडून कशी जाणार, घेऊन तरी उन्हात कुठंकुठं फिरणार. तुझा बाप आज आहे, उद्या नाही. त्याचा काही उपयोग नाही. मी गावाकडे जावं म्हणते. इथ कचरा वेचतेय तिथं शेतावर मजुरी करीन. माझ्या पोरीवर असा प्रसंग तरी येणार नाही.
`हो आई, तू जाच गावाला' विजू.
`तू काय करशील?'
`मी जाईन हॉस्टेलवर.'
`काय करायचं बाबा, ते हॉस्टेल. एक असलं, पण शिकायचं तर सहन करायला हवं'
चूल पेटविली, भाकरी बडविल्या. कालवण केलं. बेबीला भरविलं. मी व विजू जेवलो. पोरीला जवळ घेऊन झोपले. अंग अगदी आंबून गेलं होतं. ठसठसतपण होतं. पण तरीही झोप येत नव्हती. मिटल्या डोळयांसमोर दत्तू दिसत होता. बेबी झोपेत घाबरली. हुंदके देऊ लागली. मी तिला जवळ ओढून थोपटू लागले.
विजयची परीक्षा झाली. न्यायला ये म्हणून त्याचा निरोप आला. चार वर्षांच्या बेबीला घेऊन मी गेले. विजयच्या अंगभर खरूज झालेली. विजय रस्ताभर बडबडत होता. `आई, हॉस्टेलवर सगळया पोरांना खरूज झालीय. साबण, तेल काही देत नाहीत; वरून आलेले सगळे साबण लंपास होतात.'
`तुझ्याकडं पैसे दिले होते. विकत आणायचास ना.'
`आणला, पण मग सारी पोरं माझा साबण वापरून खल्लास करतात. काही बोलता येत नाही.'
`मोठ्या ताइंर्ना सांगायचं.'
`सांगितलं, त्या नुसत्या हसतात. परीक्षेच्या वेळी तर या खरजेने इतकं हैराण केलं; पण काही औषध दिलं नाही.'
घरी आल्यावर मी चुलीवर मोठं तपेलं ठेवून पाणी तापत ठेवलं. कडुलिंबाचा पाला वस्तीतल्या झाडाचा तोडून आणला. विजयला खसाखसा घासून गरमगरम पाण्यानं अंघोळ घातली. गरम भात कालवण खाऊन पोरगं झोपलं. सकाळी उठून मी कामाला लागले. दिवस वर आला. अजून का उठत नाही म्हणून जवळ गेले तर विजू तापानं फणफणला होता. अन् ते दुखणं त्याला दोन हप्ते पुरलं. दवाखाने, औषध, मलमं करून करून जरा आराम पडू लागला होता. पण अंगात अजिबात ताकद नव्हती. भूक लागत नव्हती. तोंड कडू झालं होतं. त्याच्या औषधावर खर्च खूप आला होता. म्हणून काळोख पडेपर्यंत मी भंगार वेचायची. त्याचा दारुडा बाप दोनतीनदा येऊन गेला. पण पोराची साधी चौकशी पण केली नाही. त्या दिवशी डोक्यावरून आणलेली काटक्यांची मोळी मी दारात टाकली. विजयला म्हटलं, `विजय, काय करू म्हणजे तुझ्या तोंडाला चव येईल.'
`आई, पैसे आहेत तुझ्याकडं ?'
`आहेत की, का रं बाळा, काय हवं सांग.'
`आई, नारळाचं पाणी प्यावसं वाटतंय.'
`हातेचा, आता घेऊन येते.'
`चल, मी पण येतो; झोपून झोपून कंटाळा आला.'
`चल.'
बेबी झोपली होती. मी झोपडीचं दार ओढून घेतलं. कोपऱ्यावरच्या शहाळवाल्याकडं गेलो. विजू पाणी प्याला. रमतगमत घराकडं आलो. मी झोपडीचं दार ढकललं व आतलं दृश्य पाहून थिजून गेले. दत्तू बेबीच्या अंगावर पडला होता. मी जोरात ओरडले. दत्तू घाबरून उठला व झोपडीबाहेर पळाला. पण त्यानं कार्यभाग साधला. माझी चार वर्षांची पोरगी मोठ्यानं रडत होती. मी धावले, तिला मांडीवर घेतली. तिचा फ्रॉक रक्तानं भरला होता. मला धक्क्यानं भोवळ यायला लागली, विजू आई, आई, म्हणून रडू लागला.
मी व विजू बेबीला घेऊन रमाबाई हॉस्पिटलला गेलो. रात्रीचे दहा वाजले होते. त्यांनी बेबीला पाहिले व सकाळी महापालिका मुख्य हॉस्पिटलला घेऊन जा म्हणून सांगितले.
`अहो, आता काही तरी उपचार करा.'
`बलात्काराची केस आहे. आम्ही अस हात लावू शकत नाही.'
मी बेबीला घरी घेऊन आले. पोरगी रडत होती. योनिमार्गाला हात लावून दुखतंय म्हणत होती. मला सणक आली.
`विजू, जारे. त्या दत्ताच्या आईबाबाला म्हणावं आईनं ताबडतोब बोलवलंय.'
दत्तूची आई म्हणाली.
`कमल, झालं ते झालं. पोराला पोराच्या बापानं चुलीतल्या लाकडानं सणकून मारलंय. आता हे प्रकरण आपल्यातच मिटवू.'
`पोरीची हलत बघा.' मी रडू लागले.
`सकाळी प्रायव्हेट दवाखान्यात नेऊ. येईल तो खर्च आम्ही करू. वस्तीतपण कोणाला बोलू नको. तुझ्या पोरीचं अजून सगळं व्हायच आहे. पोरीची अब्रू म्हणजे - '
`अन् तुझा पोरगा त्याला का अब्रू लुटायला सोडलं आहेस. लाज वाटते का तुम्हांला? माझ्या पोरीचं वाटोळं केलं. आज माझी पोरगी नासवली. उद्या आणखी कोणाची. मी अशी गप्प बसायची नाही. त्याला शिक्षा झाली पाहिजे. पोरीबाळींना सोडून आयांनी कुठं जायचं की नाही. चार वर्षांची पोरगीसुद्धा वस्तीत सुरक्षित नाही. माझा आवाज चढायला लागला. संताप संताप होत होता. दत्तूला उभा सोलून काढावा वाटत होत. माझा आवाज ऐकून आजूबाजूच्या बायका जमा होऊ लागल्या. दत्तूची आई उठून निघाली. मी तिचं बखोट धरलं.
`कोठे चाललीस, माझ्या पोरीची अब्रू भरून दे.' मी चंडिकेचा अवतार धारण केला. दत्तूची आई गरकन् वळली, मला हिसडा देऊन म्हणाली, `जा तुला काय करायचं ते कर. सरळ सांगायला गेलं तर टांगायला नेतेस. साऱ्या वस्तीभर डांगोरा पिट. तुझीच अब्रू जातेय. माझा पोरगा वस्तीत कालपासून नाहीच आहे.'
हळूहळू शेजारच्या आयाबायाही पांगल्या. बेबीला मांडीवर घेऊन मी बसले. विजू माझा हात हातात घेऊन जवळच झोपला. उजाडलं, पोरगी तापानं फणफणली होती. नवरा म्हणणारा दारुडा उजाडताना उगवला. `काय झालं' म्हणून विचारू लागला. मी व विजू नऊलाच घराबाहेर पडलो. महापालिकेच्या दवाखान्यात आलो. डॉक्टरांची वेळ दहा होती. दहा म्हणता म्हणता अकरा वाजले. केसपेपर काढला. डॉक्टरबाईनी बेबीला तपासलं, औषधं दिली. तुमच्या भागातल्या पोलीसस्टेशनला तक्रार नोंदवा म्हणाल्या. दवाखान्याच्या बाहेर आलो तेव्हा एक वाजला होता. बेबीला व विजूला दवाखान्याच्या क्रॅटीनमध्ये खायला घातलं. मी चहा प्याले. पोलीसस्टेशनला आलो. विजू बेबीला घेऊन बसला.
`साहेब, केस नोंदवायची आहे.'
`बसा बाहेर, बोलवितो.'
तासाभरानं येऊन मी म्हटलं, `साहेब, महापालिकेच्या डॉक्टरबाइंर्नी केस नोंदवायला सांगितलंय.'
`काय केस आहे?'
`वस्तीतल्या पोरानं माझ्या पोरीवर अत्याचार केलाय.'
`कुठाय पोरगी?'
मी विजूच्या मांडीवर बसलेल्या बेबीकडे बोट केले.
`या पोरीवर?'
मी हो म्हटले.
`अरे पाटील, रेपची केस आहे. चार वर्षांच्या पोरीवर रेप, अख्ख्या मुंबईत खळबळ माजणार. आपलं पोलीसस्टेशन गाजणार. पत्रकार प्रकरण सनसनाटी करणार.'
`बाई, बसा. पोरीला बोलवा.'
सारे पोलीस जमले. काय झालं, कस्सं झालं, कधी झालं. सारेजण विचारू लागले. बेबीकडे बघायला लागले. बेबी घाबरून गेली. एकानं तर बेबीचा फ्रॉक वर केला. मी खसकन खाली ओढला. हळू हळू मला त्या चौकशीची किळस यायला लागली. सारेजण आमच्यावरील आपत्ती मिटक्या मारीत मजेनं चाखीत होते. काहीही घाणेरडे प्रश्न विचारीत होते. बिचारा विजू गांगरून गेला होता. नको ते या वयात त्याच्या कानांवर पडत होते.
`साहेब, केस नोंदवताय ना!' मी जोरात ओरडले.
`बाई, माफ करा. रेपची केस आहे, गंभीर प्रकरण आहे. आमचे साहेबच पाहिजेत.'
`कोठे आहेत?'
`बंदोबस्ताला गेले आहेत, येतील इतक्यात.'
`आम्ही बाहेर बसतो.'
माझा दारुडा नवरा दोनदा घरी चल म्हणून येऊन गेला. वस्तीवरला गणेशदादाही समजूत घालून गेला.
`आपसात मिटवू, चल. पोराच्या बापाला पैसे द्यायला लावतो, तुला.'
मी निमूट बसून राहिले.
आठ वाजता साहेब आले. सगळी केस ऐकून घेतली. दत्तूच्या आईवडिलांना बोलवून घेतले. दत्तूला अटक झाली.
`बलात्काराची केस नोंदवायची आहे कां?' साहेब सारखे विचारायचे.
`हो.' मी.
`पुरावा.'
`मी स्वत: पाहिलंय. माझ्याकडं दवाखान्याचे रिपोर्ट आहेत.'
`बघा हं विचार करून. परत सांगा. पुढच्या सर्व परिणामांना तोंड द्यायची तयारी आहे?'
साहेबांना हे केसचं झंझट नको होतं, हे माझ्या लक्षात यायला लागलं.
मी `हो' म्हणाले.
माझं, विजूचं आणि नंतर दत्तू व त्याच्या आईवडिलांचं म्हणणं लिहून घेईपर्यंत रात्रीचे दोन वाजले.
`आता सकाळी दहा वाजता या.' साहेब म्हणाले. आम्ही घरी आलो तर नवरा दारू पिऊन झुलत पडला होता.
`पोलीसस्टेशनला कशाला गेलीस? तुला काय कळतं कां? आपली किती नाचक्की होतेय; उद्या गेलीस तर पाय मोडून ठेवेन.'
`पाय मोडणाऱ्याचं तोंड बघा. दत्ताच्या बापानं पाजलेली दिसतेय.' भाकरी बडवत मी ओरडले. पोरीला भाकरी कुस्करून चारवली. विजूपुढं भाकरी चटणी कांदा ठेवला. मी माठातलं तांब्याभर थंडगार पाणी पोटात रिचवलं व पोरीला पोटाशी घेऊन पडले.
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी पोलीस आले. झोपडीचे फोटो घेतले. बेबीचा रक्ताचा फ्रॉक व चड्डी ताब्यात घेतली. दहा वाजता आम्ही पोलीस स्टेशनला आलो. त्या दिवशी पोलिसांच्या गाडीतून आम्हांला कोर्टात नेले. कोर्टात जबानी झाली. संध्याकाळी परत आम्ही पोलीस स्टेशनला आलो.
विजूच्या अंगात शक्ती नव्हती. बेबी मला पूर्ण चिकटून होती. मीही खचून गेले होते. आज तर या साऱ्या प्रकाराला कंटाळून गेले होते. साहेब म्हणाले, `बाई, आता कोर्ट केस चालू होईल. तुम्हांला बोलावतील तेव्हा पोलीस स्टेशनला यावे लागेल.'
`साहेब, दत्तूचं काय ?'
`त्याला उद्याच डोंगरीला पाठवायचंय. तो सज्ञान नसल्यानं तिथं त्याला ठेवायचं आहे.
बालगुन्हेगार सारे तिथं ठेवतात. त्याला सुधारगृह म्हणतात.'
`किती दिवस?'
`सज्ञान होईपर्यंत.'
`अन् मग शिक्षा?'
`ही शिक्षाच आहे' बाई अन् झालं ते होऊन गेलं. ते काय परत येणार आहे. पोरगी लहान आहे. दत्तू डोंगरीला गेला. पण आमची रोजची पोलीसस्टेशनची फेरी काही चुकली नाही. आज काय सही हवी आहे. आज काय हा पुरावा हवा आहे. `साहेब, दत्तू लहान म्हणता, अन् हे कस्सं त्याला सारं कळतं, साहेब, शिक्षा होऊन पोरीची अब्रू परत येणार नाही हे मलाही कळतं. पण साहेब, दत्तू जर मोकळा सोडलात तर वस्तीत अनेक दत्तू मोकाट सुटतील. मग आम्ही या आमच्या पोरीबाळींचं काय करायचं ? विष देऊन
मारायचं ? कस्सं सोडवायचं या नराधमाच्या तावडीतून? साहेब, बघा या कोवळया जीवाकडं, हा आघात ही पोर आयुष्यभर विसरणार नाही. एवढी घाबरली आहे. दचकून ओरडत उठते. दत्तूला जबर शिक्षा झाली पाहिजे. पुऱ्या वस्तीला वचक बसला पाहिजे. अस्सं काळं कृत्य करताना पोरांना दत्तूच्या शिक्षेची आठवण झाली पाहिजे. साहेब, हा पोरीवरचा सूड म्हणून मी करीत नाही. मीही पोलीस स्टेशनला चकरा मारून वैतागले. वस्तीत परत असे दत्तू होऊ नयेत. वस्तीतल्या पोरी सुरक्षित राहाव्यात. एवढ्यासाठीच साहेब हे सारं करतेय !'
माझ्या पोटतिडकीच्या बोलण्यानं साहेब हलले. `तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.' म्हणाले.
`आई, कसला विचार करतेस?' विजू म्हणाला. `काही नाही, उद्यापासून तुझी शाळा सुरू झालीय ना, तुला हॉस्टेलला सोडते, घराला कुलूप ठोकून मी अन् बेबी परभणीला जातो. पोरीची भीती त्याशिवाय जायची नाही.'
`आई, तू आता परत येऊ नकोस. सुट्टीत मी तिकडेच येतो.'
रॉकेल संपलेल्या भगभगत्या चिमणीकडे पाहात मी हारलेल्या लढाईला पूर्णविराम दिला व काळोखात बेबीला पोटाशी घेऊन झोपले.
- वृषाली मगदूम, वाशी, नवी मुंबई


