प्रेसचे दिवस
संगणकयुगामध्ये छपाई तंत्रामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे मोठीच क्रांती झाली आहे; पण पंचावन्न वर्षांपूर्वी प्रेसमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतलेल्या नलिनी गोखले यांचा तेव्हाच्या छपाईतंत्राविषयीचा हा रंजक लेख वाचकांना निश्चितच आवडेल. आज नलिनीताइंर्चं वय ऐंशी आहे.
मी आत्ता सांगत आहे तो काळ १९५० च्या दशकातला. १९४५ मध्ये माझे कमलाकर मोरेश्वर गोखले यांच्याशी लग्न झाले. हे तेव्हा अॅम्युनिशन फॅक्टरीत नोकरीला होते. लवकरच ती नोकरी सोडून ते सरकारी नोकरीत ऑडिटर म्हणून लागले. दोन मुले झाल्यानंतर तीही नोकरी सोडून त्यांनी स्वत:चा धंदा करायचा म्हणून प्रिंटिंग प्रेसची जुळवाजुळव करायला घेतली. ते खूप कष्टाळू होते; पण तितकेच शीघ्रकोपी आणि आपलेच म्हणणे खरे करणारे. त्यांच्या चुलत्यांचा प्रेस होता आणि तिथे त्यांनी काही काळ उमेदवारी केली होती. त्यामुळे नोकरी करायची नाही हे ठरले; पण प्रेसचा धंदा हा काही चर्चा करून झालेला निर्णय नव्हता.
माझ्या माहेरची परिस्थिती गरिबीची होती. आम्ही पाच बहिणी व तीन भाऊ. थोरला भाऊ अकाली निधन पावलेला. एका बहिणीचे लग्न होईतो वडील पेन्शनीत निघाले. मला लहानपणापासून कलेची आवड. ड्नॅइंर्ग चांगले होतेच; पण भरतकाम-विणकामही आवडायचे. टॅटिंग व क्रोशे शिकून त्यातही मी निपुण झाले होते. आमचे शेजारी साठे म्हणून राहात. त्यांनी मी मॅटि्न्क झाल्याझाल्या एका सरकारी खात्यात ट्न्ेसरची नोकरी आणली. साठ-सत्तर वर्षांपूर्वी स्त्रियांनी नोकरी करणे एवढे प्रचलित नसताना मला मात्र या नोकरीची आवड निर्माण झाली होती. चार-सहा महिने बाहेरचे जग पाहता आले; पण लग्नानंतर ती नोकरी सुटली.
'नवजीवन बाइंर्डिंग वर्क्स' अशी मोठी पाटी वाड्याच्या बाहेरच्या दारावर लागली तेव्हा प्रेसला खरी सुरुवात झाली, १९५२च्या सुमारास. सुरुवातीला मला रस्त्यावर जाऊन पाटी पाहायची लाजच वाटायची. प्रेस सुरू झाला तो घरातच. सासू-सासरे व आम्ही असे एकत्र कुटुंब होते. पाहुणे-रावळे, माहेरवाशिणी, गडीमाणसे असा मोठा गोतावळा होता. मामंजींनी प्रत्येक मुलासाठी ४००० रुपये ठेवले होते. ते यांना मिळाले. एके दिवशी मुंबईतल्या देसाई कंपनीतून दोन मोठे पेटारे आले. एकात होते कटिंग मशीन व दुसऱ्यात स्टिचिंग मशीन. दोन्हीही जर्मन मशीन्स होती; पण हातांनी चालवायची. चार-पाच दिवस नुसती मशिने जोडायचे काम चालले होते. त्या खोक्यांच्या फळया इतक्या सुंदर होत्या, माझ्या भावांनी त्यापासून एक छान वर्क-टेबल तयार केले होते. परवा-परवापर्यंत ते मुलाकडे वापरात होते. स्टिचिंग मशीनची वेगवेगळया जाडीच्या तारांची बंडलं येऊन पडली आणि कटिंग मशीनच्या चार-चार फूट लांबीच्या धारदार स्पेअर सुऱ्या!
योगायोगाने यजमानांना वा. रा. कोठारींच्या 'झेेपर ऊरळश्रू छशुी' मध्ये नोकरी लागली ती रात्रपाळीची. त्यामुळे रात्री ती नोकरी व दिवसा प्रेसचे काम असा त्यांचा दिवस सुरू झाला आणि तीन मुलांची मी आई नकळत प्रेसच्या धंद्यात ओढली गेले. दहा माणसांचा स्वैपाक, चहा-पाणी, आणि हे सर्व लाकडाच्या भुश्श्याच्या शेगड्यांवर! स्वयंपाक-जेवणं झाली की प्रेसच्या खोलीत जाऊन नवीन-नवीन शिकायचे. पहिल्यांदा कागदाच्या घड्या घालायच्या शिकले, त्याला कागद 'मोडायचे' असे म्हणत असू. बहुतेक दोन किंवा तीन घड्या पण खूप वेगाने घालायच्या, तेही टोके नीट जुळवून, बाहेरच्या ओसरीत हळूहळू कागदाची रिमे, फॉर्म, पुस्तकांचे गठ्ठे जमा व्हायला लागले. यांनी भवानी पेठेतून स्वत: फळया आणून बाइंर्डिंगचे उंच पाट बनवून घेतले होते. ते इतके मजबूत व जड होते की एक पाट उचलायला कठीण जायचे. अशा तीन पाटांच्या फळया त्यांनी एका हातात तोलून एक बिनब्रेकच्या सायकलवरून आणल्या होत्या.
हळूहळू काम जमायला लागले. एक-दोन कामगारही तासावर यायला लागले. अर्थात मुख्य कामगार आमचे 'हे'च होते. काम वाढले तेव्हा मला आठवतात राऊत नावाचे एक बाइंर्डर आणि शिगवण नावाचा एक मुलगा, फॉर्म मोडून झाले की त्यांची जुळणी, प्रत्येक फॉर्मचा एक गठ्ठा असे चार ते दहा-बारा गठ्ठे अर्धगोलात मांडून ठेवायचे. वेगाने एकीकडून सुरुवात करून उजव्या हाताने डाव्या हातावर घेत घेत एक अंक किंवा पुस्तक पूर्ण करायचे व आडवेतिडवे लावून त्याचा गठ्ठा करायचा किंवा एकत्र करून बांधायचे व पुढे स्टिचिंग करताना परत 'सोडवायचे'. यानंतर त्या पुस्तकाला स्टिचिंग म्हणजे स्टेपलिंग व्हायचे. यातसुद्धा नेहमीच्या किंवा कमी पानाच्या पुस्तकाला 'पोटात स्टिच' असायचा. स्टिचिंग मशीन मी चालवले नाही. कारण पायाने जोर द्यायला लागायचा; पण मशीनला फीडिंगला बसायची.
नंतर पुस्तकाला 'बॅकपेस्ट' व्हायचे; म्हणजे पुस्तकाला कव्हर लागायचे. यात 'सरस' नावाचा एक प्रकार असायचा. अतिशय उग्र वासाचा, चिकट गोंद. पहिल्या पहिल्यांदा याचा वासच सहन नाही व्हायचा, नंतर सवय झाली. पंचवीस-तीस पुस्तकांचा गठ्ठा घेऊन त्याच्या पाठीला ब्रशने सरस लावायचा. नंतर एकेक पुस्तक घेऊन, डोके व एक बाजू जुळवून हाताच्या चिमटीने कव्हर चिकटवायचे. पुस्तक फिरवून, ओढून परत चिमूट फिरवायची. मला हे काम आवडायचे व स्पीडही यायचा. तिथून पुस्तके कटिंग मशीनवर जायची. तीन बाजूंनी छाट घेऊन पुस्तक एकदम सुबक दिसायला लागायचं, मग त्याचे गठ्ठे बांधायचे. कटिंगवर मी काम नाही केले; पण मुलांनी केले. एक जण फिरवायला, एक जण दाबावर व बहुतेक करून हे लावायला. कटिंगचे कात्रण खूप गोळा व्हायचे. महिन्यात एकदा- दहा-बारा पोती निघायची. कापलेल्या कागदाच्या डेमी-क्राऊन वगैरे करत कधीकधी ३/४ इंच लांबीच्या स्लिपा निघायच्या. त्यांची आम्ही पॅड्स बनवायचो.
ज्या पुस्तकांना स्टिच बसत नसे त्यांना टोच्याने भोके पाडून ट्वाइनसारख्या दोऱ्याने शिवण करायला लागायची. खूप फॉर्मचे व पूर्ण उघडता येईल असे पुस्तक असेल तर ते विशिष्ट शिलाईने शिवायला लागायचे, त्याला सेक्शन शिलाई म्हणत. करवतीने काप घेऊन, वरून लांब सुतळया बांधून व त्या पुस्तकात गुंतवून एक विशिष्ट क्रमाने सुईने शिलाई करायला लागायची. असे काम आले, की आम्ही जाधव बाइंर्डरना बोलवायचो. पांढरे स्वच्छ इस्त्रीचे कपडे घातलेले मितभाषी जाधव सेक्शन शिलाई, फुलक्लॉथ, लेदर बाइंर्डिंग खूप छान करत. मी आणि जाधव मिळून सेक्शन शिलाईचे काम उरकत असू. सेक्शन शिलाईचे काम मला आवडायचे.
हळूहळू पसारा वाढत गेला. स्वयंपाक आवरून मी मोडायला, जुळवायला, बॅकपेस्टला, शिलाईला बसायला लागले. अर्जंट कामे आली की घरातले सर्वचजण प्रेसमध्ये कामाला जायचो. पहिली काही पुस्तके आठवतात ती ताम्हनकरांचे 'पावाचा अन्नकोट', गोरेबाइंर्चे 'धाडसी बालवीर' तसेच खूप प्रती असलेली 'महारोगाला भिऊ नका' आणि 'गोवध बंदी, कां?' रोहिणी, हंस, मोहिनी, नवल हे अंक आमच्याकडेच असायचे. काम कुठवर आले हे विचारायला अनंत अंतरकरांच्या चकरा व्हायच्या. रोहिणीचे काणे, समन्वयचे मोडक हेही आठवतात. स्वत:चे मशीन नसलेले काही लोक घरी बाइंर्डिंगचे काम करायचे व मशीन आमचे वापरायचे. एक आणा सुरीप्रमाणे कामासाठी आलेले वाळवेकर, जोशी हे आठवतात. त्या वेळी जवळजवळ निम्म्याहून अधिक घर कागदांनी भरून गेलेले असायचे. पुस्तकं जरी जास्त असली तरी स्टेशनरी बाइंर्डिंगलाही काम यायचे जसे की बिलबुके वगैरे. त्यासाठी परफोरेटिंग, नंबरिंग, इंटरलीव्हींग अशा कलाही आत्मसात केल्या. कागदाची सुबक पाकिटे व लिफाफे बनवायलाही शिकले. बिलबुकांवर डुप्लिकेट, ि्निप्लटाकेट असेल त्याप्रमाणे अॅडजस्ट करून हँडनंबरिंग मशीनने एका हाताने कागद उलटत जलदगतीने केलेल्या नंबरिंगचा आवाज अजूनही कानात घुमतो.
५७-५८ मध्ये बाइंर्डिंगचा पूर्ण जम बसल्यावर यजमानांनी टाईप विकत घेतला व कंपोजिंग रूम सुरू केली. वेगवेगळया टाईप केसेसमध्ये भरणे यात खूप मजा यायची. 'ग, ट, ऊ, ब, ड, श', 'च, ह, य, क, र, ण' असे केसचे तक्ते पाठ केले आणि कंपोजिंगही शिकले. पहिले काही दिवस बऱ्याच पानांचा कंपोज करून दिला. त्या वेळी बाइंर्डिंगचे काम जरा कमी झाले व अय्यप्पा नावाचा एक कुशल कामगार मिळाला. तासावर असूनही जलदगतीने काम करण्यात तो एक्स्पर्ट होता. एकंदरीत सर्व कामगार इतके साधे, मनमिळाऊ आणि विश्वासू होते की तसे मिळणे भाग्यच. या सुमारास माझ्या मुलीचा जन्म झाला. मुद्रणाच्या कामात प्रुफे तपासणे हे माझे मुख्य काम झाले. गिऱ्हाईकांशी बोलणे, निरोपानिरोपी, टायपाची खूट, पुस्तकांची पार्सले शिवून नावे घालणे ही कामे वाढली.
१९६१ मध्ये मामंजींचे निधन झाले. पानशेतच्या पुरात प्रेसमध्ये १ ।।-२ फूट पाणी आले होते. कागदाचे नुकसान झालेच. टायपातून मातीची पुटे काढून टाकताना त्रास झाला. त्यानंतर प्रेस वाढला तो पुढली १० ते १५ वर्षे. 'मुद्रक : सौ. नलिनी गोखले, श्री मुद्रणालय, पुणे' अशी पुस्तकांवर प्रेसलाईन यायला लागल्यावर खूप छान वाटायचे. कंपोझिटर्सच्या आग्रहाखातर त्यांना फायदा करून देणारे मतदार-याद्यांचे काम यायला लागले; पण मुख्यत: प्रेस वाढला तो पुस्तक-छपाई म्हणूनच. सुरुवातीला पंढरपूरचे दिगंबर हरी तेलंग यांची खूप धार्मिक पुस्तके छापली. नंतर स्वाध्यायचे डॉ. वि. प. महाजन यांची पाठ्यपुस्तके, योगविद्याधाम (लोणावळा) यांची पुस्तके व मासिक, वा. रा. कोठारींची पुस्तके, काणे-महाराजांची पुस्तके, जे. दत्त यांची पुस्तके, पु. ग. वैद्यांची पुस्तके, ऊअउउ बँकेचे रिपोर्ट्स व पुस्तके, सिंध सोसायटी व रायसिंगानी यांचे काम अशी काही मुख्य कामे आठवतात. छपाईचे मशीन आम्ही घेतलेच नाही. त्यामुळे कंपोजच्या गॅल्या वाहण्यासाठी दगडू, चिमा, शिरपा असे गाडीवाले आमचेच होऊन गेले. आजूबाजूच्या प्रिंटर्सपैकी साथीदार, इंदिरा प्रेस, तासकरांचा शरद प्रिंटिंग यांचेकडे प्रिंटिंग व्हायचे; पण मुख्यत्वे देशमुखवाडीतल्या काळ प्रेसमध्ये, मुकुंदराव दाते यांचेकडे. यानंतर प्रेस चालवला तो यजमानांनी केवळ स्वत:ला व्यस्त ठेवण्यापुरता.
या माझ्या प्रेसच्या आठवणी जास्त करून प्रेस सुरू करतानाच्या, बाइंर्डिंगच्या दिवसातल्या व कंपोजिंग सुरू करतानाच्या माझ्या सहभागाच्या जास्त आहेत. त्यावेळी म्हणजे माझ्या तरुणपणी, काम केल्यावर आपल्याला खर्चाला हाताशी दोन-पाच रुपये मिळावेत असे वाटायचे, पण असा पैसा कधीच मिळाला नाही. यजमानांनीही अमाप कष्ट केले; पण त्यांना नफा या शब्दाचे वावडे होते. कष्टाचे एक साधन आणि प्रबोधन असा काहीसा त्यांचा दृष्टिकोन होता. उत्तर आयुष्यात प्रकृतीने मला साथ दिली नाही. मनाने मी जरा कमकुवतच होते. केवळ गृहिणीच राहिले. आयुष्यही सतत तब्बेतीचा विचार करत करत निष्क्रियच गेले. माझ्या चाळिशीनंतर मला पाहिलेल्या कोणाला कदाचित खरेही वाटणार नाही की मी असे दिवस काढले होते. मागे वळून पाहताना, कष्टाचे असले तरी प्रेसचे दिवस मनातून जात नाहीत. दाबप्रेस, स्लिपा, शिकंजा, खळ, कात्रण, टोच्या, रिमाचा बांधा, किंतान असले शब्द खुणावतात आणि त्या आठवणीत मी रमून जाते.
- नलिनी गोखले, पुणे


