Skip to main content

तो प्रवास .... गोरखपूर ते रेणुकूट

रात्रीचे आठ वाजायला आले होते. कोणीतरी सांगितले अजून रेणुकूट तास दीड तास दूर होते. म्हणजे पोचेपर्यंत साडे नऊ, दहासुद्धा होणार. रेणुकूटला कोणीही ओळखीचे नव्हते. तेथून मला गोविंदपूरला डॉ. रागिणी प्रेमना भेटायला जायचे होते. माझे अंदाज चुकत गेले होते. खरे तर काहीच माहिती नव्हती मला त्यामुळे अंदाज तरी काय करणार ? मी चांगलीच चिंतेत होते. उत्तर प्रदेश परिवहन निगमची बस खचाखच भरली होती. मला पुढच्या बाजूला बॉनेटवर बसायला म्हणजे टेकायला जागा मिळाली होती. शेजारी बसलेला माणूस माझी परिस्थिती हेरत होता, माझ्याशी गप्पा मारायचा प्रयत्नही करत होता. तो दगडी कोळशाच्या खाणीत ठेकेदार होता आणि त्याला सावज अगदी हातात आल्यासारखे वाटत होते. त्याचा मला आग्रह चालला होता की मी त्याच्याबरोबर जावे, तो माझी सर्व व्यवस्था करेल डाक बंगल्यावर आणि दुसऱ्या दिवशी गोविंदपूरला पोचते करील. मी चेहऱ्यावर बेदरकारपणा दाखवत चिंता लपवत होते.
सकाळी ६ ला मी गोरखपूरला घरातून निघाले होते. सासरहून निघणं तसं अवघडच होतं. लग्नाला फार वर्षं झालेली नव्हती. मुलगा लहान होता. उत्तरप्रदेशचे वातावरण बरेचसे सरंजामशाहीचे आहे. घरातला मोठा पुरुष हा बराचसा हुकूमशहा असतो, आणि त्याला विचारल्याशिवाय घरात काही होऊ शकत नाही. दिवाणखाना संस्कृती ही तिथली आणखी एक खासियत. दिवाणखान्यात कोणी बाहेरचे आले असले तर मग सोडाच पण एरवीही संध्याकाळी बायकांनी दिवाणखान्यात यायचे तर जामानिमा नीट असलाच पाहिजे. नव्यासारखी दिसणारी भारीतली भारी साडी, त्याला मॅचिंग सगळया गोष्टी, अंगावर दागिने, कपाळावर चांगलं मोठं कुंकू, जमल्यास भांग भरलेला, हलकी का होईना लिपस्टीक. मला यातलं सर्व करणं अशक्यच होतं. मी शक्यतो तिथे येतच नसे, पण आलेल्या लोकांना बहुरानी बघायची असायची. मी वयाची चाळिशी ओलांडलेली, कशाची बहुरानी ! मला लाजता येत नसे, पाया पडता येत नसे, पदर सावरत, संकोचत, लाजत, भोळसट आणि निष्पाप चेहरा, मोठे डोळे, फडफडणाऱ्या पापण्या, छे ! यातलं काही करणं मला शक्यच नव्हतं. दहा बारा दिवस हे सारं करून मी पार उबले होते. आता बाहेर पडून मोकळा श्वास घ्यायला मिळाला नाही तर माझं काहीतरी बरेवाईट झालं असतं, त्याच्या अगोदरच मी एक बेत आखला. उत्तर प्रदेशच्या पूर्वेच्या मागास भागात गोरखपूर येते. त्याच्या दक्षिणेला मध्य प्रदेश आणि बिहारच्या सीमेलगत रेणुकूटजवळ गोविंदपूर गावी वनवासी सेवाश्रम आहे. इथे डॉ. रागिणी प्रेम आणि प्रेमभाई काम करत होते. त्यांची माझी ओळखही नव्हती. पण जाण्यासारखं ते एकच ठिकाण मला दिसत होतं. मी स्वयंसेवी कार्यकर्ती म्हणून महाराष्ट्नत आले. नंतर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काम करत होते. पहिलं लग्न मोडून घटस्फोट घेऊन नंतर परत लग्न तेही उत्तर प्रदेशी भय्याशी - मी घाटी तो भैय्या - त्यात मी ग्रामीण भागात काम करणारी, पँट आणि कुडता घालणारी, बांगड्या, कुंकू, दागिने या सर्वांना फाटा दिलेली, नवऱ्यापेक्षा वयाने बरीच मोठी. नवरा आय्. आय्. टी. चा बी. टेक. तोही ग्रामीण भागात एका संस्थेत इंजिनीयर म्हणून काम करत होता. त्याच्या घरचे वातावरण त्याच्या अंगवळणी पडलेले होते. वीस-पंचवीस दिवस काय हरकत आहे सहन करायला अशी त्याची भूमिका. त्याला काहीच सहन करायचं नव्हतं. त्याचे कपडे त्याला बदलायला लागले नव्हते, दागिने, लिपस्टीक याची त्याच्यावर बळजबरी नव्हती. तो बहुरानी नव्हता, चाळीस वर्षांची नववधू तो नव्हता. त्यामुळे त्याला म्हणायला काय जात होतं !
सकाळी सहा वाजताच मी घर सोडलं होतं. कसंकसं जायचं हे फारसं माहिती नव्हतं. गोरखपूर - बनारस नंतर बनारस ते रेणुकूट असे जायचेच एवढे कळले होते. पण किती तासांचा प्रवास आहे. केव्हा पोचेन. रेणुकूटवरून गोविंदपूर किती दूर आहे काही तपास नव्हता. पण वाटलं जरा मोकळी हवा खाईन, कार्यकर्त्यांशी काहीतरी सामाजिक विषयावर चर्चा होईल, बरं वाटेल असा विचार करून निघाले होते. घरात सासऱ्यांना परवानगी विचारलीच नाही. फक्त सांगितलं अशी अशी जाते आहे. मुलगा लहान होता. नवरा असल्या प्रवासाला आणि संस्थेत यायला तयार नव्हता. सर्वांनाच वाटलं असेल काय अगोचर बहू आहे ही ! तशी मी पहिल्यापासून अगोचर होतेच. लहानपणी वडील म्हणायचे ही मनस्वी आहे. मला याचा अर्थ कळला नाही तेव्हा. पण मी काय करेन याचा थांगपत्ता घरच्यांना लागत नसे.
गोरखपूर - बनारस आरामगाडी सहज मिळाली, खिडकीची जागा मिळाली. मग काय दिल खुश ! मला प्रवासात निसर्ग बघण्याचा
फार नाद आहे. शेती, झाडे, जंगल, गावे, लोक, दुकाने सगळं सगळं मला बघायचं असतं. आजही मला अशी सवय आहे. बस छान चालली होती. संध्याकाळपर्यंत रेणुकूटला पोचेन असं वाटत होतं; पण प्रवासात विघ्नं कशी आणि केव्हा येतील, हे सांगता येत नाही. त्यावेळी मी प्रवास करण्याला एवढी सरावलेलीही नव्हते. वाटेत एका शहरात रस्त्यात बस थांबली. पुढचा रस्ता बंद होता. इथल्या कॉलेजमध्ये विद्यार्थी आणि प्राचार्य यात संघर्ष पेटला होता. विद्यार्थी रस्त्यावर आले होते. रस्त्यावर विटांच्या तुकड्यांचा खच पडला होता. सर्व वाहने खोळंबून बसली होती. कॉलेज सरकारी असल्याने विद्यार्थ्यांनी आपला रोख सरकारी वाहनांकडे वळवला होता. आमची आरामबस, तिला मोठमोठ्या काचा, आतून जाड पडदे. पथरावच्या भीतीने सर्व प्रवाशांनी काचा लावून पडदे पसरून घेतले. माझ्यासारखं कोणी पडदा जरा बाजूला करून बाहेर काय चाललंय याची चाहूल घेऊ लागले की सारे दबल्या सुरात राग व्यक्त करत. मला रागच आला यांचा. आम्ही पडद्यात राहायचं आणि आता सर्वात महत्त्वाचा ड्नयव्हर, त्याच्या पुढच्या काचेला काय संरक्षण होते ? मी थोडा वेळ ड्नयव्हरच्या शेजारच्या सीटवर जाऊन बसले समोरचे बघत. या भानगडीत २ ।। तास असेच गेले. मग पोलीस आल्यावर त्यांनी वाहने दुसरीकडून काढून दिली.
बनारसला गाडी पोचली तेव्हा दुपार टळून गेली होती. पुढचा प्रवास किती लांबचा, किती तासांचा आहे काही अंदाज नव्हता. इथून माघारी फिरायचं तरी वाटेतल्या गोंधळातून किती वेळ लागेल हे कळत नव्हतं. समोर एक बस उभी होती. खचाखच भरली होती. विचारल्यावर कळलं की ती रेणुकूटाची शेवटची बस आहे. मी मनाचा हिय्या केला आणि गर्दीत तशीच चढले. बाईमाणूस म्हणून लोकांनी रस्ता दिला आणि एकदम पुढे बॉनेटवर गादीसारखं केलेलं होतं तिथे टेकायला जागा दिली. स्त्री-दाक्षिण्याचा फायदा मिळाला.
बस तयार होती पण चालकाचा पत्ता नव्हता म्हणून अर्धा पाऊण तास आणखी उशीर झाला. मी उत्तरप्रदेशात प्रवास आहे म्हटल्यावर साडी, बांगड्या, कुंकू एवढं माफक प्रसाधन संरक्षण म्हणून केलं होत. नाहीतर या बसमध्ये मी एक प्रेक्षणीय वस्तू बनले असते. जवळच बाकावर बसलेल्या पुरुषाची नजर मला टोचायला लागली तेव्हा मी सावध झाले. वाचायचे पुस्तक काढून डोळयांसमोर धरले. पण त्याच्याकडून प्रश्न येऊन लागले. मलाही माहिती हवी होती की रेणुकूट किती लांब आहे, किती वेळ लागेल म्हणून मी माझे प्रश्न टाकले. रेणुकूटला पोचायला रात्री उशीर होईल. तुम्हांला कोणाकडे जायचं आहे. रेणुकूटला कोणीच ओळखीचे नव्हते. त्याने हळू हळू आपलं जाळं टाकायला सुरुवात केली. माझं हिन्दी तिथलं नाही, परत हातात इंग्रजी पुस्तक तेव्हा त्याला वास लागला असणार. शिवाय नाही म्हटलं तरी चेहऱ्यावर चिंता जाणवली असणार त्याला. `बाई, तुम्ही काही फिकीर करू नका. मी इथला जाणकार आहे. मला तिथे सर्व ओळखतात. मी तुमची सगळी सोय करीन.' तो दगडी कोळशाच्या खाणीचा कंत्राटदार होता.
आता अंधार झाला होता. बाहेरचं फारसं काही कळत नव्हतं. अगदी पुढे असल्याने गाडीच्या दिव्यात थोडंफार दिसत होतं. रस्त्यावर वाहन फारशी नव्हतीच. लहानसहान गावं, रॉकेलचे मिणमिणते दिवे, मधेच एकादं मोठं गाव, बैलगाड्या, एखादा ट्न्क असं दिसत होतं. रस्त्याच्या कडेची झाडं आहेत फक्त का ऐन जंगलातून चाललोय काही कळत नव्हतं. मी मनाची तशी खंबीर आहे. उगीचच भीतीची भुतं उठवून स्वत:लाच घाबरवण्याची सवय नाही मला. आणि खरं तर प्रवासाचा फारसा अनुभव नसल्याने काय काय घडू शकतं हे कळतही नव्हतं. अज्ञानात आनंद होता तरीही मनात काहीबाही येतही होतं. गाडी आता बंद पडली तर काय ? रेणुकूटला रात्री दहा-अकराला पोचले तर काय करायचं, कुठं राहायचं, कोण आसरा देईल ? हा ठेकेदार पाळत ठेवून आपल्या मागे आल्यास काय करावं लागेल. हे असले विचार मनात दडवून मी बेफिकीरपणे बसले होते. डोक्यावर एक लहानसा दिवा होता त्यामुळे फारसा उजेड नव्हता. बरेच जण जमेल तसे पेंगत होते. मला ते काळजीने आणि बसायच्या अस्थिर जागेने शक्य नव्हते आणि ठेकेदाराला ते करायचे नव्हते. तो काहीबाही प्रश्न मला टाकत होता, पण गाडीच्या आवाजात मला ते ऐकायला येत नसल्याचे नाटक करता येत होते. पलीकडे एक मुस्लिम जोडपे आणि त्यांची दोन मुले मांडीवर असे बसले होते. बाईच्या तोंडावर बुरखा होता, पुरुष मधून मधून माझ्याकडे सहानुभूतिपूर्वक कटाक्ष टाकत होता. त्यांना रेणुकूटलाच उतरायचे होते. मी त्यांना विचारलं, `भाईसाहब, रेणुकूट केव्हा येईल ?' मला उत्तरापेक्षा त्यांच्याशी ओळख करून घ्यायची होती. काही जमलं नाही तर मी विचार करत होते की माणसं सज्जन दिसतायत, त्यांच्याकडे आश्रय मागायचा. रात्री दहा अकराला दुसरं कोण भेटणार आणि एकट्या बाईला आसरा कोण देणार, दिला तर त्याची किंमत असणार का ? काय असणार ? मी किती शूर असले, धाडसी असले तरी अशा प्रसंगात कधी सापडले नव्हते, अनुभव नव्हता. शेजारच्या लांडग्याची नजर मला असह्य होत होती. तरी पण फार काळे चित्र, भयाण प्रसंग मी मनासमोर आणून अगोदरच गर्भगळित होत नव्हते. घाट लागला होता का रस्त्याला वळणं होती, जंगल होतं का शेती होती, गावं होती की ओसाड माळ होते काही अंदाज येत नव्हता. आपल्याला शहरी लोकांना विजेच्या दिव्यांचा उगाचच आधार वाटत असतो आणि ते नाहीत म्हणजे एकदम विजनवासात पडल्यासारखं वाटतं.
पंचवीस वर्षांनंतर आज मी आत्ता इतकी फिरले आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातल्या जंगलात लहान-मोठ्या शहरात, युरोपात आणि आफ्रिकेत बहुतेक वेळा एकटीच. आता मी चांगली तरबेज झाले आहे; पण त्या वेळी अनुभव नसलेली मी जरा गांगरूनच गेले होते आणि वाटत होते की त्या ठेकेदाराला माझी अवस्था पूर्ण कळते आहे आणि त्याच्यापासून मला सुटायचंय. तो मुस्लिम माणूसही
ततकाच घातक ठरू शकेल हेही कळत होते. रेणुकूट न येता बस पहाटेपर्यंत जात राहावी असले विचार मनात येत होते आणि ते शक्य नाही हेही कळत होते. पुढचे विचार मी फारसे करतच नव्हते. मला वाटत होते की काहीतरी होऊन माझा प्रश्न सुटेल. पण कसा ? मी घरचा विचार मनात आणलाच नाही. तो विचार करायला लागले असते तर घाबरून नक्कीच लांडग्याच्याच तोंडी पडले असते. पण शेवटी रेणुकूट आले. कंडक्टरने ओरडून तसे सांगितले. मी माझी पिशवी खांद्यावर घेऊन उतरले. बसच्या थांब्याच्या बाजूला बऱ्यापैकी लोक इतक्या उशिरासुद्धा होते, हे बघून जरा बरे वाटले. मी गोविंदपूरला कसे जाता येईल याची चौकशी सुरू केली. कदाचित ते अगदी जवळही असेल अशी शक्यता होती. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की लोकांनी सांगितले की वनवासी सेवाश्रमच्या संस्थेची इथेच प्रदर्शनी लागली आहे, तिथे त्यांच्यापैकी कोणीतरी असणारच. ते ऐकल्यावर असं वाटलं की मनावरचा भार उतरल्याने मी आता तरंगतही तिथे जाईन. कोणीतरी मला तिथे घेऊन गेले. संस्थेचे सर्वोदयी अघळपघळ कार्यकर्ते भेटल्यावर तर इथे आल्याचे सार्थक झाले. गरमगरम जेवण मिळाले तेव्हा लक्षात आले की आज दिवसभर उपास झाला होता. प्रवासात नवख्या भागात बाहेरचे काही न खाल्लेले परवडते, त्यामुळे तोंड मिटून गप्प होते. रात्री थंडीत जाडजाड रजयांच्या आत शिरल्यावर अशी मस्त झोप लागली !
सकाळी उठल्यावर सर्व आवरले. नाश्त्याला ताटात पोहे, पाण्याने भिजवायचे आणि नंतर थोडे दूध आणि गुळाचा लाडू सारखा गोळा त्या बरोबर खायचे, हे फारच छान वाटले. मग प्रदर्शनी पाहिली. हात करघा (माग) गठ्ठा करघा असे पाहिले. रेशमाचे सूत काढून ते विणण्याचे काम, जाड ब्लँकेट विणण्याचे काम असे बघितले. लोकांशी गप्पा मारल्या. सकाळी रस्त्यावर आल्यावर रेणुकूटचे खरे दर्शन घडले.
रेणुकूटला बिर्लांची डाला सिमेंट फॅक्टरी आहे. जवळ रिहांद धरण आहे. इथे सिमेंट फॅक्टरीच्या चाळी आहेत. सारे वातावरण धुळकट आणि उदास. फॅक्टरीत काम करणाऱ्या गरीब मजुरांचा वावर, त्यांचे धुळीने माखलेले देह, त्यातले बरेचसे आदिवासी वाटत होते. दहाच्या सुमाराला मला घेऊन श्री. तिवारी हे कार्यकर्ते मोटारसायकलने निघाले. बरं झालं की रागिणीबहन संस्थेवर होत्या; पण प्रेमभाई दौऱ्यावर गेले असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. रागिणीबहन डॉक्टर - बहुधा एम. डी. आहेत. त्यांच्याशी गप्पा झाल्या. सर्व प्रदर्शनी श्री. तिवारींनी फिरून दाखवली. एका गावातही त्यांच्याबरोबर जाता आले. संस्था बरीच वर्षं आदिवासी भागात काम करते आहे. आदिवासींचे दारिद्र्य मिटावे म्हणून खादी कताई, बुनाई सर्व कामे चालतात, शेती, आरोग्य याचे कामही चालते. काम चांगले चालले होते असे वाटेपर्यंत रिहांद धरण, त्याचे विस्थापन, अन्याय, फसवणूक त्यातच डाला सिमेंट फॅक्टरीत होणारी पिळवणूक आणि प्रदूषण यातून साऱ्या कामावर पाणी फिरवल्यासारखे झालेय, असे रागिणीबहन सांगत होत्या; पण तरीही काम केलेच पाहिजे यावर भक्कमपणे उभ्या होत्या. आजही प्रेमभाइंर्च्या निधनानंतर रागिणीबहन सर्व जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत.
या साऱ्या गोष्टी मनावर ठसल्या आहेत. आजही ताजेपणाने गोरखपूर - रेणुकूट प्रवास आणि आश्रमाचे काम आठवते; पण ही काय भानगड आहे कळत नाही की येताना मी कशी आले, केव्हा पोचले, काही म्हटल्या काही आठवत नाही. जणू काय मी परतीचा प्रवास केलाच नाही. बहुधा तो प्रवास फार सुरळीत पार पडला असावा. आश्रमाच्या लोकांनी नीटपणे एका ठेपीत जाणारी बस मिळवून त्यात बसवून दिले असेल; पण त्या प्रवासाची आठवणही नाहीये.
लहानपणी मध्यम वर्गाच्या घरात वाढलेली मी जरी बंडखोर होते तरी वातावरण खूप दबावाचे होते; पण मुंबई असल्याने मोकळीक घेता येत असे. वडिलांना ७वी म्हणजे फायनलनंतर माझं लग्न लावून द्यायची इच्छा असली तरी मुंबईत ते शक्य नव्हते. त्या काळात जेवढा चंटपणा करता आला, शाळेच्या संघातून खेळता आले तेवढे करून घेतले. वयाच्या चाळिशीनंतर मी स्वातंत्र्य ओढून मिळवून घेतले होते. पहिल्या लग्नाच्या काचातून सुटून दुसऱ्या लग्नाच्या काचात सापडता सापडता वाचले ती या अशा भटकंतीतून. नवऱ्याला, सासरच्यांना मान्य नसतानाही, अशी मुशाफिरी करतच चालले आहे. खूप वेगळया आणि अवघड परिस्थितींना तोंड देत देत शिकत पुढे चालले आहे. त्यामुळेच जीवनात जिवंतपणा आहे. मजा आहे.
- कुसुम कर्णिक, मंचर

प्रतिसाद

The content of this field is kept private and will not be shown publicly.
Type the characters you see in this picture. (verify using audio)
Type the characters you see in the picture above; if you can't read them, submit the form and a new image will be generated. Not case sensitive.