Skip to main content

प्रतिसादास उत्तर द्या

तेथे पाहिजे जातीचेच

प्रास्ताविक- भारतातील जाती-वास्तव
आपल्या भारत देशात पिढ्या न् पिढ्या परंपरागत पद्धतीने अनुपालन केला गेलेला, व्यक्तीची ओळख सांगणारा, `जात' हा घटक भारतीय समाजव्यवस्थेचा अविभाज्य अंग बनलेला आहे हे सर्वविदितच आहे. या जातीच्या वर्चस्वाचा आवाका एवढा मोठा आहे, की समाजाच्या सर्वांगीण क्षेत्रात दिसून येणाऱ्या प्रभावाने अचंबा वाटावा. जेव्हा एकजातीय समूहाचा समाज (आजच्या सामान्य माणसांच्या परिकल्पनेप्रमाणे) बनतो तेव्हा त्याची एक संस्कृती आकाराला येते. ज्यात केलेले नियम हे सर्वांसाठी बंधनकारक असतात व हे नियम व्यक्तीचे जीवन नियंत्रित करतात आणि त्याला धार्मिक मान्यता मिळते `संस्कार' म्हणून किंवा व्यक्तिगत कायदा म्हणून (शिीीेपरश्र श्ररु) भारतात व्यक्तीच्या गुणकर्मावर व्यक्तीचे मूल्यमापन होत नाही तर तिचे मूल्यमापन वर्ण, जात, वंश व लिंग याच आधारावर केले जाते, बिच्चाऱ्या श्रीकृष्णाने `श्रीमद्भगवदगीते'त कितीही जीव तोडून सांगितलेले असले तरी `चातुर्वर्ण्यं मया सृष्टा गुण कर्मविभागश:' तरी प्रत्यक्षात त्याच्या काळात तरी गुणकर्मामुळे व्यक्ती ओळखली जात होती काय? तसे जर असते तर उदार व शूर कर्णावर मानहानीचा प्रसंग का आला असता ? द्रोणाचार्याला गुरू म्हणून एकलव्याला अंगठ्याचे दान का करावे लागले असते? थोडक्यात भारतीय समाजव्यवस्था रामायण महाभारताच्या अगोदरच वैदिक (उत्तर) काळातच आपली गुण व कामाची शहानिशा करून व्यक्तीची चोख ओळख करण्याची तात्त्विक मूल्ये हरवून बसलेली होती आणि संपूर्ण मूल्यव्यवस्था विषमतेवर बांधून आपल्या संस्कृतीचा उदो उदो करू लागली होती. `जात' लिंग, वंश, वर्ण इत्यादी विषमतेचे वेगवेगळे मोहरे होते, त्यात `जात' जास्त प्रभावी मोहरा असल्याचे दिसून येते.
जातीच्या आधारावरच व्यक्तीचे जगणे ठरते (निवास, अन्न, वस्त्र, आरोग्य, शिक्षण व करमणूक) निवास, जागा - महारवाडे, ब्राह्मणाच्या आळया, अन्न - उष्टेनाष्टे, आंबलेले, विटके खाणे काही व्यक्तिसमूहांना करावेच लागते तर काहींना भिकेत उत्तम शिधा, आटा भिक्षुकी व्यवसायामुळे मिळून सुग्रास अन्न खाता येते तर काहींना जनावरांच्या शिकारी करून पक्ष्यांना मारून उपजीविका करावी लागते. वस्त्राच्या बाबतीत आजही कितीतरी लोकांना अर्धनग्न राहावे लागते तर काही लोक उंची वस्त्रांना कंटाळून फॅशन म्हणून अर्धनग्न राहतात. आरोग्य व शिक्षण गरीब मागास सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा केवळ उच्चार केला जातो. प्रत्यक्षात गरीब, अशिक्षित लोकांच्या वाट्याला काहीच नाही. `कोल्हाट्याचं पोर' हा या बाबतीत डॉ. किशोर काळेंनी अमीट दस्तऐवज करून ठेवलेला आहे. जसजशा मागास जाती शिकतील व आपले जगणे शब्दांकित करतील तसतशी भारतीय जातीव्यवस्थेत जगणाऱ्या व्यक्तीसमूहाची ससेहोलपट कशा प्रकारे होते याचे वेगवेगळे दस्तऐवज (वेर्लीाशपींी) बाहेर पडतील जे येथील उच्चभ्रू संस्कृतीला आपल्या जगण्याचा हिशेब मागतील, कारण ७५% (प्रतिशत) ग्रामीण लोक आजही २१ व्या शतकात तसेच जीवन जगत आहेत. या उलट त्रिवर्णीय जाती ज्यांना ज्ञानसत्ता, बलसत्ता व वित्तसत्ता परंपरागत पद्धतीने आरक्षित करून मिळालेली, लिखित व अलिखित पद्धतीने शास्त्रांनी नोंद केलेली व प्रत्यक्षात राबवलेली, भारतीय राज्यघटनेने काही प्रतिशत वंचित लोकांना अल्परूपात खुली केल्याबरोबर येथील राजमान्य शास्त्रीवर्ग खडबडून जागा होऊन वर्णसंकर व व्यवसायसंकर या संकल्पना स्पष्ट करू लागला आणि जातीजातीत भांडणं लावण्याचं तंत्र म्हणजे आरक्षण होय अशी आरक्षणाची सवंग व्याख्या संभावितपणे करू लागला. स्वत: आरक्षणजातीमुळेच हजारो वर्षे भोगत असतानादेखील जातीमुळे आरक्षण मिळू नये हे म्हणणे म्हणजे निर्लज्जपणाची परिसीमा होय, असो. जातीमुळे माणसामाणसात दुरावा निर्माण होतो, बंधुभावाचा विलोप होतो आणि देशात यादवी सुरू होते अशा या जातीची निर्मिती कोणी व कशी केली?
जातीची उत्पत्ती
जात कशी अस्तित्वात आली, तिची जडणघडण कशी झाली हा समाजशास्त्रीय संशोधनाचा विषय असला व सध्या आपल्या विवेचनाचा विषय नसला तरीही जातीच्या उत्पत्तीचे मूळ आपल्याला तपासावेच लागेल, कारण त्यावरच प्रस्तुत लेखाची मेढ रोवलेली आहे, हे विसरता येणार नाही. जात ही चातुर्वर्ण्यातून निर्माण झाली आणि चातुर्वर्ण्य संकल्पना आर्यसमाजातील होती. ऋग्वेदाच्या दशम मंडलातच ही संकल्पना स्पष्ट करण्यात आलेली आहे. विराट समाजपुरुषाचे चार अंग (शरीराचे अवयव) चातुर्वर्ण्याचे द्योतक आहेत. हा आर्यसमाज एका विशिष्ट वर्णाचा (रंगाचा) वंशद्योतक जनुकांनी बनलेला होता, त्यामुळे वंशशुद्धी बिघडणार नाही अशा पद्धतीने सवर्ण विवाहाचा पुरस्कर्ता होता, एकाच वर्णाचे चार
अंगापासून ब्राह्मण (मुख) क्षत्रिय (बाहू) वैश्य (उरू) शूद्र (पाय) चार वर्ग बनले तरीही त्यांच्यात वर्णामुळे सहज विवाह होत असत. नंतरच्या काळात विवाह बंधने जी ताठर झाली त्याचे कारण एतद्देशीय काळया, चपट्या नाकाच्या लिंगपूजक लोकांशी संबंध येऊन जो वर्णसंकर होऊ लागला ज्यामुळे (रंग) वर्णच बिघडू लागला, ज्यामुळे गोऱ्या सरळ नाकाच्या आर्य समाजात अराजक माजून आपला वर्णीय समाज वाचवण्याची धडपड सुरू झाली. सवर्ण आणि अवर्ण यांच्या शरीरसंबंधातून निर्माण झालेल्या रंग (गोरा) गमावलेल्या आर्यांच्या समाजात प्रश्न निर्माण झाला आणि यातूनच जातीची उत्पत्ती झाली. `जात' म्हणजे जन्माला आलेला किंवा आलेली `समान: वर्ण: येषां ते सवर्णा:' ही `सवर्ण' कल्पनाच मोडीत निघू पाहत होती. वर्ण तर त्या मनुष्य समूहाच्या अस्तित्वाची मूळ खूण होती. सवर्ण विवाहाची प्रवृत्ती आजही पाश्चात्त्य देशात किती मूळ धरून आहे हे वारंवार वंशभेदावरून होणाऱ्या दंगलीवरून दिसून येते. ज्यातून वर्णाभिमान किती जाज्वल्य आहे हे कळून येते. तरीही आजही जगात सवर्ण(गोरे) व अवर्ण (काळे) यांचे विवाह होतात. आणि वेगळयाच रंगाच्या संतती देखील उत्पन्न होतात. हीच स्थिती तत्कालीन समाजात होती, परंतु भारतीय बनलेल्या आर्यांनी समझोता करून `जात' लोकसमूहाची व्यवस्था लावण्यासाठीच जातीय विवाहाची अट ताठर केली. कारण स्त्रीपुरुष यांच्या होणाऱ्या शरीरसंबंधातूनच नवी प्रजा निर्माण होते हे सर्वमान्य तत्त्व विवाहाच्या धार्मिक मान्यतेच्या बंधनाशी जोडण्यात आले व विवाह सजातीय म्हणजे आपल्याच जातीत करावे असे बंधन लादण्यात आले, आता वर्णाचा आग्रह थोडा सैल झाला, कारण मनुष्य सुलभ कामप्रवृत्ती सवर्णाची अवर्णाकडे सहज होऊ शकते आणि झालेली होती. असे होऊ नये म्हणून विवाहबंधन अधिक कडक करण्यात आले आणि स्त्री विवाहामुळेच जात निर्माण करते. पुन्हा जनुकाचा प्रश्न, ज्यामुळे सत्तेला आणि पुरुषसत्ताक कुटुंब व समाजव्यवस्थेला प्राधान्य मिळून त्या त्या पुरुषांची जात त्याच्या अपत्यांना मिळते. जात मात्र स्त्रीच निर्माण करते, म्हणून जात, विवाह व स्त्रिया यांचा असा अन्योन्य संबंध आहे. त्यामुळे जातीतच स्त्रियांनी विवाह करावेत हा प्रमुख फतवा प्रत्येक पुरुषासत्ताक कुटुंबाचा व समाजाचा उत्तर वैदिक कालातील धर्मसूत्रांनी जो काढला तो पिढ्या न् पिढ्या हजारो वर्षांपासून अबाधित चालू आहे.
विवाह ईश्वरी योजना होय हे एकदा मान्य झाल्यावर मग काय पाहावे? जातीबाहेर विवाह करणाऱ्यांना त्यांचा समाज मृत्युदंडाचीदेखील शिक्षा देऊ शकतो हे प्राचीनकालापासून ते ते दोन तीन वर्षांत घडलेल्या व दूरदर्शनने ज्यांचा वृतान्त सादर केलेला आहे, अशा आधुनिक काळापर्यंत जातीबाह्य आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांना भयंकर दिव्यांना सामोरे जावे लागते हे आपल्याला दिसून येते.
जातीचे मूळ जातीतल्या जातीत विवाह करणे यातच आहे हे आंतरराष्ट्नीय कीर्तीच्या दोन महाराष्ट्नीय समाजशास्त्रज्ञांनी शास्त्रीय पद्धतीने सिद्ध केलेले आहे. ते दोन विद्वान, म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर (उरीींशी ळप खपवळर) आणि डॉ. श्री. व्य. केतकर (कळीींेीू ेष लरीींशी) होत. `एपवेसराू ळी ींहश ेपश्रू लहरीरलींशीळीींळल ींहरीं ळी शिर्लीश्रळरी ींे लरीींशी `ऊी. इ.ठ. आलशवज्ञरी (उरीींशी ळप खपवळर).
आजही विवाह ठरवताना जातीचे बारीक बारीक पदर उपजाती, शाखा इत्यादी उकलले जातात. या संकुचितपणाचा विचार करताना वडीलधारी मंडळी मुलामुलींना विचारतच नाहीत हे विशेष होय. विवाहात जातीची मातब्बरी कमी करायची असेल तर आंतरजातीय विवाहाशिवाय पर्याय नाहीत. भारताला कलंक लावणाऱ्या जातव्यवस्थेला हादरा देण्यासाठी जातीतल्या जातीत होणारे विवाह मोडीत काढले पाहिजेत. जी व्यवस्था दोन व्यक्तींना पसंतीच्या आधारावर विवाहास मनाई करते ती एक नकारात्मक व्यवस्था होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुन्हा उद्धृत करावासा वाटतो उरीींश ीूीींशा ळी पशसरींर्ळींश ींहळपस. खीं ाशीशश्रू िेहीळलळींी लशश्रेपसपळपस ींे वळषषशीशपीं लरीींशी षीेा ळपींशीारीीूळपस आंतरजातीय विवाह जात नष्ट करण्याचा रामबाण उपाय नव्हे हे खरे, पण तो प्रभावी उपाय मात्र जरूर आहे. मी स्वत: या उपायाकडे गंभीरपण पाहिले व या विषयीच्या माझ्या कामाची दिशा मी ठरवून टाकली. याबाबतीत माझे प्रेरणास्थान डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत.
मी माझ्या स्वत:च्या विवाहाच्या वेळेस जात मोडीत काढून माझ्यापेक्षा वेगळया जातीच्या पाटील (कुणबी-मराठा) मुलाशी विवाहबद्ध झाले. या घटनेने संपूर्ण नागपूर जिल्हा ढवळून निघाला, कारण ग्राम व्यवस्थेत आजही जात किती अडीगपणे टिकून आहे, हे रोज जाणवते. दि. १७ एप्रिल १९६२ रोजी आमचा विवाह वाजत गाजत झाला. दोन्ही जातींचे लोक अर्थातच भयंकर चिडलेले होते, बरेच शिव्याशाप झाले, बहिष्कार टाकला गेला, कारण हे लग्न आव्हानात्मक वाटले कित्येकांना, तर काहीना गंमतजंमत वाटली, कारण असली लग्नं टिकत नसतात, `येतील वर्षभरात प्रत्येक जण आपापल्या घरात, अरे, यांना मुले झाली तर लग्न कोण करणार त्यांच्याशी मग गयावया करतीलच ना जातीत घ्या म्हणण्यासाठी. मुलीने प्रेशर आणले असेल, भानगडी झाल्या असतील,' एक ना अनेक ! किती ताळतंत्र नसलेल्या गप्पांची कोळीष्टके, विचार केला तर अडकून जावं, असो या लग्नावर लिहिणे अजूनही बाकी आहे, भारतीय समाजाच्या वास्तवाचा एक अद्भुत दस्तावेज ठरावा. पण काही आमच्या वयाचे तरुण मात्र विचार करू लागले होते. विरोधाला सामोरे जाऊन जर यांनी हे क्रांतिकारक पाऊल उचलले तर आपण का भ्यावे? आमच्या लग्नानंतर ६ महिन्यांनी (६२ ची घटना) एक तरुण जातीने सोनार, आमच्याकडे आला, तो मोतीराम पावडेच्याच गावाकडचा, नरखेडचा, भारत सेवक समाज संस्थेचा सदस्य, आपली प्रेमकहाणी सांगता झाला, मुलगी शिक्षिका, उत्तरप्रदेशीय ठाकूर जमातीच्या पोलीस इन्स्पेक्टरची होती. बाप हातकड्या घालण्याची कोशीश करत होता. मोतीराम पावडेंना भेटून इन्स्पेक्टर बापाने
सांगितलेले (मुलगी बी.एस्सी. असल्यामुळे यांच्याच शाळेत गणित शिक्षिका होती) की `कानपूरसे गुंडे लाऊंगा और कब कत्ल होगा पता भी नही चलेगा', काहीही मागमूस राहणार नाही. त्यामुळे त्याच्या प्रेमकहाणीत तथ्य असल्याचे आमच्या लक्षात आले. एवढेच नव्हे तर शाळेतील मुख्याध्यापकांनी ही गणितशिक्षिका दोन महिन्यांपासून शाळेत येत नसल्याचे साहेबांना कळवले होते. या तरुणाला मदत कशी करावी हा आमच्यापुढे पेचच होता. मग योजना आखली गेली. त्या योजनेनुसार मोतीराम पावडे शिक्षिकेचा पगार घेऊन (दोन महिन्यांचा, आई सतत तगादा लावत असल्यामुळे) तिच्या नागपूरच्या घरी (टेकडीलाईन, बर्डी) गेले. मुलीला पालकांनी वरच्या धाब्यावर खोलीत कोेंडून ठेवलेले होते. पावडेसाहेबांना पेबुकावर शिक्षिकेची सही घेणे भाग होते म्हणून शिडी लावली गेली, साहेब वर गेले, मुलगी पगाराचे पैसे (मुद्दाम एकेकच्या नोटा नेलेल्या) मोजत होती. यांनी हळूच चिठ्ठी मुलीसमोर सरकावली, `तो शीशमहल हॉटेलमध्ये वाट बघतो, तू तेथे जा, पुढची व्यवस्था करून ठेवलेली आहे.' मुलीने वाचले व ह्यांचेकडे पाहिले, हे जोरात बोलले `बाई, जरा प्यायला पाणी आणा.' ती संकेत समजली आणि तेथून सरळ गल्ल्यागल्ल्यातून लपतछपत जवळच असलेल्या शीशमहल हॉटेलला आली. पाणी अजून कसे येत नाही म्हणून पैसे घेऊन आई खाली उतरली व ओरडली, `भागी रे बा!' हेही आवाज ऐकून खाली उतरले, घरात कोलाहल होता. हे मुकाट्याने तेथून सटकले व रिक्षाने घरी आले. टॅक्सीची व्यवस्था अगोदरच केलेली होती आणि राष्ट्न्संत तुकडोजी महाराजांशी मोझरीला बोलणेदेखील. हॉटेलातून सरळ टॅक्सी अमरावती मार्गाला लागली, तिच्या आईवडिलांना आमचा संशय. दोघांनीही येऊन आमचे घर खोली न खोली तपासून घेतले, दोन तासांनी मोझरीवरून महाराजांचा फोन आला, सुखरूप जोडपे पोहोचल्याचा, पुढे महाराजांनी त्यांचा विवाह लावून दिला व तिला आश्रमाच्या गणित शिक्षिका म्हणून नेमले. आज महाराज हयात नाहीत पण त्यांची आठवण मनात जिवंत आहे. ६ महिन्यांपूर्वीच जून १९६२ रोजी माझी नेमणूक अमरावतीच्या शासकीय विदर्भ महाविद्यालयात झालेली होती, संस्कृत सहप्राध्यापक म्हणून. मोझरीला आम्हा उभयतांचे जाणे येणे होते, कारण महाराजांचे पुरोगामित्व व राष्ट्नीय एकात्मतेसाठी केलेला प्रयत्न आम्ही त्यांच्या भजनांद्वारे जाणून होतो. `या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वर चि असा दें, महाराजांना आमच्या कामाबद्दल व आमच्याबद्दल एक आदरमिश्रित कौतुक होते; कारण भारत एक होण्यासाठी जातिधर्म मोडीत काढले पाहिजेत ही त्यांची प्रामाणिक धारणा होती. या कामाची प्रेरणा डॉ. आंबेडकर होते. पण या पहिल्या अनुभवात राष्ट्न्संत पाठीशी होते.
या प्रसंगानंतर अनेक जीवघेणे प्रसंग आंतरजातीय विवाह करून देताना आले. जवळ जवळ ३५० च्या दरम्यान विवाह घडवून आणलेले. या देशात विवाहाच्या संदर्भात जातव्यवस्था किती खोलवर मूळ रुजवून बसतेय व प्रत्यक्ष जन्मदातेदेखील अपत्यांच्या जीवावर जातीमुळे कसे उठतात. सर्व बाबतीत अपत्यांच्या सुखाचा विचार करणारे मायबाप याच विषयी नरराक्षस का बनतात हा अभ्यासाचा विषय ठरावा. आजही असे जीवघेणे प्रसंग आंतरजातीय विवाहेच्छुकांवर घडताना आपण प्रत्यक्ष दूरदर्शनच्या माध्यमातून पाहतो.
१९६३ नंतर हे काम मंदगतीने चाललेले होते, नवी नवी नोकरी तीही अनोळखी शहरात. कामाच्या व्यापामुळे पतीचे नागपुरात व त्यांच्या गाव परिसरात राहणे इ. कारणे. १९६५ ला नागपूरला नागपूर महाविद्यालयात बदली झाली. एकदाचे बस्तान बसल्यावर पुन्हा
माझ्या सामाजिक कार्याकडे वळले. कॉलेजेस व सार्वजनिक सभांमधून तरुणांसाठी मी या विषयावर बोलतच होते, तरुणांनी हाक दिली की मदतीला जायचे, बरेचदा कायदेशीर मदतही लागत असे. वकिलांना तयार ठेवावे लागे. १९६७ साली पावडेसाहेब जिल्हा परिषदेवर निवडून आले त्यांचा एक नाईट स्कूलचा विद्यार्थी व जि.प. उपाध्यक्षाचा पी.ए. असलेल्या पिल्लेवारचे (जो पुढे आमच्या संस्थेचा सेक्रेटरी झाला) अत्यंत चित्तथरारक पद्धतीने लग्न झाले. त्याची बायको कोष्टी व तो स्वत: मांगबुरड जातीचा. मुलीकडचे लोक फक्त शस्त्राची भाषा जाणत होते, या लग्नात माझी स्वत:ची शासकीय नोकरी गमावण्याची वेळ आली होती. ही घटना मला वाटते कोठेतरी शब्दांकित करून छापली गेली असावी. साधारणत: हे विवाह मंगलकार्यालयात होत असत, विशेषत: आर्य समाज मंदिर मंगल कार्यलयात. आम्ही वर-वधूचे कायद्यात बसणारे वय बघत होतो. (डॉक्युमेंट्स) मुलीवर कोणत्याही प्रकारचा दबाव तर नाही ना व यांचे प्रेम वर्षाच्या आतले कच्चे तर नाही ना याची खात्री करून घेत होतो, कारण बहुतेक हे विवाह प्रेमविवाहच असत. वास्तविक नोंदणी पद्धतीने हे विवाह व्हावेत असे आम्हांला वाटे, परंतु या कार्यालयाच्या एकूण कायदेशीर पद्धतीच्या विलंबामुळे ते विवाह मोडण्याची शक्यता जास्त बळावत होती. म्हणून तोही प्रयत्न सोडून दिला. आमची संस्था आतापर्यंत रजिस्टर्ड झालेली नव्हती. १९८४ च्या दरम्यान पुण्याचे निवृत्त नोंदणी अधिकारी नागपूरला आले, त्यांनी आंतरजातीय विवाहितांची राष्ट्नीय संघटना रजिस्टर्ड करून घेतलेली. त्यांनी माझ्या या विषयावरच्या काही कथा वाचलेल्या, त्यांनी गळ घातली. या संस्थेद्वारे मी विवाह नोंदवत जावे. मी मान्य केले. मग कामाला वेग आला. १९८० ते १९९० या दहा वर्षांत बऱ्याच केसेस येत होत्या आणि त्याबरोबर संकटं देखील. सर्वच अनुभव लिहिले तर एक स्वतंत्र ग्रंथ व्हावा. कायद्याच्या किचकटपणामुळे हे धाडस करता येत नव्हतं, म्हणून हिंदू किंवा बौद्ध विवाहपद्धतीने हे विवाह करत होतो. अशीच एक केस आली १९८०-८१ च्या दरम्यानचा काळ. मध्यप्रदेशातील सीवनी या शहरातून एक जोडपे लपतछपत नागपूरला आले. सोबत छोटी ६ वर्षांची मुलगी. त्यांना कोणीतरी आमच्या कामाबद्दल सांगितलेले. वर - हिंदू यादव, नोकरी सबइंजिनीअरची, वधू- मुस्लिम घटस्फोटित, ६ वर्षांची मुलगी असलेली. यादवच्याकडे घरगुती कामे करणारी. लोक दोघांबद्दल टीका करू लागले. मुलाने ठरवले हिच्यावर टीका थांबवण्यासाठी पत्नीचा दर्जा द्यावा, हिच्याशी लग्न करावे, पण या लग्नाने जातीय दंगल उसळेल म्हणून नागपूरला आले, मुलीचे नातेवाईक नागपुरातही त्यांच्या मागावर होतेच. हे लग्न आम्हांला अत्यंत गुप्तता राखून करावे लागले. विवाहासाठी मुलीचे हिंदुकरण होणे गरजेचे होते म्हणून नागपुरातील प्रसिद्ध शास्त्री बोलावून, मंगल कार्यालयाची दारे बंद करून हे लग्न लावावे लागले, नाहीतर नागपुरातही दंगल उसळायला काही वेळ लागला नसता. धार्मिक विवाहविधीशिवाय असा तात्काळ विवाह करून देण्याला पर्याय नसतो म्हणून मनात नसूनही धार्मिक विधींचाच आधार घ्यावा लागतो आणि धर्म जेथे दखल देतो तेव्हा धार्मिक दंगली या उसळतातच ना, असाच विरोध हिंदू धर्मातीलच दलित-सवर्ण विवाहात जाणवतो. तसेच कोणत्याही दोन जाती हिंदूतीलच विवाहाच्या निमित्ताने एकत्र आल्या तरी कुटुंबीय व सामाजिक असंतोषाचा भडका उडाला म्हणून समजावे. एवढे मात्र खरे की ६५ वयात तर अशा विवाहात जी धावपळ करावी लागते ती जमत नाही, त्यामुळे अलीकडे कन्सल्टेशनचे काम स्वीकारले. या ज्या आंतरजातीय विवाहाच्या अुनभवातून जी काही सामाजिक तथ्ये समोर येतात त्यांचे विश्लेषणात्मक रीतीने निष्कर्ष मांडणे मला आवश्यक वाटते.
१. संपूर्ण व्यवस्था (समाज) भारतात जातप्रधान आहे विशेषत: विवाहसंस्थेत हा घटक अतिशय महत्त्वाचा असतो. सजातीय विवाहाची सर्वत्र सक्तीच धर्माचा आधार घेऊन केलेली असते, जागोजागी वरवधूसाठी निर्बंध घातलेले असतात, त्यासाठी जात, उपजात, शाखा, कुलदैवत इत्यादी बारीकसारीक तपशिलासह जात सांभाळली जाते.
२. उच्चजाती विशेषत: ब्राह्मण आपले जातीवर्चस्व अधिक जपून ठेवताना दिसतात. एक दोन अपवाद वगळता ब्राह्मण जातीय वर-वधू इतर जातीच्या जोडीदाराच्या निवडीत कमी पडतात असे दिसून आले. खरं तर शिक्षण व प्रगल्भ जाणिवांचा धनी असलेली ही जात विवाहाच्या बाबतीत अत्यंत पारंपरिक पद्धतीने जात्याभिमान जपताना दिसते. गंमतशीर गोष्ट म्हणजे ब्राह्मण कम्युनिस्ट माणूस मुलगी देताना वर हा ब्राह्मण कम्युनिस्ट असेल याची दक्षता बाळगताना दिसतो. ब्राह्मण वर्गाच्या अन्य जातीदेखील अंधानुकरण करतात हे उल्लेखनीय होय.
३. बहुजनातील मध्यम जाती विवाहाच्या बाबतीत जात्याभिमानाने अती आंधळया असतात. मराठा पाटील, देशमुख कुणबी ही महाराष्ट्नतील संख्येने, सत्तेने (सर्वच प्रकारची सत्ता) मातब्बर असलेली जात, विवाहाच्या बाबतीत अत्यंत कडवी दिसते. आपल्या अपत्याने खालच्या जातीचा जोडीदार निवडला तर त्या व्यक्तीच्याच नव्हे तर स्वत:च्या अपत्याचा देखील मृत्यू घडवून आणण्यास मागे पुढे पाहात नाही. विशेषत: दलित आदिवासी भटक्या जातीच्या व्यक्तीचा तसेच शेती व्यवसायाशी अधिकतर जुळलेला हा वर्ग शेती व्यवसायाशीच जुळलेल्या इतर जातींशी अतिशय हीन लेखून वागत असतो
४. प्रत्येक जात आपल्या जातीचे अस्तित्व व अभिमान कडवेपणे जपताना दिसते.
५. दलितदेखील ब्राह्मण किंवा मराठ्याशी मुलीने लग्न केले तर अत्यंत तीव्रपणे विरोध करतात, अगदी ठार मारण्याच्या धमकीपर्यंत. फक्त त्यांनी केलेला युक्तिवाद लक्षणीय ठरावा. `बाह्मण व मराठा देशमुख पाटलांनी आमच्यावर फार अत्याचार केले ते आम्हांला सोयरे नकोत.'

६. १९६५ ते १९८० पर्यंत साधारण मंदगतीने होणाऱ्या आंतरजातीय विवाहाची गती १९८० ते ९० बरीच वाढली, परंतु ९० नंतरच्या दशकात या गतीने बराच वेग घेतलेला दिसतो. शिक्षणात व उच्च नोकऱ्यांत झालेली प्रगती हे कारण असावे पण काही ठिकाणी तितकाच कडवा विरोध, अजूनही दोघेही उच्चपदस्थ असताना पालकांनी केलेला दिसतो. नोव्हेंबर २००५ मध्ये माझ्या एका नातेवाईकाला मुलीकडच्या लोकांनी विवाह निमंत्रण पत्रिकाच काढू दिल्या नव्हत्या कदाचित. उच्चपदस्थ मुलाचे नातेवाईक हे अशिक्षित दलित असावेत ही भीती वाटत असावी. मुलगी लखनौतील `बनिया' बापाची बेटी. बाप-बेटी दोन्ही उच्चपदस्थ, परंतु जातीचा इतका पगडा की लोकांना कळले तर आपल्याला बहिष्कृत करतील.
७. १९९० नंतर संगणकसंस्कृतीने या `नेटीझन' जोडप्यांना बरेच जवळ आणलेले दिसते परंतु, हे उच्चशिक्षितांमध्येच अधिक दिसते.
८. आजही आंतरजातीय विवाह हे बहुधा प्रेमविवाहच असतात, ठरवलेले दिसत नाहीत. फार पिचत उदाहरणे दिसतात. हजार बाराशेची लोकसंख्या असलेल्या काटोल तालुक्यातील पारडशिंगा गावातील एका फुलेवादी माळी शेतकऱ्याने आपली मुलगी सोनार मुलाला दिली आणि मला निमंत्रण दिलं. `आपण यायलाच हवं, मी अशिक्षित माणसाने फुले विचाराने हे लग्न ठरवले.' मला त्यादिवशी माझ्या कामाचं चीज झाल्यासारखे वाटले.
९. बौद्ध धर्माचा स्वीकार केलेली महार मंडळी (`महार' दलितातील एक जात) आंतरजातीय विवाहाच्या बाबतीत इतर जातीपेक्षा अग्रेसर दिसते. सवर्ण जोडीदाराची जशी निवड केली जाते तसेच आदिवासी, भटक्या जातीच्या व इतर मागासवर्गीय जोडीदार निवडून आंतरजातीय विवाह करतात. घरचा विरोध पत्करूनही हे विवाह तरुण तरुणी करतात. मला वाटते, हा फुले आंबेडकरवादी समता विचाराचा प्रभाव असावा. जोडीदार निवडीत बरोबरीचे शिक्षण व दिसणे यावर भर दिसतो.
१०. दु:ख याचे वाटते की, समतेच्या व पुरोगामित्वाचा डांगोरा पिटणारी सामाजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी, कोणत्याही जातीची असो, आंतरजातीय विवाहाच्या बाबतीत कितीही अघळपघळ बोलत असली तरी प्रत्यक्षात स्वत:च्या अपत्यांच्या बाबतीत मात्र पारंपरिकपणे जातीतल्याच जोडीदाराचा विचार करतात
या निष्कर्षातून हेच निष्पन्न होते की २१ व्या युगात संगणक संस्कृतीने आर्थिक विकासात लोकांना सामील करून घेतले परंतु आमची सामाजिक व्यवस्था मात्र माणसांचे खच्चीकरणच करते, जातीमुळे हिणवण्यापासून ते वास्तव बदलू शकले नाही तरीही माझ्यासारखी आशावादी स्त्री असे ठामपणे सांगते की जातीचे विवाहातील अस्तित्व येत्या २५ वर्षांत इतिहासजमा होईल. कदाचित नव्या पिढ्यांना नवल वाटेल, खरेच असे होते काय ?
- डॉ. कुमुद पावडे, नागपूर

प्रतिसाद

The content of this field is kept private and will not be shown publicly.
Type the characters you see in this picture. (verify using audio)
Type the characters you see in the picture above; if you can't read them, submit the form and a new image will be generated. Not case sensitive.