Skip to main content

प्रतिसादास उत्तर द्या

आम्ही माणसांची शेती करतो!

`तुम्ही नेरळची सगुणा बाग पाहिली आहे का हो ?' यंदा मे महिन्याच्या सुट्टीत कोणालाही हा प्रश्न विचारला, तर उत्तर बरेचदा होकारार्थी यायचं - तेही अभिप्रायासकट, `काय सुंदर ठिकाण आहे, शहरी धावपळीपासून लांब निवांतपणी राहायला मिळतं - हल्लीची फार्म हाऊसेस शहरीच होत चालली आहेत - पण इथे मात्र अस्सल शेतात राहायची मजा येते - नदीत डुंबत - पाण्यातलं घर -'
तर काहींच उत्तर होतं - `ऐकलंय खरं सगुणा बागेबद्दल. तिथे म्हणे अॅग्रो टूरिझमचा प्रकल्प आहे - असं आहे - तसं आहे....'
होय, सगुणा बागेत अगदी तस्संच आहे - जसं पाहिलं - ऐकलं आहे - तस्संच! नेरळ स्टेशनवर उतरल्यावर १५ मिनिटांत रिक्षाने आपण मालेगावमधल्या सगुणा बागेत पोहोचतो. दारात रिक्षा आवर्जून थांबवली जाते. एक घारी - गोरी - देखणी हसतमुख व्यक्ती समोर येते. `नमस्कार - मी शेखर भडसावळे. आणि ही माझी पत्नी अनुराधा'. आपण मागे बघतो. एक हसरा चेहरा, हातातलं काम ठेवून आपल्याला नमस्कार करतो. आपण पुढे जातो. मुक्कामावर थोडं विसावल्यावर ब्रेकफास्टच्या टेबलावर पुन्हा भडसावळे पति-पत्नी हजर. तसेच हसतमुख, फ्रेश ! गप्पा मारत ओळख करून देत - घेत ते आपल्यालाही कधी मोकळं करून टाकतात कळत नाही.
ब्रेकफास्टच्या टेबलावरच बकुळीचा सुगंध आपल्याला खुणावत असतो. आपण फुलं वेचायला जातो `आता या फुलांचा छानसा गजरा करा. त्यासाठी अंहं - सुई दोरा नको. समोर केळी आहे ना, तिचं सोपट काढून घ्या. त्यात ओवा फुलं - बघा कसा अगदी नॅचरल गजरा तयार होईल !' अनुराधाताई शेजारी उभं राहून आपल्याला सुचवतात. फुलं वेचताना - झोपाळयावर झोके घेताना - लॉनवर लोळताना - नदीकडे जाताना - पाँड हाऊसच्या व्हरांड्यात - इथे - तिथे अनुराधाताई आपल्याला अशाच भेटत राहतात. तेव्हा जाणवतं - याही अशाच नॅचरल - बकुळीच्या गजऱ्यासारख्या - इथल्या मातीशी एकरूप झालेल्या - ऋजु बोलणं - सौम्य हसणं - कापलेले केस - सुटसुटीत सलवार-कमीज अशी सोयीस्कर आधुनिक राहणी - आणि तरीही इथल्या निसर्गाचाच एक भाग होऊन राहिलेल्या
- १०० टक्के निसर्गकन्या !
खरं तर अंबरनाथसारख्या ठिकाणी त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. शिक्षण तिथेच. मायक्रोबायॉलॉजीमध्ये बी. एस्सी. करून त्यांनी एम. एस्सी. केलं ते बाय रिसर्च ! टाटा क्रॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटसारख्या मान्यवर संस्थेतून त्यांनी ही पदवी संपादन केली. आणि एकदम त्या शेतकरीच झाल्या ? ही काय जादू? `जादूच म्हणायची, पण `गोड' जादू आहे बरं का !' अनुराधाताई मोकळेपणाने सांगतात. `कॉलेजमधे जी मैत्रीण मिळाली. तिचा भाऊ मला इतका आवडला, की फारसा पुढचा मागचा विचार न करता, मी `हो' म्हणून टाकलं. शेखर भडसावळे शेतीच करणार आहेत - नव्हे ते त्यांचं निश्चित ध्येय आहे, हे माहीत असूनही मी लग्नाला तयार झाले!' अनुराधाताई कबुली देऊन टाकतात. `लग्नानंतर शहरी जीवन सोडून, शेतकऱ्याची पत्नी होऊन, इथे मालेगावला घरी आले खरी - पण घर कसलं ते ! नुसतं ओसाड माळरान - समोर जमीन आणि वर आकाश. लोकलची, दुकानांची, माणसांची गर्दीच गर्दी पाहायची सवय असलेल्या दृष्टीला माणूस म्हणून दिसायचा नाही - शेतकरीपणामुळे समाजाशीही संबंध तुटल्यासारखे झाले होते. एकटं वाटायचं कधी कधी - पण बाहेरचा हा रखरखीतपणा घराच्या उंबऱ्याच्या आत मात्र अजिबात नव्हता. घरात सासूबाई - सासऱ्यांची प्रेमाची सावली होती - मायेचा ओलावा होता. शेखर नुकतेच अमेरिकेहून फूड सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजीमधली डिग्री घेऊन परत आले होते - मायभूमीची आठवण ठेवून - तिच्या ओढीने. शेखरच्या वडिलांनी म्हणजेच हरिकाकांनी शेखरना अमेरिकेला जाताना एक पत्र दिलं होतं. आपल्या मातीचं ऋण फेडण्याची प्रेरणा त्या पत्राने शेखरना दिली. परदेशातही भारतीयांना फार कमी लेखतात, तुच्छतेने वागवतात हा अनुभव शेखरना आला होता. त्यामुळे शिक्षण घेऊन भारतात परत तर जायचंच, गेल्यावर शेतीच करायची, आणि परक्यांच्या अमेरिकत राहण्यापेक्षा आपल्या सगुणा बागेत अमेरिका निर्माण करायची - हा त्यांचा ठाम निर्धार होता.
- पण नक्की सुरुवात कुठून, कशी करायची ? घराची आर्थिक घडी बसवणंही जरुरीचं होतं. त्या दृष्टीने मी योगदान द्यायचं ठरवलं. माझ्याही शिक्षणाचा उपयोग झाला असता. कर्जतच्या ज्युनिअर कॉलेजमधे मला लेक्चररशिप मिळाली. शेखरने त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित केलं. उजाड-ओसाड माळरानावर त्यांनी ग्लिरीसीडिया म्हणजे `उंदीरमारी'ची झाडं प्रथम लावली. ही झाडं चांगली वाढली आणि शेतातल्या उंदरांचा सुळसुळाट कमी झाला. मग हळू हळू एक प्रकारची फळझाडं - इतर धान्यांची शेती सुरू झाली. आमचा आत्मविश्वास वाढला. १९८६ मध्ये एक तलाव बांधून त्यात आम्ही मत्स्यशेतीचा प्रयोग केला. तो आर्थिकदृष्ट्या चांगला यशस्वी झाला. आमच्या शेतात साप खूप निघायचे. शेखर ते पकडून हाफेकन इन्स्टिट्यूटला द्यायचे. पण हळूहळू त्याची यातायातच जास्त आणि पैसे कमी अशी वेळ आली. एक दिवस शेखरने मला विचारलं, `हे साप आपणच ठेवू या का ?' आता साप आणि पाळायचे ? मी धसकलेच ! घरात लहान मुलं होती. पण तरीही मी शेखरना `नाही' म्हणून कधीच नाउमेद केलं नाही. तेव्हापासून सर्पराजांचा मुक्काम इथल्या एका शेडमध्ये ! या शेतात पकडलेल्या सापांचे डेमॉन्स्ट्न्ेशन आम्ही पुढे पाहुण्यांना द्यायला लागलो.
अनुराधाताइंर्चं कुटुंब एव्हाना पंचकोनी झालं होतं. जबाबदारी वाढली होती. कॉलेज म्हणजे वाहतुकीची समस्या - शेतीत मदत म्हणजे तर श्रीगणेशाच - घरची जबाबदारी आणि मुख्य म्हणजे मुलांची जबाबदारी. खेड्यातल्या वातावरणामधे मुलांना वाढवणं, शिकवणं हे एक आव्हानच होतं. पण मुलांच्या बाबतीत अतिशय पक्की वैचारिक बैठक असलेल्या अनुराधाताई सांगतात, `मुलं तर तशी मोठी होतच असतात. पण वेळच्या वेळी त्यांची विचारशक्ती विकसित करणं, तिला योग्य वळण देणं, मुलांची निर्णयक्षमता वाढवणं, शिस्त लावणं या गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं की पुढच्या जीवनात मुलं आत्मविश्वासाने सगळया गोष्टींना तोंड देऊ शकतात. आणि हेच खरं शिक्षण असं मला वाटतं. आर्थिक चणचण त्यावेळी बरीच होती. तरीही आम्ही मुलांना माझ्या नणंदेकडे केनियाला पाठवलं. त्यांची दृष्टी विशाल होण्यासाठी केलेली ती इन्व्हेस्टमेंटच होती. झाडांची नाही का वेळच्या वेळी खतपाणी घालणं, कुंपण घालणं, छाटणी करणं अशी मशागत करावीच लागते तरच ती निरोगीपणे बहरतात !'
जिद्दीने आणि निष्ठेने केलेल्या प्रयत्नांना यश येतंच. दोघांचे प्रयत्न, अथक कष्ट बघून, आजवर ओसाड वाटणाऱ्या जमिनीने आपल्या पोटातल्या मायेचा वर्षाव या कुटुंबावर केला. शेती - झाडेझुडपे - वृक्षराजी बहरायला लागली. परिसर हिरवा हिरवा होऊ लागला. आणि आजूबाजूच्या लोकांचं लक्ष वेधलं गेलं. साप बघण्यासाठी, त्यांची माहिती करून घेण्याच्या निमित्ताने माणसे यायला लागली. मग त्यांचं चहा-पाणी हे ओघाने आलंच. लोकांना हे आवडत होतं - वेगळं वाटत होतं. रोजच्या धावपळीच्या जीवनात, थोडा वेळ शांतपणे निसर्गाच्या सान्निध्यात घालवावेसे वाटण्याची लोकांची गरज आणि आमची प्रतिष्ठेची गरज यांची सांगड घातली - आणि त्या क्षणी, मला वाटतं, `अॅग्रो टूरिझम' म्हणजेच कृषी पर्यटनाचं बीज आमच्या मनात पडलं ! अनुराधाताई सांगतात मग त्यावर घरात चर्चा झाली. सर्व बाजूंनी विचार करून, या कल्पनेला व्यावसायिक स्वरूप द्यावं असं ठरलं. मला जमेल तशी शेतीत मदत मी करत होतेच. आता या प्रकल्पाची पूर्ण जबाबदारी घेण्याच्या दृष्टीने विचार सुरू झाला.
अनुराधाताई त्यावेळची परिस्थिती सांगतात. ३० वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. त्या काळात आजच्यासारख्या प्रवासाच्या, रस्त्यांच्या
सोयीसुविधा नव्हत्या. खरं तर कुठल्याच सोयी नव्हत्या. लोकांची प्रवृत्तीही वेगळी होती. बाहेरची - शहरातली - लोकं मुद्दाम उठून `शेतावर' येतील का, ही शंका होती. आणि आम्हांला तर `फार्म हाऊस' करायचं नव्हतं. `कृषी पर्यटन' हीच स्पष्ट कल्पना आमच्या डोळयांपुढे होती. लोकांनी शेतावर म्हणूनच यावं, शेतीचा, शेतकऱ्याच्या जीवनाचा थोडा जवळून अनुभव घ्यावा, निखळ निसर्गाच्या जवळ जाण्याचा आनंद लुटावा, असं आम्हांला वाटत होतं.
मग कामाला निश्चित दिशा लागली. जे काही करायचं, ते पर्यटकांना सोयीचं - आनंदाचं व्हायला हवंच, पण त्याची साधन-सामुग्रीही इथलीच - याच जमिनीतली असावी असा त्यांचा आग्रह. लोकांसाठी राहण्याच्या खोल्या बांधल्या - त्याही चार झाडांमध्ये `इंटर क्रॉप' असावं अशा. बऱ्याच मोठ्या जमिनीवर बांबूची झाडं होती. त्यांची दाट सावली असायची. त्या सावलीखाली जेवणाची व्यवस्था केली. बांबूचीच टेबलं, खुर्च्या बनल्या. मोकळया हवेत - दाट सावलीत चहा, ब्रेकफास्ट, जेवण घ्यायला पर्यटकांना आल्हाददायक आणि खूप वेगळं वाटतं. खोल्यांबरोबरच कॉटेज आल्या. शेतावर राहायचं, तर झोपडीत राहायची खरी मजा. पण सर्वात गंमत वाटते ती `पाँड हाऊस'ची. ही कल्पना खरोखरच अफलातून आहे ! शेतातल्या तलावात पिलर्स टाकून त्यावर शेतातल्याच लाकडांनी भर पाण्यात केलेली अतिशय सुबक बांधणी - थेट काश्मीरमधल्या हाऊसबोटची आठवण करून देते. त्यातला व्हरांडा, झोपाळे, खुर्च्यांवर बसून समोरच्या पाण्यातल्या बदकांना आरामात खायला घालणं हा एक मस्त अनुभव असतो. शेजारीच स्वत: पॅडल मारत करायच्या बोटींगची सोय, सुरक्षित, पण दमछाक होतानाही मजा आणणारी ! गोड्या पाण्यातल्या माशांचा तलाव, भरपूर फुलझाडं, लॉन्स. गावच्या उल्हास नदीचा इथल्या पर्यटनाच्या आनंदात मोठा वाटा आहे. नदीचा - नदीच्या वाहत्या पाण्याचा फार खुबीने वापर करून घेतला आहे. इथल्या मुक्कामात नदीवर जाणं हा एक महत्त्वाचा कार्यक्रम असतो. माणसांनी बांधलेल्या तलावात पोहणं वेगळं आणि नदीच्या वाहत्या पाण्यात `डुंबणं' वेगळं ! तलाव कितीही आधुनिक - सुंदर असू शकतो - पण खुल्या आकाशाखाली स्वच्छ वाहत्या पाण्याची `ओढ' अनुभवणं काही औरच चीज असते ! नाहीच जमलं, तर घ्या डब्ल्यू. बी. राईड ! म्हणजे `वॉटर बफेलो राईड !' चक्क म्हशीच्या पाठीवर स्वार होऊन पाण्यातून मारलेला फेरफटका ! संध्याकाळी गोबर गॅस प्लांट बघा, गाई-म्हशींच्या जवळ जायची हिंमत करून बघा, जमलं तर दूधही काढा ! धान्यांची, भाज्यांची, शेती, फळझाडं - फुलं - सगळं आपल्याबरोबर हिंडून दाखवलं जातं. त्यातल्या खाचाखोचा उलगडून सांगितल्या जातात. अनुराधाताई उत्साहाने - आपल्याबरोबर हिंडतात, आपल्या प्रश्नांना उत्तरं देतात. दमल्यावर गरमागरम जेवण. जेवण - ब्रेकफास्ट चविष्ट तर असणारच. कारण भाज्या - फळं - कडधान्यं सगळं इथल्याच मातीत पिकलेलं असतं - ताजं ताजं आपल्या ताटात आलेलं असतं. मन तृप्त होऊन जातं. हिंडताना तळं दिसल्यावर आपल्या तोंडून जातं - `काय सुंदर कमळं !' `ही कमळं नाहीत, याला म्हणतात कुमुद !' अनुराधाताई नेमका फरक स्पष्ट करतात. सगळा इथला अनुभव घेतल्यावर आपलाही नेमका फरक स्पष्ट होतो - हे फार्म हाऊस नाही - रिसॉर्ट नाही - हे आहे खरंखुरं कृषी पर्यटन !
`आज जे सगळं दिसतं आहे. ते सगळं एकदम तर होणं शक्य नव्हतं. हळूहळू मांड मांडत - नवीन कल्पना राबवत अडीअडचणींना तोंड देत - ३० वर्षांत सगुणा बाग इथपर्यंत आली आहे. आता `माऊथ पब्लिसिटी'मुळे लोकांना सगुणा बागेबद्दल माहिती झाली आहे. सगळयाच सीझनमधील पर्यटकांचा प्रतिसाद वाढला आहे. कारण प्रत्येक सीझनची मजा वेगळी, निसर्ग वेगळा, अनुभव वेगळा असतो ! डॉ. पाटील म्हणून एकांनी अस्ट्न्ेिलॉयातील
कृषी पर्यटनावरचं एक पुस्तक आम्हांला पाठवलं आणि ते वाचल्यावर, आश्चर्य म्हणजे लक्षात आलं की, पुस्तकात जे जे काही दिलं आहे, ते सगळं आम्ही इथे अंमलात आणतो आहोतच ! हा एक वेगळाच अनुभव होता. अनुराधाताई म्हणतात `आज आम्हांला कृषी पर्यटनाच्या मूलभूत कामामुळे या क्षेत्रात मानाचं, आदराचं स्थान आहे. आम्ही या विषयावर एक पुस्तकही लिहिलं आहे. सगुणा बागे संबंधित प्रत्येक बाबतीत आम्ही दोघं आणि घरातली मिळून चर्चा करतो, सगळयांची मतं समजावून घेतो आणि मगच निर्णय घेतो.'
आपल्या सासूबाई आणि सासरे यांच्याबद्दल अनुराधाताई फार आदराने भरभरून बोलतात `दोघंही अत्यंत प्रेमळ, समजून घेणारे आणि समजावून देणारे. त्यांच्याकडून मी खूप शिकले. सासऱ्यांना समाजकार्याची आवड होती. आदिवासी लोकांसाठी केलेल्या कामाबद्दल त्यांना `रायगड मित्र' हा पुरस्कार मिळाला होता. `आपला वेळ आणि पैसा या दोन्हीमधला वाटा समाजासाठी काढलाच पाहिजे' असं त्यांचं जीवनाचं सूत्र होतं. घराच्या दारातल्या चपलांच्या रांगेवरून घराची श्रीमंती - शोभा वाढते असं ते म्हणत असत.
हे आल्या-गेल्याचं, माणसं जोडणारं घर अनुराधाताइंर्नी आपलं मानलं - मनापासून. पतीच्या आवडीची जीवनशैली स्वीकारली. खरं तर उज्ज्वल शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या अनुराधाताइंर्ना एम्. एस्सी., पीएच. डी., परदेशवारी - व वास्तव्य असा प्रवास अशक्य नव्हता. पण हा मोह त्यांना कधी पडला नाही. केवळ आपल्या मनाचा कौल स्वीकारून त्यांनी या आयुष्यात आपलं व्यक्तिमत्त्व ओतलं. खरोखर इतकं सोपं असतं का हे ? अनुराधाताई भेटल्या नसत्या, तर कदाचित विश्वास बसला नसता ! पण त्या मात्र सहजपणे सांगतात, `एकदा तुम्ही ठरवलं, मनापासून एखाद्याला आपलं मानलं, की हे सगळं `आतून' येतं, त्यासाठी वेगळा असा प्रयत्न करावा लागत नाही. त्यातून झाडांची, झुळझुळणाऱ्या पाण्याची लहानपणापासून मला आवड होती. अर्थात तरीही झाडं - माती - पाणी - जमीन हेच आपलं आयुष्याचं सर्वस्व होईल, अशी त्यावेळी कल्पना आली नाही !'
आज अनुराधाताइंर्ना शहराला दुरावल्याचं दु:ख नाही, शहरी हाय-फाय गोष्टींचं आकर्षण नाही. टीव्हीवर कोणत्या मालिकेत कोणती कथा कशी फुलतेय यापेक्षा त्यांना अनेक प्रकारचे बांबू, भाजीपाला, फळं, फुलं आपल्या शेतात फुलवण्यात जास्त रस आहे ! शहरात राहून घड्याळाच्या काट्यांची चिंता करण्यापेक्षा, पर्यटकांचा विचार करणं, त्यांना अधिकाधिक सुविधा, विविध प्रकल्पांची माहिती आणि जास्तीत जास्त मौज - मजा कशी देता येईल, याचा विचार करणं जास्त क्रिएटिव्ह आहे. त्यासाठी नवीन नवीन कल्पना प्रत्यक्षात उतरवणं नावीन्याचा वेध घेत राहणं, संग्रह करणं, वाचन करणं सगळ आलंय. या सगळयाचा आविष्कार अनुराधाताइंर्च्या छोट्या छोट्या गोष्टींतून प्रत्ययाला येतो. छोटंसं बांबूचं साऊंड ऑफ म्युझिक, खोल्यांबाहेर लावलेल्या बांबूच्या छोट्या छोट्या बॉक्समधून ते बांबूच्या आरामखुर्चीपर्यंत बांबूचा इतका सुंदर उपयोग कुठे पाहायला मिळणार नाही. पाँड हाऊसमधलं वारली पेंटिंग असो, वा लाकडाच्या नैसर्गिक आकारातून बनवलेली तिथली डायनिंग टेबलं, अनुराधाताइंर्च्या सौंदर्यदृष्टीची सहजपणे साक्ष देतात. सजावट असली, तरी ती साधी, मनाला, नजरेला सुखावणारी, आपुलकी निर्माण करणारी अशीच !
`झाडांना हात लावू नये', `फुले झाडावरच अधिक सुंदर दिसतात', किंवा `कचरा साठविणे म्हणजे पर्यावरण बिघडविणे' अशा प्रकारच्या तुटक, खवचट पाट्या इथे कुठेही नाहीत. `एक तर असं अप्रत्यक्षपणे का होईना, पण पर्यटकांना दुखवणं आम्हांला मान्य नाही, आणि दुसरं म्हणजे आपणच थोडा विश्वास टाकला, आपल्या वागण्यातून तसं जाणवून दिलं, की पर्यटक आपणहून अधिक जबाबदारीने वागतात !' अनुराधाताई त्यांच्या मॅनेजमेंट स्किलची एक खुबी सांगून जातात.
खरोखर हा सगळा व्याप मॅनेज करणं ही एक तारेवरची कसरतच म्हणायला हवी. सकाळच्या चहापासून रात्रीच्या शेकोटीपर्यंत सर्व बाबींकडे बारकाईने लक्ष ठेवणं हे एकट्या - दुकट्याचं काम नसलं, तरी सहकाऱ्यांनाही संभाळून घ्यावंच लागतं. आमच्या उत्पन्नापैकी ६० टक्के भाग पगारावर खर्च होतो. कामगारांची राहण्याची सोय, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय, आजारपणं, इतर घरगुती बाबी बघाव्या लागतात. आणि दुसरीकडे पर्यटक ! मुख्य परीक्षा असते ती शेतावरच्या दिवसाच्या वेळा संभाळण्याची. पर्यटकांना सकाळच्या चहापासून प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी द्यावीच लागते. आणि त्यासाठी खूप आधीपासून नियोजन करावं लागतं. कामांचा क्रम लावावा लागतो. बाजारहाट, साठवणूक, सीझनप्रमाणे पर्यटकांच्या कार्यक्रमात करायचे बदल, त्यांच्या बदलत्या गरजा सगळयाचं भान ठेवावं लागतं. शेखरना मधून मधून बाहेरगावी जावं लागतं. त्यावेळी महत्त्वाच्या बाबतीत एकटीने निर्णयही घ्यावे लागतात. कधी अपघात होतात - चोरी होते - उद्धट, उर्मट, बेशिस्त पर्यटकांना तोंड द्यावं लागतं -'
` - पण तरीही हे सगळं करण्यात भरपूर आनंद आहे.
आंतरिक समाधान आहे. रोज नवीन काहीतरी शिकायला मिळतं - रोज नवीन काहीतरी सुचतं. हातून काहीतरी नवीन घडल्याचा आनंद मिळतो. कृषी पर्यटनाने आम्हांला खूप काही दिलं. मुख्य म्हणजे प्रतिष्ठा दिली. या व्यवसायामुळे एका शेतकरी कुटुंबाची समाजात प्रतिष्ठा वाढली. नवीन काहीतरी यशस्वीपणे करून दाखवणारे म्हणून आदर मिळाला, मानसन्मान मिळाला. पैसाही मिळाला - पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे माणसं जोडण्याची संधी मिळाली. आज मोठमोठे सरकारी - इतर अधिकारी, शाळा कॉलेजचे विद्यार्थी, मानसिकदृष्ट्या विकलांग असणारी मुले आणि सर्वसामान्य माणसे - समाजातील सर्व स्तरातील लोकं इथे सहलीसाठी येतात. मनापासून एन्जॉय करतात. काहीतरी खास वेगळं मिळाल्याचा अनुभव घेऊन परततात. त्यात आम्हांला खूप समाधान मिळतं. कारण इथे येणारा प्रत्येकजण जाताना `आनंदाने गेला पाहिजे' हे आमचं सूत्र आहे. पुन्हा इथे यायची इच्छा त्याच्या मनात रेंगाळली पाहिजे. `कृषी पर्यटन' म्हणताना, खरं म्हणजे `माणसांची शेती करतो'. आम्ही `थश लीेि शिेश्रिश !' शेती आणि पर्यटनाचा अनोखा संगम त्यामुळे साधला जातो.
`काही कटू अनुभव येतात - संकटंही येतात. ती येणारच. आमच्याच शेतावर झालेली ढगफुटी वा वीज पडण्याचा प्रसंग आज आठवला तरी अंगावर काटा येतो. पण -'
`पण खचून जाणं त्या दोघांना माहीतच नाही.' अनुराधाताइंर्ची कॉलेजमधली मैत्रीण - कम - नणंद मधेच बोलते. `कोणत्याही प्रसंगाला शांत डोक्याने आणि घट्ट मनाने सामोरं जातानाच मी त्यांना पाहिलं आहे. अहो, एखादी असती तर पळून गेली असती- पण भीतीचे, पळ काढण्याचे संस्कारच नाहीत. तिच्या अपार-अफाट कष्टांची तर मी साक्षीदार आहे.'
`२६ जुलैचा पाऊस. आलेल्या पुराच्या पाण्यामुळे सगळया शेतांवर रेतीच रेती पसरली. पण दोघेही डगमगली नाहीत. शेखर तर `ग्रीन फिंगर्स' घेऊनच जन्माला आलाय जणू, पण अनुराधाची सळसळत्या हिरव्या मनाची साथ असल्यावर शेतं पुन्हा हिरवी हिरवी होऊन जायला वेळ लागलाच नाही !
आज मुलींची शिक्षण झाली आहेत. एकीचा विवाहही झाला आहे. मुलगा परदेशातून शिक्षण घेऊन परतला आहे. व्यवसाय स्थिरावतो आहे - एकूणच स्थैर्य स्वस्थपणा आला आहे. पण अनुराधाताई थांबलेल्या नाहीत. त्याच उमेदीने रोज नव्या उत्साहाने - नवीन कल्पनांसह काम करत आहेत. आणि त्याचा परिणाम म्हणूनच की काय, अगदीच `कोरडवाहू' असलेले शहरी पर्यटक इथून - सगुणा बागेतून परतताना `बागायती' शेतासारखे टवटवीत, फ्रेश होऊन परतत आहेत !
- अवंती महाजन, मुंबई

प्रतिसाद

The content of this field is kept private and will not be shown publicly.
Type the characters you see in this picture. (verify using audio)
Type the characters you see in the picture above; if you can't read them, submit the form and a new image will be generated. Not case sensitive.