Skip to main content

प्रतिसादास उत्तर द्या

कहाणी- एका संघर्षाची

देशमुख आणि कंपनी हे प्रकाशन व्यवसायातलं एक महत्त्वाचं नाव आहे. या प्रकाशनानं अनेक चढउतार बघितले, ते पारही केले. यात श्री. रा. ज. देशमुख यांचा वाटा मोठा होता हे अनेकांना माहीतच आहे; पण त्यांच्या हयातीत त्यांच्या बरोबरीनं आणि त्यांच्या निधनानंतर, त्यांच्या पत्नी सुलोचनाबाई यांनी पेललेल्या गोवर्धनाची सगळयांनाच माहिती असेल असं नाही. या महिन्यात सुलोचनाबाइंर्चा स्मृतिदिन आहे. त्या निमित्तानं त्यांची आठवण उजळणं औचित्यपूर्ण ठरेल आणि आजवर फारशा प्रकाशात न आलेल्या, प्रकाशन व्यवसायातल्या एका कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाची आपल्याला ओळख होईल.

सुलोचना राम देशमुख म्हणजे माझी मावशी. रा. ज. देशमुख यांच्याबरोबर अडतीस वर्षे आणि त्यांच्या निधनानंतर बारा वर्षे असा एकूण पन्नास वर्षे तिचा देशमुख आणि कंपनीशी.. त्यामुळे मराठी साहित्य विश्वाशी जवळचा संबंध होता. प्रकाशनक्षेत्रात आयुष्य गेल्यामुळे तिचे विचारविश्व तसे समृद्ध झाले होते; तसेच मराठी साहित्यविश्व समृद्ध व्हावे यासाठी तिने अखेरपर्यंत प्रयत्न केले होते. देशमुख आणि कंपनीची परिस्थिती १९८६-८७ मध्ये बिकट झाली होती. त्यामुळे मावशीला मदत करण्यासाठी १९८८-८९ पासून मी देशमुख आणि कंपनीच्या व्यवहारात नियमितपणे लक्ष घालण्यास सुरुवात केली. मावशी आणि भाचा या नात्यात गुरु-शिष्य या नात्याची भर पडली.

माणसाची निर्मितिक्षमता, जन्म-मृत्यूबद्दल त्याला वाटणारी भीती, त्याच्या माणूसपणाच्या मर्यादा आणि व्याप्ती, त्याच्या मनाचे खेळ, त्याची तर्कदुष्टता- अतार्किकता या सगळयांचे भान मला मावशीकडून मिळाले. आपल्या आणि समोरच्या माणसाच्या मर्यादा ओळखून व्यवहार कसा करावा हे मी मावशीकडून शिकलो. सौंदर्यशास्त्र, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान यांसारख्या विषयांचे थोडेसे वाचन-अध्ययन माझ्याकडून झाले तेही मावशीमुळेच. आक्कामावशी माझी प्रेमळ मावशी तर होतीच पण शिवाय माझी शिक्षक-सहकारीही होती. रा. ज. देशमुखांसारख्या जगावेगळया, कलंदर वृत्तीच्या माणसाशी यशस्वी संसार करून दाखविणारी जिद्दी गृहिणी होती. आपल्या उतारवयात, नवऱ्याच्या मृत्यूनंतर मोडकळीस आलेला, कर्जात बुडालेला प्रकाशन व्यवसाय मोठ्या हिमतीने उभा करून आपल्या नवऱ्याची आणि व्यवसायाची गेलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवून देणारी कर्तबगार प्रकाशक होती. अखेरच्या वर्षा-दीड वर्षात मावशी खूप थकली होती. देशमुख आणि कंपनीने जे यश मिळविले त्याचे समाधान होते; पण नीलेगावच्या जहागिरीबाबत काही करू न शकल्याची रुखरुख मनात होती. या काळात माझी भूमिका तिच्या स्वाभिमानाला धक्का न लावता तिला सांभाळून घेण्याची होती.

तिच्याविषयी वाटणारी आत्मीयता.. हे कौतुक बाजूला ठेवून वस्तुनिष्ठपणे तिच्याबद्दल काही लिहिणे मला अवघड आहे याची मला जाणीव आहे. शालिनी तुळपुळे ही पुण्यातले प्रसिद्ध वकील सी. ए. तुळपुळे यांची लाडकी मुलगी. दिसायला देखणी, शिकलेली. १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतलेली. रा. जं.चे शिक्षण तिसऱ्या यत्तेत संपलेले, धिप्पाड देहयष्टीचे, काळे, राकट देशमुख कोणत्याच निकषावर शालिनीसाठी योग्य वर ठरू शकत नव्हते. सर्वांचा विरोध पत्करून शालिनीने या लग्नाला मान्यता दिली. वि. स. खांडेकरांनी शालिनीचे नाव सुलोचना ठेवले आणि मावशी सुलोचना देशमुख झाली. खांडेकरांशी घनिष्ट संबंध ही व्यवसायाच्या दृष्टीने जमेची बाजू होती. सासरची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. स्वत: काका त्यांच्या शीघ्रकोपी स्वभावाबद्दल प्रसिद्ध होते. मात्र काकांनी आपल्या बायकोला मारहाण कधी केली नाही. काकांबरोबरचा मावशीचा संसार आज ना उद्या मोडणार याची बहुतेकांना खात्री वाटत होती; पण हळूहळू हा संसार मार्गी लागला. काकांच्या उग्र-संतापी स्वभावाबरोबरच त्यांचे काही गुण... स्पष्टवक्तेपणा, प्रेम करण्याची ताकद, दुसऱ्याला दिलेल्या शब्दासाठी झीज सोसायची तयारी, समाजऋण मानण्याची आणि आपल्या परीने ते फेडण्याची त्यांची धडपड आणि त्यांचे कर्तृत्व यांची कल्पना मावशीला असली पाहिजे. मावशीला तिच्या वडिलांनी फार मोठा मानसिक आणि काही प्रमाणात आर्थिक-व्यावहारिक आधार दिला. काकांचे अपशब्द ऐकून रडत रडत माहेरी येणाऱ्या मुलीला त्यांनी समजावून घेतले. तिच्या अडचणींवर उपाय शोधले. प्रसंगी देशमुखांच्या स्वभावाची पर्वा न करता त्यांची कानउघाडणी केली. धंद्यासाठी प्रशस्त जागा उपलब्ध करून दिली. मावशीला कर्तबगार, कमी बोलणाऱ्या, येणाऱ्या परिस्थितीला धीराने तोंड देणाऱ्या, प्रामाणिक आणि बुद्धिमान पुरुषांबद्दल एक नैसर्गिक आकर्षण होते. काका स्वत: आणि वडील हे दोघेही या कसोट्यांना उतरणारे होते. त्यांच्याखेरीज मावशीचे मामा (नानासाहेब मोडक) आणि चुलतबंधू (डॉ. एच. टी. तुळपुळे) यांच्याबद्दलही मावशीला आदरयुक्त प्रेम वाटत असे. भाऊसाहेब खांडेकर आणि साने गुरुजी यांच्यासारख्या जगाच्या दृष्टीने मोठ्या असलेल्या व्यक्तींशी जवळचे नाते असूनही असे प्रेम मावशीला त्यांच्याबद्दल कधीच वाटले नाही. लग्नानंतरची सात-आठ वर्षे मावशीच्या धैर्याची, मानाची आणि प्रेमाची परीक्षा पाहणारीच होती. काकांचा स्वभाव, शिव्या, आर्थिक अडचणी, अपुरी जागा, शारीरिक कष्ट या सगळया गोष्टी पचवून ती काकांसोबत उभी राहिली, इतकेच नव्हे तर 'मंगल वाचनमाला' या शालेय पाठ्यपुस्तक निर्मितीच्या निमित्ताने काकांच्या धंद्यातही लक्ष घालू लागली. या धडपडीतच तिने मोठ्या जिद्दीने बी. टी.चा अभ्यासक्रमही पूर्ण केला.

१९५७ नंतरचा तेरा-चौदा वर्षांचा काळ देशमुख पती-पत्नी आणि त्यांची प्रकाशन संस्था यांच्यासाठी मोठ्या भरभराटीचा गेला. १९६० नंतर 'ययाति'ने ललित वाङ्मय प्रकाशनातील कीर्तीचा मार्ग खुला झाला. 'स्वामी', 'व्यक्ती आणि वल्ली' आणि 'युगान्त' ह्या पुस्तकांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. 'कोसला', 'सावित्री', 'धार आणि काठ' यांसारखी वाङ्यीन अभिरुची संपन्न करणारी पुस्तके कंपनीने प्रकाशित केली. राज्य शासनाची आणि साहित्य परिषदेसारख्या मान्यवर संस्थांची अनेक पारितोषिके कंपनीच्या पुस्तकांना मिळाली. देशमुख आणि कंपनी प्रकाशन व्यवसायातील एक अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाऊ लागली. मावशीला लहानपणी ज्या वैभवात राहण्याची सवय होती, त्यातून कितीतरी अधिक वैभव काकांनी आता तिच्या पायांशी ठेवले होते. व्यावहारिक यशाबरोबरच देशमुख पती-पत्नींचे भावनिक जीवनही विकसित होत होते. ह्या जोडप्याला मूलबाळ झाले नाही तरी त्यांचा प्रपंच पती-पत्नींपुरताच मर्यादित नव्हता. काकांनी या काळात पुस्तक प्रकाशनाखेरीज इतर संबंधित विषयांतही भरपूर लक्ष घातले. म. टा.च्या सहकार्याने केलेली पुस्तक विक्री योजना, संयुक्त साहित्याचा प्रयोग, स्वस्त पुस्तक योजना, व्याख्याने, पुस्तकाचे जाहीर वाचन, साहित्य परिषदेच्या निवडणुका, साहित्य संमेलनाचे आयोजन या सर्व उपक्रमांमध्ये ते हिरिरीने सहभागी होत असत. एक आडदांड, वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणून काकांची प्रसिद्धी होती. मावशी या काळात प्रसिद्धीच्या झोतात आली नाही; परंतु अनेक लेखकांनी त्यांच्या पुस्तकांना लिहिलेल्या मनोगतांमध्ये किंवा खाजगी पत्रव्यवहारामध्ये मावशीचे आभार मानले आहेत. रणजित देसाई आणि भाऊसाहेब खांडेकर या कुटुंबाचाच एक घटक होते. नरहर कुरुंदकर आणि इरावती कर्वे हे वैचारिक, भावनिकदृष्ट्या मावशीचे जवळचे मित्र होते. मंगल वाचनमाला प्रकाशित करण्यासाठी मावशीने पाठ्यपुस्तकातील, धड्यांचा, कवितांचा अभ्यास केला होता. लेखकांची क्षमता ओळखणे, त्यांच्याकडून लिखाण करवून घेणे, लिखाणातले कच्चे दुवे ओळखून लेखकाला पटवून पुन्हा लिहून घेणे, लेखनावर संपादकीय संस्कार करणे, पुस्तकाला योग्य, अनुरूप शीर्षक सुचवणे यांसारखी महत्त्वाची कामे मावशी जबाबादरीने पार पाडत असे. 'ययाति'चे लेखन चालू असताना खांडकेरांच्या पत्नीचे निधन झाले. खांडेकरांची दुबळी प्रकृती, मानसिक अस्वस्थता यावर मात करून त्यांना लिहिते करण्याचे काम मावशीने केले. काकांनी भाऊसाहेबांना मोठा भाऊ मानले होते. मावशीने काकांसाठी ते नाते जपले. खांडेकरांच्या मृत्यूनंतर मात्र खांडेकरांचे वारस आणि देशमुख यांच्यामध्ये मतभेद झाले त्याचा मनस्ताप मावशीने अखेरपर्यंत सोसला. रणजित देसाइंर्चे लिखाण देशमुखांनीच प्रकाशित करावे हा खांडेकरांचाच आग्रह होता. काकांनी देसाइंर्वर पुत्रवत् प्रेम केले. 'स्वामी'ने देसाइंर्ना उदंड लोकप्रियता मिळवून दिली. देशमुखांच्या अखेरच्या काळात रणजित देसाइंर्चे आणि त्याचे संबंध खूपच दुरावले; परंतु देशमुखांबद्दल वाटणारे प्रेम आणि आदर रणजित देसाइंर्ना कधीच पुसून टाकता आले नाही. नरहर कुरुंदकरांशी 'रूपवेध'च्या निमित्ताने जुळून आलेला स्नेहबंध हा मावशीसाठी अनमोल ठेवा होता.

युगान्त, आदिमाय, श्रीमान योगी, राधेय यांसारखी ललित पुस्तके, घार आणि काठ यांसारखा वाङ्मयीन प्रवाहांचा आढावा, शरद्चंद्रांचे साहित्य, माप्र्सि दसाद सारख्या उपेक्षित तत्त्वज्ञाची भूमिका, सौंदर्यास्वाद, स्त्री-मुक्ती चळवळीसारखे सामाजिक प्रश्न, भारतीय लोकशाहीपुढची आव्हाने यांसारख्या अनेक साहित्यिक, सामाजिक, राजकीय प्रश्नांवर कुरुंदकर देशमुख पती-पत्नींशी चर्चा करीत असत. परस्परांची व्यक्तिमत्त्वे विकसित होण्यात या चर्चांचा मोठा वाटा होता. आपल्या पश्चात देशमुख प्रकाशानाची धुरा कुरुंदकरांच्या खांद्यावर देण्याचे या पती-पत्नींनी ठरवलेही होते. परंतु कुरुंदकरांचे १९८२ मध्ये अकाली निधन झाले. काकांची प्रकृती पण खालावलेलीच होती. आपल्या मृत्युपत्रात आपल्यानंतर देशमुख आणि कंपनीची एकमेव उत्तराधिकारी म्हणून मावशीची निवड केली होती. आपली अपुरी राहिलेली मातृत्वाची इच्छाही मावशीने देशमुखांवर प्रेम करूनच पूर्ण केली. लहानपणीच मायेला पारख्या झालेल्या काकांना तिने सर्व गुणदोषांसकट आपले मानले. काकांचे आडदांड-राकट व्यक्तिमत्त्व आपल्या नागर संस्कृतीत बसवण्याची धडपड केली. काकांची कलासक्ती, सौंदर्यदृष्टी, सरळ मन, दिलेला शब्द पाळण्याची त्यांची धडपड यामुळे ती भारून गेली. तिने आपल्या सर्वस्वानिशी काकांवर प्रेम केले. काकांच्या उतरत्या काळात मोठ्या निष्ठेने तिने त्यांना साथ दिली. आजार, आर्थिक ओढाताण, प्रकाशन व्यवसायाचा ऱ्हास- नीलेगावातील एकाकी जीवन हे सगळे तिने हसतमुखाने सोसले. मिसेस रा.जं.ची आणखीही एक ओळख लोकांना त्या काळात झाली ती म्हणजे 'एस' .'एस' हे मावशीचे टोपणनाव. 'एस' हा एक ग्रुप आहे, असो. त्याला गूढतेचे वलय देण्याचा प्रयत्न कंपनीने केला होता. देशमुख आणि कं.च्या बऱ्याच पुस्तकांना प्रस्तावनेचा मजकूर ह्या 'एस'कडून झालेला आहे. हा अट्टहास मावशीने कशासाठी केला होता? तो केवळ एक पब्लिसिटीचा भाग होता की काही वैचारिक भूमिका त्यामागे होती?

त्या सुमारासच भालचंद्र नेमाडेंची 'कोसला' ही कादंबरी कंपनीने प्रसिद्ध केली होती. नेमाडे, अशोक शहाणे ह्या वेगळया वाटेने जाऊ पाहणाऱ्या हुशार मुलांना हाताशी धरून त्यांच्याकडून साहित्यक्षेत्रात काही काम करून घेता येईल असा मावशीचा प्रयत्न होता; पण हा प्रयोग पूर्ण फसला. १९७० नंतर कंपनीकडे कोणीच धडाडीचा, तरुण लेखक-प्रकाशक, संपादक शिल्लक राहिला नाही. काकांवर प्रेमाची उधळण करणाऱ्या मावशीला ह्या काळात आधार दिला तो इरावतीबाइंर्नी. मावशीची कुचंबणा त्यांच्या लक्षात येत असे. काही समाजकार्य करण्याची, स्वत:ची वेगळी अस्मिता जपण्याची मावशीची भावनिक गरज त्यांच्या लक्षात येत असे. त्यांनीच मावशीला सेवाग्राममध्ये जाण्याचा आग्रह केला. मावशी अनाथ, परित्यक्ता स्त्रियांमध्ये मिसळून त्यांचे प्रश्न समजावून घेऊ लागली. त्यातूनच पुढे मावशीने 'कुमारी माता' हा आपला प्रबंध सादर करून पीएच.डी. मिळवली. 'मंगल वाचन'च्या व्यवहारात काका, ठोकळ, खांडेकर व आठलेकर हे चार भागीदार होते. काका आणि ठोकळ यांच्यातच प्रत्यक्ष भांडण झाले. या वादामधून काकांवर 'इन्कमटॅक्स' अधिकाऱ्यांची धाड पडली. 'प्रामाणिक' काकांची बेअब्रू झाली. मावशीला हा घाव अत्यंत जिव्हारी लागला. काकांची ही बेअब्रू ज्यांच्यामुळे झाली त्यांना मावशीने आयुष्यभर क्षमा केली नाही.

मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील नीलेगाव हे एक छोटे गाव. या गावातील प्रचंड इस्टेट देशमुखांच्या मालकीची होती. जवळचे वारस म्हणून रा. जं.ना ही इस्टेट मिळाली. १९७५ पासून देशमुख नीलेगावात राहण्यासाठी गेले. सुस्थितीतील प्रकाशन व्यवसाय, पुण्यातील तीस वर्षांपासूनचा मित्रपरिवार या सगळयांवर पाणी सोडून नीलेगावात जाऊन राहण्याचे आकर्षण काकांना का वाटलं असेल? आणि काकांचा हा निर्णय मावशीने कसा काय पेलला?

लहानपणी दरिद्री अवस्थेत घर सोडायला लागलेल्या काकांना या जहागिरीचे आकर्षण वाटले ते त्यातून मिळणाऱ्या मानामुळे. प्रकाशन व्यवसायातील अनुभवातून काकांच्या लक्षात आले होते, ललित वाङ्मयाचे प्रकाशन हा पैसा मिळवून देणारा धंदा नाही. शालेय पाठ्यपुस्तकांचे प्रकाशन खरेतर पैसे मिळवून देतो. सरकारी धोरणातील बदलांमुळे सर्वच प्रकाशकांच्या हातून पाठ्यपुस्तके सुटली होती. या परिस्थितीत नीलेगावात जाऊन तेथे काही सुधारणा कराव्यात, गावात वीज, पाणी, शाळा या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, लोकांनी जहागिरदार म्हणून आपल्याला ओळखावे असा विचार काकांनी केला असेल. त्यावेळेस मावशीने त्यांना विरोध केलेला दिसत नाही. अगोदर मावशी तिचा प्रबंध पूर्ण करण्यासाठी पुण्यातच राहिली होती, नीलेगावात काकांची तब्येत खूपच बिघडल्याचे मावशीला समजताच ती तेथे गेली व काकांना उपचारांसाठी पुण्याला घेऊन आली. हा काळ आजारपण, आर्थिक ओढाताण आणि मनस्तापाचा होता. एकामागून एक लेखक आपली पुस्तके अन्य प्रकाशकांकडे देऊ लागले होती. १९८१ मध्ये मावशीसमोर अडचणींचे डोंगरच उभे होते. प्रकाशन व्यवसायाचे उत्पन्न काहीच नव्हते. औषधपाण्याचा खर्च, कागदाचे व्यापारी, प्रेस, बुक बाइंर्डर्स सर्वांचीच उधारी थकली होती. रॉयल्टीसाठी लेखक तगादा लावीत होते. सर्व धावपळ मावशीलाच करावी लागत होती. एकेकाळी प्रकाशकांचे राजे समजले जाणारे काका आता निंदानालस्तीचा-टीकेचा विषय झाले होते. काकांच्या मृत्यूबरोबरच देशमुख आणि कंपनीचाही अंत होणार अशी अटकळ सर्वांनीच बांधली होती. सर्व विरोध डावलून काका मावशीबरोबर नीलेगावाला गेले; पण काकांची तब्येत खूपच बिघडली. मावशीने परत त्यांना पुण्याला आणले; पण काकांचे २ जूनला निधन झाले. देशमुख कंपनीचा शेवट ही आता अनेकांच्या दृष्टीने केवळ औपचारिक बाब उरली होती. 'देशमुखांची बायको आता झोळी घेऊन दारोदार हिंडेल!' अशी चर्चा मावशीच्या कानांपर्यंत गेली. वृद्ध एकाकी मावशीचा मानी स्वभाव या वाक्याने पेटून उठला. दाटून आलेल्या निराशेवर तिच्या जिद्दीने मात केली. रा. जं.ची मानहानी तिला सहन होईना. देशमुख आणि कं.ची गेलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवून देण्यासाठी तिने कंबर कसली. देशमुख दांपत्याचे सहजीवन काकांच्या मृत्यूमुळे संपले नव्हते. कारण काकांचे व्यक्तिमत्त्व जणू मावशीने आत्मसात केले होते. काका सतत मावशीच्या सोबत होते. १९८७ मध्ये डॉ. मधुकर वाकोड्यांच्या 'झेलझपाट'ला ह. ना. आपटे पारितोषिक मिळाले आणि कंपनीच्या पुनर्जन्माची- नव्या यशाची जणू नांदीच झाली. यानंतर देशमुख आणि कंपनीची वाटचाल म्हणजे मावशीची यशोगाथा आहे. जुन्या लेखकांच्या जोडीला तिने नव्या, तरुण रक्ताच्या लेखकांची एक फळीच निर्माण केली. कविवर्य विठ्ठल वाघ, डॉ. अरुण गद्रे, नामदेव कांबळे, विद्युल्लेखा अकलूजकर, प्रतिमा इंगोले, डॉ. मधुकर वाकोडे, वा. ह. कल्याणकर यांसारख्या लेखकांचे कसदार लिखाण तिने प्रकाशित केले. साहित्य अकादमीचा सर्वोच्च बहुमानही 'राघववेळ' या नामदेव कांबळयांच्या कादंबरीला मिळाला. मावशीच्या देखरेखीखाली प्रकाशन संस्थेसाठी असलेला मानाचा विष्णुपंत भागवत पुरस्कार कंपनीने मिळवला. सदानंद भटकळ यांच्या पुढाकाराने काकांच्या प्रकाशनक्षेत्रातील कर्तृत्वाचा गौरव केला गेला. मावशीसाठी ही मोठ्या आनंदाची आणि समाधानाची बाब होती. रा. ज. देशमुखांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी प्रकाशन व्यवसायाशी संबंधित व्यक्तीला पारितोषिक देण्याचे ठरले. मावशी आता एका ऋणातून मुक्त झाली होती. १९९५ नंतर मावशीची तब्येत ढासळू लागली. तिची जीवनेच्छा संपत आली होती. एका अपघातामध्ये तिच्या डोळयाला इजा झाली व दृष्टी अधू झाली होती, ती पूर्णच गेली. काकांची आठवण सोबत होती; पण मन जास्त भूतकाळातच रमत होते. डॉ. श्रीनिवास सामंत यांनी शिवाजी महाराजांवर काही लिखाण केले होते. 'वेध महामानवाचा' हा ग्रंथ देशमुख आणि कंपनीने प्रकाशित केला. या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. मावशीचा दम्याचा त्रास फारच वाढला. आता बहुतेक वेळ ती झोपूनच राहू लागली. 'महाराष्ट्न् फाउंडेशन' या संस्थेने देशमुख आणि कंपनीला सर्वोत्कृष्ट प्रकाशनसंस्था म्हणून एक लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर केला. ही बातमी ऐकून मावशी कृतकृत्य झाली. काकांच्या मृत्यूनंतर ज्या अट्टहासाने तिने देशमुख आणि कंपनीची वाटचाल चालू ठेवली होती त्या अट्टहासाचं कारणच आता संपलं होतं. त्याबरोबरच तिच्या जीवनाचं प्रयोजनही संपलं होतं. मावशीला दवाखान्यात ठेवलं होतं. तेथेच अनेकजण तिचं अभिनंदन करायला आले होते. काकांनंतर तिला ज्या कोणी मदत केली होती, त्यांचे आभार मानण्यासाठी तिने एक लेख लिहून 'केसरी'चे संपादक अरविंद गोखले यांना दिला व लवकरात लवकर छापण्याची विनंती त्यांना केली.

एका संघर्षमय जीवनाचा अंत झाला. हा संघर्ष ज्या मानी स्वभावामुळे, ज्या मूल्यांसाठी आणि माणसासाठी तिने आयुष्यभर केला; ज्या संघर्षाच्या जखमा तिने आयुष्यभर मिरविल्या, त्या संघर्षाचा हा अंत निरामयतेचा होता... साफल्याचा, समाधनाचा होता.

देशमुख आणि कंपनीवर तिने स्वत:च्या मुलावर करावे तसे प्रेम केले. देशमुख आणि कंपनी तिच्यामागे चालू ठेवणे, उत्तम साहित्यिक मूल्ये, समाजावर चांगले संस्कार करण्याची क्षमता, नवीन काळात समोर येणारी नवीन आव्हाने यांचे भान ठेवून पुढची वाटचाल करणे, हीच माझ्या मते तिला वाहता येणारी श्रद्धांजली आहे.
'कुमारी माता' हा सुलोचनाबाइंर्चा पीएच. डी.चा प्रबंध प्रसिद्ध झाला, त्या वेळी त्यांचे भाचे श्री. रवि गोडबोले यांनी त्या पुस्तकाच्या सुरुवातीला लिहिलेल्या एका हृद्य आणि माहितीपूर्ण लेखाचा हा लेख हे संक्षिप्त रूप आहे.

- रवी गोडबोले, पुणे

प्रतिसाद

The content of this field is kept private and will not be shown publicly.
Type the characters you see in this picture. (verify using audio)
Type the characters you see in the picture above; if you can't read them, submit the form and a new image will be generated. Not case sensitive.