Skip to main content

प्रतिसादास उत्तर द्या

मानव

``नही म्हनत व्हती भो% मी येंल्हें. पाठवू नका म्हनलं पोरले. त्ं आयकलं नि.''
``आता त्येंल्हें बी काय मायथी, आसं व्हनार हे म्हणून.''
``नही पन; काही गरज ना व्हती न् पारले पाठव्याची.''
``....................''
``तिच्या पयशावरस घर धकत व्हतं का ? कां आजस भीकलागली व्हती ? ''
``पयशा गियशासाठी काय म्हना; सोताच्या पायावर उभी राहयाले पाहाते आच्ची पिढी. त्येवढ्यासाठीस पाठवलं व्हतं पाव्हन्यानं बी रुपाले.''
``काही गरज ना व्हती पाठव्याची. जान-जवान लेकबाय नजरखाली पायझे. घरी ध्यानात येता सम्दया गोस्टी. दाबाखाली राहातं लेकरु. तठी कोन्नकाय - कोन्हाचा दाब राहतो ना धाक. चांगलं नि राहालं जग आता. भरोशाचं नि राहालं कोन्ही. फसवलं
रांडमेल्यांन्हं मह्या लेकराले. भरतीन... भरतीन कुठी जातीन.... सत्त्यानास व्हो% त्येंच्हां कोल्हट्याच्हां % !''
शिव्याशाप देत व्हती कांचनबाई ! तयतयाट करत व्हती. थयथयाट करत व्हती. काय करू न् काय नही, आसं झालं व्हतं तिल्हे. नाकावर मिरची आन् जीभीवर कोयती नाचत व्हती तिच्या. चर्रचर्र कापत व्हती. कोन्हाचस आयकत नव्हती. भाऊ-दोधू समजावून समजावून कटायून गेल्हा. त्येचं बी आयकत नव्हती. थोडसंबी आयकून घ्याले तयार नव्हती. नवऱ्याले तं् काया पान्यात पाहात व्हती - खाऊ कां ठ्यू करत व्हती. कटंकटं बोटं मोडून टाकले त्येच्या नावानं. बांगड्या गिंगड्या फोडून टाकल्या.
धो % धो % वाहत व्हता फुटलेला बांध. शिव्याशाप वहात व्हत्या पान्यासारख्या. मनात इन तो सबद मारत व्हती. नवऱ्याले त्ं नवऱ्याले पोरले बी बोल्याले लागली,
``तोंड दाखव्याले जागा ठिवली नि रांडनं % ! मढं जावो % उल्ट्या भावलीचं. काय कामाशी आशी जनपत. जना चांद नही त्ं राहा वांझ % ! मरेल परवडली आस्ती लहानपनीस. नख लावून देल परवडलं आस्त शिनालच्या नल्डीले....''
``गुफचूप बस्ती कां % ? बन कर बोंबलनं... कधलोंक भुकती ? ''
न राहून बोल्लास भानुदासराव. कधलोंग चुप बशीन ? बायकोच सारखी बोलत व्हती. काय काय नही बोलत व्हती. नवऱ्याले नवरा म्हनत नव्हती. मानमर्यादा देल्ही सोडून तिन्हं. आडान्यावानी बोल्याले लागली. आडान्यावानी वाग्याले लागली. कपडेलत्ते काय भिरकाले, भांडे कुंडे काय फेकले..... फेकाफेक - कुठल्या कुठी चाल्ली गेल्ही गंमत... नवऱ्याले तं् नवऱ्याले, रुपाले बी बोल्याले लागली. नुस्तं दोषी बोलनं नही, आचकट विचकट, गायाशिया देऊ लागली.
``तोंड संभायून बोल न् जरा % ! नवलपनी तुह्यास घरात घडली कां घटना ? आशा लयस घटना घडता. निंघून जाता लोकांच्या पोरी घरातून. रूपानं तसं तं् काही केल्हं नि. ''
``माय % माय % माय % !! काय लाज सोडली वं % माय ह्या मान्सानं. काही गुन्हा केला नाही म्हन्तो. यव्हढा गू खाल्ल्यावर ...''
पटापट तोंडावर मारून घेतलं मंग तिन्हं. तिचं तिचं तोंड झोडपून घेतलं. छाती बी बदडून काढली. भानुदासराव घाबरून गेल्हा. बरा तिचा भाऊ जवळ व्हता. म्हनून तग धरून व्हता. दोधू नं् बी लय समजावलं बहिनले. तोंडानं सांगलं - हात धरून घेतले तिचे. दटावत खाली बसवली,
``सबुरीनं घे न् जरा % ! आगाजा करून उपेग नि काही. आशानं महारवाडा व्हईन. सऱ्या जगाले मायथी पडीन. कोन्हाकोन्हाच्या तोंडावर हात ठेवशीन मंग. जगनं मुश्कील व्हईन तुम्हालेस.''
``ह्या मान्साच्या पायरीस भंडावा आयेनं रे बाप्पा%सम्दा%! आन् मनी माय वं माय %%.......! ''
``बोंबलू काय राहाली - कोन्ही मरलं कां आठी ? ''
``मऱ्याले काय - मरनावूनबी जास्त मरन हाये हे.''
``.........................''
``ह्या मान्सा पायरीच बुडतीचा पायरो आला भो % आम्हाले. किती चांगले चांगले स्थळं आल्थे - देल्ही नि पोर. भारी भरले ताव्हा. आता चांगला गू खावाडला. दाखवजो म्हना तोंड समाजाले. चांगलं नकटं केल्हन नाक. मही लेक मही लेक वसनात व्हता. आता कुठे गेल्ही तुही लेक ? आता कुठी गेल्ही तुही शिकोनी ? ''
``.....................''
``घरात पाय ठयरत नि त्येंच्हां. भाईर % जावू द्या म्हन्ता ! काय डबुलं हे कान्नू भाईर. भारी भरतो मनाले. महीस काय गांड लाल हाये म्हन्तो. मीस काय हुशार हे. तेचातेचास भारी भरतो. कशी आली हुशारी कामी ? आती शहाणा त्योचा बैल रिकामा येऱ्हीस नि म्हन्ता....''
``.....................''
``आठी जाईन... तठी जाईन... ह्या कार्यक्रमाले जाईन... आता घरचा कार्यक्रम दाखव म्हणाले जगाले... सांग जगाले मही पोर पयून गेल्ही आसं... सांग जगाले मही पोर महाराचं घर घुसली आसं...''
- आयकत नव्हती कांचनबाई ! काय काय बोलत व्हती. बोलीन नही त्ं काय % ! मायचं काळीज व्हतं तिचं. आन् घटना बी तशीच घडली व्हती. तिची एकुलती यक लेक घर सोडून गेल्ही व्हती. सोडून म्हणजे तशी नोकरीसाठी गेली व्हती. कांचनबाईचा पयल्ह्यापासून इरोध व्हता रूपाच्या नोकरीले. नोकरीलेस नही तं शिकशनाले बी. पोरची जात हाये. यवढं शिकाडून उपेग नही, आसं तिचं म्हन्न व्हतं. टायमोटाईम नवऱ्याले सांगत आली व्हती तशी. नही आयकलं भानुदासरावानं. आपल्याच मनाचं धकवलं. पोरले शिकवलं. नुस्त शिकवलं नही तर नोकरीवर बी पाठवलं. काही गरज नाव्हती पोरच्या नोकरीची. पोरले घरापासून दूर पाठव्याची. पाठवली. तिन्ह
तिकडी आसं केल्हं ! नोकरीच्याच ठिकानी सूत जमवलं. कोन्न काय काही मायथी नि-घरी न सांगतास घेतलं लगन करून.
लगनगिगन केल्ह्यावर शहाजुकसारका फोन केल्हा घरी,
``पप्पा, मीन्हं लगन केल्हं ! आशिरवाद घ्याले कधी यू?''
फोन योस्तर काहीस मायथी नाव्हतं घरी. थोडशिकबी कानघुस ना व्हती, की पोर आशी करीन म्हणून. केल्हं तिन्हं - काय करता % ! काय करून घेता तिचं ? तिचं कायन्ही घरचह्यांच्या जीवावर बितली. जास्ती करून तिच्या मायच्या जीवावर. जसं काही कोन्ही मेंल्हं आशी करत व्हती. कायन्हीन मायन्ही छाती झोडत व्हती. भांडेकुंडे आदळत व्हती. नवऱ्याले त्ं कच्चा खायाले पाहात व्हती. भाऊले मधुन मधुन तोंडी लावत व्हती,
``किती चांगले स्थळ आनले व्हते भाऊ तुन्हं. काही कदर नि ह्या मान्साले. कैक दा त्ं तू तोंडावर पडला. येल पाव्हने परत धाडले ह्या गेलचोद्या मान्सानं. कोन्ह्या तोयापुराच्या घरी देत व्हता कान्नू ? नही देती व्हती दुसऱ्याच्या घरी त्ं बहिनच्या घरी देता. मी का मना करत व्हती. महे आवढस म्हन्न व्हतं - पोरच लगन करा. नही केल्हं ! आयकल नही. टेंपी हू देल्ही पोर. तिन्हं आसं केल्हं. नाक नकटं केल्हं आमच्हं.तोंड दाखयाले जागा ठिवली नि जगाले. ''
मायबापाच नाक नकटं केल्हं त्ं केल्हं, पोर वऱ्हून म्हणत होती - आशिरवाद घ्याले काव्हा यू ? चांगले बिनलाजे धंदे हाये कां ? कांचनबाईचा म्हणूनच जीव तुटत व्हता. बोंबलु बोंबलु नल्डा कोल्डा पडला तिचा. सांगून सवरून केल्हं आस्तं लगन त्ं बरं झालं आस्तं, आसं तिचं म्हन्न व्हतं. पोरनं यकदमस बॉम टाकला. सरा धिंगाना घातला. वऱ्हून घरी याचं म्हन्ते.
मायबापाचा काय जीव जात अशिन त्ये राहालं - वऱ्हून उल्टी टांग कऱ्याले पाहाते. चांगले धंदे हायती का बरं हे ? तोंड दाबून बुक्क्याचा मार नही का हां ? जखमवर मीठ चोयाचा परकार नही का हां ? जखम बी तिन्हस दिल्ही - मीठ बी त्येस चोयून राहाली. त्येच्यानं पुरतं हादरून गेल्हं भानुदासरावाचं घर. कांचनबाईनं जास्त हादरवून सोडलं. घाबरवून सोडलं.
भानुदासराव सरळ मारगी व्हता. सकारात्मक विचार करणारा. वास्तवाले सामोरा जाणारा. तो करू शकला आस्ता लेकीचं स्वागत. तिच्या धाडसाचं कौतुकच केलं आस्त त्यानं; पन बायकोनं कुठी सवड देल्ही. येक क्षणभर बी उसंत देल्ही नि तिन्हं. येच राहालं बाजूले तिन्हस सुरू केल्हं कोकलनं. जसाकाही नवलपनी डोंगर कोसळला तिच्यावर.
भानुदासरावाने विचारस करू देल्हा नि तिन्हं. सवडस देल्ही नि. हालचाल करू देल्ही नि. उपट वचपा काढू लागली त्येच्यावर. चहूबाजूनं अॅटॅक केल्हा तिन्हं नवऱ्यावर. बायकोनं चढाई केल्यानं त्यानं बचावत्मक पवित्रा घेतला होता. त्याचा तिन्हं गैर अर्थ काढला व्हता. गैरफायदा घेतला व्हता. जास्त वरचढ झाली व्हती. यवढी की भानुदासरावाले हार खानी पडली. यवढा म्होटा माणूस पण हतबल झाला. लहान लेकरासारखा कऱ्याले लागला. काय करा काय नही काही कळून येत नव्हतं त्याला. मारगस सुचत नव्हता. डोखं बधिर हून गेल्हं..... सम्दे रस्ते बंद झाल्यावानी..... मंधी कोंडावून गेल्हावानी.....गेल्हा मंधी मंधी.....खोल खोल......आनखी खोल.....चाल्ला गेल्हा विचारांच्ह्या खाईत....खाली उतरल्यावर वऱ्हच्हे दोर कापून टाकल्यावानी.....
आशी स्थिती हून गेल्ही भानुदासरावांची. त्याच्यानं तो बी गोत्यात आला. त्येचा त्येचा इचार कऱ्याले लागला,
`खरंस रूपानं दोर कापून टाकले कां आपल्या प्रगतीचे ? खरंस नकटं केल्हं कां आपलं नाक पोरनं ? '
काही काही कळून येत नव्हतं. यवढा म्होटा माणूस कसा लुळापांगळा हून गेल्हा. लंगडा झाला. -खरंस आसं व्हतं कधी कधी ? सोतावर बितली की गोत्यात येतो माणूस ? आंधळा व्हतो कां तो ? मती गुंग हून जाते त्येची ? भानुदासरावाले बी आसंस झालं व्हतं. काही काही कळून येत नव्हतं.
`नही पन ! आपली पोर आसं करन्हार नि. आपलं नाव धुळीस मिळवन्हार नि. चांगलं केल्हं तिन्हं ? जे केल्हं त्ये चांगलं केलं...?'
`हे' का `त्ये' ..... `त्ये' का `हे' ... चांगलं केल्हं का वाई केल्हं..... वाईट म्हटलं तर मनाले पटत नव्हतं. चांगलं म्हटलं तर बायकोले पटत नव्हतं. खावू का ठ्यू करत व्हती त्ये. सध्या तिचा जोर कायम व्हता. भानुदासराव तिच्याखली दबला व्हता. उजेडात सापडलेल्या वाटवाघुळयासारका चाचपडत व्हता....
भानुदासराव, जिल्ह्यातलं नावाजलेलं नाव. जिल्ह्यास काहून राज्यभार नाव व्हतं त्येच्हं. नावाजेल माणूस व्हता तो. आभ्यासू मानूस व्हता. चांगल्या चांगल्यांल्हे बोलू देत नव्हता. सम्दयादूर त्येंच्ह्या नावाचा दबदबा व्हता. दबदबा आसा की, परिवर्तन, प्रबोधनाच्या चळवळीतला प्रामाणिक कार्यकर्ता, थोर विचारवंत.
लयस पुरस्कार न् सन्मान भेटेल व्हते. कामस तसं व्हतं. त्याग व्हता. काही कशाचा लोभ नव्हता. फक्त यकस ध्यास व्हता, समाजाचा विकास झाला पाहिझे. अज्ञानाचा नाश झाला पाहिझे. त्यासाठी जे जे करता इन ते ते कऱ्याचं - कशाची अपेक्षा न ठिवता. पयसा नको, मान नको, सन्मान नको. कुठी बी बोल्हवा - हाये तयार ! ठिकठिकानी भाषनं देत फिऱ्याचं. कधी कंटाळा नही. परिवर्तन, प्रबोधनाचा विचार पेरण्याचा ध्यासच घेतला व्हता जणू भानुदासरावानं. असा त्यांचा सभाव व्हता !
आशे लयस उदाहरणं व्हते. जठी ना तठी भानुदासरावांच्हं नाव व्हतं. त्येंच्ह्या कार्याचा झेंडा उंच व्हता. विधवा विवाह आसो, आंतरजातीय विवाह असो - हामखास प्रोत्साहन दिन. पुढाकार घ्यून सोताच्या खर्चानं लगन लावून दिन. अस्पृश्यता निवारण आसो, जातीनिर्मूलन आसो, अन्याय - अत्याचार - शोषणाच्या विरोधात आधी उभा राहीन. सम्द्यात पुढी उभा राहीन. कुठी का सांगानं तुम्ही; आरध्याराती तयार राहीन. फुले - शाहू - आंबेडकरांच्या विचारांच्हां धगधगता निखारा व्हता भानुदासराव ! .......
जिल्हा परिषदच्या समाजकल्याण विभागामारफत आंतरजातीय विवाह करेल जोडप्यांचा सत्कार व्हतो दरसाल. त्या कार्यक्रमाचा प्रमुक पाव्हना ठरेल व्हता - भानुदासराव. काही तरुण-तरुणी तर भानुदासरावांच्या हस्ते सत्कार व्हतो म्हणून आंतरजातीय विवाह करत असत. भानुदासरावांच्या विचारांच्हां हा विजय व्हता. आन् घरात मातर पराभव !
पराभव नही त्ं काय ? नही पण पराभव बी म्हन्ता येन्हार नही ! पोरनं बरोबर चोखाळला व्हता मारगं. प्रश्न तिचा नव्हता, तिच्या मायचा व्हता. कांचनबाई नवऱ्याचं कर्तृत्व जाणून व्हती की नव्हती, तिचं तिल्हे मायथी. आसलं बी तरी तिल्हे काही देन-घेनं नव्हतं. निदान ह्या घडीलेतरी. राहून राहून नवऱ्याले
उघडे पाडित व्हती. सालं ! भाईर काय मानासाच्या नावाचा गवगवा हाये न घरी बाई काय गांजून राहाली. काहीस समजू नि राहाली नवऱ्याले ! काडीकचऱ्या सारका उडवत व्हती. म्हन्ता नि का घरकी मुरघी दाल बराबर !
आसं झालं व्हतं ! भानुदासरावांच्हं काही चालत नव्हतं. हारला व्हता तो बायकोपुढी. निदान तसा भास तरी व्हत व्हता त्या घडी.
तशाबी परिस्थितीत तो बायकोले समाजवत व्हता,
``जे झालं त्ये झालं...''
तो, तिल्हे समजवत व्हता आन त्ये नवऱ्यावर उल्टुन पडली व्हती. तुटून पडली व्हती. उल्टुन बोलत व्हती. आत्तर पित्तर काढत व्हती. सम्दा खयमाना करून टाकला तिन्हं.
``काही गरज नि आम्हाले तुमच्याही . तुमच्हा म्होटेपना तुम्हाले लखलाब आसो. तिकडीस मिरवा तो. आमच्ह्या नादारीले हायाती आसो.''
सम्दा घर डोक्यावर घेतलं व्हतं तिन्हं. थयथय करत व्हती. आदयआपट करत व्हती. भिंतीवऱ्हचे फटुगिटू भिरकावून देल्हे .... शोकेसमधले पुरस्कार बी फेकून देल्हे.... पायदळी काय घेतले.... घरभर सम्दा पसारा पसरवून टाकला.....
आशानं आसं तशानं तसं. हतबल झाला बिचारा भानुदासराव. बायकोची समज कशी घाला - हाच प्रश्न त्येच्यापुढी. प्रश्नसादासुदा नव्हता. ज्या पद्धतीनं तिची प्रतिक्रिया आली व्हती ती पद्धत भयंकर व्हती. त्येच्या आकलनाच्या भाईरची व्हती. ताव्हास समजून गेल्हा व्हता तो, की केस आपल्या हातातली नही. म्हणून पुढचा बंदोबस्त करून ठिवला व्हता. साल्याले न सासूसाऱ्यांल्हे बोल्हावून घेतलं व्हतं.
साला जवळ आसल्यानं आला व्हता लगोलग. त्येन्हं सोताची काही परतीक्रिया देल्ही नि लगोलग. बोल्याले चानसस भेटला नि त्येल्हे बी. पाहून हबकून गेल्हा व्हता. बहिनची परिस्थिती हाताभाईरची व्हती. तील्हे आवरनं, सावरनं महत्त्वाचं व्हतं त्या टायमाले. त्येस काम केल्हं मंग त्येन्हं. बहिनले समजावत राहाला...तिची समज घालत राहाला. तिल्हे आवरत राहाला. कधी पाव्हन्याची, कधी बहिणीची बाजू घेत राहाला.. सावरत सावरत आघलोंग आनलं त्येन्हं. आन् आता तो बी थकला. मायबापाची वाट पाहात बसला. त्येचे मायबाप म्हणजे भानुदासरावांचे सासुसासरे.
गणोजीराव ! भानुदासरावांचे सासरे. कीर्तनकार. टाळकुटे - पळपुटे कीर्तनकार नव्हते. त्यातले नव्हते ते. कांचनच्या मायथीतले. प्रबोधनाचा प्रसार आन् प्रचार करणाऱ्यांपैकी यक व्हते. माध्यम म्हणून कीर्तनाचा वापर करत व्हते. धर्माचं खरं स्वरूप समाजावून सांगत व्हते. भानुदासरावांचा आदर्श गणोजीरावस व्हते. सासऱ्यांच्या कार्याचा वसास ते पुढं चालवत व्हते. गणोजीरावांनी सोता विधवेशी विवाह केलेला. कांचन त्या विधवेचीस कन्या व्हती!
त्ये दोन्ही नवराबायको आले. ताव्हा जास्तच हांबरडा फोडला कांचननं. रडबोंबल कऱ्याले लागली. मायच्या गयात पड्याले लागली. नवऱ्याचे गाऱ्हाणे सांग्याला लागली. पोरच्या बाऱ्यात काहीमाही बोल्याले लागली. जास्तस आगाजा वाढवला तिन्हं. तिल्हे मायथी व्हतं - आता आपला बाप आला. आपला बाप लय खराब हे. तो नवऱ्याची चांगली आत्तरपित्तर काढीन. आपली बाजू घिन. मोड्याले लावीन रूपाचं लगन. परत आन्याले लावीन तिल्हे. तिल्हे बी चांगली झापून काढीन. आन् दिन जातीतल्या यखांदी पोऱ्याशी लगन लावून. लय वयखी हाये त्येंच्ही तशी. आपला नवरा दबून जातो त्येंच्ह्या पुढी. लय वजन हाये आपल्या बापाचं. हे परकरन त्ं चुटकीसरशी मिटवीन मह्या बाप. दाबुन टाकीन सम्दी गोट.
आशानं आसं तशानं तसं वाटत व्हतं कांचनले. बुढ्यानं बी रडबोंबल करू देल्ही पोरले. शांत हू देल्ही. मनांतलं जळमट निघू दिल्हं तिच्या. त्यानंतर हळूसकन खणकावली,
``येक गोस्ट इचारू कां, बेटा ? ''
``इच्यारानं, काय म्हन्ता, बाबा %.''
``मीन्हं जर तुह्या मायशी लगन केल्हं नस्त - त्या टायमाले त्ं?''
आपला बाप असा काही प्रश्न इचारीन येची कल्पनास नव्हती कांचनले. पयल्यास प्रश्नात गडबडून गेल्ही डोख्यात दगड बसल्यावानी. बाप काम्हूं आसं विचारून राहाला, येचा थांगपत्ता लागला नि तिल्हे. थांग घ्याले लागली. मघाचा आकांड तांडव इसरून प्रश्नाचं उत्तर शोधू लागली,
`खरंस आपल्या बापनं आपल्या मायशी लगन केल्हं नस्त त्ं ? काय झालं आस्तं ? आपलं, आपल्या मायचं ? त्या टायमाले दिवस लय खराब व्हते. रड्याले दिवस पुरले नस्ते आपल्याले. कु त्रे हाल खाते ना आपले. हाये की नि ? '
आशानं आसं झालं आस्तं तशानं तसं. काही खरं झालं नस्तं. खरच, देव मानूस हाये आपला बाप. कळून चुकलं
कांचनले. पुढं बोल्लंी नि मंग त्ये. तीच्या मनाचा तळ शोधत दुसरा गळ टाकला गणोजीरावांन्हं,
``मी जसा हाये, तसाच मह्या जवाई हाये, बेटा. कस्तुरीमृगाची पारख नि तुल्हे. बोले तसा चाले त्याची वंदावी पाऊले, आसा थोर माणूस हाये. त्येंच्ही पोरबी तशीच निंघाली. खाण तशी माती % ! वारे % व्वा ! कमवलं पोर न नाव. चांगलं धाडस केल्हं. कौतुक केंल्हं पायझे तिच्या धाडसाचं. ''
फटाफट उडून गेल्हे फ्यूज कांचनचे. आपला बाप बी खुशाल म्हणू राहाला - पोरनं नाव कमावलं ? आसं कसं काय ? काही काही कळून आलं नि तिल्हे. काही करू पावली नि. विरोध करू शकली नि की सबद बोलू पावली नि. चूप राहाली - पडून मायच्या कुशीत. बापस पुढी बोल्ला.
``जातीपातीच्या भिंती पडल्याशिवाय `मानसाले' प्रतिष्ठा लाभणार नि बेटा. जाती अंताचा हा लढा यकट्या दुकट्याकडून पुरा व्हणार नि. मी असो का भानुदासराव. आमच्ह्या शंभर सभा - संमेलनांपेक्षा म्होटं काम केल्हं रुपानं. आशा हाजारो - लाखो रूपा पुढं येतीन ताव्हास जातीपातीच्या भिंती कोसळतील. भुईसपाट व्हतीन. त्या किती बी अभेद्य आसू दे मंग. बुरुज आसो का गढी .... कूड आसो का कांक्रीट .... आपोआप जमीनदोस्त व्हतीन.... त्येच्या नंतर मंग कोन्ही श्रेष्ट राहणार नही, कोन्ही कनिष्ट राहाणार नही. तुह्यासारकीवर शोक कऱ्याचा परसंग येन्हार नही.... येकस येक जात शिल्लक राहीन..... त्ये म्हन्जे - माणूस .... ! माणूस..... !! माणूस ...... !!! ''
``नवं सुंदर जग तयार व्हईन. ताठी सम्दे प्रेमानं राहतीन. कोन्ही कोन्हाशी भांडणार नही..... कोन्ही कोन्हाचं शोषण करनार नही...कोन्ही कोन्हाला लहान म्हण्णार नही.... सम्दे समान राहतीन. कोन्ही कोन्हाले गुलाम करनार नि.... तठी देव नशीन ना दानव..... राहतील फक्त मानव... ! मानव... !! मानव.... !!! ''
मायबाप आपली बाजू घेतीन, आसं वाटलं व्हतं कांचनले. तसं मात्र झालं नही. रूपाचीच भलावन केल्ही त्यांनी बी. भुईसपाट पराभव झाला कांचनचा. भानुदासरावांचा दणदणीत विजय !
लगोलग आवरा आवर सुरू झाली. स्वागत समारंभाची तयारी सुरू झाली....
- अशोक कौतिक कोळी,
जामनेर

प्रतिसाद

The content of this field is kept private and will not be shown publicly.
Type the characters you see in this picture. (verify using audio)
Type the characters you see in the picture above; if you can't read them, submit the form and a new image will be generated. Not case sensitive.