Skip to main content

प्रतिसादास उत्तर द्या

जखमा

ऑफिसमध्ये आज दिवसपाळी होती. ती संपवून निघालो. पण घर जसं जवळ येईल तसं मन आज खूपच अस्वस्थ होऊ लागलं. प्रवास असाच सुरू राहावा घर कधीच येऊ नये असं वाटत होतं. गेली तीन महिने हे असंच होतंय. पण काय करणार ? वास्तव टाळता येत नव्हतं. घराचा द्वेष करतच घराजवळ आलो. गाडीचा आवाज ऐकताच समोरच्या ताईची मुलगी मामा, मामा म्हणत बाहेर आली. स्टँडला लावलेल्या स्वयंचलित गाडीत ती मोठ्या दिमाखानं बसली. तिच्या पाठोपाठ ताई म्हणचे तिची आई आली. `काय हो आज लवकर आलात?' तिचा नेहमीचाच प्रश्न. `हो' एवढंच माझंही नेहमीचं उत्तर. खोटं खोटं हसतच मी जिना चढू लागलो. कुलूप काढलं. लाईट न लावताच काही क्षण खुर्चीत बसलो. पुन्हा उठून लाईट लावला. घर प्रकाशानं गच्च भरलं. घरातला अंधार दूर झाला पण माझ्या मनातील वेदनांच्या गर्दीमुळे झालेला अंधार मात्र तसाच कायम होता. तो कोणत्या दिव्यांनी जाणार माहीत नव्हतं......
दिवसभराच्या कामामुळं अतिशय थकवा आला होता. काही वेळ गादीवर पडून राहावसं वाटलं. गादीवर आडवा झालो. पुन्हा एका क्षणातच उठून बसलो. गेल्या तीन महिन्यांपासून हे असंच होतंय. होय, रोझीनं घटस्फोट घेऊन आज तीन महिने पूर्ण झाले. खरं तर ती मला नकोही होती. आणि हवीही होती. सारं आयुष्य तिच्या नावानं उधळलं. समाज, परंपरा, जात, कुटुंब या सर्वांचा पाश तोडून तिच्याशी लग्न केलं. सारं जगच तिच्यासाठी विसरलो. पण ती मात्र जग विसरायला तयार नव्हती. स्वत:चा धर्म विसरायला तयार नव्हती. लग्नानंतर तिला मुलाबाळांऐवजी हवं होतं माझं धर्मांतर. तीच तिची पहिली आणि शेवटची अट. मी तिच्यावर किती प्रेम करतो हे मोजायचं तेच एक परिमाण ! काही चुका तिच्या, काही माझ्या. चुकांची बेरीज वाढतच गेली. चुकांच्या ढिगाऱ्यातच आम्ही आमचं नुकतंच सुरू झालेलं आयुष्य हरवलं. प्रेम हरवलं. शेवटी कंटाळून दोघांनी एकत्रितपणे घटस्फोट घेतला. रोझी निघून गेली. मी एकटाच राहिलो. तिच्या अनुपस्थितीत घर खायला उठलं. घरातील प्रत्येक वस्तूला तिचा स्पर्श झाला होता. तिच्यानंतर त्या वस्तूंचाही मला राग येऊ लागला. रागाच्या भरात अनेक वेळा वस्तूंची आदळआपट केली. कप फोडले. बशा फोडल्या. भिंतीवर लाथा मारल्या. भिंती तशाच राहिल्या. त्रास मात्र मलाच झाला. रोज असा मनाचा कोंडमारा होतोय. कोणाजवळ बोलणार तरी कसा ? माझ्या अंगात कार्यकर्त्याची वस्त्रे. मी लेखक, कवी, सामाजिक परिवर्तनाच्या प्रयत्नात खारीची भूमिका करणारा. वृत्तपत्रे, आकाशवाणी या माध्यमातून असंख्य लोकांना भेटणारा. पुस्तकं लिहून पुरस्कार मिळवणारा. समाजाच्या नजरेत मी एक कार्यक्षम आणि हुशार तरुण. या सर्व प्रसिद्धीच्या वलयांमुळं किंबहुना ती अधिक जपण्यासाठी वेदनांचे असंख्य डंख निमूटपणे सोसण्याशिवाय पर्याय नव्हता. हे सर्व सोसण्याचीही सवय झाली. पण चार भिंतीच्या आड मात्र कधी तरी जोरात ओरडावं असं वाटायचं. पण लागलीच वाटायचं, ``अरे, कार्यकर्त्याला ओरडण्याचा अधिकार नाही. तो जबाबदार घटक आहे.'' या जबाबदारीची कधी-कधी कीव यायची. कधी-कधी वाटायचं आपण लग्नच करायला नको होतं. हा प्रश्नांचा भोवरा महाभयंकर असतो. एका प्रश्नातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा.... न संपणारे प्रश्न. जीवघेणे प्रश्न....
रोझीनं घटस्फोट घेतला. तत्पूर्वी तिनं खूप त्रास दिला. संसाराविषयीच्या स्वप्नावर वरवंटा फिरवला. ती अशी का वागली ? खरं तर घटस्फोटानंतर आणखी किती काळ हे प्रश्न माझ्या मागे लागणार आहेत मला माहीत नाही. खरं तर तिच्या विषयावर मी विचारच का करावा ? मी घराबाहेर असतो तेव्हा या प्रश्नाची उत्तरं अनेक अंगांनी दिली असती. पण भिंतीच्या आड मात्र मला काही सुचत नाही. माणूस एवढा असहाय का होतो ? निराश का होतो ? भूतकाळ क्षणात विसरायची कला त्याच्याकडे असती तर ! छे, पण असं कोठे झालं आहे. भूतकाळाचे पाश गळयाभोवती आवळतात. श्वास कोंडतो. रोझीनंही माझा श्वास कोंडला आहे. रोझी माझी पत्नी झाली होती. माझी सखी झाली होती. कधी-कधी लाडिकपणे ती माझी आईसुद्धा झाली होती. बाळ म्हणून मला हाक मारायची हौसही तिनं फेडून घेतली होती. या सर्वापेक्षा वेगळे म्हणजे रोझी माझी सवय झाली होती. मी तिची सवय झालो होतो की नाही सांगता येणार नाही. खरं तर रोझीनं माझी सवय व्हायला नको होतं. मी त्याबाबत तक्रारही केली नसती....
रोज रात्री घरात आल्यानंतर मी अशा विचारांच्या, कल्पनांच्या आणि वेगवेगळया वादांच्या चक्रव्यूहात अडकतो. रात्रभर धडपडतो. घरी कोणी मित्र आला तरच माझी या चक्रव्यूहातून सुटका होते. अन्यथा मी जखमी होतो. रर्क्तेंंबाळ होतो. गर्दीत गेलो की मग मात्र माझ्या जखमा कुठल्या कुठं जातात. सुकायला लागतात. वाटतं ही गर्दी संपूच नये. पण गर्दीतल्या माणसाचासुद्धा स्वत:चा एक रस्ता असतो. त्यांना त्यांचं मुक्कामाचं ठिकाण असतं. गर्दीतून तो त्याच्या त्याच्या रस्त्यावर जातो. मलाही रस्ता आहे पण या रस्त्यावर मला खायला उठणारं घर आहे. घर भाड्याचंच, पण त्या घराच्या भिंतींनासुद्धा रोझीच्या स्पर्शामुळं चेतना आली होती. रोझीनंतरही त्या चेतना तशाच होत्या. खरं तर रोझीवर आता जास्त विचार करणं बरोबर नाही. न्यायालयात शपथा घेऊन आम्ही परस्परांना नको असल्याचं सांगितलं. थरथरत्या हातांनी घटस्फोटाच्या कागदावर सह्या केल्या होत्या. कायद्यानं आम्ही एकमेकांचे नव्हतो. पण माझं मन मात्र कायद्याच्या मर्यादा ओलांडून तिच्यापर्यंत धावायचं. तिला विचारलं, ``रोझी, आपण कायदा व समाज विसरून पुन्हा एकत्र राहू या.'' ती म्हणाली, ``काही तरीच काय वेड्यासारखं बोलतोय. मी आता तुमची पत्नी नाही. समाज काय म्हणेल व धर्म काय म्हणेल ?''
हे सारं आठवून डोकं गरगरू लागलं. दोन्ही हातांनी कपाळ चेपण्याचा प्रयत्न केला. कपाळावरील शिरा बोटांच्या चिमटीत धरून ओढण्याचा प्रयत्न केला. पुन्हा गादीवर आडवा झालो. दोन-चार क्षण शांत पहुडलो. बेडशीट सरळ करण्यासाठी म्हणून पुन्हा उठलो. लक्षात आलं की हे बेडशीट रोझीनंच तिच्या आवडीनुसार खरेदी केलं होतं. फेकून द्यावं का हे बेडशीट ? पण फेकायचं तरी काय, काय? वस्तू फेकून काय करणार ? मन कसं फेकता येईल ? कसल्याच प्रश्नाची उत्तरं मिळत नाहीत. हे प्रश्न भयानक असतात तर किती ? ते माझ्याच मागे का लागले आहेत ? ओफ ! पुन्हा प्रश्न ! मला कोणी तरी सोडवा या प्रश्नांच्या तावडीतून ! रोझी तू असा त्रास देऊ नकोस मला.... जा, या भिंतीच्या आणि घरातील वस्तूंच्या कणा-कणांतून.... बाहेर पड.... मी तुझ्याशी कधीही बोलणार नाही. तुला कसलाच दोष देणार नाही. रोझी तू जात नाहीस ? साला ही रोझी म्हणजे काही औरच.... तिचा स्पर्श किती सुखद असायचा.... लाडात आली की आपल्या हाताची लांबलचक बोटं माझ्या केसांतून हळुवारपणे फिरवायची..... नोकरी करून आलो, की घाई गडबडीत चहा करायची. राजा थकलास का रे ? असं तिनं विचारताच माझा थकवा कोठल्या कोठे गायब व्हायचा. रोझी चिडायची. तिला माझं समाजकार्य नकोसं असायचं. एखाद्या दिवशी ती स्वयंपाकच करायची नाही. भूक लागली असेल तर जा तुझ्या समाजाकडं असं ठणकावून सांगायची. मी तिला समाज, समाजाची उत्पत्ती, त्याची रचना, वर्णव्यवस्था, सामाजिक बांधिलकी, परिवर्तन, वर्गसंघर्ष, वर्णसंघर्ष समजून द्यायचो. मार्क्सवाद, आंबेडकरवाद सांगण्याचा प्रयत्न करायचो. पण हे ऐकत असताना तिला चटकन झोप यायची. एरव्ही तिला झोप यावी म्हणून मी परीकथा सांगत असे. पण मार्क्सवाद सुरू झाला की मात्र तिला झोप यायची. मला नको तुझा `मारक्या' अशा शब्दांत ती मार्क्सची हेटाळणी करायची. बाबासाहेब आंबेडकरांवरही चिडायची. तिला हवा असायचा स्वर्गातला पिता. प्रभू येशू ! सातत्यानं ती त्याचीच प्रार्थना करायची. माझ्यातला आंबेडकर आणि मार्क्स तिला सैतान वाटायचा. तो दूर व्हावा म्हणूनही ती तिच्या प्रभूकडं प्रार्थना करायची.
अरे, मी रोझी विषयीचं सर्व आयुष्य कशाला आठवतोय.... मी मूर्ख आहे..... कल्पनावादी आहे. `प्रॅक्टिकल' नाही `इमोशनल' आहे. पण कोणताही माणूस पूर्ण प्रॅक्टिकल किंवा पूर्ण इमोशनल असतो का ? अरे, पुन्हा हे प्रश्न का जन्माला येताहेत ? हे जगातील सर्व प्रश्नांच्या मातांनो तुम्ही वांझोट्या व्हाल. तुमच्या पोटी कधीही प्रश्न जन्माला येणार नाही असा शाप मी तुम्हांला देतो आहे. तुम्ही वांझोटे होण्याचा, तुमचा गर्भ मोकळाच राहण्याचा शाप देतो आहे....
``वा रे, कावळया ! काव काव करणाऱ्या !! उकिरड्यावर बसणाऱ्या. आमचा बाप होऊन ओरडणाऱ्या कावळया, तुझा शाप कधी खरा ठरतो का ?''
साला, मी कावळाच ! नाही तर काय ? अरे, पण कावळा आंबेडकरवाद सांगत नाही. मार्क्सवादही सांगत नाही. त्याला रोझीची आठवणसुद्धा होणार नाही. रोझी ! पुन्हा रोझी !! रोझीचा स्पर्श किती गोड असायचा नाही का ? तिच्या कुशीतील प्रत्येक क्षण हजार वर्षांचं आयुष्य घेऊन यावा असं वाटायचं. पण साला आपण वाटण्यावर किती काळ जगणार ? खरं तर `असण्यावर' जगायला हवं. पण हे `असणं' माझ्या वाट्याला कुठाय ? रोझी किती गच्च मिठी मारायची. श्रावणात फुलणाऱ्या पारिजातकासारखा तिच्या चुंबनांचा वर्षाव असायचा.... मला वाटतं मी खूपच वाहत जातोय.... वाहणं हा पाण्याचा स्थायिभाव. मी पाणी तर नाही ना ? पण काही असो रोझीच्या मिठीत वाहून जाणं सुद्धा काही औरच होतं....
आता मात्र मला स्वत:ला आवरणं कठीण झालंय. मी घरातील दिवे बंद करतोय. अंधाराची मला भीती वाटायला लागलीय. रोझीही अशीच अंधाराला घाबरायची. झोपताना तिच्या उशाखाली नेहमीच बॅटरी असायची. चला सुरू करा ते
दवे. घर पुन्हा एकदा उजेडानं भरलं. आठवणी विखरू लागल्या. वर्तमानकाळ भूतकाळाला करकरा चावून खाऊ लागला. मी स्वयंपाकघरात जाऊन उभ्यानंच तांब्याभर पाणी प्यालो. खरं तर अशा प्रकारे पाणी पिणं रोझीला कधीच आवडायचं नाही. साला पाण्याच्या कणा-कणातही रोझीच.....
मी हताश होतोय. पुन्हा गादीवर बसतोय. मला वाटतं रोझी माझ्याच शेजारी आहे. ती मला मिठीत घेतेय.....
हे सर्व कशामुळं घडत असावं ?
वासनेमुळं.
अतीव प्रेमामुळं.
विरहामुळं.
मला तरी वाटलं वासनेमुळंच ! खरंच माझ्यातील वासना तरी हे बोलत नसावी ? पण वासना म्हणजे काही पाप नव्हे. माणूस मोठा असो अथवा छोटा, वासना हा त्याचा स्थायिभावच. कार्यकर्ता आणि लेखक तरी त्याला अपवाद कसा असणार ? नव्या तत्त्वज्ञानाची जुळवाजुळव करतच मी उठलो. भिंतीला लटकलेली शबनम बॅग गळयात अडकवली. ती पुन्हा गादीवर फेकून दिली. खिशात हात घालून पैसे किती आहेत पाहिलं. सुमारे शंभर रुपये होते.
वेश्यावस्तीत आपल्याला कोणी तरी पाहिल्यास काय म्हणतील ? नाही, पण आपण लपत-छपत जायचं. कोणाच्या नजरेला पडायचं नाही. माझ्याच प्रश्नाला मीच उत्तरं देत होतो.
अरे, पण मी वेश्यांचे प्रश्न अनेक वेळा मांडले आहेत. नेहमी त्यांचाच विचार केला आहे. पण कार्यकर्त्याची भूमिकाही निभावली आहे. असं असताना त्यांच्याकडं आपणही इतरांप्रमाणं जावं हे बरोबर नाही. आपण आयुष्यात असं कधीच केलेलं नाही. हे आपण भलतंच काही तरी करतोय. आपल्या प्रतिष्ठेला, प्रतिमेला हे शोभणारं नाही. आता मनातच एक नवं युद्ध आकाराला आलं. युद्धात रोझी दूर फेकली गेली होती.
झक् मारली प्रतिष्ठा अन् प्रतिमा ! वासनेला नसते प्रतिमा आणि नसते प्रतिष्ठा. ती त्या पलीकडं जाणारी असते. पाप आणि पुण्यसुद्धा भंकस आहे. दुबळया मनाची ती लक्षणं आहेत. माझं दुसरं मन वासनेच्या आहारी जाऊन सांगू लागलं.
मी दुबळा नाही. खरोखर दुबळा नाही. पण दुबळेपण संपविण्यासाठी वेश्यावस्ती कशाला ?
दोन मनांचं युद्ध किती काळ चालणार ? पण मी त्याला दाद दिली नाही. युद्धातील निर्णयाची वाट न पाहताच मी घराबाहेर पडलो. दरवाजाला कुलूप लावलं. जिना उतरून खाली आलो. ताईची मुलगी अजून गाडीवरच बसलेली होती. मला बघून ती पळाली. गाडीला कीक मारली. स्टँडवरून गाडी ढकलली. गियर न टाकताच ती एक क्षण थांबवली. पुन्हा ती बंद केली. स्टँडवर लावली. पायीच निघालो. अर्ध्या एक तासांनी डोंबारवाड्यात पोहोचलो. पूर्वी या ठिकाणी डोंबारी राहायचे. नंतर वेश्यावस्ती झाली. पण या वस्तीचं नाव मात्र डोंबारवाडा असंच राहिलं. या वाड्यासमोरून मी एक हजार वेळा तरी गेलो असेन. पण यावेळी वाटणारी भीती मला कधीच वाटली नव्हती. चोर पावलांनी, अधूनमधून दोन्ही हात तोंडावर ठेवत कसा तरी वस्तीत शिरलो. मला न ओळखणाऱ्या गल्लीत शिरलो. संपूर्ण वस्ती ओठ रंगवलेल्या बायांनी गच्च भरली होती. एका वेळी १५-२० महिला मला खुणवत होत्या. गटारींच्या काठावर बसलेल्या या महिलांशी मी अनेक वेळा कार्यकर्ता म्हणून बोललो होतो. पण यावेळी मात्र त्यांच्या नजरेला नजर भिडवण्याची हिंमत होत नव्हती. अतिशय गलिच्छ वस्ती. कशा तरी तग धरलेल्या झोपड्या. त्यात मिणमिणते दिवे. झोपडीसमोर तुंबलेल्या गटारी, त्यात वळवळणारे किडे, स्वत:ला विकण्यासाठी थांबलेल्या महिला व काही क्षणाकरता त्यांना विकत घेणारे सौदागर.... काही किडे पोटासाठी वळवळताहेत. काही किडे वासना शमविण्यासाठी वळवळताहेत. शेवटी सगळेच किड्यासारखे ! मीही त्यातीलच एक !! या किड्यांच्या गर्दीत माझ्यातील लेखक, कार्यकर्ता, घटस्फोटित पती सर्व काही दूर पळाले होते. वासना शक्तिमान असते. पिशाच्च असते. वासना बंधनं तोडणारी असते. ही सर्व अधूनमधून वाचलेली वाक्य आठवत मी वस्तीतील शेवटच्या झोपडीत गेलो. त्या झोपडीत होती सुमन. नाव सुमन पण तिला कसलं आयुष्य मिळत होतं. तिनं मागितले तेवढे पैसे तिच्या हातात टेकवले.
तनं झोपडीचा दरवाजा बंद केला. फाटक्या गादीवर लांब कापड टाकून ती झोपली. माझे हात-पाय थरथरू लागले. पण आपली अवस्था सुमनला कळाल्यास ती चेष्टा करेल. हेटाळणी करेल. म्हणून मी पाय जमिनीवर गच्च ठेवण्याचा प्रयत्न केला. दोन-चार क्षण असेच गेले. मी शांत..... खांबासारखा उभा.... सुमन भडकली, ``हो सायेबा, आवरा लवकर. अजून दहा गिऱ्हाइकं करायची हायती.''
सुमन कशी यंत्रासारखी बोलत होती. काही मिनिटांपूर्वी बाहेर खुणवणारा तिचा चेहराही चेतनाहीन वाटत होता. माझ्याकडं पाहतच तिनं साडीला हात घालून ती वर करण्याचा प्रयत्न केला आणि एकदम आई%%%गं असं म्हणत ती विव्हळली. मी पुन्हा घाबरलो. काय झालं ? असं तिला विचारलं. तिनं माझ्याकडे दुर्लक्ष करीत साडी गुडघ्यापर्यंत वर ओढली. म्हणाली, ``साहेब, गेल्या महिन्यात मला चौघांनी पळवून नेलं होतं. रात्रभर त्यांनी मला भोगली. भोगणं आम्हांला काही नवं नाही. पण त्या सैतानांनी माझ्या मांडीला जळत्या सिगारेटचे चटके दिले. दोन्ही मांड्यांना जखमा केल्या. बघा तर !'' सुमननं आणखी साडी वर केली. तिच्या दोन्हीही मांड्यांवर भल्या मोठ्या आणि चिघळलेल्या जखमा होत्या. मला त्या पाहावेनात.
मी म्हणालो, ``पोलिसांना का नाही सांगितलंस ?''
ती म्हणाली, ``पोलिसांनीही एकदा असंच चटकं दिलं होतं.''
माझी नजर पुन्हा तिच्या जखमांवर खिळली. जखमी अवस्थेतच सुमन माझ्यासारख्यांच्या अनेक जणांमधील वासनेचा सैतान शांत करत होती. छे-छे आपण तरी त्या सैतानाच्या रांगेत जाऊ नये. मी काही एक न बोलताच झोपडीचा दरवाजा उघडू लागलो. तसं ती म्हणाली, ``अहो साहेब, घाबरलात काय ? अहो, आमचा जन्मच असा. पैसे दिलाच आहात तर बसा.''
``नाही, नाही मला जावं लागेल.... असं सांगून तिच्याकडं न पाहताच मी दरवाजा उघडला. पुन्हा चोर पावलांनी रस्त्यावर आलो. सुमनच्या जखमा माझ्या नजरेसमोरून जात नव्हत्या. जखमांतून बाहेर डोकावणारं मांस दिसत होतं.... सुकू पाहणाऱ्या, सडू पाहणाऱ्या जखमांमध्ये वेदनांचे हजार किडे जन्मत असतील.... वळवळत असतील असं वाटायला लागलं.... याशिवाय वासनेचे किडे वेगळे.... सुमन म्हणजे किड्यांचे पालनपोषण करणारी जणू एक दुनियाच.... विचाराच्या तंद्रीतच राजरामपुरी पोलीस ठाण्यात आलो. माझा मित्र पाटील या ठिकाणी होता. इन्स्पेक्टर होता तो. मोर्चा, आंदोलने यात मी भाग घेत असल्यानं त्याची व माझी चांगली ओळख झाली होती. त्याच्या ऑफिसमध्ये गेलो. तो हजेरी घेत होता. काही वेळ मी एकटाच बसलो. सुमनच्या जखमा मला अस्वस्थ करीत होत्या. पाटील आला. त्यानं चहाची ऑर्डर दिली. चहा येईपर्यंत मी त्याला सुमन, तिच्या जखमा याविषयी सांगितलं. त्यानं ते शांतपणे ऐकलं. तो हसायला लागला. पोलीस एखाद्याच्या जखमेवरही हसतात हे मला पटलं नाही. मी त्याच्यावर रागावलो.
तो म्हणाला, ``महाशय, तुम्हांला सुमीनं गंडविलं. अरे बाबा, आपल्याकडं येणाऱ्या गिऱ्हाइकांकडून केवळ पैसे उकळायचे पण त्याची वासना भागवायची नाही म्हणून काही वेश्यांनी असे हे नवे उद्योग सुरू केले आहेत. त्या स्वत:च जखमा करून घेतात. त्या चिघळतात. काही बायका आपण गरोदरावस्थेत असल्याचं तर काही आपल्याला व्याधी झाल्याचं खोटंच सांगतात. गिऱ्हाईकाचा पैसा हातात पडल्यावर हा प्रकार सुरू होतो. एखादा भावनाप्रधान माणूस या जखमा, या व्याधी पाहून परत फिरतो. तर काही जण या जखमांना दाद देत नाहीत. तुटून पडतात एखाद्या पशूप्रमाणे त्यांच्यावर नि त्यांच्यातील खऱ्या-खोट्या जखमांवर....
पाटीलने दिलेली ही माहिती ऐकून मी चक्रावलो. मनातल्या मनात म्हणालो, या बायकांच्या आयुष्याला झालेल्या जखमा खऱ्या की त्यांनी स्वत:हून करून घेतलेल्या खऱ्या. पण मुळात कोणत्याही कारणानं जखमी होणं, विशेषत: वासनेनं धुंद होऊन आलेल्यांपासून सुटका करून घेण्यासाठी, त्यांच्यातील पिसाळलेल्या कुत्र्यापासून सुटका करून घेण्यासाठी अघोरी मार्गानं जखमा करून घेणं केव्हाही वाईट.... हे सर्व कशासाठी चाललं आहे....
``अरे बाबा, कुठं हरवलास तू ?'' पाटलानं खडा सवाल करून माझी एकाग्रता भंग केली. शिवाय अशा भानगडीत न पडता लग्न करून घेण्याचा सल्ला दिला. चहा आला. तो घेतला. पाटलांना सलाम करून निघालो. पौर्णिमेची रात्र असल्यानं शुभ्र चांदणं पडलेलं होतं. चंद्र अतिशय सुंदर दिसत होता. पण त्याच्यावरील डाग मला सुमनच्या जखमेसारखा दिसू लागला.
मी परत घरी आलो. दरवाजा उघडला. शांतपणे गादीवर पडलो. मला माझ्या जखमा दिसू लागल्या. रोझीलाही अशाच जखमा झाल्या असतील नाही का ? सुमनच्या खोट्या आणि खऱ्या जखमा ! आयुष्यावरच्या जखमा. नाना तऱ्हेच्या जखमा. या जखमांचे परस्परांशी काही नाते असेल का ? छे जखमांना कोठे नाते असते का ? जखमा त्या जखमाच ! नाही, हे काही तरी अर्धसत्य वाटतं.... मग पूर्णसत्य काय ? प्रश्नाचं पुन्हा एक भलं मोठं वर्तुळ. ते गोल-गोल
फिरायला लागलं. अनेकांच्या जखमांवर, वेदनांवर मी कथा लिहिल्या. लेख लिहिले. काही जखमांनी मला प्रसिद्धी मिळवून दिली. पुरस्कार मिळवून दिले. पण माझ्या जखमा कोणाला दाखवायच्या ? रोझीला तर नाही ? अरे, हे तर भलतंच कोडं झालं.... हे कोडं सुटण्याऐवजी अधिक गुंतागुंतीचं होणार.... असंख्य प्रश्नांची गर्दी. मी असंख्य वेळा लाथा घालून अनेक प्रश्न जखमी केले होते.... पण साला मेलेल्या प्रश्नातून नवा प्रश्न जन्माला येतोय.... सुकलेल्या जखमेतून नवी जखम जन्म घेतेय.... हो, कितीही लाथा घातल्या तरी समोर येणारे. प्रथम पण त्यांना होणाऱ्या जखमांचीही मला दया येते. सर्वच जखमांचा हिशेब करता करता रात्र कधी संपते हे मला आजही समजत नाही.
- उत्तम कांबळे, नाशिक

प्रतिसाद

The content of this field is kept private and will not be shown publicly.
Type the characters you see in this picture. (verify using audio)
Type the characters you see in the picture above; if you can't read them, submit the form and a new image will be generated. Not case sensitive.