मृत्यू
मथूआजींच्या आजारपणाचं स्वरूप आता गंभीर झालं होतं. डॉक्टरांनीपण आशा सोडली होती. फोन केल्याबरोबर मथूआजींचे सगळे मुलगे आणि मुलगी धावत आले होते. आजींना एकूण पाच मुलगे आणि एक मुलगी. मोठा महारुद्राप्पा मुंबईला, दुसरा सदाशिव सांगलीला, तिसरा महादेव बंगलोरला, चौथा शिवलिंगा पुण्याला आणि पाचवा सोमनाथ कोल्हापूरला घरीच असायचा. मुलगी कलावती निपाणीला होती. आजींची गेली दोनतीन वर्षं आजारपणातच गेली होती. मुलं सवड होईल तशी भेटून जात होती. शंकरराव - आजोबा - आजींपेक्षा मोठे असले तरी तब्बेतीने खुटखुटीत होते. रोज वखारीत नियमित बसत होते. सगळा व्यवहार तेच बघत होते. घरचा खर्चही तेच चालवत होते. वखार आजींच्या नावावर होती, कारण ती त्यांना माहेरून वारसाहक्काने मिळाली होती. त्यामुळे घरी गेल्यावर मथूआजी सगळा हिशोब विचारायच्या आणि शंकरराव तो सांगायचे. पैसे आजींजवळ द्यायचे. सोमनाथ वखारीत काम करीत होता. कामाला तो जबरदस्त होता. पण मालकांचा मुलगा असला तरी तो मालक नव्हता. त्याला कामगारासारखा पगार मिळायचा. त्यातून त्याच्या कुटुंबाचा खर्च म्हणून आजी पैसे कापून घ्यायच्या आणि उरलेले पैसे पगार म्हणून द्यायच्या. याचंच
सोमनाथला दु:ख होतं. सोमनाथला दोन मुलीच होत्या. वखार चालवण्याचं त्याला चांगलं ज्ञान होतं. पण वयाची पंचाहत्तरी ओलांडून गेली तरी शंकरराव आणि मथूआजी सत्ता सोडायला तयार नव्हते. महारुद्राप्पा आल्यापासून सोमनाथने त्याच्या मागे भुणभुण लावली होती. महारुद्राप्पा त्याचं म्हणणं ऐकल्यासारखं करीत होता. सोमनाथला भीती वाटत होती की आई अचानक गेली तर वखारीवर आणि घरावर सगळेच हक्क सांगतील. त्याच्या आत जर निदान तिच्यानंतर तरी वखार आपल्या नावावर व्हावी. आजी दिवसातून एखादा तासच शुद्धीत असायच्या. बाकीचा सबंध वेळ बेशुद्धीतच असंबद्ध बडबड करायच्या. त्यामुळे सोमनाथचा जीव वरखाली होत होता. मथूआजींना त्याने कितीतरी वेळा सांगितलं होतं. पण फटकळ मथूआजींनी त्याला कधीच दाद दिली नव्हती. शंकरराव तर काय ! आजींच्या ताटाखालचं मांजर होते. त्यांना सोमनाथचं म्हणणं जरी पटत असलं तरी एकतर त्यांच्या हातात काही नव्हतं. आणि जरी सोमनाथ आणि त्याची बायको गिरिजा खूप चांगले वागत होते तरी एकदा वखार त्यांच्या नावावर झाल्यावर ते कशी वागणूक देतील आपल्याला याबद्दल शंकररावांना धास्ती वाटत होती. त्यामुळे ते सोमनाथच्या म्हणण्याचा पाठपुरावा करीत नव्हते. सर्वजण आजी कधी मरतील याची वाट पाहात होते. सोमनाथ मात्र आईने इतक्यात मरू नये म्हणून प्रार्थना करत होता. त्याचं एकमेव कारण वखारीवर आपलं नाव लागण्याकरिता आईची संमती हवी होती. रात्रंदिवस तो याच विचारात होता. त्याने महारुद्रप्पाची भेटही एका चांगल्या वकिलाशी करून दिली होती.
महारुद्राप्पा मुंबईला एका कापडगिरणीत सुपरवायझर होता. त्याला येऊन आता चार दिवस होऊन गेले होते. त्याचा मुलगा आता शिक्षकाच्या नोकरीला लागून चार वर्षे झाली होती. आता त्याला त्याचं लग्न करायचं होतं. आता या निमित्ताने आपण जातोच आहोत कोल्हापूरला तर त्याच्या लग्नाचंही बघू असा विचार तो आणि त्याची बायको गौराबाई करत होती. इकडे आल्यावर मथूआजींची प्रकृती बरीच गंभीर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे आत्ता आपण लग्नाचा विचार बोलून दाखवणे शोभणार नाही असे मनात येऊन वरकरणी तरी दोघेही शांत होते. इकडे येण्यापूर्वी वधूपित्यांनी त्यांना पाठवलेल्या पत्रांना त्यांनी आम्ही आत्ता तिकडेच येत आहोत असे कळवल्याने वधूपिते वारंवार त्यांच्याकडे खेटे घालत होते. एकदोनदा तर इतके लोक आले की, शेजाऱ्यांना आजींचं काहीतरी बरंवाईट झालं असावं अशी शंका आली. शहाणपण सुचून दोघांनी शेजारच्या घरात भेटायला सुरुवात केली. आता तर `आईची फार इच्छा होती' असं म्हणत त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे अमितला बोलावून घेतले आणि मुली बघण्याचे कार्यक्रम सुरूही केले. महारुद्राप्पाला या मुलाच्या अगोदरच्या दोन मुली होत्या. त्यांची लग्ने झाली होती. गौराबाई मुळातच अतिशय आळशी होती. त्यामुळे तिचं आणि मथूआजींचं नेहमीच वाजायचं. तिच्या मुली जसजशा मोठ्या होऊ लागल्या तसतशा भराभरा कामं उरकू लागल्या. आता त्यांची लग्न होऊन गेल्यामुळे गौराबाई नाइलाजाने घरकाम उरकत होती. सून आली तर तिला हवंच होतं. इथे येताना आजींचं आयुष्य तरी एकदम संपेल किंवा त्यांना लवकरच बरं वाटेल अशी दोघा नवराबायकोची अपेक्षा होती. दोन्हीपैकी काही झालं असतं तरी ते सून शोधमोहिमेला लागायला मोकळे होणार होते. पण इथे काहीच होत नव्हतं. आजींचं कोमात गेल्यासारखं अस्तित्व त्यांना कोणतीच हालचाल मनमोकळेपणाने करू देत नव्हतं. त्यामुळे ते अस्वस्थ होते. त्याचा अर्थ लोक मात्र त्यांना आजींबद्दल किती प्रेम आहे असा लावत होते.
दुसऱ्या सदाशिवचं सांगलीला किराणामालाचं दुकान होतं. त्याची बायको शैला एक दिवस आजींना बघून गेली. नंतर मुलांच्या शाळेचं निमित्त सांगून जी परत गेली ती आलीच नाही. तिला एक मुलगा, एक मुलगी अशी शाळेत शिकणारी मुलं होती. सदाशिव मात्र रात्री दुकान बंद करून रात्री मुक्कामाला कोल्हापूरला येत होता. कोल्हापूरच्या घरात लागणारं वाणसामान त्यानेच पुरवायचं असा नियम त्याला मथूआजींनी घालून दिला होता. त्यामुळे आजींच्या या आजारपणाच्या निमित्ताने आलेल्या आणि येणाऱ्या माणसांकरिता पाठवाव्या लागणाऱ्या सामानाचा खर्च आपल्याला कसा काय झेपेल याचा विचार तो करत होता. शैलाला तर पहिल्यापासूनच या गोष्टीचा राग होता. आणि आता सासू गंभीर आजारी आहे असं कळल्यापासून ती वेळ मिळेल तेव्हा सदाशिवला पटवत होती की, ``सासूबाई गेल्यानंतर आपण सामान पाठवायचं नाही बरं कां !'' सदाशिवला हे कळत होतं पण वळत नव्हतं. आपण आपल्या फायद्याकरिता आईच्या मरणाची वाट पाहात आहोत की काय या जाणिवेने त्याला अपराधीपणाची बोचणी लागत होती. मथूआजी तशी हुशार बाई होती. आपल्या मुलांचा घराशी संबंध राहावा याच उद्देशाने त्यांनी प्रत्येक मुलावर काही ना काही जबाबदारी सोपवली होती. मोठ्या मुलाने दरवर्षी आजींना दोन नऊवारी साड्या आणि शंकररावांना दोन धोतरे आणि दोन शर्टाची कापडे द्यायची असा दंडक होता. बायका कितीही कुरकुरल्या तरी आजींची मुलं त्यांचे नियम पाळत होती.
मथूआजींचा तिसरा मुलगा महादेव बंगलोरला कापडाचे दुकान चालवत होता. कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, बेळगाव इकडच्या साड्या आणून तो विकत होता. तसा त्याचा व्यापार बऱ्यापैकी होता. त्याची बायको अंजना हुषार होती. त्याला दोन मुलगे होते. अंजना फावल्या वेळात शिवण शिवून थोडेफार पैसे मिळवत होती. आता आई आजारी आहे म्हणून महादेव आणि अंजना दोघेही आपापले उद्योग सोडून ताबडतोब निघून आले
होते. दरवर्षी दिवाळीला त्यांनी घरातल्या बायकांना चांगल्यापैकी साडी द्यायची असा नियम आजींनी त्यांना लावला होता. कदाचित यानंतर आपल्याला हा प्रघात पाळण्याची गरज राहाणार नाही असा सूज्ञ विचार करून अंजनाने यावेळी नेहमीपेक्षा जास्त किंमतीच्या चांगल्या साड्या घेतल्या. दोघंही मुलगे आता आळीपाळीने दुकानात बसू शकत होते. त्यामुळे महादेव आणि अंजना निवांतपणे काही दिवस कोल्हापूरला राहू शकत होते. त्यामुळे त्यांच्या लांब राहाण्याचा राग करणाऱ्या आईला आता बरे वाटेल असं महादेवला वाटत होतं. पण कोल्हापूरला आल्यावर आई बेशुद्धावस्थेतच आहे असं पाहून दोघेही निराश झाले. आजी तर कोणालाच ओळखतसुद्धा नव्हत्या. महादेवने आठवण करूनसुद्धा अंजनाने साड्या बाहेर काढल्या नाहीत. काय काय घडतंय ते पाहून नंतरच काय ते ठरवू असं अंजनाने त्याला हळूच सांगितलं. ती घरकामात मदत करत होतीच. त्याचबरोबर ती घरातला अंदाज पण घेत होती. महारुद्राप्पाच्या मुलाच्या लग्नाची खटपट चाललेली तिला दिसली. तसेच सोमनाथची भुणभुणही तिच्या कानावर आली. सदाशिवच्या बोलण्यातून तो किती माणसं किती दिवस राहातील याचा अंदाज घेतोय हेही तिच्या लक्षात आलं. त्याचं कारणही तिने जाणलं. पण काही असलं तरी त्यांचा पल्ला लांबचा होता. त्यामुळे त्यांना कोणतीही तड लागेपर्यंत थांबणं भाग होते. महादेव जमेल तशी काही कामं करत होता. एक दोनदा तो वखारीवरही गेला होता. पण त्याचा हेतू आपली वखार बघावी एवढाच शुद्ध असला तरी त्याचे तिथे येणे शंकरराव आणि सोमनाथला आवडलेले नाही हे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे आतां तिथे न जाता डॉक्टरांना निरोप देणे, भाजीपाला आणणे, आपल्या पूर्वीच्या मित्रांना भेटणे, व्यापाऱ्यांना भेटून व्यावसायिक बोलणी करणे या गोष्टीतच तो मन रमवत होता. तसं पाहिलं तर या घरातली सांपत्तिक स्थिती फारशी चांगली नाही हे तो मनोमन जाणून होता. एकेकाळी शंकररावांची शेती, दोन इमारती आणि वखार अशी मालमत्ता होती. पण आजींच्या कठोर स्वभावाने थोडेसे दुखावलेले शंकरराव ऐन उमेदीत बाहेरख्याली झाले. वखारीकडे दुर्लक्ष झाले. कर्ज झाले. सांपत्तिक स्थिती उतरणीला लागली.
आजींनाही तोपर्यंत पत्ता नसलेल्या बऱ्याच गोष्टी कळल्या. पण सूज्ञ आजींनी स्वत:च्या स्वभावाला थोडी मुरड घालून गोड बोलून शंकररावांना ताळयावर आणले. मात्र मोठ्या प्रपंचाचा खर्च चालविण्यासाठी इमारत विकावीच लागली. त्यातून कर्जफेड तरी झाली. शेती कुळांना करायला दिली. पण ते उत्पन्न नगण्यच होते. पाचही मुलगे बेताच्याच बुद्धीचे. त्यामुळे व्यवसाय किंवा नोकऱ्याही बेताच्याच होत्या. राहायला घर होते आणि बऱ्यापैकी चालणाऱ्या वखारीवर बाकीच्या मुलांच्या थोड्याफार मदतीने घर चालत होते. आजींचा चौथा मुलगा शिवलिंगा पुण्याला एक वाईन-शॉप चालवत होता. तो चांगलं कमवत होता पण त्याचा मुलगा मतिमंद होता. त्याच्या पाठीवर झालेली मुलगी चांगली होती. पण मतिमंद मुलाला घेऊन येणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे शिवलिंगा एकटाच येऊन भेटून गेला होता. अर्थात त्याबद्दल कोणाचीच तक्रार नव्हती. कारण शिवलिंगाचा मुलगा समीर आता सोळा वर्षांचा होता. पण त्याचं खाणं अचाट होतं. त्यामुळे तो वीस वर्षांचा वाटावा इतका जाडजूड, धिप्पाड झाला होता. कधीकधी तो अनावर व्हायचा. यामुळे तो येणं म्हणजे सगळयांना संकटच वाटायचं. पुण्याला त्याला एका शाळेत घातलं होतं. तिथे तो दिवसातले आठ तास असायचा. तेवढा वेळ शिवलिंगच्या बायकोला - ललिताला - स्वस्थता मिळायची.
मथूआजींची एकुलती एक मुलगी `कलावती'. मथूआजी काळयासावळया, उंच पण जरा ओबडधोबडच होत्या. शंकरराव मात्र निमगोरे, उंच, नाकेले, तरतरीत असे होते. कलावती वडिलांच्या वळणावर गेली होती. त्यामुळे वयात येताच तिला मागण्या येऊ लागल्या. अभ्यासात तिचं फारसं लक्ष नव्हतंच. पण अजून ती लहान आहे असं म्हणत मथूआजी तिचं लग्न `दोन वर्षांनी करूया' म्हणत होत्या. पण कलावतीला रोज कुणाकुणाचे फोन यायला लागले, आईचं न ऐकता कलावती वेळीअवेळी बाहेर भटकत राहायची. काही काही कानावर यायला लागल्यावर आजी सावध झाल्या. त्यांच्या भावाने आणलेल्या वकील
कलावतीचं लग्न करून मोकळया झाल्या. कलावतीचं सासर चांगलं गब्बर होत. शेतीवाडीही भरपूर होती. कलावतीला देखरेख करण्याचंच भरपूर काम होतं. कलावती मात्र काहीतरी कारण काढून दरवेळी माहेरी आली की आईकडून काहीतरी भारी किंमतीची वस्तू उपटायचीच. नेलेल्या वस्तूच्या जोरावर तिला मोठेपणा मिरवायचा असे. आत्ताही ती आईच्या उशाशी बसून थोडीफार सेवा करत असली तरी आईच्या कुठल्या गोष्टीवर आपल्याला हक्क सांगता येईल ह्याचा विचार करत होती. मथूआजी आजारी पडल्यावर त्यांनी अंगावरचे सगळे दागिने, मंगळसूत्राशिवाय काढून शंकररावांच्या हातांत दिले होते. तेव्हा त्या शुद्धीत होत्या. त्यांनी सर्वांना बाहेर घालवले. त्यानंतर दागिने शंकररावांनी कुठे ठेवले ते कोणालाच माहिती नव्हते. आजी त्यानंतर बेशुद्धच झाल्या. कलावती मात्र पुन: पुन: आडून आडून दागिन्यांबद्दल चौकशी करीत होती. मथूआजींनी आत्तापर्यंत सुनांना कडकपणानेच वागवले होते. त्यामुळे त्या आपल्याला काही देतील असं सुनांना केव्हाच वाटलं नव्हतं. मात्र पूर्वीपासूनच मथूआजींची सर्व मुलांवर आणि एकंदरच घरावर अशी जरब होती की, त्यांच्या इच्छेविरुद्ध कोणीच वागू शकत नसे. मुलगे जरी परगावी असले तरी त्यांच्या मनातही कोणतीही गोष्ट करताना आईला काय वाटेल या गोष्टीचा विचार प्रथम यायचा. इतकी दहशत सर्वांच्याच मनात होती. त्यामुळे सुनासुद्धा मथूआजींकडून कौतुकाची किंवा काही मिळण्याची अपेक्षा न करताच त्यांची सेवा करत होत्या. मुलांनादेखील वडिलांचं चुकलेलं पाऊल कळलेलं होतं. त्यामुळे घराची जी वाताहत झाली ती सावरायला आईचंच कर्तृत्व उपयोगी पडलं याची जाणीव होती. सुनांच्या बाबतीत कडक असली तरी मथूआजींनी कोणात भेदभाव केला नव्हता. मुलांनी शिकावं अशी जरी त्यांची इच्छा असली तरी मुलांचा वकूब त्या ओळखत होत्या. त्यामुळेच जेमतेम शिक्षण संपलं की त्यांनी मुलांना काहीना काही काम करायला भाग पाडलं. उगीच लाड करत घरी बसू दिलं नाही. त्यामुळे नाइलाजापोटी का असेना मुलं स्वावलंबी झाली. हे सगळं मुलं जाणून होती.
आई आजारी आहे म्हटल्यावर सगळी मुलं आईसाठी एकत्र आली. प्रत्येकाच्या मनातला विचार वेगळा असला तरी आईबद्दलची काळजी, माया हे मूळ होतं. आईचं अनिश्चित कालापर्यंतचं बेशुद्ध असणं प्रत्येकालाच या ना त्या कारणाने गैरसोयीचं असल्याने मूळ विचाराला फाटे फुटत गेले. एकदा आजींना स्नानासाठी सुनांनी बाथरूममध्ये नेले आणि आजींचे अवयव एकदम शिथिलच झाले. सुना घाबरल्या. पुरुष धावून आले. सर्वांनी मिळून आजींना बाहेर आणून गादीवर ठेवले. एकजण डॉक्टरांना बोलवायला गेला. आजींचा देह अगदी निपचित पडला होता. तेवढ्यात महादेवाने त्यांच्या नाकाशी सूत धरून पाहिले. सगळयाजणी आजूबाजूला बसलेल्या, मुळात घर अंधारं ! सूत हललं कां नाही हे कोणालाच कळलं नाही. तोपर्यंत काहीजणींनी डोळयाला पदर लावून रडायलाही सुरुवात केली होती. इतक्यात मथूआजींनी डोळे उघडले, आणि सर्वांना शेजारी बसलेले पाहून म्हणाल्या, ``माझ्याजवळ कशाला बसलात?'' आजींचा आवाज अगदी क्षीण होता. कलावतीने तोंडाला कान लावला. तिला ते बोलणे कळले.
``अगं आई, तू पंधरा दिवस बेशुद्ध आहेस !'' कलावती म्हणाली. आजींनी ते शब्द ऐकले का नाही माहिती नाही. पण पुन्हा: त्यांना ग्लानी आली. शेजारी बसलेल्या सर्वांनी कलावतीकडे चौकशी केली. तिच्याकडे तरी सांगण्यासारखं काय होतं ? तेवढ्यात डॉक्टर आले. त्यांनी आजींना नीट तपासले. सगळं ठीक असल्याचं सांगितलं. आजूबाजूची माणसं एव्हाना जमा झाली होती. काहींनी तर ऑफिसात रजेचा अर्ज टाकला होता. कारण सर्वच मुलांनी गडबडीला सुरुवात केली होती. मोठ्या महारुद्राप्पाच्या मुलांना निरोप गेले म्हणून ते सांगली आणि मिरजेहून येत होते, मुलाला मुलगी दाखविण्याकरिता येत असलेल्या लोकांना थांबवले गेले, सोमनाथ घाईघाईने डॉक्टरांना बोलवायला गेला, एकाने शिवलिंगाला फोन केला. शंकररावांच्या घरात फोन नसल्याने त्याचा उलट फोन तिळव्यांच्या घरी आला. तिळव्यांनी शेजारच्या देशपांडेंना सांगितलं, देशपांडेनी कुलकर्ण्यांना असं शेजारधर्म म्हणून एकमेकांना सांगत दहावीसजण जमले. तोपर्यंत वखार बंद करून शंकरराव आणि कामगार पण आले. वखार घाईघाईने बंद कां केली म्हणून शेजारपाजारच्या दुकानदारांना संशय आला. असा बराच जमाव जमला. इतक्यात डॉक्टर बाहेर आले. त्यांना शेजाऱ्यांनी अडवल्यावर `अजून तरी सगळं ठीक आहे' म्हणत डॉक्टर निघून गेले आणि मग `उगीच वेळ गेला म्हणत' जमा झालेले लोक पांगले. पण जे प्रवासाच्या अर्ध्या
वाटेत होते असे कलावतीचा नवरा, सासरा, सासू, महारुद्राप्पाच्या मुली आणि जावई येऊन पोचले. शिवलिंगाला आता बायकोला सोडून येण्यासारखे नव्हते त्यामुळे तो बायको, मुलगी आणि मुलासह जरा उशिरा येऊन पोचला. सांगलीहून शैलापण आली होती. एवढी माणसं जमल्यावर आणि आजी बऱ्या आहेत म्हटल्यावर सगळयांना जेवायला घालायचं काम आलं. गौराबाई, शैला, अंजना, गिरिजा, कलावती सगळयाच भराभरा स्वयंपाकाला लागल्या. सगळयांची जेवणं होईतो संध्याकाळचे पाच वाजले. शिवाय सकाळीच असा प्रकार घडल्याने गावातले परिचित आणि नातेवाईक संध्याकाळी समाचाराला आले ते वेगळेच.
आणखी चार दिवस मथूआजी बेशुद्धच होत्या. आता मात्र जावा जावा, भाऊ भाऊ हळू हळू गप्पा मारायला लागले. महारुद्राप्पाच्या मुली चार दिवस राहाण्याचा विचार करून थांबल्या. प्रथम प्रथम सर्वांनाच आपण आजींच्या मृत्यूबद्दल इतक्या घाईघाईने सर्वांना का निरोप पाठवले याबद्दल अपराधीपणा वाटत होता. मग सर्वांनी एकमेकांची समजूत काढली. महारुद्राप्पा गौराबाईला म्हणाला, ``काय गं, तुला कसं असं वाटलं की माझी आई मेली म्हणून ? तू कां आरडाओरडा केलास ? म्हणून मी मुलींना फोन केला. केवढी फेजती झाली माझी !''
गौराबाई म्हणाली, ``मला काय एकटीला वाटलं नाही. मी सासूबाइंर्ना धरून बसले होते. अंजना अंघोळ घालत होती. त्यांनी एकदम डोळे फिरवले आणि अंग टाकलं. आम्ही दोघी घाबरलो. मग आणखी काय करणार?''
अंजना तिला पुष्टी देत म्हणाली, ``हो ना ! मी पण घाबरले. मग गिरिजाला हाक मारली. तिनं पण पाहिलं. म्हणून तुम्हांला बोलावलं.''
``बरं केलंस बाई !'' कलावती म्हणाली, ``आता उद्यापासून अंघोळच नको घालायला. इथेच अंग पुसून काढीन मी!''
``उद्या ते पाहुणे मुलगी दाखवायला आणतो म्हणालेत. काय करायचं ?'' महारुद्राप्पाने गौराबाईकडे पाहात विचारले. गौराबाई गप्पच राहिली. `उगीच आपण घाई करतोय असं बाकीच्यांना वाटायला नको' असं तिच्या मनात आलं. मग अंजनाच म्हणाली, ``येऊ देत की हो ! सासूबाइंर्चं काय आता ठीक आहे.'' तेवढीच पडत्या फळाची आज्ञा म्हणून मग दुसऱ्या दिवशी मुलगी बघायचा कार्यक्रम झाला. मुलगी अमितला पसंत पडली नाही. आणखी लोकांना निरोप द्यायचे ठरले. आजींजवळ रात्री कोणतीना कोणती सून झोपत असे. तशा सगळया बायका आजींच्याच खोलीत झोपत होत्या. आजींच्या तोंडातून मध्येच `घुर्र घुर्र' आवाज येत होते. मधेच त्या काहीतरी बरळत होत्या; एकदोनदा त्यांनी जोरात हातपाय आपटले. त्यामुळे कोणालाच नीट झोप आली नाही. गिरिजा तेवढी लवकर उठली. महारुद्राप्पा आत आला. बायकोला झोपलेली बघून ओरडला, ``गौरे ऊठ, चहा कर आधी''. गौराबाई नाइलाजाने धुसफुसत उठली. तोपर्यंत महादेव दूध घेऊन आला. हळूहळू सगळेच उठले. कलावतीला झोपलेली बघून रुद्राप्पा म्हणाला, ``ही माहेरवाशीण झोपलीय बघ अजून !'' कलावती ते ऐकून उठली आणि म्हणाली, ``आता कुठलं बाबा माझं माहेरपण ! आई होती तोवर माहेरपण!''
``अजून आई आहे, वन्सबाई !'' गिरिजा फणकारली ``आणि मी काय तुमचं करत नाही की काय ?''
``अगंबाई, आई ती आईच की !'' कलावतीचं बोलणं ऐकून खरं म्हणजे सोमनाथला राग आला होता. कारण कलावती सर्वांत जवळ आणि एकटीच मुलगी म्हणून लाडकी, म्हणून दर महिन्याला निदान चार दिवस तरी ती राहायला यायचीच. तेव्हा गिरिजाच तिचं सगळं करायची. तरीही कलावतीने असं म्हणावं हे कोणालाच आवडलं नसलं तरी सकाळी सकाळी या विषयावर वाद नको म्हणून सोमनाथ म्हणाला, ``ते खरंच आहे गं, कलाक्का ! म्हणून तर आपण सगळे इथे जमलोत. बरं, आता तू चहा घे आणि मस्त काहीतरी स्पेशल नास्ता बनव. आज आईची तब्येत जरा बरी आहे. किती तरी दिवसांनी सगळे एकत्र आलोत.'' कलावतीचा मूड बदलला. ती उत्साहाने खरंच काहीतरी करायचा विचार करायला लागली.
आज गौराबाईने आजींना स्पंजिंग केले. शैलाने कपडे धुतले. गिरिजा आणि अंजनाने स्वयंपाक केला. जेवतानाही सर्वजण खेळीमेळीने गप्पा मारत होते. जेवणाच्या वेळी एकेक सून आजींना काहीतरी पेज, खीर भरवत असे. पण आजींच्या तोंडात फारच थोडं जात होतं. आतां दर दोन दिवसांनी आजी सगळयांना घाबरवून सोडत होत्या. परंतु तोही जणू काही नित्यक्रम झाल्याप्रमाणे सगळेजण वागत होते. तरीही दुपारच्या वेळी बोलण्यात विषय निघेच.
``रुद्राप्पा, तू काय रजा वाढवून घेतलीस का ?'' महादेव
``होय रे ! पण खरं म्हणजे माझी इतकी रजा शिल्लक नाहीय. आत्ता मला खरं म्हणजे प्रमोशनचा चान्स होता. पण आतां काय होतंय कुणास ठाऊक? अमितच्याही लग्नाचं अजून जमत नाहीय. उद्या तो परत जातोय. मला पण येऊन आता पंधरा दिवस झाले की रे ! तुझं बरं आहे. निदान मुलं दुकान चालवताहेत.'' रुद्राप्पा वैतागला होता.
``अरे, कसलं बरं ! या मुलांना गिऱ्हाइकं राखायची कळतात का ? आणि वसुलीला तर मलाच जावं लागतं. शिवाय मुलं पण आता बाहेरचं जेवण जेवून कंटाळली आहेत. एकदा वाटलं अंजनाला पाठवून द्यावं. पण आईचं तर रोज नवीनच लक्षण दिसतं. काय करावं काही कळत नाही.'' महादेव सुस्कारला.
``या सोमनाथचं बरं आहे. इथल्या इथेच तो आणि बाबा वखारीत जाताहेत. आपण मात्र कामधंदा सोडून इथे हातावर हात
ठेवून रिकामे बसलोत.'' शिवलिंग म्हणाला. तितक्यात सोमनाथ आतून बाहेर येत असताना त्याने ते ऐकले. त्याला राग आला. ``अरे, मग काय इथेच असून मी काय घरात बसू का ? तुम्ही आहात की आईकडे बघायला. आत्ताच तर आलाहात. नेहमी तर मी अन् माझी बायकोच दोघांना सांभाळतो.''
``मग काय उपकार करतोस का ? घरात राहिला आहेस. तुला बाहेरच्या जगातल्या अडचणींची काय कल्पना! शेणालासुद्धा पैसा मोजावा लागतो तिथे ! आम्ही काडी काडी जमवून कसा संसार जमवला आम्हांला माहीत. आणि आई तर काय या दोन वर्षांत आजारी पडलीय. नाहीतर तीच तर स्वयंपाकपाणी करत होती.'' सदाशिव खडसावून म्हणाला. बाकीच्यांनीही थोडी थोडी री ओढली. इतक्यांत कलावती बाहेर येत म्हणाली, ``काय रे उगीच वाद घालता ! आईला मधेच जाग आली तर तिला काय वाटेल?'' तिच्या या दटावणीने सगळेच जरा नरमले. सोमनाथ मात्र धुसफुसतच बाहेर पडला. पुरुषांची अशी धुसफुस चालली असताना बायकाही एकमेकींना चाचपत होत्या.
``काय गं, अंजना, बांगड्या नवीन केल्यास का ? किती ग्रॅमच्या आहेत.'' गौराबाईने चौकशी केली.
``साठ ग्रॅमच्या आहेत. पहिल्या फारच झिजल्या होत्या ना ! मग एकदा चार वर्षांनी मुलांची लग्न झाली की कुठे आपल्याला करायला मिळणार आहे. सगळी सुनांची भर!'' अंजना म्हणाली.
``हो बाई, खरं आहे. मीसुद्धा यंदा मंगळसूत्र नवीन केलं. पहिलं दहा वर्षं टिकलं होतं. आता अमितच्या लग्नाचं जमलं तर बरं होईल बाई ! काय ललिता, या वेळेला समीर जरा शांत वाटला. आणि थोडं थोडं स्वत:च काम करतो. कसं काय झालं हे ?'' गौराबाईनं थोडं उत्सुकतेने विचारलं. कारण दर वेळेला समीर आक्रस्ताळेपणा करायचा. भरपूर जेवायचा. या वेळेला तो जरा सुस्तच होता.
``त्याला हल्ली आम्ही एका शाळेत पाठवतो. त्यामुळे थोडा सुधारलाय. पण शाळेचा खर्च महिन्याला एक हजार रु. आहे. खरं म्हणजे परवडत नाही. पण करायला तर हवाच. आणि आत्ता तो जरा सुस्त आहे म्हणजे रोजच्या गोळया आहेत ना ! त्याही महिन्याला पाचशे रुपयाच्या. तुमची कर्तीसवरती मुलं पाहिली ना म्हणजे मला त्यांचा हेवा नाही वाटत. पण आमच्या नशिबाचा राग येतो.'' ललिताला रडू यायला लागलं.
गिरिजा म्हणाली, ``रडू नका हो बाई. मुलगी तुमचं नाव काढेल. ती तरी हुशार आणि देखणी आहे ना !''
``अहो, देव कुठेतरी उणं भरून काढतो. आपल्या हातात काही नसतं.'' शैलाने ललिताला समजावले. सगळयांच्या अशा गप्पातच संध्याकाळ झाली. मथूआजींना बघायला एकेक जण गेली. एकीने त्यांचे कपडे बदलले. एकीने तोंड पुसले. आणि एकाएकी आजींना जोराची उलटी झाली. तिकडे आवरायला जाईतो आजींचे अंथरूण खराब झाले. घशातून चमत्कारिक आवाज यायला लागला. त्यांना साफ केले. पण आवाज मोठा झाला. सगळे मुलगे, नातवंडे खोलीत जमा झाली. बघता बघता आजींचा देह निष्प्राण झाला. घर हुंदक्यांनी आवाज करायला लागलं. बोलणं कोणालाच सुचेना. सोमनाथ आणि शंकरराव वखारीतून आले. सोमनाथ मटकन् खाली बसला. त्या बसण्यातही `आईने सही केलीच नाही' हा हताशपणा होता. शंकरराव गोंधळून नुसते फेऱ्या मारत राहिले. काय करावं कोणालाच सुचेना. मग शेजारचे गणपतराव डॉक्टरांना घेऊन आले. डॉक्टरांनी `आजी नक्की गेल्या' हे जाहीर केल्यावर गणपतरावांनी रुद्राप्पाला सांगून सोमनाथकडून लाकडे आणायला सांगितली. पुढच्या सगळया गोष्टी त्यांनीच पार पाडल्या. आता मंडळीही बरीच जमली होती. प्रत्येकजण आल्या आल्या दुसऱ्याला विचारत होता, ``आता तरी नक्की का ?'' खात्री पटल्यावर `आत्ता आलोच' म्हणत घरी जाऊन पोटपूजा उरकून येत होता. शिवाय `अहो, मेलेल्याला भूक नसते, पण आपल्याला आपली काळजी केलीच पाहिजे' असा गंभीर विनोद करत होता. गणपतराव रुद्राप्पाकडून सर्व गोष्टी करून घेत होते. शंकररावांना कितीही एका जागी बसवले तरी उठून ते फेऱ्या घालायला लागत, इतके अस्वस्थ झाले होते. अशा वातावरणातच सर्व विधी पार पाडून तो दिवस संपला. दुसरा, तिसरा दिवसही बधीर वातावरणातच पार पडला. आता चार पाच दिवस काही महत्त्वाचे काम नव्हते. म्हणून सदाशिव, शिवलिंगा, महादेव घरी एकदा नजर टाकून येतो म्हणायला लागले. बायका सगळया कोल्हापूरलाच राहाणार होत्या. या सगळयांच्या जाण्याला कोणीच हरकत घेतली नाही. कारण सगळे पुन: नवव्या दिवशी परत येणारच होते. कलावतीही सासरी गेली. तिच्या घरची आलेली माणसंही परतली.
चौदा दिवस पार पडल्यावर दुपारी शंकरराव मुलांना म्हणाले, ``उद्या तुम्ही सगळे जाणार, त्या आधी तुमच्या आईने माझ्याकडे एक पत्र लिहून ठेवले आहे. ते मी तुम्हांला रात्री वाचून दाखवीन. मग तुम्ही उद्या जायला मोकळे !''
शंकरराव आता बरेच सावरले होते. गेले कित्येक वर्षं आजींनी सांगायचं आणि शंकररावांनी ऐकायचं असंच चाललं होतं. काहीही झालं तरी शेवटचा निर्णय मथूआजींचाच असे. आजी अंथरुणावर पडल्या तरी सर्व व्यवहार त्याच बघत. त्यामुळे आजी गेल्यावर शंकरराव एकदम गोंधळून गेले. त्यांना निराधार, अनाथ वाटू लागले. त्यामुळे ते सारख्या फेऱ्या घालत होते. पण आता ते शांत झाले होते. मुलांनी शंकररावांच्या चेहेऱ्याकडे बघितलं. त्यांना बरं वाटलं. कारण गेले काही दिवसांची
शंकररावांची अवस्था त्यांना बघवत नव्हती. आईशिवायच्या आपल्या असहाय वडिलांना बघून त्यांच्या तरुणपणातल्या चुकीची आठवण मुलांनी केव्हाच पुसून टाकली होती. कदाचित आईच्या कडकपणाला कंटाळून वडील चुकले असावेत असे त्यांना जाणवले असावे. काही असो आईशिवाय असलेल्या वडिलांचा विचार मुलांनी आत्ता प्रथमत:च केला असावा.
संध्याकाळी चहानंतर सर्व भाऊ, सुना, कलावती एकत्र बसले. उद्या जायचं म्हणून कलावतीला रडू यायला लागलं. रुद्राप्पा म्हणाला, ``कलाक्का, रडायला काय झालं? आई नसली तरी आम्ही पाच भाऊ आहोत तुला माहेरपण करायला, रडू नकोस.'' महारुद्राप्पाला आता आपण मोठे आहोत याची जाणीव झाली होती. त्यामुळे त्याने सर्वांच्या वतीने कलावतीला आश्वासन दिले. सोमनाथची बायको गिरिजा म्हणाली, ``इथे पण नेहमीसारखं येत जा ! आई नसल्या म्हणून काय झालं ? घर तुमचंच आहे की ! वडीलपण आहेत.'' बाकीच्या वहिनींनीपण कलावतीचे सांत्वन केले. कलावतीपण शांत झाली. सगळया भावांना म्हणाली, ``यंदा तुमच्या घरी कोणतेच सण होणार नाहीत. निदान या दिवाळीला तरी सगळेजण माझ्या घरी या. कित्येक वर्षांत तुम्ही भाऊबीजेला माझ्याकडे आलाच नाहीत.'' `येऊ ! येऊ !' सगळयांनी तिला आश्वासन दिले. दिवाळीला सगळयांनी कोल्हापूरच्या घरात जमायचं हा आजींचा कित्येक वर्षांचा दंडक होता. बरीच वर्षे मुलांनी तो पाळला होता. पण हल्ली मात्र काही वर्षे प्रत्येक घरातला एखादाच कोणीतरी हजेरी लावून जात असे. बोलता बोलता आठ वाजले. शंकरराव हॉलमधे बसले. सर्वांना तिथेच बोलावून घेतलं. एका बाजूला महारुद्राप्पाला बसवलं. त्यांच्याजवळ एक बॅग होती. ती त्यांनी उघडली. त्यातून एक पाकीट बाहेर काढलं. आजींचं मृत्युपत्र होतं ते ! सर्वजण उत्सुकतेने पाहात राहिले. शंकररावांनी वाचायला सुरुवात केली.
सर्वात प्रथम शंकररावांचे नाव होते. घर शंकररावांना दिले होते. त्यांच्यानंतर ते सोमनाथला मिळणार होते. वखार सोमनाथच्या नावावर केली होती. आजींचे दागिने त्यांनी समप्रमाणात पाच सुना आणि कलावतीला दिले होते. आजींनी आत्तापर्यंत मुलांकडून जे पैसे किंवा वस्तू घेतल्या होत्या त्यांचा चोख हिशोब लिहून ठेवला होता. वखारीतल्या पैशांचा हिशोब लिहून उरलेले पैसे सहा मुलांना सारखे भाग करून दिले होते. ती रक्कमही कमी नव्हती. प्रत्येकाला सुमारे ५० हजार तरी होते. ही गोष्ट शंकररावांनाही नवीनच होती. शंकररावांनी शेतीचे येणारे पैसे घ्यावेत असं लिहून ठेवलं होतं. आईचा हा हिशोबीपणा पाहून सगळेच स्तंभित झाले. सोमनाथला तर रडूच आले. आपण आईला ओळखूच शकलो नाही हे त्याला जाणवले. `यापुढे प्रत्येक मुलाने आपआपला खर्च आपणच चालवावा. पण अडचणीच्या वेळी सर्वांनी एकमेकांना मदत करावी, आणि कलावतीची आठवण ठेवावी' असेही लिहून ठेवले होते. हे पत्र आजींनी मृत्युपूर्वी लिहून ठेवले होते. म्हणजे सुमारे एक महिन्यापूर्वी त्यांनी शंकररावांजवळ दिले होते. जणू काही त्यांना आपल्या मृत्यूची चाहूल लागली होती.
मथूआजींच्या सुनाही भारावल्या होत्या. इथे येण्यापूर्वी आपल्या नवऱ्यांना आपण किती शहाणपणाचा सल्ला देत आहोत. असं समजणाऱ्या सर्व सुना आता सासूचा मोठेपणा बघून मनोमन शरमल्या होत्या. इतके दिवस सर्वजणी सासूने `हिला काय दिलं असेल' असा विचार करत असूयेने जळफळत होत्या. पण आजींच्या मृत्यूने सर्व चित्र बदललं होतं. शंकरराव, सोमनाथ आणि सर्वच मुलांना मथूआजींचा त्यांच्या कडकपणाबद्दल राग यायचा. पण त्यामुळेच आपण सर्व मर्यादेत राहिलो याची जाणीव त्यांच्या मृत्यूने झाली. एका मृत्यूने सर्वांच्या डोळयांवरचा गैरसमजाचा पडदा दूर केला.
- मृणाल प्र. जोशी,
बेळगाव


