डोरिस लेसिंग्ज
डोरिस लेसिंग्ज - संवादी साहित्याची निर्माती
डोरिस लेसिंग्ज यांना या वर्षीचं साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळालं. त्यांच्या कादंबऱ्यांत तीव्र बुद्धिवाद, राजकीय तत्त्वज्ञान आणि अनुयायांचं काटेकोर विश्लेषण आहे. शिवाय वैचारिक जग नि संसारी जग यांच्या कात्रीत सापडलेल्यांची तडफड त्यांनी नेमकेपणानं टिपलेली आहे, त्यांच्या साहित्याचा आणि आयुष्याचा हा लेखाजोखा
डोरिस लेसिंग्जला २००७ चे साहित्याचे नोबेल मिळाले ही गोष्ट खरी, पण त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक मोल तिच्या साहित्याचे, त्यातील वैविध्याचे आहे! लेसिंग्जची एक कथा, तिच्या आत्मचरित्राचा काही भाग, आणि अगदी अलीकडील, २००७ साली प्रकाशित झालेली कादंबरी `द क्लेफ्ट' इतके थोडे लिखाण वाचूनही हे लक्षात येते. संगीतातील उपज अंगाप्रमाणे तिचे लिखाण भासते. त्यावर समाजकारणाचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव असूनही त्यातील कलाकारी, सौंदर्यमूल्य कमी होत नाहीत, हे तिच्या साहित्याचे सर्वात मोठे मूल्य माणसाच्या अंतरंगातील भावविश्व वैचारिकतेतून उलगडताना ते कोठेही कोरडे, कडवट, एकांगी किंवा रखरखीत होत नाही.
दि. २२ ऑक्टोबर १९१९ साली डोरिसचा जन्म पर्शियात (आताचे इराण) झाला. १९२५ मध्ये, शेती करण्याच्या उद्देशाने तिचे कुटुंब झिंबाब्वेमध्ये स्थलांतरित झाले. शाळा डोरिसने वयाच्या १३व्या वर्षीच सोडली. १५ व्या वर्षी घर सोडून घरगुती नर्स म्हणून कमवायला लागून त्यानंतर स्वत:चे शिक्षण स्वत: केले. याच सुमारास जिथे काम करत होती, त्यांच्याकडेच राजकारण, समाजकारणावर बरेच वाचन केले.
१९३७ मध्ये सॅलिसबरीत टेलिफोन ऑपरेटरची नोकरी केली व त्याच सुमारास लिखाणास सुरुवात झाली. त्यानंतर काही काळ ती ऱ्होडेशियात होती. वर्णविरोधी व न्युक्लिअर वॉरविरोधी भूमिकेमुळे ऱ्होडेशियातून तिला बाहेर पडावे लागले. १९४९ मध्ये सगळयात लहान मुलासह ती लंडनमध्ये आली. याच काळात तिची पहिली कादंबरी, `द ग्रास इज सिंगिंग' प्रकाशित झाली. १९६२ मध्ये तिचे वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक `द गोल्डन नोटबुक' प्रसिद्ध झाले.
१९५४ सालच्या सॉमरसेट मॉम पारितोषिकापासून ते २००७ चे नोबेलपर्यंत मोठी यादी आहे. पण त्याहीपेक्षा तिच्या लिखाणातील वैविध्य, तिच्या व्यक्तिमत्त्वातील व त्यातून साहित्यात सतत होत राहाणारे परिवर्तन लक्षणीय आहे.
कम्युनिझम, मानसशास्त्रीय संदर्भ, सूफिझम अशा व्यापक विषयांवर डोरिसचे साहित्य आहे. इडि्न्स शाह यांच्याकडून सूफिझमच्या अभ्यासाची प्रेरणा डोरिसला मिळाली.
तिला स्वत:ला, सूफिझमवर आधारित विज्ञानकथांची मालिका `क्रॅनोपस इन अरगॉस' हे स्वत:चे लिखाण सगळयात महत्त्वाचे वाटते. या लिखाणात प्रगत, आधुनिक समाजाचा एकंदर वेग, व तदनुषंगिक समस्या बहुआयामी दृष्टिकोनातून पाहिली आहे.
डोरिस लेसिंग्जला स्वत:चे लिखाण स्त्रीवादी या विशेषणात टाकून मोकळे व्हावे असे वाटत नाही. तिच्या लिखाणामध्ये आशय, शैली आणि आकारमयता यांचे एकीकरण होताना दिसते.
`गोल्डन नोटबुक' मध्ये नैराश्यातून बाहेर पडताना येणारे
आत्मभान, भ्रमनिरासाची जाणीव, व त्यातून बरे होणे ही सर्व प्रक्रिया महत्त्वाची आहे, असे तिचे म्हणणे, पण हे समीक्षकांनी लक्षात घेतलेले नाही असे डोरिसचे म्हणणे आहे. `गोल्डन नोटबुक' मध्ये अॅना वुल्फ नावाची स्त्री स्वत:ची गोष्ट ४-५ वह्यांमध्ये लिहिते. या वह्यांसाठी विशिष्ट रंग वर्णिले आहेत. काळया वहीत अॅना तिचे आफ्रिकेतील अनुभव लिहिते, लाल वहीत ब्रिटिश कम्युनिस्ट पार्टीचे अनुभव, पिवळया वहीत तिची दु:खी प्रेमकथा, तर निळया वहीत तिचे भावविश्व, स्वप्न याबद्दल लिहिते. या सर्वांचे सार सोनेरी वहीत आहे. हे लिखाण १९६० मध्ये अतिशय लोकप्रिय ठरले. अनेक भाषांमध्ये त्याचा अनुवादही झाला.
अ मॅन अॅन्ड टू वुमेन, द हॅबिट ऑफ लविंग, प्लेझर.. अशा अनेक कथा, ज्यांच्यातील काहींवर चित्रपटही निघाले. यापासून ते विज्ञानकथांची मालिका, कादंबऱ्या असे सर्वंकष साहित्य डोरिसने निर्मिले आहे.
डोरिसच्या साहित्याची यादी द्यायची म्हटले तर त्यासाठी एक पूर्ण लेखच लागेल.
२००१ साली तिचे `द स्वीटेस्ट ड्नीम' हे पुस्तक प्रकाशित झाले. वयानुसार येणारे शहाणपण आणि तारुण्यातील मस्ती, जोश हे दोन्ही यात मिळते. साठच्या दशकाने जगाला, ढवळून टाकणारे तरीही वैशिष्ट्यपूर्ण असे एक वेगळेच परिमाण दिले. या दशकातील एका कुटुंबाची गाथा यात आहे.
२००७ साली, वयाच्या ८५ नंंतर डोरिसने आपल्याला `द क्लेफ्ट' नावाची एक उत्तम कादंबरी भेट दिली आहे. वास्तव, कल्पना, माया यांच्या सीमेवरचे हे लिखाण आहे. एक रोमन सिनेटर, त्याच्या उतार वयात, भूतकाळाचे अवलोकन करताना, मानवी सर्जनाची ही महागाथा सांगतो आहे. क्लेफ्ट ही समुद्रकिनाऱ्यावरील डोंगर कपाऱ्यात रहाणारी एक आदीम काळातील स्त्रियांची वसाहत आहे. त्यांना पुरुषांबद्दल काहीच माहीत नसते. चंद्राच्या कलांवर, सागरी भरती-ओहोटीच्या आवर्तनांवर नवजन्म होत असतो. त्यांना फक्त मुलीच होतात. आणि अचानक एक दिवस मुलगा जन्माला येतो आणि त्यांच्या विश्वात खळबळ माजते. स्त्री-पुरुषांचे वेगळेपण, तरीही एकमेकांना पूरक असणे, आणि हे सर्व असूनही लिंगभावीय संदर्भ व्यक्तीवर करत असलेले परिणाम, यावर ही कादंबरी आधारित आहे.
आता यानंतर डोरिस आपल्यासाठी काय खजिना आणते त्याची वाट पाहू !
- शुभदा कुलकर्णी


