'सार्याजणी'चा स्नेहमेळावा
ऐन थंडीत, `साऱ्याजणी' च्या स्नेहमेळाव्याची ऊब
`मिळून साऱ्याजणी' च्या १८ व्या वर्धापनदिनाची क्षणचित्रं...
नजमा मणेर यांना पुरस्कारप्रदान
`कथा गौरीची' पुस्तक प्रकाशन आणि `तू दोस्त माह्या' नाटक.
अनुपस्थित असलेल्यांना हळहळ वाटावी आणि पुढच्या मेळाव्याला जरूर उपस्थित राहण्याचं ठरवण्यासाठी हा लेख.
गेली १८ वर्षं पावसाच्या साक्षीनं ऑगस्टमध्ये साजरा होणारा `मिळून साऱ्याजणी' चा वर्धापनदिन सोहळा यंदा थंडीच्या साथीनं `९ फेब्रुवारी'ला साजरा झाला. पाऊस कितीही लोभवणारा असला तरी कार्यक्रमासाठी तो गैरसोईचा ठरू शकतो, म्हणून यावर्षीपासून `फेब्रुवारी' मध्येच आपण वर्धापनदिन नव्हे तर स्नेहमेळावा साजरा करण्याचं नक्की केलंय.
गौरी देशपांडे ही साऱ्याजणींची खास लाडकी मैत्रीण... तिच्या धक्कादायक निधनानंतरचा `गौरी देशपांडे' विशेषांक बघता बघता संपला, पण तिच्याविषयीचा विचार थांबला नाही. उलट अधिक शाश्वत काही असावं या आंतरिक प्रेरणेतून `कथा गौरीची' या पुस्तकाची तयारी सुरू झाली.
वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात या पुस्तकाचं प्रकाशन ठरवलं. मौज प्रकाशन गृहानं पूर्ण सहकार्य दिलं.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा ठरल्या प्रा. पुष्पा भावे आणि प्रमुख पाहुण्या होत्या डॉ. विजया साठे.
मीमांसाभूषण डॉ. पु. बा. आणि ताराबाई साठे यांच्या स्मरणार्थ एक वर्षाआड पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या पुरस्काराच्या मानकरी होत्या फलटणच्या सामाजिक कार्यकर्त्या नजमा मणेर.
वाचक, आप्तजनांच्या भेटीच्या या वार्षिक योगाच्या वेळी एखादा सकस कार्यक्रम देण्याची प्रथा.. यंदा ललित कला केंद्र निर्मित `तू दोस्त माह्या' या नाट्यप्रयोगाचं आयोजन होतं.
वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाच्या तयारीत मग्न असतानाच बातमी आली ती बाबा आमटे या तपस्व्याच्या निधनाची.
विद्या बाळ यांनी सुरुवातीलाच बाबांबद्दल आदर व्यक्त करून ``त्यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रम सुरू करू'' असं सांगितलं.
सुषमा विजापूरकरांनी सर्वप्रथम उपस्थितांचं स्वागत केलं. कार्यक्रमाची रूपरेषा सांगून `साऱ्याजणी'च्या संपादक मंडळापैकी डॉ. गीताली वि. म. यांना प्रास्ताविकासाठी आमंत्रित केलं.
``छापील शब्दांच्या रूपानं आपली भेट होत असते आणि आपण सतत स्वत:शी नव्यानं संवाद साधत असतो, पण प्रत्यक्ष भेटीचा आनंद वेगळाच असतो. आपल्या सभोवती अनेक स्त्रिया, दलित, श्रमिक वगैरे अनेक वंचित घटकांवर अन्याय, अत्याचार होताना बघून आपलं मन निराशेनं घेरतं. अशावेळी सामूहिक कृती आणि संकल्प करण्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाची चैतन्याची आणि सामाजिक बांधिलकीची बॅटरी चार्ज करण्यासाठी स्नेहमेळाव्याचा हातभार लागतो, म्हणूनच दरवर्षी असा मेळावा आयोजित करतो.'' असं सांगून त्यांनी व्यासपीठावरच्या मान्यवरांचं स्वागत केलं.
पुरस्कारप्राप्त नजमा मणेर यांची ओळख विद्या बाळ यांनी करून दिली. नजमा मणेर या उदारमतवादी घरातून, कट्टर मुस्लीम विचारसरणी असलेल्या सासरी आल्या. सासरी थोडाफार छळ, भरपूर कष्ट आणि आर्थिक ओढाताण सहन करावी लागली. आजारपणानं नवऱ्यानं शिंपीकाम थांबवलं आणि संपूर्ण आर्थिक जबाबदारी त्यांच्यावरच येऊन पडली. तेव्हा त्यांनी वस्तीत मुलींना कुराण शिकवणं आणि बांगड्या भरण्याचा व्यवसाय सुरू केला. त्याबरोबरच मुलींना स्वच्छतेचं, बचतीचं महत्त्व शिकवणं, बँकेत खाती उघडून देणंही. थोड्या दिवसांनी बालवाडी शिक्षिकेची नोकरी लागली. विवंचना कमी झाल्या पण काम थांबलं नाही. बचतगटांच्या स्थापनेचंही काम सुरू झालं. त्यांची दोन्ही मुलं उच्चशिक्षित आहेत. एक सिनेमॅटोग्राफर आणि दुसरा इंजिनिअर. ऑगस्ट २००७ च्या वर्षारंभ विशेषांकात त्यांची सविस्तर ओळख आहे.
मीमांसाभूषण पु. बा. आणि ताराबाई साठे पुरस्काराच्या या चौथ्या मानकरी. रोख रुपये ५ हजार चा हा पुरस्कार स्वीकारताना मागच्या वेळेच्या पुरस्काराच्या मानकरी मीनाक्षी देशपांडे यांनी असं म्हटलं होतं की, पैसे इथेतिथे खर्च झाले की पुरस्काराचं काहीच शिल्लक राहत नाही. त्यांच्या सूचनेवरून यंदा नजमा मणेर यांना मानपत्र आणि रोख रु. ५०००/- चा पुरस्कार देण्याचं ठरलं.
ज्येष्ठ आहारतज्ज्ञ आणि पु. बा./ताराबाइंर्च्या स्नुषा डॉ. विजया साठे यांच्या हस्ते नजमा मणेर यांना मानपत्र आणि पुरस्कार प्रदान करण्यात आला
पुरस्काराला उत्तर देण्यासाठी नजमा मणेर उभ्या राहिल्या. मध्यम उंची, मध्यम बांधा, कुंकू नसलेलं एक टिपिकल मुस्लीम व्यक्तिमत्त्व. अगदी साधंसुधं... एका लहान गावातली, कट्टर धार्मिक कुटुंबातली स्त्री आपल्या रोजच्या जगण्याच्या धडपडीतून इतरांनाही मदत करू पाहते. पुरस्कारासाठी निवडली जाते.
प्रेक्षकांना उत्सुकता होती, बाई कशा बोलतात याची. बाइंर्नी हिंदीत बोलणं सुरू केलं. त्यांचा संघर्ष थोडक्यात मांडून, बचतगटामार्फत कशी कामं चालतात, ते विस्तारानं सांगितलं. समोर बसलेल्या दोन्ही मुलांकडे बोट दाखवत त्या म्हणाल्या, ``माझी दोन्ही मुलं आता कर्तबगार आहेत. या पुरस्काराच्या पैशाची तशी आता गरज नाही.'' असं सांगून त्यांनी ती रक्कम त्यांनी ``भारतीय मुस्लीम महिला आंदोलनाला आणि प्रगत शिक्षण संस्थेला तसेच मुस्लीम महिलांच्या संघटनेला' मदत म्हणून देत असल्याचं जाहीर केलं.
यानंतरचा कार्यक्रम होता पुस्तक प्रकाशनाचा. `कथा गौरीची' या पुस्तकाच्या संपादकांपैकी एक प्रा. वंदना भागवत यांनी पुस्तकाविषयी विचार मांडले.
``चळवळीला कृतीशीलतेची गरज असते, पण कृतीच्या मागे काही स्पष्ट विचार असण्याचीही गरज असते. आजच्या काळात एकपदरी सुस्पष्टता असणं अवघड आहे. काळं-पांढरं, चूक-बरोबर या भाषेत बोलता येत नसतं. माणसाच्या मनाची, नात्यांची गुंतागुंत वाढत चालली आहे. स्त्री-पुरुष असणं म्हणजे काय, त्यांच्या प्रतिमांची आलेखनं मनात घेऊन जगताना ती बदलायची म्हणजे काय अशा प्रश्नांची आव्हानंही वाढत चालली आहेत.'' असं सांगून ``साहित्य वाचताना केवळ त्या क्षणीच्या आपल्या भावनांचं शमन, अशा बंदिस्त भावनेनं वाचन होऊ नये तर ते अधिक अभ्यासू पद्धतीनं असावं'' अशी अपेक्षा व्यक्त केली.
गौरीच्या साहित्याबद्दलचं प्रेम त्यांनी व्यक्त केलं, त्याबरोबरच
श्री. पु. भागवतांचे संपादक म्हणून अनुभवही त्यांनी सांगितले. पुस्तकावरील चंद्रमोहन कुलकर्णींचं अतिशय देखणं मुखपृष्ठ आहे, त्याची यथार्थता वंदना भागवत यांनी उलगडून दाखवली.
प्रा. पुष्पा भावे यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन झालं. प्रा. पुष्पा भावे हे नाव घेतलं की सकस काहीतरी ऐकायला मिळणार ही खात्री असतेच.
``गौरीचं ८० पासूनचं लेखन माझ्या नजरेसमोर आहे'' असं त्यांनी म्हणताच गौरीच्या साहित्याचा पटच त्या उलगडून दाखवणार असं लक्षात आलं.
``गौरीच्या साहित्यात देश-विदेश फिरलेली, इंग्रजीवर प्रभुत्त्व असलेली उच्च आर्थिक गटातली स्त्री दिसते असा तिच्यावर आक्षेप घेतला जातो, पण पाश्चात्यवाद वेगळा आणि पाश्चात्य जीवनशैलीत रुळलेलं असणं वेगळं, तिच्या नायिका पार्टीला जाणाऱ्या असल्या तरी बिना मेकअपच्या, लांब शेपटा घालणाऱ्या नमू/कालिंदी अशी नावं असणाऱ्या असतात. पुरुष वाचकांना वाटतं, गौरीला देह इतका महत्त्वाचा का वाटतो? तिची जगण्याची संकल्पना संपूर्ण आहे. देह वजा करून कसं चालेल? ती देह प्रतीक स्वरूपात वापरते हे लक्षात घ्यायला हवं. स्त्री-पुरुष नात्यांपैकी शारीर नातंही सुंदर आहे, असं ती मानते. जे मानते ते ती धीटपणे मांडते. तिची नात्यातल्या निर्मळपणावर श्रद्धा आहे. तसेच नात्याची नितळता जपण्यासाठीचा आग्रह आहे. ती जाहीरपणे म्हणत असे, `मी स्त्री-वादी नाही' तिला कोणत्याच वादात बंदिस्त व्हायचं नव्हतं. तिचं लेखन उदारमतवादी, अभिरूचीपूर्ण जगण्याची आस तिच्या नायिकात आहे. जगण्याच्या प्रवासात ती नुसती स्त्री-पुरुष नात्याबद्दल बोलत नाही, तर एकूण जगण्याविषयी भाष्य करते. तिचा खरा आग्रह नात्याविषयीच्या अभिरूची संपन्नतेविषयी आहे.''
प्रा. पुष्पा भावे यांच्या भाषणातलं गौरीच्या लेखनाविषयीचं एक वाक्य फार सुरेख होतं, ते असं ``तिचं साहित्य म्हणजे अनेक छटांचे समुद्र'
प्रा. पुष्पाताइंर्चं भाषण हे उत्तम भाषेचं, विचारांच्या ठामपणाचं, मुद्देसूद मांडणीचं आणि गौरीच्या साहित्यावरच्या प्रेमाचं उदाहरण ठरण्यासारखं होतं.
व्यासपीठावरचे, उपस्थितातले सारेच `साऱ्याजणी'च्या परिवारातले तरीही `त्या आपल्यांचे' औपचारिक आभार विद्या बाळ यांनी मानले आणि कार्यक्रमाचा एक टप्पा संपला.
दुसरा आणि तेवढाच देखणा टप्पा होता, ललित कला केंद्र निर्मित नाटक `तू दोस्त माह्या'. नाटकाचं कथानक इथे देणं शक्य नाही. आई-वडील नोकरीला गेले की घरातल्या एकट्या मुलांची भावावस्था दाखवणारं हे आजचं नाटक, आजच्या पिढीचं. लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार सगळेच तरुण पिढीचे. नवीन शैली, उत्स्फूर्त अभिनय आणि अत्यंत देखणा प्रयोग असं त्याचं थोडक्यात पण महत्त्वाचं वर्णन. एका वाक्यात सांगायचं तर `सर्वांनी पाहायलाच हवं'!
`मिळून साऱ्याजणी' च्या वाटचालीत अनेकांचं सहकार्य, प्रेम, प्रतिसाद लाभत आला आहे. १८ वर्ष सरली, त्याअर्थी मासिक आता `तरुण' झालंय. सर्वांचा स्नेह असाच राहू दे ही इच्छा!
- नीलिमा बोरवणकर


