Skip to main content

अक्षर-संवाद : एक वेगळा उपक्रम

उन्हाळयाची सुट्टी लागली की रोजच वर्तमानपत्रात उन्हाळी शिबिरांची माहिती यायला लागते. आम्ही चार-पाच मैत्रिणी मिळून दरवर्षी मुलांसाठी निरनिराळे उपक्रम आयोजित करतो. अलीकडे बहुतेक मुलं इंग्रजी माध्यमात शिकतात त्यामुळे मराठी वाचन कमी होताना दिसते. मग यासाठी काय करता येईल या विचारातून पाच दिवसांच्या 'अक्षर-संवाद' शिबिराची आखणी केली. 'अक्षरस्पर्श' ग्रंथालय, 'किशोरमित्र' यांच्या सहकार्याने 'इंद्रधनू'ने हा उपक्रम पार पाडला. मराठी साहित्याची ओळख आणि लेखन,वाचन, संवाद यातील कौशल्य वाढवणे अशी शिबिराची साधारण रूपरेखा आखली होती.

२३ एप्रिल- जागतिक पुस्तकदिनाचे औचित्य साधून शेक्सपीअरबद्दल माहिती सांगत शिबिराची सुरुवात झाली. दहा ते पंधरा वयोगटातील ३०-३५ मुलं उत्सुकतेने सहभागी झाली होती. आशा साठे, सुधा देव आणि नयन कुलकर्णी यांनी मुलांना गोष्टी सांगत मराठी लेखकांचा, त्यांच्या पुस्तकांचा थोडाफार परिचय करून दिला. गोष्टींचे सादरीकरण करणे, चित्रे काढणे यामुळे नुसते बसून ऐकण्यापेक्षा आपल्यालाही काहीतरी करायला मिळतंय म्हणून मुलं खूप झाली. सुधाताइंर्नी कुसुमाग्रजांची 'आगगाडी आणि जमीन' कविता मुलांकडून साभिनय आणि ठेक्यात म्हणून घेतल्याने मुलांना खूष मजा वाटली.

आपण जी मराठी भाषा रोज बोलतो, तिच्याबद्दल आपल्याला खरंच किती माहिती आहे? मराठी कधीपासून बोलली जाते? मराठी भाषा कोणी समृद्ध केली? अशा प्रश्नांची उत्तरे देत मराठी भाषेचा इतिहास आशाताइंर्नी मुलांचा खेळ घेत उलगडून दाखवला. त्यामुळे मुलांना मराठीतले कवी, लेखक तसेच मराठी साहित्यामधील कथा, कादंबरी, नाटक, नाट्यछटा, प्रवासवर्णनं असे निरनिराळे प्रकारही समजले.

भाषा म्हणजे संवादाचं माध्यम. भाषा तयार होते वाक्यांनी, वाक्य असतात शब्दांची आणि शब्द असतो अक्षरांचा. अक्षरांतून, शब्दांतून होकार, नकार, राग, आनंद, आश्चर्य असे कितीतरी भाव व्यक्त करता येतात, हे पण मुलांना एका छोट्याशा खेळातून समजलं.
मुलांना आई-बाबांना काय सांगावसं वाटतंय असं एक वाक्य प्रत्येकाला लिहायला सांगितलं. त्यांच्या सर्व भावना आईबाबांपर्यंत पोहोचवण्यासाठी मग लगेच त्याची एक 'अक्षरसंवाद- आई-बाबांशी' अशा नावाची छोटी पुस्तिका तयार केली.

त्याचप्रमाणे शिक्षक कसे असावेत/ कसे नसावेत याबद्दलचे मुलांचे विचार पण जाणून घेतले. चार-पाच दिवस 'मराठी'त उत्साहाने रमलेल्या मुलांनी समारोपाच्या दिवशी गाणी व कवितांचे छान सादरीकरण केले. विशेष म्हणजे ही गाणी, कविता त्यांनी स्वत: शोधून, प्रत्येकानं कवीचं, लेखकाचं नाव आठवणीनं सांगितलं. टी.व्ही. की वाचन अशी महाचर्चाही मुलांनी घडवून आणली.

या कार्यक्रमासाठी आलेल्या विद्याताई बाळ यांनी मुलांबरोबरच पालकांशी पण संवाद साधला. मुलांनी एकमेकांना भेट म्हणून आवडलेल्या कवितेच्या ओळी लिहिलेली, सुंदर चित्रं काढलेली बुकमार्क्स दिली. हे सगळं फक्त चार-पाच दिवसांपुरतं मर्यादित न ठेवता मराठी वाचन नेहमीकरता चालूच ठेवायचं म्हणून सर्व मुलांनी मिळून 'वाचन माझा धर्म आहे, सारे वाचक माझे बांधव आहेत... वाचकांचे कल्याण आणि मराठी भाषेची समृद्धी यातच माझे सौख्य सामावलेले आहे.' अशी प्रतिज्ञा केली.

- विदुला साठे, हडपसर

प्रतिसाद

The content of this field is kept private and will not be shown publicly.
Type the characters you see in this picture. (verify using audio)
Type the characters you see in the picture above; if you can't read them, submit the form and a new image will be generated. Not case sensitive.