दादा अर्थात श्री. ना.घरातले
मृतिदिन. पं. महादेवशास्त्री जोशी, सुधाताई यांच्याशी घरगुती संबंध... विंदा करंदीकरांनी कविता ऐकवणं... नानासाहेब गोरे, आचार्य अत्रे यांसारख्या दिग्गजांशी गप्पा... साक्षात `पु.लं.'कडून वाऱ्यावरची वरात ऐकायला मिळणं... आपल्या हेवा करण्यासारख्या बालपणाच्या अनुभवांविषयी सांगताहेत `श्री. नां.' च्या कन्या.
आज तुम्ही नाहीत! तुम्ही जेव्हा होतात तेव्हा जेवढे आमच्या मनात नव्हतात तेवढे आता मनात बसले आहात. मन तुम्हीच व्यापून टाकलं आहे. मनाचा कानाकोपरा भरला आहे तो केवळ तुमच्या आठवणींनीच. काठोकाठ भरल्यामुळे मनाची हालचाल थांबली आहे, स्तब्ध झाली आहे. थोडीशी बधिरावस्था झाली आहे.
तुम्हांला निस्तेज पडलेलं पाहून मन कासावीस झालं आहे. असे तुम्ही पडून राहिलेले कधी आठवणीतच नाही. अहो, पडलात ते सुद्धा एका हातात र्ेीीं श्रेेज्ञ चा अंक व दुसऱ्या हातात पान! म्हणजे तोल गेला तरी सावरायला हात रिकामे नाहीत. शेवटच्या ह्या पडण्यातच तुमचं सर्व आयुष्य दिसतं. हात रिकामे नाहीतच. सबंध आयुष्याचं सार शेवटच्या ह्या पडण्यात प्रतिबिंबित होतं. सतत व्यग्र. हल्ली तरुण मुलांना अगदी लहान मुलांनासुद्धा काही करायला नाही म्हणून इेीश होतं. तुमच्या शब्दकोशात बोअर हा शब्द नाही. तुम्ही एक कादंबरी लिहीत असाल, २-३ कादंबऱ्यांचं कथानक तुमच्या डोक्यात रण माजवत असे. आत्ताचाच नाही तर पुढील कित्येक वर्षे वेळ कसा जाईल ? ही चिंता नाही. म्हणूनच तर शेवटपर्यंत कार्यरत होतात व एकदम हेल्दी होतात.
कुणीही गेलं तरी पोकळी निर्माण होते म्हणतात. पण मला हे निरर्थक वाटतं. असण्यापेक्षा नसण्यानेच अस्तित्व सिद्ध होत असतं. मानव नेहमीच अज्ञाताचा शोध घेत असतो. तुम्ही आता अज्ञातात गेले आहात. आम्हीसुद्धा ह्या अज्ञाताचा शोध घेण्यात रमून जाऊ. आता तुमच्या वागण्याचा, कृतीचा, बोलण्याचा (जे तुम्ही थोडंफार बोलत होतात.) अर्थ काढत बसू.
तुम्ही खरे नास्तिक होतात. देव मानला नाही म्हणजे किती नाही, संपन्नतेच्या काळात मानला नाहीत व आपत् काळात सुद्धा मानला नाहीत. जे भोग तुमच्या वाट्याला आले ते `मलाच का?' हा निरर्थक विचार न करता त्यावर लगेच तोडगा शोधण्यास तुम्ही सुरुवात करत होतात.
निष्काम कर्मयोगाचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे तुमच जगणं. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना `तो' च होता व साहित्यसेवा करतानापण `तो' च होता. तुम्ही कुठल्याच पुरस्कारांचा व मानसन्मानांचा हव्यास धरला नाहीत. ते तुमच्याकडे आपोआप चालत आले. अगदी अमेरिकेतील रॉकफेलरसुद्धा ५० वर्षांपूर्वी गोखलेवाडीतील श्रीनांना शोधत आला. सर्व मानसन्मान तुमच्या गळयात आपोआप पडले.
`आत्म्याला शांती लाभो' म्हणायची पद्धत आहे. मुळात तुम्ही आत्मा मानत नव्हतात चार्वांकासारखे. तुमचं मन सदैव अशांत असायचं. मनात सतत विचारांची खळबळ चालूच. म्हणून तर तुम्ही इतक्या सुंदर व सकस साहित्यकृती निर्माण करू शकलात. सत्य हे नेहमीच न पेलणारं असतं. त्यात सरमिसळ करावीच लागते. पण तुमचं सर्वच रोखठोक व गिलावा न दिलेलं. ते आमच्यासारख्या सामान्यांना कसं पचणार ?.
गुढी-पाडव्याला `हाक आभाळाची' ह्या कादंबरीचं प्रकाशन झाले. खरंतर शनिवारी १७ मार्चला तुम्ही पुण्याला येण्यासाठी बॅग तयार केली होती. तुमची तुम्हांलाच कल्पना आली म्हणून आयत्यावेळी येणं रद्द केलंत. तुम्ही येणार म्हणून आम्हीही उत्सुक होतो. समारंभ दृष्ट लागण्यासारखा झाला. नेहमीप्रमाणे विंदांचं काव्यगायन रंगलं. प्रत्येक वक्त्यानी ह्या वयात पेंडशांनी कादंबरी लिहिली म्हणून कौतुक केलं व आश्चर्य व्यक्त केलं. मला कौतुक जरूर वाटलं, पण आश्चर्य अजिबात वाटलं नाही. लहानपणापासून आम्ही पाहत आहोत की एकदा का तुम्ही एखाद्या विषयाने झपाटलात की ते पूर्ण होईपर्यंत रात्रीचा दिवस करून तुम्ही ते पूर्ण करणारच. `तुंबाडचे खोत' ह्या कादंबरीचे लेखन पूर्ण झाल्यानंतर अतिश्रमाने व ताणामुळे तुम्हांला पॅरेलेसिसचा अॅटॅक आला होता.
तुमच्या पहिल्या कादंबऱ्या `एल्गार' पासून `कलंदर' पर्यंत तुम्ही लेखन करत आहात असं आठवत नाही. तेव्हा आम्ही फारच लहान होतो. तुम्ही जग प्रवासाला गेलात तेव्हा अनिल ३, मी ६, व ताई ९ वर्षांची होती. त्या वयात आपले दादा हे इतरांपेक्षा फारच वेगळे आहेत ही जाणीव पहिल्यांदा झाली. त्यावेळी तुमचे झालेले सत्कार व पेपरमध्ये येणारे तुमच्याबद्दलचे लेख ह्यामुळे तुमची ओळख होत गेली. घरातले `दादा' ह्यापेक्षा पेपरमधले `दादा' मनावर जास्त कोरले गेले. नाही म्हटलं तरी त्या वयात आम्हा मुलांना जवळ घेऊन `तुम्ही कौतुक करत नाही', याची खंत होती. पण तुमच्या कर्तृृत्वामुळे ती खंत आज क्षीण झाली आहे.
`रथचक्र', `लव्हाळी', `ऑक्टोपस' तुमची सर्व नाटकं, तुमचं आत्मचरित्र हे लेखन आमच्यासमोर झालं. त्यावेळची तुमची समाधी अवस्था लेखकाची समाधी पाहण्याचं भाग्य आम्हांला मिळाले. रात्री तुम्ही नाटकातील किंवा कादंबरीतील संवाद पुटपुटायचेत. `रथचक्र'ला अॅक्रॅडमी अॅवॉर्ड मिळालं. तुम्ही व आई दिल्लीला जाऊन आलात. घरात वावरणारे `दादा' कमी व त्यामुळेच बाहेरच्यांकडून तुमची ओळख होत गेली.
एक त्र कुटुंबामुळे तुमचं व आमचं इतकं भाग्य की आमची काळजी तुम्हांला नव्हती. कुटुंबातील सर्वांनी ही उणीव भरून काढायची कसून धडपड केली. अर्थात हे एकतर्फी नव्हतं. कुटुंबातील सर्वांचंच तुम्ही अगदी मायेनं केलंत - त्याला हे चोख उत्तर होतं. एकूणच आमच्या लहानपणी मुलांचे लाड व कौतुक ह्याबद्दल आनंदी आनंद होता. ह्या बाबतीत आम्ही नशीबवान, कौतुक तुमच्याकडून नाही पण काका-काकूंकडून भरघोस मिळालं. (जरा अतीच झालं.) काही बाबतीत तुमचे निर्णय तुम्ही मुलांवर लादलेत. एरव्ही स्वातंत्र्य व मुक्ती यांचा विचार करणारे तुम्हीच का ? असा प्रश्न पडतो. हे जरी असलं तरी आई-वडील झाल्यावर आता तुमची भूमिका पाहते. तुमचं मन इतकं विशाल होतं की तुम्ही नेहमी `मराठी' माणसाचा विचार करायचात. एकूणच मराठी माणूस `राष्ट्नीय स्तरावर मागे का?' `आंतरराष्ट्नीय स्तरावर भारतीय माणूस मागे का?' तुमचे विचार कधीच कुटुंबापुरते मर्यादित नव्हते. आता पाहता असे वाटते तुमच्यापुढे आम्ही मुलेच कमी पडलो. एकेकदा वाटतं, मुलगी म्हणून तुमच्याशी नातं होतं त्यापेक्षा वाचक म्हणून तुमच्याशी संबंध आला असता तर जास्त बरं झालं असतं. तुम्हांला फोन करायचा तरी मी विचार करत असे ``अरे, आता नको, आता ते झोपले असतील.'' पण वाचक केव्हाही भेटायला आले तरी तुम्ही त्यांचे भरभरून स्वागत करत होतात.
आमच्या बाबतीत इतके संकोची असलेले तुम्ही नातवंडांच्या बाबतीत अगदी उलट. सचिन (काकांचा मुलगा) व हर्षद (नंदाचा मुलगा) ह्यांना दर रविवारी समुद्रावर नेणारे व त्यांच्यात रंगून जाणारे `दादा.' वृषाली (नात) तुमच्या मांडीवर बसून लडीवाळपणे बोलायची. हे पाहून आम्हांला समाधान वाटायचं. जे आम्हांला मिळालं नाही ते निदान ह्यांच्या वाट्याला आलं.
एवढं सांगितलं तरी काय गमावलं व काय कमावलं ह्यात कमावलेल्याचं पारड जास्त जड आहे. हा विचार केला तर जे कुणाच्याही भाग्यात नाही ते आम्हांला आपोआप मिळालं. अहो, `पु.लं.'नी वाऱ्यावरची वरात साभिनय करून दाखविली. पं. महादेवशास्त्री जोशी व सुधाताई ह्यांसारखे शांत दांपत्य अगदी घरगुतीसंबंधानी जवळ आले. विंदा करंदीकर ह्यांनी रामूभय्या दातेंवर केलेली `साठीची गझल' त्यांच्याच तोंडून ऐकण्याचं भाग्य आम्हांला मिळाले. लहानपणी त्यांची `बालगीतं' त्यांच्याच तोंडून ऐकली. अमर शेखांसारखे शाहीर ``राम राम राजा कुणबी हरिराम'' सारखी गीतं पहाडी आवाजात ऐकवायचे. डोळे मिटून व टिचक्या वाजवत तालात ते म्हणायचे. विजया मेहतांसारखी श्रेष्ठ दिग्दर्शिका नाटकांविषयी चर्चा करत. श्रीराम लागूंसारखे नटसम्राट, नाट्यक्षेत्रातील कितीतरी दिग्गज व्यक्ती आम्ही अगदी जवळून पाहिल्या आहेत. नानासाहेब गोरेंसारखे राजकारणी. आचार्य अत्रेंसारखे उत्तुंग व्यक्तिमत्त्व. शंाताबाई शेळकेंसारखी श्रेष्ठ कवयित्री, गोखलेवाडीतल्या त्या टिचभर जागेत तासन् तास दादांबरोबर गप्पा मारीत. डोक्यावर पदर घेतलेला अतिशय प्रसन्न असा त्यांचा चेहरा, आजही डोळयांसमोर येतो. त्यांचा मोठा, मोकळा व ओलावा असलेला आवाज आजही कानांत घुमतो. सुरेश पेंडसेंसारख्या पोलीस खात्यातील नामवंतांच्या तोंडून - रामन राघवसारख्या नराधमाला कसं पकडलं, हे लगेचच आम्हांला ऐकायला मिळालं. इरावती कर्वेसारखं अभ्यासू व्यक्तिमत्त्व. त्यांच्या तोंडून महर्षी कर्व्यांच्या कौटुंबिक आठवणी ऐकल्या. शिल्पकार भाऊ साठे, महादेवकाका जोशींसारखे अफाट उद्योजक (ज्यांनी फाळणी नंतर स्वत:ची रळीश्रळपश काढली होती.) किती नावे सांगू ! अशा अनेक व्यक्ती जवळून न्याहाळायला मिळाल्या. हा योग तुमच्यामुळेच आला. ह्या सर्वांच्या प्रभावामुळे आमची अभिरुची संपन्न झाली. विविध कलांमधील अभिजात सौंदर्याचा साक्षात्कार झाला. हे सर्व डोळयांपुढे आलं की कुणीही हेवा करावा असंच आमचं लहानपण गेलं हे लक्षात येतं.
आता माहिमला गेल्यावर तुमच्या खोलीतील ती कॉट रिकामी असणार; पण अजूनही भास होतच राहील की तुम्ही वाचत किंवा लिहीत आहात. तुमच्याकडे येणाऱ्या कुटुंबातील प्रत्येकाला तुमच्यासाठी वेगळा वेळ राखून ठेवावा लागे. आम्ही कुणीही आलो की, सरोज इकडे ये. एका हाताने कॉटवर थाप मारून `बस' असं म्हणून तुम्ही इत्थंभूत चौकशी करत होतात. तुम्हांला मुलांचं यश ऐकवलं की तुमचे डोळे आनंदाने चमकू लागत. पण एखादा प्रॉब्लेम कळला की त्याचा शहानिशा होईपर्यंत तुम्ही सतत अनिल, वैजूकडे विचारणा करत होतात. पण आता तुम्ही नाही. काय वाटतं ? ते शब्दात सांगताच येणार नाही. पण अतिशय निराधार वाटतंय.
- अंजली (सरोज) दीक्षित,
पुणे


