संवाद
प्रिय वाचक,
आपल्या संवादाचा हा मजकूर तुमच्यापर्यंत पोचवण्यापूर्वी महिनाभर आधी प्रवासाला निघालेला असतो आणि तो प्रत्यक्षात कागदावर उमटण्यापूर्वी आणखी एका प्रवासातून आलेला असतो. हे थोडसं पावसासारखं असतं. ढग हळूहळू जमून येतात आणि मग एका क्षणी पाऊस सुरू होतो. कधी कधी अचानकच ढग जमून येतात आणि मग पाऊस कोसळायला लागतो! संवाद सदैव ढगांचा मागोवा घेतच प्रवासात असतो.
आता हेच बघा ना! मला तुमच्याशी इतक्या घटनांविषयी आणि घडामोडींविषयी बोलायचे आहे - अगदी कालच्या दिवसापासून थोडीथोडी मागे जात सांगते. काल पुणे विद्यापीठात `समर्थ भारत अभियाना'च्या कार्यक्रमासाठी गेले होते. तिथे पोलीसदलातल्या (सी.आय.डी.) एक वरिष्ठ पदाधिकारी मीरा बोरवणकर प्रमुख पाहुण्या होत्या. आपल्या पंचवीसेक वर्षांच्या कामाच्या वाटचालीतून व्यक्तिगत अनुभवांचे दाखले देत त्यांनी स्त्रियांमधली मर्मस्थानं किंवा दुबळया जागा आणि त्याबरोबरच त्यांची बलस्थानं अगदी नेमकेपणानं सांगितली! अमराठी असूनही मराठीतलं त्यांचं बोलणं, समोरच्यांना विश्वासात घेणारं आणि आर्जवी होतंच, त्याबरोबरच त्यामागचा त्यांचा आत्मविश्वास आणि ठामपणाही प्रभावी होता. या महिला मेळाव्याच्या आधी ९ तारखेला `मिळून साऱ्याजणी' चा स्नेहमेळावा नेटकेपणानं छान साजरा झाला. त्याचा वृत्तान्त या अंकात तुम्ही वाचालच आणि त्याला जोडूनच दुसऱ्या दिवशी १० तारखेला `मिळून साऱ्याजणी' च्या प्रतिनिधींची रंगतदार, जिव्हाळयाची, निरोप घेताना अक्षरश: हुरहुर लावणारी बैठक झाली. निपाणी, बेळगाव, गोवा, नागपूर, मुंबई, नगर, ठाणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद अशा महाराष्ट्नच्या वेगवेगळया ठिकाणाहून या मैत्रिणी आल्या होत्या. त्यात दोघे मित्रही होते, सातारा आणि सांगलीहून आलेले. या सगळयांबरोबरच्या गप्पा, चर्चा यांमधून परस्परांचं नातं खरोखरीच अधिक समृद्ध आणि श्रीमंत होऊन गेलं. याचवेळी `नेटवर्क ऑफ वुइमेन इन मीडिया' या राष्ट्नीय संघटनेची, पुण्यात परिषद झाली. त्याचं उद्घाटन प्रसिद्ध नृत्यांगना आणि तेवढ्याच कणखर समाज कार्यकर्त्या मल्लिका साराभाई यांनी केलं. त्यांचं बोलणं अत्यंत स्फूर्तिदायक होतं. `आधी केले, मग सांगितले' याचा प्रत्यय त्यात होता. वृत्तपत्र, नियतकालिकं किंवा इलेक्ट्नॅनिक माध्यमांतल्या सगळयांनाच आपापल्या जागी, आपल्या जागेत खूप काही करता येईल, असा विश्वास त्यांनी आपल्या भाषणातून दिला.
या सगळया अग्रक्रमातल्या कार्यक्रमांमुळे त्याच दिवसात असलेले `पुलोत्सव' आणि `वसंतोत्सव', या पुण्यातल्या अनोख्या कार्यक्रमांची पर्वणी मला अर्थातच गमवावी लागली!
सुरुवातीला म्हटलं तसे संवादाचे खरे वेध २४ जानेवारीच्या `इंडियन एक्स्प्रेस' मधल्या पहिल्या पानावरच्या बातमीमुळे लागले! दिल्लीचे अभ्यासक योगेन्द्र यादव आणि संजय कुमार यांच्या नेतृत्त्वाखाली ४००० स्त्रियांना भेटून स्त्रियांवरच्या अत्याचाराच्या अवस्थेची पाहणी केली गेली. या पाहाणीची आखणी `सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटी' या दिल्लीच्या संस्थेनं केली होती. त्यामध्ये, दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या, तेरा महानगरांमधल्या, वेगवेगळया एकशे साठ ठिकाणच्या या स्त्रिया होत्या. त्याबरोबरच, एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्येची १७ मोठी शहरं, एक लाखाहून कमी लोकसंख्येची ११ गावं आणि ६८ ग्रामीण भागातली खेडी यांचा समावेश होता. निवडणुकीच्या याद्यांमधून सरधोपटपणे स्त्रियांची नावं बघून पाहणीतल्या सहभागी स्त्रिया निश्चित केल्या गेल्या. एकूण सहभागींमध्ये ७५% हिंदू, १२% मुसलमान, १४% दलित आणि १०% आदिवासी अशी त्यात प्रातिनिधीकता सांभाळली होती. या शोध पाहाणीसाठी एकूण ३२० जणांनी काम केलं, त्यात ८०% स्त्रिया होत्या.
हा सारा तपशील देणं मला अशासाठी महत्त्वाचं वाटतं की, त्याची पद्धत शास्त्रीय आधारावर बेतलेली आहे याची नोंद व्हावी. शिवाय नामवंत अभ्यासकांनी यावरून निरीक्षणं आणि निष्कर्ष नोंदवले असल्यामुळे त्यांची विश्वसनीयताही अधोरेखित व्हावी.
सुरक्षित समजल्या गेलेल्या घरात आणि सुरक्षित वाटणाऱ्या घराबाहेरच्या जगात, स्त्रियांच्या वाट्याला केवढा हिंसाचार येतो आणि त्यामुळेच त्यांना किती असुरक्षित वातावरणात जगावं लागतं याचा कितव्यांदा तरी प्रत्यय या
पाहाणीने पुढ्यात ठेवला आहे. हिंसाचार इतका सर्वव्यापी आहे की तो सुशिक्षित-अशिक्षित, गरीब-श्रीमंत, शहरी-ग्रामीण किंवा उच्चनीच जाती-धर्म असा भेदाभेद न करता या साऱ्या प्रकारच्या घरातल्या स्त्रियांना आपल्या पंजात पकडतो! घरातला हिंसाचार अतिशय अल्प प्रमाणात नोंदविला जातो हेही या पाहाणीनं स्पष्ट केलं आहे. स्त्रियांचं कमावतेपण हा त्यांच्या सामर्थ्याचा एक महत्त्वाचा घटक मानला जातो खरा, पण हा अभ्यास असं दाखवतो की केवळ गृहिणी असणाऱ्या स्त्रियांपेक्षा कमावत्या स्त्रियांवर अधिक अत्याचार होतात. शिवाय अत्याचार केवळ लग्नानंतर, सासरीच वाट्याला येतो असं नाही तर अविवाहितांना त्यांच्या भावाकडून, वडिलांकडूनही अत्याचार सोसावे लागतात! कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ केवळ मुकादम आणि कष्टकरी अशा रोजंदारीवरच्या स्त्रियांनाच जाचक ठरतो असं नाही तर शहरी किंवा संघटित क्षेत्रातल्या स्त्रियांनाही लैंगिक छळवादापासून सुटका नाही. अत्याचारांची कारणमीमांसा करताना, सैलपणे आणि सर्रास केलं जाणारं विधान स्त्रियांच्या निमंत्रक पोषाखाकडे बोट दाखवतं पण या अभ्यासानं हे स्पष्टपणे नमूद केलं आहे की उलट अशा प्रकारचे पोषाख न घालणाऱ्या, स्त्रियांनाच शाब्दिक आणि शारीरिक अशा दोन्ही पातळयांवरच्या लैंगिक छळाशी सामना करावा लागतो! स्त्रियांना भोगाव्या लागणाऱ्या हिंसाचारासंदर्भात अनेक समज-गैरसमजांची सगळीकडे बजबजपुरी दिसते. त्यावर हा अभ्यास लख्ख प्रकाशझोत टाकणारा आहे, म्हणूनच त्याबाबत या महिलादिन विशेषांकात बोलणं फार महत्त्वाचं आहे. आपल्या सभोवतीच्या किंवा ओळखीच्या पाच-पंचवीस कुटुंबांकडे बघून, घाईघाईनं व्यापक निष्कर्ष काढण्याची अनेकांना सवय असते. त्या छोट्याशा जगातल्या, इवल्याशा अनुभवांवरून मग एकदम सकारात्मक उद्गार काढले जातात. उदा. आजकाल पुरुष खूपच घरकामात मदत करतात, स्त्रियांना नाही हो आता छळाला तोंड द्यावं लागत, छान पगाराच्या नोकऱ्यांमुळे आता स्त्रियांना भरपूर निर्णयस्वातंत्र्य असतं - इ. इ. किंवा नकारात्मक उद्गारांमध्ये - `४९८ अ' च्या इतक्या खोट्या तक्रारी करतात हो स्त्रिया, किंवा आता सासुरवास संपून सूनवास असतो घरोघरी इ. इ विधानं ऐकू येतात. या सगळयात थोडं तथ्य नक्कीच आहे. पण एवढ्या अल्पसंख्य अनुभवांवरून काही कोटी लोकसंख्येबाबत ठाम विधानं करणं अशास्त्रीय आणि चूकच आहे. हे आपण सगळयांनी समजून घ्यायला हवं. बलात्कार, सासरचा छळ, कामाच्या ठिकाणचा लैंगिक छळ आणि कुटुंबांतर्गत अत्याचार या संदर्भात गेल्या काही वर्षात, काही कायद्यात सुधारणा झाल्या तर काही कायदे नव्यानं मंजूर झाले आहेत. त्यावरून अनेक घरातले पुरुष अस्वस्थ झाले आहेत. त्यांना असुरक्षित वाटतं आहे. त्यांच्या मनातलीही भावना समजण्यासारखी असली तरी मुळीसुद्धा समर्थनीय नाही. आजवर घरीदारी सर्वत्र, श्रेष्ठ आणि वरचढ स्थानावरून वागा-बोलायची सवय असल्यामुळे, त्याला पायबंद घालणारे कायदे त्यांना खुपणार, टोचणार हे खरं. विविध नात्यात आपल्या कुटुंबात आणि समाजात आपल्याबरोबर वावरणाऱ्या स्त्रिया या माणसंच आहेत आणि त्यांना आपल्याइतकाच माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे. हे समजायला पुरुषांना खूपच उशीर झाला आहे. त्यामुळे ते स्वत:ही माणूस होण्याऐवजी पुरुष म्हणूनच जगताहेत आणि स्त्रियांनाही माणूसपणाच्या पातळीवर पोचायला आडकाठी करताहेत. यात ते `पुरुषार्थ' गाजवत असले तरी माणूसपणाचा धर्म गमावताहेत! हे कठोर शब्द लिहिताना, याला सन्माननीय अपवाद आहेत याची मला जाणीव तर आहेच पण त्यांच्याविषयी माझ्या मनात नितांत आदराची भावना आहे.
आंतरराष्ट्नीय महिलादिनाच्या निमित्तानं, आपण `साऱ्याजणी' एकमेकींना साथ करत, सामाजिक परिवर्तनासाठी काही ना काही करत राहण्याचा निश्चय करू या आणि त्यासाठी शुभेच्छा देऊ या.
फेब्रुवारीच्या माझ्या संवादात वीणा गवाणकर यांच्या पुस्तकांचा उल्लेख करताना, माझ्याकडून गफलत झाली. त्यांची पुस्तकं अनुवाद नसून अनेक संदर्भ पुस्तकांवरून त्यांनी स्वत: लिहिलेली ती चरित्रं आहेत! या चुकीबद्दल मी दिलगीर आहे.


