सांज सकाळपुरती माय
वैशाखातल्या कडक उन्हाच्या भडक्यात मातीचं ऊर तडकून जात होतं, अशा वेळी साधन कांदोरीची माय देवी जटेश्वरी मरून गेली.
मरण्यापूर्वी जटीचं पोट फुगून नगारा झालं होतं. दोन बांबूंना दोरी बांधून झोपाळयासारखी खाटुली तयार करून साधन तिला इस्पितळात घेऊन गेला होता; पण जटी सारखी म्हणत होती-
'मला इस्पितळात नको ठेवू रे, साधन,! तिथं डोंब लोक नाड्याबिड्या ओढूनताणून चिंध्या करून टाकतात, बापा!'
'डाक्तर म्हणतो, इस्पितळात घेऊन जा.'
'बापू रे माझ्या, तिथं नेऊन माझ्या चिंध्या नको करू रे!'
'कोणी काही नाड्याबिड्या कापत नाही, माय.'
'कापतात बाबा, कालचा पोरगा तू! अजून ओठ पिळला तर दूध निघेल. तुला काय माहिती? डोंब नाड्या कापतात, आतडी काढतात अन् डाक्तरलोक ती आतडी बाटलीत भरून ठेवतात.'
'पण कशासाठी गं माय?'
'अरे माझ्या बाळा, तुला नाही कळणार ते! या कलियुगात मेल्या माणसाचं शरीर जाळायसाठी, गाडायसाठी नसतं रे, माझ्या सोन्या!'
'ए माय, काय बडबडते तू?'
'बोलू दे बापा! तूच सांग, कोणी नात्यागोत्यातलं, ओळखीचं माणूस मेलं तर त्यांच्या समाजाची जबाबदारी असते, घेऊन जातात की नाही?'
'बोल तू.'
'अरे ते डाक्तर- डोंब- दाया सगळे गिधाडासारखे टपलेले असतात.'
'माय!'
'खरंच रे, टपून, नजर ठेवून असतात, अन् मग एखादी बेवारस लाश मिळाली, की सगळे भागीदार होतात. डोंब नाड्या-आतडी काढून डाक्तरला देतो, दाया कपडे वगैरे सामानसुमान घेतात अन् मग डोंब लोक ती लाश सडवून हाडं विकून पैसा कमावतात.
'हट्, पण मी असताना असं कसं होऊ देईन?'
'नकोच होऊ देऊ, बापा! मी तुझी सांज-सकाळपुरती माय, मला इस्पितळात मरू देऊ नको.'
'तू चूप बस आता!'
साधननं मायला धमकावलं नि उठला. याच जटीनं कधीकाळी त्याला जन्म दिला होता. फार प्राचीन जात होती तिची. ते लोक जराव्याधाचे वंशज. पारधी जातीचे. त्याच वंशातल्या जटीनं साधनला नऊ महिने, नऊ दिवस पोटात वाढवलं होतं.
कशी काय एक जन्मदात्री आई फक्त सांज-सकाळपुरतीच आई होऊन जाते, ती एक अद्भुत अन् विलक्षणच कहाणी!
साधन दीड वर्षांचा होता तेव्हापासूनच जटीच्या अंगात देवीचा संचार होऊ लागला होता. तेव्हापासून ही जटी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत देवी जटेश्वरी होऊन जात असे. या काळात कोणीही तिला आई-बहीण म्हणू शकत नसे. तसा नियमच होता. साधनलाही तिनं समजावून सांगितलं होतं. 'मला माय नाही म्हणायचं बाळा, समजलं?'
'कधीच नाही?'
'नाही रे माझ्या सोन्या, खूप पहाटे सूर्य उगवेपोतर माय म्हणायचं अन् पुन्हा सूर्य डुबल्यावर म्हणायचं, दिवसा नाही.'
'असं कसं गं माय! फक्त सकाळी व संध्याकाळी तू माय, अन् दिवसा देवी?'
'असंच बापा, मी तुझी फक्त सांजेपासून सकाळपर्यंतची माय.'
हीच सांज-सकाळपुरती माय जटेश्वरी कशी काय जादवपूरच्या रेल्वेलाइनपर्यंत येऊन पोहोचली अन् तिनं कसं मुलाला वाढवलं- त्या खूपच गोष्टी!
साधन कांदोरीला आई सोडून काही माहीतच नव्हतं. ती म्हणेल ती पूर्वदिशा! आता तो तीस वर्षांचा झाला तरी मतिमंदच. फक्त एक रेड्यासारखं आतडं सोडलं तर दुसरं काहीच नाही. फुफ्फुसं, लाल जास्वंदीसारखं हृदय, सर्पासारख्या सळसळीत शिरा, पहाटेच्या फुलासारखा अंडकोष वगैरे सर्व नाममात्र, पोटातलं आतडंच तेवढं सजीव.
आणि भूक, प्रचंड भूक. नुसतं खायला घालण्याचा लोभ दाखवून त्याच्या मालकाची बायको त्याच्याकडून लाकडं फोडून घेते, ट्यूबवेलचं पाणी उपसून भरून घेते, मणमण दगडी कोळसे फोडून घेते. ही मालकाची बायको म्हणजे घुंगट घेऊन वावरणारी सुंदर तरुणी. जटी म्हणे-
'मालकिणीकडे बघत जाऊ नको, साधन.'
'नाही माय.'
'कधी बघावंच लागलं तर मातृभावानं पाहायचं, समजलं नं?'
'हो माय?'
आई जे म्हणे त्याला साधन होकार देई. आईच त्याचं विश्व नि चंद्र-सूर्य! तीच आई जेव्हा तापानं, आवेनं, कफ-पित्तानं आजारी पडून फुगू लागली तेव्हा साधननं मालकाजवळ पहिल्यांदा पैसे मागितले.
'कशाला रे?'
'माय मरायला टेकली, मालक.'
'काय झालं? आजारी आहे का?'
'हो मालक, मायला दिवसाउजेडी अंधार दिसतो, मीठ खाल्लं तं बत्तासा खाल्ला म्हणते, आज तर भर दुपारी मला म्हणे की, माय म्हणून हाक मार, साधन.'
'असं म्हणाली?'
'होय मालक, डाक्तरला दाखवावं लागंल, मला पैसे द्या.'
मालकानं त्याला दहा रुपये देऊन म्हटलं, 'आईचं औषधपाणी कर, साधन. किती झालं तरी गर्भधारिणी माता ती.'
'माझी माय साधी बाई नाही मालक, ती देवी आहे.'
'बरं, तू डॉक्तरला दाखव.'
अनादि नावाचा एक डॉक्टर पूर्वी याच वेटाळात राहात असे; पण तो ज्याचं औषधपाणी करे तो रोगी मरून जाई, म्हणून कॉलनीतल्या लोकांनी त्याला मारमार मारून इकडून हाकलून लावलं होतं. अनादि डॉक्टरनं आता रेल्वेलाइनच्या पलीकडे दवाखाना उघडला होता अन् चांगलं नावही झालं होतं त्याचं आजकाल. कारण तो आता खून वगैरे झालेल्या मृतांना 'डाइड ऑफ हार्ट फेल्युअर' असं सर्टिफिकेट देऊन स्मशानाची वाट सोपी करून देत असे. तिकडे स्मशानात काम करणाऱ्यांनाही अलीकडे थोडे पैसे चारून विकत घेता येतं. हीही एक सोयच!
अनादि डॉक्टरची चांगली भरभराट होईल असं भविष्य देवी जटेश्वरीनं वर्तवलं होतं. म्हणूनच असेल कदाचित; पण हा खूष भ्रूणहत्या, गर्भपात, खोटी सर्टिफिकेटे देणे वगैरे कामं सर्रास करणारा डॉक्टर. पापाच्या भीतीनं देवी जटेश्वरीच्या दर्शनाला येत असे. ब्राह्मण जातीचा हा डॉक्टर देवी जटेश्वरीचे पाय धरत असे आणि तेल, नारळ, तांदूळ, मीठ असं बरंच काही तिच्या पायाशी ठेवून जात असे.
साधननं बोलवताच हाच अनादि डॉक्टर लगबगीनं जटीला बघायला आला. जटीच्या खोलीत खूपच घाण येत होती. लाकडी पलंगावर देवी जटेश्वरी परीकथेतल्या राक्षसिणीसारखी हात-पाय पसरून उताणी पसरलेली. पोट फुगून टम्म. फक्त जटेश्वरीच्या डोळयांत मात्र अतींद्रिय दृष्टी. चिपडानं लडबडलेल्या डोळयांत इतकी सुंदर दृष्टी असू शकते हे अनादि डॉक्टरनं कधी पाहिलं नव्हतं.
अनादि थबकला. नाडी बघून अन् फुगलेलं पोट बघून त्याच्या डोळयांत पाणी आलं. त्याला आठवलं की यावर्षी फक्त एकदोनदाच तो पापक्षालनासाठी जटेश्वरीकडे आला होता.
'मा, मोठं पाप झालं, मा!' म्हणाला.
दिवसाढवळया कोणीही जटीला मा म्हणू शकत नसे, देवी जटेश्वरीच म्हणावं लागे. म्हणूनच अनादि डॉक्टर रात्रीच्या अंधारात, काळया कापडानं तोंड झाकून आला होता.
'काय पाप झालं, बाबा?'
'ती पोरगी मरून गेली, मा!'
जटी म्हणाली होती- 'अरे, महापापी होती ती. तुला कळणार नाही, पण तिचा आत्मा घेऊन आता यमदूत धांगडधिंगा घालत असतील. महापाप करून बापाच्या तोंडाला काळं नाही फासलं तिनं? चांगल्या घरची पोर अन् असली घोडचूक!'
'आता काय होईल, मा?'
'हे घे बाबा, हा ताईत घे. त्यात घोरपडीच्या कंठाचं हाड आहे. उशीखाली ठेवत जा झोपण्याआधी. अन् करकरीत संध्याकाळी घरात गंगाजळ शिंपडत जा, समजलं नं?'
अनादिसारख्या पश्चात्तापदग्ध माणसांसाठी गर्भातच मेलेल्या पोरांची नखं, घोरपडीच्या कंठाचं हाड, करकोच्याच्या चोचीचं तेल वगैरे कोण देणार आता? आता त्याच्या बदल्यात पैसा नाही अडका नाही, फक्त पायलीभर तांदूळ घेत असे देवी जटेश्वरी. मग सूर्यास्तानंतर तीच साधनची माय व्हायची. देवीरूपात मिळालेले तांदूळ रांधून भात करायची अन् आपल्या बावळया पोराला खाऊ घालायची.
आता या अनादिला कोण तारणार? दु:खानं त्याच्या डोळयांत पाणी आलं. म्हणाला- 'साधन, इस्पितळात भरती करून बघ, मला काही देवीच्या तब्येतीचं निदान होत नाही.'
अनादिनं पैसे दिले. टॅक्सीतून घेऊन जा म्हणाला,
साधनची इतकी घाबरगुंडी उडाली की तो धावतच मिठाईच्या दुकानात गेला. दु:खानं भारावलेल्या अवस्थेत त्यानं दुकानातच बसून चुरमुरे-बत्तासे-खाजं वगैरे खाल्लं आणि घटाघट गाडगंभर पाणी प्याला.
कोणी टॅक्सीवाला जटीला घेईना, म्हणे 'मुर्दी है, गाडीमे मर जाएगी.'
मग साधनच्या मालकानं त्यांच्या बाबूंच्या वनातले दोन बांबू दिले. त्याला दोरी बांधून झोळण्यासारखी खाटुली तयार करून साधन तिला बांगूरच्या इस्पितळात घेऊन गेला.
इस्पितळ म्हणजे अचाटच! किती इमारती अन् किती माणसं! साधन बलरामला म्हणाला- 'बलरामदादा, भीती वाटते रे, हातापायात गोळे आलेत, इथं इतके दरवाजे, कोणत्या दारातून न्यायचं रे मायला?'
'तू म्हणजे एक विचित्रच आहेस, साधन.'
बलराम, जगदीश आणि उद्धव जाऊन डॉक्टरला घेऊन आले. 'बुढी मरायला टेकलीय' म्हणत डॉक्टर तिला भरती करणार नव्हते, तोच साधन जोरजोरात रडत डोकं छाटलेल्या बळीच्या बोकडासारखा जमिनीवर गडबडा लोळण घेऊन तडफडत म्हणू लागला- 'देवी आहे ती. तिला वाचवा, डाक्तर. तिच्याशिवाय माझ्यापुढं सगळा अंधारच अंधार! माझी सांज-सकाळपुरती माय ती! केस पिकले माझे, तरी जिवापाड लाडकोड पुरवायची, आपण उपाशी राहून मला खाऊ घालायची.'
'काय बोलतोस काही कळत नाही.'
'डाक्टरबाबू, डाक्तरबाबू!' साधन किंचाळत होता.
बलरामचं सासर इथेच कुदघाटात. कॉलनीत राहणारा माणूस तो. प्रतिष्ठित लोकांना पाहून तो घाबरून जात नाही. गरीब होता तेव्हा अन् आताही त्याचा स्वभाव शांत. धलेश्वरी नदीचा थंडपणा आणि धानशेतासारखा नम्र साधेपणा होता त्याच्या स्वभावात; पण आता कॉलनीत घर, स्वत:चा रिक्षा आणि बारूईपूरला शेतजमीन खरीदल्यापासून मात्र तो पार बदलून गेलाय. आता पांढरपेशा लोकांचं गोडगोड, गुलूगुलू बोलणं ऐकलं की त्याला थुंकावंसं वाटतं. बलराम समजून चुकलाय की आता हा बंगला सबुरीचा नाही. मगरुरीचाच!
तो पुढे झाला. ठसक्यात पण शांतपणे म्हणाला- 'त्या सामान्य बाई नाहीत, डॉक्टर. दैवी अंश आहे त्यांच्यात. आम्ही त्यांना देवी मानतो, धर्मपूजेचा मान व टोपलीभर दान देतो. शीट असंल तं भरती करून घ्या नं, सर! शीट तर काही तुमची नाही, माझी नाही, सामान्य माणसांसाठीच आहे का नाही?'
अखेर जटेश्वरी इस्पितळात दाखल झाली.
साधनचं रडणं-भेकणं ऐकून डॉक्टरांना वाईट वाटलं नि जरा संकोचल्यासारखंही झालं. कारण एवढ्या मोठ्या जवान पुरुषाला आईसाठी इतकं रडताना त्यांनी कधी पाहिलं नव्हतं.
'देवी वाचेल नं डाक्तरबाबू?'
'बघू साधन, इतका उतावीळपणा करू नको.'
'तिला काही रोग नाही, बाबू, ती माणूस नाही, देवी आहे. रोग तिच्याजवळ यायलाही घाबरतात.'
'बरं बरं, ठीक आहे.'
'दिवसभर तिच्या अंगात देवी येते, डाक्तरबाबू! फक्त सकाळी अन् संध्याकाळी ती माझी माय होते. सकाळी गंगेवर स्नान करून रंगीत साडी नेसली की देवता होऊन जाते. तेव्हा सर्वांसारखाच मीपण तिला देवता मानतो, बाबू!'
'असं होय?'
पण 'माय' म्हणण्यासाठी माझा जीव तडफडत राहतो, बाबू. सारखं वाटतं, केव्हा एकदा सायंकाळ होईल न मी तिच्या मांडीवर डोकं ठेवून 'माय-माय' म्हणून मन शांत करीन.
डॉक्टर आश्चर्यचकित होऊन साधनकडे बघतच राहिले. नर्स हसून थट्टेनं म्हणाली- 'तुझं एवढं मोठं डोस्कं तिच्या मांडीवर ठेवतोस?'
साधन गंभीरपणे बोलला- 'हो जी, डोकं ठेवतो; माय-माय म्हणतो, खूप लाडावून घेतो. दिवसभर तिच्याभोवती भक्तजनांची गर्दी असते; पण रात्री फक्त ती आणि मीच.'
'बरं, दिवसा काय खायची तुझी माय?'
'मला काय ठाऊक, बाबू? असंच थोडा चहा म्हणा की गंगाजल म्हणा, देवतेच्या शरीराला भात लागतच नाही.'
'आणि संध्याकाळी?'
'भात रांधायची, मला वाढायची पण ती एवढंसं लहान पोरासारखं खायची.'
'म्हणूनच हा रोग झालाय, साधन.'
'नाही बाबू, देवीच्या शरीरात रोग कसा शिरेल? मला तर वाटतं की कोणीतरी दुष्टानं करणी केली तिच्यावर.'
'बरं, पाहतो आम्ही.'
'डाक्तरबाबू!'
'बोल.'
साधन पायाखालची माती टोकरत म्हणाला 'इस्पितळात तर तुमच्या इथं लक्ष्मी राहते, बाबू. भाताचा डोंगर अन् वरणाचा समुद्र. माय तर काहीच खात नाही, बाबू, तर तिच्या वाटणीचा भात मला घालाल का?'
'ते कसं शक्य आहे, साधन!'
डॉक्टर दिङ्मूढ होऊन साधनकडे बघतच राहिले. माणसाच्या शरीरात पशूसारखी इतकी सरळ, निरागस प्रवृत्ती त्यांनी कधी पाहिलीच नव्हती.
जटीवर काही इलाज होऊच शकला नाही. 'तिला झालं तरी काय?' म्हणून साधननं डॉक्टरचं डोकं खाल्लं; पण डॉक्टर तरी काय सांगणार? त्यांनी जटेश्वरीला ग्लुकोज दिलं, सलाइन दिलं, अन्ननलिका सुकली होती म्हणून नळी लावून अन्न देण्याचा प्रयत्न केला. सर्व प्रयत्न झाले पण जटीची प्रकृती काही सुधारली नाही. मधूनमधून शुद्धीवर आली की ती म्हणे- 'साधन रे, माझ्या बापा रे, मला इस्पितळात नको ठेवू. डाक्तर नाड्या कापून घेतील, डोंब हाडं-कवटी विकून खिसे भरतील. मला घरी ने बाबा, साधन.'
तिसऱ्या दिवशी डॉक्टरांना तिच्या रोगाचं निदान करता आलं. फारच भयंकर लागट रोग हा. आजपर्यंत या भारतभूमीत यावर उपाय नाही. रोगाचं नाव- उपासमार. स्वत: काही न खाता उपाशी राहून खादाड साधनला खाऊ घालताघालता जटेश्वरीच्या सर्व नाड्या पार सुकून गेल्या होत्या.
'अरे, हा दैवी रोग आहे साधन, यावर काही उपाय नाही,' डॉक्टर जरा कडवट थट्टेनं म्हणाले.
'मग घेऊन जाऊ तिला?'
'घेऊन जा.'
जटेश्वरीही डोळे उघडत म्हणाली. 'अरे बावळया पोरा साधन, माझा जन्मवृत्तांत तुला काय माहीत रे! कुठल्या कुळातली मी? घरी घेऊन चल, तिथेच देह सोडीन मी.'
बलराम, जगदीश, साधन व आणखी चारपाच जण जटेश्वरीला परत घरी घेऊन आले. जटीच्या घरासमोर एक कडुलिंबाचं झाड होतं, त्या झाडाखाली तिला ठेवलं, सर्वजण म्हणाले की ही लिंबाची सावली चांगली असते साधन, आम्ही आहोतच बाजूला, तू तिच्याजवळ जाऊन बस. त्यांच्या सांगण्याप्रमाणे साधन जटेश्वरीजवळ जाऊन बसला.
'एखाद्या ब्राह्मणाला बोलाव, साधन!' जटेश्वरी म्हणाली.
'आहे, ब्राह्मण आहे.'
'कोण?'
'अनादि डाक्तर.'
अनादि जटेश्वरीजवळ येऊन बसला. साधनला गहिवरून येत होतं. 'काही तरी बोल माय, माझी सांज-सकाळची माय तू, बोल!' साधन कळवळत होता.
जटीला शेवटची शुद्ध आली नि ती बोलू लागली- 'तुझा बाप कांदोरी, रानावनात राहणारे, गवताच्या ताट्या विणणारे लोक तुम्ही. बुरूड जातीचे.'
'आणि तू?'
'मी?'
आकाशात सूर्य तळपत होता, सकाळचे दहा वाजलेले. जटी चांगली होती तेव्हा ती या वेळी देवी होऊन घरात ध्यानस्थ बसायची, दर्शनाला येणाऱ्या लोकांची पूजा ग्रहण करायची. आता साधनला वाटतंय की मायनं आपल्याला जवळ घ्यावं.
जटीलाही वाटतंच आहे, की साधनला जवळ बोलवावं; पण ती तसं म्हणू शकत नाही. तिच्या चहूकडे भक्तजनांची गर्दी. माणसंच माणसं. ते तिच्यापाशी जात, नमस्कार करत आणि हळहळत. याच लोकांनी वर्षानुवर्षे पायली-पायली तांदूळ देऊन साधनला जिवंत ठेवलंय. जटी तर स्वेच्छेनंच देवी होऊन बसली होती, आता दिवसाडजेडी सर्वांसमोर तिला देवीरूपातच मरावं लागणार.
साधननं तिला भक्तिभावानंच विचारलं होतं की तू कोण? त्याचा बाप कांदोरी, गवताच्या ताट्या विणणारा तर जटी कोणत्या समाजातली? साधन, बलराम, जगदीश सगळेच भोवती गोल वर्तुळ करून बसले.
'तुम्ही दूरच रहा, बाबांनो, तुम्ही वरच्या जातीचे, खूप वरचे.'
'आणि तू?'
'माझा इतिहास खूपच विचित्र आहे रे, आमचा आदिपुरुष जराव्याध, नाव ऐकलंय?'
'जरा- व्याध?'
अनादि डॉक्टर घाबरला, म्हणू लागला 'भयंकर भ्रम झालाय त्यांना, अशा रोग्याला इस्पितळातून कसं काय सोडलं? इतका गंभीर रोग जडलेल्या रोग्याभोवती इतकी गर्दी कशी? जराव्याध तर महाभारताइतका प्राचीन, गोेष्टीतलाच.'
'काही भ्रम नाही की विकार नाही डॉक्तर, माझी गोष्ट खरी का खोटी ते सोडून दे, ऐकलंय की...
जटीनं एक विलक्षण कहाणी सांगायला सुरुवात केली-
'समुद्र कोणत्या देशात आहे, द्वारकानगरी कुठं आहे माहीत आहे का? जरा व्याधानं त्या देशात जाऊन बाण मारला होता.'
'कोणाला?'
'कृष्णाला, पोथी वाचली नाहीस?'
'ते सर्वांनाच माहीत आहे.'
'अरे, ते तर सर्व पापांमधलं महापाप! भगवानाला बाण मारण्याएवढं मोठं दुसरं पाप असू शकतं का? म्हणूनच तर त्या जरा व्याधाच्या वंशाला तो देश सोडून जावं लागलं.'
'कुठे?'
'हिजली- तमलूक-काँथी- मेदिनीपूर!'
'लहानसाच कुटुंब-कबिला होता आमचा. आम्ही स्मशानात हिंडायचो, साप धरायचो, स्मशानात टाकलेल्या मडक्यातून पाणी प्यायचो.'
'शी!'
'आम्ही पाखरं धरणारे म्हणून आमच्या जातीला 'पाखमारा' जात म्हणत.'
'ही पाखमारा कुठली गं जात? नाव तर कधी ऐकलं नाही.'
'हं, तर आमच्या समाजात पाट लावण्याची रीत नव्हती; पण माझं मन या साधनच्या बापावर बसलं अन् समाजाला चाललं नसतं म्हणून आम्ही पळून जाऊन लग्न केलं रे!'
जटीला सुसंगत बोलता येत नव्हतं. पहिल्या लग्नाला लग्न म्हणतात आणि दुसऱ्या लग्नाला पाट लावणं. या पाखमारा म्हणजेच पारधी जातीतल्या नियमानुसार जन्मत:च मुलीचं लग्नं त्यांच्या देवाशी लावण्यात येत असे. मग देवाला ओला नारळ वाहूनच त्या माणसाच्या घरात संसार करायला येत.
'त्यानंतर खूप वर्षांनी मी देवी झाले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्या अंगात देवीचा संचार होऊ लागला.'
'देवी जटेश्वरी, पाणी पिते का थोडं?'
'नाही रे बाबांनो, आता मी सुखानं स्वर्गात जाणार; पण साधन...' जटीला उचकी लागली.
'काय माय, मला काय सांगते?'
'आता मी देवी आहे, बघ डोक्यावर सूर्य तळपतोय.'
'हो, दिवसच आहे आता.'
'आता तुझी माय नाही, साधन. देवी स्वर्गारोहण करतेय, तुला भरपूर दान करावं लागेल.'
'काय दान?'
सगळयांनाच खूप कुतूहल वाटत होतं. साधनच्या पडवीत, घराभोवती गर्दी उसळली होती. जणूकाही एक अत्यंत गरीब, दुर्दैवी बाई नव्हे तर कोणीतरी लोकमान्य प्रसिद्ध व्यक्ती मरून जातेय अशी गर्दी! सगळे चूप. श्वास रोखलेले. काय दान मागणार ही देवी जटेश्वरी अशा अंत्यसमयी?
'संध्याकाळी मेले असते तर माणूस म्हणून गेले असते, तुला काही पैसाअडका खर्च करावा लागला नसता; पण आता देवीला तुला हत्ती द्यावा लागेल. श्राद्धात हत्तीदान कर.'
'वचन देतो' दु:खानं नि शोकानं पागल झालेला आणि ही अचानक ओढवलेली आपत्ती बघून गोंधळलेला साधन ओरडला- 'ऐका हो, श्राद्धात मी हत्तीदान करीन.'
'घो. घो... घो.. घोडा दान कर.'
'करीन.'
'अन्न-वस्त्र-भूमी-सोनं-रुपं भरपूर दान कर.'
'करीन.'
साधन हुंदके देत म्हणाला 'सगळं देईन गं! तू मला सोडून जाऊ नको, माझं कोणी नाही दुसरं!'
'तुझ्या बा-बा-बा...'
जटीचे शब्द अडखळत होते. साधनची बायको माहेरी पळून गेली होती, तिला परत घेऊन येण्याचे शब्द जटी बोलू शकली नाही. त्यापूर्वीच तिची मान कलंडून गेली.
कोरं कापड पांघरून, फुलं-चंदन वगैरेनी सजवून सर्वांनी ढोल पिटत जटीला जाळायला नेलं. सगळा खर्च अनादि डॉक्टरनंच केला. जटीला पाहून अगदी पहिला विचार त्याच्या मनात आला तो हा की जा बाळा, आता पुन्हा पुन्हा तांदूळ नेऊन देण्याची जबाबदारी टळली. तांदळाची किंमत ताडामाडासारखी वाढत होती, तरी तांदूळदान करूनच अनादि देवी जटेश्वरीच्या पाया पडायला जात असे. त्याची बायको करवादायची, 'एवढी देवी असून तिला भक्तजनांच्या अडचणी समजत नाहीत?'
मग खूप दु:ख झालं अनादिला. बलरामच्या हातात काही पैसे देऊन तो म्हणाला 'तुम्ही सगळे काहीतरी खाऊन घ्या. देवीला चंदनाच्या लाकडानं जाळा. लाकडं चांगली वाढलेली घ्या. जाताना वाटेवर फुलं उधळा, लाह्या उधळा, चिल्लर पैसेपण उधळा. तुझा तो मेहुणा आहे, त्याची बरीच माणसं आहेत नं? बोलाव सगळयांना.'
बलराम वगैरे लोकांना जटीचा मृत्यू अलौकिकच वाटत होता. मरताना ती जे काय बोलली ती सारी त्यांच्या लेखी दैववाणीच. म्हणूनच आवेशानं बलराम म्हणाला- 'येईल नं तो, नाही आला तर मुंडकंच छाटीन त्याचं.'
पिचतच बलराम असं बोलयचा; पण त्याचं बोलणं ऐकताच मेहुणा लगेच हजर झाला. नाव सदानंद, स्वभावही तसाच. तो सरकारी ऑफिसात प्यून होता.
'अरे, गोळी घाल त्या चाकरीला! क्रॅज्युअल लीव्ह नाही का? अन् दांडी मारली तरी सरकारी नोकरी काही जात नाही.' असं म्हणत त्यानं कंबरेला पंचा बांधला. डोक्यावरचे केस विंचरून गळयात कागदी फुलांचा हार घातला आणि सदानंद व त्याचे साथीदार 'हरिबोल- हरिबोल- हरिपदे जा' म्हणत जटेश्वरीला घेऊन गेले.
२
साधनची आई मानवी असूनही देवी कशी झाली ती एक विलक्षणच कहाणी- ते लोक मेदिनीपूरच्या भागात राहणारे. पारधी जात. ते स्वत:ला जराव्याधाचे वंशज म्हणत. ईश्वराची हत्या केली म्हणून शापदग्ध झाल्यामुळे त्यांना दूरच्या द्वारकापुरीहून इकडे यावं लागलं होतं.
शाप असा की त्यांनी घर बांधून राहायचं नाही. पक्षी पकडायचे नि विकायचे. स्मशानाजवळच्या झाडांखाली राहायचं, मडक्यात अन्न शिजवायचं. शवशय्येवरच त्यांच्या वधू-वरांची पहिली रात साजरी होई. चितेचा जाळ बघून त्यांच्या मनात विषण्णता वगैरे काही येत नाही. चितेपाशीच आया बाळांना जोजवतात, त्यांचे लाड करतात, नवरा-बायको बसून गाणी गातात, झोपतात.
मेदिनीपूरच्या मिठाच्या घळीत, काजूंच्या बागेत कामं करायला मजूर म्हणून दक्षिणकडचे पुष्कळ लोक येणं-जाणं करत.
पारधी समाजात नियम होता, की आपल्या समाजाबाहेर लग्न करायचं नाही. जटी विलक्षण रूपवती होती. तांबूस रंग, निळसर डोळे, लांबसडक केस. डोक्यावर उंच अंबाडा बांधून ती त्यावर लाल खड्यांची माळ गुंफायची. नदीच्या पाण्यात आपलं रूप पाहायला तिला खूप आवडायचं, गर्द निळी साडी नेसून नटायलाही फार आवडायचं.
एका हिवाळयात जटीची भटकी टोळी सुवर्णरेखा नदीच्या तीरावर होती. या वेळी नदीकाठच्या वाळूवर खूप देशांतरित पाखरं येतात. उंच गवताच्या झुडपात जाळं टाकून जटीनं शीळ घालताच पाखरं यायची नि तिच्या जाळयात फसायची.
तिथेच एकदा तिची अन् उत्सवची गाठ पडली. उत्सव बुरूड जातीचा, गवताच्या सुंदर ताट्या विणण्याचा त्या लोकांचा पिढीजात धंदा. उत्सव त्या वेळी तीस वर्षांचा होता. ठेंगणा पण बळकट बांधा, सावळा रंग आणि खांद्यापर्यंत दाट कुरळे केस. तो स्वत:च गाणी रचायचा अन् चालीवर गायचा.
जटीला बघून त्यानं गाणं रचलं...
'अगं, निळया साडीवाली इकडं तं पहाय
तुझ्यासाठी तळमळतोय माझा प्राण हाय.'
जटीच्या हातात तेव्हा जाळयात अडकलेला नीळकंठ पक्षी फडफडत होता. जटी उत्सवसमोर जाऊन त्याला वेडावत म्हणाली, 'आ...हा, प्राण तळमळतोय म्हणे! तोंडचोपड्याचं गाणं ऐका! दिलीस ना पाखरं उडवून?'
'ती पाखरं धरून काय गं सई.
माझंच प्राणपाखरू
आणून टाकतो तुझ्या पायी.'
उत्सव गात सुटला. त्याला खूपच मजा वाटत होती. त्याच्या समाजातल्या मुली अशा धिटुकल्या नसतात. असे डोळे वटारत नाहीत. या मुलीचे डोळे, जिवणी, नाक जणू दगड कोरून काढलेल्या नक्षीसारखे कोरीव.
'सोंगाड्या!'
जटी शिवी हासडून चालू लागली तर उत्सवनं एकदम लांब उडी घेऊन तिचा हातच धरला.
'शिवी का दिली मला?'
'तू गाणं का रचलं? माझी पाखरं उडवलीस!'
उत्सव गडगडून हसला. त्यानंतर एकदम तिच्या हातातलं जाळं हिसकून त्यानं त्या फडफडणाऱ्या नीळकंठ पक्ष्याला सोडून दिलं आणि तेच जाळं गोंधळलेल्या नि संतापलेल्या जटीवर टाकून म्हणाला, 'तूच माझं पाखरू! पळतेस कुठं? तू माझं प्राण पाखरू.'
जटीला रडूच फुटलं. जाळं तिथंच टाकून ती पळून गेली. उत्सवचं हसणं कितीतरी वेळ तिचा पाठलाग करत होतं.
दुसऱ्या दिवशी उत्सव त्यांच्या डेऱ्यावरच येऊन हजर. जटीच्या आजीला कळवळून म्हणाला- 'काही तोडगा सांगा ना आजी, जंगलात फिरावं लागतं, छातीत कळ येते सारखी. तुम्ही अनुभवी जाणकार लोक, जडी-बुटी जाणता, काहीतरी तोडगा सांगा.'
जटी फाडकन् म्हणाली- 'त्या तोंडचोपड्या सोंगाड्याला चांगली पिटाई हाच तोडगा. त्यानं माझं धरलेलं पाखरू सोडून दिलं.'
हसतहसत जटीच्या आजीनं तिलाच एक शिवी हासडून आपलं काम करायला जा म्हणून बजावलं. त्यांच्या समाजातल्या मुलींनी बाहेरच्या माणसांकडे बघायचं नसतं. आपल्याच समाजात राहायचं. जटीच्या वागणुकीतली चलबिचल आजीनं हेरली होती, अशा चंचलपणाची तिला भीती वाटून गेली होती.
उत्सव पुन्हा कधी त्यांच्या डेऱ्यावर आला नाही; पण जटीचाच पाठलाग करून तिला नवनवीन अपरिचित स्वप्नं दाखवू लागला- घर करून राहायचं. पडवीत धानाच्या गोण्या. वेताच्या पाळण्यात झुलणारी पोरंबाळं. त्या घरात जटी आरशात आपलं रूप पाहील. चांदीचे दागिने घालेल, घराभोवती येणाऱ्या-जाणाऱ्यांचा वावर.
गवताच्या ताटीपेक्षाही सुंदर विणकाम करून उत्सवनं स्वप्नांचं जाळं विणायला सुरुवात केली आणि ते जाळं जटीवर टाकलं. जटी त्या जाळयात पुरती गुरफटली आणि ती दोघं पळून गेली. खडगपूरपासून दिघापर्यंत भटकंती. कुठे काजूच्या बागेतलं तर कुठे मासोळया वाळवण्याचं मजुरीचं काम करायचं. खूप दूर पळून जाणं भागच होतं. नाहीतर त्या पाखमाऱ्या पारध्यांनी शापित समाज सोडून जाण्याच्या अपराधासाठी त्यांना बाण मारून लोळवलं असतं.
उत्सव काही त्यानं दाखवलेली स्वप्न साकार करू शकला नाही; पण तरी जटी मात्र खूष होती. किती छान! फक्त दोन वेळा काहीतरी शिजवून खायचं आणि प्रेम करायचं! हाती पैसे आले की साडी घ्यायची, गुंजेच्या माळा, लाखेच्या बांगड्या, रुपेरी गोठ! वेगवेगळया तऱ्हेनं केस बांधायचे, छापील साड्या नेसायच्या. ती काही आता पारधीण नव्हती, वरच्या जातीत गेली होती, तिचा दर्जा वाढला होता.
उत्सव म्हणायचा- 'आमची जात काही अशीतशी नाही, जटी! आम्ही पैसे देऊन मुलगी आणतो, गणगोताला भात अन् बोकडाचं मटण खाऊ घालतो.'
'जाऊ दे नं ते सगळं आता!' जटी भीतभीतच म्हणायची. तिला वाटे की फक्त हा संसार आणि प्रेम राहिलं की झालं! शापित समाजातली मुलगी ती. ज्यांनी ईश्वराच्या टाचेला बाण मारून त्याची हत्या केली त्यांनी सतत इथून तिथे भटकतच जगायचं असतं! पण जटीनं नियम तोडला होता, म्हणून रागावून आजीनं काही करणी केली तर? आईनं जटीच्या नि उत्सवच्या कडब्याच्या बाहुल्या करून त्यावर मंत्र टाकून, जादूटोणा करून फोडून काढलं तर? फारच भीती वाटे जटीला, 'ते जातीपातीचं जाऊ दे नं, उत्सव! दुसरं काहीतरी बोल नं'! जटी म्हणायची.
'भीती वाटते तुला?'
'चूप रे तोंडचोपड्या!' जटी लाडात येऊन म्हणायची. पाठ फिरवून केस विंचरायला बसायची. यालाच वरच्या जातीत जाणं म्हणतात का? मग जटीला जोर का येत नाही म्हणायचा की 'जा तुम्ही, मरा त्या मसणात! मी नाही येणार परत!'
कुठून दुरूनही डुम-डुम-डुम-डुम असा ढोलाचा आवाज येताच जटी चमकून उठे. पारधी असेच ढोलावर लवचीक वेताच्या काडीनं आवाज करत जातात. टोळी करून हिंडतात. मधमाश्यांसारखं पोळं करून राहतात. आणि हे असं सगळयांनी एकत्र कळप करून राहणं आणि भटकणं हे त्यांच्या दृष्टीनं फारच महत्त्वाचं असतं.
कारण ते काय सामान्य लोक थोडेच होते? जराव्याधाचे वंशज! तो व्याधही सामान्य माणूस नव्हताच; कारण त्यानं ज्याला मारलं तो तर स्वयं श्रीकृष्ण भगवान! त्या गुराखी यादवांनी इतकी पापं केली, की दु:खानं श्रीकृष्ण भगवान एकांतात बसून घटकाभर विसावले होते. त्यांचे ते रक्तकमळासारखे सुंदर पाय.
जटीची आजी सांगायची- 'हो गं बाई, रक्तकमळासारखे पाय त्यांचे. भोवती बाणासारख्या उंच अणकुचीदार गवताचं जंगल. त्या गवताच्या जंगलाआडचे ते पाय बघून त्या व्याधाला काहीतरी मतिभ्रमच झाला जणू! दिला सणकन् एक बाण सोडून! बस! आणि मग काय झालं माहीत आहे? सगळं आकाश अंधारून गेलं. सूर्यानं तोंड झाकून घेतलं. समुद्र शोकविव्हळ झाला अन् खवळून त्यानं पाण्यातले सगळे जलचर बाहेर फेकून दिले. माशांचा हा डोंगर झाला तडफडता. त्यातले काही परत पाण्यात गेले नि रडू लागले. गवळी दूध दोहायला बसले तर गाइंर्च्या आचळातून रक्ताच्या धारा! चांगली फटफटीत सकाळ होती तरी रात्रीसारखा काळोख झाला अन् आकाशात तारे चमकू लागले.
आणि तेव्हाच आकाशातून ती दैववाणी झाली :
'ज्यांनी भगवानाला मारलं त्यांना कुठेही थारा मिळणार नाही. अरे जरा, व्याध तो व्याधच! या जगात भगवान पुन्हापुन्हा जन्म घेतात आणि तुझ्यासारखा एखादा कसाई भगवानाला बाण मारतो. जे लोक हे कृत्य करतात त्यांना घर-दार, ठावठिकाणा मिळणे नाही. जरा, तू आता तुझा सगळा कुटुंब-कबिला घेऊन इथून निघून जा.'
'कुठे जाऊ?'
'जिकडे डोळे नेतील तिकडे!'
'सगळा समाज घेऊन जाऊ?'
'नाहीतरी काय गणगोत इथे सोडून जाशील? अरे, तुमचा सगळा समाज आता महापापी समाज झाला. या समाजात कोणी मुलगी देणार नाही. जे काय संबंध करायचे ते आपसातच. समाजातून कोणी बाहेर जायचं नाही, कोणाला आत घ्यायचं नाही. टोळी करून भटकत राहायचं आणि ऐक, ए जरा, ऐकू येतंय का तुला?
'हो, ऐकू येतं.'
'तर ऐक, तुमच्या समाजातल्या मुलानं किंवा मुलीनं टोळीबाहेर जायचं नाही. तुझ्या पापामुळे तेही पापी झाले. पोरं जन्मताच देवाशी त्यांचं लग्न लावून द्यायचं.
'बरं' जरा रडतरडतच बोलला गं बाई, काय सांगू तुला, ती द्वारकापुरी कोणाला सोडावीशी वाटेल गं! किती सुंदर नगरी ती! निळया समुद्रकाठी सोन्याचे कळस लावलेले भव्य प्रासाद! अर्थात् जरा अन्- त्याचं गणगोत बिचारं बाहेरच्या जंगलातच राहायचं; पण दुरून सगळे बघायचे त्या वैभवशाली नगरीकडे. दुसऱ्यांचं ऐश्वर्य, दुसऱ्यांचं वैभव पाहूनही डोळयांना काय कमी सुख होतं?
त्यानंतर जराला कायमचाच भोग भोगावा लागला. कमी त्रास झाला का! नात्यातले, गणगोतातले सगळे लोक, गाठोडी-बोचकी- गाडगीमडकी, शिकारी कुत्रे असा सर्व कबिला घेऊन काय कमी भटकावं लागलं? कुठे सत्यपुत्र- केवलपुत्र- चोल- पांत्य वगैरे देशोदेशी भटकतच गेला जरा; पण कुठे थारा मिळेना. जिथं गेलं तिथले लोक म्हणत- भगवानाला मारून आता आमचा सत्यवान करायला आलात का? ए लांडग्या, द्वारकापुरीला स्मशान करून टाकलंस आणि आता आमच्यावर नजर पडली का तुझी?
जराला कुठंही बूड टेकायला जागा मिळेना. तिकडे वरती स्वर्गात बसून देवाधिदेवही उसासे टाकत होते. कारण द्वापर युग जाऊन कलियुग आलं होतं. भटकून भटकून जरा म्हातारा होऊन गेला. हत्तीपायाचा रोग जडला. अंग ठणकू लागलं. शेवटी कोणीतरी दयेनं म्हणालं- राठ देश माहीत आहे का? वंग देश? गौड देश? गंगा जिथे समुद्राला जाऊन मिळते त्या प्रदेशात जा. तिथे पापी-तापी-लोभी-वंचक-सैतान वगैरे सर्वांना आश्रय मिळतो. त्या देशातून कोणाला हाकलत नाहीत, जिकडे जा तुम्ही- मग जरा या देशात आला. स्मशानापाशी राहायचं, आपल्या टोळीतच लग्न करायची, स्मशानातच शेज सजवायची, स्मशानातल्या मडक्यांमध्येच बायकांनी भात रांधायचा अन् सर्वांनी खायचा. त्यांच्या समाजातले पुरुष व बाया खूपच स्वतंत्र वृत्तीच्या. बायका दिसायला सुंदर. तांबूस केसांचा उंच जुडा बांधून त्यावर पाणवेलीचा सर गुंफायच्या. दगडी कोरवी मूर्तीसारखं रेखीव सौंदर्य. किती पुरुष घोटाळत; पण या बायकांनी त्यांना फटकारून आपलं कुळशील जपलं होतं. आपल्या जातीतच लग्नं केली. त्यांच्या रक्ताची पवित्रता, प्राचीन, म्हणूनच इतकं सौंदर्य!
कमी होत होत, मरतमरत ते आता फक्त शंभरेक जण उरले असतील; पण तरीही ते आपल्या टोळीबाहेर जात नसत. शहराच्या कडेनं, खेड्यांच्या पायवाटांवरून ते डुमडुम ढोल वाजवत चालत चालत निघून जात. 'पाखमारा पारधी चालले' लोक ओरडत. शहरांकडे ते लोक फिरकतच नाहीत. मधूनमधून, वर्षातून एकदोनदाच ट्नयबल वेलफेअर ऑफिसमध्ये नाव नोंदवायला येतात. कोणी मेलं तर नोंदवायला येतात. सरकारी ऑफिसात त्यांना शेड्यूल्ड ट्नइब म्हणतात म्हणे!
जटी त्यांच्यातलीच होती, त्यामुळे ती एका कानानं अर्धवट लक्ष देत उत्सवच्या गोष्टी ऐकायची आणि तिच्या दुसऱ्या कानात सारखा ढोलकाचा डुम-डुम आवाज घुमत राहायचा.
ते आले तर? तिचे माय-बाप-आजी-गणगोतातले लोक येऊन म्हणाले तर की चल परत! जंगलात आपल्या समाजात चल!
उत्सव तिची ही भीती पाहून हसायचा- गाणं म्हणायचा-
सोड तुझं मिथ्या भय!
प्रीतीच्या जाळयात कोणाचं काय भय?
जटी म्हणायची- 'तोंडचोपड्या, थापाड्या!'
उत्सव म्हणे- अगं, माझ्यात जान आहे तोवर कोण तुला नेणार? तुझे ते जंगली लोक? त्यांनी उत्सवला ओळखलंच नाही मग! सरळ दरोगासाहेबाला जाऊन सांगितलं की सगळे सरळ येतील. काही घाबरू नको तू!
तरी जटीची भीती काही जाईना; पण हळूहळू तिला समजावून समजावून उत्सवनं बरंच सावरलं होतं. त्यातच जटीच्या पोटी एक चांगला लठ्ठमुठ्ठ, दाट काळयाकुरळया केसांचा, काळा मुलगा जन्मला. अगदी उत्सवसारखाच. जणू बापाचंच तोंड बसवलेला. फक्त डोळे मात्र आईसारखे स्वच्छ, निळसर, चकाकणारे.
उत्सवला आता वरच्या जातीत जाण्याची इच्छा होऊ लागली. जटीला त्यानं वरच्या जातीत उचलून आणलंच होतं. त्याला मनातून माहितीच होतं, की तो ताट्या विणणाऱ्या जातीचा, त्या पाखरं धरण्या-मारणाऱ्या पारध्यांपेक्षा वरच्या जातीचा. आता तो मजुरी करतोय. ही आणखी वरच्या जातीत जाण्याची पायरी.साधनचा बाप झाल्यावर त्याची ही आणखी वरच्या जातीत जाण्याची इच्छा तीव्र होऊ लागली. दरिद्री लोकांमध्ये राहण्यापेक्षा चांगल्या सभ्य लोकांच्या समाजातला एखादा कोपरा गाठला पाहिजे असं वाटू लागलं. जटीला त्यानं सांगितलंही.
'ए जटी, त्या बिड्डी ऑफिसातले बि.डि.ओ. साहेब काय म्हणतात माहीत आहे?
'काय?'
'म्हणतात की आता कचेरीत जाऊन कोणालाही नाव बदलता येतं. काही अडचण नाही. हे कांदोरी वगैरे ऐकलं की आपण खालच्या जातीतलेच वाटतो की नाही?'
'म्हणून नाव बदलशील?'
'का नाही? अगं, उत्सव कांदोरीपेक्षा उत्सव दास, साधनचंद्र दास हे ऐकायला छान वाटतं की नाही! शिवाय मग दुसरं काहीतरी काम घेऊन मोठ्या शहरात निघून गेलो की प्रश्नच मिटला.'
'का पण?'
'अगं, मोठं शहर म्हणजे जगन्नाथचं श्रीक्षेत्र असतं. तिथं कोणी कोणाला विचारत नाही. नाव बघताच समजून जातील की हा चांगला वरच्या जातीचाच माणूस असणार, नाहीतर नावापुढे 'दास' कसं?
उत्सवचं बोलणं ऐकून खूप आनंद झाला जटीला. कंबरेवर हात ठेवून नाचायलाच लागली ती. म्हणाली,'चल, लवकर चल! आत्ताच जाऊ अन् वरच्या जातीचे होऊ.'
उत्सव प्रेमानं म्हणाला, 'वेडी गं वेडी! आता कसं जाणार? मुलगा थोडा मोठा होऊ दे, त्याचं उष्टावण झालं, की देवाला पूजा-नैवेद्य पाठवून मग जाऊ.'
जटीला एकदम वाटून गेलं, की जिच्या पूर्वजानं भगवानाची हत्या केली ती आपल्या जातीच्या निर्दिेष्ट देवाशिवाय दुसऱ्या देवाला पूजा-नैवेद्य कसा देणार? पाप लागलं तर! काही भलतंसलतं झालं तर! पण नंतर वाटलं की उत्सव म्हणतो तेच बरोबर आहे. सर्व सोडून गेलो अन् त्यापूर्वी कचेरीत लिखापढी करून जात बदलून घेतल्यावर तिचे मायबाप वगैरे कोणीही तिला धरू शकणार नाहीत.
'ठीक आहे!' जटी डोळे मिटून म्हणाली.
पारध्यांच्या आदिपुरुषाला-जराव्याधाला-ज्या देवानं आकाशवाणी सुनवली होती तो काय त्या वेळी हसत असेल?
झालं. साधनचं उष्टावण झालं. त्यावेळी उत्सव खडगपूर स्टेशनवर हमाली करत होता. सर्व हमालांना त्यानं भात-मटण खाऊ घातलं आणि त्याचवेळी खाण्याबरोबर चोरून विकली जाणारी भेसळवाली देशी दारू भरपूर ढोसली. थोड्याच वेळात एक भडभडून उलटी झाली आणि इस्पितळात उत्सव मरून गेला.
त्यानं दाखवलेली स्वप्नं, त्याचं भरभरून प्रेम, गळाभर गाणी सगळं घेऊन निघून गेला उत्सव. जटी आता एकटी नि स्वतंत्र होती. मनात येईल तिकडे खुशाल जाऊ शकली असती; पण पाळण्यातलं हे बाळ- रडणारं- हसणारं- टकटक डोळयांनी तिच्याकडे पाहणारं!
जटी मनातून समजली काय करायचं ते. सरळ आपल्या पारध्यांच्या टोळीत परत जायचं! आजीचे पाय घट्ट धरून खूप रडायचं. कारण इस्पितळातल्या डॉक्टरांनी आणि पोलिसांनी काहीही सांगितलं असलं तरी तिची मनोमन खात्री होती की उत्सवला तिच्या आजीनंच मंत्र फुकून, करणी करून मारलं! भ्यालेल्या पाखरासारखी जटी पोर पोटाशी धरून त्यांच्या टोळीकडे गेली.
पण हाय भगवान! तिथं कोणीच नाही. कुठं गेली तिच्या जातीची सर्व माणसं? कुठं ते रंगीबेरंगी पोषाख, कुत्री, गाढवं, बकरे, बोचकी नि आजीचं खळखळून हसणं! स्मशानात नाही, घाटावर नाही, कुठं गेले सगळे? जटी धावतच तिथल्या ट्नयबल बोर्डाच्या कचेरीत गेली.तिथंही कोणाला काही माहीत नाही. स्मशानाच्या आसपास पहा, तिथेच पडले असतील कुठेतरी, असं म्हणून त्या लोकांनी तिला वाटेला लावलं. जटीला भडभडून रडू येऊ लागलं. या समाजातून त्या समाजात, या जातीतून त्या जातीत, वरवर चढत जाण्याची कितीतरी स्वप्नं दाखवून उत्सव सर्व सोडून निघून गेला होता. जटीनं करावं तरी काय आता?
भरपूर लावण्य नि भरपूर तारुण्य घेऊन जटी स्टेशनवर जाऊन बसली. मांडीवर पोर घेऊन आकाशाकडे नजर लावून विचार करू लागली. हमालांच्या वस्तीपाशी एका पारावर हनुमानाचं लहानसं देऊळ होतं. तिथं एक संन्यासी नेहमी बसलेला असे. त्यालाच तिनं सल्ला विचारला.
'इथंच रहा', संन्यासी डोळे मिटूनच बोलून गेला. वृद्ध माणूस होता तो, बऱ्याच देवदेवतांची कास धरून शेवटी या हनुमानजींना धरून बसल्यावर त्याची परिस्थिती जरा सावरली होती. जटी तिथे जाऊन बसताच हनुमानाच्या पारापाशी गर्दी जमू लागली. संन्याशालाही त्याची चूक लक्षात आली. काही दिवसांनी तर तीन-चारजण येऊन म्हणू लागले की, 'या बुढ्ढ्याजवळ राहून काय होणार? आमच्याबरोबर चल, तुला शहर दाखवतो.' पण जटीला धमन्यांमधून वाहणाऱ्या प्राचीन रक्तानं तिला जंगलातल्या पाखरा-जनावरांनाच नव्हे तर अपरिचित माणसांनाही ओळखायला अन् फटकून दूर ठेवायला शिकवलं होतं. तिनं सरळ त्या माणसांना शिव्या हासडून वाटेला लावलं. त्या लोकांनीही उगवायचा तो सूड उगवलाच. पोलिसात चुगली केली. काही दिवसांनी पोलीस येऊन म्हणू लागले.'
'बाबाजी, सर्व बातमी मिळाली आहे आम्हांला.'
'कसली बातमी बाबा? मी संन्यासी माणूस, देवाच्या पायाशी पडून राहतो.'
'देवाच्या की देवीच्या आँ? इथं बाई ठेवतोस? बदमाशी करतोस, दारू विकतोस, जुव्याचा अड्डा चालवतोस!'
'सगळं झूट!' संन्याशाचा गोरा चेहरा रागानं लालबुंद होऊन गेला.
पोलीस तसे चांगले संसारी लोक होते, ते म्हणाले, 'अरे, सगळं झूट आहे हे तुलाही माहीत आहे आणि आम्हांलाही! पण या बाईमुळं सगळा गोंधळ होतोय. हाकलून दे नं तिला.'
'हाकललं तर ती त्या चोरांच्या हाती जाऊन पडणार, त्यांना तेच हवंय.'
'मग काय करायचं ते कर नि मर' म्हणून पोलीस जाताजाता बोलले- 'कशाला उगीच त्या गुंडांना चिथावतोस? गूळ ठेवला तर माशा घोंगावणारच! ती पोरगी आहे तोवर हे असंच चालणार. त्या गुंडाचंच राज्य आहे, बाबाजी! जबरदस्ती करून त्यांनी पोरीला ओढून नेलं तर कोणाची हिंमत आहे रोखण्याची?'
संन्यासी काळजीत पडला. जटीलाही समजून चुकलं की इथं राहिलं तर या संन्याशावर व तिच्यावरही आफत येणार. ती म्हणाली, 'माझ्या संसारातली ही भांडीकुंडी गहाण ठेवते, बाबाजी, मला फक्त थोडे पैसे द्या.'
'कुठं जाशील बाई पोर घेऊन?' संन्याशी म्हणाला. कुठं जाणार ते तर जटीलाही ठाऊक नव्हतं आणि तिच्या नात्यागोत्याचंही कोणी नव्हतं. संन्याशानं एक सुस्कारा सोडला आणि जटीला एक लाल कोरं कापड दिलं. असं लाल कापड बिहारी लोक प्रेतावर पांघरतात. ते कापड आणि एक लहानसर त्रिशूळ तिला देऊन संन्यासी म्हणाला, 'तुला ती गिधाडं फाडून खातील हे तर खरंच पोरी; पण हे वस्त्र आणि शस्त्र घेऊन तू निघून जा. या घोर कलियुगातही थर्ड क्लासमध्ये साधू-संन्याशांना तिकिटाशिवाय जाता-येता येतं. कोणी काही विचारत नाही.'
'पण विचारलं तर?'
'मी देवी जटेश्वरी आहे असं सांग.'
'देवी?'
'अगं, सांगायला काय जातं?' असा उपदेश करून संन्याशानं तिची पाठवणी केली. आणि खरोखरच ट्न्ेनमध्ये कोणी काही विचारलं नाही. तिचं रूप, उपरण्यासारखं गुंडाळलेलं लाल कोरं कापड, पाठीवरच्या बोचक्यातलं तान्हं पोर आणि हातातला त्रिशूळ पाहून सगळे थक्क होऊन बघतच राहात.
जटी खिडकीतून बाहेर पाहत होती. डोळयांत पाणी तरारत होतं, ही सगळी माणसं तिच्याकडे आदरयुक्त भीतीनं पाहताहेत. यालाच का म्हणतात वरच्या जातीत जाणं? हाय रे, उत्सव असता तर बघता की कोर्ट नाही- कचेरी नाही फक्त एक उपरणं आणि त्रिशूळाच्या जोरावर जटी कशी वरच्या जातीत शिरून गेली!
एक माणूस मात्र तिच्यावर पाळत ठेवून होता. तो गाडीत गाणी-भजनं वगैरे म्हणून पैसे मिळवणारा वयस्क, काटकुळा माणूस,. जटीला म्हणाला, 'हावडा स्टेशन तर आलं बाई, आता कुठं जाणार?' जटी काहीच बोलली नाही. डोळे फाडून ती हावडा स्टेशनवरचं जनअरण्य बघत होती. उत्सव म्हणायचा ते हेच का जगन्नाथाचं श्रीक्षेत्र? इथं तर जिकडं बघावं तिकडं माणसंच माणसं! जंगलातल्या झाडांवरही इतकी पानं नसतील? इतक्या माणसांच्या गर्दीत जटी जाणार तरी कुठे? तो माणूस तिच्या मागोमाग होताच. पुन्हापुन्हा विचारत होता
'कुठं जाणार?'
जटी म्हणाली, 'माहीत नाही' तर तो म्हणाला, 'माझ्याबरोबर येतेस?'
'कुठे?'
जटीला आता भीती वाटत नव्हती. तिच्या मनात आदिम शक्तीचा संचार होऊ लागला. माणूस बघताच कोणाला भ्यायचं नि कोणाला नाही ते तिला कळू लागलं. या माणसाची तिला भीती वाटली नव्हती. शिवाय डोळयांपुढे ती एक अद्भुत जनअरण्य पसरलेलं बघतच होती.
त्या माणसानं तिला समजावून सांगितलं की 'मी गाडीत गाणं-भजनं म्हणत फिरतो. तू जर तान्ह्या साधनला पाठुंगळी घेऊन माझ्या मागोमाग फिरलीस तर जास्त भिक्षा मिळेल. पटत असेल तर माझ्या घरी चल.'
'कुठाय तुझं घर?'
'हे बघ, तू-तू करून बोलू नको, चलायचं असंल तर चल.'
तिथं चांगलं चाललं होतं वर्षभर. तो माणूस गाणी म्हणायचा, जटी पाठोपाठ जायची, पैसे मिळाले की जटी संध्याकाळी तांदूळ विकत घ्यायची, भात रांधायची. तो माणूस बाहेर पडवीत झोपायचा, जटी दाराला कडी घालून मात्र आत झोपायची. साधनला कुशीत घेऊन त्याचे खूप लाड करायची. शिवाय स्टेशनजवलच नेपाळी-भूटानी म्हाताऱ्या माळा-गंडे- दोरे- ताईत- मुळया- पाखरांचे पाय- बेडकांची सालं वगैरे वस्तू विकत बसलेल्या पाहून तिलाही शहरात चालणारी चलाखी कळू लागली होती.
कोणी विचारलं की, 'काय गं, साध्वी बाई तू, तुला काही संधिवातावरचा उतारा माहीत आहे का?' तर जटी आता शिव्या घालून कोणाला फटकारेनाशी झाली. शांतपणे गंभीर चेहरा करून ती आजीजवळच्या जडी-बुट्ट्या आठवायची अन् मधूनमधून औषध द्यायचीही.
चांगलं चाललं होतं, चांगलंच चाललंही असतं; पण एक दिवस रात्री तो माणूस पडवीतून आत येऊन झोपतो म्हणू लागला. तो तरी किती दिवस पडवीत झोपणार? अन् पडवीत पडूनपडून किती तळमळावं लागतं ते जटीला तरी कसं कळणार?
जटी खवळली आणि तिनं त्रिशूळ उगारलं म्हणाली, 'तुला काय ठाऊक मी कोण आहे ते! माझं कुळशील, गणगोत आहे माहीत? माझ्यापुढे असा प्रस्ताव मांडण्याची हिंमत! बाण मारून चिरून टाकीन तुला!'
दुसऱ्या दिवशी सकाळीच जटीनं ती जागा सोडली. खूप विचार करूनच ती देवी जटेश्वरी होऊन बसली. देवी बनल्याशिवाय ती तिच्या बावळया पोराला पोसू शकली नसती आणि पुरुषांच्या नजरेपासून स्वत:ला वाचवूही शकली नसती.
जटीला समजून चुकलं होतं की स्वत:भोवती काहीतरी अलौकिक दैवी कवच घातल्याशिवाय समाजात तिचा टिकाव लागणं शक्य नाही.
'सुंदर रूपाचे भोग, दुसरं काय!' जटी स्वत:शीच पुटपुटली.
३
'साधन, तुला आता देवीचं श्राद्ध करावं लागेल बाबा' लोक म्हणू लागले.
'हो, करीन, मायला हत्ती देईन, घोडा देईन, जमीन-सोनं-नाणं सगळं देईन. वचन दिलंय मी.'
सगळे एकमेकाच्या तोंडाकडे बघू लागले. साधनचं बोलणं वेडसरपणाचं वाटत होतं; पण त्यानं वाचन दिलं होतं हेही खरंच. शिवाय जटी काही सामान्य बाई नव्हती, दैवी अंश होता तिच्यात. अलौकिकत्वाचा अधिकार होता.
'काय बोलतो साधन तू! अरे, तू जे वचन दिलं तो किती पैशांचा खेळ आहे ठाऊक आहे का तुला?' बलराम गंभीरपणे सहानुभूतीनं म्हणाला.
'बोलून चुकलोय मी!'
'मग जा आता भीक मागायला, दारोदार भीक माग.'
साधन गळयाभोवती पंचा गुंडाळून भीक मागायला निघाला. बिचाऱ्याची माय गेली. आता संध्याकाळी कोणी भात रांधत नाही. मासळी भाजून तिचं साल काढून ती अद्रकाच्या व लिंबाच्या रसात घोळून त्यावर मीठ-मिरची व तेलाचा थेंब घालून 'ये बेटा, माझ्याजवळ बसून खा', म्हणणारं कोणी उरलं नाही.
डोळयांत पाणी, गळयाभोवती पंचा, कंबरेला फाटकी घोंगडी गुंडाळून साधन भीक मागत होता; पण कोणी काही देईना. हिंडूनहिंडून पाय सोलवटले तेव्हा साधनजवळ जेमतेम एकवीस रुपये जमले होते. आणि पायलीभर तांदूळ. एक पायली तांदूळ देऊन अनादि डॉक्टरनं जटीचं जन्मभराचं ऋण फेडून टाकलं.
शेवटी काहीतरी करायला पाहिजे म्हणून बलरामच कालीघाटावर गेला. सगळयात गरीब व दरिद्री दिसणारा एक पुरोहित गाठून त्याला साष्टांग नमस्कार घालून म्हणाला-
'फार मोठं संकट ओढवलंय भटजीबुवा, माझ्यावर नाही, माझ्या मित्रावर. असा काहीतरी उपाय सांगा, की साप तर मरेल पण काठी मोडता कामा नये!'
'अरे, पण काय, कसलं संकट?'
संकटाचं वर्णन ऐकून भटजीबुवा हसू लागले.
बलराम म्हणाला 'बुवा, तुम्ही तर नेहमीच मध म्हणून गूळ आणि सोनं म्हणून पाच पावल्या ठेवता. पहा नं जरा शास्त्रात काही सोय असली तर.'
भटजीबुवा नाकात तपकिरीची चिमूट कोंबत म्हणाले,'मूल्य द्या, सगळं होऊन जाईल.'
'पण किती?'
'हेच धरा, शंभर रुपये.'
'शंभर रुपये असते तर तुमच्यासारख्या पाच पावल्यावाल्या भटजीपाशी आलो असतो का, सांगा?'
'ठीक आहे, एेंशी रुपये द्या.'
भटजींच्या डोळयांत पैशाचा मोह दाटून आला होता. याच वेळी स्क्रू जरा टाइट करायचा असतो ना! पण फार दर करणंही बरं नाहीच कारण कालीघाटावर उपाशी ढेकणांसारखा ब्राह्मणांचा बुजबुजाट! पाच रुपये मिळाले तरी श्राद्धात सात समुद्रांसकट त्रिभुवनदान विधिपूर्वक करून टाकायला तयार! बलरामनं थोडा वेळ विचार केला. जाण्यायेण्याचा खर्च, थोडाफार नशापाण्याचा खर्च वगळून किती सांगावे? मग जरा ठणठणीत आवाजात म्हणाला- 'हे बघा भटजीबुवा, तुमच्या हाती मी अठरा रुपये देईन. तुम्हीच सर्व करायचं. नाहीतर मी दुसरीकडे जातो. पैसे टाकले तर भटजी काय कमी पडलेत! गूळ टाकला की मुंग्या येणारच. कबूल आहे का नाही ते स्पष्ट सांगा. मला घाई आहे. तुमच्याशी आणखी भाव करत बसलायला मला टाइम नाही.'
'घेऊन ये तुझ्या मित्राला; पण बाबा, मार्कंडवस्त्र- पितृपुरुषांचं वस्त्र- तूप- फुलं- लाकडं- तीळ- पंचद्रव्य- पंचगव्य वगैरे सगळं तुम्हीच आणाल ना?'
'ए, चलाख बामणा! हे सगळं आणणार असतो तर इथं तुझ्या मळक्या पंचाचा वास हुंगायला आलो असतो का रे?'
बलराम साधनला घेऊन आला.
भटजींनी सर्व सामान आणलं होतं. त्यांच्या घराच्या पडवीतच बसले होते. ते खणखणीत आवाजात म्हणाले-'दक्षिणेकडे तोंड करून बस, बाबा.'
त्यांच्याजवळ एक लाल डोळयांचा, केस कापलेला, भुसकट रंगाचा माणूस बसला होता
'अग्रदानी ब्राह्मण आहेत, यांना श्राद्धाचं दान करायचं.'
अग्रदानी डोळे उघडून म्हणाला- 'लवकर मामा! तिकडे चाकद्याला हजार रुपयांचं श्राद्ध आहे, दहा मिनिटांत आवरा.'
'अरे, झालंच आत्ता! ये बाबा, आचमन कर.'
आचमन झालं. श्राद्ध सुरू झालं. भटजी एकएक जिन्नस साधनच्या हाताला लावून लगेच परत घेत होते.
एक एक रुपयाची अठरा नाणी हातात घेऊन बलराम सगळं पाहात होता.
भराभर आटोपलं श्राद्ध. एका चार आणेवाल्या पंचाचं एक-एक सूत काढून साधननं कधी न पाहिलेल्या तिन्ही लोकीच्या पितरांना सहस्रवस्त्रदान केलं. मग भटजी म्हणाले,
'आईला काय देणार होतास?'
'अं... अं... म्हणजे हत्ती!'
'ठीक आहे, पाच पावल्या ठेव म्हणजे हत्तीदानाचं पुण्य तुला लाभलं. कळलं ना?
'पैशानं दान करायचं तर ते असंच करायचं असतं.'
बलराम कागदावर हिशेब लिहीत होता- हत्तीदान. सव्वा रुपया.
साधन अगदी हळवा आणि चकित होऊन गेला होता. पाच पावल्या देऊन वचन दिल्याप्रमाणे गजदानाचं फळ पदरात पडतं! असं माहीत असतं तर...
'हं, आता आणखी पाच पावल्या ठेव, अश्वदान झालं.'
मग जशी काही शर्यतच सुरू झाली. साधन म्हणे- अश्व- जमीन- सोनं- धान्य- रुपं आणि भटजी म्हणे- पाच पावल्या, पाच पावल्या, पाच पावल्या-
बलराम फक्त एवढंच पडताळून पाहात होता की हा महान दानयज्ञ अठरा रुपयांत आवरतो की नाही! शेवटी तो म्हणाला-
'गोदान पाच आण्यांत आटपून टाका, भटजीबुवा.'
झिलप्यांच्या शेकोटीच्या धुरात डोळे उघडत अग्रदानी म्हणाला- 'पाच आण्यांत गाय मिळते?'
'पाच आण्यात गोदान नाही झालं मामाजी तर तुमच्या भाच्याला बोटं मोडत बसावं लागेल. दक्षिणा मिळणार नाही.'
साधनच्या अंगावर आईचंच एक विरलेलं लाल उपरणं होतं. साधन आता एखाद्या बिथरलेल्या रेड्यासारखा दिसत होता. शेकोटीतल्या निखाऱ्यांवर एवढ्याशा मातीच्या खपरेलात भटजींनी थोडे तांदुळाचे दाणे शिजवले. ते श्राद्धान्न. भाताचा वास नाकात शिरताच साधनच्या मनात चलबिचल सुरू झाली.
बलराम म्हणाला- 'चल साधन, आचमन करून भटजींना एक लोटांगण ठोकून ऊठ.'
साधन उठला; पण तो खाली पाहात होता. जमिनीवर त्याच्या पंचाच्या बोचक्यात अनादि डॉक्टरनं दिलेले पायलीभर तांदूळ होते. भटजीनं सगळे तांदूळ का शिजवले नाहीत? हे तांदूळ तर मायला दान करायला आणले होते, मग त्यातले थोडेसे दाणेच शिजवण्याचा अर्थ काय? साधनला संशय येऊ लागला. नाकातून खॅक असा आवाज काढला त्यानं.
भटजी बोलला, 'तू लेका माझ्या हातावर अठरा रुपये टिकवून हरिश्चंद्र होऊ पाहात होतास? रामचंद्र होऊ पाहात होतास?'
बलराम हसत होता; पण हसता हसता तो एकदम थांबला. साधन खाली वाकून सगळे तांदूळ पंच्यात बांधून घेत होता.
'अरे, अरे, ते तांदूळ माझ्यासाठी आहेत!' ब्राह्मण किंचाळला.
'चोर साल्या!'
साधननं ब्राह्मणाला शिवी हासडली. याच भटजीनं त्याच्या हातून देवी जटेश्वरीच्या नावे अफाट ऐश्वर्यदान करवलं होतं ना! जटेश्वरी आता वेगानं उडत स्वर्गात जात असेल! ज्या देवाला तिच्या पूर्वजानं बाण मारला होता, त्याच देवाच्या पायाशी! स्वर्गधामी! साधन सगळं कसं विसरून गेला?
'अरे, हे काय करतो रे, साधन?'
'तांदूळ नेतो, भात करून खाईन.'
'अरे, श्राद्धाचे तांदूळ ते, तुला चालणार नाहीत.'
'चूप बस, बलराम!'
मदमत्त हत्तीसारखा ओरडला साधन. म्हणाला- 'घरात एक पैसा नाही तांदूळ आणायला, हे तांदूळ मी सोडणार नाही.'
'अरे मूर्खा, महामूर्खा!'
'तांदूळ माझे आहेत, बलराम! माझ्यामागे लागू नको.'
भटजी आकांडतांडव करत म्हणाले- 'श्राद्धाचे तांदूळ तू रांधून खाणार! मग हे श्राद्ध निष्फळ झालं लेका!'
'असं कसं निष्फळ होईल? मी हत्तीदान नाही केलं? गोदान नाही केलं? सोनं-रुपं-भूमी सगळं दान नाही दिलं? कोण साला माझ्या मायचं श्राद्ध निष्फळ करतो? पाहतोच मी!'
छातीशी तांदळाचं बोचकं धरून साधन डुलतडुलत घराकडे निघाला. तोआता घरी जाईल. शेगडी पेटवून भात रांधेल. भाताचा वासच खूप छान असतो.भाताच्या वासातच साधनला त्याची माय भेटते. साधन जितके दिवस भात करून खाईल, तितके दिवस त्याची सांज-सकाळपुरती आई त्याचीच राहील.
आईची आठवण येताच आपण भटजींशी वाईट वागलो म्हणून साधनला पश्चात्ताप झाला. त्याचे डोळे पाण्यानं डबडबले. म्हणाला- 'माय, तू कसंही करून स्वर्गात चालली जा. तुझा साधन आता भात रांधून खाणार. काही मनावर घेऊ नको, माय-'
- महाश्वेतादेवी,
अनुवाद : वीणा आलासे, कोलकाता
('सांज-सकाळपुरती माय' ही कथा अनुवादित करत असतानाच पश्चिम बंगालमध्ये नंदिग्राम हत्याकांड घडले आहे. कृषी की औद्योगीकरण हा आपल्या सर्वांच्याच दृष्टीने अतिशय महत्त्वाचा व गंभीर मुद्दा आता युद्धक्षेत्रात रूपांतरित होऊन गेला. त्यानंतर हे युद्धक्षेत्र फक्त नंदिग्रामपुरतेच मर्यादित न राहता कलकत्त्यापर्यंत येऊन पोहोचले आणि आता ते दिल्लीकडे कूच करू लागले आहे.
महाश्वेता देवी गेल्या तीन महिन्यांपासून या प्रकरणात पूर्णपणे गुंतून गेलेल्या आहेत. त्यांच्या स्वभावानुसार त्यांनी स्वत:ला झोकून देऊन सक्रिय सहभाग घेतला आहे. रोज बंगाली वृत्तपत्रातून परखड भाषेत स्तंभलेखन सुरू आहे, विविध ठिकाणी सभांनाही उपस्थित राहत आहेत. वयाला ऐक्याएेंशी वर्षे पूर्ण झालेली, व्याधिग्रस्त शरीर या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्या खंबीरपणे कृषक बांधवांच्या पाठीशी उभ्या आहेत. त्यांची सामाजिक बांधिलकी नवीन तेजाने उजळते आहे.अशा वेळी त्यांना भेटीची वेळ मागणे व त्यांच्याशी कथेबद्दल चर्चा करणे शक्य नाही. उचितही नाही, तसा प्रयत्नही मी केला नाही, कारण त्या जे करताहेत ते काम माझ्या कामापेक्षा जास्त मोलाचे आहे...
असो. प्रत्येक कथा एक स्वतंत्र निर्मिती म्हणून वाचकांशी संवाद साधत असतेच. 'सांज-सकाळपुरती माय' हे तर अक्षरश: एक नवं-पुराण आहे, ते कितीतरी अंगांनी संवाद साधत जाईल.
एका पारधी जमातीच्या बाईच्या मृत्यूभोवती गुंफलेली ही कथा श्रुतिकथा-स्मृतिकथा- दंतकथा इत्यादी मौखिक परंपरांचे सूत्र धरून भटक्या जाती-जमातींच्या जीवनसंघर्षाची कहाणी सजीव करून दाखवते.
पारधी समाजातली जटी आणि कलकत्त्याच्या बकाल वस्तीत राहणारी देवी जटेश्वरी ही एकाच नाण्याच्या दोन बाजू दाखवणाऱ्या जटिल वास्तवाचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्तिरेखा. एकीकडून ती स्वत:ला शापित समाजातली म्हणून कमी दर्जाची मानते. जातीचे नियम मोडले म्हणून तिच्या मनात भीती व अपराधीपणाची भावना आहेच. दुसरीकडून स्वत:ला समाजाच्या बुभुक्षित नजरेपासून वाचवण्यासाठी व पोराला निदान एकवेळ पोटभर खाऊ घालण्यासाठी ती समाजात पसरलेला अंधविश्वास वापरते आणि जाणूनबुजून स्वत:भोवती दैवी वलय निर्माण करते.
तिचा मुलगा साधनही एकीकडे आपल्या आईला खरोखरची देवी मानतो; पण तिच्या श्राद्धाच्या वेळी पुरोहिताची लबाडी लक्षात येताच विद्रोह करून सगळे तांदूळ घरी घेऊन येतो.
अंधविश्वास - विद्रोह- वास्तव अशा तिन्ही पातळयांवर सतत हेलकावे घेत ही कथा शेवटी ज्या चिरंतन सत्यापाशी येऊन पोहोचते ते सत्य- भूक.
पोटासाठी दशदिशा, फिरविशी जगदीशा- हेच खरे!)


