Skip to main content

प्रतिसादास उत्तर द्या

जनांची - जणांसठी - रंजना

आज रंजनाकडे जाण्याचा योग आला. नवीन घर घेतलं म्हणून ती कित्ती दिवस बोलवत होती. पण आज गेले ते तिचा जिवलग गेला म्हणून सांत्वन करायला.
रंजना प्रथम माझ्या घराजवळच राहात होती. त्या तीन खोल्यांत दहा बारा मुलांसाठी पाळणाघर चालवत होती. त्यातच तिला बालवाडीची कल्पना सुचली. तिच्या आईने तिला सल्ला दिल्याप्रमाणे दुपारी झोपायचं नाही म्हणून मधल्या वेळेत शिकवण्या सुरू केल्या. तसं पाहाता रंजना फार काही शिकलेली नाही. पण रंजना एक अचाट बाई आहे. संध्याकाळ झाली की सर्व घर स्वच्छ आवरून नवरोबांचं स्वागत करायला मोकळी. छान टापटिपीने साडी नेसून त्याच्या गाडीमागे बसून फिरून येई.
तिचा नवरा आणि ती लहानपणापासून एकत्र खेळलेले. आज पस्तीस वर्षं एकमेकांना ओळखत होते. आणि रंजना आज एकटी झाली. पण ते आपल्या विचाराप्रमाणे.
भेटायला गेले ते चौथ्याच दिवशी दुखवटा असतो तसं ते घर असेल असं वाटलंच होतं. पण रंजनाने आपले टपोरे डोळे मोठे करत आमचं स्वागत केलं, फक्त गळयात चेन होती. कुंकू नेहमीप्रमाणे लाल ठसठशीत, रंजना तिच्या नेहमीच्या आवाजात बोलत होती. घर पंधरा दिवसापूर्वी जसं होतं तसं ठेवायचा प्रयत्न करीत होती.
रंजना वेगळीच, नवऱ्याने व्ही.आर.एस. घेतल्यावर भाजणी व्यवसाय सुरू केला. दररोज सकाळी उठून मुलगा शाळेत गेला की दोघेही भाजणी भाजायला उभे राहात.
त्यातून मसाल्याची ऑर्डर. पुन्हा पेणहून पापड-कुर्डया-शेवया आणून दुकानांना माल पोहोचवणे. मुलगा शाळेतून घरी आल्यावर त्याच्याकडे लक्ष देणे.
एकीकडे नवऱ्याने भिक्षुकी सुरू केली. त्यातही त्यांना उसंत मिळत नव्हती.
रंजना एवढा उद्योग का करत होती? त्याचं कारण तिने सांगितलं. माझ्या या उद्योगामुळे तीन अपंग पोट भरत आहेत आणि सोळा प्रकारच्या कडधान्यांची भाजणी मुलाबाळांच्या तोंडी जात आहे, चार मराठी माणसांना रोजगार मिळत आहे.
गृहिणींना नेहमी प्रश्न पडतो काय करायचं? पण रंजनाने मात्र तिच्या स्वभावामुळे भरपूर प्रगती केली होती.
``थांब, हे पंधरा दिवस जाऊ देत बाळा, मी पुन्हा उभी राहीन. पुन्हा या जागेत माल दिसेल तुला.'' रंजना मोठ्या मुलाला समजावत होती.
रंजनाला पुन्हा आमच्या वडवली भागात यायचं आहे. तसं तिने बोलून दाखवलं.
येणाऱ्या, भेटणाऱ्या प्रत्येक बाईला तिने वेगळा विचार करायला लावला. मला हळूच म्हणाली ``दिवसभर बोलण्यात जातो. रात्र जवळ आली की आतून रडू येतं. तेव्हाच मी रडते. मुलांसमोर रडलं की ती कोलमडून जातात. त्या दिवशी घेतला अनुभव. आज इतक्या वर्षांचा सहवास, तो गेला. पण मी ढासळले तर त्याला काय वाटेल ! त्याच्यासाठी मी जिवंत उत्साहाचा झरा होते. दररोज रात्री आम्ही निवांतपणे मोकळा संवाद करायचो, आता ते नाही गं. पण मुलांकडे कोणी पहायचं?''
सांत्वनासाठी येणाऱ्यांनी जे शब्द आधार म्हणून घ्यायचे तेच शब्द रंजना उच्चारत होती.
रंजना एवढी प्रॅक्टिकल होती. नवरा गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी मुलाला कामावर पाठवलं. धाकट्याला शाळेत.
मी तर मनोमन रंजनाला हात जोडले. मोकळया मनाची रंजना ह्या दु:खाला अशी सामोरी गेली. अजब रसायन तिच्यात आहे. येणाऱ्या स्त्रियांना ती सांगत होती. गप्प बसू नका, घर, मुलं सांभाळून काहीतरी करता येतं.
खरंच कोणीही महिला या कारणास्तव दु:खी असेल तर जरूर तिला भेटावं. जीवनाचं तत्त्वज्ञान चार शब्दात ती मांडते. समस्या सोडवते.
- दीपाली कात्रे, अंबरनाथ

प्रतिसाद

The content of this field is kept private and will not be shown publicly.
Type the characters you see in this picture. (verify using audio)
Type the characters you see in the picture above; if you can't read them, submit the form and a new image will be generated. Not case sensitive.