Skip to main content

प्रतिसादास उत्तर द्या

वाच ग घुमा! वाचू मी कशी?

अक्षरस्पर्श ग्रंथालयाच्या वर्धापनदिना निमित्ताने झालेल्या
कार्यक्रमाचा वृत्तान्त आपल्यासाठी देत आहोत.
अक्षरस्पर्श ग्रंथालयाच्या नवव्या वर्धापनदिनाचा सोहळा दिनांक १२ जानेवारी २००८ रोजी निवारा सभागृहात थाटात साजरा झाला. अध्यक्षा अनुराधा राव यांनी प्रमुख पाहुण्या व श्रोते यांचे स्वागत करून अक्षरस्पर्शच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीबद्दल व पुढील संकल्पांबद्दल माहिती दिली. त्यानंतर ठराविक पद्धतीने अहवाल वाचन करण्याऐवजी ग्रंथालयात काम करणारी सहकारी मंजिरी कोपरकर, वाचकांचे प्रतिनिधी दीपाली आंबेकर, अभय खवासखान व डॉ. विजया देव आणि कार्यकारिणी सदस्य रूपाली शिंदे यांनी अक्षरस्पर्शबद्दलचे त्यांचे अनुभव व अपेक्षा सांगितल्या. अक्षरस्पर्शमध्ये नेहमीच असलेली पुस्तके मिळतात, त्यावर बोलता येते, पुस्तकांच्या देवघेवीखेरीज बरेच काही घडत असते, अक्षरस्पर्शचे वेगळेपण जाणवते असा अनुभव सर्वांनी सांगितला.
त्यानंतर प्रमुख पाहुण्या व प्रसिद्ध लेखिका विद्युल्लेखा अकलूजकर यांची ओळख विद्याताई बाळ यांनी करुन दिली. विद्युल्लेखा अकलूजकर यांचे वास्तव्य गेली अनेक वर्षे क्रॅनडामधे असून, टोरँटोमधे प्रसिद्ध होणाऱ्या `एकता' या मासिकाच्या त्या संपादक आहेत. २००५ मधे झालेल्या जागतिक मराठी परिषदेत परदेशात राहून मराठी लेखन करणारी मराठी लेखिका म्हणून त्यांना सन्मानित केले गेले. विद्याताइंर्च्या हस्ते शाल देऊन विद्युल्लेखा अकलूजकरांचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर प्रसिद्ध पद्मजा फाटक यांचाही विद्युल्लेखा अकलूजकर यांच्या हस्ते शाल देऊन सत्कार करण्यात आला. विद्याताइंर्नी पद्मजाताइंर्ची ओळख करून दिली. `हसरी किडनी', `गर्भश्रीमंतीचे झाड' अशी दर्जेदार पुस्तके लिहिणाऱ्या, बापलेकीसारख्या वेगळया विषयावरच्या पुस्तकाचे संपादन करणाऱ्या पद्मजाताई जीवघेण्या आजारानंतरही किती `मजेत' असतात हे सत्कारानंतर त्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतातून श्रोत्यांच्या लक्षात आले. या छोट्याशा कार्यक्रमामुळे पद्मजाताइंर्ना वाचक आणि वाचकांना पद्मजाताई' भेटल्याचा आनंद लाभला.
त्यानंतर विद्युल्लेखा अकलूजकर यांनी `वाच ग घुमा वाचु मी कशी ?' अर्थात वाचन या विषयावर त्यांचे विचार मांडले. सुखातीलाच `वाच ग घुमा' मधल्या `ग' मुळे पुरूषश्रोते या कार्यक्रमाला यायला बिचकतील का असा विचार मनात आल्यावर मग `वाच रे घुम्या' असं शीर्षक द्यावे असं सांगून त्यांनी सुरवातीलाच अगदी खेळीमेळीचे वातावरण निर्माण केलं. सुमारे पस्तीस चाळीस वर्षे परदेशात वास्तव्य असूनही मराठी भाषेचे जतन त्यांनी कसे केले हे सांगताना, बालपणच्या महर्षि धोंडो कर्वे यांच्या भेटीबद्दलची व त्यांनी दिलेल्या `केल्याने होते आहे रे आधी केलेचि पाहिजे' या संदेशाची आठवण सांगून त्या म्हणाल्या की `केल्याने' या शब्दातून आपण स्वत: प्रेरणा घेतली, आणि मराठी टिकेल कां याची चिंता करण्यापेक्षा त्यासाठी कायकाय करू शकतो हा विचार केला आणि त्याप्रमाणे कृती केली. प्रथम घरात मराठीतूनच बोलण्याचा दंडक ठेवला, त्यामुळे मुलेही मराठी बोलू लागली. वाचनाच्या बाबतीत कुठे, किती, कसें, काय असे प्रश्न उपस्थित करून, श्वासोश्वासाइतके
वाचन गरजेचे आहे असे समजून मिळेल ते पुस्तक, वेळ मिळेल तेव्हा, असेल तिथे वाचण्याचे तत्त्व अंगीकारल्याचे सांगितले. किचनमध्ये, हॉलमधे, वरच्या मजल्यावर, झोपताना उशाशी, अशी वेगवेगळी पुस्तके, त्या त्या ठिकाणी असू तेव्हा वाचायला सपाटा लावला. मात्र `बाबा वाक्यं प्रमाणम्' अशा भाबड्या आंधळेपणाने कुठलेही पुस्तक वाचताना स्वत:ला प्रश्नही विचारावेत असे मतही व्यक्त केले. काय वाचावे असा प्रश्न निर्माण न करता काहीही वाचावे, नवेजुने, संतवाङमय, बखरी इतकेच नव्हे तर कोशसुद्धा वाचावे असे सांगतांना सलमान रश्दी व त्यांची पत्नी यांची एक आठवणही त्यांनी सांगितली. हे दोघेही झोपतांना उशाशी ऑक्सफर्ड व वेब्स्टर असे दोन शब्दकोश ठेवत आणि एखाद्या शब्दाचा अर्थ दोन्ही शब्दकोशात कसा वेगवेगळा आहे यावर चर्चा करत. आणि त्यामुळेच सलमान रश्दींची भाषा फार समृद्ध झाली. त्यामुळे असे कोशवाङमही, भाषा टिकवायला व वाढवायला उपयुक्त ठरते असे त्यांना वाटते.
या खेरीज भारतातून प्रत्येक वेळी तिकडे परत जातांना भरपूर पुस्तके नेली, त्यामुळे मराठी भाषेवरचे आईवडिलांचे प्रेम मुलांना जाणवले व त्यामुळे मुलेही मराठी पुस्तके वाचू लागली. मुलांना कटाक्षाने मराठी नाटके दाखवली, वत्यांचे सौंदर्य उलगडून दाखवले. मासिकातले चांगले लेख वाचून दाखवले. या सगळयामुळे मुलगा मुक्तक याने वृत्तबद्ध कविता केली. `भावबंधन'चे विडंबन करून म्यावबंधन हे नाटक लिहिले आणि पृथ्वीचे प्रेमगीतसारखी कविताही पाठ केली.
भाषा जपणे म्हणजे संस्कृती जपणे असे सांगून त्या म्हणाल्या की खरकटं, पारोसं, नैवैद्य या कल्पना इंग्रजीतून समजावणं शक्यच नाही. त्या जगायलाच हव्यात. मातृभाषा मराठी असूनही फक्त इंग्रजीतूनच शिकणे म्हणजे कर्मदरिद्रीपणा आहे असं सांगून त्या म्हणाल्या की एकमेकांना भेट देतांना साड्या, डेकोरेटिव्ह इ. वस्तू देण्यापेक्षा पुस्तके द्यावीत, मासिकाची किंवा ग्रंथालयाची वर्गणी भरावी. मुलांमधे वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी त्यांना गोष्टी सांगाव्यात. मात्र त्या संस्कार करण्याचा अट्टाहास नसावा. अगदी निखळ हसवणाऱ्या रमणाऱ्या गोष्टी सांगाव्यात.
चांगला वाचक हा चांगला लेखक होऊ शकतो हे सांगून स्वत: अनुवादकरून इतर भाषातील साहित्य मराठीत आणल्याचे त्यांनी सांगितले. वाचनातून संवादाची, लेखनाची प्रेरणा मिळते असे सांगतांना, स्कॉटलंडमधल्या चित्रकार वाचक असलेल्या डोरोथी डेबेटची गोष्ट त्यांनी सांगितली. काही चांगले वाचायला मिळत नाही अशी तक्रार नवऱ्याजवळ केल्यानंतर, `मग तूच का लिहित नाहीस काहीतरी चांगले ?' या नवऱ्याच्या प्रश्नाचे आव्हान स्वीकारून सातशे पानाची ऐतिहासिक कादंबरी डोरोथीने लिहिली. शेक्सपीअरच्या बेकेटवरही कादंबरी लिहिली.
वाचकाला कुठलाही विषय अविषय नसावा, त्याने मिळेल ते वाचत रहावे, साने गुरूजींपासून सावरकरांपर्यंत सगळे वाचावे लहानपणी वाचलेल्या अनेक गोष्टींचा अर्थ मोठेपणी उलगडतो म्हणून कुठलाही विषय वर्ज्य नसावा असे मत व्यक्त करून एकदा मासिकातील समस्यापूर्तिबद्दल सांगितले. एकदा मासिकांचे एक सहसंपादक अरूण जतकर यांनी `इंग्रायणी' अर्थात मराठीचा ऱ्हास असा निराशावादी सूर लावल्यावर त्यांना `इंद्रायणीकाठी' असे खणखणीत उत्तर देऊन, मराठी कधीही नष्ट होणार नाही असा आशावाद व्यक्त केला आणि आपले भाषण संपवले. अतिशय रंगलेल्या या कार्यक्रमाचा तितकाच रंगतदार समारोप आशा साठे यांनी केला.
- रुपाली शिंदे, पुणे

प्रतिसाद

The content of this field is kept private and will not be shown publicly.
Type the characters you see in this picture. (verify using audio)
Type the characters you see in the picture above; if you can't read them, submit the form and a new image will be generated. Not case sensitive.